Wednesday, March 23, 2011

अप्पी आव्वी इ.इ..........

अप्पी आणि आव्वी या दोघी नक्की कधी आल्या आमच्याकडे ते सांगणं कठीण आहे पण बोलका पोपट जेव्हा वटवट कम कटकट ज्यादा करायला लागला तेव्हाच या जुळ्यांनी आमच्या घरात आधी चंचु आणि मग बुधला प्रवेश केला हे नक्की...(आयला काय मोठ्ठ वाक्य झालं दोन दोन आणि, दोन दोन नक्की....नक्की अर्थपूर्ण झालंय नं??निदान निरर्थक तरी नसेल ...पण फ़ारा दिवसांनी बरहा हाती घेतल्यावर मोठ्ठं वाक्य आणि त्याहून मोठ्ठा कंस वाचक सहन करतील...(किंवा ही पोस्ट इथेच सोडतील तरी) हो मान्य आणखी एक कंस?? पण करते, इथंच पूर्ण करते) हां तर कोण त्या अप्पी आणि आव्वी त्यांनी काय इतकं घोडं मारलंय की तडक बरहाला (आणि अर्थात वाचकांना) पिडतेय ही बया असे अनेक प्रश्न इथवर आलेल्या वाचकांना पडले असतीलच तर त्याचीच उकल करण्याचा हा पोस्टप्रपंच...

तर पार्ट वन कोण या भवान्या...आणि त्याही जुळ्या...म्हणजे अगदी जुळ्याच आहेत का ते माहित नाही पण आमच्याकडे मात्र आव्वी आली की अप्पी करावीच लागते आणि अप्पी केली नाही की मग आव्वीला यावं लागतं.....त्यामुळे मला तरी त्या जुळ्याच वाटतात...

म्हणजे झालं असं "मला वलती उचल" इतकं मोठं मराठीत म्हणण्याऐवजी आमच्या पोपटाने सरळ ’अप’ म्हणजेच वरती या शब्दावरुन आम्हाला "अप्पी अप्पी" या शब्दाने लक्ष वेधायला सुरुवात केली...माझ्या पिढीतल्या इतर अनेक एक्साइटेड आई-बाबांप्रमाणे आम्ही पण "अले वा हा तल अप्पी म्हणतो" म्हणून स्वतःच बोबलं कौतुक.....

हो त्याच्याऐवजी आम्हीच बोबडे बोलु कॅटेगरीत असतो नेहमी..कधीकधी वाटतं एकमेकांशीपण बोबलंच बोलु..."काय ले आज ममं घली कलायचं की बाहेलुन आनु?" असो..

तर अशी ही कोडकौतुक करत घरी आलेली अप्पी आणि इथल्या डेकेअर नामक प्रकाराची हवा लागल्यामुळे तिथे काही इवलुसं लागलं की "आय गॉट आव्वी" (आयला उगाच युव्ह गॉट मेल का आठवतंय मला..जाऊदे....लहान मुलांबरोबर राहिलं की आपल्याला पण तो कमी एकाग्रपणा का काय म्हणतात तो गूण लागतोच थोडा त्याचाच प्रभाव आणि काय?)

तर त्या "आय गॉट आव्वी" मधली आव्वी...या दोघींनी कधी गळ्यात गळा घातला आणि मग नंतर आम्हाला गंडा घातला काही कळलंच नाही....

सक्काळी सक्काळीच या जुळ्या अवतरतात..पांघरूणातच त्यांचा संचार सुरु होतो....कितीही वाजता उठलं (किंवा उठवलं) तरी झिंगल्यासारखं गादीवरून आमचे पाय खाली टेकवुच शकत नाही अशा प्रकारे "अप्पी अप्पी" असं आधी मंद्र, मध्य आणि नंतर तार सप्तकात अप्पी ताई आपलं आगमन जाहीर करतात. पैकी तार सप्तक हे रौद्र कम रडकं रुप असल्याने लक्ष द्यावंच लागतं पण समजा नाहीच दिलं तर मात्र लगेच "आव्वी"मॅडम ताबा घेतात..म्हणजे आता सक्काळ सकाळी आणि तेही मऊ मुलायम गादी त्यावर त्याहून मुलायम कम्फ़र्टर (खरं सांगते इथल्या हवामानाप्रमाणे ज्याप्रकारे गादी, कम्फ़र्टर वापरले जातात त्यांचा इफ़ेक्ट असला नामी आहे की भूक कमी लागली तरी आईच्या हातचे दोन घास जास्त खाल्ले जातात तसं झोप कमी असली तरी दोन तास जास्त झोपतील) तर अशा जागी हे कार्टं त्या अप्पी आणि पाठोपाठ आव्वीबाईंना बोलवून खरं तर आम्हाला फ़ुल्ल टू गंडा घालतं पण त्याला शाळेत पाठवायची गरज आम्हालाच असल्याने आम्ही तडक अप्पी करतो आणि कुठे आव्वी, दाखव आम्हाला असे आमचे मूलमंत्र म्हणायला सुरुवात करतो..

एकदा का या जुळ्याचा इफ़ेक्ट होतोय असं दिसलं की कार्टं आम्हाला दिसेल तिथे कोंडीत आपलं अप्पी-आव्वीत पकडतो..काही (या काहीचं उत्तर इज गोइंग टू बी वन मोर पोस्ट पण आय अ‍ॅम नॉट गोना पकाव माय वाचक्स मोर) कारणाने आईचा आवाज चढतो असं दिसलं की रडव्या सुरात अप्पी अप्पी सुरु होतं आणि आपण अर्थातच तरी लक्ष दिलं नाही की आव्वी का बहाना सुरु...माहित असतं तरी दया येते आणि मग काय तोच तो मूलमंत्र...कुते आव्वी..कधी कधी जास्त डोक्यात गेलं की आव्वीवरचे उपाय अर्थातच थोडे कडवे म्हणजे उंच खुर्चीवर बसवणं किंवा त्यावेळी सुचेल ती धमकी असेही असतात..पण या जुळ्या काही आपली जागा सोडायला तयार नाहीएत..

नेहमीच अप्पी प्रथम येते असं नाही...खूप लागणारं नसेल पण उगाच थोडा धक्का लागलाय पण आमचं नसलेलं लक्ष वेधायचं असेल तर मग आव्वी आव्वी म्हणून चित्कारायचं आणि आपण काणाडोळा करत नुस्ती नजर फ़िरवली तरी लगेच "अप्पी अप्पी... मला अप्पी दे"...हे अप्पी दे म्हणजे एखादी वस्तू दिल्यासारखं केलं जातं...खरं तर ते ध्यान बघताना जबरा हसायला येत असतं पण तो खोट्या आव्वीचा खरा सिरियसपणा तोंडावर आणून कधी मी ती अप्पी देते हे माझं मलाच (आणि अर्थातच बाबाची टर्न असेल तर त्याचं त्यालाच) कळत नाही...

अशा या जुळ्या अप्पी आणि आव्वी..कोंबडी आधी का अंडा सारखं अप्पी आधी की आव्वी ते त्याच्या करवित्यालाही माहित नाही..पण येतात जोडीने आणि गमती-जमती करुन जातात...

अगदी आत्ता ही पोस्ट लिहिताना पण खरं तर बरंच काही सुचलं होतं पण बाबाचं एका यंत्राबरोबर काही सुरु होतं तिथे आपल्याला प्रवेश नाकारला जातोय हे लक्षात येताच चिरंजीवांनी माझ्या दिशेने आव्वीचा बोर्ड फ़डकावला आणि माझ्या लेखनचिंतनात (की विवंचनेत?) असल्याने नेम बरोबर लागला...मला एक मिन्टं आपण खर्‍या आव्वीशीच डील करतोय असं वाटलं आणि मग गळ्यात हात घालुन मांडीवर बसल्यावर ही लबाडी अप्पीसाठी होती हे मला कळलं..पण आता रडं थांबवायला आणि तेही अप्पी-आव्वीवालं रडं थांबायला कुठलंही डायव्हर्जन थिअरम चालतं हे लक्षात आलं माझ्या..मी पण कुथे आव्वी च्या उत्तरादाखल कुठेही नेलेलं बोट चक्क सायकलला?? सायकलला आव्वी होते का? मग आपण तिला हॉप्पिटलमध्ये नेऊ हं...असं कैच्याकै बडबडून डायव्हर्जन थियरमचं रुपांतर कंफ़्युजन थिअरममध्ये केलं आणि या जुळ्यांना त्याच्या डोक्यातुन (तात्पुरतं का होईना) ढकलून दिलं...

आणि हा अप्पी आव्वी ब्रेक घेतल्यामुळे आणखी काय सांगायचं होतं ते आठवत बसले तर ही पोस्टही कायमची ड्राफ़्टात जाईल..

म्हणून इति अप्पी-आव्वी पुराणं संपुर्णम....

Wednesday, March 9, 2011

तीन महिने

कसं करतेस गं एकटीने?? सध्या मला विचारला जाणारा नेहमीचा प्रश्न....खरं सांगायचं तर पाण्यात पडलं की पोहावंच लागतं नाही का? अगदी तसच..

पहिले तीन महिने नियमाने बाळाने निदान बावीस तास झोपायचं असतं.. बाहेरच्या थंडीत हिटरने उबदार केलेल्या घरात अंमळ जास्त झोपणार बाळ ही जमेची मुख्य बाजू आणि अंगात कामानिमित्ताने जरा जास्तच मुरलेलं multitasking ही दुसरी...तसा हा प्रगत देश त्यामुळे काही गोष्टी यंत्राने होणार असतात. त्यांचा पुरेपूर फायदा घ्यायचा असतो अशा वेळी..तोच घेतोय...
एक स्वयंचलित पाळणा... "नाच बसंती" म्हटल्याप्रमाणे तो झोके घालतोय, साथीला पद्मजा ताईंचा सुमधुर आवाज "रंग बावरा श्रावण गातोय"... मग एका बाजूने घडाळ्यावर लक्ष ठेवून जमेल तशी खायची तयारी करायची, अधेमध्ये डायपर बदलणे, पिऊ घालणे अशी कामंही सुरु ठेवायची आणि दुसरीकडे स्वत:साठी ब्लूरे वर दुसरी एखादी जगजीत नाही तर शान, सोनू, सुरेश, आशा..... मूड असेल तशी प्लेलिस्ट ऐकता ऐकता कामं मात्र सुरु ठेवायची...एखादा दिवस जास्त शांत वेळ असेल तर एखादा पिक्चर पण टाकू शकले मी अशी एकटी....हे आतमध्ये बाळाचं गाणं आणि बाहेर माझं आणि अविरत सुरु असणारी कामंधामं पाहून मला कधी तरी मी inception जगतेय की काय असही वाटायचं...फक्त इथे किक मारायचं कामं बाळराजाचं....

याच पद्धतीने गरज होती म्हणून चक्क पार्ट टाइम कामं पण करू शकले...काही नाही आता फक्त माझी प्ले लिस्ट थोडा वेळ बंद करून शांतपणे VPNला जोडून घेतलं इतकच...या महिन्यात पूर्ण वेळ करतेय...अर्थात बेटर हाफ ने त्यासाठी खास सुट्टी घेतली कारण दिवसातले चार तास काढण त्यामाने सोप्प होत...उद्या बाळ तीन महिन्यांचा होईल आणि अर्थात त्याच्या हालचाली येत्या काही महिन्यात वाढतील पण जिची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो...माझी आई.... पुन्हा आमच्याकडे असेल...

आज सकाळ सकाळी ती अमेरिकेच्या पूर्व किनार्यावर आल्याचा फोन आला आणि गेले कित्येक दिवस जे मनाला सांभाळल होत ते चटकन डोळ्यातून बाहेर आलं..ती आहे हेच पुरेस आहे नाहीतर न बोलता करू शकते म्हणून करण्यासारख्या खूप गोष्टी करतेच आहे... आता काही तासांनी ती इथे पोहोचेल आणि मग मात्र मी पुन्हा तिच्याकडून लाड करून घेताना गेले तीन महिन्याचा दिवसा येणारा एकटेपणा सहजच विसरेन....

आजची पोस्ट अशा सर्व आयांसाठी ज्या लेकीच्या माहेरासाठी कुठलीही अडचण पुढे न करता फक्त मदतीचा हात देतात.....आज पुन्हा म्हणावसं वाटतंय अवे तो मज्जा नी लाईफ ..