Showing posts with label दिवाळी. Show all posts
Showing posts with label दिवाळी. Show all posts

Wednesday, November 11, 2015

शुभ दीपावली २०१५

सकाळी आई उठवायच्या आधी फटाक्यांच्या आवाजांनी जाग येणं आणि त्यात मग आपण आपल्याही एक दोन लवंगी-चक्रीची भर घालून चकली, चिवडा, (बेसन) लाडू खात खात दिवाळी अंक वाचणं. भरपूर दिवस शाळा नसल्याने डोक्याला ताप नाही, ही एक सूक्ष्म आनंदाची भावना घेऊन तुळशीच्या लग्नाची वाट पाहणं. ह्म्म्म मला दिवाळी आवडते, हे एक चित्र. 




आजुबाजुला दिवाळीचं वातावरण नसताना आठवण ठेवून आधीच्या शनि/रविवारी जमेल तेवढा फराळ बनवणं, दिवाळीच्या दिवशी नेमकी मिटिंग लावली बघ बिजनेसने किंवा अर्र यंदा भारतात जाऊन आलो म्हणून सुट्टी नाही घेत येणार असले विचार करत सकाळी लवकर उठून एक दिवा, मुलांना थोडा-फार फराळ आणि नेहमीची लगबग. ऑफिसमध्ये उगीच लक्ष न लागणे, क्वचित डोळे भरून येणे पण तरी विकेंडला अमकी/तमकी पार्टी आहे त्याच्या मेन्युची वगैरे मनात उजळणी करणे, पुन्हा नंतरच्या विकेंडला मराठी मंडळाचा फराळ वगैरे वगैरे कधी कधी आधीच्या दिवाळींपेक्षा जास्त नेवर एंडिंग वाटणारं हेही एक चित्र. पुढे मुलं मोठी झाली की चित्र बदलेल. 



बदलणार नाही ते म्हणजे "ह्म्म्म दिवाळी मला आवडते", ही हे चित्र चितारतानाची भावना. हा सण आपल्या मनात आनंदाची, समाधानाची भावना जागृत करण्यासाठी मदत करतो. थंडीची थोडी मरगळ येणार असते, दिवस लहान होतानाचा अंधार दूर करायची  चेतना देतो. वय, जागा, ज्यांच्याबरोबर आपण साजरं करतोय हे सगळं सगळं बदलत राहणार आहे पण ती भावना आहे तशीच राहील/ राहो हीच प्रार्थना. 
आपल्या ब्लॉगर/फेसबुकवरचे लाइक्स (इकडे २०० आणि तिकडे १०० च्या अतिशय जवळ पोहोचवलं तुम्ही माझिया मनाला), शिवाय अपेक्षेपलीकडे गुगल प्लसवरचं फॉलोइंग, हा लोभ असाच राहुदे आणि ही दीपावली आपलं येणारं वर्ष लक्षवेधी ठरवू दे. अनेक अनेक अनेक शुभेच्छा. शुभ दीपावली. 


Friday, October 24, 2014

दिवे लागले रे

हा उत्सव खरं तर फक्त दिव्यांचा. त्यांनी घराबाहेर लावलेल्या कंदिलात असावं, त्यांनी रांगोळीजवळ मिणमिणत राहून तिची शोभा वाढवावी आणि घरभर तेवत राहावं. फटाके वगैरे प्रभूती नंतर आल्या असाव्यात. त्यांचं माझं, मी मायदेशात असतानाही विशेष सूत जुळलं नव्हतं आणि देशाबाहेरसुद्धा आणले तर फार फार तर फुलबाजीसारखे.
 
या वर्षी देखील बरेच दिवे लावायचं मनात होतं मग बाकी सगळ्या कामाच्या आठवड्यात शुक्रवारी थोडं मनासारखं दिवाळीला घरी आणायचा मुहूर्तही आला.
 
फराळ संपूर्ण सासरहून आला त्यामुळे तिकडे उजेड पाडायला वाव नव्हता पण त्यामुळे थोडं डोकं चालवायला वेळ मिळाला आणि नेहमीच्या रांगोळीला साथ म्हणून घरातला एक भाग थोडी फुलं,रांगोळी, तोरण आणि अर्थातच दिवे लावले आणि घरी आलेल्या पाहुण्यांनीही वातावरणनिर्मितीसाठीची दाद दिली. त्याचेच थोडे फोटो आणि अर्थात दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
 


 
शुभ दीपावली.येणारे वर्ष आपणासाठी लाभदायी ठरो हीच प्रार्थना.
 

Sunday, November 10, 2013

दिवाळी २०१३

एक एक वर्ष येतं जेव्हा प्रत्येक ठिकाणी युद्धभूमीसारखी कामं मागे लागतात. सध्या तरी मी फक्त दिवाळीबद्दल म्हणतेय हो.
या वर्षी माझ्या नव्या घरातली पहिली दिवाळी. खर तर आता पर्यंत निदान सातेक घरं बदलली. मग दिवाळीला ते घर चांगलं कस दिसेल याची तयारी देखील प्रत्येक ठिकाणच्या निदान पहिल्या दिवाळीला तरी  होते. त्यात आमच्या चाळणीत क्रिएटिव्हिटीचे एक दोन खडेही न आल्याने किती काही केलं तरी शेवटी फार उजेड पडणार नाही हे साधारण माहित असतं. यंदा तर आठवडाभर तीन वेळा बिघडलेला कंदील मार्गी लावेस्तो दिवाळीच्या शुक्रवारची मध्यरात्र उलटली. आणि तरी तो संपूर्ण विभाग बेटर हाफच्या ताब्यात आहे.
 
यंदा वर्षभर मित्रमंडळ घरी बोलावता आलं नाही म्हणून दुसरया दिवशी संध्याकाळी डझनभर पोरं, त्यांचे पालक आणि काही नवीन लग्न झालेले असा बराच उरक होता. कामांची यादी वाढत जात होती. तरी या वर्षी दोन्ही घरच्या आई मंडळींनी फराळ वेळेवर पोचावा म्हणून एक आठवडा आधीच पाठवला होता. पण मग त्यातले काही पदार्थ थोडे फार मोडले वगैरे तर ते आपणच खाऊ आणि पाहुण्यासाठी थोडं तरी फराळाचं कराव म्हणून ते मागे होतच.
 
दरवर्षी आणि वर्षातून मध्ये मध्ये मी चिवडा करते त्यामुळे ती कामगिरी आधीच फत्ते करून ठेवली होती. पण यावेळेस सासूबाईंनी येता येता एक मुगडाळीची चकली करायला दाखवून प्रेमाने सोऱ्या दिला होता. त्याच्या आठवण झाली आणि मग चकल्या करायचं ठरवलं.
 
मी आजतागायत माझ्या स्वयंपाकघरातल्या प्रयोगात हा प्रयोग खरं तर विविध कारणांनी टाळत होते पण यंदा माहित नाही का पण मुलांना आवडतात आणि आजीच्या चकल्या प्रवासात तुटल्या म्हटल्यावर माझ्यातली आई जर जास्तच जोरात जागी झाली. आणि मग त्या असंख्य टिपा आठवत चकलीची पहिली batch केली. आपल्या चिमुकल्या दातांनी कुडुम कुडुम करत ती मोडून खाणाऱ्या माझ्या पिलांना खाताना पाहून मग  त्यांच्या घरी येणाऱ्या मित्रमंडळीसाठी पण थोड्या करूया असं माझं मीच ठरवलं. आणि मग त्या मंद आचेवर तळणाऱ्या चकल्यानी माझ्या दोन रात्री चकलीमय झाल्या. अर्थात ही कढई पुढच्या gasवर आली म्हटल्यावर असंख्य काम back burner वर गेली हे वेगळं सांगायला नकोच.
 
असो तर अगदी शेवटच्या घटकेपर्यंत घरच्या दिवाळीवर हात फिरवता फिरवता ब्लॉग बिचारा वाट पाहात राहिला. पण असं म्हटलंय न की देवदिवाळी पर्यंत शुभेच्छा दिल्या तरी चालतात म्हणून मी माझ्या सर्व प्रकट अप्रकट ब्लॉगवाचकांना दिवाळीच्या शुभेच्छा देते.
आणि आमच्या घराचा थोडा फार फराळ ठेवला आहे तुमचा इतक्यात संपला असेलच तेव्हा हा थोडा फराळ गोड मानून घ्याल अशी आशा.
 
ही दिवाळी आपण सर्वाना सुखसमाधानाची जावो आणि हे नवीन वर्ष आपणासाठी चागंल्या गोष्टी घेऊन येवो हीच कामना.

Monday, November 12, 2012

आली दिवाळी....


यंदा नोव्हेंबर लागला, पहिला रविवार आला आणि मायदेशात सगळीकडे चाहुल लागली ती दोन आठवड्यांनी येणार्‍या दिवाळीची. त्याचवेळी म्हणजे याच नोव्हेंबरच्या पहिल्या रविवारी उन्हाळ्यात एक तास पुढे केलेलं घड्याळ एक तास मागे आणलं गेलं.रविवारी तर अगदी एक तास जास्त झोप, हे आणि बरीच कामं एक तास लवकर झाल्याचा दरवर्षीचा अनुभव आला पण खरी कसोटी सोमवार पासून असते. म्हणजे त्या एका तासाने सगळ्यात मोठा फ़रक पडतो तो संध्याकाळच्या वेळेवर. एकतर मी आधीच बरीच कॅनडाच्या जवळ असल्याने तशीही सूर्यकिरणं तिरकी झालेली असतातच त्यात हा एक तास म्हणजे न उगवणारा सूर्य मळभाच्या रुपाने थोडं फ़ार अस्तित्व दाखवायचा प्रयत्न करत असतो तो साडेचार पाचच्या सुमारास आकाशाच्या पटलावरून गायब होतो आणि काम संपवून बाहेर येईस्तो डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही असा मिट्ट काळोख होतो. दिवसाही फ़ार काही प्रेरक वातावरण वगैरे नसतं. पाऊस नसेल त्या दिवशी धुकं आणि मळभ.

या पार्श्वभूमीवर दिवाळीचं माझ्या इथल्या घरात येणं मला सुखदच नाही तर आवश्यकही असतं. घरातली थोडी फ़ार रोषणाई, कंदिल, दिवे आणि यावर्षी घरून आलेला फ़राळ अजून मिळाला नसल्याने वाट पाहून केलेले (आणि थोडेफ़ार फ़सलेले) माझ्याच हातचे फ़राळाचे पदार्थ. आपल्या पद्धतीचे कपडे इकडे मिळत नाहीत म्हणून ती खरेदी नाही आणि खरं तर मुलांना ती वाढतात तसे आणि सिझनच्या हिशेबाने कपडे घेतले गेल्याने आणखी काही नवीन खरेदी अशी नाहीच. जी काही थोडीफ़ार नवी मित्रमैत्रीणी आहेत त्यांना बोलावणं आणि एखाद्या घरचं नंतरच्या शनिवारी होणारं पॉटलक बास हीच काय ती आत्ताची दिवाळी. 

पण तरी याने रोजच्या रुटिन जीवनात जो काही थोडाफ़ार बदल असतो तो या थंडी आणि अंधाराने आलेली मरगळ सारायला मदत करतोच. मला वाटतं माझ्या स्वतःच्या बाबतीत म्हणायचं तर यावर्षी उदास व्हायच्या प्रसंगांचा सल असल्यामुळे असेल बहुतेक, निदान यंदातरी दिवाळीचं माझ्या घरी येणं फ़ारच गरजेचं होऊन बसलंय. म्हणजे जणू काही ती माझी कुणी खूप जुनी, गुणाची मैत्रीणच आहे जिला माझिया मनात काय चाललंय ते कळतंय आणि मग ती मला बदल म्हणून हा प्रकाश घेऊन मनातला अंधार दूर करू पाहतेय. सकारात्मक विचारांची सुरूवात म्हणून दिवाळीची आपली वर्षोनुवर्षे असणारी मैत्री वृद्धिंगत करुया असं मीही मग मलाच सांगते.

आवर्जून लवकर उठून केलेली उटण्याची आंघोळ आणि मग लावलेला दिवा. अगरबत्तीचा प्रसन्न वास वातावरण मंगलमय करतोच करतो. मुलं सारखी "दिवाळी म्हणजे काय?" असं चिवचिवत राहतात. त्यानिमित्ताने केले आणि आले गेलेले फ़ोन, शुभेच्छा, फ़राळ आणि खास जेवण. चार दिवस खरंच हवेसे. त्यानंतर लगेच इथे येणारी थँक्सगिव्हिंगची सुट्टी पण मोहवतेय. आह! काही करू नये फ़क्त आपल्या कुटुंबीयांना वेळ देता यावा आणि थोडा विरंगुळा, बास! बाहेर कधी अंधार पडलाय त्याची निदान यादिवसांत तरी खंत नसावी. आणि हे लिहिता दोन्ही देशातले मोठे सण अंधाराच्या पार्श्वभूमीवरच येतात याचं प्रत्येक वर्षी वाटलेलं विशेष. 

माझ्या आठवणीतल्या दिवाळी जिथे साजरी करायचे त्या घरातल्या माझ्या अतिशय प्रिय मैत्रीणीने काढलेला एका फ़ोटो शुभेच्छांसाठी, माझिया मनाच्या वाचकांसाठी खास. काय म्हणता दिसत नाही?  अरे हो सांगायचं राहिलंच की माझ्या पिकासामधली जागा भरायला काहीच अंश शिल्लक असल्याने निदान फ़ोटोसाठी एक जागा शोधत होते. भाडं कमी, डिपॉझिट नको वगैरे अशी म्हणजे आखुडशिंगी, बहुगूणी वगैरा वगैरा तर एकदम लक्षात आलं आपलं फ़ेसबुक आहे की. तर काही दिवसांपूर्वी माझिया मनाचं फ़ेसबुक पेज निर्माण केलंय.ज्या ब्लॉगवाचक मित्र-मैत्रीणींचे कॉंटॅंक्स आहेत त्यांना आग्रहाचं निमंत्रण पाठवलंय ते स्विकारायचं राहिलं असेल तर या ब्लॉगसाठीची तीच दिवाळी गिफ़्ट समजावी आणि ज्यांना ते पाठवायचं राहिलंय त्यांनी अर्थातच संपर्क साधावा हेच आग्रहाचं निमंत्रण. मग तिथले अपडेट्स तुम्हाला आपोआप व्हाया सर्वांचं (सध्याचं) लाडकं फ़ेबु दिसत राहतील. या पेजच्या वापर वगैरे कसा करायचा ते शिकणंच सुरु आहे त्यामुळे तूर्तास एवढंच. इकडे ब्लॉगच्या उजव्या बाजुलाही त्या पेजची फ़्रेम दिली आहे ते खरं तर फ़ोटोवालं विजेट मला लावायचं होतं पण अभ्यास कमी पडला. त्यावर पुन्हा केव्हातरी...

सध्या मात्र दिवाळीच्या रोषणाई आणि फ़राळाचा आनंद लुटूया. तुम्हा सर्वांना ही दिवाळी सूख-समाधानाची, आनंदाची आणि येणारं वर्ष आरोग्यमयी जावो हीच इच्छा.

Thursday, October 27, 2011

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा


गेले काही दिवस स्वत:ला सांगतेय कर ग बाई काही तरी सोय कर यावेळच्या पोस्टची...थोडी वेगळी...पण उहुं...काही डोकच चालत नाही....शुभेच्छा तर द्यायच्या आहेत...यावेळी खरं   तर दसरा झाल्या झाल्याच सासरहून निघालेला फराळ वेळेत आलाय (अर्ध्याहून अधिक संपलाय) ...सगळं आहे फक्त चिवडा मी करणार आहे..म्हणजे केला आहे...कधी नव्हे ते नवरा घरी कंदील करायचं म्हणतोय...पण तोही आज उद्या करून अगदी पाहिलं अभ्यंगस्नान झाल्या झाल्या संध्याकाळ पर्यंत कंदील लटकलाही... बाहेर एक छापील रांगोळी पण काढली...काल खूप पणत्या लावल्या आणि मग एकदाचं डोकं चाललं...
दिवाळीसाठी काय वेगळं पाहिजे अजून...दिवाळीची तयारी, फराळ, आणि यावर्षी वेगळं म्हणजे मी काही न लिहिल्यामुळे बहुदा ब्लॉगवर मागच्या दिवाळीची वर आलेली पोस्ट...हाय टाईम मा.म.......:)


ही दीपावली सर्वांना सुख समाधान आणि आनंदाची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...


Tuesday, November 2, 2010

दिन दिन दिवाळी

अरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला) असतो नुसता. देवळं वगैरे आहेत पण आमच्या फिलीची मजा नाही. अर्थात इथल्या माउंट हूडची मजा काही और आहे हे मात्र खरं. लॉंग ड्राईव्हवर जाताना उजवीकडे हा असा माउंट हूड आणि रेडिओवर 'रिमझिम गिरे सावन'.. वा क्या बात है. सोबत कांद्याची भजी मिळाली की झालीच मग खरीखुरी दिवाळी. असो.




काय म्हणता वाचल्यासारखं वाटतंय?? हो म्हणजे वटवटराव आपलं तोंड बंद ठेवणार नाहीत हे माहित होतं मला, पण इतकं सांगुन सवरुनही शेवटी फ़राळाचं ताट आणि एक छोटासा संदेश विसरलाच म्हणून मग पुन्हा एकदा स्वतःकडे श्रेय लाटून मीही सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतेच कशी...आणि त्याने म्हटल्याप्रमाणे नमनाचं तेल वाहायला लागायच्या आतच पळते....:)

यावर्षीचा फ़राळ आईने अगदी मला वेळेवर पोहोचेल असा पाठवला. त्यामुळे मी स्वतः काहीही करणार नाहीये हे सु.वा.सांगणे नको...तसंही सासरहूनही फ़राळ निघालाय आणि तोही पोहोचेलच..
 
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

Tuesday, November 3, 2009

दिव्यांची आरास





मोठी माणसं घरात असली की सगळे सण कसे नीट आठवण करुन दिले जातात. आता जी पौर्णिमा गेली ती "त्रिपुरी" यावर्षी आई घरात असल्यामुळे तिने आठवण करुन दिली. मग या दिवशीही एक दिव्यांची माळ घरात लावली. ती लावता लावता मला मागची त्रिपुरी आठवली.
मुंबईत बोरिवली पश्चिमेला मंडपेश्वर भागात ज्या गुंफ़ा आहेत तिथे प्रथमच त्रिपुरी पौर्णिमेला जायचा योग आला आणि प्रत्येक जणांनी केलेली दिव्यांची आरास पाहुन डोळे आणि मन तृप्त झाले. मुंबईजवळच राहुनही कधीच जाणं का झालं नाही माहित नाही आणि आता मायदेश सोडुन काही वर्ष झाल्यानंतर का होईना जाणं झालं हेही नसे थोडके. शक्य असेल तर या दिवशी मुंबईकरांनी (आणि इतरांनीही)  तिथे नक्की जायलाच हवं.
इथे एक छोटी टेकडी आहे, जिच्या आत या गुंफ़ांमधलं महादेवाचं मंदिर आहे. आसपास जो काही परिसर आहे तिथे या दिवशीच्या संध्याकाळी तिथे मोठमोठ्या रांगोळ्या काढुन त्याभोवती दिवे, पणत्या, समया ठेवुन दिव्यांची आरास केली जाते. सगळी जणं आपापले दिवे किंवा काही नुसतं तेल घेऊन मग ते सगळीकडे लावतात. कुठला दिवा विझला की तो मागुन येणारा कधी लावतो कळणारही नाही. काळोख व्हायला लागला तसा तो परिसर या लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाला आणि कानावर तिथे लावलेले शांत सुरातले अभंग. दिवाळीचं हे वेगळं रुप प्रत्येक मुंबईकराने डोळ्यात साठवायलाच हवे आणि या गुंफ़ा जतन करण्यासाठीही पाठिंबा. जास्त लिहिण्यापेक्षा फ़ोटो लावते. पुढच्या वर्षी नक्की जाल..






























Wednesday, October 14, 2009

दिपावलीच्या शुभेच्छा..

दिवाळी सण मोठा
नाही आनंदा तोटा

या दिपावलीच्या निमित्ताने इथे आलेल्या प्रत्येक पाहुण्याला दिपावलीच्या अनेक अनेक शुभेच्छा... फ़राळाचं एक अप्रतिम ताट मायाजालावर मिळालंय तेही ठेवलंय. गोड मानुन घ्या आणि असाच लोभ राहु द्या.


आपल्या येण्याने, प्रतिक्रिया देण्याने अजुन काही लिहावंसं वाटतं म्हणून आज जास्त काही लिहित नाही....फ़क्त एकच प्रेमाची विनंती... आवाज आणि प्रदुषण करणारे फ़टाके फ़ोडताना जरा थोडा आपल्या पर्यावरणाचा विचार करा. दिवाळीतल्या रांगोळीतल्या रंगासारखे थोडे रंग काही फ़ुलझाडे अंगणात लावुन साजरे करता आले तर नक्कीच फ़ायदा होईल पर्यावरणाला आणि आपल्या चित्तवृत्तीला प्रसन्न करण्यासाठी...