Wednesday, November 11, 2015

शुभ दीपावली २०१५

सकाळी आई उठवायच्या आधी फटाक्यांच्या आवाजांनी जाग येणं आणि त्यात मग आपण आपल्याही एक दोन लवंगी-चक्रीची भर घालून चकली, चिवडा, (बेसन) लाडू खात खात दिवाळी अंक वाचणं. भरपूर दिवस शाळा नसल्याने डोक्याला ताप नाही, ही एक सूक्ष्म आनंदाची भावना घेऊन तुळशीच्या लग्नाची वाट पाहणं. ह्म्म्म मला दिवाळी आवडते, हे एक चित्र. 
आजुबाजुला दिवाळीचं वातावरण नसताना आठवण ठेवून आधीच्या शनि/रविवारी जमेल तेवढा फराळ बनवणं, दिवाळीच्या दिवशी नेमकी मिटिंग लावली बघ बिजनेसने किंवा अर्र यंदा भारतात जाऊन आलो म्हणून सुट्टी नाही घेत येणार असले विचार करत सकाळी लवकर उठून एक दिवा, मुलांना थोडा-फार फराळ आणि नेहमीची लगबग. ऑफिसमध्ये उगीच लक्ष न लागणे, क्वचित डोळे भरून येणे पण तरी विकेंडला अमकी/तमकी पार्टी आहे त्याच्या मेन्युची वगैरे मनात उजळणी करणे, पुन्हा नंतरच्या विकेंडला मराठी मंडळाचा फराळ वगैरे वगैरे कधी कधी आधीच्या दिवाळींपेक्षा जास्त नेवर एंडिंग वाटणारं हेही एक चित्र. पुढे मुलं मोठी झाली की चित्र बदलेल. बदलणार नाही ते म्हणजे "ह्म्म्म दिवाळी मला आवडते", ही हे चित्र चितारतानाची भावना. हा सण आपल्या मनात आनंदाची, समाधानाची भावना जागृत करण्यासाठी मदत करतो. थंडीची थोडी मरगळ येणार असते, दिवस लहान होतानाचा अंधार दूर करायची  चेतना देतो. वय, जागा, ज्यांच्याबरोबर आपण साजरं करतोय हे सगळं सगळं बदलत राहणार आहे पण ती भावना आहे तशीच राहील/ राहो हीच प्रार्थना. 
आपल्या ब्लॉगर/फेसबुकवरचे लाइक्स (इकडे २०० आणि तिकडे १०० च्या अतिशय जवळ पोहोचवलं तुम्ही माझिया मनाला), शिवाय अपेक्षेपलीकडे गुगल प्लसवरचं फॉलोइंग, हा लोभ असाच राहुदे आणि ही दीपावली आपलं येणारं वर्ष लक्षवेधी ठरवू दे. अनेक अनेक अनेक शुभेच्छा. शुभ दीपावली. 


2 comments:

  1. Replies
    1. आभार पल्लवी. आशा आहे की तुझी दिवाळी आनंदाने साजरी झाली असणार. :)

      Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.