Wednesday, March 8, 2017

ती आणि मी

जसजसं वय वाढतंय तसतसं काम करायची शक्ती वाढावी म्हणून जमेल तसं जिममध्ये जायचा मी प्रयत्न करत असते. जेव्हा सकाळी कामावर लवकर उठून जावं लागे तेव्हा घरची जबाबदारी बाबावर टाकून अगदी सहा वाजतादेखील मी तिथे दाखल झाली आहे. अशावेळी जायचा मुख्य फायदा म्हणजे जवळजवळ कुणीच आलेलं नसतं. आपली गाण्याची प्लेलिस्ट मोठ्याने लावली तरी डोळे मोठे करणारं कुणी नसणार असतं. किंवा शांततेनं दिवसाची सुरुवातही करता येते.

माझ्या वेळेत थोडंफार इथं तिथं होई. पण बरेचदा माझं आटपेस्तो एक तीन चार जणींचा ग्रुप धावून परत लॉकर रूममध्ये मला भेटे. माझी त्यांची ओळख हाय हलोच्या पुढेही गेली. पाश्चात्य देशात लॉकररूममध्ये दिगम्बर अवस्थेत या ग्रुपला पाहताना मला खर तर आता नजर मेल्यामुळे म्हणा किंवा इतका व्यायाम केल्यावर थोडा वेळ असाही काढला म्हणून काय त्यात याची सवय झाली असल्यामुळे म्हणा काही गैर किंवा लाजिरवाणं वगैरे वाटत नाही. उलट आपल्या शरीराला इतकं आपलंसं म्हणून सहज वावरणाऱ्या या बायका मला  योग्य वाटतात.
माझ्याशी त्यांच्यातली एक नेहमी बोले. नेहमीचंच रुटीन बोलणं पण तिने मला तिथे त्या पाचेक मिनिटात एकटं पडू दिलं नाही. आम्ही सर्व त्या क्षणापुरता एकमेकींच्या मैत्रिणी होत असू. या मैत्रीला आणि आम्हाला नावाची गरज नसे.

मागच्या वर्षी मी मध्ये एक वेगळं जिम सुरु केलं होतं. तिथला योगाभ्यास मला आवडत असे फक्त हे जिम थोडं महाग होत आणि नंतर कॉस्ट कटिंगच्या आमच्या दिवसात आम्ही पुन्हा जुन्या जिमवर सेट झालो. तर तिथे एका योग करताना मला "ती" दिसली. साधारण ५५ च्या आसपास वय असेल पण शरीरयष्टी कमनीय आणि योग करतानाचा फिटनेसही अगदी बरोबर. आम्ही हसलो पण तिने नक्की मला ओळखलं का हे मला माहीत नव्हतं. तसंही येत जात कितीतरी अनोळखी व्यक्ती सहजगत्या हाय करून जातात म्हणा.

मग माझं ते जिम सुटलं आणि सकाळी जिमला जायची वेळी मी थोडी उशिरा केली म्हणजे मुलांबरोबर वेळ मिळेल. त्या दिवशी मी थोडी लवकर आणि "ती" थोडी उशिरा असा एक योगायोग आला. मग मी तिला त्या जुन्या जीबद्दल विचारून माझा जुना प्रश्न निकालात काढला. तिने मला तिथेही ओळखलं होत आणि तिनेही काटकसर करायच्या दिवसात ते जिम सोडून दिलं होतं. आज त्यांचा मोठा ग्रुप नव्हता आणि लॉकर रूममध्ये आम्ही दोघीच होतो.

तिला बोलताना दिगंबरावस्थेत जास्त मोकळं वाटत असावं त्यामुळे बोलता बोलता ती माझ्या जवळ आली आणि माझे डोळे एकदम उघडले. तिचे दोन्ही स्तन रोपण केलेले होते. जगाचं आणि बरेचदा स्त्रीचं सुद्धा ज्या अवयवामुळे जास्त लक्ष वेधलं असतं तिला ते नव्हतंच. ते स्वीकारून तिने ज्या उमेदीने बाकीच्या शरीराच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केलं होतं त्याला मी मनातल्या मनात सलाम केला.

याआधी या संपूर्ण गृपबद्दल वाटणारा अभिमान आज काकणभर जास्त वाढला. अशा कितीतरी स्त्रिया ब्रेस्ट कॅन्सरशी सामना करत असतील आणि तरी आपलं रोजचं रुटीन टिकवत असतील. त्यांनी शरीर झाकलं की आपण त्यांना नॉर्मलच समजून त्यांच्याशी वागतो, तुलना करतो. कधीतरी आपण कपड्याआतली त्यांची वेदना पहिली तर त्यांचे हसरे चेहरे आपल्याला बरंच काही शिकवून जातील.


आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त  "ती" आणि अशा अनेक स्त्रियांना माझे कोटी कोटी प्रणाम.