Saturday, August 13, 2016

संधी

मुलं जसजशी शाळेची भाषा शिकायला लागतात तसा त्यांचा मातृभाषेशी संपर्क कमी होतोय असं सध्या जाणवतंय. अर्थात त्यात त्यांचा किंवा आमचा कुणाचाच दोष नाही. त्यांच्या आसपास सध्या घरी सोडून इतरत्र मराठीचं वातावरण नसल्याने यावर फार काही उपाय नाही. घरी फक्त कानीकपाळी "मराठी बोला रे"चा ओरडा करणे हे मात्र आम्ही दोघ मायेने (?) करतो. 

त्यादिवशी घरी खेळायला एक मित्र असताना आमच्या संभाषणात थोडा ओरडा खायची वेळ आली तशी उगाच दया येऊन तेवढा एक भाग मी आरुषबरोबर मराठी मध्ये बोलले. शिवाय त्याच्या मित्रासमोर तो ओरडा खातोय हे मित्राला कळू न द्यायची दखल मी घेतेय हे सांगायला मी काही विसरले नाही. तेव्हा त्याला अर्थातच ते मी काही वेगळं किंवा त्याच्या फायद्याचं करतेय असं काही वाटलं नाही.

हा जो त्याचा मित्र आहे त्याची भारतीय वंशाची आई माझ्याच मुलांसारखी इथे वाढलेली आहे आणि बाबा अमेरिकन. या जोडप्याची आणि पर्यायाने त्यांच्या घरचीच भाषा इंग्रजी. त्याची आई केव्हातरी लहानपणी मातृभाषेत रस न दाखवल्याचं दुःख करते. तिला अर्थातच फक्त इंग्रजीच येते. 

काल अचानक याच मित्राची आठवण घरी कशावरून तरी निघाली आणि एकदम आरुषला हसायला आलं. मी विचारलं तेव्हाचा आमचा छोटा संवाद.
आरुष:   आई मी त्यादिवशी थोरिनच्या घरी गेलो तेव्हा त्याची आई त्याला एकदम जोरदार ओरडली.
मी:         बघ म्हणजे सगळे ओरडतात. (मी आपलं त्यातल्या त्यात स्वतःला जस्टीफाय करायचं सोडलं नाही)
आरुष:   हो सगळे ओरडतात (हेखिक्ककरून आणि दात दाखवून) पण थांब त्यात एक गम्मत झाली.
मी:         काय? (मनातल्या मनात एक धपाटा पण देतात का काय इथले पालक?)
आरुष:   ती ओरडली आणि मला सगळं कळलं कारण ती सगळं इंग्लिशमध्ये बोलत होती.
मी:        ओह
इथे दोघ पण मोठा पॉज.
आरुष:  आई तू तिला तिच्या मुलाला त्यांची भाषा शिकवायला सांगशील का? म्हणजे त्यादिवशी तू तो आपल्याकडे आला तेव्हा त्याला कसं कळलं नाही माझी आई मला ओरडते तसं मला पण कळणार नाही.

अर्थात घरी मराठी बोलायला हवं या माझ्या जुन्या कॅम्पेनला मार्केट करण्याची संधी काही मी सोडली नाही. तूर्तास घरी सगळ्यांनी विशेषतः शेंडेनक्षत्राने देखील आपसात मराठी बोलायचा फतवा आपोआप निघाला आहे. अर्थात लहान मूल आईबाबाने रागवलेलं जसं विसरतं तसं आणखी काही दिवसांनी इथल्या उन्हाळाच्या सुट्ट्या संपतील आणि शाळा सुरु झाली की हा फतवा विसरला जाईल हे भय आहेच. Wednesday, July 20, 2016

गुडबाय मॉसी पॅनकेक

मॉसी पॅनकेक हा माझी दोन्ही मुलं ज्या पाळणाघरात गेली, तिथे मागच्या मोठ्या यार्डात असणारा त्यांचा पेट ससुल्या. या पाळणाघरात महिन्याभराच्या बाळापासून पाच वर्षाच्या आतली येणारी मुलं त्यांचे वाढीचे टप्पे पूर्ण करून प्रिस्कूलमध्ये गेली की मग खऱ्या शाळेत केजीच्या वर्गात जायला तयार होईपर्यंत इकडे असतात. माझ्या धाकट्याचं इथलं हे शेवटचं वर्ष म्हणजे खरं सांगायचं तर ऑगस्टमध्ये आम्ही या सुंदर फॅसिलीटीलाच गुडबाय म्हणणार .मागे जानेवारीमध्ये ज्या फ्रोझन दिवसांचा उल्लेख झाला तेव्हा विंटर ब्रेकसाठी पाळणाघर बंद होतं आणि ती थंडी सहन न झाल्यामुळे मॉसी गेला. 

त्याच्यावर प्रेम करणाऱ्या छोट्या छोट्या मुलांना हे सत्य पचवण्यासाठी आधार देणाऱ्या आमच्या शिक्षकांची ही पोस्ट असं म्हटलं तर जास्त योग्य ठरेल. रोज त्यांच्याकडून येणाऱ्या इमेलमध्ये मी ही इमेल वाचली आणि हेलावून गेले. त्यांची परवानगी घेऊन आणि त्यांनीच दिलेले फोटो वापरून, त्यांनी केलेल्या डॉक्युमेंटेशनचा हा मराठी अनुवाद. यातलं माझा मुलगा ऋषांक हे नाव वगळता नावं आणि काही तपशील वगळला आहे. ही कहाणी शिक्षकांच्या शब्दात. 

८ जाने. २०१६
आमचा शाळेचा लाडका पेट मॉसी पॅनकेक मागच्या आठवड्यातली भयानक थंडी सहन करू शकला नाही. आज आम्ही मुलांना ही बातमी सांगितली आणि त्यांना काय झालं असेल त्याबद्दल चर्चा करायला वेळ दिला. आम्ही हा संवाद वर्गात असुरू केला आणि त्यांना काही सांगितले पण मुख्य करून आम्ही त्यांना काय म्हणायचं आहे ते ऐकलं. हा तो संवाद. 

शिक्षिका -  आम्हाला आज तुमच्याशी मॉसी पॅनकेकबद्दल काहीतरी बोलायचं आहे. 
बबलु -      तो मेला.  
ऋषांक -    तो मेला? 
शिक्षिका-    आपण  बाहेर त्याच्या घरी जाऊ या आणि त्याच्याबद्दल बोलुया. 
इला -        आपण आपली जर्नल्स घेऊन जायला हवं. 
रसेल-        मला वाटतं मॉसी पॅनकेक पिंजरा तोडून फेन्सवरून उडी मारून पळाला. 
चार्ली -       मग आपण त्याला शोधलं पाहिजे. 
शिक्षिका-    मुलानो आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की मॉसी पॅनकेक पळाला नाहीये. मुख्याध्यापिका बाईंनी त्याला पाहिलं आणि तो जिवंत नव्हता. 
इला-         तुला कसं माहित?
शिक्षिका-    तो त्याचे डोळे उघडत नव्हता, तो आता उड्या मारत नव्हता आणि तो काही खात-पीत नव्हता. 
रॉन-         तो खात नव्हता. 
सोनिका-    तो खात आणि पीत नव्हता. 
ऋषांक -   तो पुन्हा जिवंत होऊ शकेल का?
शिक्षिका-  जेव्हा कुणी मरून जातं आणि  खाणं बंद करतं, जेव्हा ते श्वास घेणं बंद करतात आणि हालचाल करत नाहीत, तेव्हा ते परत जिवंत होत नाहीत. 

त्यानंतर मुलांना आम्ही मॉसीचं रिकामी घर पाहायला बाहेर घेऊन गेलो. 

अनु -     तो कुठे गेला? तो हलत का नव्हता? तो मरून गेला होता का?
लॉय  -    जेव्हा तो श्वास घेत नव्हता तेव्हा तो कसा दिसत होता?
चार्ली -    मला मॉसीची काळजी वाटतेय. मला त्याची आठवण येतेय.
इला -     त्याला थंडी आवडत नाही. 
लॉय -    आपल्या बाईं कशा त्याला काढायला गेल्या?
रॉन -     मॉसी कुठे आहे? तो इथे का नाहीये?
ऋषांक -  मला वाटतं मॉसीला बर्फामुळे खूप थंडी वाजली. मला माहीत आहे थंडीमध्ये बर्फामुळे बनीजना खूप थंडी वाजते, ते बाहेर पडू शकत नाहीत आणि म्हणून ते मरून जातात. 
किरण -  मग आपण जसे गरम कपडे घालून बंडल अप करतो तसं ते का करत नाहीत?
एल्विन -  मला वाटतं मॉसी अंगावर बर्फ पडल्यामुळे मरून गेला. 
केंट -    मला वाटतं मॉसीच्या अंगावर तो राक्षस आला जो तुम्हाला श्वास घ्यायला देत नाही आणि तुमचं हृदय बंद पडतं. 
ऋषांक -  मला मॉसी परत जिवंत व्हायला हवा आहे. 

बाहेरून परत आल्यावर मुलांना त्यांच्या जर्नलमध्ये  मॉसीबद्दल काही न काही लिहायचे होते. कुणीतरी मॉसीसाठी चित्ररूपी गुडनाईट गाणं लिहिलं, कुणी तो जिवंत,आजारी आणि मरून गेलेला असा त्याचा जीवनप्रवास रेखाटला तर कुणी त्याला मुलं पाहायला जायची तेव्हा त्यांचा घोळका आणि त्यांच्याबरोबर एखादं मोठं माणूस  चित्र रेखाटलं. याचं एक प्रेझेंटेशन त्यादिवशीच्या इ-मेलने आम्हाला आलं. 


त्यादिवशी ऋषांक घरी आला आणि मी त्याच्याशी मॉसीबद्दल बोलले तेव्हा तो अगदीच भावूक झाला नाही असं नाही, पण त्याने ते स्वीकारलं होतं. मॉसी परत आला तर त्याला नक्की आवडलं असतं पण तो येणार नाही हे त्याला माहीत होतं. त्याने त्याच्या  मॉसीच्या आठवणी त्याला जमतील त्या भाषेत म्हणजे रेखाटनात त्याने व्यक्त केल्या, आपले शिक्षक,मित्र यांच्याबरोबर त्या आठवणी जागवल्या आणि त्यामुळे त्याचं मन मोकळं झालं होतं. 


इथे दिलेलं प्रत्येक चित्र कुठली आठवण सांगतं हे त्याला पक्क आठवतं आणि ते त्याने मला अगदी काल हा ड्राफ्ट पूर्ण करायचा म्हणून ही चित्र पुन्हा पाहताना त्याबद्दल सांगितलं देखील. मी आजवर कुठच्याही कारणाने जसजसे काही संपर्क गमवले त्यावेळी त्याबद्दलच्या जुन्या आठवणींमध्ये मी जास्त गुरफटले किंवा त्यातून बाहेर यायला मला जरा जास्तच वेळ लागला.  मॉसी  पॅनकेकच्या या घटनेकडे त्रयस्थ नजरेने पाहताना इतक्या लहान वयात त्यांच्या छोट्या मित्राला कायमचा निरोप देऊ शकण्याचं या मुलांचं धैर्य बघून त्यांचा एक प्रकारे हेवाच वाटतो.

Friday, May 27, 2016

एकमेका सहाय्य करू

आमची फार्मविलेची पोस्ट लिहिली त्यानंतर पुलाखालून बरचं पाणी वाहिलं. म्हणजे आम्ही वेगवेगळ्या प्रकारे शेती करून पाहिली. प्रगती आहे पण तरी मागची काही वर्षे सीएसए शेयर घ्यावा असा विचार होता त्याला शेवटी यंदा मुहूर्त मिळाला. ज्यांना ठाऊक नाही त्यांच्यासाठी सीएसए म्हणजे community supported agriculture. एखाद्या लोकल शेतकऱ्याला आपल्या वाट्याचे पैसे देऊन त्याच्या शेतीतले पीक विकत घेता येतं. किती मोठे शेत आहे त्याप्रमाणे किती लोक  भाग घेऊ शकतात त्याचाहिशेब असतो. एकदा का शेतकऱ्याला आपलं पीक विकलं जायची पक्की खात्री झाली की त्याचाही शेतावर बारा-चौदा तास राबायचा उत्साह वाढत असेल आणि ताजी भाजी मिळायची खात्री असल्यामुळे ग्राहक पण खूश असा हा मामला. 

मागे एकदा शेजारणीने जवळच्या क्रेस्ट फार्मकडे असा CSA शेयर असतो याची कल्पना दिली होती. त्यांच्या मेलिंग लिस्टवरून त्यांचा शेयर उपलब्ध आहे ही मेल आल्यावर लगेच फोन करून माहिती काढली आणि चेक पोस्टाने पाठवायच्या ऐवजी स्वत:च जायचा  विचार केला. अर्थात या कामालाही आज जाते, उद्या नक्की होत होतं आणि बहुतेक पोस्टानेच चेक पाठवायला लागणार होता. तेवढ्यात परवा थोडा वेळ मिळाला आणि एक चक्कर शेतावर मारली. 

माझं फोनवर बोलणं झालं होतं जॉन बरोबर त्यामुळे तिथे तोच असेल असा मी विचार केला होता. पण खरं तर मला एक घर आणि त्यामागची शेती, तिथला कम्पोस्ट खताचा भाग आला तरी कुणी दिसत नव्हतं. तिथे उजवीकडे काही रोपं दिसत कुंपणापलीकडे एक स्त्री काम करत होती तिला मी हा चेक कोणाला देऊ म्हणून विचारायला गेले आणि माझी ओळख झाली एमी बरोबर. एमी या वर्षी CSA ची ही शेती करणार होती. म्हणजे तिनं ओळख करून दिली त्याप्रमाणे "I am the farmer this year". 

माझ्याकडे वेळ आहे का विचारून तिने मला तिची शेती दाखवायची तयारी दाखवली.मला नाही म्हणावसं वाटलं नाही. शेतावरच्या पहिल्या भाज्या घ्यायला २ जूनला यायचं आहें. आमच्याकडे तसं अजून गरम नाही झालय पण एमीच्या शेतावरच्या ग्रीन हाउस मध्ये गाजर बऱ्यापैकी झाले होते. आणखी काही रोप बऱ्यापैकी मोठी झाली होती. मी सहज विचारल्यावर कळलं की एमी फेब्रुवारीतल्या थंडीपासून या रोपांसाठी करतेय. मग बाहेरची शेती पाहीली. त्यातही कांदे,केल,टोमेटो,बटाटा,मुळा, काकडी, कोबी अशी भरपूर विविधता होती. एक सोरेल नावाची मला माहित नसलेली पालेभाजी दाखवताना ती लावायचं कारण म्हणजे तिची एक ग्राहक रशियन आहे आणि रशियन जेवणात ती भाजी वापरली जाते असं एमी म्हणाली.  कोथिंबीर लावता का हे त्याच विषयावरून विचारून घेतलं तेव्हा माझ्यासाठी नक्की लावेन असंही ती म्हणाली. 

आमचा संवाद  असाच सुरु राहिला असता पण मला निघायचं होतं. ती स्वतः कामात होतीच. जाता जाता शुक्रवारी शेतात स्वयंसेवक म्हणून काम करता येईल ही माहिती पुरवायला ती विसरली नाही. 

ही पोस्ट लिहिताना, ही शेतातलं धान्य खरेदी करून शेतकऱ्याला त्याचा माल विकायची आधी विकायची खात्री द्यायची पद्धत पाहता नकळत माझ्या मनात आपले शेतकरी आलेच. कदाचित प्रत्येक प्रकारच्या शेतीला हा फॉर्मुला लागू होणार नाही पण असा प्रयोग करून पाहायला हरकत नसावी. माझ्यासारख्या लोकांनी तंत्रज्ञ म्हणून ढीग काम केलं तरी आमची पोटं भरायला शेतकऱ्याने शेतात राबलं नाही तर सगळं व्यर्थ आहे, ही जाणीव जेव्हा तीव्र होईल तेव्हा तरी असे "एकमेका सहाय्य करू" सेतू उभे राहावेत. तूर्तास, त्या दिवशी निघता निघता आमच्या शेतकरणीने दिलेला ताजा मुळ्याचा गड्डा आणि थोडी फुलं :)          Friday, April 29, 2016

लास वेगसमधला मराठमोळा टर्बन ठसका

यंदा वर्षाच्या पहिल्या तिमाहीत पायाला भिंगरी लागल्यागत फिरणं सुरु आहे. त्यात कामाच्या निमित्ताने का होईना पण वेगसला जायला मिळालं तर बरंच वाटतं. अंहं!!  ते what happens in Vegas साठी नाही तर आम्हाला त्याच निमित्ताने रोज सूर्यदर्शन होईल हा प्रामाणिक हेतू. तर यावेळी  आमचे एक स्नेही, जे गेली  काही वर्षे वेगसला राहतात त्यांनी आम्हाला एका मराठी उद्योजकाबद्दल  आणि त्यानिमित्ताने "अर्बन टर्बन" बद्दल सांगितलं तेव्हा आम्ही आमच्या चार दिवसाच्या निवासात एक जेवण तरी तिथे घ्यायचं निश्चित केलं.  

लास वेगस  फेम स्ट्रीपच्या मँडेले बे हॉटेलच्या बाजूने खालच्या अंगाला हार्ड रॉक कॅफेच्या बाजूला गेलं की एका छोट्या स्ट्रीपमॉल मध्ये तुम्हाला अर्बन टर्बन हे भारतीय खाद्य पद्धतीचं रेस्टॉरंट दिसेल. जर तुम्ही ऑकलँड (न्युझिलँड) ला राहिला किंवा फिरला असाल तर ही चेन तुम्हाला कदाचीत ठाऊक असेल. ही चेन अमेरिकेत प्रथम वेगसमध्ये आणायचं स्वप्न पाहिलं मराठमोळा भूषण अराळकर त्याची पत्नी जास्मिन यांनी. आम्हाला आमच्या स्नेह्यांनी याचा एक मालक मुंबईचा मराठी माणूस आहे हे सांगितलं त्यामुळे अर्थात जास्त उत्सुकता होती आणि या जागेत शिरताना समोरच मुंबईची रिक्षा पाहिल्यावर आम्ही आमची बच्चे कंपनी देखील खुश झाली. ही भारतातून अमेरिकेत खास इम्पोर्ट केली आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही या रिक्षामध्ये बसून photo काढू शकता.


आतमध्ये काही टिपिकल मराठी फलक आणि चित्र वगैरे आणि अत्यंत अदबशीर नोकरवर्ग  ambience आम्हाला खूप आवडला. आम्ही गेलो तेव्हा भूषण यांचा मुक्काम न्युझिलँडला होता तर जास्मिन नंतर येणार होत्या. पण आम्ही मालकांना भेटायला मागतो आहोत त्यामुळे एक अत्यंत मऊ आवाजात बोलणारे सरदारजी आम्हाला भेटायला आले आणि  नावातल्या टर्बनचा थोडाफार खुलासा झाला. हे यांचे व्यावसायिक भागीदार. मी त्याचं नाव घाईघाईत विचारलं आणि विसरले पण त्यांनी आदरातिथ्यात आम्हाला भूषण किंवा जास्मिनची कमी भासू दिली नाही. 

आम्ही मुंबईची लोकं कुठेही गेलो तरी वडापावची आठवण काढत असतो पण यावेळी मात्र खिमा पावावर मांडवली झाली. बच्चे कंपनीसाठी पाणीपुरी आणि चिकन टिक्का. खिमा पसंतीची पावती समोरून आलीच पण पाव अगदी आपल्याकडे मिळतो तसा आहे हे जास्त महत्वाचं. 

सोबतीला नान आणि चिकन करी मागवल्यावर जेवण उरणार याची खात्री झाली होती पण मधेच आमच्या सरदारजींबरोबरच्या गप्पामध्ये इथे मिळणाऱ्या खास पर्दा बिर्याणीचा उल्लेख ऐकून राहवलं नाही म्हणून मागवलीच. बरं झालं आमचं बोलणं आणि त्यांचा आग्रह हे सगळं जुळून आलं नाहीतर एका वेगळ्या डिशला आम्ही मुकलो असतो. हा तिचा पर्दानशीन फोटो पाहिलात तरही डिश काय चीज आहे हे तुम्हाला नक्कीच कळेल. 


हे सर्व खाऊन पोटं तृप्त होऊन आणि उरलं खाणं दुसऱ्या दिवशीच्या लंचसाठी घेऊन आम्ही परतलो ते आमच्या स्नेह्यांना धन्यवादाची पावती देत. त्यानंतर दोन दिवस सकाळी भरपूर काम आणि संध्याकाळी बच्चेकंपनी बरोबर भटकंती असा भरगच्च कार्यक्रम होता. शेवटच्या दिवशी विमान प्रवासाला काही तास वेळ होता तेव्हा अगदीच राहवलं नाही म्हणून शेवटी One for the road म्हणून  एकदा इथे धावती भेट दिली. आम्हाला घाई आहे हे कळल्यावर फक्त आमची एकच ऑर्डर असल्याप्रमाणे पंधरा मिनिटांत जेवण आमच्यासमोर हजर.

यावेळी शीग कबाब आणि आपली मुंबईची लाडकी फ्रँकी, पुन्हा एकदा चिकन टिक्का आणि बच्चेलोकांसाठी चिकन नगेट्स वगैरे मामला होता.


पैकी फ्रँकी सोडल्यास सगळं खाणं बेस्ट होतं. यावेळीदेखील पोटोबा तुडुंब भरल्यामुळे मुलांना इथले गुलाबजाम खिलवायचे राहिलेच. शिवाय त्यांच्या मेन्यूवर नसलेले चिकन कोल्हापुरी वगैरे पदार्थ ते सांगितलं तर खास बनवून देतात ही माहितीपण थोडी उशीराने हाती आली. त्यामुळे पुन्हा केव्हा जायचं याचे वेध पोटोबांना आधीच लागले आहेत. आपलं काय मत आहे?

Friday, April 8, 2016

एका सुरुवातीची सात वर्षे


दरवर्षीप्रमाणे गुढी पाडवा आला की आता तीच गुढी ब्लॉगवर पण उभारायची हे आठवून हसायलाच येतं. पण यंदा मात्र काही हसू बिसू नाही. काय म्हणता विश्वास नाही बसत? पहा की हा फोटो. दोन वेगवेगळ्या गुढ्या आणि चक्क ताजा कडूनिंब आणि रांगोळीसुद्धा. 


तर मागे वळून पाहतेय आणि जसा आरुष पुढच्या महिन्यात आठ होईल तसा ब्लॉगदेखील सात वर्षांचा होतो हे लक्षात येतंय. मागच्या अनेकानेक पोस्ट मध्ये ब्लॉग लिहायची कारणे अधून मधून येउन गेली आहेत. ती सगळी संग्रहीत केली तर ब्लॉग १०१ वगैरे काही लिहिता येईल पण आणखी एक प्रांजळ कारण या वाढदिवसाच्या निमित्ताने लिहिते. आरुषला घेऊन मी भारतात काही महिने राहिले आणि जवळच्या माणसांची बदललेली रूपं आणि सगळ्यात महत्वाचं त्याचं माझ्याभोवती असलेल्या अपेक्षांचं ओझं पाहून मी गप्प झाले होते. मला व्यक्त व्हायची आणि गप्पा मारायची गरज होती. पण मला त्यावर उपप्रश्न नको होते. त्यावेळी सुरु झालेला हा  माझा स्वतःशी संवाद अजून सुरु आहे याने काही वेळा मला स्वतःलाच विचारात पडायला होतं. आता काही नवीन सुचणार नाही असं वाटत असतानाच काही तरी आपसूक मनाशी येतं आणि मी इथेच व्यक्त होते. 
इथले बरेचसे संवाद मी ज्या व्यक्तींबरोबर केले पाहिजेत, ते मी केले नाहीत आणि त्याची गरजही नाही. पण माझ्या डोक्यातून ते निघून जाणं ही माझी वैयक्तिक गरज हा ब्लॉग पूर्ण करतोय. आशा आहे की हा संवाद मध्ये मध्ये खंड पडला तरी सुरु राहील. 
सर्व ब्लॉगवाचकांचे मनापासून आभार. आणि गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा.   Tuesday, March 8, 2016

My Eagle is taking a flight

ती काही तासांची असताना मी तिला पहिल्यांदी पाहिलं. ती आली, तिने पाहिलं आणि जिंकलं असं तेव्हा मला तरी वाटलं. आमच्या छोट्याश्या कुटुंबातली ती पहिली पुढच्या पिढीची सदस्या, माझ्या ताईची मुलगी, माझी भाची "अदिती". ती झाली तेव्हा माझं इंजिनियरींगचं शेवटचं वर्ष सुरु होण्याआधीची सुट्टी होती. तिला हॉस्पिटलमधून आमच्या घरी सुरुवातीचे महिने ठेवणार याचा कोण आनंद मला होता. माझ्याकडे तिच्यासाठी वेळच वेळ होता. नंतर साधारण चारेक महिन्यांची झाल्यावर ताईला कामावर जावं लागणार होतं. तो पहिला दिवस माझ्या लक्षात आहे. माझा आणि माझ्या बहिणीचा आवाज तसा सारखा आहे. त्यावेळी मी अदिती असलेल्या खोलीत काही बोलत गेले की तिला वाटायचं की तिची आईचं आली. 

मग वेळ आली तिची तिच्या घरी जायची. त्या दिवशी आमचं घर इतकं रिकामी वाटत होतं की मला वाटत होतं लगेच ट्रेन पकडून तिच्याकडे जावं. अर्थात लगेच नाही पण माझ्या कामाची जागा आणि तिचं घर हे मला माझ्या घरापेक्षा कमी अंतर असल्यामुळे मी कामावर जायला सुरु केल्यावर अदितीला जास्तीत जास्त वेळा भेटायला जायची संधी मिळाली. भारतात तेव्हा (किंवा कदाचित आताही) ज्या स्पर्धात्मक युगात आम्ही आयटीवाले काम करायचो, तेव्हा कामावरून निघताना अगदी साडेअकरा पण व्हायचे. मग ती झोपली की मी पोचायचे आणि ती सकाळी उठली की मी तिच्यासाठी सरप्राईज म्हणून हजर असायचे. 

तिला माझ्याबरोबर आणि मला तिच्याबरोबर खूप आवडत असे. माझ्या मित्र-मैत्रिणींमध्ये मी तिचा उल्लेख"माझी मुलगी" म्हणूनच करत असे. तेव्हा तर माझं लग्न पण झालं नव्हतं. माझे तिच्याबरोबरचे अनेक प्रसंग माझ्या लक्षात आहेत. तिच्यापासून गेले कित्येक वर्षे मी हजारो मैल दूर आहे पण माझं चित्त तिच्याहीपाशी आहे. तिचा अभ्यास, आवडीनिवडी, वाचन यात काय नवीन आलं, हे आमच्या स्काईप संवादातून मी माहित करून घेत असते. 

तरी जेव्हा तिने मला पहिलं पत्र ती साधारण सहा वर्षांची असताना पाठवलं होतं तेव्हा मी चकित झाले होते. माझी मुलगी आता लिहिते हे पाहून मला दाटून आलं. ती मराठी माध्यमात शिकत असल्यामुळे आमची पत्रमैत्रीदेखील बहरत होती. सुरुवातीचं चार पाच ओळींचं पत्र आता हळूहळू मोठं होत होतं. काही वर्षांनी त्यात शेवटी नेहमी एक चिंटूचा जोक ती लिहित असे. मी काय लिहित होते ते मात्र मला अजिबात आठवत नाहीये.मला मुलगी नाही याची मध्ये मध्ये खंत वाटली की मी आदितीसोबत संवाद साधते, तिच्याबरोबर शास्त्रीय संगीताची एकच मेहफिल मी ऐकली आहे आणि ती मला नेहमी लक्षात राहील.  

यंदा ती बारावीत आहे, परीक्षा सुरु आहेत आणि काही दिवसांपूर्वी  तिचं पत्र आलं. आता कॉलेजमध्ये गेल्यामुळे मराठीमध्ये लिहिणं सुटलंय अस म्हणणारी माझी छोटी भाची मला तिच्या आताही एकसारख्या असणाऱ्या सुवाच्च अक्षरातून मला फोन किंवा स्काइपवर सांगू न शकणारी तिच्या करियरसंबंधी काही सांगु पाहत होती. तिच्याकडून सर्वांच्या असणाऱ्या अपेक्षा, तिला काय करायचं आहे आणि हे तिने तिच्या आईबाबांना कसं समजावून सांगितलं आहे हे वाचताना माझे डोळे पुन्हा एकदा भरून आले. 

हे पत्र तिने लिहायचं मुख्य कारण आम्हा दोघीमधला असलेला विश्वास आणि तिच्या निकालानंतर मला धक्का वगैरे बसू नये म्हणून तिने घेतलेली खबरदारी हे सगळं वाचून मी तरी इतकचं म्हणू शकते "My Eagle is taking a flight". 

आजच्या महिलादिनानिम्मित माझ्या भाचीसारख्या अनेक मुली त्यांच्या भविष्याची तयारी करत असताना दाखवत असलेल्या जिद्दीला सलाम म्हणून. महिलादिनाच्या शुभेच्छा.

आम्हा दोघींमधला पत्रसंवाद मी सगळ्यांना दाखवेनच असं नाही पण मागे तिला एक कार्ड पाठवलं होतं, ते इथे   आहे.  
 

Monday, February 22, 2016

गाणी आणि आठवणी २१ - जो है समाँ कल हो न हो

जे लोकं मला वरवर ओळखतात त्यांनी मला प्रचंड खिदळताना पाहिलं आहे. जी मंडळी मला खूप जास्त चांगली ओळखतात त्यांनी मला अर्थात खिदळताना पाहिलं आहेच पण हसता हसता डोळ्यातलं पाणी पाहणारी ही काही मोजकी मंडळी आहेत.

आता "अरे संसार, अरे संसार" सुरु झाल्यावर त्यातले किती माझे पाण्याने भरलेले डोळे पाहण्यासाठी माझ्या आजुबाजुला असू शकणार आहेत म्हणा? पण बोलायचा उद्देश इतकाच की मला नक्की कशाने हळवं व्हायला हे बरेचदा माझं मलाच माहित नसतं पण शक्यतो हे भरलेले डोळे सगळ्यांना दिसणार नाही याची मी खबरदारी घेते. 

माझे आई-बाबा पहिल्यांदीच अमेरिकेत आले होते आणि आम्ही मे मधल्या मोठ्या विकांताला त्यांच्याबरोबर डीसीचा दौरा आखला होता. आम्ही स्वतः तोवर बरेचदा डिसिला जाऊनही तिथून थोडं पुढे असणारे लुरे केवरंस आणि शेनानडोह पार्क या दोन जागी गेलो नव्हतो आणि सगळ्यात मोठ्ठं म्हणजे माझ्यासाठी आणि अर्थात आई-बाबांसाठीदेखील महत्त्वाचं म्हणजे त्या वर्षी डीसीजवळच्या एका युनिवर्सीटीमध्ये आशा भोसले,सोनू निगम, कैलाश खेर यांचा गाण्याचा कार्यक्रम होणार होता. त्याची तारीख या लॉंग विकेंडच्या एका दिवशी होती;म्हणजे दुधात साखर.मग काय आम्ही सगळा बेत नित आखला आणि सगळी बुकिंग्ज वगैरे करून टाकली. 
आमची ती सगळी ट्रीप दृष्ट लागण्यासारखी झाली आणि मला वाटतं शेवटून दुसऱ्या रात्री हा वर म्हटलेला गाण्याचा कार्यक्रम होता. आम्ही, म्हणजे मी आणि आई-बाबा, आशा ताईचे जितके चाहते, तितकाच सोनू पण आमचा लाडका. त्याला आम्ही सारेगम सुरु झालं तेव्हापासून फॉलो करतो असं म्हटलं तर वावगं ठरू नये. मी आणि माझी भावंडं सोनुसाठी कुणाची ओळख काढून सारेगमच्या शुटींगच्या ठिकाणी जाऊन पण एक भाग पाहून आलो होतो. आई-बाबा मात्र प्रत्यक्ष पहिल्यांदीच त्याला पाहत होते. 

आशाताईंनी सुरुवातीची काही गाणी घेतल्यावर सोनू आला आणि त्याने प्रेक्षकांना अक्षरश: नाचायला लावले. सुरुवातीच्या तीन रांगामधली लोकं तर तितका वेळ त्या महागड्या तिकिटाच्या खुर्चीत बसली पण नाही असं आम्ही गमतीत म्हणालो पण. 

या ठिकाणी नंतर काही दिवसांनी हिमेश रेशमीया गाणार होता त्याच्या जाहिरातीच्या सीडीमधेच कुणीतरी फुकटात वाटत होतं आणि सोनुने गातागाता ते पाहिलं तर त्याने नावानिशी त्या प्रकाराबद्दल माईकवरून निषेध व्यक्त करून तो प्रकार थांबवला आणि पुन्हा रफीची काही गाणी गायली. 

माझ्या डावीकडे आई, तिच्या डावीकडे बाबा बसले होते आणि माझ्या उजवीकडे माझा नवरा बसला होता. सोनूची गाणी आई-बाबांना भक्तिभावाने ऐकताना केव्हातरी त्याने त्याच्या खास प्रस्थावनेसकट "कल हो न हो सुरु केलं" आणि काय झालं माझं मला कळलच नाही. माझे डोळे घळघळा वाहू लागले. 

नशीब की आई-बाबा डावीकडे म्हणजे मंचाच्या दिशेने तोंड करून होते पण उजवीकडे बसलेल्या माझ्या नवऱ्याने माझ्या डोळ्यातलं पाणी पाहिलं आणि मला ढोसलं. मी त्याला तोंडाने "शुश" म्हटलं. बिचारा आधी घाबरला असणार आणि तो आईला सांगेल म्हणून मी त्याला शुश करतेय. मला माहित होतं माझं मन अभद्र विचार करत होतं आणि त्याचे सूर इतके सच्चे लागले होते की डोळे माझं ऐकणार नव्हते.  
   
हर घड़ी बदल रही है रूप ज़िंदगी
छाँव है कभी, कभी है धूप ज़िंदगी
हर पल यहाँ जी भर जियो
जो है समाँ कल हो न हो
 
आम्हा तिघा भावडांमध्ये आई-बाबांबरोबर सर्वात जास्त वर्षे मी राहिले. माझ्या लग्न व्हायच्या दिडेक वर्षे आधी तर आम्ही तिघंच असायचो. माझ्या आई-बाबांबरोबर मी माझ्या आठवणीतली सगळ्यात लाडकी बंगलोर ट्रीप केली आहे. तिथून आम्ही तिघं उटी-कोडाईलाचारेक दिवस गेलो होतो; ते आमच्या तिघांच्या आयुष्यातले बेस्ट दिवस होते. त्यांनतर आमच्या घरात प्रचंड उलथापालथ झाली आणि सगळ्यात मुख्य मी त्या प्रवाहापासून दूरदेशी ढकलल्यासारखी लांब. 

त्या सगळ्या छान दिवसां नंतर आता  पुन्हा आम्ही एकत्र भटकंतीचा आनंद घेत होतो. मला वाटतं सोनू आम्हाला सांगत होता "जो है समाँ कल हो न हो". माझे डोळे उगीच काही वाहत नव्हते.  मी आवरलं स्वतःला आणि त्या दोघांना अजिबात न कळता उरल्या मेहफिलीचा आनंद लुटला. त्या दिवशी आई-बाबांनी प्रथमच मूर्ती छोटी कीर्ती मोठी अर्थात कैलाश खेरला पाहिलं आणि ऐकलं आणि तेव्हापासून तोही त्याच्या आवडत्या यादीत जाऊन बसला. मला तर तो मी कैलासा ऐकलं तेव्हापासूनच आवडतो. पण तरी जेव्हा त्या ट्रीपची आठवण येते तेव्हा मला स्वतःला सांगावसं वाटतं "जो है  समाँ कल हो न हो". Sunday, January 31, 2016

फ्रोजन

नवीन वर्ष ओरेगावात उजाडलं तेव्हा आम्ही सुशेगात कुणाच्या तरी दर्याकिनाऱ्याच्या (भाड्याच्या) बंगल्यात मित्रमंडळींसोबत थंडीतला सुर्याचा थोडाफार उबारा अनुभवत होतो. तसं पाहिलं तर एकदा का सप्टेंबरचा पहिला आठवडा गेला की जून किंवा जुलैपर्यंत अनऑफिशियली इकडे हिवाळाच आणि तोही संततधार पावसाचा चिल्ड विंटर. पण नेमकं कोस्टल वेदर सनी असण्याचा फायदा आम्हाला घेता आला. दृष्ट लागणारे सुर्यास्त पाहून १ तारखेला रात्री घरी पोहोचलो आणि रविवारी जिमला जायला दरवाजा उघडला तोच बर्फाची चादर. तसंही सुट्टीवरून आल्याआल्या बाहेर जायचा फार उत्साह होताच असंही नाही आणि हे निमित्त मिळालं. 

त्यानंतर सोमवारी शाळा बंद आणि मंगळवारी निसरडे रस्ते म्हणून शाळा उशीराने उघडणे वगैरे प्रकारात २०१६ अगदी वाजत गाजत आलं असं म्हणायला हरकत नाही. मागच्या आठवड्यात आमच्या पूर्वीच्या मुक्कामी "जोनास" येउन गेला त्यापुढे इकडे खरं तर अगदीच फुटकळ बर्फ म्हणायचा पण यावेळी जरा विंटर ब्रेकमुळे मुरलेला निवांतपणा असल्यामुळे असेल थोडा निसर्गाचा आनंद जास्तच लुटला. दोन दिवस आमचाही गाव फ्रोजन होता त्यातली काही क्षणचित्रे. 
 
 

 
या अशा हवामानाला चहाची जोड तर हवीच. याच सुट्टीत आपुलकीने घरी येऊन गेलेल्या मैत्रीची आठवण या कपमध्ये मावेल का बरं :)