दरवर्षीप्रमाणे गुढी पाडवा आला की आता तीच गुढी ब्लॉगवर पण उभारायची हे आठवून हसायलाच येतं. पण यंदा मात्र काही हसू बिसू नाही. काय म्हणता विश्वास नाही बसत? पहा की हा फोटो. दोन वेगवेगळ्या गुढ्या आणि चक्क ताजा कडूनिंब आणि रांगोळीसुद्धा.
तर मागे वळून पाहतेय आणि जसा आरुष पुढच्या महिन्यात आठ होईल तसा ब्लॉगदेखील सात वर्षांचा होतो हे लक्षात येतंय. मागच्या अनेकानेक पोस्ट मध्ये ब्लॉग लिहायची कारणे अधून मधून येउन गेली आहेत. ती सगळी संग्रहीत केली तर ब्लॉग १०१ वगैरे काही लिहिता येईल पण आणखी एक प्रांजळ कारण या वाढदिवसाच्या निमित्ताने लिहिते. आरुषला घेऊन मी भारतात काही महिने राहिले आणि जवळच्या माणसांची बदललेली रूपं आणि सगळ्यात महत्वाचं त्याचं माझ्याभोवती असलेल्या अपेक्षांचं ओझं पाहून मी गप्प झाले होते. मला व्यक्त व्हायची आणि गप्पा मारायची गरज होती. पण मला त्यावर उपप्रश्न नको होते. त्यावेळी सुरु झालेला हा माझा स्वतःशी संवाद अजून सुरु आहे याने काही वेळा मला स्वतःलाच विचारात पडायला होतं. आता काही नवीन सुचणार नाही असं वाटत असतानाच काही तरी आपसूक मनाशी येतं आणि मी इथेच व्यक्त होते.
इथले बरेचसे संवाद मी ज्या व्यक्तींबरोबर केले पाहिजेत, ते मी केले नाहीत आणि त्याची गरजही नाही. पण माझ्या डोक्यातून ते निघून जाणं ही माझी वैयक्तिक गरज हा ब्लॉग पूर्ण करतोय. आशा आहे की हा संवाद मध्ये मध्ये खंड पडला तरी सुरु राहील.
सर्व ब्लॉगवाचकांचे मनापासून आभार. आणि गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा.
Aparna, Mala exactly kaltay tula kay mhanaychay te karan mi pan sadharan ashach anubhavatun geleli aahe...tuzya blog post mala nehami khup real vatatat te kadachit yamulech asel..
ReplyDeleteतसं असेल निशा. माझे अनुभव फार काही जगावेगळे नाहीयेत.
Deleteआवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार :)