Showing posts with label शुभेच्छा. Show all posts
Showing posts with label शुभेच्छा. Show all posts

Friday, October 24, 2014

दिवे लागले रे

हा उत्सव खरं तर फक्त दिव्यांचा. त्यांनी घराबाहेर लावलेल्या कंदिलात असावं, त्यांनी रांगोळीजवळ मिणमिणत राहून तिची शोभा वाढवावी आणि घरभर तेवत राहावं. फटाके वगैरे प्रभूती नंतर आल्या असाव्यात. त्यांचं माझं, मी मायदेशात असतानाही विशेष सूत जुळलं नव्हतं आणि देशाबाहेरसुद्धा आणले तर फार फार तर फुलबाजीसारखे.
 
या वर्षी देखील बरेच दिवे लावायचं मनात होतं मग बाकी सगळ्या कामाच्या आठवड्यात शुक्रवारी थोडं मनासारखं दिवाळीला घरी आणायचा मुहूर्तही आला.
 
फराळ संपूर्ण सासरहून आला त्यामुळे तिकडे उजेड पाडायला वाव नव्हता पण त्यामुळे थोडं डोकं चालवायला वेळ मिळाला आणि नेहमीच्या रांगोळीला साथ म्हणून घरातला एक भाग थोडी फुलं,रांगोळी, तोरण आणि अर्थातच दिवे लावले आणि घरी आलेल्या पाहुण्यांनीही वातावरणनिर्मितीसाठीची दाद दिली. त्याचेच थोडे फोटो आणि अर्थात दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
 


 
शुभ दीपावली.येणारे वर्ष आपणासाठी लाभदायी ठरो हीच प्रार्थना.
 

Tuesday, January 14, 2014

एक छोटं खाद्यवर्तुळ पूर्ण होतंय….

आपले मराठी सण जवळ आले की मला मज्जा वाटते. म्हणजे त्यावेळी ब्लॉगचे स्टॅट पाहिले की कुणीतरी त्या त्या सणाची जूनी पोस्ट वाचून गेलेलं असतं. मी पण ती पोस्ट पुन्हा वाचते आणि शक्य असेल तेव्हा अर्थात यंदाच्या सणाच्या तयारीला लागते. आपल्याकडे सणांना तोटा नाही. आपलं मनोधैर्य का काय म्हणतात ते नेहमी उंच ठेवायचं असेल तर अशा छोट्या मोठ्या सणांना पर्याय नाही. 

मागचे काही वर्षे जेव्हा आम्ही इस्टकोस्टला होतो तेव्हा आसपासची एक दोन मराठी मंडळ आपले सण आवर्जून साजरे करायची परंपरा कायम ठेवत आमचं मनोधैर्य मध्येमध्ये उंच व्हायला बळ देत. नॉर्थवेस्टला आल्यावर मात्र मराठी मंडळ हे प्रकरण फारसं अंगी लागलं नाही. कदाचित अजून मुलं लहान आहेत, तिकडे असलेल्या जुन्या ग्रुप्समध्ये जाउन घुसायचं वगैरे मुदलात अंगात नाही, पुन्हा ते ठिकाणही थोडं लांब वगैरे असण हे सगळं जे काही असेल त्याने आमच्या मुलांना आपले सण कसे समजवायचे असे प्रश्न यायला लागले आणि मग ठरवलं की यंदा आपलं आपण करायचं. जिथे ते इतरांबरोबर वाटता येईल तिकडे तेही करावं आणि नसेल तर निदान आपली चार डोकी तरी खुश झाली पाहिजेत. 

मागच्या वेळी जानेवारीत मुंबईत असल्याने निदान संक्रांत तर व्यवस्थित साजरी झाली. आमच्यात, "सणाला काय?" या प्रश्नाचा स्पष्ट उद्देश, "खायला स्पेशल काय?" असा असल्याने परत येताना चांगल्या डझनभर गूळपोळ्या घेऊन आलो आणि चवीचवीने खाल्ल्या. 

त्यानंतर होळीला आयुष्यात पहिल्यांदाच पुरणाची पोळी बनवली. ती माझ्या अंदाजापेक्षा बरीच पोळीसदृश्य लागलीदेखील. 


श्रीखंड हा एक पदार्थ जास्त गुंतागुंतीचा नसल्याने आणि दही लावायचं काम आउटसोर्स केल्याने पाडव्याची चिंता नव्हती. 

उकडीच्या मोदकाचं आठवणीने आणलेलं आणि घरातल्या घरात हरवू नये (आणि अर्थात खराब होऊ नये) म्हणून फ्रीजमध्ये ठेवलेल्या पीठाने गणेश चतुर्थीला चक्क एकवीस मोदक करता आले आणि ते ज्या वेगाने करू त्याच्या प्रचंड जास्त पटीने संपलेही. 



दिवाळीला सगळा फराळ करणार होते, पण यंदा आमच्या दोघांच्याही घरून बरेच आधी फराळाचे डब्बे आले. त्यात चकलीने थोडा घोटाळा केला होता त्यामुळे नेहमीच्या हुकुमी चिवड्याबरोबर चकली करायचा प्रयोग केला आणि तुफान यशस्वी झाला. आता पुन्हा एकदा आम्ही संक्रांतीच्या उंबरठ्यावर उभे राहिलो. 




करू करू आणि इकडे चिकीचा गूळ मिळत नसल्याने होणार नाही होणार नाही हे माहित असतानाही प्रयत्न म्हणून तिळगूळ बनवून पहिला अगदी समदे नाहीत पण सात आठ लाडू झाले आणि मग चुरा जिंदाबाद म्हणून राहिलो. 

या सगळ्याचा उल्लेख काही वेळा मागच्या वर्षीच्या पोस्ट्समध्ये किंवा ब्लॉगच्या फेसबुक पानावर नुसता फोटो टाकून केला आहे.
माझी स्वतःची स्वयंपाकघरातली एकंदरीत प्रगती, रस इ.इ. पाहता मला स्वतःला हे एक सणांच्या निमित्ताने पूर्ण केलेलं खाद्यवर्तुळ पाहताना समाधान वाटतंय. अजून बरेच खास आपले मराठी पदार्थ आहेत ते कधी जमेल तसं करून पाहिन.घरात खायची आवड सर्वांना असणं हे आमच्या घरात वेगवेगळ्या पाककृती स्वतः करून पाहण्यामागचं मुख्य कारण आहे.नेहमी सगळं मी एकटी करत असते असं नाही. कारण शेवटी आम्ही दोघ या भागातले शिकाऊ उमेदवार आहोत. ज्याला जे जमतं तो ते करून पाहतो. शिवाय एखादा वेगळा पदार्थ करताना काय किंवा नेहमीची न्याहारी बनवताना काय, माझी मुलं आसपास असतात. पैकी आरुष आता जरा "हेल्पर जॉब" करायचा आहे या उत्साहात असतो. म्हणून त्यालाही काहीबाही दिलं जातं. त्याचे हजार प्रश्न, त्या गप्पांतून होणाऱ्या गमती जमती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो पदार्थ सगळ्यात पहिले चाखताना त्याने दिलेली पसंतीची पावती या सगळ्यावर एक वेगळी किंवा प्रत्येक कृतीमागे एक पोस्ट लिहिता येईल. 

महत्वाचं हे आहे की आपल्या आवडीचे खाद्यपदार्थ त्या त्या सणांच्या निमित्ताने आपण स्वतः बनवण्याची प्रोसेस एन्जॉय करणे. आमचं खाद्यवर्तुळ आम्ही हळूहळू पूर्ण करतोय आणि आपण? 

अरे हो मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा. सूर्याचं हे संक्रमण आपण सर्वांना लाभदायी होवो हीच सदिच्छा. 

Wednesday, February 27, 2013

मराठी असे....


मूल झालं की त्याच्या वाढीच्या टप्प्यामध्ये त्याचं बोलणं हा एक मोठाच टप्पा. त्यात आमच्यासारखी दूरदेशी राहणारी मंडळी या टप्प्यात जास्त धास्तावलेली कारण आसपासचं वातावरण वेगळ्या भाषेतलं. मग आपलं मूल कोणती भाषा बोलेल? 

आरुषच्या वेळेस ही चिंता नव्हती, कारण मी त्याच्यासाठी साधारण दोनेक वर्षे पूर्ण वेळ घरी होते. त्यामुळे सुरूवातीच्या काळात त्याच्या कानावर भरपूर मराठी पडेल हे आपसूक झालं. ऋषांकसाठी मात्र ती सुविधा नव्हती. मी तो सहा आठवड्याचा असतानाच कामाला सुरूवात केली आणि त्यातही आई आल्यामुळे निदान मी त्याला घरी ठेवू शकले पण तरी आठेक महिन्याचा असतानाच तो पाळणाघरात जायला लागला. त्यामुळे त्याच्याकडे मराठीपेक्षा इंग्रजीचा शब्दकोष वाढायला लागला. मग ती वर म्हटलेली चिंता सतवायला लागली.

साधारण दोन वर्षाचा तो होणार तेव्हा त्याची हळूहळू बोलायची तयारी होतेय हे कळतानाच आमचा मायदेश दौरा झाला आणि परत आला तो पोपटासारखा मराठी बोलायला लागला. आता फ़क्त एकच करायचं घरात आग्रहाने मराठीच बोलायचं. एकाचं वय वर्षे साडे चार आणि दुसरा दोन असे दोघं अगदी शुद्ध नसलं तरी बर्‍यापैकी मराठीत बोलताहेत हे आजच्या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने विचार करताना बरं वाटतंय.

म्हणजे आधीही एका पोस्टमध्ये म्हटलं तसं ही मुलं इंग्रजी भाषेत शिकतील, त्यांच्या आसपासचे त्यांचे मित्रमैत्रीण शिक्षक सारेच दुसर्‍या भाषेत बोलणारे असले तरी त्यांची मराठी मात्र अशीच कायम राहावी. निदान आई-बाबा, आजी-आजोबां आणि नातेवाईंकाशी तरी त्यांनी मराठी बोलावं इतका आग्रह कायम राहिल. याहून पुढे मराठी साहित्यातही त्यांना रस वाटावा...पण सध्या माझ्या खयाली पुलावापेक्षा कालच दोघांची एक बर्‍यापैकी मराठीत गोष्ट वाचतानाची चित्रफ़ीत केली आहे..पाहुया कशी आलीये ती....

मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा. 








Monday, November 12, 2012

आली दिवाळी....


यंदा नोव्हेंबर लागला, पहिला रविवार आला आणि मायदेशात सगळीकडे चाहुल लागली ती दोन आठवड्यांनी येणार्‍या दिवाळीची. त्याचवेळी म्हणजे याच नोव्हेंबरच्या पहिल्या रविवारी उन्हाळ्यात एक तास पुढे केलेलं घड्याळ एक तास मागे आणलं गेलं.रविवारी तर अगदी एक तास जास्त झोप, हे आणि बरीच कामं एक तास लवकर झाल्याचा दरवर्षीचा अनुभव आला पण खरी कसोटी सोमवार पासून असते. म्हणजे त्या एका तासाने सगळ्यात मोठा फ़रक पडतो तो संध्याकाळच्या वेळेवर. एकतर मी आधीच बरीच कॅनडाच्या जवळ असल्याने तशीही सूर्यकिरणं तिरकी झालेली असतातच त्यात हा एक तास म्हणजे न उगवणारा सूर्य मळभाच्या रुपाने थोडं फ़ार अस्तित्व दाखवायचा प्रयत्न करत असतो तो साडेचार पाचच्या सुमारास आकाशाच्या पटलावरून गायब होतो आणि काम संपवून बाहेर येईस्तो डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही असा मिट्ट काळोख होतो. दिवसाही फ़ार काही प्रेरक वातावरण वगैरे नसतं. पाऊस नसेल त्या दिवशी धुकं आणि मळभ.

या पार्श्वभूमीवर दिवाळीचं माझ्या इथल्या घरात येणं मला सुखदच नाही तर आवश्यकही असतं. घरातली थोडी फ़ार रोषणाई, कंदिल, दिवे आणि यावर्षी घरून आलेला फ़राळ अजून मिळाला नसल्याने वाट पाहून केलेले (आणि थोडेफ़ार फ़सलेले) माझ्याच हातचे फ़राळाचे पदार्थ. आपल्या पद्धतीचे कपडे इकडे मिळत नाहीत म्हणून ती खरेदी नाही आणि खरं तर मुलांना ती वाढतात तसे आणि सिझनच्या हिशेबाने कपडे घेतले गेल्याने आणखी काही नवीन खरेदी अशी नाहीच. जी काही थोडीफ़ार नवी मित्रमैत्रीणी आहेत त्यांना बोलावणं आणि एखाद्या घरचं नंतरच्या शनिवारी होणारं पॉटलक बास हीच काय ती आत्ताची दिवाळी. 

पण तरी याने रोजच्या रुटिन जीवनात जो काही थोडाफ़ार बदल असतो तो या थंडी आणि अंधाराने आलेली मरगळ सारायला मदत करतोच. मला वाटतं माझ्या स्वतःच्या बाबतीत म्हणायचं तर यावर्षी उदास व्हायच्या प्रसंगांचा सल असल्यामुळे असेल बहुतेक, निदान यंदातरी दिवाळीचं माझ्या घरी येणं फ़ारच गरजेचं होऊन बसलंय. म्हणजे जणू काही ती माझी कुणी खूप जुनी, गुणाची मैत्रीणच आहे जिला माझिया मनात काय चाललंय ते कळतंय आणि मग ती मला बदल म्हणून हा प्रकाश घेऊन मनातला अंधार दूर करू पाहतेय. सकारात्मक विचारांची सुरूवात म्हणून दिवाळीची आपली वर्षोनुवर्षे असणारी मैत्री वृद्धिंगत करुया असं मीही मग मलाच सांगते.

आवर्जून लवकर उठून केलेली उटण्याची आंघोळ आणि मग लावलेला दिवा. अगरबत्तीचा प्रसन्न वास वातावरण मंगलमय करतोच करतो. मुलं सारखी "दिवाळी म्हणजे काय?" असं चिवचिवत राहतात. त्यानिमित्ताने केले आणि आले गेलेले फ़ोन, शुभेच्छा, फ़राळ आणि खास जेवण. चार दिवस खरंच हवेसे. त्यानंतर लगेच इथे येणारी थँक्सगिव्हिंगची सुट्टी पण मोहवतेय. आह! काही करू नये फ़क्त आपल्या कुटुंबीयांना वेळ देता यावा आणि थोडा विरंगुळा, बास! बाहेर कधी अंधार पडलाय त्याची निदान यादिवसांत तरी खंत नसावी. आणि हे लिहिता दोन्ही देशातले मोठे सण अंधाराच्या पार्श्वभूमीवरच येतात याचं प्रत्येक वर्षी वाटलेलं विशेष. 

माझ्या आठवणीतल्या दिवाळी जिथे साजरी करायचे त्या घरातल्या माझ्या अतिशय प्रिय मैत्रीणीने काढलेला एका फ़ोटो शुभेच्छांसाठी, माझिया मनाच्या वाचकांसाठी खास. काय म्हणता दिसत नाही?  अरे हो सांगायचं राहिलंच की माझ्या पिकासामधली जागा भरायला काहीच अंश शिल्लक असल्याने निदान फ़ोटोसाठी एक जागा शोधत होते. भाडं कमी, डिपॉझिट नको वगैरे अशी म्हणजे आखुडशिंगी, बहुगूणी वगैरा वगैरा तर एकदम लक्षात आलं आपलं फ़ेसबुक आहे की. तर काही दिवसांपूर्वी माझिया मनाचं फ़ेसबुक पेज निर्माण केलंय.ज्या ब्लॉगवाचक मित्र-मैत्रीणींचे कॉंटॅंक्स आहेत त्यांना आग्रहाचं निमंत्रण पाठवलंय ते स्विकारायचं राहिलं असेल तर या ब्लॉगसाठीची तीच दिवाळी गिफ़्ट समजावी आणि ज्यांना ते पाठवायचं राहिलंय त्यांनी अर्थातच संपर्क साधावा हेच आग्रहाचं निमंत्रण. मग तिथले अपडेट्स तुम्हाला आपोआप व्हाया सर्वांचं (सध्याचं) लाडकं फ़ेबु दिसत राहतील. या पेजच्या वापर वगैरे कसा करायचा ते शिकणंच सुरु आहे त्यामुळे तूर्तास एवढंच. इकडे ब्लॉगच्या उजव्या बाजुलाही त्या पेजची फ़्रेम दिली आहे ते खरं तर फ़ोटोवालं विजेट मला लावायचं होतं पण अभ्यास कमी पडला. त्यावर पुन्हा केव्हातरी...

सध्या मात्र दिवाळीच्या रोषणाई आणि फ़राळाचा आनंद लुटूया. तुम्हा सर्वांना ही दिवाळी सूख-समाधानाची, आनंदाची आणि येणारं वर्ष आरोग्यमयी जावो हीच इच्छा.

Saturday, December 31, 2011

काठावर पास...

हे वर्ष सुरु झालं होत तेच मुळी सुट्टीने....हो म्हणजे कामावर आणि ब्लॉगवर एकदम सुट्टी...पण काम तरी लवकर सुरु करावं लागलं...मग जशी आई आली तस त्या निमित्ताने ब्लॉगची सुट्टी पण थोडी फार संपवली....तरी कुठेतरी सारं काही शांत नव्हतं ....अर्थात ते तसं कधी असतं म्हणा पण तरी संदेश लिहिलं आणि त्यावरच्या प्रतिक्रिया इ.इ. पाहून फार मजा आली (मला वाटत विषय निघाला आहे म्हणून ही पोस्ट मार्केट करायचं श्रेय मी हेरंबला (त्याच्या लाडक्या कंसात) द्यायला हवं) ....त्याच्या बझवरचे लाईक आणि निरोप पाहून ओह आय मिस दिस वगैरे सारखं....

मग लगेच घेतलीच लेखणी आणि मग काही बाही सुचत गेलं....गाण्यांच्या आठवणी होत्याच पण मागचा ब्लॉग मेळावा होता त्यांना शुभेच्छा द्यायलाच हव्या होत्या...आई असल्यामुळे बरेच दिवस राहिलेलं नॉट विदाउट माय डॉटर वाचलं आणि त्याबद्दल लगेच लिहिलं गेलं....या वर्षी आमच्या भागात काही म्हणता उन्हाळा येत नव्हतं त्यामुळे जुलैला तो (एकदाचा) आल्यावर मग थोडं फिरण झालं आणि ब्लॉग पुन्हा राहिला पण मायदेशात त्यातही माझ्या मुंबईमध्ये झालेल्या हल्ल्याचं दर्द बाहेर आलंच...ऑगस्टमध्ये मैत्रीदिनाच्या निमित्ताने काही विचार बाहेर आले पण त्यावर उतारा म्हणून आईचा वाढदिवस साजरा करावा म्हणून मी ट्राय केलेल्या (सध्या ब्लॉगवरून गायब असलेल्या) श्रीतैच्या एका रेसिपीने धमाल उडवली...आणि एक गोष्ट तर मी ब्लॉगवाचकांना सांगितलीच नाही....जुलै संपता संपता बाबापण आले...मग काय फुल टु धमाल...त्यांच्याबरोबर पुन्हा मग भटकंती..मी इथे पाहिलेल्या काही जागा मला गरम हवामान असेपर्यंत दाखवायच्या होत्या त्यातून माझा माउंट हूड आणि इथे इतर बर्फाच्छादित पर्वत इ. बद्दलचा गोल गोल झालेला भूगोल मग ब्लॉगवर आला...बाबा आल्यामुळे जरा जास्त चुटूचुटू बोलायला लागलेल्या आरुषने पण मग त्याची एक जमाडी गम्मत सांगितली....

या वर्षात उदास व्ह्यायचे बरेच प्रसंग आले, जपानसारख्या घटना झाल्या...गझल पोरकी झाली....हे सगळं ब्लॉगवर मुद्दाम नाही लिहिलं ते आपसूक आलं....माझा स्वतःचा एक अगोड प्रवासही ब्लॉगवर मांडला...आणि बघितल तर एक आकडा टुकटुक करतोय "३१".

आता या कॅलेंडर इयरमधला सर्वात शेवटचा महिना सुरु झाला आणि राजेने माझ्या दोन पूर्णवर टाकलेली कमेंट कम आशीर्वाद आठवला....तो म्हणाला होता की या वर्षी शंभर पोस्टा लिही...हम्म...मग असंच सुचलं की शंभर तर अजून कधीच केल्या नाहीत मग निदान काठावर पास होऊया....तसंही मुंबई विद्यापीठाने ४० मोजायची सवय लावली होतीच आणि तीच सवय ब्लॉगवर कामाला आली..शेवटच्या क्षणाला काही तरी करून चाळीस होताहेत कळलं की आमचं हुश्श असायचं तसच ....आणि उगाच कशाला ते विन्जीनियारिंगचे दिवस आठवा म्हणून मी आपलं शाळेत पास-नापास, पास-नापास खेळतात न तसं एकदाचे माझे ३५ झाले म्हणजे "काठावर पास" म्हणून सर्वांना २०१२ साठी सुयश चिंतिते......

फिर मिलेंगे.......

Tuesday, November 2, 2010

दिन दिन दिवाळी

अरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला) असतो नुसता. देवळं वगैरे आहेत पण आमच्या फिलीची मजा नाही. अर्थात इथल्या माउंट हूडची मजा काही और आहे हे मात्र खरं. लॉंग ड्राईव्हवर जाताना उजवीकडे हा असा माउंट हूड आणि रेडिओवर 'रिमझिम गिरे सावन'.. वा क्या बात है. सोबत कांद्याची भजी मिळाली की झालीच मग खरीखुरी दिवाळी. असो.




काय म्हणता वाचल्यासारखं वाटतंय?? हो म्हणजे वटवटराव आपलं तोंड बंद ठेवणार नाहीत हे माहित होतं मला, पण इतकं सांगुन सवरुनही शेवटी फ़राळाचं ताट आणि एक छोटासा संदेश विसरलाच म्हणून मग पुन्हा एकदा स्वतःकडे श्रेय लाटून मीही सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतेच कशी...आणि त्याने म्हटल्याप्रमाणे नमनाचं तेल वाहायला लागायच्या आतच पळते....:)

यावर्षीचा फ़राळ आईने अगदी मला वेळेवर पोहोचेल असा पाठवला. त्यामुळे मी स्वतः काहीही करणार नाहीये हे सु.वा.सांगणे नको...तसंही सासरहूनही फ़राळ निघालाय आणि तोही पोहोचेलच..
 
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

Friday, February 26, 2010

या वेळचा खास मराठी भाषा दिवस..

उद्या २७ फ़ेब्रुवारी, जागतिक मराठी भाषा दिवस. खरं सांगते मला काही हा दिवस प्रत्येक वेळी लक्षात नव्हता आणि आपल्यापैकी बर्‍याच जणांना तो नसेल पण यावेळी दोन कारणांसाठी लक्षात आहे एक म्हणजे मराठी ब्लॉग लिहायला घेतला म्हणून आता मराठीविषयीच्या खास गोष्टींकडे आपसूक जास्त लक्ष ठेवलं जातं आणि दुसरं म्हणजे या मराठी भाषा दिवसाचं औचित्य साधुन सुप्रसिद्ध संगित दिग्दर्शक कौशल इनामदार आपलं मराठी अस्मितेचं गीताच्या ध्वनिमुद्रिकेचं प्रकाशन करणार आहेत यासाठी..

खरं तर म्हणजे बरंच आधी महाराष्ट्र दिनाला हे होणार होतं पण काही कारणाने हा प्रकल्प लांबला गेला. अमेरिकेत राहून याबद्द्ल सर्वप्रथम मला याविषयी कळलं ते कौशलने एका मराठी ऑरकुट कम्युनिटीवर याविषयी लिहिलं तेव्हा..त्यावेळी त्यात कमीत कमी २०$ किंवा ५०० रु. द्यावे असं आवाहन होतं..एक सर्वसामान्य भारतीय माणसाचा कुठल्याही ठिकाणी पैसे मागितले की आता त्याचं पुढे नक्की काय होईल हा प्रश्न माझ्या मनात आला. एकीकडे साईटवरचं त्याचं आवाहन जितकं सच्चं होतं तितकंच आपला पैसा योग्य मार्गी जाईल का हे नक्की करणंही महत्त्वाचं..
ती साईट नीट पाहताना लक्षात आलं त्याने अमेरिकेतला जो संपर्क दिला होता त्या व्यक्तीला म्हणजे सचिन प्रभुदेसाई याला बी.एम.एम. च्या निमित्ताने जरा जवळून ओळखायला लागलो होतो. मग एक दिवस सचिनला समोरुनच विचारलं की काय आहे हे सर्व. सचिन हाही परदेशात राहिला तरी अस्सल मराठीने आणि त्याच्या प्रभावी बोलण्याने आपलंसं करणारं एक व्यक्तिमत्व त्यामुळे त्याने जेव्हा या प्रकल्पाबद्दल आणि मुख्य हे लोकांकडूनच पैसे उभारण्याबद्दलची जी भूमिका मांडली त्याने क्षणाचा विचार न करता मी आपलं खारीचं योगदान या प्रकल्पाला दिलं..त्याने जी मला माहिती दिली त्यावरून हे पैसे निव्वळ स्वतःच्या कॉन्टॅक्ट्सवर जमवायला कौशलला कठिण नाही हे कळत होतं पण अशी वेड लागलेली माणसंच इतिहास घडवतात हेही खरं...
२०$ काय किंवा ५०० रु. काय सर्वसामान्य माणूस आपल्या एकावेळच्या बाहेर चांगल्या ठिकाणी जेवायला यापेक्षा जास्त पैसे उडवतो. एकदा ठरवुन नाही खाल्लं तरी आपण हे डोनेशन करु शकतो या अर्थाची मेलही त्यावेळी मी माझ्या काही संबंधीतांना केली होती..कारण मलाही या भूमिकेमागचा सच्चेपणा पटला होता.
जेव्हा ही सीडी पूर्वनियोजित तारखेला प्रकाशीत होऊ शकली नाही तेव्हा त्याबद्दलची दिलगीरी व्यक्त करणारी इ-मेल स्वतः कौशलनी सर्वांना पाठवली आहे..त्यानंतर जेव्हा सचिनकडे या गाण्याची पहिली अप्रकाशीत कॉपी आली तेव्हा त्याने त्याच्या गाडीत नेऊन आम्हाला ऐकवली. तो दिवसही आठवतो कारणे नेमकी कोजागिरी होती आणि आम्ही एका गेट-टुगेदर साठी भेटलो होतो. ती ऐकवताना खरं सचिनची एक प्रामाणिक भावना होती जी कौशलचीही असणार की तुम्ही जे काही पैशाचं योगदान देताहात त्यावर काम सुरू आहे. अतिशय सुंदर गीत आहे अगदी लिटिल चॅम्प मधल्या मुग्धा पासुन ते आताच्या आणि लिजेंड कॅटेगरीतल्या सर्व गायकांचे आवाज आहेत..फ़ायनल व्हर्जन ऐकायला खूप उत्सुक आहे.
ओरेगावात आल्यावर बदलेल्या पत्यांसंदर्भात जेव्हा कौशल बरोबर इमेल झाली तेव्हा न विचारता त्यांनी आता ही सीडी मराठी भाषा दिवशी म्हणजे २७ फ़ेब्रु. २०१० ला होईल म्हणून (न विचारता) कळवलं तेव्हापासुन मनातल्या मनात देवाला सांगत होते की मराठीसाठी जे काही हा माणूस इतकं खपून करतोय त्याला यश दे. इतके दिवसात आता वृत्तपत्रात वगैरे जेव्हा या सीडीची बातमी वाचते तेव्हा बरं वाटतंय की आता आणखी विलंब न होता ही सीडी उद्या प्रकाशीत होतेय आणि खर्‍या अर्थाने हा मराठी भाषा दिवस खास प्रकारे साजरा होणार आहे...
अनेक शुभेच्छा कौशल इनामदार यांना या प्रकल्पासाठी. सीडीच्या आमच्या कॉपीसाठी वाट पाहु आणि या ब्लॉगच्या सर्व वाचकांनाही मराठी भाषा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

Wednesday, December 30, 2009

२००९ ला निरोप

सध्या ब्लॉग्ज, वृत्तपत्रं, फ़ॉर्वड मेल्स सगळीकडे २००९ ला निरोपाच्या भाषा सुरू आहेत त्यामुळे थोडंसं टॅगच्या पोस्टसारखं ठरवलं आपणही देऊया आपला एक छोटासा निरोप आणि येणार्या वर्षासाठी शुभेच्छा. आपण कितीही घोष केला की हिंदु नववर्ष आता नाही पाडव्याला तरी काय आहे, शेवटी रोज जी तारीख लिहितो तिचं वर्ष बदलायचा दिवस १ जानेवारीलाच येतो. म्हणजे या नववर्षापासून कुणाची सुटका नाही.
तर काय काय घडलं २००९ मध्ये माझ्याकडे? काही नाही एका साध्यासुध्या मराठी घरात घडू शकेल तेच...सगळं घरगुती तरीही खास. सगळ्यात पहिलं मागची थंडी आवरता आवरता हा ब्लॉग चालु केला आणि आठवड्यामाजी काही बाही लिहून चालुही ठेवला. खरं तर विश्वास बसत नाही की चक्क २९ लोकांना या ब्लॉगशी दोस्ती करावीशी वाटली आणि जवळपास दहा हजार भेटी. अधेमधे काही लिहायची प्रेरणा म्हणजे माझे फ़ॉलोअर्स आणि आवर्जुन मिळणार्या प्रतिक्रिया.
त्यानंतर मुख्य म्हणजे मुलाचा पहिला वाढदिवस. कालपरवापर्यंत रांगणार्या आणि महिन्यांमध्ये मोजणी होणार्या बाळाला वाढदिवशी औक्षण करताना आधीचं वर्ष लख्खपणे तरळलं. आईची खूप आठवण झाली त्याच्यासाठी पण आई नाही येऊ शकली तरी भारतातून त्याची आत्या आणि नवर्याची एक मैत्रीण येऊ शकले हा बोनस. आता एका मित्राच्या भाषेत सांगायचं तर terrrible two चालु झालेत.
त्यानंतर बी.एम.एम.ची तयारी. जे काही थोडं-फ़ार करता आलं वॉलेंटियर म्हणून त्यातल्या शेवटच्या टप्प्याचं काम आणि मग मुख्य तीन दिवसांची धमाल. खूप सारे कार्यक्रम, भारतीय जेवण, मैत्रिणींशी गप्पा, थोडंफ़ार गॉसिप आणि बरंच काही पण फ़ुल टू मजा. त्यानंतरही जवळच्या मराठी मंडळात कार्यकारिणीत असल्याने वेगळी धमाल होतीच. सणावारी कार्यक्रम, त्याच्या मिटिंग्ज, थोडंफ़ार वेबचं काम शिकणं असं काही ना काही चालुच होतं.

उन्हाळा म्हटला की काहीतरी हिंडण्या-फ़िरण्याचा कार्यक्रम झालाच पाहिजे तसं ऑगस्टच्या सुरूवातीला लेक जॉर्जला जाऊन आलो. एकदम रिलॅक्सिंग जागा आहे. खरं तर फ़ॉलमध्ये गेलं तर रंगांचा बहर फ़ार छान पाहता येईल. पण उन्हाळ्यात बोटिंग आणि मोठमोठ्या दिवसांची मजा लुटायलाही अगदी योग्य.

त्यानंतर नेहमीचं रूटिन चालु असतानाच एकदम कोस्ट-टु-कोस्ट घरंच बदललं. आई आली आमच्याबरोबर राहायला. आणि नव्या जागी जायच्या आधी घरी आईसोबत मुलाला एकटीने सांभाळायचा वेगळा अनुभव. सॉलिड दमायला व्हायचं आणि कायम डोक्यात काही ना काही काम नाचत असायचं.अगदी गाडीचं सर्विसिंग राहिलंय इथपासुन ते घर दाखवायचं एक ना दोन.. कुणी विश्वास ठेवो न ठेवो पण कुठलंही डाएट न करता त्या तीनेक महिन्यात माझ्या वजनाचा काटा आपसुक खाली आला. असो...
सगळं आवरून कसंबसं कडाक्याची थंडी पडायच्या आत निघालो आणि जवळजवळ दुसर्याच आठवड्यात तिथे जुन्या जागी बर्फ़ पडल्याचं मैत्रीणीने कळवलं. म्हटलं नशीब नाहीतर मुव्हिंगमध्ये हाल झाले असते.
इथे महिनाच होतोय आताशी, नव्या जागी रूळायचं काम पुढच्या वर्षातच होणार आता. पण सध्यातरी सरत्या वर्षाला शांततेत निरोप आणि येणारं वर्ष सर्वांसाठीच आशेचे किरण घेऊन येवो ही अपेक्षा.....