Thursday, September 30, 2010

कामगार जीवनातील एक दिवस

ही दिनचर्या वाचण्यापूर्वी इथे अपेक्षित असलेला कामगार म्हणजे आधुनिक जगतात संगणक नामे यंत्रावर संपूर्णपणे किंवा दिवसाच्या कामाच्या तासातले निदान ८०% तास संगणकावर काम करतो अशी व्याख्या आहे याची कृ नो घ्या.


सकाळी सकाळी शक्यतो कंपनीच्या बसने हा कामगार कामावर आला की आधी वंदू तुज प्रमाणे संगणक सुरु करतो. उगाच चला म्हणून उंदीर मामांनाही हाय करतो आणि आजूबाजूच्या इतर कामगार मित्रांकडे नजर टाकतो...ओझरती नजर आपल्या साहेब या विशेष श्रेणीतल्या कामागाराकडेही गेलेली असते पण तो तसे अजिबात दाखवत नाही. त्या झलक नजरेमधून सर्वप्रथम साहेब आहेत का आणि असल्यास त्यांचा मूड या दोन्हीच्या निरीक्षणामधून आपला उर्वरित दिनक्रम आखायला त्याला मदत होते. आता मायबाप कंपनी सरकारच्या कृपेने त्याचा गणपती बाप्पा सुरु झालं असेल तर तो चेहऱ्यावर कामाने पछाडलेपणाचा एक भाव आणून आपली गरम,जी, थोबाड्पुस्तिका अशी अनेक मेल अकौंट उघडून त्यामध्ये ताझी खबर काय आहे त्यानुसार या..........हु म्हणून कामाला म्हणजेच त्या मेलना उत्तर, त्यातली काही तत्परतेने इतर कामगार आणि मित्रमंडळीच्या अकौंटला पाठवणे अशी अति महत्वाची काम करतो. मधेच त्याला आपल्याला एक आउट लूक किवा लोटस नोट नावाचा अकौंट पण आहे याची आठवण येते आणि तो तेही उघडतो...आदल्या दिवशी काय दिवे लावले आहेत त्यानुसार ही मेल बॉक्स भरलेली किवा ओसंडून वाहणारी अश्या कुठल्यातरी एका प्रकारची असते...
आता इतका पसारा निस्तरायचा म्हणजे पोटात ब्रेकफास्टचे दोन कण गेले पाहिजेत अस अर्थातच त्याच्या पोटातले उंदीरमामा सांगत असतात. त्यांनी नाही सांगितले तर त्याच्या संगणकावर सुरु करताच इतर कामगारजनाशी त्वरित संपर्क साधणारी तीच वेळ, दूत अशी software त्यांच्या खिडक्यामधून तोच संदेश त्याच्यापर्यंत पोहोचवण्याच काम करून दमल्या असतात...

तो हीच वेळ योग्य समजून उठतो तोवर आजूबाजूच्या कामगार खुर्च्याही सरकवण्याचे आणि सारेच कॅन्टीन नामे मुक्कामाच्या ठिकाणी निघाल्याचे सूर आसपास घुमतात आणि पाचेक मिनटात मजल्यावर नीरव शांतता पसरते. कॅन्टीन मधली रांग, काय घ्यायचं किवा नाही याबद्दलची चर्चा, आपल्याला हवं ते टेबल (याची व्याख्या कामगार ग्रुप प्रमाणे निराळी असते...ट्रेनी किवा नवीन लोक शक्यतो सकाळी सकाळी पाहत राहता येईल अशी हिरवळ जिथून दिसेल ती जागा पसंत करतात... काय आहे हिरवळ पाहिलेली डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगली असते असे एकमत आहे) तर सांगायचा मुद्दा म्हणजे सकाळी साडेआठ नावाच्या सुमारास आलेला कामगार वर्ग अश्या प्रकारे साडेदहा वाजेपर्यंत पोटपूजा आणि वर उल्लेखलेली कामे (??) करून पुन्हा एकदा आपल्या खुर्चीवर स्थानापन्न होतो...

जेवणात जस मीठ महत्वाचं तसच रोजच्या कामात एक किवा दोन मिटींगा या हव्यातच...त्यातलीच एखादी असल्यामुळे कामाने त्रस्त बिचारा कामगार मग system वर लॉगिन करून काही पाहण्याचा विचार रद्द करून मिटिंग रूम मध्ये जातो...त्याला बोलायचं नसतच ऐकायच की नाही हेही तोच ठरवतो.. वायरलेस connection असेल तर त्याला ते न ऐकता आपण खूप बीजी असल्याचा आव आणता येतो नसेल तर शून्यात नजर लावून तो एक तास कशी बशी कळ काढतो... ते शून्यात नजर उगाच साहेबाला आपण कामाचा चिंतन करतोय अस भासवायला पण मनात मात्र इतक्यात आवडत्या क्यूबमधून आलेला संदेश नाही तर दुसर्या कंपनी मधल्या "तिने' किवा "त्याने" पाठवलेली मेल नाहीतर मग सकाळी हिरवळीवर दिसलेलं नव पाखरू असे अनेक थोर विचार मनात रुंजी घालत असतात...

हा मिटिंगचा अक्खा एक तास आणि वर आणखी अर्धा तास डोक्यावरून पाणी चाळीसेक मिंट दुसरी फुटकळ काम करणे नाहीतर mom उर्फ मीटिंगची मिंट बनवणे किवा पुन्हा पुन्हा वाचणे या कार्यात काढेपर्यंत जेवणाची वेळ होतेच..पुन्हा मग सकाळी सांगितलेली पिंगपिंगी, रांग (यावेळी जरा मोठी) हिरवळीची जागा हे सोपस्कार होतात आणि मग मात्र हक्काचा लंच टायमाचा तास बडवायला मंडळी जरा चक्कर मारायला बाहेर जातात...कुणी पान सुपारीवाल असेल तर त्याची सोय नाही तर चिंगम चॉकलेटसारख्या कारणाने पुन्हा एकदा इतर कंपनी मधली हिरवळ पाहणेही होते...झालंच तर किती काम आहे (??) या नावावाखाली साहेबाला किवा client ला शिव्या घालण्याचं पवित्र कार्यही याच वेळात होऊन जात.

हे होईस्तो दुपारचा एक वगैरे वाजलेला असतो. मग मात्र आपल्या कामगाराला परिस्थितीची जाणीव होते...बरीच कामाची मेल, इशू लॉग इ गोष्टी वाट पाहत असतात..तो मान खाली घालून मुकाट्याने कामाला सुरुवात (दुपारी बर का??) करतो...त्यातही जर दुपारी मिटिंग असेल तर मग तिथे जाऊन उघड्या डोळ्याने झोप काढणे याखेरीज अन्य काही करणे त्याच्या हातात नसतेच. मिटिंग मधून बाहेर आल्यावर आपल्या कामाच्या software मध्ये आतापर्यंत लॉगिन केले नसल्यास करून पाच सहा खिडक्या उघडून कामाची वातावरण निर्मिती करणे त्याला भाग पडते. अर्थात मध्ये मध्ये होणारी पिंगपिंगी....सवयीचा परिणाम म्हणून पुन्हा पुन्हा आपल्या कामाव्यतिरिक्त मेल पाहणे, बझ करणे, इथली डाक तिथे पाठवणे...भावी किवा सद्य पार्टनर (असला तर) त्यांच्याशी sms , फोन, chat यासाधनांपैकी उतरत्या भाजणीने संपर्कात राहणे हेही कामगाराला करावच लागत...पाळणाघरात मुल बिल असेल तर मग बघायलाच नको आणखी एक संपर्क जागेची वाढ.. असो तर अशी ही काम करून थकलेल्या जीवाला थोडा श्रमपरिहार हा हवाच....शिवाय भारतीय कॅन्टीन असेल तर मग पाहायलाच नको....समोसा, वडे, चहा-कॉफी असे संमिश्र वास सुटलेले असतील तर जागेवर बसण अशक्यच...सगळा ग्रुप तय्यार असेल तर पुन्हा एक कॅन्टीन चक्कर नाहीतर निदान स्वत:च्या जागेवर काहीतरी खायचा मागवून शेजारच्या कुबातल्या मित्र-मैत्रिणीबरोबर आजचा दिवस कसला बोअर आहे किवा तो अमक्या तमक्याचा मेल पाहिलास का? (खुपदा ही चर्चा एखाद्या fwd मेलबद्दल असते हे सांगणे न लगे)

शेवटी एकदाचे चार सवाचार वाजतात आणि निर्ढावलेला कामगार असेल तर तो साडे पाच किवा सहाची पहिली कंपनी बस असते त्याने सटकायच्या दृष्टीने काम आवव्राच्या तयारीला लागतो...जितका अनुभव जास्त तितके हे काम जास्त लवकर आणि डोक्याला फार ताप न देता होते....खुपदा तर बरेचसे काम आदल्या किवा त्याच दिवसाच्या मेलना चतुरपणे उत्तर दिले की होऊन जाते....हुशार लोक यालाच आपल्या डोक्यावरचा काम दुसर्याच्या डोक्यावर घालणे असही म्हणतात पण खर ते तसही नाही त्याला in order to achieve ठिस, why dont we do it ......way असा साज चढवून ते 'वी' म्हणजे 'समोरचा' इतकं केलं तरी गोड बोलून काम होतं....अगदी तसं शक्य नसेल तर to proceed further I need following information from you म्हणून एक जमेल तशी मोठी लिस्ट बनवून समोरच्याच्या गळ्यात मारली की दुसऱ्या दिवसापर्यंत आपण तसेही proceed होणार नसतो मग अर्थात घराकडे proceed व्ह्यायला आपण मोकळे होतो...आणि मुख्य अश्या एक दोन तरी मेल ची कॉपी साहेब नावाच्या प्राण्याच्या पोस्टबॉक्समध्ये पडेल याची खबरदारी घ्यावी. म्हणजे लेकरू किती काम करतय असा वाटून तोही आपल्या बाजूचा...आणखी एक मुद्दा म्हणजे अश्या मेल्स गाशा गुंडाळून झाल्यावरच पाठवाव्या म्हणजे समोरचा गाफील राहून उत्तर देईपर्यंत आपण त्या साडेपाचच्या बसने दोन-तीन सिग्नल्स तरी गाठलेले असतात आणि आणखी एक दिवस सत्कारणी लावून आपण पगाराच्या दिवसाची वाट पाहायला मोकळे झालेलो असतो...अर्थात नेहमीच इतका सरळ धोपट दिनक्रम मिळणार नसतो. कधी तरी तो डेड लाईन नावाचा राक्षस पुढे होऊन उभा ठाकतोच. आणि इतर वेळी 'काय काम करतो की नाही हा' असे वाटणारा आपला कामगार अंगात शंभर हत्तीच बळ आणून नाईट (आणि अर्थातच डे पण) मारून झटपट काम उरकून client च्या गळ्यात मारून टाकतो...हा एक दोन किडे त्यात राहतात पण पुढच्या काम मिळायची हीच बेगमी समजून साहेबही त्याला शक्यतो रागे भरत नाही...

काय आहे, कामं करण हा खरा कामगाराच्या हातचा मळ आहे पण उगाच वेळेच्या आधीच ते संपवण्याची पण गरज नसते. त्यामुळे 'वारा तशी पाठ' या न्यायाने काम होत राहतात....पण वरच्या दिनचर्येत सांगितलेली कामं रोजच्या रोज केलेलीच बरी अशा प्रकारात मोडतात. अनुभवाने हे प्रत्येक कामगाराला (त्यातल्यात त्यात IT मधल्या) कळत आणि मग कामाचं ओझं न राहता it was just another day म्हणून त्याच कामाच्या जागी पुन्हा एकदा येण्यास तो सज्ज होतो.

Thursday, September 23, 2010

गाणी आणि आठवणी ५ - आरंभी वंदिन अयोध्येचा राजा

रेडिओची साथ बालपणापासुनची; त्यामुळे सकाळी सहा-सातच्या दरम्यान लागणारी भजनं, अभंग कानावर पडून त्यांचे शब्द, चाल सारं तेव्हापासुन मनात बसलंय.नकळत पं.भीमसेन, किशोरी आमोणकर असे भलेभले गायक ऐकण्याचं भाग्य आपल्याला लाभतंय हे कळण्याचं ते वय नव्हतं. पण त्यातली अशी मनात बसलेली गाणी जेव्हा नंतर मोठं झाल्यावर ऐकली गेली तेव्हा त्यातलं गांभीर्य,अर्थही कळायला लागला आणि अशा गाण्यांची संगत लागली.त्या सुरांच्या मोहिनीने चिंतेच्या काही क्षणात थोडा वेळ का होईना मनाला शांतताही दिली.


"आरंभी वंदिन अयोध्येचा राजा" हा पं.भीमसेन जोशी यांनी गायलेला अभंग मी नक्की असाच सहाच्या वेळेस केव्हातरी ऐकला असणार असं मलातरी वाटतं.सकाळच्या शांत वातावरणात जेव्हा फ़क्त आईने पाणी तापवण्यासाठी सुरु केलेल्या स्टोव्हचा आवाज साथीला असे तेव्हा अर्धवट झोपते हे सूर मनात पक्के झाले आणि त्यानंतर जेव्हाही केव्हा हा अभंग ऐकला तेव्हा तेव्हा तशीच तंद्री लागल्याचं जाणवतंय.

खरं काय जादू आहे या सुरात की शब्दात? पक्कं कळलं नाही पण कुठेतरी मनात हा अभंग बसला आहे असं वाटतं. नेहमी प्रथम वंदिला जातो तो गणपती पण तरी यात अयोध्येच्या राजाला सुरुवातीचं वंदन करुन थोडा साध्या शब्दात सांगायचं तर कोड ब्रेक केलाय का असं वाटतं. बर्‍याच गाण्यांचे जन्म, त्यांच्या चालींबद्दलच्या सुरस कथा प्रचलित आहे तसंच याचाही उगम कळला तर ते वाचायला मला नक्की आवडेल.

पं. भीमसेनजींच्या धीरगंभीर आवाजात जेव्हा आरंभी वंदिन सुरु होतं तेव्हाच आपण त्याकडे खेचलो जातो असा माझा अनुभव आहे आणि साथीला भजनी तालातला ठेका आपल्याला लगेच ताल धरायला भाग पाडतो. ते टाळ जणू काही आपणच वाजवतोय असंही वाटायला लागतं आणि पुढंपुढं त्यांच्या सुरांत अधिकाधिकच गुंतायला होतं. आधीची गंभीरता पहिल्या दोनेक कडव्यांनंतर जेव्हा "काही केल्या तुझे मन पालटेना" या कडव्याला येते तेव्हा मात्र त्यांचा आवाज मुलायम होतो आणि ते सूर आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जातात.

हे कडवं ऐकताना काही वेळा वाटतं आपण कुणा दुसर्‍या व्यक्तीचं मन पालटायला पाहातोय किंवा काही वेळा ते आपलंच मन असतं जे पालटायला तयार नसतं आणि आपणच त्याची आर्जवं करत असतो. ही एकच ओळ, आठेक वेळा तरी सलगपणे गायलीय आणि प्रत्येकवेळी त्यातली नजाकत वेगळी आहे, सुरांची पट्टी वेगळी, पंडितजी वेगवेगळ्या प्रकारे जणू काही मन पालटवण्याचा प्रयत्न करताहेत..त्यांची ती आळवणी अक्षरशः डोळ्यातून पाणी काढते. अगदी थोडक्यात सांगायचं तर ही आळवणी ऐकली तर कुठलाही भक्त किंवा देव यांच मन बदलवण्याची ताकद त्यात आहे.फ़क्त हेच नव्हे तर सारीच कडवी आपल्याला त्या रामाच्या दरबारी घेऊन जातात आणि मग तो सुरुवातीला आरंभी कुणाला वंदायचं हा प्रश्न जर पडलाच असेल तर गौण होऊन जातो. सगळ्यात शेवटी जेव्हा पुन्हा संथ लयीत ते ’अयोध्येचा राजा’ म्हणतात तेव्हा आपल्या नकळत मनातल्या मनात आपण आपल्या हातातले टाळ शांतपणे खाली ठेवलेले असतात ते माझं मलाच कळलेलं नसतं.

बेचैनीचे छोटे मोठे प्रसंग अधेमधे येतच असतात. अगदी साधं एखादा दिवस नीट गेला नसेल आणि मग रात्री झोप लागताना त्रास होत असेल तरी किंवा अवेळी जाग आली की त्या शांततेत हा अभंग जरुर ऐकुन पाहावा. सगळं काही विसरुन आपण एका वेगळ्याच विश्वात जातो. मागे एका विमानप्रवासात तेवीस तास अडकले होते तेव्हा माझ्या नशीबाने आय-पॉडमध्ये हा अभंग होता. त्या प्रवासात मी तो नक्की कितीवेळा ऐकला याची मोजदाद नाही पण जीवाची घालमेल कमी करायला या सुरांनी, शब्दांनी आणि त्यातल्या आळवणीने खूप मदत केली असं मला खात्रीने वाटतं.

आपल्याला कितीही मित्र-मैत्रीण, आवडीतली लोकं असा गोतावळा असला तरी गाणी जितकं आपल्याला हलकं करु शकतात ती ताकद बाकीच्या गोष्टींमध्ये थोडी कमीच आहे. कुणाला एखादा अभंग आवडेल तर कुणी एखादी सुफ़ी धुन ऐकत तंद्री लावेल. पण सुरांची जादू तीच. त्यातही मनात बसलेली गाणी लहानपणापासुन ऐकली असल्यामुळे सवयीची झाली असली तरी एखाद्या विशिष्ट प्रसंगी मोलाची साथ करतात. माझ्यासाठी हा अभंगही असाच.या लेखाचं अभिवाचन पंडितजींना आदरांजली म्हणून ऋतूहिरवा २०११ साठी केलं होतं ते इथे ऐकता येईल..
Friday, September 17, 2010

गुणी बाळ

आळस हा माणसाचा शत्रु आहे असं शाळेतल्या सुविचाराच्या फ़ळ्यावर शंभरवेळा लिहिलं तरी कंटाळा हा माणसाचा सगळ्यात जवळचा मित्र आहे हे प्रॅक्टिकली खरं आहे..निदान माझ्या बाबतीत तरी..

गेले काही दिवस एक कंपनीचा आणि एक क्लायन्टचा अशी दोन लॅपटॉपची बाळं घेऊन मी कामाची कसरत करायचा काहीबाही प्रयत्न करत असते.(कंटाळ्यावरुन सुरु केलंय तर क चा भरणाच होणार की काय??) पण गेले काही दिवस रोज सुरु करताना कंपनीचा लॅपटॉप कुरकुरतोय, तर बघुया म्हणून नाही.खरं म्हणजे लगेच ऑफ़िसला सांगायला हवं असं मनात हजारदा येतं कारण मला ओव्हरनाइट डिलिव्हरीने पाठवायचा म्हणून ऑनलाइन ऐवजी बेस्ट बायमध्ये जाऊन त्याने नवाकोरा डेल इंस्पिरॉन, एच डी स्र्कीन, सात नंबरच्या खिडक्या (त्या व्यवस्थित उघडायला शिकायचंही...) आणि थोडक्यात सांगायचं तर एकदम झट्याक पीस पाठवला आणि दोन-तीन महिन्यांत कुरकुर म्हणजे..पण नाही. रोज ती कुरकुर ऐकली न ऐकल्यासारखं करुन पुन्हा येरे माझ्या मागल्या.

त्यादिवशी मात्र जरा विकांताला काम करायला सुरुवात केली आणि नवरा (त्याला इलेक्टॉनिक वस्तुला काही झालेलं खपत नाही एकवेळ बायको-मुलं पडली तर एक तुच्छ कटाक्ष बास...असो...) लगेच म्हणाला”अगं त्यात सीडी टाकुन ठेवलीस का? बघ नं जरा आवाज येतोय तर?’

खरं म्हणजे हा प्रश्न मलाही पडला होता. पण काय आहे मला वाटलं असेल एखादी तर असुदे, बुट होतोय नं आणि तसंही या लॅपटॉपची स्क्रीन, साईड इफ़ेक्ट्स पाहायला जरा होईल हाताशी...म्हणजे आयत्या वेळी उठायला नको (सीडी,रिमोट झालंच तर खारे दाणे, पाणी आणायला उठण्याचा कंटाळा या विषयावर पुन्हा केव्हातरी). त्यामुळे पुनश्चं हम्म्म.आणि दुर्लक्ष उर्फ़ कंटाळा...

आज माहित नाही सकाळी काय झालं होतं ते बहुतेक कंटाळा महाराज दुसरीकडे कुठेतरी गुंतले असावेत आणि नेमकं सीडी ड्राइव्हचं तोंड माझ्याकडे होतं (किंवा लॅपटॉप सुरु करताना त्याची दिशा बदलायचा कंटाळा आणि काय?) पण म्हटलं बघुया कुठली सीडी आहे ती? तर चक्क इजेक्टचं काम होईना. म्हणजे नुस्तं दार किलकिलं होतंय पण प्रत्यक्ष हालचाल शुन्य..तसंही अजुन दोघांपैकी एकही लॅपटॉप संपुर्ण सुरु झाला नव्हता म्हणून शेवटी हातानेच सीडी ड्राइव्ह उघडली आणि त्यात माझा सगळा राग पळवुन लावेल असं एक गोंडस बाळ माझ्या बाळासारखंच नजरेस पडलं...

उर्वरित गोष्ट फ़िनितो करायला फ़क्त फ़ोटो टाकते. बाकी असं काही अकस्मात पाहिलं की कुठल्या आई-बाबाला (किंवा अगदी मावशीपासुन काकापर्यंत सगळ्यांनाच) काय वाटेल हे या फ़ोटोतच आहे असं मला तरी वाटतं..."माझं गुणाचं बाळ ते..........." :)


Sunday, September 12, 2010

आमचं "फ़ार्मविले"

काही वर्षे फ़िलीमध्ये स्वतःच्या घरात राहिल्यामुळे वसंत आला की बागकामाच्या मागे लागायची सवय होती..तरीही अर्थात मूळ मुंबईचं पाणी अंगात असल्यामुळे आमची मजल फ़ुलझाडं, टॉमेटो, मिरच्या आणि गेला बाजार वांगं यापलिकडे कधी गेली नाही. पण तरी एकदा रोपं रुजली की मग उन्हाळ्यात घरचं, बिनखताचं खायला मजा यायची. यावर्षी मात्र तसलं काही नाही याची खंत मार्चपासुनच सुरु होती. कुठल्याच दुकानाच्या गार्डन सेक्शनकडे पाहावंसंही वाटत नव्हतं.पण बहुधा माझ्या शेजारणीला, साशाला, माझी व्यथा कळली असावी त्यामुळे मग आपण कम्युनिटी गार्डनमधला एक वाफ़ा घेऊया का? असं तिनं सुचवून पाहिलं.माझी अर्थात ना नव्हती पण तरी आमची सरड्याची धाव माहित होती म्हणून मग तिच्यासोबत एक वाफ़ा घेऊया असं ठरवलं.

आमचा वाफ़ा

अमेरिकेत बर्‍याचशा गावात हे असं कम्युनिटी गार्डनचं प्रस्थ आहे. म्हणजे काही जागांमध्ये वाफ़े नाममात्र शुल्लक भरुन त्या सिझनपुरता भाड्याने घ्यायचे, ते सुरुवातीला पेरणीयोग्य जमीन उखळून वगैरे ठेवलेले असतात आणि पाण्याची सोयही केलेली असते. आपण फ़क्त आपल्याला हवी ती रोपं लावणे, त्यांची निगा घेणे आणि अर्थातच पीक काढणे हे करायचं. काहीठिकाणी विशेषतः चर्चेसच्या वगैरे जागा असतील तर त्यांची उपकरणीही ठेवलेली असतात आणि एखाद-दोन जागा कम्युनिटी स्पॉट्स म्हणून राखीवही ठेवल्या असतात. आपल्याकडे जास्तीची रोपं असतील तर ती तिथं लावायची आणि एखाद्या गरजुने त्यातुन हवं तितकंच स्वतःसाठी घ्यायचं असा फ़ंडा आहे.

लागवडीला सुरुवात
मला खरं सांगायचं तर इतकी वर्षे अमेरिकेत राहून याबद्दल विशेष माहितीच नव्हती त्यामुळे साशाने याबद्दल सांगितलं तेव्हा चला पाहुया कसं जमतंय ते असं तर वाटलंच शिवाय असा काही कन्सेप्ट असू शकतो हेच मला कौतुकास्पद वाटलं. नेमकं ज्या दिवशी आमच्या गावच्या कम्युनिटीतर्फ़े जे वाफ़े होते त्यांचं सुरु वाटपं होणार होतं आम्हा दोघींपैकी कुणालाही त्याच दिवशी जाणं जमणार नव्हतं आणि दुसर्‍या दिवशी गेलो तर अर्थातच सगळे वाफ़े संपले होते. मग काय? वेटिंग लिस्टवर आमचं नाव देऊन परत आलो.पण तसं त्यातुन काही निष्पन्न व्हायची शक्यता नव्हती. मग जवळजवळ मनातुन हे सारं काढलंच होतं तितक्यात मी एका शनिवारी एका लोकल फ़ेअरला गेले होते तिथे एका चर्चचा एक स्टॉल होता तिथे काही वाफ़े उपलब्ध असल्याचं कळलं आणि मुख्य त्यांनी काही शुल्क असं लावलं नव्हतं. फ़क्त आपल्या ऐपतीप्रमाणे दान करावं अशी विनंती होती. नेकी और पुछ पुछ? मी लगेच साशाला हे कळवलं आणि मग तिने अजुन माहिती काढली.
टॉमेटोची सुरुवात

या चर्चची जागा थोडी गावाच्या शेवटाला होती पण तरी दहा-पंधरा मिन्टं ड्राइव्ह म्हणजे ओके होतं आणि ते अजुन वाफ़े बनवत होते त्यामुळे मग एप्रिलमध्येच लगेच त्यांना डोनेशनचे पैसे देऊन आम्ही आमचा वाफ़ा पक्का केला.

एप्रिलच्या शेवटाला वगैरे वाफ़े आपल्या ताब्यात देतात आणि मग लगोलग लावणी केली की मग काय लावताय त्याप्रमाणे जुन,जुलै,ऑगस्ट, सप्टेंबर पर्यंत घरच्या भाज्या खायच्या. याबाबतीत माझा अनुभव तसाही वर उल्लेखलेला आहेच त्यामुळे माझ्या बेकिंग गुरुलाच मी माझी गार्डन गुरुही मानलं आणि तिनं सांगितल्याप्रमाणे आधी घरीच माझ्याकडे ज्या काही टॉमेटो इ.च्या बिया होत्या त्या लावल्या. नेमकं मेमध्ये आम्ही मायदेशवारी केली त्यामुळे थोडीफ़ार प्रत्यक्ष लागवड तिनेच केली पण परत आल्यावर जे काही करु शकत होतो ते आम्हीही केलं..

आमचा छोटा माळी
आरुषकरता तिने दोन-तीन स्ट्रॉबेरीचीही लागवड केली होती. पण यावर्षी वसंतातला सुरुवातीचा पाऊस साधारण जुनच्या सुरुवातीपर्यंत लांबल्यामुळे विशेष स्ट्रॉबेरी आल्या नाहीत पण नंतर मात्र झुकिनी (ही आपल्या दुधीची चुलत-बहिण) ने मात्र थैमान घातलं..

झुकिनीने झुका दिया....
मी माझ्या आत्तापर्यंतच्या वास्तव्यात एवढ्या झुकिन्या खाल्या नसतील. काकडीही अधुन-मधुन आपले रंग दाखवत होती. वांगं, मका छान तरारत होते. तर टॉमेटोबद्द्ल काहीच बोलायला नको. इतकं सगळं आपल्या आपण उगवुन लावु शकतो शिवाय जास्तीच कुणाबरोबर शेअरही करु शकतो ही कल्पनाच काय छान आहे नं? ही बाग लावताना साशाने खास स्पेशल इफ़्केट्स खूप सारे झेंडू गोलाकार लावुन आणि काही सुर्यफ़ुलाची झाडंही लावुन केली . त्यामुळे मला देवासाठी ताजी फ़ुलं तर मिळतातच आहे पण त्याचा मुख्य उपयोग आपल्या बागेत नकोसे किटक येत नाहीत हेही मी शिकले.


मक्याच्या बाजुला झेंडूचं कुंपण
मागे फ़ेसबुकमधल्या बर्‍याच मित्रमैत्रीणींनी मला त्यांच्या त्या फ़ार्मविलची आमंत्रणं, भेटवस्तु, शेजार काय पाठवायचा सपाटा लावला होता.तशीही सोशल नेटवर्किंग साइटवर फ़ार सोशल व्हायला मला जमत नाही; पण नेमकं त्याचवेळी माझं खरखुरं फ़ार्मविले, खरी शेजारीण आणि सध्या खर्रखुर्र पीक असं सुरु आहे. त्यामुळे त्या व्हर्च्युअल फ़ार्मविलमध्ये मी फ़ार नव्हते हे आणखी वेगळं सांगायला नकोच...असा काही प्रकार मुंबईबाहेर जरा वसई-विरार किंवा कर्जत वगैरेच्या इथे राबवला तर एखाद्या पावसाळ्यात थोडी शेती तिथेही करायला काय मजा येईल नं असं ही पोस्ट लिहिताना सारखं वाटतंय....

घरगुती फ़ार्ममधली ताजी ताजी भाजी

Thursday, September 9, 2010

३०००० +

आज बझवर काहीतरी टाकलं आणि महेंद्रकाकांनी गमतीत म्हटलं "चला म्हणजे आपण यांना पाहिलत का?" चा बोर्ड लावायला नको. त्यामुळे सहज ब्लॉगवर आले..पाहिलं तर आधीची पोस्ट टाकून तसे दहा दिवस होतील. त्यांचंही बरोबर आहे...पण एकंदरितच ब्लॉग लिहिणं, वाचणं सारंच सगळ्या व्यापात कमी झालंय. तरीही काहीतरी लिहायला हवं आणि लक्षात आलं की ब्लॉग वाचक संख्या चक्क ३०००० चा आकडा ओलांडतेय...


योगायोग म्हणजे मागच्या सप्टेंबरमध्येच पाच हजाराबद्दलची पोस्ट टाकली होती आणि एका वर्षात ही संख्या २५००० ने वाढली म्हणजे माझ्यासाठी ही खरंच उत्साह वाढवणारीच गोष्ट आहे....यानिमित्ताने या ब्लॉगला भेट देणारे सारे वाचक (प्रतिक्रिया देणारे आणि मूकपणे या पोस्ट सहन करणारे), फ़ॉलोअर्स सर्वांचेच खूप खूप आभार.

सध्या सगळीकडे गणपतीची धामधुम सुरु आहे त्यापार्श्वभूमीवर इथे मात्र मराठमोळ्या पद्धतीने सण साजरा करायची शक्यता जवळजवळ मावळली आहे. जवळच्या मराठी मंडळाच्या साइटवर अद्याप मेच्या जुन्या कुठल्यातरी कार्यक्रमाचीच वर्णी आहे, त्यांना केलेल्या इ-मेलला रिप्लाय नाही..मागची काही वर्षे साजरे केलेले गणपती उत्सव आता छान वाटायला लागलेत..मजा म्हणजे इतकी वर्षे ते साजरे करताना मायदेशातले गणपती, मुंबईची मजा आठवायचे आणि यावर्षी इथल्या इथलेच गणेशोत्सव आठवतेय...त्यामुळे फ़क्त उदास वाटतंय. त्यात ९/११ जवळ आल्याने टि.व्ही.वर तो इतिहास पुन्हा पुन्हा आठवताना ही उदासी फ़क्त वाढतेय..विचित्र योगायोग, ज्या दिवशी आपल्या इथे वाजत-गाजत गणपती येतील त्याच दिवशी इथे शांततेतले हुंदके वातावरणातली गहिरेपणा वाढवतील...जाउदे....मला वाटतं मी जास्त होमसीक होतेय.... असो...

या सर्वांचाच एकत्रित विचार करता या घडीला ते सारं विसरुन हे तीस-हजार नक्कीच "माझिया मना"ला उभारी देतील...तेव्हा पुन्हा एकदा सर्वांचे आभार आणि गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतानाच तो शांततेत साजरा होवो हीच गणपतीच्या चरणी प्रार्थना...

Wednesday, September 1, 2010

माझी(ही) दंतकथा

या मायदेशवारीत दंतचिकित्सक (तेच ते डेंटिस्ट हो) माझ्या यादीवर अम्मळ वरच्या क्रमावर होता. अमेरिकेतली महागडी दंतव्यवस्था हे त्यास कारण नसुन (थोडंफ़ार असलं तरी) निव्वळ कंटाळा या कारणास्तव ओरेगावातला दाताचा डागदर म्या अजुन पाहिला नव्हता त्यामुळे फ़क्त साफ़सफ़ाई (अर्थात दातांचीच) हे छोटंसं काम करायला त्यातला चांगला कुणी दाताचा डागदर शोधा आणि मग त्याने उपटसुंभासारख्या लावलेल्या इतर अनंत शोधामुळे (की नसलेल्या दंतप्रश्नांमुळे) त्याला आणि इंशुरन्स कंपनीला अस्मादिकाच्या रुपाने एक कायमस्वरुपी गिर्‍हाइक मिळवून द्या (अरे...हे वाक्य कुठे सुरु झालं होतं..आयला संपवतानाची क्रियापद शोधायला हवीत....असो...आणि त्यात कंस...देवा....वाचव माझ्या वाचकांना....) हा तर हे सर्व (म्हणजे जस्ट दोन मिन्टं आधी म्हटल्याप्रमाणे) टाळण्यासाठी आपला देशी वैदु काहीही करुन गाठायचाच होता...
आता इथे ओरेगावाप्रमाणेच बोरीवलीचाही उल्लेख करणं अपरिहार्य आहे (त्यामुळे हे नमनाचं तेल घडा नं. २ वाटत असलं तरी बी म्या काय करु शकत न्हाई म्हंजे न्हाई) हा तर बोरीवली...हे माझं सध्याचं माहेर (म्हणजे सध्या आई-बाबांच निवासस्थान (निवासस्थान हे इतकं शुद्ध निव्वळ आई-बाबांचा आदर द्विगुणीत करण्यासाठी खास बरं का?? ) असलेलं ठिकाण) असलं तरी ते माझं मूळ माहेर नव्हे कारण ही लोकंही इथं येऊन माझ्या भाषेत माझी फ़कस्त दुसरी मायदेशवारी आहे...म्हंजे हे ठिकाण माझ्यासाठी घराबाहेर पडलं की सासरसारखंच..
त्यामुळे इथे माझा कुणी शिंपी, न्हावीण (शुद्ध मराठीत ब्युटीशियन), शालेय मित्र-मैत्रीणी, कट्टे, भेळवाला, नारळपाणीवाला, घड्याळजी, सोनार (झालं भरकटलं गाडं..) पण आइच्यान सांगते आधी माझे बारा बलुतेदार अगदी बांधलेले होते आणि लगीन झालं तरी मागच्याच्या मागच्या वक्ताला त्यांनी पुन्हा तीच सर्विस माझ्यासारख्या गेलेल्या कस्टमरलासुद्धा आस्थेने चौकशी करुन पुरवली होती....(आता ही पोस्ट खरं म्हणजे दंतवैदुकडून या आठवणीतल्या बलुतेदाराकडे वळवण्याचा प्रचंड मोह होतो आहे पण बेगमी म्हणून दुसर्‍या कुठल्या पोस्टमध्ये त्यांच्यावर डिटेल मध्ये लिहीन म्हणते...तुर्तास त्यांच्या आठवणीसाठी एक वाक्य आणि एक कंस इतकंच बास...) असो...तर अगदी अगदी थोडक्यात (आणि कंसांशिवाय) सांगायचं तर हे सांगायला माझं माहेर पण मला सगळंच नवं विशेष करुन कस्टमर सर्विस प्रकारात मोडणारं सगळं...(हुश्श...तेल संपतंय अलमोस्ट) त्यामुळे यावेळी जरी दंतवैदु माझ्या लिस्टमध्ये टॉपवर होता तरीही तो (किंवा ती) कोण हे गुलदस्त्यामध्येच होतं..आणि त्यातही आईला विचारलं तर आईने चक्क कानावर हात ठेवले. "मी माझे सगळे आधीचे डॉक्टर (आणि चक्क लॅबपण) ठेवलेत..बोरीवलीतल्या डॉक्टरकडे मी जात नाही" - इति मासाहेब..आता आली पंचाईत पण माझे बाबा (मला वाटलं होतंच त्याप्रमाणॆ) माझ्या हाकेला धावले..."अगं इथे मी एक एक डॉक्टर पाहून ठेवलेत. आपण उद्या जाऊया की तुला आत्ता वेळ आहे??" ये हुई नं बात...आय लव्ह यु बाबा...मी लगेच त्यांच्या आत्ताच्या हाकेला ओ दिला आणि आम्ही रिक्षात बसलो..(इथे उतरण्याच्या जागेचं नाव द्यायचा मोह होतोय पण बाबांना पुन्हा त्यांच्याकडे जावं लागेल म्हणून त्यांच्या तोंडचा घास आपलं डॉक्टर काढून घ्यायचं पातक मी माझ्या डोस्क्यावर घेत नाही..तसंही इच्छुकांना हा अनुभव कुठल्याही डॉक्टरकडे येऊ शकेल याची मला खात्री आहे...) असो.....(तर आता एकदाचं संपलं त्येल...)
आता गेल्या-गेल्या अर्थातच आम्ही कुणी व्हिआयपी नसल्याने बाहेरच्या रिसेप्शनीस्टने काही लाल चादर अंथरावी अशी अपेक्षा नव्हतीच.(श्या रेड कार्पेट हो...लाल चादर म्हटलं की उगाच ऑपरेशन आठवलं का?? बुरी नजरवालों....) पण तरी हसल्या-नसल्यासारखं करुन आणि पाचेक मिन्टं नुस्तं आत-बाहेर करुन (थोडक्यात आपण अत्यंत बिजी आहोत हे आमच्या मनावर (तिच्या मते) बिंबवल्यावर) शेवटी एकदाची ती बया आम्हाला प्रसन्न झाली..म्हणजे थोडक्यात कुणासाठी?? हा एक तुच्छ प्रश्न आमच्यापर्यंत आला..तरी नशीब आम्ही एकमेव (म्हणजे तसे मी आणि बाबा दोघं पण पेशंट एक) बाहेर होतो...आणि तिच्या आत-बाहेर करण्यावरुन एक (किंवा दोन खुर्च्या असतील तर दोन) आतमध्ये असेल असा माझा कयास...असो बापडे...ती बिजी तर बिजी...यानंतरचा आमचा संवाद ती आणि मी या भाषेत लिहिला तर जास्त रोचक होईल (किंवा पटकन संपेल)

ती (मला नमनालाच): सर नाही आहेत मॅडम आहेत.
मी: डेंटिस्टच आहेत नं त्या? (म्हंजे त्यांच्या डेंटिस्ट असण्यावर माझा आक्षेप नव्हता हो पण समजा एखाद्या नायर डेंटल मधल्या मुलाने नायर मेडिकल मधल्या मुलीवर मारलेली लाईन असली म्हंजे...हाय की नाय लॉजिक??)
ती (किंचीत हसून): हो.
मी: चालेल मॅडम असल्यातरी. मला फ़क्त क्लिनिंग करायचं आहे.
ती (पुन्हा पुर्वीचीच मग्रुरी): क्लिनिंगला अपॉइंटमेन्ट लागते.
मी (मनात) : च्यायला तुला मला नो एंट्री मध्येच टाकायचं तर सरळ सांग नं उगाच नवी कारणं काय देतेय??
मी (प्रकट): मग द्या अपॉइंटमेन्ट..
ती (मी कामाला लावलं अशा काही चेहर्‍याने): शनिवारी साडे-चारची आहे. (आणि आम्ही मंगळवारी गेलो होतो..जाम बिजी दिसताहेत हे...)
मी (मनात): च्यामारी इथे पण माझ्या चार विकांतामधला एक शनि संध्याकाळ उडणार वाटतं.
मी(प्रकट) : बरं द्या सध्या. पण रद्द करायची असेल तर फ़ोन केला तर चालेल नं?
बाबा (अरे हो ते पण बरोबर आहेत नाही का?) : अपर्णा, कार्ड घेऊन ठेव त्यांचं...अहो मला जरा एक कार्ड द्या. पुढच्या वेळी फ़ोन करुनच येऊ. (हे बहुतेक आजची फ़ेरी बाद होतेय म्हणून बहुतेक)
ती (वहीत लिहायला नाव विचारायचं सोडून भावी धोक्याची कल्पना आल्यामुळे बहुतेक): जरा एक मिनिट थांबा.
आणि ती (यावेळी खरोखरच्या लगबगीने) आत गेली...
तेवढ्यात बाबा म्हणाले खरं ही मला ओळखते पण आज जरा काम जास्त आहे वाटतं...बाबांना आता थोडं अपराधी वाटत होतं असं वाटुन मी उगाच त्यांची समजुत काढली म्हटलं अहो थांबा मला मजा येतेय....
ती (परत आल्यावर चेहरा शक्य तेवढा कोरा ठेवत): पंधरा मिन्टं थांबाल का? आतमध्ये पेशंट आहे.
मी (मी पण चेहरा कोराच ठेऊन): ठीक आहे...
इतका वेळ ही आपली प्यादी चालवत होती; दिला की नाही चेकमेट? असा चेहरा करायचा खरा मूड आला होता पण मला पहिल्यांदी तरी समोरच्याला मान द्यायची सवय आहे मग त्याने त्याचे दाखवायचे दाखवले की मग पुढची मुव्ह...असो...(हे थोडं अनावश्यक...आय नो..पण असंही एखादं वाक्य असावं असं वाटलं म्हणून....)
आता हे प्रकरण इथे संपेल असं (वाचकांप्रमाणेच) मलाही वाटलं होतं पण खरी गम्मत पुढेही होती..पुढचा संवाद आहे डॉक्टरसाहिबां आणि मी यांच्यातला..सोय़ीसाठी आपण त्यांना डॉ. उल्लेखुया.


डॉ.:  हं काय?
मी:  मला स्केलिंग करायचं आहे.
डॉ:  ते मी बघते.
मी:  काहीच नाही...(अरे म्हणजे आता आपल्याला आपल्या दातांची अंदरकी बात माहित असली तरी उगाच कशाला तिला आत्ताच दुखवा..नंतर तिने वचपा काढला म्हंजे??)
डॉ: (तोंडात एकदा प्रेमळ हात आणि कटाक्ष इ. झाल्यावर): हम्म..स्केलिंगच करायला लागेल..चारशे रुपये होतील
मी:  हो (म्हणून अर्थातच आ वासला...)
डॉ: (वर,खाली, ऊजवी असं सगळं साफ़ करुन कम कोरुन झाल्यावर डावीकडे आल्यावर): इथली कॅप लुज झाली आहे...
मी:  (ती त्या निमित्ताने थांबली आहे याचा फ़ायदा घेऊन दोन मिन्ट तोंड मिटल्यासारखं करुन...(मनात)): आयला ही लोकं एकदा शिरली तोंडात की थोड्या वेळाने ब्रेक का नाही घेत?? त्यांच्या सिलॅबसमध्ये हा महत्त्वाचा भाग कसा नाही...आ वासुन तोंड कायमचं मोठं झालं म्हणजे??
मी (प्रगट):  अहो तेच तुम्हाला सांगायचं होतं मला क्लिनिंग झाल्यावर की ती कॅप मध्येच निघते.
डॉ.:  अशी कॅप कधीही निघाली की डेंटिस्टकडे जायचं आणि बसवुन घ्यायची. पंधरा दिवसांपेक्षा जास्त झाले तर मग प्रॉब्लेम येतो.
मी: (मी पण तेच करायचं होतं हो अशा अर्थाने पण वेगळे शब्द शोधत): आत्ताच मागच्या आठवड्यात लक्षात आलं माझ्या...
डॉ.:  अशी कॅप कधीही निघाली की डेंटिस्टकडे जायचं आणि बसवुन घ्यायची. इथेच असं नाही कुठला जवळचा डेंटिस्ट असेल तिथे जाऊन करुन घ्यायचं.
मी (मनात) :  अगं मग कर नं आता?? तू नक्की डेंटिस्ट आहेस नं? मग मी डेंटिस्टच्या खुर्चीत असताना डेंटिस्टकडे जा म्हणून सारखं काय सुरु केलयंस?? नक्की ही नायर मेडिकलची लाइन दिसतेय...
मी (आता हिला मी एखाद्या एकदम रिमोट गावात राहते अस वाटू नये म्हणून नाद सोडून (प्रगट)): हम्म...आता करता येईल का?
डॉ.:  ५० रु. होतील.
मी (मनात):  आयला हिचा कायतरी प्रॉब्लेम आहे किंवा हिला कुणीतरी पैशासाठी मोठा चुना लावलाय...पन्नास रु. पण असं सांगतेय की पाच हजार..
मी (प्रगट) :  चालेल..
यानंतर अर्थातच तिने पन्नास रुपयांचं ते काम पाच रुपयात आपलं मिन्टात..(छ्या वाण नाही पण गूण लागला वाटतं) केलं...स्वच्छ दात आणि घट्ट कॅप घेऊन मी बाहेर आले..(इथे कंसात का होईना एक गोष्ट जरुर सांगितली पाहिजे मॅडमच काम मात्र एकदम एक नंबरी होतं...ते एक जास्त वेळचा आ सोडला तर काय बी त्रास न्हाय बगा..)
असो...शेवटी एकदा़चे ते साडे-चारशे रु. त्या बाहेरच्या कोर्‍या चेहरेवालीला देऊन आम्ही निघालो. बाबांचं आपलं मला तशी ही थोडी ओळखते प्रकरण सुरु होतंच..पण तेवढ्यात मी माझी आधीची मनातली शंका (लायनीवाली हो) क्लियर व्हावी म्हणून त्यांना म्हटलं ही डॉ.तर चांगली वाटते. दोघं एकत्र प्रॅक्टिस करतात का? अगं ही बहुतेक काही महिन्यांपुर्वी इथे कामाला लागली आहे. चला म्हणजे फ़ुकटच्या जनरल नॉलेजमध्ये वाढ झाली तर..या (तशा) छोटाश्या दंतप्रकरणाच्या शेवटी काढलेले काही निष्कर्श:

१. नव्या दंतवैदुकडे पहिली लढाई दारातच सुरु होते आणि ती आपण जिंकण्याचे चान्सेस जास्त असतात...(कमॉन आपण मायबाप सरकार असतो तिथे)
२. दाताची कॅप कधीही निघाली की डेंटिस्टकडे जायचं आणि बसवुन घ्यायची. पंधरा दिवसांपेक्षा जास्त झाले तर मग प्रॉब्लेम येतो.(‍^C ^V असलं तरी सौ टका खरा है वो...)
२. सर डेंटिस्ट असतील तर मॅडम डेंटिस्टच असल्या पाहिजेत असं नाही...किंवा दुसर्‍या शब्दात सर डेंटिस्ट असतील तर डेंटिस्ट मॅडम त्यांचीच लाईन असेल असं नाही...म्हंजे माझा वरचा नायर डेंटल मिट्स नायर मेडिकल फ़ंडा यकदम खरा असु शकतो...
३. डेंटिस्ट मॅडम सारखे पैसे कन्फ़र्म करताहेत म्हंजे त्या पगारी डॉक्टर (उर्फ़ नोकर लिहायचा मोह आवरतेय) असण्याची शक्यता जास्त.
४. आणि हे फ़ायनलवालं.... बाहेरच्या रिसेप्शनिस्टने सरांची (पगार देतात म्हणून) न बोलता केलेली स्तुती खरी असली तरी त्याचा अर्थ मॅडम डेंटिस्ट म्हंजे आपलं ते चांगली डेंटिस्ट नसेल असंच काही नाही...(कदाचित या दोघींचं सकाळी वाजलं असल्यामुळे ही काही पेशंटना सरांकडे पाठवतेय असंही असू शकतं)
असो...अशी ही एक छोटीशी दंतकथा माझा तो एक दिवस आणि आता आठवताना वेळ एकदम मजेत घालवून गेली....

फ़ोटू गुगलबाबाच्या सौजन्याने