Thursday, February 18, 2010

माझी बेकिंग गुरु...

तशी याआधी दोनदा माझ्या ब्लॉगमधुन तुम्ही भेटला आहात तिला. एकदा माझी सखी शेजारीण म्हणून आणि नंतर आम्हाला खेकडेगिरी करवताना. आणि आता यावेळी तिची ओळख करुन देते ती तिच्या गृहिणी रूपातली.


मुळात जेवण कसं करतात याबद्दल मला बरंच कुतुहल आहे (करण्याचा आळस असला तरी) त्यामुळे भारतात असताना संजीव कपुरचं खाना-खजाना अगदी मन लावुन पाहायचे तसंच इथंही फ़ुड नेटवर्क अगदी आले त्या महिन्यापासुन आजतागायत पाहाते. स्वतः काही करायचं असेल तर मला अगदी डिटेल रेसिपीच लागते आणि तरी खूपदा पदार्थ करताना पोपटच होतो. म्हणून जरी घरी बरेच प्रकार मी करुन पाहाते आणि ते कधी जमतात कधी फ़सतात तरी एक गोष्ट मी कधीच केली नाहीये किंवा त्या वाटेलाच गेले नाही म्हणा ना..आणि ते म्हणजे बेकिंग.

सुरुवातीला साशाशी झालेली ओळख मैत्रीत बदलत गेली. आणि कसं काय माहित पण या माझ्या प्रिय मैत्रीणीने बहुतेक माझं पाककलेतलं सद्य ध्यान(?) लक्षात न घेता, बेकिंग हा साधारण इथे जास्त प्रमाणावर केला जाणारा प्रकार मला शिकवायचा तिने चंगच बांधला..अर्थात तिच्या आग्रहाला मलाही नाही म्हणवलं नाही आणि मुख्य माझ्या आईलाही मी असं काही शिकावं असं वाटत होतं त्यामुळे आई परतायच्या आधी आईच्या आवडीचा कॅरेट केक करुया म्हणून मी तिला म्हटलं...खरंतर जेव्हा मी तिला म्हटलं "बाई, मला आता सांग काय काय आणि किती किती आणू?" तर तिचं म्हणणं आपल्या इथल्या कुठल्याही शेजारणीसारखं.."काय कमी पडलं तर मी देईन नं?" आणि माझी आई म्हणजे "हे बघ, तिचे नोकरीचे प्रश्न चालु आहेत. त्यामुळे तिला खर्च लावु नकोस". दोघींच्या कात्रीत मी मात्र देवा आता सगळं एकदा नीट निस्तरू दे हाच धावा करायची बाकी होते...असो काही कमी पडलं नाही पण पठ्ठीने बहुतेक ठरवलं होतं की माझ्या आईला तिच्यातर्फ़े काही द्यावं म्हणून खास ऑरगॅनिक गाजर आणून ठेवले होते आणि हट्टाने तेच वापरले..

पण तिला कॅरेट केक करताना पाहताना मला माझी आई, मावश्या, शेजारच्या छान छान पदार्थ करणार्‍या काकी सगळ्या सगळ्या आठवल्या. कारण त्या जसं "घाल अंदाजे" करतात आणि त्यामुळे माझ्यासारख्या होतकरुंच काहीच होत नाही तसंच ती काही काही पावडरी,इसेन्स अंदाजे घालत होती. पुन्हा मला तिच्याकडे लिहुन ठेवलेली सविस्तर रेसिपीसुद्धा दिली पण प्रत्यक्ष करताना ना तिने ती पाहिली ना पाळली. असो...हा कॅरेट केक खूपच छान झाला होता हे सांगणं न लगे.

मला आधी एक गोल ट्रे भरपुर होईल असं वाटलं होतं पण तिने दोन केले आणि बरं केलं. पहिला कसा संपला ते कळलच नाही. आणि दुसराही अगदी चाटुन पुसून लवकरच संपला. खरंतर तिची करण्याची पद्धत खूपच सोपी वाटत होती आणि तसं तिनं म्हटलंही. पण तरी मी स्वतः अजुनही दुसरा केला नाहीये. पण बहुधा करेन.

त्यानंतर दुसरं प्रपोजल तिचंच होतं माझ्या आवडत्या "बिस्कॉटीचं". ही एक इटालियन पद्धतीची दोनदा बेक केलेली कुकी. अमेरिकेत चहा-कॉफ़ी बरोबर खायला छान (आणि तशी सुपर मार्केटमध्ये थोडी चढ्या भावाने मिळणारी) इतकंच माझं नॉलेज होतं. ही पण खरंतर कधीच बनवणार होतो पण मग मध्ये आईची निघायची तयारी, ती स्वतः तिच्या बोटीच्या कामात व्यस्त, मग मला आई मदतीला नसल्याने वेळ नाही या सगळ्या प्रकारात आज एकदाचा वेळ मिळाला तिला आणि मलाही. यावेळी मी सगळं सगळं घेऊन गेले अगदी आठवणीने आणि मला मैदा टाळायला आवडतो हे मागच्या वेळी साशाला कळल्यामुळे मागेच एकदा आम्ही एकत्र एका सुपरमार्केटमधुन स्पेल्ट या नावाने मोड आलेल्या गव्हाचं जे पीठ मिळतं ते घेतलं होतं. आणि मला आवडतात म्हणून अक्रोडही त्यात टाकण्यासाठी घेतले होते.

पण तरी यावेळी आरुषला आवडतील म्हणून तिनं थोडे चॉकलेट चिप्स घातलेच म्हणा. रेसिपी बाहेरही न काढता सरळ तिच्या भाषेत on top of her head असल्याने मागच्यावेळेसारखंच थोडं इकडचं तिकडचं घालुन केलं पीठ मोठ्या लाकडी चमच्याने कालवायला सुरुवात केली. शिकताना या पीठाला हात लावायचा नाही हे मुख्य सांगितलेलं असतं कारण बहुधा हाताच्या उष्णतेने जास्त मऊसर होऊ शकतं.


डबल बेक म्हणजे सुरुवातीला जो पीठाचा गोळा इतका पातळ दिसतो तो की अर्धवट बेक होऊन बाहेर आलेलं त्याचं जाडं रुप पाहुन मला तर अजि म्या ह्ये काय पाहिले असंच झालं. मग त्याच्या कापुन कुकीज करुन पुन्हा बेक करायच्या मग तो प्लेटमधला फ़ोटो दिसतो तशा बिस्कॉटिजचा डोंगर हजर....आता फ़क्त चहा आणि ताज्या ताज्या बिस्कॉटी....

तिने शाळेचा विषयच काढला म्हणून मी तिला विचारलंही त्याबद्द्ल तर बहुधा तिनं बेकिंग सोडून इतर गोष्टी म्हणजे near the flame in a small pan वाल्या शिकल्या असाव्यात आणि आपल्या कॉलेज जीवनात एका डॉक्टर जोडप्याच्या घरी त्यांच्या मुलांना संध्याकाळी पाहता पाहता जेवण करायची नोकरीही केली आहे ही जास्तीची माहिती मला मिळाली.

 
इथे एकंदरित काम करुन शिका असं सगळीच सरसकट करतात त्यामुळे जितक्या सहजपणे ते सांगितलं जातं तितकं ते आपल्या सहजी पचनी पडत नाही. पण ही खूप कामसू आहे हे माझं जुनं मत नेहमीच मी असे तिचे अनुभव ऐकते तेव्हा पक्कच होतं.असो.. आजची बिस्कॉटी करताना मी किती शिकले मला माहित नाही पण खाताना मात्र आतापर्यंत खालेल्ल्या सगळ्या बिस्कॉट्या एकीकडे आणि ही त्या सगळ्यांच्या वर इतकंच म्हणू शकेन..

फ़ार वाटतंय एकदा स्वतःही केक आणि बिस्कॉटी करुन पाहीन...करेन नक्की पण आज मात्र माझ्या या पोस्टद्वारे माझ्या या बेकिंग गुरुला सलाम.

22 comments:

  1. आता तुझाही निषेध :)

    अगं तुझं बिस्कॉटीचं वर्णन मी (फक्त वाचलेल्या :( ) झ्वीबाक (Zwieback) नावाच्या जर्मन कुकीजशी इतकं जवळचं आहे ना ...

    ReplyDelete
  2. बिस्कॉटी.. नाव कसलं भारी आहे न?
    अस वाटतंय स्कुटी वर बसून बिस्कीट खाणा-या व्यक्तीला बिस्कॉटी म्हणतात कि काय..
    अशा अनेक खाद्य प्रक्रिया असतील न?
    आम्हाला त्यात कसला रस... आम्हाला आपला खाण्यात रस..

    पूर्वी पोह्याची गिरण होती तेव्हा गरम गरम पोहे घायचे त्यातल दही, किवा ताक तिखट मीठ किवा मग दुध, गुळ
    मिश्रण करून खायचो........ हि एक रेसिपी आणि
    आवडीची कुठलीच भाजी नसली कि मग
    दाण्याचे कुट घायचे आणि त्यात तिखट मीठ, दही टाकून कालवून
    तोंडी लावायला पदार्थ तयार... असले बारीक सारीक पदार्थ कसे करायचे हेच माहित आम्हाला.. म्हणजे मला..

    बाकी छान खाद्य प्रक्रिया
    आवडली.. कधी योग आला तर खायला घाला आम्हाला...
    चहा तर घेऊच..

    बिस्कॉटी.............मस्त variety

    ReplyDelete
  3. हा हा गौरी निषेध करायचाच तर साशाचा..आम्ही काय फ़क्त खाण्यापुरताच सहभागी म्हटलंस तरी चालेल आणि शिक्षणाच्या नावाने तिच्याबरोबर गप्पाच मारल्यात...

    ReplyDelete
  4. अखिल तुझे पदार्थ पण मस्तच आहे....पोहे आणि दूध तर मला अजुनही तितकंच आवडतं...फ़क्त कधी गिरणीतले गरम पोहे नाही मिळाले..आणि दाणे आमच्याकडे कुट होईपर्यंत जिवंतच राहणार नाहीत की काय असं वाटतं कधी कधी..भाजले की असेच पोटात जातात.....

    ReplyDelete
  5. नुसता वर्णन, खादाडी, निषेध नको...बिस्कॉटी हवेत मला :)
    मस्त झालीय पोस्ट..

    ReplyDelete
  6. सुहास, सगळ्यांना आता एकदा साशाच्या घरीच बोलावते...ही ही....:)

    ReplyDelete
  7. गाजर हा प्रकार विशेष आवडता नसल्याने सेमी निषेध. फक्त बिस्कोटी पुरताच.. पण तो ही मागे घेऊ शकतो. जर मगाशी म्हणाल्याप्रमाणे त्या बिस्कोट्या आम्हाला इथे पाठवल्यास तर.. :-)
    आता म्हणशील साशाच्या घरीच बोलावते सगळ्यांना.. म्हणून आधीच सांगून टाकतो की तुम्हीच या इथे साशा आणि बिस्कोट्या घेऊन. :D

    ReplyDelete
  8. फ़ार पुढचा विचार करुन कॉमेन्ट दिलीस तू हेरंब...बरं सध्या एक काम करं..त्या बीजे मध्ये मिळणार्‍या नानीच्या(Nonnie's) बिस्कॉटिजवर समाधान मान मग बघुया कधी येतोय ते....

    आणि एक गाजर केक ट्राय कर मलाही इथलं गाजर फ़ारसं आवडत नाही...पण यात कळतही नाही गाजर खातोय म्हणून...

    ReplyDelete
  9. chan aahe ga tuzi maitrin ekdam ... mast shikavate tula :)

    _Ashwini

    ReplyDelete
  10. पोळ्या करण्याच्या व्यापातुन आता सुटका होणार तर!! टेस्टी दिसते आहे पोस्ट.. मी पण आता एक पोस्ट लिहिणार आहे केकचे शंकरपाळे.. वाट पहा.. हे हे हे.. :)

    ReplyDelete
  11. वा:! बरेच दिवसांनी बिस्कॉटीची आठवण करून दिलीत. पुण्यात तिकडच्या सारखी बिस्कॉटी नाही मिळत. स्टारबकची कॉफी आणि सोबत बिस्कॉटी म्हणजे माझा वीक्पोइन्ट.
    -निरंजन

    ReplyDelete
  12. महेन्द्रकाका, पोळ्यांकरता बिस्कॉटी आणि केक म्हणजे घरच्यांना "चॉकलेटच्या बंगल्याला टॉफ़ीचं दार" सारखं वाटेल नाही?? प्रयत्न करुन पाहाते पटतात का? :)
    आणि आपण बापुडे खाण्यापुरता पाहावं स्वयंपाकघरातले प्रयोग या विषयावर तुम्हीच जास्त चांगलं लिहाल....:)

    ReplyDelete
  13. धन्यवाद निरंजन आणि ब्लॉगवर स्वागत...
    ह्म्म...इथे स्टारबक्सचं पण प्रस्थच आहे...एकतर हेडक्वार्टर्स जवळ असल्याने चार चार पावलांवर स्टारबक्स आहेत...आमच्या अपार्टमेंटच्या ऑफ़िसमध्ये पण स्टारबक्स ब्रु करतात...
    मला जसं खेकडा-भजी आणि कटिंग हे कॉम्बो आठवतं तसंच काहीसं तुमचं झालंय...:)

    ReplyDelete
  14. अपर्णा,
    रेसिपी मेल करशील का? आता वार्षिक परीक्षा आहेत. पंधरा दिवसात अजिंक्य च्या मित्रांचे घरी सारखे येणे होईल. बघते मी ही प्रयत्न करून हे पदार्थ करण्याचा.
    कळवीन तुला.

    ReplyDelete
  15. आपला पण निषेध बिस्कॉटी साठी...हेरंबसारखीच अट आहे माझी निषेध मागे घेण्यासाठी...

    "बिस्कीटांच्या गच्चीवर बिस्कॉटी छानदार
    कॅरटकेकच्या अंगणात गाजर लाल लाल...
    असावा सुंदर.."

    ReplyDelete
  16. अपर्णा ताई फक्त खादाडी पोस्ट करताय. . .आम्हाला मेजवानी कधी ते सांग??? :)

    मस्त झाली आहे पोस्ट!!!

    ReplyDelete
  17. अपर्णा, अग वाढदिवसाची मस्त ट्रिट दिलीस गं. दोन्हीही पदार्थ मला आवडतात. चला आता चहा आणि बिस्कॉटी तयार ठेव, आलेच मी. पोस्ट मस्तच.

    ReplyDelete
  18. अनुजाताई, रेसिपी माझ्याकडे आली की सर्वांनाच देईन...म्हणजे मग निदान निषेध थोडा कमी होईल...ही ही....
    आपल्या प्रतिक्रियेबद्द्ल आभार...

    ReplyDelete
  19. देवेन्र्द हेरंबसारखंच तुलाही एखादं दुकान सुचवावसं वाटतं पण मला वाटतं कुठल्याही कॅफ़े कॉफ़ी डे सदृष्य दुकानामध्ये असेल....

    ReplyDelete
  20. मनमौजी, या की एकदा नक्की जमवुया मेजवानीचा बेत...खरे खरे मुरब्बी करणारे आहेत आपल्याकडे त्यांना पण आवताण देऊ...

    ReplyDelete
  21. भाग्यश्रीताई, तू आलीस तर साशाकडून खूप काही शिकशील असं मला वाटतं....(म्हणजे बेकिंगचं...बाकी तू आमची महागुरू आहेस....)

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.