Showing posts with label सुपरमॉम. Show all posts
Showing posts with label सुपरमॉम. Show all posts

Monday, January 23, 2012

"ति"ला शुभेच्छा.....

सुरूवातीला मध्य, नंतर पूर्व आणि आता पश्चिम अशा अमेरिकेच्या वेगवेगळ्या भागांत राहिल्यानंतरचा जानेवारीतला माझा अनुभव म्हणजे सगळीकडे वाढत गेलेली थंडी आणि त्यामुळे आलेला आळस..कुठे बाहेर जाऊ नये, घरातल्या घरात शेकोटी लावून काहीतरी गरम हातात घेऊन बसून राहावं असं वाटायचे हे दिवस. थोडेसे कंटाळवाणेच...या कंटाळ्याला आधार असतो तो जानेवारीत असणार्‍या ऑस्ट्रेलियन ओपनचा.
तसंही मायदेशात असल्यापासून मी ग्रॅंड स्लॅमच्या टुर्नामेंट्स तिथे क्रिकेटचे सामने पाहायचे त्याच (किंवा त्यापेक्षा कांकणभर अधीक) भक्तिभावाने पाहाते. त्यावेळी स्टेफ़ी हे माझं दैवत. मग तिने एखादा सामना गमावला की त्या सेमेस्टरच्या माझ्या निकालाची पण गडबड होणार असं मला वाटे...ती निवृत्त झाल्यानंतरही आणखी वेगवेगळे टेनिस खेळाडू आवडत राहिले.पण तिच्याइतकं कुणी कंसिस्टंटली आवडलं नाहीये...आणि आता इतक्यात वाचलेल्या "ओपन"मुळे कळलेला आंद्रेही पुन्हा एकदा जास्त आवडलाय....इतकं प्रामाणिक आणि विथ डिटेल्स आत्मचरित्र बर्‍याच दिवसांनी वाचलं...पण विषय या दोघांबद्दल नाहीये मुळी.
या जानेवारीतही म्हणजे अगदी आत्ता ही ऑस्ट्रेलियन ओपन सुरू असताना खरं म्हणजे शनिवारी किंवा कुठल्याही रात्री कुणाकडे जायचा मला कंटाळा येतो. कारण एकतर वेस्ट कोस्टमुळे बरेच सामने दुसर्‍या दिवशी सकाळी रिपिट टेलिकास्टमध्ये दाखवले तर पाहावे लागता किंवा फ़क्त निकाल पाहता येतो. त्यामुळे निदान विकेंडला तरी मुलं झोपली की निवांतपणे जागरण करून आपल्या आवडीचे काही सामने पाहायचे असा बेत होता. पण नेमकं मुलालाच त्या कुंटुबाकडे खेळायला जायचं असल्याने आम्हाला जाण्याखेरीज गत्यंतर नव्हता. पण मग लवकर निघुया असं ठरवलं होतं तरी येता येता साडे-नऊ वाजलेच..उशीरा येतानाचा फ़ायदा म्हणजे छोटं पिलु गाडीतच झोपलं आणि मोठ्याने पण पेंगायचे सूर लावले होते. या पार्श्वभूमीवर जेव्हा मी ऑस्ट्रेलियन ओपन सुरू केली तेव्हा पहिल्या सेटमध्ये ती कशी पडली आणि तिच्या घोट्याला कसं बॅंडेज लावलंय त्याचे फ़ुटेज दाखवत होते आणि दुसरा सेट सुरू होता. मी डोळ्यांना स्कोर दिसायच्या आत जमेल तेवढा डिव्हिआर मागे घेतला आणि आताच आल्यासारखं फ़्रेश मनाने मॅच पाहायला बसले.
पहिल्या सेट "ति"ने गमावला होताच आणि दुसर्‍या सेटमध्येही काही आशेचे किरण असे दिसत नव्हते. त्यात टाय ब्रेकरमध्ये तिच्या समोर असलेल्या तितक्याच ताकदीच्या खेळाडूला तो सामना खिशात टाकायला चांगले चार मॅच पॉइन्ट्स होते. आपल्या आवडत्या खेळाडूला हरताना पाहायला कुणाला आवडेल?? पण जिद्दीने खेळून हे चारही मॅच पॉइन्ट्स वाचवून तिने तिसरा सेट आणि पर्यायाने मॅच खिशात टाकली तर....माझ्यासारखाच हा विचार "ति"च्या प्रत्येक चाहत्याने केला असणार खात्री आहे मला आणि अर्थात तिने स्वतः.ही.
फ़क्त एकच विचार आम्ही करू शकत नव्हतो तो म्हणजे तिला आत्ता झालेल्या दुखापतीचा. तुम्ही आंद्रेचं "ओपन" वाचलंत तर टेनिस या खेळाबद्दल आपले एकंदरीत डोळे उघडतील. फ़िटनेस, हेल्थ आणि खेळाडूचा त्या दिवशीचा गेम याबद्दल एक प्रेक्षक म्हणून आपण विचारच करू शकत नाही इतक्या गोष्टी तिथं पडद्यामागं होत असतात. आपल्यासाठी सामना असतो ती या दोन योद्ध्यांसाठी एक लढाई असते आणि असतात डावपेच. प्रतिस्पर्ध्याचा कमजोर भाग मिळाला की त्यावर हल्ला करून फ़ायनल सेट हा खूपदा मानसिक ताकदीवर जिंकला जातो. अर्थात हा सामना पाहताना मात्र फ़क्त आता "ति"च्यासाठीचा विचार, "ति"ने खेळावं हेच वाटत होतं....पण त्यादिवशी ते चारही मॅच पॉइन्ट वाचवून मग तिसर्‍या सेटला नमनालाच डबल ब्रेक करून आपलं पारडं जड करायची किमया "ति"ने साधली. त्यानंतर जरी तिची सर्विस तिच्या प्रतिस्पर्धीने एकदा मोडली तरी आधीच घेतलेल्या आघाडीमुळे तिला ६-४ असा तिसरा सेट आणि पर्यायाने ती मॅच खिशात टाकण्यापासून अडवणारं कुणीच नव्हतं. तो दिवस, ती रात्र तिचीच होती....फ़क्त तिची.....
याआधीही मी तिच्याबद्द्ल इथे  लिहिलंय...हो तिच्या पुनरागमनाच्या वेळेस....कदाचित माझं स्वतःचंही त्यावेळी स्वतःच्या करियरमध्ये काही न काहीतरी करायचं सुरू होत होतं पण जुळत नव्हतं म्हणून ती जास्त लक्षात राहिली. आताही तिच्याइतकं भव्य काही केलं नसलं तरी काही ना काही सुरू आहे. एकदा मुलं झाली की एक एक छोटं पाऊलही मोठ्या शिडीवर चढल्यासारखं वाटतं त्यामुळे असेल बहुधा किमची मी मोठ्ठाली पंखी आहे..तिने पूर्ण सीझनमध्ये एक पदक मिळवलं तरी माझ्यासाठी ते खूप खास असतं.
टेनिस किंवा कुठल्याही खेळात खेळाडूचं वय, त्यांची शारीरिक पार्श्वभूमी याला खूप महत्व आहे. तिला आधीच्या मॅचमध्ये झालेली दुखापत आणि तिच्याबरोबर खेळणार्‍या तिच्यापेक्षा वयाने लहान असणार्‍या स्पर्धक हे सर्व एका पारड्यात टाकलं तरी ती माझी लाडकी सुपरमॉम असल्याने आई होताना आणि मग आईपण जपताना कामाच्या ठिकाणी कराव्या लागणार्‍या ऍडजस्टमेन्ट करणार्‍या माझ्या सार्‍या मैत्रीणी (आणि अर्थात याची पूर्ण कल्पना असणारे मित्र) तिला यावर्षीच्या फ़ायनलमध्ये पाहायला नक्कीच इच्छुक असतील.....
आता इथे स्पर्धेत राहिलेल्या सगळ्या स्पर्धक म्हणजे अगदी किमची आजची मॅच जिच्याबरोबर आहे ती वोज्नियाकी काय किंवा दुसर्‍या भागात आगेकुच करणारी शेरापोव्हा आणि अगदी काल व्हिनसला सरळ दोन सेटमध्ये हरवणारी मॅकारोव्हा या सगळ्या सगळ्या मला तितक्याच आवडत असल्यातरी जेव्हा मी एक आई म्हणून माझी करियर,घरातली छोटी लढाई लढत असते...स्वतःला सिद्ध करायचा प्रयत्न करत असते त्या पार्श्वभूमीवर मला वाटतं अगदी मनापासून द्यायच्या माझ्या शुभेच्छा मी देणारे त्या फ़क्त "किम"साठी,एका सुपरमॉमसाठी आणि सगळ्यात मुख्य तिने आता सांगितल्याप्रमाणे तिच्या शेवटच्या  ऑस्ट्रेलियन ओपन साठी.......

Best of Luck Kim....

छायाचित्र मायाजालावरुन साभार.....

Sunday, September 13, 2009

एका आईचं पुनरागमन

गेले सत्तावीस महिने ती आपली मुलगी आणि घर यात आनंदाने रमली. इतके दिवस तिने टेनिसचा एकही सामना पाहिला नाही. तिला जमलं नसतं असं नाही पण तिने पुर्णवेळ आपल्या बाळीलाच दिला. आणि आता ही पोस्ट लिहिण्याच्या काही क्षण आधी ती पहिली स्पर्धक आहे की जी वाइल्ड कार्डमधुन खेळुन यु. एस. ओपनच्या फ़ायनला नुसती पोहोचलीच नाही तर तिच्या विरोधातली तरुण तडफ़दार स्पर्धक कॅरोलाइन वोजनियाकी हिचा सरळ सेटमध्ये धुव्वा उडवून दिमाखात अमेरिकन ओपनचा चषक आपल्या हातात उंचावतेय. "किम क्लाईस्टर्स" २००९ ची अमेरिकन ओपनची विजेती. आजची रात्र तिच्यासाठी आणि तिच्यासारख्या पुनरागमन करणार्या सर्वच आया यांच्यासाठी खास...

तसं तिच्या कारकिर्दीतलं हे दुसरं मोठं पदक. पहिलं इथेच २००५ ला घेतलं होतं आणि योगायोगाने पुनरागमनातही तिने इथेच श्रीगणेशा केला. आणि १९८० नंतर टेनिसमधलं कुठलंही मोठं पदक मिळवणारी ही पहिली आई आहे. टेनिसच्या जगतात एका आईसाठी हे नक्कीच कठिण आहे कारण एका बाळाच्या जन्मानंतर पाठीची अवस्था आणि पोटाच्या स्नायुमध्ये आलेली शिथीलता याने टेनिसचा कणा म्हणजे सर्विस करताना its just not the same again. शिवाय या सत्तावीस महिन्यात सगळ्या नव्या दमाच्या तारकांशी सामना करायला तो स्टॅमिनाही हवा. तिला वाइल्ड कार्डजरी मिळालं असलं तरी तिचा ड्रॉ अतिशय कठिण होता आणि उपान्त्य फ़ेरीमध्ये तर विनस विल्यम्सबरोबर तिचा सामना होता. अंतिम फ़ेरीच्या या मॅचमध्ये सुरुवातीला कॅरोलिनाने किमची सर्विस ब्रेक करुन पुढचा रस्ता कठीण आहे याची जाणीव तिला करुन दिली होती. हा सेट जाणार असे कागदावर वाटत असतानाच या कणखर मातेनं ७-५ असा अक्षरश: खेचुन आणला आणि दुसर्या सेटमध्ये मात्र कॅरोलिनाला डोकं वर काढायला दिलं नाही. हा सेट तिने अगदी ६-३ असा अलगद खिशात घातला आणि मग मात्र तिला अश्रु आवरेनासे झाले.

तिची अठरा महिन्यांची छोटी मुलगी जेडसुद्धा मॅच पाहायला आली होती आणि तिच्या चषक घेतानाच्या मुलाखतीत त्याबद्द्ल विचारलं त्यावेळी इतर कुठल्याही पालकाप्रमाणे ती निरागसपणे म्हणाली की आज आम्ही आमच्या मुलीची दुपारची झोप थोडी उशीरा केली म्हणजे ती ही मॅच पाहायला जागी राहील. आणि उद्यापासून मला पुन्हा तिला रुटीन नीट करावं लागेल. तिला तिचं नेहमीचं आईपणाचं आयुष्य उद्यापासून पुन्हा हवय हेही तितकंच महत्वाचं नाही का?
टेनिसच्या इतिहासात मी पहिल्यांदाच चषक वितरण झाल्यानंतर एक संपुर्ण कुटुंब कोर्टवर पाहतेय. त्या छोट्या मुलीला आपल्या आईने काय मिळवलंय हे नक्कीच इतक्यात कळणार नाही पण ती चकाकणारी वस्तु काय आहे याची उत्कंठा नक्कीच आहे आणि त्या आईच्या डोळ्यात आपल्या लेकीची प्रतिक्रिया पाहण्याचा आनंद.
अशा अनेक छोट्या मोठ्या क्षेत्रात आपल्या जिद्दीवर आपलं घर सांभाळुन करिअर मध्ये पुनरागमन करणार्या अनेक मातांना हजारो सलाम....