Thursday, December 31, 2020

सरत्या वर्षाचा लेखाजोखा

 यंदा जुलैपासून ब्लॉगवर माझा पायरव नाही म्हणजे काय झालं तरी काय असा स्वतःच आज विचार करताना सुचलं की कितीही डोळ्यांतून पाणी काढणारे क्षण आले तरी जाताना या वर्षाला हसतमुखाने निरोप द्यावा. 
यावर्षी आठवतं आधीपासून प्लॅन केलेलं आमच्या कुटुंबाचं यलोस्टोन नॅशनल पार्कात जाणं. आजाराने जग व्यापलं होतं पण योग्य काळजी घेऊन जेव्हा काही मोजक्या लोकांनाआता जाऊ दिलं त्यात आम्ही चौघेही होतो. एकजुटीने आणि आजूबाजूच्या पर्यटकांशी मास्क लावून, योग्य अंतर राखून वन्यप्राणी दर्शन करण्यामुळे सहा महिन्याचा शिणवटा पळाला. मन त्या चार दिवसासाठी हलकं झालं. त्याचा फायदा ऑनलाईन शाळा सुरु झाल्यावर काम आणि घरचा समतोल साधण्यासाठी नक्कीच झाला. त्यानंतर मोजके लोकल वॉक वगैरे सोडले तर माणसं जाण्याखेरीज काही घडत नव्हतं. घरी कुणाला बोलवणे नको इतके नियम आणि त्यामुळे विशेष करून सण तर घरातच साजरे केले. बरेच वेळा आतील हुंदके दाबून मुलांना आपल्या मनात काय सुरु आहे, याचा सुगावा लागू न देता मागचे पाचेक महिने गेले आणि मग आजाराची टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे चक्क हवाईला जायची संधी मिळाली. पॅसिफिक नॉर्थवेस्टमध्ये अजिबात सूर्यदर्शन नाही अशा ऋतूमध्ये जायला मिळाल्याचे आभार मानावे तितके कमीच. या दोन ट्रिपांमध्ये माझ्याकडे एकंदरीत बरंच काही संथपणे सुरु होतं. प्रकृतीच्या किरकोळ कुरबुरीदेखील नकोशा वाटण्याचं हे वर्ष. अशात कामाची जबाबदारी वाढवून मिळाली आणि त्यात थोडंफार नीट काम करून स्वतःला बरं वाटणं हा अशा बिकट वर्षातला उच्चबिंदू म्हणावा. या आठवणींची ही चित्रगंगा. यातली बरीचशी चित्रे अर्थातच माझ्या नवऱ्याने काढली आहेत. त्याला माझ्या फोनमधील चित्रणाची साथ. माझ्या ब्लॉगला साथ देणाऱ्या सर्व वाचकांचे या वर्षात इतक्या कमीवेळा लिहूनही साथ देण्याबद्दल मनापासून आभार आणि २०२१ साठी अनेक शुभेच्छा. 

#AparnA #FollowMe