Wednesday, March 31, 2010

ब्लॉगवाचक...

ब्लॉग लिहायला घेतला की हळुहळु वाचकसंख्या वाढायला लागते..जितके नेमाने आपण लिहू लागतो तितकेच नित्यनियमाने काही लोक आपल्याला वाचकरूपाने भेटतात..प्रत्येक ब्लॉगसाठी अत्यावश्यक असलेली ही जात आणि स्वतः ब्लॉगरही याच जातीतला. निदान मी तरी...अरे आता आपण ब्लॉग करतो म्हणजे आपणही दुसर्‍या ब्लॉगर्सचं वाचायला हवं नं?? म्हणजे मी फ़क्त लिहिणार आणि तुम्ही वाचा या प्रकाराला आम्ही तरी लेखक म्हणतो आणि त्यांची पुस्तकं आम्ही विकत घेऊन वाचतो...(चकटफ़ू लिहितात ते ब्लॉगर अशी नवी व्याख्या आहे का??कोण रे ते ???)....तर अशाच ब्लॉगवाचन आणि ब्लॉगलेखनातून जाणवलेले काही ब्लॉगवाचकांचे प्रकार..


१. मित्र वाचक....साध्या शब्दात सांगायचं तर हे आपल्याला आधी ओळखत असणारे आणि तुमच्या ब्लॉगवरही येणारे दोस्त लोक. या लोकांचं एक बरं असतं, मैत्री असल्यामुळे ते तुमच्या ब्लॉगचे इमानी वाचक असतात आणि कुणीच काही म्हटलं नाही तर निदान यांचे कौतुकाचे दोन शब्द तरी असतात...काही काही ब्लॉगवर तर मित्रपरिवारांचाच इतका सुकाळ असतो की त्यापुढे मजसारखा पामर वाचक प्रतिक्रिया द्यायलाही कचरतो..उगाच त्यांचं चाललंय त्यात आपण कशाला ढवळाढवळ असंही वाटतं...दृष्ट लागावी असा मित्रपरिवार असणारा ब्लॉग आपलाही असावा असं सुरुवातीला मला वाटायचं पण नंतर आधीच्या मित्रमैत्रीणींना या विश्वात आणण्याचं तसं काही काम नाही हा एक प्लस पॉइंट माझ्यासारख्या ब्लॉगर्सना आहे असं त्याकडे सकारात्मक पाहायला मी शिकले..आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे वाचकांचा यापुढील प्रकार...


२. वाचक मित्र....मित्र वाचक आणि वाचक मित्र टायपायला चुकलेबिकले नाही...तर ते तसंच आहे..वाचक मित्र म्हणजे तुम्ही लिहित जाता, ते वाचत जातात आणि मुख्य म्हणजे प्रतिक्रिया देत जातात. कधी कधी तर प्रतिक्रियांमधुन तुम्ही दोन-तीन पेक्षा जास्तवेळा एकमेकांशी संवाद साधता आणि मग ब्लॉगर आणि वाचक यात एक वेगळी मैत्री निर्माण व्हायला लागते..प्रतिक्रियांमधुन बोलता बोलता कधी तुम्ही चॅट आणि बझ्झवर बोलायला लागता कळत नाही..एकाच देशात असलात तर मग फ़ोनाफ़ोनीपण सुरू होते हे असतात वाचक मित्र...म्हणजे मित्र झाला स्टार सारखं वाचक झाला मित्र...याचे तोट्यापेक्षा फ़ायदे जास्त आहेत....कारण त्यांना तुमच्या लेटेस्ट पोस्ट्स माहित असतात आणि त्यामुळे तुमचा संवाद खर्‍या अर्थाने सुसंवाद व्हायला सुरुवात होते....तोटा म्हणजे कधीतरी हाच सुसंवाद विवादातही रुपांतरीत होऊ शकतो पण तेवढी एक काळजी घेतली तर वाचक मित्रासारखा ब्लॉगरसाठी दुसरा मित्र नसावा....

३. धुमकेतू वाचक....हे वाचक आपल्यापैकी बर्‍याच जणांना अधुन-मधुन भेटत असतील..(म्हणजे धुमकेतुने कितीवेळा भेट द्यावी असं वाटतं??) हां तर एखाद्या दिवशी मेलबॉक्स उघडावी आणि एकाच व्यक्तीने अगदी जुन्या-पुराण्यापासून नव्यापर्यंत चार-पाच पोस्टवर एकदम कॉमेन्टून तुमची सकाळ प्रसन्न करून टाकावी ते हे वाचक...मीही त्यातली आहे कारण काही ब्लॉगावर नित्यनियमानं जाणं होत नाही आणि मग एखादा दिवशी एकदम छप्पर फ़ाडके कॉमेन्टून टाकण्यासारखं वाचायला मिळतं...मग पुन्हा बरेच दिवसांसाठी गायब असे हे वाचक खरं तर सर्वच ब्लॉगर्सना हवेहवेसे वाटत असतील नाही?? निदान मलातरी आवडतं बाबा सक्काळ सक्काळी असा एखादा धुमकेतू आलेला...

४. सडेतोड पण निनावी वाचक...थोडक्यात ऍनोनिमस...ही जात जरा कधीकधी डंखधारी असू शकते..पण निंदकाचे घर असावे शेजारी तसे असाही कानपिचक्या देणारा एखादा वाचक असावा असं वाटतं..पण जोवर त्यांच्या कॉमेन्ट्स आपण इतरांच्या ब्लॉगवर वाचतो तोस्तर...एकदा का हा गडी आपल्या ब्लॉगवर आला की कुठून आली ही पिडा असं वाटतं...तरी एक बरंय जे ब्लॉगर्स कॉमेन्ट्स अप्रुव्ह करुन मगच प्रदर्शित करतात ते निदान यांना लांबुनच घालवून देऊ शकतात पण माझ्यासारखे ब्लॉगर्स कुणी काही लिहिलं तरी ते तसंच ठेवतात...आजकाल ब्लॉगिंगचा प्रसार जास्त झालाय का माहित नाही पण निदान माझ्याकडे तरी निनावी माणसं फ़ार दिसत नाहीत...

५. गडबडीत असणारे वाचक...हे वाचक मला फ़ार आवडतात..एक म्हणजे बर्‍याचदा हे फ़क्त वाचक असतात. म्हणजे यांचा स्वतःचा ब्लॉग नसतो पण तरी यांना बर्‍याच जणांचे ब्लॉग वाचायचे असतात. मग त्यातही तुमची एखादी पोस्ट आवडली किंवा काही पटलं नाही तर अगदी इंग्रजी किंवा मिंग्लिशमध्येतरी ते एखादी ओळ तुमच्यासाठी लिहून जातील....नेहमीच यांच्याकडून हे होत नाही पण कधीतरी ते तुमचे वाचक म्हणून तुमच्या ब्लॉगसाठी इतकं तरी करतील म्हणून म्हणायचं गडबडीत असणारे वाचक...

६. परतफ़ेड वाचक....खरं तर हे वाचक म्हणजे दुसरे ब्लॉगरच असतात..काही वेळा नेमकं आपण म.ब्लॉ.नेटवर जायला आणि यांची एखादी पोस्ट तुम्हाला भुलवायला एकच गाठ पडते. मग तुम्ही अगदी आवर्जुन त्यांना प्रतिक्रिया लिहिता आणि मग त्याद्वारे तुमच्या ब्लॉगवर येऊन हे ब्लॉगरही तुमच्या ब्लॉगवर येऊन एखादी प्रतिक्रिया देतात..सुरुवात निव्वळ परतफ़ेडीने होते पण जर एकमेकांच्या ब्लॉगवरचे विषय नेमकेच एकमेकांना पटले की मग अजून एक, अजून एक करता हे वाचक आणि तुम्ही एकमेकांचे क्र.२ चे वाचकही बनतात..शेवटी मराठी ब्लॉग-विश्व म्हणजे”एकमेका सहाय करू अवघे लिहु ब्लॉगे’ आहेच की...मी नेहमी माझ्या ब्लॉगवर प्रतिक्रिया देणार्‍यांचे ब्लॉग किमान एकदा वाचून पाहाते आणि खरं तर त्यामुळे कित्येकवेळा मला असे अनेक छान छान ब्लॉग मिळतात जे मग नंतर कायम वाचले जातात..त्यामुळे ब्लॉगविश्चातली ही आणखी एक महत्वाची जात म्हणायला हरकत नाही..

७. मूक वाचक....सगळ्याच ब्लॉगवर आणि तेही मराठी ब्लॉगवर फ़ार मोठ्या संख्येने आढळणारा वाचकांचा प्रकार म्हणजे मूक वाचक...खरं तर कुठल्याही मराठी ब्लॉगवर जा, जर नियमितपणे लिहीणारा असेल तर ब्लॉग-हिट्स दहा-पंधरा हजार आरामात असतात तरी कित्येक पोस्ट्स कॉमेन्टवाचुन पडलेल्या असतात किंवा त्यावर फ़क्त क्र.१ आणि २ च्या वाचकांच्या प्रतिक्रिया असतात...नाही आवडलं तर तेही लिहावं पण काही तरी बोलावं की नाही असा प्रश्न पाडणारे हे सर्व वाचक...यांच्याशिवायही पान हलत नाही कारण लिहिलेलं कुणी वाचतंय ही भावनातरी यांच्यामुळे मिळते..पण जर हे सगळे जर एक एक करून बोलायला लागले तर मात्र संपुर्ण मराठी ब्लॉगिंग विश्व ढवळून निघेल...

मग राहिलंय का काही लिहायचं??? येऊ द्यात की प्रतिक्रियेत...

तळाच्या वरची टिप....ही पोस्ट वाचुन जर या ब्लॉगवरचे वरच्या सगळ्या प्रकारचे वाचक बोलायला लागले तर भरुन पावलं असं समजेन...


खरी तळटीप....याच पोस्टवरुन प्रेरणा घेऊन कुणी आता ब्लॉगर्सचे प्रकार पोस्ट लिहायला हरकत नाही...मी त्यासाठी महेंद्रकाका आणि हेरंबला टॅगतेय...आणि त्यांनी आणखी कुणाकुणाला शोधून आणि नवे नवे पोस्ट्स टॅग करून ही साखळी थोडी खेचावी अशी विनंती....

Friday, March 26, 2010

माझे स्वयंपाकघरातले प्रयोग भाग अमुक अमुक....

एक केकची रेसिपी (ती पण खरी उधारवाली) काय टाकली आणि आता ही बया पण त्या इतर गृहिणींसारखी पदार्थांचे फ़ोटो आणि रेसिप्या देऊन छळणार की काय असं अजिबात वाटू देऊ नका आणि तरी त्या निदान पाककुशल असतात म्हणून पदरात काही बरं तरी पडतं.....काय आहे खादाडी राज्याचा प्रधान सेनापती (आपल्याला जाम आवडली बाबा ही उपमा.(आणि उपमा ऍज अ खाद्यपदार्थपण)...आले कंस, कंसातले कंस आणि सगळंच अष्टप्रधान मंडळ)) असो...हा तर काय खात आपलं सांगत होते...की या प्रधान सेनापतीचा मुक्काम सध्या इथेच जवळपास आहे आणि त्याचा मुक्काम इथे असला की तो खादाडी पोस्ट टाकून टाकून मारे जळवत असतो...(असं निषेध करणार्‍यांना वाटतं...) पण खरं असं आहे की तो बिचारा आठवणींवर कसंबसं उकडलेलं अन्न पोटात ढकलत असतो आणि आपण त्याने आधी खालेल्या खादाडीचा हेवा करत असतो...नाय बा हे काय पटल नाय....


ओरेगाव बाकी कसंही असलं तरी एक फ़ायदा म्हणजे इथं समदं फ़्रेश मिळतं..म्हणजे फ़ळं, भाज्या, खेकडे (ते तर सगळ्यांनाच माहितेत..) पण तरी आमचा जीव पापलेटसाठी घुसमटत होता...काय आहे तलापिया, सॅमन आणि गेला बाजार(बाजार म्हटलं तरी कोळणीच्या पाट्या आठवतात...) कोळंबी म्हटलं तरी आपले मुंबईसारखे मासे खाल्यासारखे वाटत नाही..इथली कोळंबीपण जराशी वेगळीच लागते...त्यामुळे पापलेटवर उडी पडणार हे तर साहजिकच आहे म्हणा आणि एकदाचं इथलं एक चायनीज दुकान मिळालं...आणि हिंदी-चीनी भाई भाई म्हणून आम्ही लगेचच गाडी तिथं वळवली....तर खरंच हिंदी-चिनी भाई भाई ऐक्य फ़्रोजन सेक्शनमधल्या पापलेटरुपाने जणू काही आमची वाटच पाहात होते...चला फ़्रोजन तर फ़्रोजन ’प्रॉडक्ट ऑफ़ इंडिया’ तर आहे...लगेच दोन्ही हातांनी माझ्या नवर्‍याने सगळाच बाजार उचलायला सुरुवात केली..एखादी कोळीण पुढ्यात असली तर काय खुश झाली असती याच्यावर असं मनात म्हणता म्हणता त्याला निव्वळ आपला फ़्रिजर छोटा आहे या कारणास्तव थांबवलं आणि तोही संपले की इथेच येऊ या बोलीवर थांबला....

आणि मग लगेच माझी मूळ सावंतवाडी गाव असणारी मैत्रीण आहे..अट्टल कोकणी रेसिपी हवी असली की मी तिचं डोकं खाते....तिच्या हुकमाबर तडक त्यातले काही पापलेट ओव्हन आणि काही तव्यात जाऊन पडले (आणि त्यानंतर लगेचच पोटात हे काय सांगायचं??) भरलं पापलेट मग ते भाजा नाहीतर तळा छानच लागतं नाही??...आणि सोबतीला कोळंबीचं कालवण आणि जीव शांत करायला सोलकढी...काय हवं अजून पोटोबा तृप्त करायला??

परमेश्वरावराच्या प्रथमावतारावर आमचं खूप प्रेम आहे..आणि असं अधेमधे आम्ही ते व्यक्तही करत असतो...शिवाय कुठच्याही रेस्टॉरंन्टमध्ये जा, काही करा, घरचं खाऊन लंबी ताणताना जे सूख मिळतं ते नक्की बाहेरच्या खाण्यात आहे का?? आता हे म्हणताना इथे आम्हाला बाहेर खाऊनही लंबी ताणता येईल असे पर्याय आहेत का अशी (कु)शंका मनात आल्यास सरळ एक मसाला नाहीतर मघई पान तोंडात टाका आणि विसरा ते सगळं...फ़ोटो कसे वाटले ते कळवायला विसरू नका....

तळ (आणि फ़ार्फ़ार important) टिप....चपात्या कर्टसी आई..नाहीतर कुणाच्या दाताखाली ती आधीची चपातीची पोस्ट अडकली असेल तर उगाच त्यांना आजचं शुक्रवारचं सामिष जेवण पचायचं नाही.....खरंतर त्या अनुभवावर म्हणायचं तर सगळेच प्रयोग आहेत स्वयंपाकघरातले..निदान एक चांगली स्वयंपाकीणकाकू (काका पण चालतील) मिळेपर्यंत. म्हणून या पोस्टचं नावही तसंच दिलंय...अरे बापरे...टिपेलाच इतकं....कुणी वाचकाने टिपेचा सूर नाही लावला म्हणजे बरं.....(माहित्येय जरा एकदमच पुअर पीजे होता...पण जरा वातावरण वाईच हलकं झालं असेल अशी आशा...)

Wednesday, March 24, 2010

त्याची बॅकपॅक

आठवड्यातून दोनदा तरी थोड्या मोठ्या मुलांच्या गोष्टीच्या कार्यक्रमासाठी वाचनालयात जाणं होतं..लहान मुलांच्या भावविश्वात मोठ्यांनाही रममाण करणारे या वाचनालयातले पाचही जण मला आवडतात आणि त्यांची गोष्ट सांगण्याची हातोटी अक्षरशः भुरळ घालते. अगदी चुकवू नये असाच कार्यक्रम..


जवळ जवळ प्रत्येक गोष्टींच्या दिवशी मी या मुलाला लायब्ररीत पाहाते...लक्ष जावं असं कॅरेक्टर वाटायचं...वय असेल जास्तीत जास्त पाच-सहा वर्षे, अमेरिकन, गोल चेहर्‍यासारखाच गोल गोल काचांचा चष्मा, हिरव्या नाहीतर पिवळ्या रंगाची फ़्रेम... खूपदा त्या फ़्रेमचा रंग कपड्याशी मिळताजुळता असणारा..थोडी मान वर करून सोबतीला आलेल्या आजीशी बोलायची सवय...कायम पाठीला छोटीशी बॅकपॅक....कौतुकही वाटायचं की या इतक्याशा वयात आपलं ओझं आपणंच वाहातोय आणि कधी कधी त्याच्या आजीचं आश्चर्य ’कधीच कसं घेत नाही ही हे पाठुंगळीचं ओझं?’...आजी मागे बसलेली आणि नातू गोष्टीची मजा घेतोय...त्यातल्या प्राण्यांना पाहुन हसतोय, कधी पुढे काय होईल याचे आडाखे बांधताना मोठ्याने बोलतोय..त्याच्या थोड्या वेगळ्या चष्मा आणि बॅगमुळेच बहुतेक माझ्या लक्षात राहिला..पण त्यापलिकडे कधी काही वाटलं नाही...आणि खरं तर कार्यक्रम सुरु झाला की मुलांसाठी सांगितल्या जाणार्‍या गोष्टींमध्ये मी अजुनही तितकीच रमते...इथे तर अगदी पपेट वगैरे वापरून सगळेच गुंग झालेले असतात. त्यामुळे नंतर निघेस्तोवर लक्षातही येत नाही वेळ कसा गेला..

इतर वेळी धावत-पळत वेळ गाठणारे आम्ही काल कसे काय ते वेळेच्या आधी पोहोचलो आणि कार्यक्रम सुरु व्हायच्या आधीची धावपळ पाहात उगाच वेळ काढत खुर्चीवर बसलो. लोक येत होते, आपल्याला आवडतील तशा जागा घेत होते, मुलांना खाली जाजमावर बसवून मागे जात होते आणि आमचं लाडकं ध्यान आलं..आज हिरवा चष्मा आणि हिरवाच टी-शर्ट... असलं गोड दिसत होतं आणि नेहमीप्रमाणे आजीबरोबर चाललेल्या गप्पा..आज जरा निवांत होतो आम्ही म्हणून त्याच्याचकडे पाहात होते..सरळ चालत येत बसण्यासाठी हा मुलगा वळला आणि मी जे पाहिलं त्याने मला खरंच ’देव देव म्हणून कुठे असतो रे तो??’ असं जोरात किंचाळावंसं वाटलं....

त्याच्या बॅकपॅकमधुन बाहेर आलेल्या आणि शर्टच्या आतुन पोटाकडे जाणार्‍या नळ्या मला पहिल्यांदीच दिसल्या...आतापर्यंत अशा प्रकारे ऑक्सिजनची नळकांडी घेऊन फ़िरणारे बरेच वयस्कर मी अमेरिकेत नेहमी पाहाते आणि जगण्याकडे एकंदरित आशेने पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन मला भारावुन टाकतो. पण आज पहिल्यांदीच असं काही आजाराचं ओझं आपल्याच पाठीवर घेऊन फ़िरणार्‍या या पिलाला पाहून मात्र कोलमडले...साफ़ कोलमडले....आज कुठली गोष्ट सांगितली गेली काहीच कळत नव्हतं...काय झालं असेल त्याला? तात्पुरतं असेल ना? अनेक प्रश्नांनी भरलेलं डोकं....आणि एक खिन्न करणारा अनुत्तरित प्रश्न...देवा, तू खरंच आहेस का?????????

Sunday, March 21, 2010

भात्यातला नवा.....चाकू

शॉपिंगची आवड बायकांना जास्त असते हे म्हणणं साफ़ खोट ठरवतील (आणि खरं ते तसं आहेही....) असे अनेकजण माझ्या माहितीत आहेत..आणि त्यात सगळ्यात वरचा क्रमांक मी माझ्याच नवर्‍याचा लावेन...एकतर सारखं लॅपटॉप घेऊन बसणं...(नाही अज्जिबात रागाने लिहित नाही मी) आणि मग त्यात डिल्स टु बाय, इ(ईईईईई) बे सारखं निदान एक(?) पान सुरु असणं हे शॉपिंगचं पहिलं लक्षण नव्हे का? नव्वद टक्केवेळी दुकानात गेल्यावर सगळ्यात पहिले आम्ही पुरुषांच्याच विभागात वळतो आणि मग तिथे ट्रायल रुम ते आयल अशा फ़ेर्‍यांमध्ये उरला वेळ तर मग महिलाविभाग असंही होतं...एकदा जरा जास्त तीव्र निषेध झाल्यामुळे ना तेरा ना मेरा करत आमची पावलं गृहोपयोगी या सदरात मोडणार्‍या विभागात वळली आणि तिथेच कळलं आपल्या नवर्‍यातला कसाई कसा लगेच जागा होतो ते...
खरं तर आमचं लग्न व्हायच्या आधीच या पठ्ठ्याने खायची प्रत्येक प्रकारची वस्तू वेगळ्या चाकुने कापता येईल याची सोय आधीच केलीय...नाही विश्वास पटत?? हा फ़ोटो पहा....

टि.व्ही वरती आयुष्यभर टिकणार्‍या सुर्‍यांची जाहिरात करणारा तो बुटकेलेसा शेफ़ टोनी आणि त्याची ती मिरॅकल ब्लेड आठवतेय का? आधी तो एक चाकू घेऊन टॉमेटो कापून दाखवतो आणि तीच सुरी इतर तमाम वस्तू कापल्यातरी परत टॉमेटो कसा त्याच शिताफ़ीने कापते...त्यानंतर मग कांदे-बटाटे कापायचा दुसरा, फ़िले करायचा अजून एक, चॉपिंगसाठी वेगळा असं करत करत डझनभर चाकूंची चळत आपल्यापुढे उभी करतो आणि मग मानभावीप्रमाणे याची किंमत खरं तर तीन आकडी पण तुमच्यासाठी चाळीस लावले बघा...आत्ताच्या आत्ता फ़ोन करा हा कार्यक्रमही आमच्याकडे काही काही शनिवारी तसंही काय लावायचं इथे टिव्हीवर या सदराखाली चालु असायचा..मग एकदा मी सहज म्हटलं अरे तुझे काही चाकु अगदी त्याच्याकडच्यासारखेच वाटताहेत असं म्हटल्यावर अगं मी तोच सेट युएसमध्ये आल्यावर घेतला होता अशी लगेच कबुली दिली त्याने...आ वासुन मी पाहातच राहिले... अरे बायकापण इतक्या पटकन भूलत नसतील त्या जाहिरातीला..मग तरी ’सगळे टिकले नाहीत का?’ (या चाकुंना आयुष्यभराची गॅरेंटी असते असं म्हणतात) या प्रश्नावर ’त्यातले काही मग मी भारतात गेलो तेव्हा इथे-तिथे वाटले..मला लागतील तेवढेच मी ठेवले’...ही कबुली नं.२....काही नाही मी फ़क्त तो आधीचा आ मिटला....
आता इतके चाकू घरात आहेत तर गप्प बसायचं ना?? इतकं आहे तरी चिकन कापायला जास्त सोपं म्हणून एक सुरासदृष्य मोठा चाकूही घेतला..."मी कापतो. तुला माहित नाही हा किती उपयोगी पडेल ते..आणि शिकागो कटलरीचे चांगले असतात माहितेय का तुला?" "बरं बाबा घे"...आता इतकं करून थांबेल तर तो कसाई कसला?? एके दिवशी सु की दुर्दैवानं कोह्ल्स या आमच्या अतिलाडक्या डिपार्टमेंट स्टोअरचं २०% सवलतीचं कुपन दारात आलं. त्यामुळे नको असताना आम्ही शनिवार साजरा करायला तिथे गेलो...(तो वरचा निषेध प्रसंग तिथलाच आहे) तर गृहोपयोगी सदरात मी जरा खरंच उपयोगी म्हणजे तवे, वाडगे असं काही पाहात असताना तिथेच क्लियरन्स (?) मध्ये आमच्या कसायाला शिकागो कटलरी या जरा चांगल्या (आणि खरं तर महाग..यांचे चाकू इतरवेळी कपाटात कुलुपबंद असतात...) कंपनीच्या दोन चाकूंना त्यांनी सो कॉल्ड क्लियरंस भावात काढलं होतं ते नेमकंच दिसलं..

"अरे, पण आहेत नं इतके आधीच घरी??"..."नाही गं मऊ फ़ळं यातल्या लहान चाकुने काय मस्त कापली जातील माहितेय का? आपल्या आधीच्या मोठ्याला हे दोन छोटे भाऊ छान शोभतील, शिवाय २०% आहे नं आपल्याकडे??" "अरे मऊ फ़ळं मी दातांनीच कापीन ना" हे माझे उद्गार ऐकायला येणं शक्यच नव्हतं आमच्या ताफ़्यात हे दोन नवे शिलेदार दाखल झाले...
मध्ये मंदीमुळे काही काही चांगली दुकानं बंद झाली तेव्हा त्यांच्या चाकू विभागातलं काही आपल्याकडे (’आपण भारतात जाऊ तेव्हासाठी गं’--लाडाने तो) येईल का याचीही चाचपणी झाली पण माझ्या भाग्याने मंदीतही अशा लाडक्या सेट्सची किंमत तीन आकडीच्या खाली उतरली नव्हती म्हणून निव्वळ वाचलो. परत कधीही चाकूने बोट कापलं तर "इतके चाकू घेतलेत पण तू नेहमी चुकीचा चाकू वापरतेस" हे डाफ़रायचं किंवा "या गोष्टीसाठीचा वेगळा चाकू घ्यायला पाहिजे सांगतो तुला" अशी धमकी....
नव्या घरात आल्यावर हे सगळे चाकू ठेवायला मला जरा अडनीडं वाटू लागलं म्हणून मी म्हटलं की एक नुसता चाकू ठेवायचा लाकडी बॉक्स घ्यायला पाहिजे.खरं तर तू इतके चाकू घेतलेस पण तो बॉक्स बरा घेतला नाहीस कधी असंच म्हणायचं होतं पण तसं काही न म्हणता फ़क्त हे घेऊया म्हटलं म्हणजे आपल्याच हाताने पायावर चाकू आपलं धोंडा मारून घेतला..आता कुठल्याही दुकानाच्या चाकू विभागात आमच्या पायांचे तुकडे पडायला लागले...अरे चाकू नाहीत फ़क्त बॉक्स.. पण समदं ऐकायला पाहिजे नं या गड्याने....शेवटी एका मेसिजमधून चाकु सकट बॉक्स आमच्या स्वयंपाकघरात येऊन पडलाच...’अरे मग फ़ायदा काय??’ - करवादले मी....’अगं मागे मी भारतात नेलेले चाकू तसेही जुने झाले असणार आतापर्यंत तर यावेळी यातले चाकू नेऊ आणि मग हा बॉक्स आपल्यालाच...; -शांतपणे इति तो...

आता चाकूचा विषय कुठल्याही कारणाने बंद असं करुन मी गप्प झाले पण माहित नाही काय झालं पुन्हा एकदा १५% चं कुपन आलं, पुन्हा आम्ही त्याच त्या गृहोपयोगीमध्ये गेलो आणि यावेळी फ़ूड नेटवर्कचं नाव ल्यालेला चाकू दिमाखदारपणे क्लियरन्समध्ये त्याच त्या कसायाची वाट पाहात थांबला होता..यावेळी तर कार्टमध्ये फ़क्त माझेच नवे घेतलेले कपडे होते त्यामुळे केवळ नवर(?)दया या नव्या कॅटेगिरीखाली हा चाकू आमच्याघरी आला...हा मात्र शेवटचा...


आता बॉक्समधली जागा तर कधीच संपलीय पण ड्रॉवर्सही भरलेत..म्हणून या नव्या चाकूचे लाड त्याच्या मालकाला काय काय कापायची संधी देऊन मी मात्र पुन्हा तोच तो दुसरा लाकडी बॉक्स घ्यायची दुर्बुद्धी सुचू नये याची मनोमन प्रार्थना करतेय....आणि आमचा कसाई मात्र भात्यात कुठला नवा चाकू टाकता येईल का हे पाहात असेल...

Thursday, March 18, 2010

मस्त मस्त मस्त...

’गोरे गोरे गाल, गालावर एक तीळ,.......जणू सौंदर्याच्या खाणीत हवालदार’ असं म्हणणारा योगेश सारखा सारखा जाहिरातीत दिसायला लागला आणि आता हा कुठला अजून एक दुसरा रिऍलिटी शो असं विचार करायच्या आधीच झी मराठीवर महाराष्ट्राचा सुपरस्टार हा कार्यक्रम सुरू झाला आणि का कुणास ठाऊक हे प्रकरण जरा हटके आहे हे लगेच जाणवलं...सुरूवातीला निवेदन थोडं अति वाटलं पण त्याकडे आरामात दुर्लक्ष करता येईल अशी कमाल करणारे कलावंत पाहायला मिळाले. खरं तर त्याच दरम्यान आई इथे असल्यामुळे झी मराठीचे सगळेच कार्यक्रम गळ्यात पडले होते. पण ती परत गेल्यावरही न चुकता पाहिला तो हाच कार्यक्रम..


रिऍलिटी शोचा अतिरेक सध्या चालु आहे पण तरी त्याही अवस्थेत हा कार्यक्रम बर्‍याच वेगळेपणांमुळे लक्षात राहिल. सगळ्यात मुख्य म्हणजे जी मुलं-मुली अंतिम फ़ेरीपर्यंत आली ती खरोखरच खूप टॅलेन्टेड वाटली.आतापर्यंतचे कार्यक्रम गाणी किंवा नाचाचे असल्याने त्यात त्या त्या विभागातल्या प्रथितयश कलावंतांची थोडी फ़ार नक्कल करून सादरीकरण असायचं आणि त्याचाच परिणाम म्हणजे दुसर्‍या-तिसर्‍या सीझनला अगदी आता जजेस काय बोलणार इथपर्यंत तोचतोचपणा आलाय...काही नाविन्यच वाटत नाही..फ़क्त भाग घेणार्‍यांचे चेहरे बदललेत इतकाच काय तो फ़रक.

सुपरस्टार मध्ये मात्र प्रत्येक टिमला आपलं सादरीकरण जवळजवळ स्वतःलाच लिहावं लागत होतं आणि आयत्यावेळच्या राउंडला तर समोर प्रसंग दिला आणि मग लगेच त्यावर सादरीकरण त्यामुळे प्रत्यक्ष सादरीकरण पाहिल्याशिवाय काय होईल काहीच सांगता यायचं नाही....यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक प्रवेश पाहाणं हे एक छोटंसं नवंकोरं नाटुकलंच पाहतोय आणि तेही नेहमीच दर्जेदार यामुळे स्पर्धाही अगदी निकोप पण अटीतटीची.. जे स्पर्धक स्पर्धेबाहेर गेले ते सगळेच एका ताकदीचे असून त्या भागात प्रभाव न पाडल्यामुळे गेले असं आमचं एक मत...अरे हा कसा काय राहिला असा प्रश्न पहिल्या दहानंतर पडलाच नाही..उलट अरे ’बॅड लक याचं’ किंवा ’ही आता एखाद्या सिरियलमध्ये तरी नक्की दिसेल बघ’ असे सकारात्मक विचार एलिमिनेशनच्या वेळीही असायचे..हे झालं कार्यक्रमाच्या एकंदरित सादरीकरणाबद्दल...

पण सगळ्यात जास्त लक्षात राहिल ती या स्पर्धकांनी सादर केलेली मनाला भिडणार्‍या विषयांवरची स्कीट्स..आताच्या भारतीय तरूणांमध्ये खदखदलेला असंतोष व्यक्त करणारे बरेचसे स्कीट्स सादर झालेत..मग कसाब, राजकारणी, गरिबी, बॉंबस्फ़ोट अगदी घटस्फ़ोट असे विषय असो की व्हॅलेंटाइन डे सारखा तसा वादात असणारा विषय...विनोदी आणि गंभीर दोन्हीही प्रकार इतक्या सुरेखपणे हाताळले गेलेत की खरं तर बरंच कौतुक या कार्यक्रमाला आणि विशेष करून स्पर्धकांना मिळायला हवं म्हणजे मिळालंही असेल पण माझ्यासारख्या इतक्या दूर राहणार्‍या व्यक्तीला ते कळणंही कठीण आहे म्हणा...

ज्यांनी अजिबातच ही स्पर्धा पाहिली नसेल त्यांच्यासाठी खास काही(खरं तर फ़क्त थोडे प्रवेश शोधणं कठीणच आहे पण...) लिंक्स इथे देतेय. ते व्हिडिओ पाहिले की नक्की हा सीझन पाहिला जाईल याची खात्री आहे...














सध्याच्या ज्वलंत प्रश्न मुंबई कुणाची, दंगे होतात त्याबद्दलचा एक चांगल्या दर्जाचा प्रवेश, एक बाप, आजच्या युगात जिनी व अल्लादिन अवतरले तर, एक भन्नाट लग्न आणि अगदी आता आता सादर झालेली कॉमन मॅनची कथा...वेगवेगळ्या मूडचे आणि आजच्या पिढीबद्दल एकंदरित आशादायी चित्र उभं करणारे असे अनेक प्रवेश पुन्हा पुन्हा पाहण्यासारखेच आहेत...

ज्यांच्यासाठी या स्पर्धा घेतल्या जातात ते स्पर्धक हे या कार्यक्रमाचं खरं यश आहे आणि त्यांना ते श्रेय द्यायलाच हवं...मुलांची टिम तर इतकी छान आणि सगळेच एकसो एक होते की शेवटच्या दहातले सगळेच लक्षात राहतील...मुलीपण खूप छान सादर करत होत्या..आता येत्या रविवारी अंतिम सोहळा असेल. कोण जिंकेल कोण हरेल याहीपेक्षा सगळीच जण या कार्यक्रमाचा पहिलावहिला सीझन असतानाही आपापली वेगळी छाप पाडू शकले हे महत्त्वाचं...त्या सर्वांसाठी ही पोस्ट...यांच सार्‍यांचंच काम खूप आवडलं..आणि मध्ये रिऍलिटी शो अज्जिबात पाहायचे नाही हे ठरवलं होतं ते असे कार्यक्रम असणार असतील तर असं काही ठरवलं होतं हेही विसरून जायला होईल....

थोडक्यात सांगायचं तर मस्त मस्त मस्त....

Monday, March 15, 2010

९७,५१,१,.... ... ...

काय आकडेमोड चालु आहे आज ब्लॉगवर असा प्रश्न पडला असेल ना? नाही नाही कुठली नंबर सिरीज नाही आहे किंवा कोडंही नाही?? ९७ वी पोस्ट टाकताना त्या ५१ शिलेदारांचे आभार मानत वाढदिवस क्रमांक १ साजरा करतोय आज माझा ब्लॉग, इतकंच सांगताहेत हे आकडे. ९७,५१,१,...अशी जगावेगळी सिरीज आहे ही आणि याचे पुढचे क्रमांक उणे नक्कीच नसतील...पुढच्या वर्षी निदान शेवटचा आकडा २ नक्कीच असेल.(कारण त्याला असावंच लागेल) फ़क्त सुरुवातीच्या दोन आकड्यांचं गणित आत्ताच नाही मांडता येणार आणि ते कुठल्याही गणितीला सांगता येणार नाही...आहे नं मजा??


खरं सांगायचं तर माणसांबद्दलची विरक्ती म्हणा किंवा इथल्या कडाक्याच्या थंडीने येणारा एक विचित्र एकांडेपणा म्हणा, या पार्श्वभूमीवर सुरू केलेला हा ब्लॉग म्हणजे बरेचदा माझा स्वतःचा स्वतःशी सुरू असलेला संवाद होता. कुणाशीही न बोलताही बर्‍याच जणांशी व्यक्त होण्याचं माध्यमच जणू. पण नकळत हा संवाद इथे प्रतिक्रिया देणार्‍या वाचकांशी सुरू झाला आणि घरगुती विषयही ब्लॉगवर निःसंकोचपणे मांडले गेले. लौकिक जगात भेटतात तशीच टिकाऊ आणि विसरून जाणारी दोन्ही प्रकारची मंडळी इथे भेटली. त्यांचं येणं आणि मुख्यत: जाणं दोन्ही आधीच गृहित धरलं होतं पण तरी चुटपुट तर लागतेच पण त्याचवेळी मनापासुन आठवण काढणारी थोडी जरी असली तरी जास्त जवळीची माणसंही भेटू लागली. माझे आधीचे मित्र दीपक, तन्वी आणि महेंद्रकाका यांच्याशी असलेली मैत्री ब्लॉगिंगमुळे आणखी वाढली तर भाग्यश्री, हेरंब, रोहन असे अनेक नवे मित्र-मैत्रीणी भेटले ज्यांची ओळख फ़क्त ब्लॉगपुरता मर्यादित राहिली नाही...या ब्लॉगचं इतकं सुंदर आणि साजेसं विजेट बनवल्याबद्दल भुंगादादांनी आभार मानु नकोस असं कधीच सांगितलंय पण त्याचा उल्लेख या पहिल्या वाढदिवशी केलाच पाहिजे आणि या ब्लॉगच्या निमित्ताने मराठी मंडळींनी जी माझी दखल घेतली आहे त्याबद्दल त्यांचेही आभार...
आणखीही ब्लॉगवर आवर्जुन प्रतिक्रिया देणारे सर्वच जण मिळून जणू काही ’कारवॉं बन गया’ ज्यांच्यामुळे वर्षभर मी काही ना काही लिहित गेले....

बर्‍याचदा काय लिहू असा प्रश्नही पडायचा. तरी आठवड्याला एक म्हणजे महिन्याला जास्तीत जास्त चार-पाच या गुणाकाराने वर्षाकाठी साधारण साठेक पोस्ट्सचं टार्गेट ठेवलं होतं..पण डिसेंबरमध्येच तो आकडा ओलांडला तेव्हा निदान शंभर पोस्ट्सतरी करूया असं नवं लक्ष्य स्वतःसाठी ठेवलं आणि साधारण त्याच्या जवळपास आलेय...कदाचित तीन पोस्ट्स टाकुही शकले असते पण मध्येच बर्‍याच इतर गोष्टींना प्राधान्य द्यावे लागले.

मागच्या पाडव्याला एक छोटी गुढी उभारली होती आणि आता वर्ष पूर्ण करताना ते ५१ साथीदार आणि बरेचसे मूक वाचक ज्यांचा १५०००+ आकडा माझ्यासारख्या नवख्या ब्लॉगरसाठी खूपच प्रोत्साहन देणारा आहे या सर्वांसाठी आजची पोस्ट. शिवाय वाढदिवसाचा केक खास मराठी मंडळीवर ठेवलाय आणि नवीन वर्षाचं औचित्य साधून ब्लॉगचं रुपडं थोडं बदललंय...आपल्याला आवडेल आणि येत्या वर्षी या ब्लॉगवर आपण नक्की यापेक्षाही जास्त प्रेम कराल ही आशा..

पाडव्याच्या अनेक अनेक शुभेच्छा...नववर्ष भरभराटीचं जावो...

Saturday, March 13, 2010

दिसला गं बाई दिसला

ओरेगावात आल्यावर पहिल्याच आठवड्यात फ़्रीवेवर असताना नवर्‍याने विचारलं होतं ’तुला माउंट हुड दिसला का?’ ’कोण हा??’ असं वैतागून म्हणणार होते पण नव्या जागी आल्या आल्या जागेवरूनच वाद नको म्हणून फ़क्त ’नाही’ इतकंच म्हटलं..त्याला वाटलं असणार इतके महिन्यांचं प्लानिंग करुन आपण घर बदललं तर या बयेने निदान नव्या जागेची सर्वसाधारण माहिती काढली असेल..आता त्याला कुठे सांगु घर सोडावं लागण्याचा सल आणि किती मोठा दगड मनावर ठेवला होता ते? असो...खरं तर अद्यापही मनाने मी कधीकधी आमच्या स्प्रिंगफ़िल्डच्या घरात असते त्यामुळे इथे यायचं पक्कं ठरलं तेव्हा नव्या जागेची माहिती काढण्याऐवजी जुन्याच जागेत गुंतलेलं मन मोकळं करत राहिले...वाटतं याबाबतीत पुरुषांपेक्षा स्त्रीया जरा कांकणभर अधिकच हळव्या असतात...असो..तो विषय नाही आज मी जरा दोन घडे जास्तच तेल ओतलंय..

तर हा ’माउंट हुड’ इतकं त्याने विचारुनही का कोण जाणे पण माहितीच काढली गेली नाही..पण आमच्या नवरा-बायकोत थोडा सुसंवाद व्हावा म्हणून त्यालाच विचारलं तेव्हा तसं कुतुहल जागंही झालं होतं पण...हा पण आहे नं तो मला ओरेगावात बराच त्रास देणार आहे एकंदरित..(चला भरकटा परत एकदा....) माउंट हुड हा ओरेगावातला जवळ जवळ कायम बर्फ़ाच्छादित असणारा पर्वत आणि इथली लोकं उन्हाळ्यात वेड लागल्यासारखी त्या पर्वतापासून ते पॅसिफ़िक कोस्ट पर्यंत चक्क धावतात..hood to coast असं नाव असणार्‍या या शर्यतीची नोंदणीच्या दिवशीच फ़ुल्ल होण्याचा तीन वर्षांचा रेकॉर्ड आहे...बापरे..ही शर्यत पाहिस्तोवर ब्लॉगवर काही लिहायचं नाही असं खरं तेव्हा ठरवलं होतं पण...ह्म्म्म हा पण....

काही नाही असेच अधुनमधुन माउंट हुड, माउंट हुड माझा नवरा करत होता पण आलो तेव्हा पाऊस आणि मागेच म्हटलं होतं ते डिमेन्टरवालं धुकं कमी व्हायची काही लक्षणं नव्हती...मला तसंही नवी जागा म्हणून रुळायलाच वेळ लागत होता तिथे हे माउंट हुड शोधायचं नवं लचांड कुठे मागं लावून घेऊ? म्हणून मीही काही विषय वाढवत नव्हते..आणि यार भटकंती करायला आवडते म्हणून काय सगळे डोंगर मला लगेच माहित व्हायला हवेतच का? (त्याच्या टोमण्याला तो कधीच वाचणार नाही हे माहित असूनही दिलेलं उत्तर आहे हे)..

एकतर मुव्हिंगवाल्यांनी सामान पोहोचवण्याची मुदत साधारण १४ दिवस (सरळ १५ दिवस किंवा दोन आठवड्याला राउंड ऑफ़ का नाही करत हो हे??) दिल्यामुळे कमीत कमी सामानात राहायची शिकस्त चालु होती आणि अशात एका रविवारी एकदाचा सामानाचा ट्रकोबा आला..(पक्षी: साधे असतात ते ट्रक आणि १६ चाकीबिकी असतात ते ट्रकोबा). आणि आल्यावर हे सगळं सामान एकत्र का आलं असं झालं...असो...(पक्षी: अगं बये पोस्टचा विषय काय? तुझं चाललंय काय??)...आधीच टिचभर वाटणार्‍या स्वयंपाकघरात ढिगभर बॉक्सेस आणि जरी सगळं फ़र्निचर आणलं नसलं तरी जे काही डाग (टि.व्ही, डायनिंग, रॉकिंग चेअर इ.इ...) आणि ५९ बॉक्सेस म्हटल्यावर काय होणार त्या बिचार्‍या दोन बेडरुमवाल्या अपार्टमेंटचं? काही नाही मध्येच आमचा मुलगा या सामानापाठी हरवुन जाईल की काय या विवंचनेत आम्ही नेटाने जागा करत कसेबसे दुपारपर्यंत संपुर्ण घर सामानमय होऊन बसलो...

नशीब आमचं एक मो चं ग्रिल (म्हणजे आपल्या चिपोटले इ. कुठल्याही मेक्सिकन भावांचा सख्खा भाऊ) आमच्या घराजवळचं आहे..त्यामुळे आमचा ट्रकर त्याचा ट्रकोबा काढण्याआधीच पळालो ते दुपारचं जेवण आणायला..आमच्या नशिबाने बर्‍याच दिवसांनी अगदी स्वच्छ सुर्यप्रकाशाचा दिवस आला होता. या अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या मुख्य एंट्रंसपेक्षा काही भाग मागच्या बाजुने जास्त जवळ पडतो त्यामुळे आम्ही मो साठी मागुन गेलो आणि परत येताना मागच्याच बाजुने आलो.

अपार्टमेंटसाठी उजवीकडे वळणार तोच मी किंचाळले "तो बघ" वॉव ...नवर्‍याच्या भाषेत सांगायचं तर जिसे ढुंढा गली गली वो तो हमारे पिछवाडे मिली.....अरे काय नजारा होता...स्वच्छ सुर्यप्रकाशाच्या पार्श्वभूमीवर देखणा पांढरा शालु चमकत होता. मागच्या बाजुला मोकळी रांच आहे त्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ट्रॅव्हेल चॅनेलवर स्विझर्लंडची दृष्य पाहातो ना तसंच हिरवळी आणि थोडंसं डोंगराळच्या मागे बर्फ़ाचा मुकुट डोकावतोय आणि हाच तो माउंट हुड हे सांगायला मला कुठल्याही साइट, जनरल नॉलेज आणि नवर्‍याचा होकार कसलीच गरज नव्हती....गाडीतच नवर्‍याला बसवुन लगेच सामानाच्या भार्‍यातुन कॅमेरा शोधुन लगोलग परत तिथेच जाऊन त्याचे फ़ोटो काढले हे वेगळं सांगायला नको...

आता जसजसे वसंतातले सुंदर दिवस येताहेत तसतसा हा माउंट हुड पाहायचा छंद अजून वाढतोय..काही ठिकाणाहून तर तो चक्क पुर्ण दिसलाय आणि अद्यापतरी संपुर्ण बर्फ़ाच्छादित दिसतोय..इथल्या वेदर रिपोर्टमध्येही नेहमी त्याची किती हजार फ़ुटाची बर्फ़ाची चादर आहे हे सांगितलं जातं..


जेव्हा जेव्हा हा दिसतो जवळ जवळ तेव्हा तेव्हा गाडी थांबवुन जवळ कॅमेरा घेतल्याचं सार्थक आम्ही केलंय...पोर्टलॅंड डाउन टाऊनच्या इथे जायचं असलं आणि स्वच्छ दिवस असला की अपार्टमेंटमधुन निघताना तो मागे असतो आणि मग हलकेच गाडीच्या उजवीकडे येतो आणि मग परत जाताना जर वेगळ्या रस्त्याने गेलो की बराच वेळ समोर राहतो...इतक्यात पुन्हा एकदा तो असाच संपुर्ण दिसला आणि राहावलं नाही म्हणून ही पोस्ट टाकतेय....आणि इतक्यांदा पाहिलं तरी ते पहिलं दर्शन कायम मनात राहिलंय आणि तेव्हाचं ते गुणगुणणं..."दिसला गं बाई दिसला..."

Wednesday, March 10, 2010

फ़ुलोरा...कोणास ठाऊक कसा..

लहान मुलं भेदरली की सशासारखी दिसतात आणि खेळत असली तरी पिंटुकल्या सशासारखीच..तशी सशासारखी भित्री भागुबाई तर असतातच म्हणा आणि त्यातुन आई नावाचं कवच सगळ्याच भितीपासून आपलं संरक्षण करेल असा एक आत्मविश्वास असतो या वयात. असे हे आपले पिंटुकले ससे, मनावर दगड ठेऊन आपण त्यांना पाळणाघर, शिशुवर्ग इ.मध्ये पाठवतो..अशा पिंटुकल्यांसाठीच हे गाणं आहे हे, आज ही पोस्ट लिहिताना अचानक उमगलं..नाहीतर लहान असताना या गाण्यावर नाच चांगला व्हायचा म्हणून बर्‍याचदा निवडलं जायचं..
आमचा ससुल्या आता धीटपणे पाळणाघरात राहतो म्हणून तो परत आला की त्याच्यासाठी हे गाणं म्हणते शिवाय आता येऊ घातलेल्या इस्टरच्या मुहुर्तावर बाजारात सगळीकडे ससुले दिसू लागलेत म्हणून या महिन्यात जमतील तितक्या ससुल्याच्या आठवणी काढल्या जातील.....
कधीतरी मोठा झाल्यावर तोही ही गाणी गाऊन दाखवेल या आशेने आजकालची गाणी असतात...पण अर्थात एकतर परदेश त्यामुळे नाही तरी सारखं सारखं पु.ल. ऐकते त्यावेळी वाटतं त्या शंकर्‍यासारखं मेरी जिंदगी में मुहब्बत का सारखं काहीतरी बरळेल आणि त्यावेळी कदाचित ती पण गम्मतच वाटेल असो...सध्या तरी आपणंच गाणी म्हणणं हेच सुरू आहे...हे गाणं कुणी लिहिलंय ते माहित नाही आणि चाल शाळेतल्या कुठल्याही कवितेसारखीच..मायाजालावर व्हिडीओपण आहे...


कोणास ठाऊक कसा पण सिनेमात गेला ससा
सशाने हलविले कान घेतली सुंदर तान
दिग्दर्शक म्हणाला वाह वाह
ससा म्हणाला चहा हवा.

कोणास ठाऊक कसा पण सर्कशीत गेला ससा
सशाने मारली उडी भरभर चढला शिडी
विदुषक म्हणाला छान छान
ससा म्हणाल काढ पान.

कोणास ठाऊक कसा पण शाळेत गेला ससा
सशाने म्हटले पाढे घडघड वाचले धडे
गुरुजी म्हणाले शाबास
ससा म्हणाला करा पास.

Monday, March 8, 2010

महिला दिन एकदम मस्तच लेख..(अर्थातच तंबी आणि कोण?)

माफ़ करा दुसर्‍या कुणाचा लेख माझ्या ब्लॉगवर टाकतेय(क्रेडिट देऊन) पण काय सांगु आता "महिला दिना"साठी यापेक्षा छान काही वाचणं असूच शकत नाही...माझं नशीब यावेळी पहिल्यांदीच मी शनिवारी रात्री ऐवजी सोमवारी सकाळी तंबी वाचलं...आणि योग्य लेख योग्य दिवशी वाचायचा योग आला...हे हे हे... ही लिंक आणि खाली मूळ लेख...एकदम लोटपोट आहे....महिला दिनाच्या शुभेच्छा....

************
सकाळचे आठ वाजले तरी किचनमध्ये खुडबूड नाही, भांडय़ांचे आवाज नाहीत, नळ सोडल्याचा धो-धो जलप्रपाती स्वर नाही आणि आज रविवारसुद्धा नाही. तरी, सारं कसं शांत शांत? असा प्रश्न बंडूला मनातल्या मनात आणि पांघरुणातल्या पांघरुणात पडला होता. प्रश्न पडला आणि लगेचच दुसऱ्याच क्षणी डोक्यात प्रकाशही पडला. आज ८ मार्च! महिला दिन! आज बंडूनं सुट्टी काढली होती आणि आज तो स्नेहलता होणार होता. म्हणजे रोज त्याची बायको स्नेहलता जे करते, ते सगळं आज त्याला करायचं होतं. कुठल्या नाजूक क्षणी आपण हे स्नेहलताला कबूल करून बसलो, असं त्याला वाटलं, परंतु ते वाटून घ्यायलाही त्याच्याकडे वेळ नव्हता. पांघरूण अक्षरश: फेकून देऊन तो ताडकन उठला, तर स्नेहलता छान घोरत होती आणि उठल्या उठल्या बंडूला पहिलं काम काय करावं लागलं असेल, तर स्वत:चं फेकून दिलेलं पांघरूण उचलून घेऊन त्याची त्याला नीट घडी करावी लागली. मग तो ठरल्याप्रमाणं ‘स्नेहलता’ झाला. दार उघडून वृत्तपत्रं घेतली, दुधाची पिशवी घेतली आणि मग दिवसातला पहिला फटका बसला. कचरेवाला येऊन गेला होता आणि घरातलं डस्टबिन भरून वाहत होतं. मग पायात चप्पल चढवून हाती डस्टबिन धरून झोपाळलेल्या अवतारात तो बाहेर पडला. गेटवरच्या वॉचमनला म्हणाला, ‘ये किधर डालनेका?’ वॉचमन दयाळू नजरेनं म्हणाला, ‘वो चौक में है नं कचरापट्टी उसमे डालनेका!’वॉचमनच्या दयाळू नजरेचा फायदा घेत बंडूनं घोडं दामटवलं, ‘हमको मालूम नही, तुम फेकके आव ना.’ हे ऐकल्यावर वॉचमनच्या डोळ्यातले दयाळू भाव लगेचच रजेवर गेले. ‘अरे साहब, सेक्रेटरी चिल्लाते है, दुसरा कुछ काम किया तो, हम गेट नही छोड सकता.’ मग झक्कत बंडू गेला त्या चौकापर्यंत आणि मनातल्या मनात म्हणाला, ‘अब तुमको शिळा भात कभी नही देंगे. फेक देंगे. मगर तुमको नही देंगे.’ परत आला तर स्नेहलता वृत्तपत्र वाचत छान ऐटीत सोफ्यावर पाय पसरून बसलेली होती. ती छान शृंगारिक आवाजात म्हणाली, ‘चहा कुठंय?’ पण त्याला त्या आवाजातला शृंगार जाणवला नाही. कारण दूध तापवायचं होतं, चहा ठेवायचा होता. चि. गिरीश आणि भविष्यातली चिसौकां अलका हे दोघेही दुधाचे रिकामे मग टेबलावर आदळत आ वासून संकटासारखे बसलेले होते. स्नेहलतानं पुन्हा एकदा चहाची मागणी नोंदवली आणि कारटय़ांनी ‘मग संगीताचा’ ऱ्हिदम वाढवला, तेव्हा गॅसवर दूध ठेवता ठेवता बंडू स्वत:च्याही नकळत करवादला, ‘अरे, मला काय चार चार हात आहेत का?’ स्नेहलताचं हे नेहमीचं वाक्य आपण बोलून गेलो, याचं आश्चर्य करत बसायलाही त्याला वेळ नव्हता. कारण दुधाची रिकामी पिशवी धुऊन भिंतीला चिकटवून ठेवून होईस्तोवर आणि चहा-साखरेचे डबे काढून होईस्तोवर पातेल्यातल्या दुधानं भवतालाची ओढ अनावर होऊन पातेल्याची हद्द ओलांडली होती. मग विझलेला गॅस पुन्हा पेटवून आधी चहा ठेवावा की दुधाचे लोट आवरावेत, अशा संभ्रमात बंडू पडला. तोवर ‘मग संगीताचा’ ठेका द्रुत लयीत सुरू झाला होता!




* * *



‘आपली दोन्ही मुलं किती शहाणी आणि समजूतदार आहेत’ या भ्रमातून बंडूला बाहेर यावं लागलं. चि. गिरीशला स्वत:चे सॉक्स कुठे असतात, हे माहिती नव्हतं, बुटांना पॉलिश कशी करावी, हेही ठाऊक नव्हतं आणि टाय बांधायची तर सवयच नव्हती. ‘चिसौकां’ अलका त्यामानानं बरी, पण त्यामानानंच! कारण माझी पोनीटेल घालून दे, असा तिनं हट्ट धरला आणि मग ती ‘डोक्याच्या मध्यावर येत नाहीये’ अशी तक्रार करत अर्धा तास घालवला. शाळेची बस आली आणि ड्रायव्हर पें.. पें.. करत साद घालू लागला, तेव्हा बंडू तिचा टिफिन भरत होता आणि टिफिनमध्ये वेफर्स भरता भरता अजीजीनं ‘आईला नको सांगूस’ म्हणत होता. वृत्तपत्रात डोकं खुपसूनही सगळं लक्ष बंडूकडे असणाऱ्या स्नेहलतानं या ‘चिटिंग’ची मनात नोंद केली. कारण कराराप्रमाणे प्रत्येक चिटिंगला पेनल्टी होती. दोन्ही निरागस भुते बसच्या डब्यात बसून शाळेकडे रवाना झाली आणि बंडू चहाचा कप हाती धरून सोफ्यावर बसला. त्यानं वृत्तपत्र हाती घेऊन वाचायला सुरुवात केली- न केली तोच स्नेहलता मोठ्ठय़ानं आळस देत म्हणाली, ‘बसताय कुठं? आठ वाजले आहेत. मला जेऊन दहा वाजता बाहेर पडायचं आहे, टिफिन घेऊन. नवऱ्यानं बनविलेले टिफिन घेऊन आज आम्ही मैत्रिणी रिसॉर्टमध्ये जाणार आहोत’, हे ऐकताक्षणी बंडूनं राज ठाकरे, शरद पवार, नितीन गडकरी यांना सोफ्यावर फेकलं आणि उठून उभा राहिला. ‘सांगा राणीसरकार, आपल्याला काय हवंय टिफिनमध्ये?’ त्यावर सकाळच्याच शृंगारिक रसात स्नेहलता म्हणाली, ‘राजा, अरे अजून मेथीची भाजी निवडायची आहे, कुकर लावायचा, कणीक तिंबायची आहे आणि आठ वाजलेतसुद्धा. आधी माझे कपडे शोधून दे, मला आंघोळीला जायचं आहे!’ आणि बंडूसमोर धर्मसंकट उभं राहिलं. ‘हिचा पेटिकोट, ब्लाऊज.. कुठं बरं असतो घरात?’ मेरी याददाश्त खो गयी है, मुझे कुछ याद नही आ रहा है, मै कौन हू? मै कहाँ हू?’ हा हिंदी चित्रपटातला डायलॉग ‘डेली यूज’साठी किती उपयुक्त आहे, हे त्याला आज कळलं. मेथी निवडताना बंडूने चुकून अनेकदा पानं फेकून दिली आणि काडय़ा ठेवल्या. काडय़ांमधून पाने आणि पानांमधून काडय़ा वेगळ्या करण्यातच त्याचा बराच वेळ गेला. मेथीची डाळ-भाजी करण्यासाठी रात्रीच मुगाची डाळ भिजत घालावी लागते, हे त्याला सकाळी कळलं. त्यामुळं कुकरमध्ये वरण, भात आणि मुगाची डाळ असे तीन डबे बसवताना त्याची दमछाक झाली. आणि मुगाची डाळ मऊ शिजल्यामुळं मेथीच्या भाजीऐवजी मेथीचं वरण जन्माला आलं. पाणी कमी घातलं की कणीक फार घट्ट भिजते आणि पाणी जास्त झालं तर कणीक सैल होऊन पोळ्या लाटण्याला जुमानत नाहीत, हे ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ बंडूला नव्यानं कळलं, तरी वळलं नाहीच. पोळ्या लाटून झाल्यावर त्याला, जगात ज्याने कोणी वर्तुळाचा शोध लावला त्याचा आणि पोळ्यांचा आकार गोलच असावा, हे ज्याने कोणी ठरवलं असेल त्याचाही भयंकर राग आला. आंघोळ करून, नवी साडी नेसून केस मोकळे सोडलेली स्नेहलता सुंदर दिसत होती. परंतु तिने जेव्हा हातातला ओला टॉवेल बेडवर नुसता भिरकावला आणि ‘वाढ चटकन. वरण-भात खाते आणि भाजी-पोळी डब्यात नेते’, असं म्हटलं तेव्हा बंडूला स्त्रीचं सौंदर्य किती क्षणिक असतं, याचा साक्षात्कार झाला!

त्या दिवशी दुपारी विविध आकारांच्या पोळ्या आणि मेथीचं वरण खाता खाता बंडूनं विरंगुळा म्हणून चक्क ‘अगले जनम मुझे बिटियाही किजो’ आणि ‘अनुबंध’ या कौटुंबिक मालिका पाहिल्या. रात्रीच्या स्वैपाकाचा खडतर प्रवास आणि मुलांना झोपविण्याचा जागतिक विक्रम पार पाडता पाडता बंडूची स्थिती ‘मुझे अपनी शरण मे ले लो राम’ अशी झाली.

कशीबशी रात्र झाली, संपली. पुन्हा नवी सकाळ आली.



सकाळी भांडी घासणारी मावशी आली ती बडबड करतच, ‘पातेल्यांच्या तळाला जळून चिकटलेली भाजी, तव्याला पोळ्यांचं करपलेलं, कुकरमध्ये भात सांडलेला. मी जोशीबाईंना म्हटलं, मी नाही घासणार तुमची भांडी..’ हे ऐकून बंडू हबकला. त्याला सिंकमध्ये ठेवलेली रात्रीच्या स्वैपाकाची भांडी आठवली. ‘आज भांडी नाहीत घासायला’, म्हणत त्यानं मावशींना परत पाठवलं आणि सिंककडे गेला. भांडय़ांचा आवाज ऐकून स्नेहलता आतून म्हणाली, ‘काय करतो आहेस?’ तर बंडू म्हणाला, ‘काल एकादशी झाली, आज द्वादशी साजरी करतो आहे!’

Saturday, March 6, 2010

ऋतुराज वनी आss लाss

खरं तर फ़ेब्रुवारीच्या पहिल्या शनिवारीच अपार्टमेंटच्या ऑफ़िसमधुन घरापर्यंत चालताना चाहुल लागली होती पण गेले कित्येक हिवाळे फ़ेब्रुवारी आणि मार्च म्हणजे कुडकुड नुसती तिथे पानं कुठे शोधा आणि शोधली तरी सापडणारही नाहीत म्हणा...असो...तर काय सांगत होते हां चाहुल लागली होती म्हणजे एका वळणावर थोडं हिरवं कोंबासारखं काही दिसलं तेव्हा भास असेल किंवा नवं गवत असेल नुसतं असं काहीसं स्वतःशीच बडबडून चक्क दुर्लक्ष केलं होतं...त्यातही नंतर नॉर्थ इस्ट मधला तुफ़ान बर्फ़च जास्त चर्चेत होता..आपण कसे वाचलो किंवा नशीब आई आधीच्या विकेंडला परतीचा प्रवास करत होती असं सगळं...आणि खरं सांगते साफ़ म्हणजे साफ़च विसरले...


नंतरच्या एका आठवड्यात परत छान स्वच्छ सुर्यप्रकाश होता म्हणून बाहेर पडलो तर त्यांनी आपलं अस्तित्व दाखवायचं ठरवलंच होतं बहुधा म्हणून यावेळी चक्क थोडे मोठे दिसले...तरी ह्म्म्म...कदाचित हे बल्ब्ज सनी डेजमुळे कन्फ़्युज झाले असतील असं म्हणत होते आणि आता लायब्ररीमध्ये पाहाते तो काय चक्क फ़ुलांसहित....आता काय म्हणणार??

बरं ते राहुदे हे सगळीकडेच आता डॅफ़ोडिल्स आणि बहुधा ट्युलिप्सनी वर यायचं ठरवलंय तर काय मान्य करायलाच हवं ना? की its early spring this time in northwest...मी जिथे काही वर्ष राहिले तिथलं वातावरण मी आता तिथे नसताना पार बिघडलंय तर जिथे मी आलेय तिथं सृष्टीत नवचैतन्य एकदम संचारलय असा माझ्या सोयिस्करपणे अर्थ लावलाय...:)

असो...नेहमी असं नसतं इथंही असं इथले जाणकार म्हणताहेत... पण ते काही का असेना वसंताची चाहुल लागलीय हे नक्की..

ही चेरीची फ़ुलं फ़ुलायला लागली की शेंबडं पोरही मान्य करील त्यामुळे राहावत नाही आहे....

अमेरिकेतल्या वास्तव्यात बहुधा पहिल्यांदाच इतका सुखद हिवाळा मी अनुभवलाय....आणि आता तर ऋतुराज वसंताचंही आगमन झालंय म्हणजे सोने पे सुहागा...

 
तर माझ्या मिडवेस्ट आणि नॉर्थइस्टमधल्या दोस्तांनो, येईल येईल तुमच्याकडेही आता काही आठवड्यात नक्कीच अवतरेल
 
तोवर माझ्या ब्लॉगवर फ़ुललेली फ़ुलं आणि चेरी पाहुन आपलं समाधान करुन घ्या...

Thursday, March 4, 2010

आज मैं उपर...

दिवस - ४ मार्च २०१०


वेळ - दुपारी १२

स्थळ - माझा लॅपटॉप आणि मेल बॉक्स

मूड - थोडासा वैतागलेला...मराठी दिनाला एका दीनवाण्या ब्लॉगरने मेलमार्फ़त पिडायला सुरुवात केलीय..त्याला चांगल्या शब्दात सांगितलं बाबा मला काढ या धाग्यातून तर उत्तर तर नाहीच...दोनेक दिवसांनी पुन्हा काहीतरी ट ला ट लावलेलं मेल...अरे कुणी नोकरी दिली रे याला आय.टी.त..साधं बी.सी.सी. नाही का करु शकत...आता आज याच धाग्यावर कुणीतरी अजुन एक आपल्या ब्लॉगची जाहिरात करतोय.याच त्राग्यावर नेमकं उत्तर म्हणून एक पोस्ट वाचली..चला आपल्यासारखेच पिडीत आहेत ब्लॉगजगतात आणि याचसाठी केला होता का ब्लॉगचा अट्टाहास असं ज्याच्यामुळे वाटलं त्या पिडणार्‍याच्या ब्लॉगवर जायचं का या पोस्टवरच रिप्लाय द्यायची असाच एकंदरित त्रासलेला मूड..पण यापैकी काहीच न करता हाती आलेलं काम करण्यासाठी म्हणून परत एकदा मेल चेक केली आणि काय???

अहो चक्क कौशल इनामदारांची कॉमेन्ट...खरंच...विश्वास बसत नव्हता म्हणून पोस्टवर पण जाऊन पाहिलं...ग्रेट यार...एक कोण कुठली ब्लॉगर तिच्या मराठी अस्मिता अनुभवाबद्दल दोन ओळी काय खरडतेय आणि माहित नाही कुठून कसं त्याने वाचलं पण तिच्यासाठी दोन शब्द त्यालाही लिहावेसे वाटले बॉस आलं ना यात सारं..एका सच्च्या दिलाच्या मराठी माणसाबद्दल म्या पामराने काय बोलावं??

बास...गेला पळून तो आधीचा त्रागा...मारो गोली उस टॉपिक को.....

आता तर हा ब्लॉग आणि मी आमचं एकचं गाणं..

"आज मैं उपर...आसमान नीचे...आज मैं आगे...जमाने के ब्लॉग है पीछे..."

Wednesday, March 3, 2010

गाणी आणि आठवणी १ - अबके सावन ऐसे बरसे

इंजिनियरिंगमधल्या कुठल्या तरी मान्सुनमध्ये "सीखो ना नैनो की भाषा" ऐकलं...तसंही आधी "अबके सावन" आणि अशा गाण्यांनी शुभाजींची गायकी आवडायला लागली होतीच...पण हे गाणं त्याच्या व्हिडिओसकट आवडलं...खरं तर कुठलंही अशा अर्थाचं गाणं करायला गेलं तर खूप जास्त शृंगारिक होऊ शकतं. पण यातल्या नायक नायिकेचा तात्पुरता विरह अगदी नेमक्या प्रसंगात दाखवण्याचं कसब खूपच छान साधलं गेलंय या व्हिडिओमध्ये आणि सोबतीला अतिशय सुंदर सुरावटींमधुन येणारा शुभाजींचे आर्त सूर....


सगळं जग जेव्हा मेच्या सुट्टीत हापुसचा आनंद घेत असतं तेव्हा मुंबै (आणि आपल्या इथल्या बर्‍याच) युनिव्हर्सिटीची मुलं "जास्त आंबे खाऊ नकोस..झोप येईल" असलं काही घरच्यांचं ऐकत बिचारी अभ्यास करत असतात आणि मग नंतर मग लगेच पुढच्या महिन्यात जेव्हा तेच जग छत्री, रेनकोट, पावसाळी चप्पल,साडीचे ओचे, ड्रेसच्या ओढण्या आणि पॅंटवर उडणारा चिखल सांभाळात शाळा-कॉलेज,ऑफ़िस कुठेकुठे म्हणून जगरहाटीत धावत असतात तेव्हा तीच आधी सांगितलेली गरीब बिचारी मुलं आपली वार्षिक सुट्टी आपल्या मर्जीप्रमाणे घालवत असतात त्यावेळी ऐकलंलं आणि अनेक वेळा पाहिलं गेलेलं हे गीत आहे...त्यामुळे कधीही ऐकलं की मला ती सुट्टी, बाहेर भरुन आलेलं आभाळ आणि हातात गरम भुट्टा नाहीतर उकडलेल्या शेंगा, चहा, भजी किंवा वेगवेगळी गरमागरम खाणी असलेली मी आठवते....कसे येणार ते दिवस परत? एकदा कॉलेजजीवन संपलं की संपल...पण...असो...

आज इथे असंच आभाळ भरुन आलंय आणि माझ्याच ऑरकुटमधल्या फ़ेवरिट व्हिडीओ पाहताना पुन्हा एकदा वार्षिक सुट्ट्यांचे ते दिवस आठवताहेत...खरंच गाण्यांबरोबर किती आठवणी निगडीत असतात ना? माझ्यासाठी तर अशी अतोनात गाणी आणि काही काही आल्बमसुद्धा काही जागा, प्रसंग यासाठी लक्षात आहेत...

पाऊस आणि गाणी हा तर एक अविस्मरणीय धागा आहे...नैनो की भाषा मध्येही सुरूवात पहाटेपासून आहे पण पाऊस येतोच...आणि पाऊस आपल्याबरोबर अनेक आठवणी घेऊन येतो...कधी त्या डोळे ओलावुन जातात तर कधी त्या आठवणींमधला मिस्किलपणा पुन्हा एकदा चेहेर्‍यावर येतो...
आणि मग नेमकं जर याच गाण्यानंतर "अबके सावन" लागलं तर..पावसाळ्यातला दुग्धशर्करा योग म्हणतात तो हाच...असं झालंय ही बहुधा आता त्या चॅनेलचं नाव आठवत नाही पण तिथे कायम गाणी असायची आणि मग पसंद आपकी स्टाइलमध्ये पावसात ही गाणी आगेमागेही लागायची...त्याचा आनंद फ़क्त एका विमानप्रवासाच्या वेळी शोभाजी प्रत्यक्षच भेटल्या त्याशी होऊ शकतो....खरंच या आवाजात आणि व्यक्तिमत्वात काहीतरी वेगळं आहे..नाहीतर जी काही दोन मिन्टं एअरपोर्टवर भेटलो होतो ते असं अनिवारपणे आठवावं आणि त्यांचीच गाणी ऐकली जावीत...ऑरा या शब्दाचा खरा अर्थ अशा काही व्यक्ति भेटल्या की अचानक समजतो नाही???
गाणी आणि आठवणी आपल्यापैकी बर्‍याच जणांचा आवडीचा छंद असणार हे नक्की....अशाच काही आठवणी अधुनमधुन या ब्लॉगवर घेऊन यायचा विचार आहे...
 
फ़ोटो मायाजालावरून साभार...

Monday, March 1, 2010

आपणचं होऊया आपल्या खारुताईंचे डेव्ह...

२००७ च्या शेवटी कधीतरी alvin and the chipmunks चित्रपट पाहिला. ऍनिमेटेड चित्रपट पाहायला वयाचं बंधन नाही हे पाहताना जाणवतं पण हे चित्रपट आपल्याला एक छान संदेश देऊन जातात हे पुन्हा एकदा पटलं...त्यानंतर भोवताली घडणार्‍या बर्‍याच घडामोडींच्या निमित्ताने हा चित्रपट सारखाच आठवतो. कितीतरी ठिकाणी मी या चित्रपटातल्या खारुताई भेटतात असं मनाशीच म्हणते त्याची आठवण म्हणून ही पोस्ट.


ही गोष्ट आहे तीन चिपमक्सची. आपल्या सोयीसाठी त्यांना खारुताई म्हणूया हवंतर. तर तीन गाणार्‍या खारुताई, त्यांचं गाण्याचं कौशल्य ओळखणारा एक धडपड्या गीत/संगीतकार डेव्ह सेव्हिल आणि त्यांच्या या कौशल्याचं मोठ्या चतुरपणे मार्केटिंग करणारा इयान. बाकीचे नेहमीचे लोकं आहेतच म्हणजे हिरो डेव्हची एक गर्लफ़्रेंड वगैरे पण ही गोष्ट मुख्यपणे घडते ती या पाच जणांच्या आयुष्यात. योगायोगाने डेव्हच्या घरी आलेल्या या तीन गाणार्‍या खारुताईंचं कौशल्य ओळखून डेव्ह त्यांच्या बरोबर एक आल्बम काढतो, त्याच्या धडपडीला यश येतं आणि तरी ते यश तो खारुताईंच्या डोक्यात जाऊ देत नाही.. पण एका मोठ्या संगीत कंपनीचा मालक इयान, खोटं खोटं अंकल इयान बनुन यांच्यात फ़ुट पाडून या तिघांना डेव्हपासुन वेगळं करुन आपल्या घरी आणतो.

यांचं गाणं जगावेगळं आहे हे ओळखून या तिघांच्या कॉन्सर्ट्सचे एकापाठी एक शो लावतो. परिणाम तिघांच्या स्वरयंत्रावर अधिक ताण आणि एकंदरित तब्येत बिघडण्यावर होते. मग त्यांची डॉक्टर त्यांना विश्रांतीचा सल्ला देते. पण धंद्याचं होणारं नुकसान आणि भावी फ़ायदा लक्षात घेऊन इयान त्यांना लिपसिंगिग करायला लावतो. दरम्यान डेव्हला आपल्या आयुष्यात मुलांसारखी झालेली या तीन खारुताईंची सवय लक्षात येते आणि यांना परत आणण्यासाठी तो एका शोमध्ये जाऊन त्यांना शोधायचा प्रयत्न करतो. खारुताईंनाही तोपर्यंत डेव्ह आणि इयान मधला फ़रक कळला असतो..इयानने केलेलं लिपसिंगिगचं गुपीत लोकांना कळतं...एकंदरित बरंच काही फ़िल्मी चक्कर घडून शेवटी ही मुलं आपल्या मानलेल्या बाबाकडे येतात. आणि मग त्यांनाही बाबाचं आपल्या भविष्यासाठी काळजी, पैशाची बचत करणं हे सगळं कळतं. ज्याचा शेवट गोड ते सारंच गोड...

ही कथा म्हटलं तर लहान मुलांसाठी आहे पण नीट लक्ष देऊन पाहिलंत तर कळतं असे कितीतरी जगावेगळी कौशल्य असणार्‍या खारुताई आपल्यात आहेत आणि आपल्यासारख्या सर्वच पालकरूपी डेव्हनी आता जागं व्हायला हवंय. मला हे जाणवलं जेव्हा हिंदीतल्या एका गाण्याच्या रिऍलिटी शोमध्ये छोट्या छोट्या मुलांना गाताना. शेवटपर्यंत टिकणार्‍या मुलांना फ़क्त कार्यक्रमासाठीच नाही तर इतर ठिकाणीही गायला लावुन काय होत असेल त्यांच्या छोट्याशा स्वरयंत्राचं हे मनात आल्याशिवाय राहावलं नाही. नंतर पाहिलं ते हिंदीमधलाच एक नाचाचा कार्यक्रम यातही मोठ्यांनाही न कळणार्‍या भावना चेहर्‍यावर आणून, सगळं अंग लचकवुन ही मुलं नाचत होती. म्हणायचं तर कदाचित मोठीही इतकी छान अदाकारी करु शकणार नाहीत पण म्हणून आतापासुनंच हे? असंही मनात आल्याशिवाय राहावलं नाही. आणि मग नेहमीप्रमाणे याच स्पर्धा मराठीतही पाहिल्या गेल्या. मुलं कार्यक्रमाबाहेर गेली की हताश, रडवेल्या चेहर्‍याचे पालक आणि कार्यक्रम संपला की मग इतर ठिकाणी या मुलांचे गुणदर्शन सुरू...

या सगळ्यांनीच हा चित्रपट एकदा मन लावुन पाहावा असं मला वाटतं...युग स्पर्धेचं असलं तरी ’लहानपण देगा देवा’ असं नंतर ही मुलं म्हणू शकणार नाहीत इतकंही त्यांना राबवावं का? एक दोनदा ठीक आहे पण हिंदीत हरलं की मराठीत..तिथुन बाहेर पडलं की एखाद्या कार्यक्रमात असं सगळीचकडे आपल्या मुलांना पुढे पुढे करायचं याला काय अर्थ आहे? आणि मग सारखं सारखं टिव्हीवर झळकायचं व्यसन मुलाला लागलं तर दोष कुणाचा? आता वेळ आहे आपल्या लहानग्याचा कल पाहुन ती कला डेव्हलप करायची, त्यातलं पुढंचं शिक्षण देऊन मोठेपणी या स्पर्धेत आपले गुण तो योग्य प्रकारे दाखवु शकेल याची तयारी करायची.

वाहिन्या, माध्यमं त्यांच इयान अंकल व्हायचं काम नेटाने करताहेत. वेगवेगळे रिऍलिटी शोज आणि स्पर्धा आयोजित केल्या जातील. कदाचित तुमच्या खास कलाकारी अवगत असणार्‍या मुलासाठी एखादा वेगळा कार्यक्रम, स्टेज शो याचंही आमंत्रण पुढ्यात येईल पण आत्ता त्या लहानग्याच्या आयुष्यात एका काळजीवाहु डेव्हची गरज आहे आणि आपल्या मुलांसाठी ती भूमिका आपण स्वतःच पार पाडायला हवी नाही का?

टीप..आज ’मराठी मंडळी’ या संकेतस्थळाचा उद्घाटन सोहळा मोठ्या डौलात पार पडला.त्यासाठी लिहिलेला हा पहिला लेख. मराठी मंडळींसाठी सर्वांनाच शुभेच्छा.