’गोरे गोरे गाल, गालावर एक तीळ,.......जणू सौंदर्याच्या खाणीत हवालदार’ असं म्हणणारा योगेश सारखा सारखा जाहिरातीत दिसायला लागला आणि आता हा कुठला अजून एक दुसरा रिऍलिटी शो असं विचार करायच्या आधीच झी मराठीवर महाराष्ट्राचा सुपरस्टार हा कार्यक्रम सुरू झाला आणि का कुणास ठाऊक हे प्रकरण जरा हटके आहे हे लगेच जाणवलं...सुरूवातीला निवेदन थोडं अति वाटलं पण त्याकडे आरामात दुर्लक्ष करता येईल अशी कमाल करणारे कलावंत पाहायला मिळाले. खरं तर त्याच दरम्यान आई इथे असल्यामुळे झी मराठीचे सगळेच कार्यक्रम गळ्यात पडले होते. पण ती परत गेल्यावरही न चुकता पाहिला तो हाच कार्यक्रम..
रिऍलिटी शोचा अतिरेक सध्या चालु आहे पण तरी त्याही अवस्थेत हा कार्यक्रम बर्याच वेगळेपणांमुळे लक्षात राहिल. सगळ्यात मुख्य म्हणजे जी मुलं-मुली अंतिम फ़ेरीपर्यंत आली ती खरोखरच खूप टॅलेन्टेड वाटली.आतापर्यंतचे कार्यक्रम गाणी किंवा नाचाचे असल्याने त्यात त्या त्या विभागातल्या प्रथितयश कलावंतांची थोडी फ़ार नक्कल करून सादरीकरण असायचं आणि त्याचाच परिणाम म्हणजे दुसर्या-तिसर्या सीझनला अगदी आता जजेस काय बोलणार इथपर्यंत तोचतोचपणा आलाय...काही नाविन्यच वाटत नाही..फ़क्त भाग घेणार्यांचे चेहरे बदललेत इतकाच काय तो फ़रक.
सुपरस्टार मध्ये मात्र प्रत्येक टिमला आपलं सादरीकरण जवळजवळ स्वतःलाच लिहावं लागत होतं आणि आयत्यावेळच्या राउंडला तर समोर प्रसंग दिला आणि मग लगेच त्यावर सादरीकरण त्यामुळे प्रत्यक्ष सादरीकरण पाहिल्याशिवाय काय होईल काहीच सांगता यायचं नाही....यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक प्रवेश पाहाणं हे एक छोटंसं नवंकोरं नाटुकलंच पाहतोय आणि तेही नेहमीच दर्जेदार यामुळे स्पर्धाही अगदी निकोप पण अटीतटीची.. जे स्पर्धक स्पर्धेबाहेर गेले ते सगळेच एका ताकदीचे असून त्या भागात प्रभाव न पाडल्यामुळे गेले असं आमचं एक मत...अरे हा कसा काय राहिला असा प्रश्न पहिल्या दहानंतर पडलाच नाही..उलट अरे ’बॅड लक याचं’ किंवा ’ही आता एखाद्या सिरियलमध्ये तरी नक्की दिसेल बघ’ असे सकारात्मक विचार एलिमिनेशनच्या वेळीही असायचे..हे झालं कार्यक्रमाच्या एकंदरित सादरीकरणाबद्दल...
पण सगळ्यात जास्त लक्षात राहिल ती या स्पर्धकांनी सादर केलेली मनाला भिडणार्या विषयांवरची स्कीट्स..आताच्या भारतीय तरूणांमध्ये खदखदलेला असंतोष व्यक्त करणारे बरेचसे स्कीट्स सादर झालेत..मग कसाब, राजकारणी, गरिबी, बॉंबस्फ़ोट अगदी घटस्फ़ोट असे विषय असो की व्हॅलेंटाइन डे सारखा तसा वादात असणारा विषय...विनोदी आणि गंभीर दोन्हीही प्रकार इतक्या सुरेखपणे हाताळले गेलेत की खरं तर बरंच कौतुक या कार्यक्रमाला आणि विशेष करून स्पर्धकांना मिळायला हवं म्हणजे मिळालंही असेल पण माझ्यासारख्या इतक्या दूर राहणार्या व्यक्तीला ते कळणंही कठीण आहे म्हणा...
ज्यांनी अजिबातच ही स्पर्धा पाहिली नसेल त्यांच्यासाठी खास काही(खरं तर फ़क्त थोडे प्रवेश शोधणं कठीणच आहे पण...) लिंक्स इथे देतेय. ते व्हिडिओ पाहिले की नक्की हा सीझन पाहिला जाईल याची खात्री आहे...
सध्याच्या ज्वलंत प्रश्न मुंबई कुणाची, दंगे होतात त्याबद्दलचा एक चांगल्या दर्जाचा प्रवेश, एक बाप, आजच्या युगात जिनी व अल्लादिन अवतरले तर, एक भन्नाट लग्न आणि अगदी आता आता सादर झालेली कॉमन मॅनची कथा...वेगवेगळ्या मूडचे आणि आजच्या पिढीबद्दल एकंदरित आशादायी चित्र उभं करणारे असे अनेक प्रवेश पुन्हा पुन्हा पाहण्यासारखेच आहेत...
ज्यांच्यासाठी या स्पर्धा घेतल्या जातात ते स्पर्धक हे या कार्यक्रमाचं खरं यश आहे आणि त्यांना ते श्रेय द्यायलाच हवं...मुलांची टिम तर इतकी छान आणि सगळेच एकसो एक होते की शेवटच्या दहातले सगळेच लक्षात राहतील...मुलीपण खूप छान सादर करत होत्या..आता येत्या रविवारी अंतिम सोहळा असेल. कोण जिंकेल कोण हरेल याहीपेक्षा सगळीच जण या कार्यक्रमाचा पहिलावहिला सीझन असतानाही आपापली वेगळी छाप पाडू शकले हे महत्त्वाचं...त्या सर्वांसाठी ही पोस्ट...यांच सार्यांचंच काम खूप आवडलं..आणि मध्ये रिऍलिटी शो अज्जिबात पाहायचे नाही हे ठरवलं होतं ते असे कार्यक्रम असणार असतील तर असं काही ठरवलं होतं हेही विसरून जायला होईल....
थोडक्यात सांगायचं तर मस्त मस्त मस्त....
मी पण पहाते हा कार्यक्रम, छान आहे नेहेमीच्या नाच गाण्यांपेक्षा. Solid मेहेनत घेतात ती मुलं. कोण जिंकेल याची जाम उत्सुकता आहे.
ReplyDeleteसोनाली
रेग्युलर नाही, पण बर्याच वेळा हा कार्यक्रम पाहिला आहे... त्यांच्या स्किट्स खरोखर मस्त असतात... तसे रिऍलिटी शो चे काही (अव)गुण आहेत ह्यात..
ReplyDeleteमी पण हयाचे काही भाग पाहिले आहेत..छान करमणुक होते...
ReplyDeleteबायकोकडून चिक्कार ऐकलंय या कार्यक्रमाबद्दल. कधी बघायचा योग आला नाही. (म्हणजे तिने लावलेला असताना मी कधी बघायला बसलो नाही :) ) .. असो आता नक्की बघेन.
ReplyDeleteसोनाली, खरंच मुलांची मेहनत जास्त वाटते..त्यासाठीच ही पोस्ट टाकली...
ReplyDeleteखरंय आनंद काही (अव) गुण आहेत फ़क्त मला त्या मुलांच्या कलाकारीला तीट लावावीशी वाटली नाही.थोडंसं टाकलंय पण ते फ़ार लक्षात येणार नाही...
ReplyDeleteदेवेंद्र आता तुम्हीही अंतिम फ़ेरी पाहाल आणि छान होईल असं वाटतंय..
ReplyDeleteहेरंब, वेळ मिळाला की फ़क्त या पोस्टमधले व्हिडीओ पहा नक्की आवडतील आणि मग सांग तू उरलेले प्रवेशही पाहणार आहेस का??
ReplyDeleteतशी टीवीची थोडी धास्तिच वाटते, पण वर दिलेले वीडियो बघून हा कार्यक्रम खुणावतोय मला टीवीकडे..मस्त मस्त मस्तच
ReplyDeleteसुहास, म्हणूनच मी ते व्हिडीओ टाकलेत..यु ट्युबवर सगळे आहेत...नक्की पहा तुला आवडेल...
ReplyDeleteअपर्णा,जाम धावपळ झाली ना गं... आज जरा अर्धा तास मिळाला. लगेच तुझ्या पोस्टवर आले.:) मी फक्त ऐकलेय याबद्दल आईकडून. आता इतके चांगला आढावा घेतला आहेस तेव्हां तू दिलेल्या लिंक नक्की पाहते.
ReplyDeleteमस्त कार्यक्रम होता हा. . .ती अमृता खूप बोअर मारायची ते सोडल तर शो धमाल होता.सर्व स्पर्धक चांगले होते. . .मजा यायची त्यांची स्कीटस पाहताना.
ReplyDeleteअगं श्रीताई, कॉमेन्टचं काय एवढं?? ते व्हिडिओ तुला नक्की आवडतील...
ReplyDeleteएक्ज्यॅटली मला हेच म्हणायचं होतं योगेश...फ़क्त मी ते पोस्टवर डायरेक्ट म्हटलं नाही....ती जरा जास्तच चावरी झाली होती..पण निदान यात कॉल बॅकचा ड्रामा तरी केला नाही हेही नसे थोडके...
ReplyDeleteसर्व व्हिडिओ पाहिले.
ReplyDeleteधन्यवाद उर्मी आणि ब्लॉगवर स्वागत. आशा आहे आपल्याला हे व्हिडिओ आवडले असतील.
ReplyDelete