Wednesday, March 24, 2010

त्याची बॅकपॅक

आठवड्यातून दोनदा तरी थोड्या मोठ्या मुलांच्या गोष्टीच्या कार्यक्रमासाठी वाचनालयात जाणं होतं..लहान मुलांच्या भावविश्वात मोठ्यांनाही रममाण करणारे या वाचनालयातले पाचही जण मला आवडतात आणि त्यांची गोष्ट सांगण्याची हातोटी अक्षरशः भुरळ घालते. अगदी चुकवू नये असाच कार्यक्रम..


जवळ जवळ प्रत्येक गोष्टींच्या दिवशी मी या मुलाला लायब्ररीत पाहाते...लक्ष जावं असं कॅरेक्टर वाटायचं...वय असेल जास्तीत जास्त पाच-सहा वर्षे, अमेरिकन, गोल चेहर्‍यासारखाच गोल गोल काचांचा चष्मा, हिरव्या नाहीतर पिवळ्या रंगाची फ़्रेम... खूपदा त्या फ़्रेमचा रंग कपड्याशी मिळताजुळता असणारा..थोडी मान वर करून सोबतीला आलेल्या आजीशी बोलायची सवय...कायम पाठीला छोटीशी बॅकपॅक....कौतुकही वाटायचं की या इतक्याशा वयात आपलं ओझं आपणंच वाहातोय आणि कधी कधी त्याच्या आजीचं आश्चर्य ’कधीच कसं घेत नाही ही हे पाठुंगळीचं ओझं?’...आजी मागे बसलेली आणि नातू गोष्टीची मजा घेतोय...त्यातल्या प्राण्यांना पाहुन हसतोय, कधी पुढे काय होईल याचे आडाखे बांधताना मोठ्याने बोलतोय..त्याच्या थोड्या वेगळ्या चष्मा आणि बॅगमुळेच बहुतेक माझ्या लक्षात राहिला..पण त्यापलिकडे कधी काही वाटलं नाही...आणि खरं तर कार्यक्रम सुरु झाला की मुलांसाठी सांगितल्या जाणार्‍या गोष्टींमध्ये मी अजुनही तितकीच रमते...इथे तर अगदी पपेट वगैरे वापरून सगळेच गुंग झालेले असतात. त्यामुळे नंतर निघेस्तोवर लक्षातही येत नाही वेळ कसा गेला..

इतर वेळी धावत-पळत वेळ गाठणारे आम्ही काल कसे काय ते वेळेच्या आधी पोहोचलो आणि कार्यक्रम सुरु व्हायच्या आधीची धावपळ पाहात उगाच वेळ काढत खुर्चीवर बसलो. लोक येत होते, आपल्याला आवडतील तशा जागा घेत होते, मुलांना खाली जाजमावर बसवून मागे जात होते आणि आमचं लाडकं ध्यान आलं..आज हिरवा चष्मा आणि हिरवाच टी-शर्ट... असलं गोड दिसत होतं आणि नेहमीप्रमाणे आजीबरोबर चाललेल्या गप्पा..आज जरा निवांत होतो आम्ही म्हणून त्याच्याचकडे पाहात होते..सरळ चालत येत बसण्यासाठी हा मुलगा वळला आणि मी जे पाहिलं त्याने मला खरंच ’देव देव म्हणून कुठे असतो रे तो??’ असं जोरात किंचाळावंसं वाटलं....

त्याच्या बॅकपॅकमधुन बाहेर आलेल्या आणि शर्टच्या आतुन पोटाकडे जाणार्‍या नळ्या मला पहिल्यांदीच दिसल्या...आतापर्यंत अशा प्रकारे ऑक्सिजनची नळकांडी घेऊन फ़िरणारे बरेच वयस्कर मी अमेरिकेत नेहमी पाहाते आणि जगण्याकडे एकंदरित आशेने पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन मला भारावुन टाकतो. पण आज पहिल्यांदीच असं काही आजाराचं ओझं आपल्याच पाठीवर घेऊन फ़िरणार्‍या या पिलाला पाहून मात्र कोलमडले...साफ़ कोलमडले....आज कुठली गोष्ट सांगितली गेली काहीच कळत नव्हतं...काय झालं असेल त्याला? तात्पुरतं असेल ना? अनेक प्रश्नांनी भरलेलं डोकं....आणि एक खिन्न करणारा अनुत्तरित प्रश्न...देवा, तू खरंच आहेस का?????????

27 comments:

  1. काय झाले होते त्याला???

    ReplyDelete
  2. :(( भयंकर.. खरंच काय झालंय त्याला?

    ReplyDelete
  3. रोहन आणि हेरंब खरंच मला माहित नाही त्याला काय झालंय ते?? आणि कसं कळणार...असं विचारणंही बरोबर नाही ना?? पण फ़ार अस्वस्थ झालं मला आणि मुख्य आधी मी खूपदा त्याच्या बॅगपॅकबद्दल विचार करायचे पण मला त्या नळ्या कालच दिसल्या...इथली लोकं आपल्यापेक्षा खूप प्रॅक्टिकल आणि धीराची आहेत इतकंच म्हणेन...

    ReplyDelete
  4. बिचारा...पण मानल त्याला ..कुठ पोट बिघडलं तर पेपर नंतर देतो अस ठरवणारा मी व एवढ्या नळ्या घेवून नियमित असणारा तो....
    ताई या पोस्ट साठी धन्यवाद...

    ReplyDelete
  5. सागर ही अशी मुलं म्हणजे आपल्यासाठी मोठे मार्गदर्शक असतात..तू त्याचा चेहरा पाहिलास तर कधीच कळणार नाही त्याच्या पाठीवर काय प्रकारचं ओझं घेऊन फ़िरतोय ते....इतका गोड आणि निरागस असतो नं नेहमी...की मी ते पाहिलं आणि गलबललेच...

    ReplyDelete
  6. खरच वाईट वाटला..पण त्या मुलाच्या धैयशक्तिला तोड नाही...देवा काळजी घे त्या पोराची

    ReplyDelete
  7. देव खरंच असतो का? मला असाच प्रश्न पडतो असे पाहुन वाचुन..
    परवा सुमनताई नावाचा लेख वाचताना असाच प्रश्न पडला होता

    ReplyDelete
  8. एवढ्याश्या जीवाला किती त्रास गं.त्यातही तू लिहीलेस त्यावरून कळतेय की तो आनंदी आहे, जीव रमवतोय. आणि सभोवताली असलेल्यांनाही आनंद देतोय.

    ReplyDelete
  9. सुहास, काळजी घेणारा तो आहे असं म्हणायचं पण तरी माझा शेवटचा प्रश्न मला छळतोच...

    ReplyDelete
  10. आनंद, मीही ती पोस्ट वाचलीय आणि खरंय तसंच वाटतं असे प्रसंग पाहुन..

    ReplyDelete
  11. श्रीताई, तो खरंच आनंदी जीव आहे फ़क्त त्याचा आनंद राहुदे इतकंच...

    ReplyDelete
  12. :(

    पण सलाम त्याच्या धैर्यशक्तीला..! लवकरात लवकर बरा व्हावा अशी प्रार्थना.

    ReplyDelete
  13. लहान मुलं अशी आजारी किंवा त्याना अशा अवस्थेत पहावत नाही. खरच धिराचा आहे तो गुंडु.
    सोनाली

    ReplyDelete
  14. अपर्णा दोन गोष्टी आहेत गं.... त्या मुलासाठी खरचं खूप वाईट वाटतय!! जे काय झालं असेल त्याला त्यातून तो लवकर बरा व्हावा आणि त्याचे ते आजारपण सहन करण्याची शक्ती त्याला आणि त्याच्या घरच्यांनाही मिळो...
    पण तूला जर शक्य झाले तर त्याच्या आजीशी बोल आणि एखादी लहानशी गोष्ट का होईना त्या मुलासाठी करायचा प्रयत्न कर.... तुझी तगमग जरा कमी होईल....

    दुसरी म्हणजे असे काही समोर आले ना की आपल्याला आपल्या श्रीमंतीची जाणिव होते गं!!!

    ReplyDelete
  15. दिपक खरंच तो बरा व्हावा हीच प्रार्थना करूया..

    ReplyDelete
  16. सोनाली, मलाही त्याचा चेहरा पाहून इतके दिवस काहीच कळलं नाही..खरंच धीराचा आहे तो..

    ReplyDelete
  17. तन्वी, तुझा सल्लाही मोलाचा आहे.. फ़क्त साधारण अशा बाबतीत कुणाला गरज असेल तरच आपण त्यांच्या प्रायव्हेट बाबतीत पडावं असं इथं कधीकधी होतं बघं..आणि आपण काही त्यांच्यासाठी करावं असं आपल्याला वाटणं आणि त्यांना त्याची गरज असणं हेही पाहिलं पाहिजे नं??

    ReplyDelete
  18. अपर्णा....ते छोटुकलं पोर कोणत्या कोणत्या दिव्यातून जात असेल त्याची कल्पनाच करवत नाही गं... आणि एवढे असून देखील तो आणि त्याची आजी गोष्टींच्या कल्पनारम्य जगात इतके रंगून जातात.... आपली वेदना, दू:ख विसरावीत म्हणून त्यांनी अनुसरलेला हा मार्ग असेल कदाचित! पण त्या छोट्याचं सोशिकपण मनाला चटका लावून गेलं!

    अरुंधती
    --
    Sing, Dance, Meditate, Celebrate!
    http://iravatik.blogspot.com/

    ReplyDelete
  19. त्याला काय झालंय विचारून फक्त आपलं कुतुहल शमणार ग ... त्याला सहन करयचं बळ मिळो, आणि एक दिवस बरं वाटो एवढंच आपण चिंतू शकणार.

    ReplyDelete
  20. अरुंधती, गोष्टींच्या जगात रमून जायचा त्यांचा मार्ग खरंच चांगला वाटतोय..

    ReplyDelete
  21. गौरी, तुझ्यासारखंच मलाही वाटतं की त्याला बरं वाटो...

    ReplyDelete
  22. अपर्णा,ही वाचल्यावर मन खूप उदास झालय . तो मुलगा आहे त्या परिस्थितीत सुद्धा तो जगण्याचा आनंद घेतोय!!! शेवटी तुम्ही जीवन किती जगला यापेक्षा कस जगला हे महत्वाच असा मी विचार करतो.

    ReplyDelete
  23. खुप मस्त लेख लिहला आहे आवडला

    ReplyDelete
  24. मनमौजी, खरं तर जीवन कसं जगलं हे महत्त्वाचं असलं तरी इतक्या लहान वयासाठी तो विचार करणं मला कठिण जातंय..पण काही (किंवा बर्‍याच) वेळा सत्य हे कटू असतं...

    ReplyDelete
  25. धन्यवाद कृष्णा...बर्‍याच दिवसांनी ब्लॉगवर आलीस....पुन्हा एकदा स्वागत :)

    ReplyDelete
  26. डोळ्यांतून पाणी आलं. काही लोकांचे हाल खरंच न बघवणारे असतात. त्यांनी कदाचित पूर्वायुष्यात खूप पापं केली असतील. म्हणून या जन्मात त्यांची शिक्षा भोगत असावेत.

    ReplyDelete
  27. संकेत, पूर्वायुष्यातले भोग हा वेगळा भाग झाला...पण इतक्या लहान अजाण वयात हे ओझं मला जास्त वाटत..

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.