Saturday, December 15, 2012

...लहान मुलांचं आयुष्य म्हणजे जणू एका कळीचंच...ती उमलण्यापर्यंतचा एक सुंदर प्रवास..काही निष्पाप कळ्या मात्र उमलण्याआधीच मुद्दाम खुडल्या गेल्या की बागेला जसं वाईट वाटावं तसं कालपासून झालंय. जी बातमी नुसती ऐकून टीव्हीवर पाहायचा धीर होत नाही त्याबद्दल काय लिहू? ही पोस्ट अकाली खुडल्या गेलेल्या त्या सगळ्या वीस कळ्यांसाठी. ... :(

Tuesday, December 11, 2012

Rest In Peace 832F


येलोस्टोन, प्रत्येक निसर्गप्रेमीला जावंजावंसं वाटणारं जंगल. एकेकाळी तिथला लांडगा नामशेष झाला होता आणि मग पर्यावरणवादी आणि शास्त्रज्ञ यांच्या अथक परिश्रमाने ७० वर्षानंतर म्हणजे ९५ च्या सुमारास कॅनडामधून १४ लांडगे पार्कात सोडले गेले होते. याविषयी डिस्कव्हरीची एक सुंदर डॉक्युमेंटरी सुद्धा पाहण्यासारखी आहे आणि जालावर बर्‍याच ठिकाणी याबद्दल लिहिले गेले आहे. लांडग्याचं "आ...ऊ" पार्कात पुन्हा घुमतंय ही गेले काही वर्षे सर्वच प्राणीप्रेमींसाठी एक चांगली घटना आहे. 

आज हा विषय काढायचं कारण म्हणजे सकाळसकाळी एक बातमी ऐकली ज्याने हे सगळं आठवलं आणि वाईटही वाटलं. ती बातमी म्हणजे या पार्कातला सगळ्यात प्रसिद्ध फ़िमेल लांडगा (याला मराठीत काय शब्द आहे?) एका शिकार्‍याच्या बंदुकीला बळी पडला. ही घटना घडली वायोमिंगमध्ये पण येलोस्टॊनच्या थोडंसं बाहेर. जोवर हे लांडगे पार्कात आहेत तोवर त्यांना अभय आहे पण एकदा पार्काबाहेर माणसांच्या तावडीत सापडला की लांडगाही माणसाचं  भक्ष्य होतो. मग देश कुठलाही असो.

थोडं या प्रसिद्ध लांडग्याबद्द्ल. लमार कॅनयान पॅकची प्रमुख ८३२एफ़ लांडग्यांच्या बिहेवरियल रिसर्चसाठी गळ्याला रेडीओ बांधलेल्या लांडग्यापैकी होती. आपल्या पॅकसाठी शिकार करण्यासाठीची धडाडी आणि पिलांची अतिशय काळजी घेणे हे तिचे मुख्य गूण तिचा अभ्यास करणार्‍यांनी नोंदवून ठेवले आहेत. लांडग्यांना मूळात या पार्कात अशाप्रकारे पुन्हा आणणे आणि मग जी नवी पिढी तयार होतेय त्यांना कॉलर करून त्यांचा अभ्यास करणे हे वाचताना वाटतं तितकं सोप्पं नाहीये. त्यामागे एका मोठ्या टीमचे अथक परीश्रम आहेत. अशा प्रकारे केलेल्या संशोधनातून जी माहिती मिळते त्याने संवर्धनाच्या प्रयत्नांसाठी हातभार लागतो.अशा प्रकारच्या हत्येने हे संशोधनाचं कामही पुन्हा नव्याने सुरू करायला लागतो. शिवाय लांडग्यासारखे प्राणी जे या पार्कात पुन्हा आणण्यासाठी इतके प्रयत्न केले गेले आहेत ते अशाप्रकारे गमवल्यावर पुन्हा तेच कार्य करणं हेही तितकं सोप्पं नाही. या वर्षात अशाप्रकारे संशोधनासाठी कॉलर केलेल्या लांडग्यापैकी ८ लांडगे मारले गेले आहेत. हा काही चांगला आकडा नाहीये.

संशोधनाच्या हिट लिस्टवर असणारा एक प्राणी पार्काच्या बाहेर गेल्यामूळे शिकार्‍यांच्या हाती लागणं यासारखं दुर्दैव ते काय? आपण जेव्हाही अशा शिकारी होतात तेव्हा माणसांचा एक बचावात्मक पवित्रा ऐकतो की ते आमच्या जागेवर आलेत. खरं आपण किती अतिक्रमण करून बसलोय याचीही आधी शहानिशा करायला हवी. आणि किती वेळा या प्राण्यांनी माणसांवर प्रथम हल्ला केलेला असतो हेही एक वेगळेच. खरं कारण दडलं असतं ते त्या प्राण्यांना मारून मिळणार्‍या कातडी, दात इ.च्या बदल्यात हाती लागणार्‍या घबाडाचं. ते कधीच उघड होणार नसतं. 

अभयारण्य करून हे प्रश्न खरंच सुटतील का हे एक कोडंच आहे. कारण अभयारण्याच्या सीमा प्राण्यांना शिकवणं कठीणच. त्यातही जर कॉलर असलेला लांडगा, शिकारी डोळेझाक करून खुशाल मारत असेल तर ज्यांना कॉलर नाही त्यांची गचांडी धरायला कितीसा वेळ?


पुन्हा एकदा निसर्ग विरूद्ध माणूस असे वाद रंगतील. ती सगळी चर्चा वाचताना मला आठवतोय मी माझ्या आतावरच्या भ्रमंतीत पाहिलेला एकमेव रुबाबदार जंगली लांडगा आणि आज ही बातमी वाचून आलेल्या आठवणीने अंगावर आलेला शहारा..

जालावरच्या चर्चेतलं लक्षात राहिलेलं वाक्य म्हणजे "Never kill an animal for doing what it is programmed to do."
May your soul Rest In Peace 832F. 

तळटीप - 

  • यलोस्टॊनमध्ये लांडगा पुन्हा आणण्याबद्दलची रोचक माहिती इथे वाचता येईल. 
  • वरचं लांडग्याचं मोफ़त चित्र साभार.Wednesday, December 5, 2012

अलाश्काची गमत


हाय..हो मला नं कुणी दिसलं की पहिलं हाय कलायला आव्वतं..पन आज हाय केल्यावर नंतल शगलं शिलियश म्याटल आहे.
आई बोल्ली का तुमाला? ती आनि बाबा आमाला मोथ्या बोतीतून तिथे लांब घेऊन गेले होते अलाश्काला. त्यांना रिलॅक्स का कायतरी व्हायचं होतं आनि फ़िलायचं पन होतं. मला पन बाड इगल बगायचा होता पन तो आई-बाबाला दिशला तेवाच मी कालसीट मदे झोपलो होतो. पन तुमाला माहिते का तिथे खूप सालमन फ़िशी पन होते. तेच बाबाला बगायचे होते.
मग त्यांनी एक कुथलीतली जागा शोधली. खलं त्यांनी नाहीच शोदली कालन त्यांना कुनाला लस्ते विचालायला आव्वत नाई. आईने पाल्क लेंजलला विचालं आनि तिने त्यांना शांगितलं तिथे जा तल हे दोगे लगेच चला तिथे. तली नशीब मी तोपलयंत जागा जालो होतो ते. मग गालीतून उतलल्यावर आई, बाबा, दादा आनि मी माज्या स्तोलरमध्ये अशं निगालो.

बाबाला फ़िशी खूप आवलतात. म्हंजे पालायला पन. आईला आनि आमाला पन आवलतात पन ते खायला आनि आईला तर काहीच पालायला आवलत नाई. खलं म्हंजे मला तो काकाचा डॉगी आवलतो पन आई नुस्ती घाबलते आनि त्यात दादापन म्हनून आमी कदी कदी साशा आंटीकले तिची म्यावी बगायला जातो तल त्याला पन आई घाबलते. खलं तल तो मला ओलखतो. पन जाउदे. आई कुथे मला मासे पालायाला देनाल म्हनून आमी त्या पार्ल्कमदल्या ब्लिजवल उबं लाहून ते क्लॉस कलनाले सालमन बगत बसलो. बाबाने खूप फ़ोतो काडले. आमचे नाई फ़िशीचे. 
मग आई म्हनाली माझा आनि लुषांकचा पन काड नं एक फ़ोतो. त्याने काडला पन त्याला अजून सालमन बगायचे होते आनि आईला वॉक कलायचा होता. दादाला माज्या स्तोललमद्ये बसायचं होतं. मला काय कलायचं होतं ते आता मला आथवत नाई. पन सगल्यांना वेगंवेगं कायतली कलायचं होतं. म्हनून आई बाबाला म्हनाली मी जला तिथे जाऊन बगते बीचवल जाता येतं का? बीच म्हनजे नदीचा बीच...त्याला काय म्हनतात बलं हं किनाला तर तिथे..बाबाने लगेच तिला मला घेऊन जा म्हनून सांगितलं..आई म्हनते तो नेहमी अशी वाटनी कलत असतो. ही दोगं कदी मोथी होनाल काय माहित? 
मग आई आनि मी मस्त निगालो.तिथे खूप हिलवीहिलवी झाली होती आनि थोलं चालल्यावल पायल्या होत्या.तिथेच तो बीचपन दिसत होता. पन मी पलेल म्हनून आई मला म्हनाली  बाबू मी तुजे फ़ोतो काडते मग आपन पलत जाऊ. मी तरी उतलत होतो पन तिला मला हेल्प कलायची नव्हती मग आमी पलत आलो. येताना आमाला एक बुक दिशली. तिते लोकांनी तिते आले म्हनून नाव लिहिलं होतं. 

आईने आमची नावं पन तिथे लिहिली आनि आमी पुले परत त्या ब्लिजवल आलो तर बाबा आनि दादा (आनि हो माजा स्तोलल पन) गायब. आईला वातलं ते पाल्किंग लॉतला असतील म्हनून तिथे गेलो तल तिथे पन कुनीच नाय. आता आई म्हनाली आपन पलत तिथेच ब्र्लिजवर जाऊ. मध्ये लस्त्यात तिने एक दोन आदीपासून लोकं होती त्यांना पन विचाललं  पन कुनीच बाबाला पाहिला नव्हता. आई तली अशी हेल्प घेते बाबाने कुनाआच विचालं नशतं. अशं आम्ही कितीतली वेला ब्लिज आनि पाल्किंग लॉतला गेलो आनि मला आता भूकपन लागायला लागली. सगलं सामान गालीत आनि आईकले चावीपन नाई. 
त्या तिथे कुथलाच फ़ॉलेल्स्ट लेंजल पन नव्हता..आनि आई म्हनाली की सेलफ़ोनला लेंज पन नाई. बापले..मी खलं तर भूक लागली म्हनून पन ललायला लागलो आनि मला  बाबा आनि दादापन पाहिजे होते...मग आई तिथे नवीन लोकं आतमध्ये जात होते त्यांना पन म्हनाली की बाबा दिशला तल पलत पाथवा. तिने कुथेतली जाऊन ती फ़ोनची लेंज आनली (माजी आई इंजिनियल आहे नं.मग तिला लेंज नको का आनता यायला?) तल नेमकं बाबाने फ़ोन उचलला नाई. मग तिने त्याला सांगितलं तू इकलेच ये म्हून. पन किती वेल कोनीच आलं नाई. आता आईपन ललनार होती पन ते काम मीच केलं. 

मग आई म्हनाली आपन परत बीचकले जाऊ. तल त्या लस्त्यावल पन कोनीच दिशलं नाई म्हनून आईने जोलात हाका मालायला सुलुवात केली. मी पन ओलललो "बा.....बा....." "दा......दा..." मग लांबून दादाचा आवाज आला...मग आमी थांबलो तर ते कुथून तली वलून येत होते...आईने मला उचलून घेतलं कालन हाका मालुन मी दमलो होतो नं? आनि मग बाबा आनि दादा पन आमच्याकले आले...खलं म्हंजे बाबा आनि दादा हलवले होते आनि मग त्यांनी आमालाच आमी हलवलो म्हनून सांगितलं...

त्यादिवशी आई बाबाबलोबल अजिबात रागावली नाई. ती फ़क्त म्हनाली चल बोतीवर पलत जाऊया. आनि तो आमचा पहिलाच दिवस होता म्हनून मग त्यानंतल कदीच गाडी लेंट कलुन अलास्काच्या जंगलात फ़िलायचं नाई हे आईने बाबाला शांगितलं आनि बाबा पन हो म्हनाला.मला पन बलं वातलं कालन कालशीतमध्ये शालखं बसन्यापेक्षा बाबाकडे अप्पी बली पलते. 

मला माहिते आईला वातलं जल त्या जंगलात बेअल आला अशता तल? आनि आमी कशं बोलवलं असतं पोलिशाला पन...तिथे अजून थोल्या वेलाने कालोख जाला अशता तल? पन मी आईला शांगितलं मी होतो नं मोथ्याने हाक मालून बोलवायला? आदीच आईने हाक मालायला शांगितली असती तल मग मी आईच्या ब्लॉगवल कशा आलो अशतो? मागच्या वेली दादाने नंबल लावला तेवाच मी थलवलं होतं की मी पन एक गमत शांगायला येनाल आहे..तल ही माजी आनि दादाची गम्मत आहे...अलाश्काची गमत.