Showing posts with label महिलादिन. Show all posts
Showing posts with label महिलादिन. Show all posts

Wednesday, March 8, 2017

ती आणि मी

जसजसं वय वाढतंय तसतसं काम करायची शक्ती वाढावी म्हणून जमेल तसं जिममध्ये जायचा मी प्रयत्न करत असते. जेव्हा सकाळी कामावर लवकर उठून जावं लागे तेव्हा घरची जबाबदारी बाबावर टाकून अगदी सहा वाजतादेखील मी तिथे दाखल झाली आहे. अशावेळी जायचा मुख्य फायदा म्हणजे जवळजवळ कुणीच आलेलं नसतं. आपली गाण्याची प्लेलिस्ट मोठ्याने लावली तरी डोळे मोठे करणारं कुणी नसणार असतं. किंवा शांततेनं दिवसाची सुरुवातही करता येते.

माझ्या वेळेत थोडंफार इथं तिथं होई. पण बरेचदा माझं आटपेस्तो एक तीन चार जणींचा ग्रुप धावून परत लॉकर रूममध्ये मला भेटे. माझी त्यांची ओळख हाय हलोच्या पुढेही गेली. पाश्चात्य देशात लॉकररूममध्ये दिगम्बर अवस्थेत या ग्रुपला पाहताना मला खर तर आता नजर मेल्यामुळे म्हणा किंवा इतका व्यायाम केल्यावर थोडा वेळ असाही काढला म्हणून काय त्यात याची सवय झाली असल्यामुळे म्हणा काही गैर किंवा लाजिरवाणं वगैरे वाटत नाही. उलट आपल्या शरीराला इतकं आपलंसं म्हणून सहज वावरणाऱ्या या बायका मला  योग्य वाटतात.
माझ्याशी त्यांच्यातली एक नेहमी बोले. नेहमीचंच रुटीन बोलणं पण तिने मला तिथे त्या पाचेक मिनिटात एकटं पडू दिलं नाही. आम्ही सर्व त्या क्षणापुरता एकमेकींच्या मैत्रिणी होत असू. या मैत्रीला आणि आम्हाला नावाची गरज नसे.

मागच्या वर्षी मी मध्ये एक वेगळं जिम सुरु केलं होतं. तिथला योगाभ्यास मला आवडत असे फक्त हे जिम थोडं महाग होत आणि नंतर कॉस्ट कटिंगच्या आमच्या दिवसात आम्ही पुन्हा जुन्या जिमवर सेट झालो. तर तिथे एका योग करताना मला "ती" दिसली. साधारण ५५ च्या आसपास वय असेल पण शरीरयष्टी कमनीय आणि योग करतानाचा फिटनेसही अगदी बरोबर. आम्ही हसलो पण तिने नक्की मला ओळखलं का हे मला माहीत नव्हतं. तसंही येत जात कितीतरी अनोळखी व्यक्ती सहजगत्या हाय करून जातात म्हणा.

मग माझं ते जिम सुटलं आणि सकाळी जिमला जायची वेळी मी थोडी उशिरा केली म्हणजे मुलांबरोबर वेळ मिळेल. त्या दिवशी मी थोडी लवकर आणि "ती" थोडी उशिरा असा एक योगायोग आला. मग मी तिला त्या जुन्या जीबद्दल विचारून माझा जुना प्रश्न निकालात काढला. तिने मला तिथेही ओळखलं होत आणि तिनेही काटकसर करायच्या दिवसात ते जिम सोडून दिलं होतं. आज त्यांचा मोठा ग्रुप नव्हता आणि लॉकर रूममध्ये आम्ही दोघीच होतो.

तिला बोलताना दिगंबरावस्थेत जास्त मोकळं वाटत असावं त्यामुळे बोलता बोलता ती माझ्या जवळ आली आणि माझे डोळे एकदम उघडले. तिचे दोन्ही स्तन रोपण केलेले होते. जगाचं आणि बरेचदा स्त्रीचं सुद्धा ज्या अवयवामुळे जास्त लक्ष वेधलं असतं तिला ते नव्हतंच. ते स्वीकारून तिने ज्या उमेदीने बाकीच्या शरीराच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केलं होतं त्याला मी मनातल्या मनात सलाम केला.

याआधी या संपूर्ण गृपबद्दल वाटणारा अभिमान आज काकणभर जास्त वाढला. अशा कितीतरी स्त्रिया ब्रेस्ट कॅन्सरशी सामना करत असतील आणि तरी आपलं रोजचं रुटीन टिकवत असतील. त्यांनी शरीर झाकलं की आपण त्यांना नॉर्मलच समजून त्यांच्याशी वागतो, तुलना करतो. कधीतरी आपण कपड्याआतली त्यांची वेदना पहिली तर त्यांचे हसरे चेहरे आपल्याला बरंच काही शिकवून जातील.


आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त  "ती" आणि अशा अनेक स्त्रियांना माझे कोटी कोटी प्रणाम.
 

Tuesday, March 8, 2016

My Eagle is taking a flight

ती काही तासांची असताना मी तिला पहिल्यांदी पाहिलं. ती आली, तिने पाहिलं आणि जिंकलं असं तेव्हा मला तरी वाटलं. आमच्या छोट्याश्या कुटुंबातली ती पहिली पुढच्या पिढीची सदस्या, माझ्या ताईची मुलगी, माझी भाची "अदिती". ती झाली तेव्हा माझं इंजिनियरींगचं शेवटचं वर्ष सुरु होण्याआधीची सुट्टी होती. तिला हॉस्पिटलमधून आमच्या घरी सुरुवातीचे महिने ठेवणार याचा कोण आनंद मला होता. माझ्याकडे तिच्यासाठी वेळच वेळ होता. नंतर साधारण चारेक महिन्यांची झाल्यावर ताईला कामावर जावं लागणार होतं. तो पहिला दिवस माझ्या लक्षात आहे. माझा आणि माझ्या बहिणीचा आवाज तसा सारखा आहे. त्यावेळी मी अदिती असलेल्या खोलीत काही बोलत गेले की तिला वाटायचं की तिची आईचं आली. 

मग वेळ आली तिची तिच्या घरी जायची. त्या दिवशी आमचं घर इतकं रिकामी वाटत होतं की मला वाटत होतं लगेच ट्रेन पकडून तिच्याकडे जावं. अर्थात लगेच नाही पण माझ्या कामाची जागा आणि तिचं घर हे मला माझ्या घरापेक्षा कमी अंतर असल्यामुळे मी कामावर जायला सुरु केल्यावर अदितीला जास्तीत जास्त वेळा भेटायला जायची संधी मिळाली. भारतात तेव्हा (किंवा कदाचित आताही) ज्या स्पर्धात्मक युगात आम्ही आयटीवाले काम करायचो, तेव्हा कामावरून निघताना अगदी साडेअकरा पण व्हायचे. मग ती झोपली की मी पोचायचे आणि ती सकाळी उठली की मी तिच्यासाठी सरप्राईज म्हणून हजर असायचे. 

तिला माझ्याबरोबर आणि मला तिच्याबरोबर खूप आवडत असे. माझ्या मित्र-मैत्रिणींमध्ये मी तिचा उल्लेख"माझी मुलगी" म्हणूनच करत असे. तेव्हा तर माझं लग्न पण झालं नव्हतं. माझे तिच्याबरोबरचे अनेक प्रसंग माझ्या लक्षात आहेत. तिच्यापासून गेले कित्येक वर्षे मी हजारो मैल दूर आहे पण माझं चित्त तिच्याहीपाशी आहे. तिचा अभ्यास, आवडीनिवडी, वाचन यात काय नवीन आलं, हे आमच्या स्काईप संवादातून मी माहित करून घेत असते. 

तरी जेव्हा तिने मला पहिलं पत्र ती साधारण सहा वर्षांची असताना पाठवलं होतं तेव्हा मी चकित झाले होते. माझी मुलगी आता लिहिते हे पाहून मला दाटून आलं. ती मराठी माध्यमात शिकत असल्यामुळे आमची पत्रमैत्रीदेखील बहरत होती. सुरुवातीचं चार पाच ओळींचं पत्र आता हळूहळू मोठं होत होतं. काही वर्षांनी त्यात शेवटी नेहमी एक चिंटूचा जोक ती लिहित असे. मी काय लिहित होते ते मात्र मला अजिबात आठवत नाहीये.मला मुलगी नाही याची मध्ये मध्ये खंत वाटली की मी आदितीसोबत संवाद साधते, तिच्याबरोबर शास्त्रीय संगीताची एकच मेहफिल मी ऐकली आहे आणि ती मला नेहमी लक्षात राहील.  

यंदा ती बारावीत आहे, परीक्षा सुरु आहेत आणि काही दिवसांपूर्वी  तिचं पत्र आलं. आता कॉलेजमध्ये गेल्यामुळे मराठीमध्ये लिहिणं सुटलंय अस म्हणणारी माझी छोटी भाची मला तिच्या आताही एकसारख्या असणाऱ्या सुवाच्च अक्षरातून मला फोन किंवा स्काइपवर सांगू न शकणारी तिच्या करियरसंबंधी काही सांगु पाहत होती. तिच्याकडून सर्वांच्या असणाऱ्या अपेक्षा, तिला काय करायचं आहे आणि हे तिने तिच्या आईबाबांना कसं समजावून सांगितलं आहे हे वाचताना माझे डोळे पुन्हा एकदा भरून आले. 

हे पत्र तिने लिहायचं मुख्य कारण आम्हा दोघीमधला असलेला विश्वास आणि तिच्या निकालानंतर मला धक्का वगैरे बसू नये म्हणून तिने घेतलेली खबरदारी हे सगळं वाचून मी तरी इतकचं म्हणू शकते "My Eagle is taking a flight". 

आजच्या महिलादिनानिम्मित माझ्या भाचीसारख्या अनेक मुली त्यांच्या भविष्याची तयारी करत असताना दाखवत असलेल्या जिद्दीला सलाम म्हणून. महिलादिनाच्या शुभेच्छा.

आम्हा दोघींमधला पत्रसंवाद मी सगळ्यांना दाखवेनच असं नाही पण मागे तिला एक कार्ड पाठवलं होतं, ते इथे   आहे.  




 

Saturday, March 8, 2014

One Tough Mother

ती तेरा वर्षांची असताना  नाझी जर्मनीच्या तावडीतून सुटून मुक्त अमेरिकेत आलेलं हे कुटुंब. तिच्या बाबांनी इथेच पोर्टलँडमध्ये एक टोप्यांच्या व्यवसायात आपले पाय रोवले आणि यथावकाश एक छोटी कंपनी सुरु केली. त्यांच्या मृत्यूनंतर या मुलीच्या नवऱ्याने ही कंपनी पुढे सुरु  ठेवली पण त्यानंतर सहाच वर्षात अचानक वयाच्या फक्त ४७व्या वर्षी हृदयविकाराने तोही गेला, तेव्हा ती आता चाळीशीत असणारी ती वर उल्लेखलेली मुलगी, जिने कधी कुठल्याही  व्यवसाय क्षेत्रात आधी कधी पाऊल टाकले नव्हते आपल्या बाबांचा इतके वर्षांचा व्यवसाय हातात घेतला. 

तिची मुलं तेव्हा अनुक्रमे २१, १९ आणि १२ वर्षांची होती म्हणजे लहानगी नसली तरी अजून शाळा कॉलेजमधली, पालकांवर अवलंबून होती. या मुलांची ही one tough Mother हा सगळा व्यवसाय हातात घेते तेव्हा  आजूबाजूंच्या इतर भाकीतकर्त्यांनी आता ही  कंपनी बुडणार म्हणून चारीठाव सांगून झालं होतं. हेच कशाला तिने व्यवहार हातात घेतल्यापासून वर्षभरात बँकेनेही फक्त चौदा हजार डॉलर इतक्या शुल्लक रकमेवर कंपनी बुडीतखात्यात घालण्याचा सल्ला दिला होता. अशा सगळ्या परिस्थितीला न जुमानता शिवाय पतीनिधनाचं ताजं दुःख बाजूला ठेवून आपलं लक्ष आपल्या मोठ्या मुलाला हाताशी धरून नवीन रिटेल प्रॉडक्ट्स वाढवून आणि जाहिरात इत्यादी माध्यमातून कंपनीला नुसतंच तारलं नाही तर तिचं नाव उत्तर अमेरिका आणि अन्य देशात नावारूपाला आणलं. 

२००४ च्या सुमारास  कंपनीची  त्या वर्षीची वार्षिक विक्री १ बिलियन डॉलरपेक्षा जास्त होती. तिचं नाव निव्वळ व्यवसायामुळेच आहे असं  नाहीये. तिने अनेक ठिकाणी मदतीसाठी संस्था सुरु केल्या आहेत आणि त्यातल्या स्त्रियांसाठी असलेल्या संस्थाही भरपूर आहे. आपल्या भारतातही तिची "हर प्रोजेक्ट(Her project)" म्हणून एक संस्था आहे. तिचा यु ट्यूब विडिओ खाली आहे.



तिच्या बाबांनी पोर्टलँडजवळच्या नदीचं नाव ठेवलेली ही कंपनी आहे "कोलंबिया स्पोर्ट्सवेअर" आणि ही टफ मदर आहे "गर्ट बॉयल". दोन दिवसापूर्वी ही आई नव्वद वर्षांची झाली. तिचा वाढदिवस महिला दिनाच्या आसपास असणं यापेक्षा सुखद योगायोग तो काय?

गर्टच्या खात्यावर असलेली ही यादी पहिली तर तिच्याबद्दलचा आदर  नक्की दुणावेल. 

  • The SBA Outstanding Business Person Award for Oregon (1977)
  • The Oregon Chapter of Women’s Forum Woman of the Year Award (1987)
  • A Top 50 Woman Business Owner by Working Woman Magazine (1993-96)
  • Oregon Entrepreneur of the Year, Oregon Enterprise Forum (1994)
  • The Golden Plate Award, American Academy of Achievement (1998)
  • Awarded the Jimmy Huega “Can Do” Award (2003)
  • Member, Oregon Commemorative Coin Commission (2004)
  • Granted Portland, OR’s prestigious First Citizen Award (2005)
  • Women of Distinction Award, Marylhurst University (2008)
  • Small Business Association Impact Award (2009)
  • Outstanding Mother Award, National Mother’s Day Committee (2009)
  • Women of Achievement Award, Oregon Commission for Women (2009)

तळटीप:

आतापर्यंत माझ्या करीयरमध्ये consulting मध्ये असल्यामुळे वेगवेगळे क्लायंट्स आले आणि माझ्यासाठी आदराची नवनवीन स्थानं निर्माण होत गेली. या टफ मदरच्या एका मुख्य प्रोजेक्टवर काम करायची संधी मिळणं हे माझंच भाग्य. आता तिचा मुलगा मुख्य कारभार संभाळत असला तरी कार्यकारिणीवर असलेली ही आई मला बाजूलाच असलेल्या employee store मधल्या तिच्या One tough Mother या  पुस्तकामुळे आणि  येता जाता लावलेल्या तिच्या पोस्टरमुळे नेहमी दिसते. तिला तसं  पाहताना मला तिची पार्श्वभूमी जाणून घ्यावीशी वाटली. हे पुस्तक खर अजून माझ्या  विशलिस्टवरच आहे. आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गेले काही महिने मला तिच्याबद्दल वाटत असलेल्या भावनांना शब्दांत मांडता आलं की  नाही माहित नाही पण त्या निमित्ताने या वाचकांना एका स्त्रीच्या यशाची कहाणी वाचावीशी वाटली तरी ते या पोस्टचं यश मी समजेन. तिच्या पुस्तकाचा काही भाग अमेझॉनवर या लिंकवर आहे. 



Friday, March 8, 2013

जिनेट


जिनेट मला भेटली ती मागच्या जानेवारीत मी योगाभ्यास सुरू करायचं पुन्हा मनावर घेतलं तेव्हा. म्हणजे झालं असं होतं की सारखं घरातून काम केल्यामुळे मला माणसं दिसायची वानवा होती. शिवाय माझा छोटा मुलगा वर्षाचा झाला होता. त्यामुळे तो त्याच्या पाळणाघरात रूळला होता.त्याच्या निमित्ताने वाढवलेलं वजन कमी करण्यापेक्षाही त्याच्यावेळी झालेल्या काही गुंतागुंतीनी पुढे जाऊन मोठं काही होऊ नये म्हणून व्यायामात नियमितपणा आणायचं मनात होतंच. चालण्याचा एकमेव व्यायाम सोडून मागची काही वर्षे काहीच केलं नाही म्हणून मग मार्गदर्शनाखाली व्यायाम आणि आपल्याला झेपेल असं म्हणून योग असा तो योगायोग होता. 

तर मी ज्या जिममध्ये जाऊ शकते तिथे प्रत्येक बुधवारी योग शिकवायला येणारी ही व्यक्ती म्हणजे जिनेट. उंचीला साधारण पाच फ़ूट चार इंच, निमुळता चेहरा, गव्हाळ रंग आणि कमालीची सडसडीत. म्हणजे तिला दोन टीनएर्जस आहेत हे मला तिने सांगितलं म्हणून कळलं. नाहीतर तसंही कुणाचं वय वगैरे गेस करायच्या बाबतीत माझी प्रगती शून्य पण बांध्यावरून काही वेळा निदान मूलं झाल्याचं लक्षात येतं. अर्थात जिनेट त्यातल्या अपवाद गटात.

तिच्या या क्लासला माझ्या आधीपासून नियमित येणारे तिचे जे काही शिष्य होते, त्यात मला पाहून कदाचित जानेवारीत बरीच जणं व्यायामाचा निश्चय करतात त्यातलीच मी असेन असं तिला वाटलं असावं.त्यामुळे तेव्हा तशी आमची जुजबीच ओळख झाली. मग नंतर साधारण चार-पाच वर्ग मी नियमितपणे गेल्यावर मात्र तिलाही माझ्याबद्दल थोडा विश्वास वाटला. आणि मग पुन्हा एकदा माझं नाव लक्षात ठेऊन विचारणं वगैरे झालं. या पुनरओळखीत मला आवडलं ते म्हणजे तिने मला मी भारतीय दिसते म्हणून तुला योग येतो का हे अजिबात विचारलं नाही. म्हणजे तसं ते विचारलं असतं तर माझी हरकत नव्हती, पण असं विचारलं की मला कसंतरी व्हायला होतं. कारण मी देशात असताना अगदी बेसिक योग शिकले पण त्यात सातत्यता वगैरे काहीच नव्हती. त्यामुळे इथे हा प्रश्नच आला नाही हे माझ्यासाठी बरंच होतं.

जानेवारीत सगळी जणं सुट्ट्यांमध्ये भरपूर खाऊन, आराम करून आलेले असतात. अगदी जिनेटही मला वाटतं दहा एक दिवसांची सुट्टी घेऊन मग अवतरली होती. त्यामुळे तिच्या जानेवारीच्या वर्गाची पेस एखाद्या संगीत मैफ़िलीत सुरूवातीला मंद्र सप्तकात धीम्या गतीने "सा" आळवला जातो तशी. मग जसजसं बाहेरचं वातावरणही हळूहळू कोंब येणार्‍या चेरी वृक्षासारखं बहरत जातं, तसतसं योगवर्गातल्या आसनांनी गती पकडली असते आणि एखादा नामवंत गायक वेगवेगळ्या रागांनी मैफ़िलीत रंग भरतो तसं वेगवेगळी आसनं आम्हाला दाखवली जातात. आणि मग पुन्हा शिशिर येतो तेव्हाचा बाज आणखी वेगळा. पुन्हा एकदा मैफ़िलीचे सूर धीमे करणारा.
योगासनं करताना स्वतःला आव्हान देणे हा उद्देश नसावा याबाबत जिनेटचं आग्रही असणं मला फ़ार आवडायचं. म्हणजे कुठल्याही आसनाची अंतिम स्थिती कशी असते हे स्वतः दाखवताना त्याचवेळी जर त्या स्थितीपर्यंत जाणं शक्य नसेल तरचे दोन-तीन पर्याय ती तिथेच दाखवत असे. 

खरं सांगायचं तर तिला योगासन करताना पाहाणं हीच मोठी पर्वणी असं जसजसे ती बेसिकच्या पुढची आसनं शिकवत गेली तसतसं आम्हा सर्वांनाच वाटायचं. शिवाय हे सगळं करताना प्रत्येक स्टेप ती शब्दातही मांडत असे. अगदी एक वाक्य आणि मग तिचं त्याबरहुकूम ती स्थिती दाखवणे आणि स्टेपप्रमाणे त्यातले बदल दाखवणे. नाचातलं मला फ़ार कळत नाही. पण तिचं आसन दाखवताना एका स्थितीमधून दुसर्‍या स्थितीत जाणे एखाद्या निष्णात नर्तकीच्या पदन्यासासारखं दिसे. त्यातही विन्यासातले तिचे एकापाठी एक करायचे जे प्रकार होते ते जवळजवळ नृत्यच होतं. काही वेळा अगदी मीच नाही तर बाकीचे साथीदारही तिचं आम्हाला हे असे प्रकार दाखवताना मुग्ध होऊन पाहात आणि मग आम्ही सर्वच तिला सांगत असू की आम्ही हे करण्यापेक्षा तू आम्हाला दाखवतेस हे पाहाणं ही आमच्यासाठी जास्त मेजवानी आहे. मग त्यावर तिचं पोनिटेल हलवून खळखळा हसणं माझी बुधवारची दुपार हसरी करून जाई.

साधारण चाइल्ड पोजमध्ये थोडं अंग ताणून मग मार्जारासनाने आमची सुरूवात असे. नंतर फ़र्माईश केली असेल तर त्याप्रमाणे किंवा जिनेटने प्लान केलं असेल त्याप्रमाणे इतर आसनं, यात निदान एकतरी विन्यासाचा प्रकार, शेवट जवळ आला की पाठीवर किंवा पोटावर झोपायची आसनं आणि मग त्यादिवशी किती काम केलं असेल त्याप्रमाणे पाच किंवा दहा मिनिटं शवासन असं एका तासाचं सत्र असे. तिच्याबरोबर वॉरियरमधले काही बारकावे तिने प्रत्यक्ष शिकवले आणि माझ्या आसनातल्या त्रुटी मला कळल्या. तसंच त्या त्या पोजमधले करेक्शन्स दाखवली की मग त्या आसनाचा फ़ायदाही मिळतो याचाही प्रत्यय आला. मला कंबरदुखी आहे मी सुरूवातीलाच सांगितल्यामुळे बर्‍याच आसनांसाठी आमच्यासाठी "काय करू नये", याविषयीच्या तिच्या सुचना तर नेहमीच फ़ायद्यासाठी असत. तसंच कधीतरी Can I touch you to give you some adjustment? असं म्हणून तिने हाताने थोडं मणक्याला ताणणं म्हणजे मला कुणीतरी माझं दुखणं जाणून त्यावर मायेने केलेला उपाय वाटे.

त्या जानेवारीनंतर बुधवारचा लंच टाइम इतका हवासा वाटायला लागला की तिच्याबरोबर फ़ॉल कसा आला ते कळलंच नाही. आणि मग जिनेटने एक छोटी अनाउंसमेंट केली. ती होती आठवड्यातून एकदा असं सहा आठवड्याच्या Retreat Yoga ची. मी हा प्रकार आधी कधी ऐकलाही नव्हता. फ़क्त ती म्हणाली की यात आपण एकाच आसनात पाच ते दहा मिनिटं राहणार आहोत आणि अशी साधारण पाच आसनं एका सेशनमध्ये आणि मग शवासन, असा एक तास. त्यादिवशी आठवणीने मी गेले आणि मला आवडलं ते तिचं शांतपणे बोलणं. काही कारण असो पण या क्लासला सुरुवातीला पाच सहा लोकं होती आणि शेवटी मी आणि आणखी एक नियमित धावणारे गृहस्थ अशा दोघांनीच हा क्लास पूर्ण केला. 

या क्लासमध्ये मी एक गोष्ट शिकले ते म्हणजे वर्षभर व्यायाम केल्यावर जसजसं बाहेरचं वातावरण थंड होत जातं तसं आपण आपल्या शरीरालाही योगमाध्यमातून थोडा आराम द्यायला हवं. यातली आसनं म्हणजे बरेचदा पाठीशी थोडं जाड ब्लॅंकेट घेऊन तिने दाखवलेल्या विशिष्ट पोझमध्ये तसंच पडून राहण. जिनेटच्या शब्दात सांगायचं We all worked very hard towards reaching our goals, we run after every small things and try to find out something for us. But sometimes the best thing that our body as well as our mind needs is to do nothing. This retreat yoga will help your body to do nothing but at the same time it will get the energy to perform again next time, may be with more strength than it had before. But at this point stay in the position and enjoy this moment of doing nothing. 

डिसेंबरमध्ये मी भारतात जाणार म्हणून मी जिनेटला आवर्जून ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. मला यायला तसंही जानेवारीचा शेवट उजाडला आणि पुन्हा तिला भेटायला अगदी आठवणीने मी फ़ेब्रुवारीच्या बुधवारी जिममध्ये गेले आणि तिथे तिला न पाहून मला गलबललं.तिथे काम करणार्‍या ऍंजीने मग मला बातमी दिली की जिनेटला फ़ुल टाइम इंस्ट्रक्टर म्हणून नोकरी मिळाली. not a ton of money in teaching classes हे तिचं म्हणणं मलाही जमिनीवर आणून गेलं.

खरं सांगायचं तर आम्ही दोघी एकमेकींचे कुणी नव्हतो, होणारही नव्हतो अगदी मैत्रीण वगैरेही नाही.या नात्याला तसा काही अर्थ नव्हता. पण तरी तिचं त्या बुधवार दुपारसाठी असणं माझ्यासाठी खास असायचं. एकदा बाबा आले तेव्हा मी तिच्यासाठी थोडी काजूकतली नेली होती. मग पुढच्या क्लासला आवर्जून तिनं तिच्या नवर्‍याला ती आवडल्याचं सांगणं, माझ्याकडे एखादी सोपी चिकनची रेसिपी सांग म्हणून विचारणं किंवा कधी मी जाऊ शकले नाही तर मग पुढच्या क्लासला माझी चौकशी, हे छोटे छोटे प्रसंग माझ्या त्यावेळच्या एकटेपणात मोलाचे होते.मला आठवतं ते काही वेळा परत जाताना माझ्या गाडीपुढे तिची गाडी असली आणि स्टॉप साईनला आमचे रस्ते बदलले की काचेतून हसून तिचं मला  हात हलवून निरोप देणं. 

निरोप द्यायची वेळ कधी तरी येणारच ना? असं मागचा महिना मी स्वतःला समजावतेय. फ़क्त आता गरज आहे ती तिने वर्षभर मेहनतीने शिकवलेल्या योगाभ्यासाला न्याय द्यायची आणि तो प्रयत्न माझ्याकडून मी नक्कीच करेन. आजची ही पोस्ट, आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने, माझ्या साध्यासरळ आयुष्यात छोट्या काळासाठी येऊन माझ्यासाठी मोठी आठवण बनलेल्या माझ्या या शिक्षिकेसाठी.तिच्या बोलण्यातून साधारण मला माहित होतं की तिनेही दोन मुलं सांभाळून आपली योगाची आवड आपल्या मर्यादेत जोपासली आणि आता तिलाही गरज आहे मोठ्या करियरची. जगातल्या सगळ्याच देशातल्या बायका कुटूंबासाठी हे सहजी करून जातात, हे तिनं मला वेगळं सांगावं लागलं नाही.कदाचित यासाठीच ती माझ्या जास्त लक्षात राहिली असेल. I love you Jeannette. Happy Women's Day.