जिनेट मला भेटली ती मागच्या जानेवारीत मी योगाभ्यास सुरू करायचं पुन्हा मनावर घेतलं तेव्हा. म्हणजे झालं असं होतं की सारखं घरातून काम केल्यामुळे मला माणसं दिसायची वानवा होती. शिवाय माझा छोटा मुलगा वर्षाचा झाला होता. त्यामुळे तो त्याच्या पाळणाघरात रूळला होता.त्याच्या निमित्ताने वाढवलेलं वजन कमी करण्यापेक्षाही त्याच्यावेळी झालेल्या काही गुंतागुंतीनी पुढे जाऊन मोठं काही होऊ नये म्हणून व्यायामात नियमितपणा आणायचं मनात होतंच. चालण्याचा एकमेव व्यायाम सोडून मागची काही वर्षे काहीच केलं नाही म्हणून मग मार्गदर्शनाखाली व्यायाम आणि आपल्याला झेपेल असं म्हणून योग असा तो योगायोग होता.
तर मी ज्या जिममध्ये जाऊ शकते तिथे प्रत्येक बुधवारी योग शिकवायला येणारी ही व्यक्ती म्हणजे जिनेट. उंचीला साधारण पाच फ़ूट चार इंच, निमुळता चेहरा, गव्हाळ रंग आणि कमालीची सडसडीत. म्हणजे तिला दोन टीनएर्जस आहेत हे मला तिने सांगितलं म्हणून कळलं. नाहीतर तसंही कुणाचं वय वगैरे गेस करायच्या बाबतीत माझी प्रगती शून्य पण बांध्यावरून काही वेळा निदान मूलं झाल्याचं लक्षात येतं. अर्थात जिनेट त्यातल्या अपवाद गटात.
तिच्या या क्लासला माझ्या आधीपासून नियमित येणारे तिचे जे काही शिष्य होते, त्यात मला पाहून कदाचित जानेवारीत बरीच जणं व्यायामाचा निश्चय करतात त्यातलीच मी असेन असं तिला वाटलं असावं.त्यामुळे तेव्हा तशी आमची जुजबीच ओळख झाली. मग नंतर साधारण चार-पाच वर्ग मी नियमितपणे गेल्यावर मात्र तिलाही माझ्याबद्दल थोडा विश्वास वाटला. आणि मग पुन्हा एकदा माझं नाव लक्षात ठेऊन विचारणं वगैरे झालं. या पुनरओळखीत मला आवडलं ते म्हणजे तिने मला मी भारतीय दिसते म्हणून तुला योग येतो का हे अजिबात विचारलं नाही. म्हणजे तसं ते विचारलं असतं तर माझी हरकत नव्हती, पण असं विचारलं की मला कसंतरी व्हायला होतं. कारण मी देशात असताना अगदी बेसिक योग शिकले पण त्यात सातत्यता वगैरे काहीच नव्हती. त्यामुळे इथे हा प्रश्नच आला नाही हे माझ्यासाठी बरंच होतं.
जानेवारीत सगळी जणं सुट्ट्यांमध्ये भरपूर खाऊन, आराम करून आलेले असतात. अगदी जिनेटही मला वाटतं दहा एक दिवसांची सुट्टी घेऊन मग अवतरली होती. त्यामुळे तिच्या जानेवारीच्या वर्गाची पेस एखाद्या संगीत मैफ़िलीत सुरूवातीला मंद्र सप्तकात धीम्या गतीने "सा" आळवला जातो तशी. मग जसजसं बाहेरचं वातावरणही हळूहळू कोंब येणार्या चेरी वृक्षासारखं बहरत जातं, तसतसं योगवर्गातल्या आसनांनी गती पकडली असते आणि एखादा नामवंत गायक वेगवेगळ्या रागांनी मैफ़िलीत रंग भरतो तसं वेगवेगळी आसनं आम्हाला दाखवली जातात. आणि मग पुन्हा शिशिर येतो तेव्हाचा बाज आणखी वेगळा. पुन्हा एकदा मैफ़िलीचे सूर धीमे करणारा.
योगासनं करताना स्वतःला आव्हान देणे हा उद्देश नसावा याबाबत जिनेटचं आग्रही असणं मला फ़ार आवडायचं. म्हणजे कुठल्याही आसनाची अंतिम स्थिती कशी असते हे स्वतः दाखवताना त्याचवेळी जर त्या स्थितीपर्यंत जाणं शक्य नसेल तरचे दोन-तीन पर्याय ती तिथेच दाखवत असे.
खरं सांगायचं तर तिला योगासन करताना पाहाणं हीच मोठी पर्वणी असं जसजसे ती बेसिकच्या पुढची आसनं शिकवत गेली तसतसं आम्हा सर्वांनाच वाटायचं. शिवाय हे सगळं करताना प्रत्येक स्टेप ती शब्दातही मांडत असे. अगदी एक वाक्य आणि मग तिचं त्याबरहुकूम ती स्थिती दाखवणे आणि स्टेपप्रमाणे त्यातले बदल दाखवणे. नाचातलं मला फ़ार कळत नाही. पण तिचं आसन दाखवताना एका स्थितीमधून दुसर्या स्थितीत जाणे एखाद्या निष्णात नर्तकीच्या पदन्यासासारखं दिसे. त्यातही विन्यासातले तिचे एकापाठी एक करायचे जे प्रकार होते ते जवळजवळ नृत्यच होतं. काही वेळा अगदी मीच नाही तर बाकीचे साथीदारही तिचं आम्हाला हे असे प्रकार दाखवताना मुग्ध होऊन पाहात आणि मग आम्ही सर्वच तिला सांगत असू की आम्ही हे करण्यापेक्षा तू आम्हाला दाखवतेस हे पाहाणं ही आमच्यासाठी जास्त मेजवानी आहे. मग त्यावर तिचं पोनिटेल हलवून खळखळा हसणं माझी बुधवारची दुपार हसरी करून जाई.
साधारण चाइल्ड पोजमध्ये थोडं अंग ताणून मग मार्जारासनाने आमची सुरूवात असे. नंतर फ़र्माईश केली असेल तर त्याप्रमाणे किंवा जिनेटने प्लान केलं असेल त्याप्रमाणे इतर आसनं, यात निदान एकतरी विन्यासाचा प्रकार, शेवट जवळ आला की पाठीवर किंवा पोटावर झोपायची आसनं आणि मग त्यादिवशी किती काम केलं असेल त्याप्रमाणे पाच किंवा दहा मिनिटं शवासन असं एका तासाचं सत्र असे. तिच्याबरोबर वॉरियरमधले काही बारकावे तिने प्रत्यक्ष शिकवले आणि माझ्या आसनातल्या त्रुटी मला कळल्या. तसंच त्या त्या पोजमधले करेक्शन्स दाखवली की मग त्या आसनाचा फ़ायदाही मिळतो याचाही प्रत्यय आला. मला कंबरदुखी आहे मी सुरूवातीलाच सांगितल्यामुळे बर्याच आसनांसाठी आमच्यासाठी "काय करू नये", याविषयीच्या तिच्या सुचना तर नेहमीच फ़ायद्यासाठी असत. तसंच कधीतरी Can I touch you to give you some adjustment? असं म्हणून तिने हाताने थोडं मणक्याला ताणणं म्हणजे मला कुणीतरी माझं दुखणं जाणून त्यावर मायेने केलेला उपाय वाटे.
त्या जानेवारीनंतर बुधवारचा लंच टाइम इतका हवासा वाटायला लागला की तिच्याबरोबर फ़ॉल कसा आला ते कळलंच नाही. आणि मग जिनेटने एक छोटी अनाउंसमेंट केली. ती होती आठवड्यातून एकदा असं सहा आठवड्याच्या Retreat Yoga ची. मी हा प्रकार आधी कधी ऐकलाही नव्हता. फ़क्त ती म्हणाली की यात आपण एकाच आसनात पाच ते दहा मिनिटं राहणार आहोत आणि अशी साधारण पाच आसनं एका सेशनमध्ये आणि मग शवासन, असा एक तास. त्यादिवशी आठवणीने मी गेले आणि मला आवडलं ते तिचं शांतपणे बोलणं. काही कारण असो पण या क्लासला सुरुवातीला पाच सहा लोकं होती आणि शेवटी मी आणि आणखी एक नियमित धावणारे गृहस्थ अशा दोघांनीच हा क्लास पूर्ण केला.
या क्लासमध्ये मी एक गोष्ट शिकले ते म्हणजे वर्षभर व्यायाम केल्यावर जसजसं बाहेरचं वातावरण थंड होत जातं तसं आपण आपल्या शरीरालाही योगमाध्यमातून थोडा आराम द्यायला हवं. यातली आसनं म्हणजे बरेचदा पाठीशी थोडं जाड ब्लॅंकेट घेऊन तिने दाखवलेल्या विशिष्ट पोझमध्ये तसंच पडून राहण. जिनेटच्या शब्दात सांगायचं We all worked very hard towards reaching our goals, we run after every small things and try to find out something for us. But sometimes the best thing that our body as well as our mind needs is to do nothing. This retreat yoga will help your body to do nothing but at the same time it will get the energy to perform again next time, may be with more strength than it had before. But at this point stay in the position and enjoy this moment of doing nothing.
डिसेंबरमध्ये मी भारतात जाणार म्हणून मी जिनेटला आवर्जून ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. मला यायला तसंही जानेवारीचा शेवट उजाडला आणि पुन्हा तिला भेटायला अगदी आठवणीने मी फ़ेब्रुवारीच्या बुधवारी जिममध्ये गेले आणि तिथे तिला न पाहून मला गलबललं.तिथे काम करणार्या ऍंजीने मग मला बातमी दिली की जिनेटला फ़ुल टाइम इंस्ट्रक्टर म्हणून नोकरी मिळाली. not a ton of money in teaching classes हे तिचं म्हणणं मलाही जमिनीवर आणून गेलं.
खरं सांगायचं तर आम्ही दोघी एकमेकींचे कुणी नव्हतो, होणारही नव्हतो अगदी मैत्रीण वगैरेही नाही.या नात्याला तसा काही अर्थ नव्हता. पण तरी तिचं त्या बुधवार दुपारसाठी असणं माझ्यासाठी खास असायचं. एकदा बाबा आले तेव्हा मी तिच्यासाठी थोडी काजूकतली नेली होती. मग पुढच्या क्लासला आवर्जून तिनं तिच्या नवर्याला ती आवडल्याचं सांगणं, माझ्याकडे एखादी सोपी चिकनची रेसिपी सांग म्हणून विचारणं किंवा कधी मी जाऊ शकले नाही तर मग पुढच्या क्लासला माझी चौकशी, हे छोटे छोटे प्रसंग माझ्या त्यावेळच्या एकटेपणात मोलाचे होते.मला आठवतं ते काही वेळा परत जाताना माझ्या गाडीपुढे तिची गाडी असली आणि स्टॉप साईनला आमचे रस्ते बदलले की काचेतून हसून तिचं मला हात हलवून निरोप देणं.
निरोप द्यायची वेळ कधी तरी येणारच ना? असं मागचा महिना मी स्वतःला समजावतेय. फ़क्त आता गरज आहे ती तिने वर्षभर मेहनतीने शिकवलेल्या योगाभ्यासाला न्याय द्यायची आणि तो प्रयत्न माझ्याकडून मी नक्कीच करेन. आजची ही पोस्ट, आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने, माझ्या साध्यासरळ आयुष्यात छोट्या काळासाठी येऊन माझ्यासाठी मोठी आठवण बनलेल्या माझ्या या शिक्षिकेसाठी.तिच्या बोलण्यातून साधारण मला माहित होतं की तिनेही दोन मुलं सांभाळून आपली योगाची आवड आपल्या मर्यादेत जोपासली आणि आता तिलाही गरज आहे मोठ्या करियरची. जगातल्या सगळ्याच देशातल्या बायका कुटूंबासाठी हे सहजी करून जातात, हे तिनं मला वेगळं सांगावं लागलं नाही.कदाचित यासाठीच ती माझ्या जास्त लक्षात राहिली असेल. I love you Jeannette. Happy Women's Day.
महिला दिनाच्या शुभेच्छा!
ReplyDeleteयोगासनं नियमीत केली व चांगल्या गुरूने शिकवली व त्याच्यासोबत केली असता खूप छान वाटते. जिनेटमुळे तुझा ’ तो ’ वेळ छान सत्कारणी लागला.
खरंय गं श्रीताई. आभार.
Deleteमहिलादिना निम्मित मी वाचलेली सगळ्यात सुंदर पोस्ट...
ReplyDeleteम्हणजे मी हि एकच पोस्ट वाचली आहे असा अर्थ नाही तर... उद्धारापेक्षा सिम्पलीसिटी ने मैत्री कळवणारी आजच्यादिवशीची विरळा पोस्ट ... म्हणून!
अभिषेक, आवर्जून लिहिल्याबद्दल आभार. त्यातही तुझं मत पुरूष प्रतिनिधीचं म्हणून जास्त महत्वाचं :)
Delete:) :)
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteThanks Yashodhan and welcome.
DeleteI can so relate to this post. :) I attended the yoga classes with 'Samantha' once a week and had a wonderful feeling everytime it was over. Now that I am in India, I want to attend some class here as well. I hope to get another memorable yoga session here as well.
ReplyDelete-Vidya.
स्वागत विद्या. तुला ही पोस्ट वाचून बिंगो झालं न एकदम :)
Deleteमला वाटत मी याआधी कधीच असा क्लास केला नव्हता आणि तेव्हा (आणि आता देखील) तिथेच इतर गुरुच्या मार्गदर्शनाखाली योग करते तेव्हा मला जिनेट नेहमी वेगळी आणि खास वाटते. तुझं समान्थाबद्दल तस असू शकेल. तू आता पुण्यातही पुन्हा yoga सुरु कर आणि तुझे अनुभव आम्हाला कळव.
अगदी आवर्जून लिहिल्याबद्दल खूप खूप आभार :)