कॉलेजमध्ये असताना स्टायपेंडरूपी स्वकमाई सुरू झाली, त्यावेळेपासून मी आणि माझी एक मैत्रीण, आम्ही दोघींनी मिळून मुंबईतल्या बर्य़ाच खादाडी जागांना भेटी दिल्या. कुठलं डाएट किंवा बचत वगैरेची चिंता नसलेली, थोडीशीच कमाई असली तरी त्यात दोघींसाठी रविवार टू रविवार परवडेल, असे दिवस होते ते. त्यावेळी एकदा रविवारच्याच एका पुरवणीत खास दक्षिण मुंबईतल्या काही खास जागांबद्दल एक लाळगाळू लेख आला होता. त्याचं कात्रण जवळ ठेऊन त्यातल्या जमेल तशा ठिकाणी खाद्ययात्रा घडली. त्यावेळी नेहमी गेलो ते स्टेडियम, सामोवार, दिल्ली दरबार अशा जागा पटकन आठवतात आणि आठवतं ते बडेमिया. ते संध्याकाळी,गाडी लागते, भरपूर गर्दी, वगैरे वर्णन वाचून दोघी मुलींनीच जावं का हा मुख्य प्रश्न पडल्यामुळे आणि निव्वळ त्यासाठी तेव्हा कुठल्या मुलाला "चल रे आमच्याबरोबर" असं काही विचारलं नसल्यामुळे राहून गेलेलं बडेमिया. मग देश सोडल्यावरही जेव्हा जाणं होणार तेव्हाही जाणं राहिलं.
यावेळी तर एकंदरित ट्रिपचा नूर फ़ार बाहेर पडण्यासारखा नव्हताच. पण एखादा दिवस असा येतो जेव्हा काही गोष्टी तुमच्यासाठी लिहिलेल्या असतात त्याप्रमाणे ते घडतं. इतर वेळी कितीही प्लान केलं तरी ते शक्य होत नाही. असा अनुभव जानेवारीतल्या एका रविवारी आला.
त्यादिवशीची संध्याकाळ मी ठेवली होती ती "सप्तसूर" या महाराष्ट्र सरकार आयोजित एका कार्यक्रमासाठी. म्हणजे नमनाचं तेल आणखी अगदी थेंबभर टाकायचं म्हटलं तर तिथे शान गाणार होता म्हणून मला तिथे जायचंच होतं. तसं गेलोही. नेमकं शानचा घसा बसल्यामुळे त्याने दोन गाणी म्हणून मग सपशेल माफ़ी मागून माझा त्या कार्यक्रमातला उत्साह कमी करून टाकला. म्हणजे बाकीचे कलावंत छान गात नव्हते असं नाही पण मनात "शान, शान"चा जप करत गेल्यामुळे मग मी तिथून उठायचा विचार केला.
माझ्याबरोबर त्यादिवशी आपल्याच ब्लॉगजगतातला माझा मित्र दिपक आणि माझे आणखी एक स्नेही होते. शिवाय बाहेर सचिन उर्फ़ सपा (त्या कार्यक्रमासाठी उशीरा आल्याने) ताटकळत होता.त्यामुळे बाहेर यायच्या कारणात शान बरोबरच सपालाही थोडं श्रेय द्यायला हरकत नसावी.गाण्यातला "सा" अशा प्रकारे आटोपला आणि आम्हा मंडळीत अचानक खायचा "खा" लागला. त्यावर दोनच मिनिटांची एक साधक (खाऊन पोटं बिघडली नसल्याने बाधक चा तसा काही संबंध आलाच नाही) चर्चाही झाली.
दोन मिनिटं अशासाठी की मी आता इतक्या वर्षांनी जात असल्याने मला ताजच्या जवळचं "दिल्ली दरबार"सोडून एकही नाव आठवत नव्हतं. आणि दिपकला मला वाटतं त्याच्या कुठल्यातरी पुरानी यादें ताजा झाल्याने लगेच "बडेमियां" आठवलं. हे तसं माझ्याही लिस्टवर आधीच्या नमन क्र. १ मध्ये म्ह्टल्याप्रमाणे देशात असल्यापासून होतं.बाकीच्यांनाही चालणार होतं. लगेच गाण्यासाठी बाहेर असणार्या गर्दीला मागे सारून आम्ही खाणार्यांच्या गल्लीत आलोही.
ताजच्या मागच्या गल्लीत एका गाडीत भटारखाना सुरू आहे, कबाबचा धूर निघतोय, बाजुला गर्दी, रस्ता क्रॉस करणारी गर्दी, ज्या नशीबवंताना गल्लीत गाडी उभी करायला मिळालीय तिथे त्यांची गर्दी या एकंदरीत गर्दीमय वातावरणात गाडीवरचा "बडेमिया"चा बोर्ड संध्याकाळच्या वेळेस झगमगतोय. मला वाटतं दररोज संध्याकाळी लागणार्या या गाडीवर पहाटे एक वाजेपर्यंत खवय्यांची गर्दी तशीच असते.
आम्ही भारतीय रेल्वेला संधी दिल्याने आमच्याकडे गाडी नव्हतीच त्यामुळे उभं राहून खायचा पर्याय होता. पण दिपकचं सजेशन होतं की इथे समोर एक "खंडहर" आहे, आम्ही तिथेच बसायचो हे त्याने इतकं ठामपणे सांगितलं की आता "खंडहर" पाहाणे क्रमप्राप्त.(हे आम्ही कोण हे बहुतेक तोच सांगेल ;) ) खरं अगदी खंडहर नव्हतं पण रस्त्यावरच्या खाण्यासाठी बसून खायचा पर्याय जितका चांगला कल्पू शकाल तितकीच बरी जागा होती."अगं, ताजमधले गोरे पण इथे येतात" - इति दिपू आणि कुठल्यातरी चित्रपटातल्या संवादाचा रेफ़रन्स..जो तिथे लक्षात आला तरी आता बिल्कुल आठवणार नाही. बरं "चल बसूया", असं म्हणायचं तर इथे पण आधी नंबर लावायला लागतो. थोडक्यात रामाची सिता म्हणजे तुफ़ान गर्दी पब्लिक फ़िदा वगैरेवाला जॉइंट म्हणजे बडेमिया. एकदा का आपला नंबर आला आणि आत गेलं की मग त्यांचा मेन्यु पाहाणे आले.
मेन्युवरचं सर्वच मागवावं का असा विचार येणं साहजिकच आहे. त्यासाठी खूप वेळ पण मिळाला कारण आम्हाला बसवून गेल्यावर कुणी आमच्याकडे साधं पाणी विचारायला देखील आलं नाही. पण त्यादिवशी उगाच मूड खराब करायला नको म्हणून त्याऐवजी दिपकने मला अगदी ठेवणीतली सलीम फ़ेकुची नक्कल करून दाखवली. म्हणजे आय विश की ते संवाद मला आता तसेच्या तसे आठवावे पण आम्ही बहुदा हैद्राबादीत वाहावले असू त्यामुळे की काय पण एकजण उगवला. तर आधी म्हटलं तसं सगळंच खायचं होतं पण त्यातल्या त्यात आपण इथलं काय खावं असा विचार करून आम्ही बडेमिया फ़ेमस कबाब, चिकन मलई टिका, चिकन रेश्मी टिका रोल (फ़ोटोत शोधू नका तो आधीच खाल्ला गेलाय), आणखी काही चिकनचे प्रकार, रुमाली रोटी इ.इ. मागवली आणि समोर वेटर दुसर्या कुणासाठी प्रचंड सजवलेलं रोटीसदृश्य काहीतरी नेताना दिसला त्यामुळे मग आम्ही तो परतला तसं लगेच ते काय होतं हे त्यालाच विचारून आमच्या तोंडातलं पाणी गिळून टाकलं आणि ती बैदा रोटी पण आमच्या ऑर्डरला टाकली.
आता पुन्हा एकदा वाट पाहाणे आले. साधारणपणे अशा प्रकारे दोन तीन रांगांमधून जायची वेळ आली की समजायचं जे खाणं येणार ते फ़र्मास असणारच. त्यामुळे आमचा हा अंदाज काही खोटा ठरला नाही. त्याने आमची सुरूवातीची सगळी ऑर्डर टेबलावर आणून ठेवली आणि तो सलीम फ़ेकू, आमचा नंबर घेऊन बसवून मग बराच वेळ भाव न देणारा तिथला ऍडमिनवाला, शिवाय न गायलेला तो शान सगळं सगळं विसरून आम्ही तुटून पडलो. ज्यांना मसालेदार खाणं आवडतं त्यांच्यासाठी या खाण्याबद्दल काय लिहायचं..हे फ़ोटोच पुढचं सगळं सांगतील.मला तसंही एकदा का भारतात गेलं की आपल्या चवीचं खायला जवळजवळ सगळंच आवडतं. पण तरी चिकन मलई टिका आणि रोलमधला रेश्मी टिका लाजबाब.
हे सगळं खाल्यावर पुन्हा मी एवढ्या लांब येईन का याची शंका आल्याने बिर्यानीलाही संधी दिली आणि नाही नाही म्हणता तिचाही फ़न्ना उडाला. इतक्या लवकर की उगा तिचा फ़ोटो-बिटो काढायचा प्रयत्नही आमच्या ऑफ़िशियल फ़ोटूग्राफ़रने केला नाही. त्यामुळे या पोस्टला मिळणारे काही दुवा (?) अर्थातच कमी होतील. जाता जाता खरं तर यांच्याकडे शाकाहारीची व्हरायटीदेखील आहे हे लक्षात आलं पण तोवर पोटातली जागा खर्या अर्थाने संपली होती.
इतकं सगळं खाऊन बिल हजारही आलं नाही, ही दक्षिण मुंबईतल्या जागांचे भाव लक्षात घेतले (का यार मला सारखं सारखं दक्षिण मुंबई आणि घर असे संदर्भ लागतात?) हा तर इतलं बिलही नक्कीच सगळ्यांना परवडण्यासारखं आहे. फ़क्त मुंबईच्या या टोकाला, असं रात्रीच्या वेळी जाणं व्ह्यायला हवं. तर मित्रमंडळींबरोबर खाणं झालं आणि जागा संपलीबिंपली काही म्हटलं तरी ते खंडहर उतरून (हो उतरताना पलीकडच्या बाजुला गोरे होत) खाली येईपर्यंत निदान पानाइतकी जागा झाली आणि खरं तर असं मसालेदार सामीष असं सगळं हाणल्यावर एक पान तो बनताही है..
मघई पानं चघळत जो चर्चगेटकडे जाताना अशा अनप्लान्ड खादाडी संध्याकाळी आणखी मिळाव्यात असाच विचार मी तरी करत होते. आणि आजच्या रविवारी इकडे असलं काही शोधूनही सापडणार नाही हाच विचार करून त्या रविवारच्या खाद्य आठवणी जाग्या करत होते.
ता.क. माझ्या पोस्टमधल्या फ़ोटोंना नेहमी नसणारा एक जास्त प्रोफ़ेशनल लूक असणार्या वरील फ़ोटोसाठी खास आभार दिपकचे.
च्यामारी !
ReplyDeleteदिप्या... चल भावा ! कधी येऊ ?
:)
Deleteमेल्यांनो शिरा पडात तुमच्या खादडीक...
ReplyDeleteभलं होवो तुम्हा चांगलंचुंगलं खाणार्यांचं असा सोयिस्कर अर्थ घेत आहोत ;)
Deleteमलाही यायचं होतं, पण नेमकी मिटींग आल्याने पुण्याला जावे लागले. नेक्स्ट टाइम. याची एक शाखा हॉर्निमन सर्कलला पण सुरु झालेली आहे. बहुतेक पुढल्या आठवड्यात टाउन साईडला गेलो की इथे भेट नक्की :)
ReplyDeleteकाका, तुम्ही मला फ़ोनवर बडेमियाचा जिक्र केला होता.आमचंही तसं आयत्यावेळेस ठरलं.
Deleteहॉर्निमल सर्कलला मी मुंबईत काम करत असताना पडीकच असायचे...तेव्हाच ही शाखा असायला हवी होती...असो पुढच्या वेळेस नक्की :)
ReplyDeleteमस्त मस्त! पुन्हा सगळं आठवलं ना ! त्यानंतर पुन्हा मी, अनघा, सपा असे गेलो होतो आणि खंडहरमध्ये एक स्पेशल कोनाडा भेटला होता बसायला..
पंक्या भावा, कधी येतो बोल?? आपलं स्ट्रीट पोर्ट्रेट्स आणि सीबी मॉल शुट करायचयं ना...
दिपु तू खंडहरची हिश्ट्री तुझ्या ब्लॉगवर लिही नं..पंकजला पण आणखी एक सैर घडेल त्या निमित्ताने... :)
Deleteबरेच दिवसांनी अशी चमचमीत पोस्ट वाचण्यात आणि पाहण्यात आली आहे त्यामुळे दिवसाची सांगता करता करता पुन्हा एक आवंढा गिळायला आलोय :D सध्या अशी परिस्थिती आली आहे की अशा डिश समोर आल्या तरी आवंढा गिळूनच समाधान मानावे लागणार आहे कारण उतार वयातील कडक पथ्य सुरू झालेय :-(
ReplyDeleteBTW, "ताजमधले गोरे" असे म्हणाला नसणार दिप्या, ताजमधले "अंग्रेज" म्हणाला असणार. नीट आठवून पहा :D
अरे हो सिद्धार्थ ते अंग्रेजाच होतं... :)
Deleteतुला काय झालं इतक्यात पथ्य आणि...तरी तुला आधीच सांगत होतो रत्नागिरीच्या फ़ेर्या कमी कर....
आणि अरे पथ्य असल(च) तरी मध्ये मध्ये चिटिंग डे असेल न त्यातही? तेव्हा जाऊन खायचं सगळं थोडं थोडं....
काळजी घे.
नि षे ध
ReplyDeleteदिप्या, कधी येऊ?
:)
Deleteअरे वा! तुम्ही दणकून हाणलेले दिसतेय. :)
ReplyDeleteअगं ते चौघांनी मिल-बाटके खाल्लंय.. :) तुला संधी असेल तर नक्की जा. मेन्युकार्डवरचे शाकाहारी पर्याय पहा. :)
Delete