Tuesday, May 29, 2012

सल ....


साधारण एप्रिल-मे हे महिने मायदेशातल्या माझ्या भाचरांचा सुट्टीचा काळ म्हणून थोडं सुट्टीसारखं माझ्याही अंगात येतं...यावर्षीही थोडं-फ़ार तसंच....अगदी आत कुठेतरी काहीतरी चुकचुकल्यासारखं वाटतं तरी ते कुणाला दाखवायचं नाही म्हणून ब्लॉगवरच्या पोस्टमध्येही भरलेल्या पेल्यासारखं सगळं चांगल्या आठवणींना साठवतेय...पण तरी काहीतरी राहिलंय....

मी शाळेत असेपर्यंत एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात वगैरे परीक्षा आटपली की निकालाची फ़ार वाट पाहायचे...म्हणजे मला कधी निकालाची "तशा" अर्थाने वाट पाहायला लागली नाही किंवा शाळेत चांगल्या मार्कांनीच पास व्हायचे म्हणून भाव मारायलाही निकालाच्या दिवसाची प्रतिक्षा नसायची. तर एकदा निकाल लागला की माझ्या शिक्षक आई-वडीलांना सुट्ट्या लागायच्या आणि मग आम्ही सगळी मावसभावंडं आजोळी जमायचो आणि ते परत यायचो शाळा सुरू व्हायच्या एक-दोन दिवस आधी म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यात...

जशी काही कुटुंबात डेंटिस्ट, गायक, वकिल अशी लोकांची घराणी दिसतात, तसंच काहीसं शिक्षकी पेशा हा माझे आई आणि बाबा दोघांच्या घराण्यात आम्ही भावंडांनी ती प्रथा मोडेपर्यंत होता. माझ्या दोन मावशा, एक काका,माझ्यापेक्षा वयाने जास्त मोठे असणारे तीन आत्येभाऊ, दोन चुलतभाऊ, सहा मामेबहिणी, दोन माम्या शिवाय मामेमावशा आणि मामेमामापण शिक्षक...(हुश..होपफ़ुली मी सगळ्या शिक्षकांना कव्हर केलंय..आणि नसेल तर वर घराणं हा उल्लेख आहेच). तसंच आईच्या आईचं, म्हणजे आज्जीचं माहेर आणि सासर एकाच गावात म्हणजे माझ्या आजोळी. त्यामुळे मे महिन्यात तमाम शहरात राहणार्‍या समस्त मावशा आणि त्यांची मुलं या एकाच गावात मुक्कामाला असत..गाव तरी किती मोठं? हजारेक वस्तीचं पण नसेल..तर आम्ही सर्व तब्बल एक महिना एकत्र हुंदडणे, नदीवर डुंबायला जाणे आणि सुट्टीतले इतर तुंबड्या लावायचे उद्योग करत असू. मे महिना आणि दिवाळी या दोन्ही सुट्ट्यांना माझ्या आठवणीत अमर करायचं श्रेय "मासवण" या पालघर तालुक्यातील  माझ्या आजोळाला जातं.

तर हा "तुंबड्या लावणे" शब्द खरा करायचे बरेच उद्योग आमच्यातल्या मुलांनी केले आहेत आणि आम्ही मुलींनी अर्थातच त्यांना बाहेरून पाठिंबा आणि मग ओरडा झाल्यावर पळ काढणे हे रीतरसपणे केलंय..एकदा मागच्या वाड्याच्या मागे एक शेत होतं तिथे आदिमानवाच्या काळातलं दगडावर दगड आपटून आग कशी लावावी, याच्या प्रात्यक्षिकात सगळा पेंढाच जळायला निघाला होता आणि आधीच पाणीटंचाई असलेल्या त्या गावात सकाळी हजारो खेपा करून नेहमी पाणी भरून जाणार्‍या काकींचे सगळे कष्ट एका क्षणात ते पाणी तिथे ओतण्यात गेले होते. त्यानंतर मध्येमध्ये आम्हीपण छोट्या कळशा घेऊन विहिरीवरून कधीकधी पाणी आणायला सुरूवात केली होती. 

"लेपाळे" या एका झाडाच्या छोटी पपईसारख्या दिसणार्‍या फ़ळांची बी बदामासारखी लागते म्हणून खा खा खाऊन मला कायमचं वर जायची वेळ आली होती. शिवाय नुस्तं ओकार्‍या आणि परसाकडे लागून काय खाल्लं याची दाद आई-बाबांना न लागू द्यायचा उद्योग मी आणि एका मामेबहिणीने केल्यामुळे रात्रीच्या वेळी आजीकडच्या गड्याबरोबर मला पाठुंगळीला नदीपल्याड असणार्‍या सरकारी दवाखान्यात न्यायला लागलं होतं...तिथली नर्स त्यानंतर जितकी वर्षे तिथे होती कधीही मला किंवा आई-बाबांना पाहिलं की त्या घटनेची आठवण करून द्यायची ("लब्बाड कुठली", असं मी तेव्हा मनात म्हणायचे) 

या आणि इतर काही कटू आठवणी सोडल्या तर गावात राहायची धमाल आणि भावंडाबरोबर एकत्र राहिल्यामुळे जुळलेले नातेसंबंध हे जे आजच्या पिढीतल्या प्रत्येकालाच मिळत नाही ते मला सहजी लाभलं होतं. आमच्या वयानुसार मामे आणि मावस भावंडाच्या ज्या जोड्या तेव्हा ठरल्या होत्या त्या अजूनही कायम आहेत. म्हणजे देश बदलला तसं प्रत्यक्ष संबंध कमी झाले पण माझी जोडी असणारी मावसबहिण आणि मी भेटलो, फ़ोन केला की अजूनही तशाच बडबड करत राहतो..अगदी पुर्वीसारखं घसा बसेपर्यंत...हे एक घसा बसायचं आणि काटा लागायचं (तेही जोडीने) आमच्यावेळी खास होतं....मामी सेफ़्टीपिनने काटा काढून द्यायची आणि मग मावशी त्यावर गरम केलेलं एक निवडुंगासारखं झाडाचं खोड की पान असे ते लावता लावता दोघींना एकदमच लेक्चर द्यायची. तसंही हे सगळे शिक्षक असल्याने लेक्चर द्यायची त्यांना आणि आम्हाला ते ऐकायची सवयच होती...:)  

माझ्या एका मावशीचं सासर आजोळहून थोडं जवळ होतं, पालघरमध्येच मनोरजवळ. ती मावशी असेपर्यंत त्यांच्या घरी जाणं हा एक आमच्या सुट्टीतला खास कार्यक्रम असे. म्हणजे आदल्या दिवसापासून "उद्या बांधणला जायचं" असं बाबा बोलले की एकदम कल्ला व्हायचा. तिची आंबा आणि चिकुची वाडी होती आणि थोडी शेती. मे महिन्यात तिच्या घरी गावठी हापूस आणि चिकू वर माळ्यावर पिकत असायचे. त्या दिवसांत ते आणि घरची मोठी जांभळे, मनोरच्या बाजारात ती विकायला पाठवत आणि अर्थात आम्हाला खायलाही मिळत.माझ्या लहानपणीची खरीखरी भातुकली खेळायला देणारी म्हणून ही मावशी सगळ्या मुलांमध्ये खूप लाडकी होती. या मावशीच्या आंबा आणि चिकुच्या वाडीत तीन दगडांची चुल करून माझ्या मोठ्या बहिणी मावशीने दिलेल्या पीठाची छोटी छोटी घावणं करत. विहिरीजवळ एक मोठं जांभळाचं झाड होतं. विकण्यासाठी रीतसर जाळ्यामध्ये गडी लोकं जांभळं उतरवण्याच्या आधी दगड मारून किंवा पडलेली जांभळं आम्ही लहान बहिणी गोळा करून आणायचो..मुलं पण काहीबाही मदत करत नाहीतर खुशाल विहिरीत पोहायला जात..
माझी जवळजवळ सगळी मावसभावंडं या मावशीच्या वाडीतल्या विहिरीत वरून उड्या मारून आणि कंबरेला सुकडी बांधून पोहायला शिकली. आम्हा मावस आणि मामे बहिणींच्या जोड्या मात्र आजोळी, सूर्या नदीत...बाबा किंवा काकांच्या देखरेखीखाली हात पाय मारायला...सगळ्याच नीट नाही शिकलो. कदाचीत मुली असल्यामुळे नंतर बंधनं येतात..लहानपणीच नदीत शिकून घेतलं तर बरं...नंतर मग नदीवर जायचं ते बहुदा पाय सोडायला किंवा मावशांनी जोर केला की मग सगळी एकत्र डुंबायला. अर्थात गावातली वस्ती इतकी कमी आणि सगळीच नात्यातली असल्याने भिती नव्हती म्हणा पण घरातली मोठी मंडळी आम्हाला कुणी त्रास देणार नाहीत याची खात्री बाळगत असावेत असं वाटतं....

मग नदीवरून परत येताना वाटेत लागलेल्या करवंदांच्या जाळीत जाऊन करवंद खायची...येताना चुलीसाठी वाटेत पडलेल्या काटक्या गोळा करून त्याचं आपल्या वाट्याचं सरपण आणायचं की आजी आणि मामी पण खूश..मग मामीच्या हातच्या तांदळाच्या हातभाकरी चहाबरोबर खाऊन उरलेला दिवस उंडारायला परत मोकळे...मला माझ्या मामीला जात्यावर दळताना आजही आठवतं. त्या गावात मामाच्या घरासमोरच चक्की येईपर्यंत माझ्या मामीने आम्हा सर्व भाचे आणि कुटुंबीयांसाठी लागणारं दळण मावशांसोबत बसून दळलंय हा विचार करताना आता खरं तर मला कससंच होतंय...

तर असं घरगूती आणि कायम पेटती असणार्‍या चुलीत शिजलेलं जेवण खाऊन आम्ही पत्ते, नवा व्यापार, नाव-गाव-फ़ळ-फ़ुल आणि असंख्य खेळ खेळलोय. "डब्बा ऐसपैस" हा एक सगळ्यात आवडता गेम..हो गेम कारण कुणाचा गेम करायचा असेल त्याच्यावर राज्य आलं की मग ते घालवायचंच नाही असं खेळलं की मग कुणीतरी एक जाम रडलं की घरातलं मोठं माणूस, बहुदा ती मामीच असे,  येऊन ओरडून आमचा डब्बाच गुल करून टाकत....:)

रविवार आला की खास गावठी कोंबडीचं जेवण आणि त्याबरोबर भाकरी असा बेत असे. मावशीकडे गेलं की हक्काचा आमरस आणि पुरी. इतर दिवशी मामी आणि मावशा जे काही ठरवून करतील ते..पूर्ण सुट्टीत जमेल तेव्हा या सर्वजणी ठरवून एक दिवस पापड करत. त्यावेळी सगळ्या चिल्लरपार्टीकडे ते पापड वाळत घालणे, त्याची राखण करणे आणि संध्याकाळी ते परत आणून मग घरी न्यायच्या ड्ब्ब्यामध्ये सुकलेल्या पळसाच्या पानात घालून ते ठेवणे यात एक दोन दिवस जात. पापडाच्या लाट्यानी छोटे पापड करायला मला तेव्हा आवडत आणि मग करता करता हळूच कुणाचं लक्ष नसलं की एक लाटी पोटात...सगळीच गम्मत...चिकवड्या इ.ही केल्या जात. पण पापडात जितकी  मी आणि माझ्या मावसबहिणीची जोडी रस घेई इतर गोष्टींमध्ये नाही. फ़क्त मावशीकडे लोणच्यासाठी वाळवलेल्या कैर्‍यांवर आमचा जाम डोळा असे. एकेवर्षी सर्व मावसभावंडांनी मिळून मावशीला ताटातली एकही कैरी मिळू दिली नव्हती आणि त्यानंतर त्या सगळ्यांनी मिळून आम्हाला जे लेक्चर दिलं त्याने आम्हाला जरब बसल्यासारखं निदान दाखवावं तरी लागलं..उगाच नंतर त्यांनी तो राग आमरस किंवा आमच्या नदी किंवा बंधार्‍यावर जाण्यावर काढला तर.....मामाच्या वाड्यातल्या चिंचेचे कोवळे कोंब काढून त्याची तिथलाच एखादा दगड पाण्याने धुवून साफ़ सफ़ाई करून केलेल्या चटणीत माझे दोन मावसभाऊ पण आम्हाला साथ देत. 

मी सातवीत गेले त्या सुट्टीत माझी मावशी त्या वर्षीच्या निकालाच्याच दिवशी गेली. तिच्या त्यावेळी दहावीत गेलेल्या माझ्या मावसभावाने फ़ोडलेला हंबरडा मला मी त्यावेळी इतकी लहान असतानाही आजही आठवतो..त्यानंतर तिच्या तेराव्याला तिच्या सासरच्या गावी गेलो ते आजतागायत मी पुन्हा तिथे गेलेच नाही...न कळता एक गाव असंच संपलं.... :(

त्यानंतरही आजोळी आम्ही जातच राहिलो. प्रत्येक सुट्टीत आपल्या बहिणीची आठवण काढून हळव्या झालेल्या माझी आई, मावशी आणि मामा/काकांना पाहायचो. नंतर दुःखाचे कढ सर्वांसमोर काढायचं कमी झालं. आम्ही भावंडं आमच्या बालसुलभ वयाने एकत्र यायची मजा घेत राहिलो...आज्जी गेल्यावरही मामा-मामींनी तिची कमी कधी जाणवू दिली नाही..मी आणि माझी मावसबहिण एकत्र जायचाही प्रयत्न अगदी नोकरी लागेस्तोवर करायचो....

मे महिन्यांत तिथे पाणी कमी असायचं पण सगळ्या नातेवाईकांचा प्रेमाचा पूर दाटलेला असायचा...आणि गरमीचं काय तेव्हाही गरमच असणार पण गावचा वारा खात हुंदडणारे आम्ही कधी गरमीच्या कुठल्या आजाराने आजारी पडलो नाही..."गावची हवा चांगली असते", असं आई नेहमीच म्हणते. तसंही असेल कदाचित.....

खरं तर मे आणि एकंदरीतच सुट्टीतल्या आठवणींवर लिहावं असं मला ब्लॉग लिहायला घेतला तेव्हापासून वाटत होतं...आणि ठरवून असं नाही पण बरोबर त्या वेळेवर गेले काही वर्षे ते कधीच झालं नाही...आणि आता हा "मे" मी या आठवणींशिवाय राहूच शकत नाहीये...:(

बघता बघता हाही मे संपेल आणि तो संपता संपता मी शाळेत असतानाच्या घालवलेल्या अनेक सुट्टींच्या आठवणींनी मला विषण्ण करून जाईल....म्हणजे नेहमी चांगल्या आठवणी आल्या की कसं प्रसन्न वाटतं पण यावर्षी नाही वाटणार...कारण मावशी गेल्यानंतर या आठवणी ज्या घराशी, कुटूंबाशी निगडीत आहेत तो माझा मामाच नाही.....मला वाटतं गेले दोन महिन्याचा हाच एक सल असावा....:(

Tuesday, May 22, 2012

बर्फ़ाचा गुलाबी बहर...


एक तर म्हणायचं बर्फ़, मग त्याला ल्यायचा गुलाबी रंग आणि सांगायचं काय तर हा बघा बहर....बात कुछ जमीं नहीं??? अहं....तसं काही अजिबात नाही आहे, बरं का! उत्तर अमेरीकेत थंडीमध्ये देवदाराचा अपवाद सोडून पानगळीला आणि मध्येमध्ये येणार्‍या बर्फ़ाला पर्याय नाही तसंच ही थंडी गेलीय आणि तो बर्फ़ आता नसणार आहे याची खात्री हवी असेल तर या गुलाबी बर्फ़ालाही पर्याय नाहीच...
म्हणजे आकाशात गुलाबी ढग दाटून येतात....

हळूहळू सगळीच झाडं हिरवी होणारेत याची खात्री पटवणारा तो बर्फ़ जवळून पाहिला की मन प्रसन्न होतं....अगदी वसंतातल्या धुंद वातावरणासारखं....


या बर्फ़ाची मजा लुटण्यासाठी एक दिवस आम्ही खास या पार्किंग लॉटमध्ये येतो...इथे खेळायला वयाची अट नाही....ते आम्हा चौघांनाही एकत्र धमाल करायला बरंच पडतं....नजरेत साठवून घ्यावी याची अनोखी रूपं...किती फ़ोटो काढले, किती वेळ इथे थांबलं तरी डोळे थकत नाहीत....


खाली पडलेला हा गुलाबी बर्फ़ इतका सुंदर दिसतो नं की दुसर्‍या दिवशी कचरा उचलणारा इथे येऊच नये अशी सोय निदान काही दिवस तरी करावी असं मलातरी वाटतं....ता.क. मागच्या पोस्टमध्येही म्हटलंय की यंदा (काही अपवाद वगळता) पोस्ट्स थोड्या उशीराने लिहिल्या जाताहेत....म्हणजे मार्चच्या शेवटी ट्युबिंगला गेलो होतो ते फ़ोटो एप्रिलला, बाबा इथे होते तेव्हापासून ऋषांक बोलतोय ते अगदी काल-परवा, त्या पार्श्वभूमीवर ही पोस्ट तब्बल एक वर्ष लेट...

कारण मागच्या वर्षी आईला याच पार्किंग लॉटमध्ये हा बहर पाहायला आणलं होतं तेव्हा काही असेच (म्हणजे माणसं नसलेल्या) या जागेचे फ़ोटो काढले होते..ही जागा ज्या कंपनीच्या आवारात आहे तिथल्या काही संबंधीतांनी ते पाहिले आणि त्यांना ही कल्पना इतकी आवडली की त्यातला एक फ़ोटो मागच्या वर्षीपासून त्यांच्या अंतर्गत जालावर (इंट्रानेटवर) कव्हर फ़ोटो म्हणून विराजमान आहे....

स्वतःच स्वतःचे कौतुक करायचे प्रसंग किती असतात आणि तेही मला फ़ोटोग्राफ़ी करण्यापेक्षा (स्वतःचे) फ़ोटो काढून घ्यायला जास्त आवडतात त्यामुळे थोडं स्वतःचं कौतुक करून घेतेच...:)

"तो" फ़ोटो आता त्यांना दिल्यामुळे इथे टाकत नाही....पण जाता जाता एक नक्की लिहावंसं वाटतं की पूर्वी आम्ही पूर्व किनारपट्टीला राहायचो तेव्हा चेरीजातीच्या फ़ुलांचा हा बहर पाहायला खास वॉशिंग्टन डिसीला जायचो. आता इथे या झाडांची आरास जागोजागी इतकी पाहायला मिळते की कुठेच जावं लागत नाही. दैनंदिन कामासाठीच्या फ़िरण्यात फ़ोर सिझन्सचे सगळे रंग मनसोक्त पाहता येतात.....

Welcome to Oregon Aparna... :)

Sunday, May 13, 2012

बातचीत, बकबक .................. बीबी


"अगं काय म्हणतोय तो??"
"काही नाही रे .. ती बीबी दे त्याला त्याची"
"कुठली बीबी...मला नाही दिसत आहे ती??"
"अरे असं काय? काउंटरवर बघ..मी पाण्याच्या जगाच्या मागे लपवलीय...नाहीतर तो सारखी मागतो?"
"दिसली दिसली.... ऋषांक, ही घे तुझी बीबी"

वरचा सुसंवाद हा "बीबी"बद्दल आमच्या घरात आजकाल रोज घडत असलेल्या असंख्य संवादांपैकी एक आहे असं म्हटलं तर?? आई गं...म्हणजे ऋषांक आल्याची बातमी ज्यांनी वाचली असेल ती लोकं म्हणतीय अगं सव्वा वर्षाच्या मुलाला आत्तापासून कुठल्या "बीबी" ची सोय करतेस...म्हणजे मुलामुलींच्या गुणोत्तरांमधलं देशातलं मुलींच घटतं प्रमाण पाहता खरं तर तसं करावं का आतापासून असा एक विचारही आम्ही दोघांनी करून पाहिला आहे. त्यामुळे आजकाल आमच्या ज्या भारतीय मित्रमैत्रीणींना मुली आहेत त्यांच्याशी आम्ही जरा जास्तच सलगीने बोलत असतो..पण या पोस्टीचा विषय हा नाहीये...मग हे नमन कशाला?? 

बरं जाऊदे तुम्ही चीची ची गोष्ट वाचलीय?? हे नमन नाही...या पोस्टेचं कारण चीचीच आहे..म्हणून चीचीचा उल्लेख झाल्याशिवाय ही पोस्ट खरं तर सुरूच होऊ शकत नाही.....

तर आरुष बोलायला लागला तेव्हाचे दिवस आठवून आम्ही "चीची" हा आता विस्मरणात गेलेला शब्द आमच्या घरात पुन्हा इंट्रोड्युस करून पाहिला..पण "काय चाललंय या लोकांचं?" या पलिकडे छोट्या राजांनी त्याला महत्व दिलं नाही...किंबहुना चीचीच काय च वरून आलेला कुठलाही शब्द तो अजून बोलायला लागला नाही... 

अरे हे काय?? आता तो थोडं थोडं बोलायला लागला हे सांगितलंच नाही की काय मी??? अरे हो...म्हणजे झाले त्याला आता बरेच महिने....या वर्षी ब्लॉगवर सगळंच पेंडिंग होतंय...पण तरी मी आय टीत असल्यामुळे अपडेट्सचं महत्व माझ्याशिवाय कुणाला माहित असणार शिवाय काय आहे मूळ उत्पादनात काही राहिलं तर सपोर्ट पॅक्स आहेतच... (काही नाही सतत सपोर्ट पॅक अपग्रेडट्सवर काम केलं की असले फ़ाल्तु जोक सुचतात मलाही...तर असो)

कुठे होतो आपण?? ह्म्म...बातचीत....
साधारण "बोलणं किंवा बातचीत" जरी आधी ऑ...ब्यळ्यॅक....व्यॉ....आणि तत्सम बकबकीने सुरू झालं तरी शेवटी ते खाण्याविषयीच्या शब्दापासून सुरू होण्याचा आपल्या मोठ्या भावाचा पायंडा लहान्याने पण सुरू केला हे त्याने त्याच्या चिरिओजना मागच्या नोव्हेंबरमध्ये "मा मा" म्हणून सिद्ध केलं...पाळणाघरात "आई"ऐवजी हा माझा मामा करणार का असा समज होणारच होता पण मामा म्हणजे कुठलंही फ़िंगर फ़ूड हे त्यांना मी लगेच क्लियर केलं...हो उगाच मधल्यामध्ये मी का मामा?? लागा रे त्याला परत "बाय आय" म्हणवून शिकवायला....:)

तर असं बरेच दिवस "मामा मामा" म्हणून त्याने आपल्या पोटाची सोय केली पण पुढे काय? त्यामुळे ते आम्ही वर म्हटलेलं "चीची" त्याला शिकवून पाहिलं. पण त्यानंतर त्याने सरळ "पी पी" म्हणजे अर्थात पाळणाघरात डायपर बदलायला जाताना म्हटलं जातं ते आम्हाला शिकवून टाकलं....त्यामुळे खरं तर आमचीच सोय झाली कारण आता दोन दोन लहान मुलांचं करण्यात गुंतलेलो आम्ही त्याची "पी पी" बदलायची असेल तर बिचारा त्याचा तोच आम्हाला सांगेल..कसं??

पण "चीची"ची सोय मात्र होत नव्हती... मला त्याला दुधाचा सीपी कप देताना "हे घे...आता पी पी" असं म्हणायची सवय आहे....पण त्याने स्वतः तिथे मात्र पाळणाघरातल्या "पी पी" ला झुकतं माप दिल्याने आता पुढे काय हा मागचा प्रश्न होताच... शिवाय मोठ्या भावाला आता आपण लहानपणी चीची म्हणायचो हे आठवून दिल्याने तो आणि बाबा सारखं चीची करायला लागले होते...मग मीच कंटाळून म्हटलं, "अरे कदाचित डायरेक्ट दूध म्हणेल किंवा दुदु...जाउदे किती चिचकारताय ते???"

आणि एक दिवस साहेब सकाळी उठल्यापासून  "बीबी बीबी" करायला लागले...मला तर काय कळत नव्हतं... हो मी जगातल्या इतर सर्वसाक्षात्कारी आईवर्गात मोडत नाही...म्हणजे सगळं स्पष्ट कळल्याशिवाय मी काही बधणार नाही हे कळल्यावर मग मी स्वयंपाकघरात काम करता करता शेवटी एका सिपीकपकडे अत्यंत आशेने पाहून मग "बीबी बीबी"चा धोशा पुन्हा लावल्यावर मात्र तो सर्वसाक्षात्कार मलाही झाला.....मी तर एकदम किंचाळलेच... 

"अरे हे बघ तो बीबी म्हणतोय कारण त्याला सिपी कप हवाय.." इति मी....
"ये.....य" हे घरातलं एबीसीडीचं चित्कारणं...
"सही..." आपला मुंबईकर..

आणि अशा प्रकारे बीबीचा जन्म झाला म्हणजे "या" बीबीचा जन्म झाला ....:) म्हणजे "पी पी" मधला "पी" हा शब्द आधीच एका जागी गेल्याने त्याला उच्चारणारं दुसरं आणि "प"सारखा उच्चार असणारं अक्षर "ब"..."पी" च्या ऐवजी "बी"..आणि आई "पी पी" म्हणतेय तर तिची लेट ट्युब पेटवायला "बी बी" इतकं जबरी डोकं हा इवलुश्या पिल्लाने चालवलंय असा मी तरी (थोडं जास्त विचार करून) निष्कर्ष काढला आहे....आता त्याला पाणी, दूध किंवा काहीही प्यायला हवं असेल आणि त्याने एकदा "बीबी" म्हटलं तरी लगेच आम्ही "बीबी"ला हाजिर करतो....:) हो चीची सारखं हा शब्द स्पेसिफ़िक नाहीये...तो थोडा लिक्विड या अर्थी शोधलाय त्याने...म्हणजे त्याला अजून भरपूर बोलायला शिकायचं आहे नं? मग एकाच शब्दावर किती पी एच डी करणार?? 

त्यानंतर (आधी म्हटलं तसं ही पोस्ट उशीरा लिहिल्यामुळे) बरेच शब्द/स्लॅंग इ.इ. आमच्या शब्दकोशात वाढले आहेत...बीबीच्या वेळी जी मजा आली ती प्रत्येकात यायला हवी असं काही नाही..पण शब्द शिकण्याची ही फ़ेज मला फ़ार आवडते...आणि सध्या मी पुन्हा एकदा तेच करतेय.....या सगळ्याचा पालक म्हणून आनंद घेतं....लेट ट्युब असली तरी मजा येतेच नं राव? म्हणजे बघा नं,मोठा भाऊ धाकट्याला म्हणतोय, 
"मी तुला तुझी बीबी देऊ?"
आणि आई-बाबा त्याला म्हणताहेत....
"आरुष तू तुझी बीबी घे.....आणि ऋषांकला त्याची दे" (खरं तर त्याची चीची होती पण आता बीबीचा जमाना आहे) 

आठवून आठवून सगळी वाक्यं लिहिली तर फ़ार मजा येईल..पण आता "ऋषांकच्या बीबी"ला महत्व द्यायला होतं म्हणून बीबी पुराण आवरतं घेते.. तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीला वाव देऊन अशी काही वाक्य स्वतःच बनवा. .. :)
आजच्या मदर्स डेच्या निमित्ताने मला दोन छान बक्षिसं मिळाली आहेत...एक आहे शाळेत स्वतः वाफ़ा बनवून, बी पेरून आणि पाणी लावून थोडंसं मोठं केलेलं एक छोटंसं रोप आणि दुसरं शाळेतल्या क्रिएटिव्ह सेशनमध्ये बनवलेलं हाताच्या ठशांचं एक छोटंस पेंटिंग....माझा मदर्स डे स्पेशल करणार्‍या माझ्या पिल्लांसाठी ही एक छोटी गमतीशीर पोस्ट...आणखी काही वर्षांनी आठवेल का त्यांना हे सगळं??? :)

Tuesday, May 8, 2012

येथोनी (फ़क्त) आनंदु रे आनंदु

एप्रिल महिन्याच्या एका रविवारी आमच्या ओरेगावातल्या हौशी मराठी गायकांचा कार्यक्रम पाहायचा प्रयत्न केला. प्रयत्न अशासाठी की पहिल्यांदीच दोन छोट्या मुलांना घेऊन कार्यक्रम पाहता येतात का हे पाहायचं होतं..आणि मुलांनी अर्थातच तो जोरदार हाणून पाडला...म्हणजे दोष नाही आहे त्यांचा..त्यांची वयंच अशी आहेत की खरं तर आम्हीच हा प्रयत्न करायला नको पण तेही करायचं कारण याच ठिकाणी मे मध्ये होणारा पुढचा कार्यक्रम वाकुल्या दाखवता दाखवत होता...त्या कार्यक्रमाचे कलावंत होते माननीय श्रीधरजी फ़डके....
आता हा कार्यक्रम पाहायला मिळणार नाही हे तिथे एप्रिलमध्येच मुलांनी सिद्ध केलं होतं पण तरी त्या कार्यक्रमानंतर सोम आणि मंगळवारी त्यांनी एका खाजगी कार्यशाळेचं आयोजन केलंय याचं पत्रक मात्र अधाशीपणे उचललंच....मागचा महिना बरीच खलबतं करून शेवटी माझ्या बेटर हाफ़ (खरंच काय छान अर्थ आहे नं या शब्दाचा) तर त्यानेच सांगितलं अगं तुला इच्छा आहे नं? जा की मग? मी पाहिन मुलांना त्यात काय??
होय हे नमन नाही आहे...ही पावती आहे मला जे मिळतंय त्याची पोच आधी दिली तरच पुढच्या पोस्टला अर्थ आहे नं...म्हणून...

मी या ब्लॉगचं नाव ज्या गाण्यावरून दिलंय, त्या गाण्याच्या संगीतकाराच्या सान्निध्यात काढतेय या विचारानेच धडधड वाढतेय....आज जीपीएसने चुकवलं नाही, ट्रॅफ़िकने अडवलं नाही...अगदी काही काही अडथळा नाही.....ज्या घरी ही कार्यशाळा असणार आहे तिथे आता श्रीधरजीही पोहोचताहेत....त्यांच्याबरोबर शिकायची इच्छा असणारे आम्ही साताठ जण आपसूक उभे राहतो...त्यांचं ते प्रसन्न हसणं आणि आल्यावर चटकन हात धुवून अजिबात वेळ न दवडता बैठक मांडून सुरुवातीला आमची ओळख करून घेणं....माझ्यासाठी सगळंच स्वप्नवत...
मराठीच्या "श, ष, क्ष" असे काही शब्दोच्चार करून त्याचं महत्व आम्हाला समजावणं.....

सुगम संगीत गायन हे काही ऐकलं आणि गायलं असं सोपं नसून त्यात काय दडलंय हे आता त्यांच्या पोतडीतून आम्हाला कळणार आहे हे समजतंय.....तितक्यात कुणी तरी दिवा लावतं..."सा" लावतानाच पेटीवरचा हात काढून आपसूक त्यांचे हात जोडले जातात....

सुरांशी आमची पुन्हा ओळख करून देताना...थोडा खर्ज आग्रहाने आमच्याकडून घोटवून मग हे काही शास्त्रीयसाठी नाही करत आहे मी....ते तुम्ही शास्त्रीय शिकत असाल तिथे करालच...आता आपण इथून पुढे जे गायल शिकणार आहोत त्यासाठी गळा तयार होतोय तुमचा असं सांगतानाचं त्यांचं हसू.....आम्हालाही मोकळं करण्याचं त्यांचं कसब....सारंच अनोखं,हवंहवंसं....

आणि मग आजचं पहिलं गाणं आम्ही लिहून घेतो....येथोनी आनंदु रे आनंदु..............


सात वाजता सुरू झालेलं पहिलं गाणं त्यातल्या लकबी समजावत आणि प्रत्येकाकडून त्या करुन घेताना रात्रीचे साडे नऊ कसे वाजतात कळतही नाही.....नंतर दुसरं गाणं सुरू आधीच्या पाच मिनिटांच्या विश्रांतीतही ते आमची चौकशी करतात...आमच्या भाबड्या प्रश्नांना हसून देतात....खरंच जी माणसं आपल्या कार्याने जास्त उंचीवर गेलेली असतात त्यांचे पाय किती खंबीरपणे जमिनीवर घट्ट रोवलेल असतात नाही?

गेले कित्येक दिवस मी जेव्हा जेव्हा सुरेशजींच्या आवाजात हा अभंग ऐकते तेव्हा मला आपलं उगीच  वाटायचं की गायकी म्हणून त्यातल्या ताना त्यांच्या स्वतःच्या असाव्यात..अर्थात या अभंगाच्या करवित्यानेच तो शिकवला, त्याला त्यातली प्रत्येक हरकत कशाप्रकारे हवी होती हे प्रत्यक्ष त्यांच्या गळ्यातून खाजगी मैफ़िलीत ऐकणं, शिकण या अनुभवाने गाणं कसं बसलं जातं हेही कळलं... त्यानंतर आणखी एक भावगीत जे माझ्यासाठी संपूर्ण नवं होतं तेही आम्ही शिकायचा प्रयत्न केला....त्याविषयी पुन्हा केव्हातरी...

कालच्या भावस्पर्शी अनुभवानंतर कवीने लिहिलेली कविता/अभंग याचं गाणं होतानाचा प्रवास जो काही पाह्यला मिळाला त्यानंतर गाणं हे गायकाच्या आधी संगीतकाराचं असतं हे मनोमन मान्य करताना....ज्या काही योगोयोगांमुळे हे भाग्य मला मिळालं त्यासाठी मी तर इतकंच म्हणेन...."येथोनी आनंदु रे आनंदु...."
 

- अपर्णा
८ मे २०१२

Thursday, May 3, 2012

दिल्ली बिल्ली...

म्हंजे झालं असं की आधीच लई वंगाळ वंगाळ बोल्नं ते आपलं शिव्या का काय हाय म्हंतांन्सी म्हूनशान सम्दी बोलुन राहिले व्हते..त्यात परवा रातीला कुनीतरी आनी बोल्लं की बग पन मग तुमी लोकं संत्र्याचा रस कवा बी पिनार न्हाय..आता ह्ये शिव्या अनं संत्र्याचा रस काय समंदं....आप्लं काय बी डोच्कं चालेना बगा म्हूनशान एगदाचं ते नेटफ़िक्ल्क्ष लावलं आनं दिल्लीची काय ती बिल्ली हाय ती पायला घेतलीच....

ते आदी नेटफ़िक्ल्क्षला कुटलं हिंदी पिच्चर आलं नं का की लगेच बगुन टाकायचं बगा..त्ये ब्येनं लई लब्बाड हायती...काय काय सांगतील...नवीन नवीन पालिसी काढतील अन मग मोडून बी टाकतील..आपन फ़ुकट पैकं कशाला जास्त द्या....त्ये पन एक कारन व्हतं बरं का बगायचं...
 
लावलं तर अक्खी श्टोरी म्हंजे काय ते चार आन्याची... न्हाय चला रुप्याची कोंबडी अवं चार आने ग्येले न्हवं का जुन्या बाजारात आपलं ते मोडीत..म्हंजे त्येच ते...ग्येले ते चार आने आनं रायले ते आठ आने पन न्हाई डायरेक्ट रुपाया आता त्यो पन राहतो का जातो द्येव जाने...हां तर कुटं होतो आपनं...रायले ते आपलं त्येच्या बा...फ़ुल्या फ़ुल्या फ़ुल्या....आसं व्हतं बगा ते पिच्चर पाह्यला म्हून न्हाई समदी हवाच आशी हाय आजकाल....हां तर रुपायाची कोंबडी अनं पाच रुपायाचा मसाला....बरं तो पन कसा तर रंग लावलेली ती तंदुरी कोंबडी अस्ते नं आक्षी तिच्यावानी..नुस्तंच रुपडं...चव समदी सारखीच...

श्टोरी काय वो तीच ती..तीन मित्र त्येला कशापाय नेहमी लागतात काय ठावं न्हाय पन लागतात..बरं लागतात तर घे मुडद्या..पन काय त्ये शिव्या शिव्या म्हटलं तर काय वरायटी हाय का नाय...त्येच ते नेहमीचं ..त त..आपलं फ़ फ़.....म्हंजे आता बाईच्या जातीला आलं म्हुन काय शिव्या ठावं न्हाय व्हयं....म्हंजे बाप्यांना ठावं नस्तील त्येच्यापरीस बाईला शिव्यांची माहिती...कशी म्हंता..अवं ऐकाया तर आम्हालाच लागतात का न्हाय?? सांगा..म्हंजे त्ये तुमी मोट्या सालंत जावा नायतर त्ये काय ते विंजिनियर व्हायच्या कालिजात...ती पाच आट पोरांच्या संगतीत हुब्या दोनेक पोरी त्या पोरांच्या टक्कुर्‍यात तरी असतात का? त्यांचं लक्ष त्ये जुनियर का काय म्हंता त्या पोरींवर आन मग त्ये एकडाव सुरु झाले की भेंडी खेळापरीस शिव्याच शिव्या देऊन राहिले की ऐकनार कोन म्हंते मी??? तर आता आलं ना ध्येनात समद्या शिव्या ऐकायचा मक्ता घेऊन पन मूग आपलं त्ये शिव्या गिळून बसल्येल्या पोरी हे पिच्चर बगनार त्यान्ला वरायटी नको??
 
बरं नको तर नको...त्ये एक कोन ते हिरो कसलं ते काळा डोळा घेऊन समदं पिच्चर फ़िरनार त्येला बगायचं तरी कसं...थोडं काय मोटं कारन नको का डोळा फ़ोडून फ़िरतोय काय? गाडीमध्ये बंदुका घेऊन फ़िरतो काय?? मसाला न्हाइ तर काय?? राहिलं तर त्ये एक संत्र....त्ये हाय तसं नामी पन रातीला पिच्चर पाहिलं नं सक्कालपतुर डोस्क्यातनं पार रस ग्येला बगा..

न्हाइ म्हंजे बगुच नका असा काय नाय....ते शेवटी तरी एक त्ये आमचं लाडकं मिथुनदा श्टाइल डान्स क्येलाय..पन म्हंते हाय नं त्यो जित्ता...उस ग्वाड लागला सारखं मिथुनदा आवडला तर त्याच्यासारकंच आपलं पाय नाचवायचं...बरं त्ये पन बगितलं पन मग त्ये श्टोरीचं काय...त्ये हिरं काय नं डाकु पन येका जागी बसुन...त्यांच्याकडे पन आक्षी म्हटलं तसं वरायटी नाय...का असं म्हनुया नं त्ये लै वंगाळ वाटायची काय ते म्हंता तुमी डेफ़िन्येशन का काय त्ये बदलली आक्शी....रातीला पिच्चर पायला अन वाटलं आता सकाळधरनं शिव्याच येतील का काय तोंडात न्हाय तर डोस्क्यात तरी..पन काय बी नाय....तसं बी माझ्या डोस्क्यात जी पन लोकं पिच्चरचं काय बी घालाया गेलेत, त्येंचंच डोस्कं गरगरलं...तर ह्ये तसं काय म्हनत्यात ते नार्मलच की.....:)

जाऊ दे...उगा आप्लं ह्ये लिवलं...काय त्ये म्हनायचं...खोदा पाड आनि निकली दिल्लीची बिल्ली.... :)

फ़ोटो साभार: मायाजाल