Sunday, May 13, 2012

बातचीत, बकबक .................. बीबी


"अगं काय म्हणतोय तो??"
"काही नाही रे .. ती बीबी दे त्याला त्याची"
"कुठली बीबी...मला नाही दिसत आहे ती??"
"अरे असं काय? काउंटरवर बघ..मी पाण्याच्या जगाच्या मागे लपवलीय...नाहीतर तो सारखी मागतो?"
"दिसली दिसली.... ऋषांक, ही घे तुझी बीबी"

वरचा सुसंवाद हा "बीबी"बद्दल आमच्या घरात आजकाल रोज घडत असलेल्या असंख्य संवादांपैकी एक आहे असं म्हटलं तर?? आई गं...म्हणजे ऋषांक आल्याची बातमी ज्यांनी वाचली असेल ती लोकं म्हणतीय अगं सव्वा वर्षाच्या मुलाला आत्तापासून कुठल्या "बीबी" ची सोय करतेस...म्हणजे मुलामुलींच्या गुणोत्तरांमधलं देशातलं मुलींच घटतं प्रमाण पाहता खरं तर तसं करावं का आतापासून असा एक विचारही आम्ही दोघांनी करून पाहिला आहे. त्यामुळे आजकाल आमच्या ज्या भारतीय मित्रमैत्रीणींना मुली आहेत त्यांच्याशी आम्ही जरा जास्तच सलगीने बोलत असतो..पण या पोस्टीचा विषय हा नाहीये...मग हे नमन कशाला?? 

बरं जाऊदे तुम्ही चीची ची गोष्ट वाचलीय?? हे नमन नाही...या पोस्टेचं कारण चीचीच आहे..म्हणून चीचीचा उल्लेख झाल्याशिवाय ही पोस्ट खरं तर सुरूच होऊ शकत नाही.....

तर आरुष बोलायला लागला तेव्हाचे दिवस आठवून आम्ही "चीची" हा आता विस्मरणात गेलेला शब्द आमच्या घरात पुन्हा इंट्रोड्युस करून पाहिला..पण "काय चाललंय या लोकांचं?" या पलिकडे छोट्या राजांनी त्याला महत्व दिलं नाही...किंबहुना चीचीच काय च वरून आलेला कुठलाही शब्द तो अजून बोलायला लागला नाही... 

अरे हे काय?? आता तो थोडं थोडं बोलायला लागला हे सांगितलंच नाही की काय मी??? अरे हो...म्हणजे झाले त्याला आता बरेच महिने....या वर्षी ब्लॉगवर सगळंच पेंडिंग होतंय...पण तरी मी आय टीत असल्यामुळे अपडेट्सचं महत्व माझ्याशिवाय कुणाला माहित असणार शिवाय काय आहे मूळ उत्पादनात काही राहिलं तर सपोर्ट पॅक्स आहेतच... (काही नाही सतत सपोर्ट पॅक अपग्रेडट्सवर काम केलं की असले फ़ाल्तु जोक सुचतात मलाही...तर असो)

कुठे होतो आपण?? ह्म्म...बातचीत....
साधारण "बोलणं किंवा बातचीत" जरी आधी ऑ...ब्यळ्यॅक....व्यॉ....आणि तत्सम बकबकीने सुरू झालं तरी शेवटी ते खाण्याविषयीच्या शब्दापासून सुरू होण्याचा आपल्या मोठ्या भावाचा पायंडा लहान्याने पण सुरू केला हे त्याने त्याच्या चिरिओजना मागच्या नोव्हेंबरमध्ये "मा मा" म्हणून सिद्ध केलं...पाळणाघरात "आई"ऐवजी हा माझा मामा करणार का असा समज होणारच होता पण मामा म्हणजे कुठलंही फ़िंगर फ़ूड हे त्यांना मी लगेच क्लियर केलं...हो उगाच मधल्यामध्ये मी का मामा?? लागा रे त्याला परत "बाय आय" म्हणवून शिकवायला....:)

तर असं बरेच दिवस "मामा मामा" म्हणून त्याने आपल्या पोटाची सोय केली पण पुढे काय? त्यामुळे ते आम्ही वर म्हटलेलं "चीची" त्याला शिकवून पाहिलं. पण त्यानंतर त्याने सरळ "पी पी" म्हणजे अर्थात पाळणाघरात डायपर बदलायला जाताना म्हटलं जातं ते आम्हाला शिकवून टाकलं....त्यामुळे खरं तर आमचीच सोय झाली कारण आता दोन दोन लहान मुलांचं करण्यात गुंतलेलो आम्ही त्याची "पी पी" बदलायची असेल तर बिचारा त्याचा तोच आम्हाला सांगेल..कसं??

पण "चीची"ची सोय मात्र होत नव्हती... मला त्याला दुधाचा सीपी कप देताना "हे घे...आता पी पी" असं म्हणायची सवय आहे....पण त्याने स्वतः तिथे मात्र पाळणाघरातल्या "पी पी" ला झुकतं माप दिल्याने आता पुढे काय हा मागचा प्रश्न होताच... शिवाय मोठ्या भावाला आता आपण लहानपणी चीची म्हणायचो हे आठवून दिल्याने तो आणि बाबा सारखं चीची करायला लागले होते...मग मीच कंटाळून म्हटलं, "अरे कदाचित डायरेक्ट दूध म्हणेल किंवा दुदु...जाउदे किती चिचकारताय ते???"

आणि एक दिवस साहेब सकाळी उठल्यापासून  "बीबी बीबी" करायला लागले...मला तर काय कळत नव्हतं... हो मी जगातल्या इतर सर्वसाक्षात्कारी आईवर्गात मोडत नाही...म्हणजे सगळं स्पष्ट कळल्याशिवाय मी काही बधणार नाही हे कळल्यावर मग मी स्वयंपाकघरात काम करता करता शेवटी एका सिपीकपकडे अत्यंत आशेने पाहून मग "बीबी बीबी"चा धोशा पुन्हा लावल्यावर मात्र तो सर्वसाक्षात्कार मलाही झाला.....मी तर एकदम किंचाळलेच... 

"अरे हे बघ तो बीबी म्हणतोय कारण त्याला सिपी कप हवाय.." इति मी....
"ये.....य" हे घरातलं एबीसीडीचं चित्कारणं...
"सही..." आपला मुंबईकर..

आणि अशा प्रकारे बीबीचा जन्म झाला म्हणजे "या" बीबीचा जन्म झाला ....:) म्हणजे "पी पी" मधला "पी" हा शब्द आधीच एका जागी गेल्याने त्याला उच्चारणारं दुसरं आणि "प"सारखा उच्चार असणारं अक्षर "ब"..."पी" च्या ऐवजी "बी"..आणि आई "पी पी" म्हणतेय तर तिची लेट ट्युब पेटवायला "बी बी" इतकं जबरी डोकं हा इवलुश्या पिल्लाने चालवलंय असा मी तरी (थोडं जास्त विचार करून) निष्कर्ष काढला आहे....आता त्याला पाणी, दूध किंवा काहीही प्यायला हवं असेल आणि त्याने एकदा "बीबी" म्हटलं तरी लगेच आम्ही "बीबी"ला हाजिर करतो....:) हो चीची सारखं हा शब्द स्पेसिफ़िक नाहीये...तो थोडा लिक्विड या अर्थी शोधलाय त्याने...म्हणजे त्याला अजून भरपूर बोलायला शिकायचं आहे नं? मग एकाच शब्दावर किती पी एच डी करणार?? 

त्यानंतर (आधी म्हटलं तसं ही पोस्ट उशीरा लिहिल्यामुळे) बरेच शब्द/स्लॅंग इ.इ. आमच्या शब्दकोशात वाढले आहेत...बीबीच्या वेळी जी मजा आली ती प्रत्येकात यायला हवी असं काही नाही..पण शब्द शिकण्याची ही फ़ेज मला फ़ार आवडते...आणि सध्या मी पुन्हा एकदा तेच करतेय.....या सगळ्याचा पालक म्हणून आनंद घेतं....लेट ट्युब असली तरी मजा येतेच नं राव? म्हणजे बघा नं,मोठा भाऊ धाकट्याला म्हणतोय, 
"मी तुला तुझी बीबी देऊ?"
आणि आई-बाबा त्याला म्हणताहेत....
"आरुष तू तुझी बीबी घे.....आणि ऋषांकला त्याची दे" (खरं तर त्याची चीची होती पण आता बीबीचा जमाना आहे) 

आठवून आठवून सगळी वाक्यं लिहिली तर फ़ार मजा येईल..पण आता "ऋषांकच्या बीबी"ला महत्व द्यायला होतं म्हणून बीबी पुराण आवरतं घेते.. तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीला वाव देऊन अशी काही वाक्य स्वतःच बनवा. .. :)




आजच्या मदर्स डेच्या निमित्ताने मला दोन छान बक्षिसं मिळाली आहेत...एक आहे शाळेत स्वतः वाफ़ा बनवून, बी पेरून आणि पाणी लावून थोडंसं मोठं केलेलं एक छोटंसं रोप आणि दुसरं शाळेतल्या क्रिएटिव्ह सेशनमध्ये बनवलेलं हाताच्या ठशांचं एक छोटंस पेंटिंग....माझा मदर्स डे स्पेशल करणार्‍या माझ्या पिल्लांसाठी ही एक छोटी गमतीशीर पोस्ट...आणखी काही वर्षांनी आठवेल का त्यांना हे सगळं??? :)

8 comments:

  1. हाहाहा.. चीची ची गोष्ट चांगलीच लक्षात आहे माझ्या :)).. चीची पीपी आणि आता ही बीबी.... इकारान्त शब्दांची चांगलीच चलती आहे तर तुमच्या घरात. :))

    उशीर झाला तरी लिहून ठेवलंस हे फार चांगलं केलंस. नाहीतर काही वर्षांनी त्यांना जाऊदे तुला तरी आठवले असते का एवढे सगळे डीटेल्स? :)

    ReplyDelete
    Replies
    1. "लक्षात ठेवणे" या बाबतीतला माझा गोंधळ मलाच चांगला माहिते..:) म्हणून हेरंब मी तुझ्याशी थोडीफ़ार सहमत आहे...थोडीफ़ार कारण मला अजूनतरी चीची आठवतेय चांगलीच त्यामुळे बीबी पण लक्षात राहिल असं सध्यातरी वाटतंय... :)

      आणि इकारान्त काय? अरे सुरूवात मामा ने झालीय...विसरू नकोस...आणि खरं तर तो माझ्या बाबांनी शिकवलेलं "काव्वा" पण बोलतो....बरं इकारान्त मध्ये "आई"चा पत्ता नाहीये अजुन...असो कंफ़ुज लोक्स आहेत ही तसंही..... :D

      Delete
  2. निरागस पोस्ट

    ReplyDelete
    Replies
    1. पल्लवी आभार्स....:)
      ब्लॉग वाचायचा पेशंस असेल तर तुला अशा निरागस पोस्ट "चकए चष्टगो" मध्ये मिळतील.... :)

      Delete
  3. अपर्णा, तुझा ब्लॉग पाहतो अधूनमधून. मला तर माझिया मना लिहिलेलं चित्रच आकर्षून घेतं. एक ललना, तिच्या केसांमध्ये अडकलेलं आठवणींचं मोरपीस...मनाचं वातावरण भावरम्य करून जातं. चित्र स्वतः काढलेलं आहे की एखाद्या चित्रकाराकडून बनवून घेतलेलं ?

    ReplyDelete
    Replies
    1. आभार केदार आणि स्वागत...

      ते विजेट कोड माझ्याही अत्यंत आवडीचं आहे आणि हेच नाही तर स्वतःचा वेळ आणि क्रिएटिव्हीटी खर्चून मराठी ब्लॉगजगतातली बरीचशी विजेट बनवायचं श्रेय आणखी एक गुणी, यशस्वी ब्लॉगर भुंगा याला जातं....भुंगा पुन्हा एकदा आभार....:)
      त्याचं विजेट माझ्या ब्लॉगवर उजवीकडे मिळेल आणि त्याच्या ब्लॉगची लिंक
      http://bhunga.blogspot.com/

      नक्की भेट द्या.....माझ्या विजेटबद्द्ल बोलायचं तर मी उजवीकडे लिहिलंय तसं आठवणीतली मोरपीसं लिहिते असं त्यानेही वाचून बनवलेलं समर्पक विजेट आहे असं माझं त्याने ते विजेट मला पाठवलं त्यादिवशीच झालेलं मत आहे. मला स्वतःला ते चित्र आणि ती मोरपीसाची कल्पना खूप खूप आवडली आहे.......भुंगा ही कमेंट/उत्तर सगळं तुमच्या विजेट साठी..... :)

      Delete
  4. बातचीत, बकबक, बीबी, चीची, पोस्ट आणि मदर्स डेचे गिफ्ट, त्यावरचा संदेश, पेंटिग, हस्ताक्षर ... सबकुछ एकदम सही गो. सुपर लाईक.

    ReplyDelete
    Replies
    1. सुपर आभार सिद्धार्थ....मजा असते नं मुलांची भाषा समजून घ्यायची ही फ़ेज..कालच आमचा "बाबा" "बीबी"वाल्याला गाड्यांचे प्रकार शिकवत होता...त्या दोघांना बघताना आणि ऐकताना मी इतकी गुंगून गेले होते नं....त्याचा "बुलडोझर" हा पहिला पाच अक्षरी शब्द आहे..:) अर्थात "आई" अद्याप बोलत नाहीच आहे...:P

      Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.