Tuesday, May 8, 2012

येथोनी (फ़क्त) आनंदु रे आनंदु

एप्रिल महिन्याच्या एका रविवारी आमच्या ओरेगावातल्या हौशी मराठी गायकांचा कार्यक्रम पाहायचा प्रयत्न केला. प्रयत्न अशासाठी की पहिल्यांदीच दोन छोट्या मुलांना घेऊन कार्यक्रम पाहता येतात का हे पाहायचं होतं..आणि मुलांनी अर्थातच तो जोरदार हाणून पाडला...म्हणजे दोष नाही आहे त्यांचा..त्यांची वयंच अशी आहेत की खरं तर आम्हीच हा प्रयत्न करायला नको पण तेही करायचं कारण याच ठिकाणी मे मध्ये होणारा पुढचा कार्यक्रम वाकुल्या दाखवता दाखवत होता...त्या कार्यक्रमाचे कलावंत होते माननीय श्रीधरजी फ़डके....
आता हा कार्यक्रम पाहायला मिळणार नाही हे तिथे एप्रिलमध्येच मुलांनी सिद्ध केलं होतं पण तरी त्या कार्यक्रमानंतर सोम आणि मंगळवारी त्यांनी एका खाजगी कार्यशाळेचं आयोजन केलंय याचं पत्रक मात्र अधाशीपणे उचललंच....मागचा महिना बरीच खलबतं करून शेवटी माझ्या बेटर हाफ़ (खरंच काय छान अर्थ आहे नं या शब्दाचा) तर त्यानेच सांगितलं अगं तुला इच्छा आहे नं? जा की मग? मी पाहिन मुलांना त्यात काय??
होय हे नमन नाही आहे...ही पावती आहे मला जे मिळतंय त्याची पोच आधी दिली तरच पुढच्या पोस्टला अर्थ आहे नं...म्हणून...

मी या ब्लॉगचं नाव ज्या गाण्यावरून दिलंय, त्या गाण्याच्या संगीतकाराच्या सान्निध्यात काढतेय या विचारानेच धडधड वाढतेय....आज जीपीएसने चुकवलं नाही, ट्रॅफ़िकने अडवलं नाही...अगदी काही काही अडथळा नाही.....ज्या घरी ही कार्यशाळा असणार आहे तिथे आता श्रीधरजीही पोहोचताहेत....त्यांच्याबरोबर शिकायची इच्छा असणारे आम्ही साताठ जण आपसूक उभे राहतो...त्यांचं ते प्रसन्न हसणं आणि आल्यावर चटकन हात धुवून अजिबात वेळ न दवडता बैठक मांडून सुरुवातीला आमची ओळख करून घेणं....माझ्यासाठी सगळंच स्वप्नवत...
मराठीच्या "श, ष, क्ष" असे काही शब्दोच्चार करून त्याचं महत्व आम्हाला समजावणं.....

सुगम संगीत गायन हे काही ऐकलं आणि गायलं असं सोपं नसून त्यात काय दडलंय हे आता त्यांच्या पोतडीतून आम्हाला कळणार आहे हे समजतंय.....तितक्यात कुणी तरी दिवा लावतं..."सा" लावतानाच पेटीवरचा हात काढून आपसूक त्यांचे हात जोडले जातात....

सुरांशी आमची पुन्हा ओळख करून देताना...थोडा खर्ज आग्रहाने आमच्याकडून घोटवून मग हे काही शास्त्रीयसाठी नाही करत आहे मी....ते तुम्ही शास्त्रीय शिकत असाल तिथे करालच...आता आपण इथून पुढे जे गायल शिकणार आहोत त्यासाठी गळा तयार होतोय तुमचा असं सांगतानाचं त्यांचं हसू.....आम्हालाही मोकळं करण्याचं त्यांचं कसब....सारंच अनोखं,हवंहवंसं....

आणि मग आजचं पहिलं गाणं आम्ही लिहून घेतो....येथोनी आनंदु रे आनंदु..............


सात वाजता सुरू झालेलं पहिलं गाणं त्यातल्या लकबी समजावत आणि प्रत्येकाकडून त्या करुन घेताना रात्रीचे साडे नऊ कसे वाजतात कळतही नाही.....नंतर दुसरं गाणं सुरू आधीच्या पाच मिनिटांच्या विश्रांतीतही ते आमची चौकशी करतात...आमच्या भाबड्या प्रश्नांना हसून देतात....खरंच जी माणसं आपल्या कार्याने जास्त उंचीवर गेलेली असतात त्यांचे पाय किती खंबीरपणे जमिनीवर घट्ट रोवलेल असतात नाही?

गेले कित्येक दिवस मी जेव्हा जेव्हा सुरेशजींच्या आवाजात हा अभंग ऐकते तेव्हा मला आपलं उगीच  वाटायचं की गायकी म्हणून त्यातल्या ताना त्यांच्या स्वतःच्या असाव्यात..अर्थात या अभंगाच्या करवित्यानेच तो शिकवला, त्याला त्यातली प्रत्येक हरकत कशाप्रकारे हवी होती हे प्रत्यक्ष त्यांच्या गळ्यातून खाजगी मैफ़िलीत ऐकणं, शिकण या अनुभवाने गाणं कसं बसलं जातं हेही कळलं... त्यानंतर आणखी एक भावगीत जे माझ्यासाठी संपूर्ण नवं होतं तेही आम्ही शिकायचा प्रयत्न केला....त्याविषयी पुन्हा केव्हातरी...

कालच्या भावस्पर्शी अनुभवानंतर कवीने लिहिलेली कविता/अभंग याचं गाणं होतानाचा प्रवास जो काही पाह्यला मिळाला त्यानंतर गाणं हे गायकाच्या आधी संगीतकाराचं असतं हे मनोमन मान्य करताना....ज्या काही योगोयोगांमुळे हे भाग्य मला मिळालं त्यासाठी मी तर इतकंच म्हणेन...."येथोनी आनंदु रे आनंदु...."
 

- अपर्णा
८ मे २०१२

27 comments:

  1. बिग बिग वॉव !!! प्रत्यक्ष श्रीधर फडक्यांकडून गाणं शिकायला मिळणं म्हणजे ...... तोडलंस मैत्रिणी !!

    ReplyDelete
    Replies
    1. मित्रा, अरे निव्वळ योगायोग...आणखी काही नाही...श्रीधरजींचे मागचे तीन वेळचे कार्यक्रम या ना त्या कारणाने चुकलेत...हे मात्र कुणीतरी आधीच ठरवल्यासारखं विनासायास पार पडलं बघ....:)

      Delete
  2. अपर्णा,
    GR888888888888888888.

    मस्तच गं!!!!

    ReplyDelete
    Replies
    1. श्रद्धा, आभार गं....:)

      आणि ग्रेट नाही फ़क्त संधी मिळाली आणि आता प्रयत्न करेन त्यांच्या शिकवणुकीप्रमाणे शिकायचा...)

      Delete
  3. Replies
    1. अगदी सचिन....मागचा आठवडा हवेत होते मी....:)

      Delete
  4. ग्रेट!खूप हेवा वाटतोय! :)

    ReplyDelete
    Replies
    1. पल्लवी आभार...
      अगं मला स्वतःलाच स्वतःचा हेवा वाटतोय....:)

      Delete
  5. थेट श्रीधर फडक्यांकडून गाणं म्हणजे ग्रेटच ग!

    ReplyDelete
    Replies
    1. आभार गौरी... अगं ग्रेट नाही वर म्हटलं तसं एक खूप छान संधी मिळाली...:)

      Delete
  6. वरच्या सगळ्यांशी सहमत!
    अपर्णा, तू गातेस हेच माझ्यासाठी नवं आहे..पण साक्षात श्रीधरजींकडून मार्गदर्शन मिळालंय तर आता तुझं गाणं जरूर ऐकायचंय..कधी ऐकवणार सांग.
    ध्वनीमुद्रण करून इथेच चढव..म्हणजे सगळ्यांना ऐकता येईल....तुझ्या पुढच्या गानप्रवासाला माझ्या हार्दिक शुभेच्छा!

    ReplyDelete
    Replies
    1. काका सर्वप्रथम आभार...
      अहो मी गाणं शिकतेय हा उल्लेख आधीच्या एका पोस्टमध्ये आला आहे..आणि इथे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की शिकणं हे गाणं समजण्यासाठीही असू शकतं...माझं तसं समजा..:)
      रेकॉर्ड करायची सवय जूनी आहे..आता त्यातल्या त्रुटी (जास्त अचूकपणे) कळतील..त्यामुळे कुठे ब्लॉगवर चढवा?? .. :D
      पण कधी भेटलो तर गळा साफ़ करायची संधी जरूर साधेन... :)

      आभार पुन्हा एकदा...:)

      Delete
  7. सह्हीच.. तू गातेस हे मलाही नवंच!!

    ReplyDelete
    Replies
    1. आनंद आभार...
      "गाणी आणि आठवणी"च्या नेहमीच्या श्रोत्याने असं म्हणावं म्हणजे...अरे वर काकांना म्हटलंय तसं आधी मी लिहिलंय की मी शिकायचे म्हणून....मला वाटतं तू हे सदर वाचायचं बंद केलंयस....
      असो माझ्या हजारों ख्वाइशेंमधलं गाणं एक समज.... :)

      Delete
  8. अरे व्वा ! मस्तच ! तुझ्यात एक कोकिळा दडलेय होय ?? हे नव्हतं माहित ! :)

    ReplyDelete
    Replies
    1. हा हा अनघा..
      अगं कोकिळ आहे की आणखी कुठला पक्षी ते आपण पेणला जाऊन ठरवुया..कसं.... :)

      Delete
  9. वाह! जबरी!
    तुझं गाणं मला माहितीय.. त्यादिवशी तू ते "जा रे जा रे, ले जा रे संदेसा.." रेकॉर्ड करुन पाठवलं होतं ना ते मी लाओलाग ब्लॅकबेरीवर डालो केलं होतं आणि ते आता माझ्या प्लेलिस्टमध्ये आहे..
    मज्जा येते तुझ्या आवाजातलं ते गाणं ऐकताना..
    जिंकलंस मैत्रीणी +++++
    या सर्वासांठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत.. ( हे जोश्यांच्या पल्लवी कडून बरं ;) )

    ReplyDelete
    Replies
    1. अरे दीपक उडव ते...ब्लॅकबेरीला त्रास नको देऊस... :) निव्वळ आरुषच्या आजारपणातल्या आग्रहामुळे गायचा प्रयत्न केला होता..
      आता मात्र या दोन दिवसानंतर पुन्हा एकदा तानपुरा जुळवायला हवा असं प्रकर्षाने वाटायला लागलं आहे....माझ्यासाठी गाणं ऐकणं हे काही लोकं योगसाधना करतात तसं काहीसं आहे...गाणं नेहमीच वर्तमानातले प्रश्न विसरायला मदत करतं....बाकी मी सुरांकडून यापेक्षा काही मागतही नाही....
      टाळ्यांसाठी आभार..... :)

      Delete
  10. Hats Off!!!

    रच्याक, सेलिब्रिटी सारेगम नुकतेच संपले गो पण इंडियन आयडॉल सुरू होत आहे. ईनफॅक्ट auditions सुरू आहेत. Wanna Try???

    ReplyDelete
    Replies
    1. नाही रे....आता जरा नव्या पिढिला संधी द्यावी म्हणते...:)
      पण सेलेब्रिटी ब्लॉगरचं एखादं सारेगम काढायचं का?? आपण सगळेच स्वघोषित सेलेब्रिटी बनून आपापले गळे साफ़ करून घेऊया...:)

      Delete
    2. नको बाबा. माझा नरडा फार कर्कश आवाज काढील. तुम्ही गा, आम्ही श्रोते वर्ग सांभाळतो :D

      Delete
    3. :)
      सगळे माझ्यासारखे दिग्गज असतील तर श्रोत्यावर्गाला खरंच सांभाळावं लागेल..नाहीतर पळून जातील ते... :)

      Delete
  11. Replies
    1. ब्लॉगवर आवर्जून आल्याबद्दल आभार्स रे राफ़ा...

      Delete
  12. नशीब थोर म्हणून ही संधी आपणास मिळाली व तिचे आपण सोने केले .

    ReplyDelete
    Replies
    1. निनाद आभार. तू मला "तू" म्हटलंस तरी चालेल. :)
      आणि हो खरं सांगायचं तर संधी मिळाली हेच..कारण त्याच भेटीत आता अमेरिकेला यायला कंटाळा येतो असं श्रीधरजी म्हणत होते. वयानुसार प्रवास आणि मग अंतर्गत प्रवासाची दगदग इ.इ. आता त्यांनी यावं असं कितीही वाटलं तरी माहित नाही पुन्हा कधी भेट होईल ते...त्यामुळे मी यावेळी सुदैवीच ठरले.

      Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.