सध्या सगळीकडे दिलाची चर्चा सुरु झालीय. फेब्रुवारीमध्ये जर दोघांचा एकत्र फोटो टाकला नाही तर फाऊल मानला जातो म्हणून एक दिवस आधीच आमचा फोटो प्रोफाईलला लावायचं प्रथम कर्तव्य मीदेखील पार पाडलंय. पण यार हे एक दिवसाचं आणि एकाच प्रकारचं प्रेम वगैरे मानणारी माझी पिढी नाही.
भटकंती हे माझं खरं प्रेम आहे (एकटीने आणि त्याच्याबरोबर देखील :) ). एकेकाळी (म्हणजे अगदी मागच्या वर्षापर्यन्त) फिरस्तेगिरी करता करता खरेदी हे पण एका बाजूला प्रेमाने करत होते. आता अचानक विरक्ती वगैरे आली नाही पण काही कारागीर जी काही कला निर्माण करून ठेवतात, त्याला आपण कितीही पैसा दिला तरी त्यांची बिदागी देऊ शकत नाही असं काहीवेळा वाटायला लागलं. अशावेळी एक मधला मार्ग मिळाला तो म्हणजे त्यांच्या अनुमतीने त्या कलेचे फोटो काढायचे आणि शॉपिंग वगैरे करायचं वारं शिरलं तर सरळ फोटो पाहत बसायचं.
आज असेच जुने फोटो पाहताना आमच्या पहिल्या अलास्का फेरीमध्ये एका बंदराला जहाज लागलं तिथे एक छोटी टूर केली होती त्यातल्या एका थांब्याजवळ एक कलादालन होतं. तिथे मिळालेले हे काचकलेचे काही नमुने. हे संपूर्ण दुकानच घेऊन घरी जावं इतके सुंदर आकार आणि रंग त्यांच्याकडे होते. नंतर आमच्या ओरेगावच्या समुद्रकिनारी ग्लास ब्लोईंगचं प्रात्यक्षिक पाहताना हे महाकठीण काम आहे हे लक्षात आलं.
तर अशी ही कला आपण काय पैसे देऊन विकत घेणार? त्या गरम भट्टीत डोकं थंड ठेवून काम करणाऱ्या कलाकारांसाठी व्हेलेंटाईन दिवसही कामाचा असणार. मी मागे एक काचेची बाटली पुन्हा चेपवून त्यावर मणी वगैरे लावून सजवलेलं ताट विकत घेतलं होतं; जे घरच्या साफसफाईत तुटलं. त्यानंतर मी मनमोकळेपणाने अशा चित्रांचा आधार घेते. यात एक ट्रेनचं एक अतिशय सुंदर ग्लास मॉडेल सहाशे डॉलरला पाहिलं तर मी फोटो का काढते हा प्रश्न कुणी मला नक्कीच विचारणार नाही. हजारो ख्वाहिशें मधली ही स्वतः ग्लास ब्लो करायची ख्वाईश ते प्रात्यक्षिक पाहिल्यावर लगेच विरून गेली हे वेगळं सांगायला नकोच.
तर माझ्या काचेवरच्या प्रेमाखातरची, प्रेमदिवसाच्या निमित्ताने आठवलेली ही चित्रगंगा. आखिर कांच पे दिल आ ही गया. यंजॉय :)
#Aparna #FollowMe