Showing posts with label स्त्री जन्मा. Show all posts
Showing posts with label स्त्री जन्मा. Show all posts

Tuesday, April 14, 2020

गाणी आणि आठवणी २३ - एकला चॉलो रे

"कहानी" चित्रपट जेव्हाकेव्हा नेटफ्लिक्सवर आला तेव्हाच पाहिला. सर्वच चित्रपट एका बैठकीत पहिले जात नाहीत.पण हा मात्र अपवाद निघाला. जसजशी ही कहाणी पुढे जाते तस लक्षात येतं की यातली मुख्य भूमिका करणारी विद्या बालन, तिचं भूमिकेतलं नावही विद्याच आहे, ही गरोदर विद्या आपल्या हरवलेल्या नवऱ्याला शोधायला एकटीच पुढे जाते. 

तो पोलीस, सात्यकी, तिला मदत करत असतो पण जेव्हा तिला कळतं की हाही IB च्या दुसऱ्या अधिकाऱ्यांसाठी आपला वापर करतोय, तेव्हा मनाने उध्वस्थ होऊन ती गेस्टहाऊसवर परत येते आणि अमितजींचा धीरगंभीर आवाज आपल्या कानी येतो. 



"जोडी तॉर डाक शूनी केउ नाsss अशी एकला चॉलो रे"

जर कुणीच तुझी दखल घेत नसेल तर एकट्याने चालत रहा  

इथून पुढे ही तिची लढाई ती एकटीनेच लढते आणि संपवतेही. लाल-पांढऱ्या साडीतली बिद्या, इतर तशाच साड्या नेसलेल्या बायकांमधून वाट काढत जाणारी, गर्दीतही एकटी असणारी बिद्या बागची. शेवटाला आपल्याला अमिताभच्या धीरगंभीर आवाजात पूर्ण गाणं ऐकायला मिळतं. त्यावेळी जाणवतं की "कहानी"मध्ये गाणीच नाहीत. चित्रपट संपताना आलेल्या या गाण्याचा इफेक्ट वेगळा. समोरून श्रेयनामावली झळकत असते आणि आपण या संपलेल्या युद्धाचा किंवा काही वेळा आपण आपापली युद्ध एकेकट्याने लढून कशी जिंकता/संपवता येईल त्याचे आत्मपरीक्षण करत असतो. 

रवींद्रनाथांनी १९०५ मध्ये बंगालच्या फाळणीच्या वेळी लिहिलेलं काव्य २०१२ मध्ये आलेल्या "कहानी"साठी आणि आता कोविडने घातलेल्या धुमाकुळासाठी ही समर्पक आहे. चित्रपटातलं गीत मूळ गीत आहे असं पकडलं तर एकच कडवं हिंदीमध्ये आहे. म्हणजे रूढार्थाने मला तेवढंच नीट कळलं पण संगीताला शब्दांची भाषा नसते. अमितजींचा आवाज हे गाणं आणखी धीरगंभीर करतो. जीवनाकडे वेगळ्या दृष्टीने पाहायला शिकवतो. मला जेव्हा हतबल झाल्यासारखं वाटतं तेव्हा मी हे गाणं ऐकते. 

जब काली घटा छाये, 
ओ रे ओ रे ओ अंधेरा सच को निगल जाए
 जब दुनिया सारी डर के आगे सर अपना झुकाये, 
जब दुनिया सारी डर के आगे सर अपना झुकाये, 
तू शोला बन जा जो जल के जहान को रोशन कर दे


हे जे संकट, आपण सर्वांवर आलं आहे त्यामुळे मी तरी अंतःर्मुख झाले आहे. आता एकट्याने चालताना काही विचार आपसूक येतात. सगळीकडे कोरोनाच्या प्रतापामुळे सगळी लोकं घरात राहू लागली तेव्हा काय करायचं याचा पत्ता बरेच जणांना नसावा. ज्यांची कामं घरून सुरु आहेत त्यांना काम हाच विरंगुळाही झालाय पण ते असो की नसो आपल्याकडे जादा वेळ आहे आणि तो आपण सत्कारणी लावू शकतो ही भावना तितकीशी लक्षात आली नाही. 

रवींद्रनाथ म्हणताहेत "तू शोला बन जा", काय करू शकतो आपण? रक्तदान, आर्थिक दान, शेजारचा कुणी आजारी/वृद्ध असेल तर त्याचं वाणसामान त्याच्या दरवाज्यापाशी आणून पोहोचवणे, आपलं कुणी एकटं राहत असेल त्यांना फोन करून आधार देणे हेही "शोला" बनवायला मदत करतील. अर्थात स्वतःची काळजी घेणे हेही तितकेच महत्वाचे. आपण काय करताय? 

आजकाल चालताना खरंच कुणी जास्त दिसत नाही त्या वाटेवरचा हा एक फोटो. 



सध्याच्या वातावरणात थोडे फार मन दुःखी/निराश करणारे विचार येणं साहजिक आहे. तेव्हा हे गाणं ऐकून पहा. ते तुम्हाला एकट्याने पुढे चालायची ताकत/विचार नक्की देईल. एकला चॉलो रे, हेच गाणं श्रेयाच्याही आवाजात आहे, नक्की ऎका




#AparnA #Followme



Wednesday, March 8, 2017

ती आणि मी

जसजसं वय वाढतंय तसतसं काम करायची शक्ती वाढावी म्हणून जमेल तसं जिममध्ये जायचा मी प्रयत्न करत असते. जेव्हा सकाळी कामावर लवकर उठून जावं लागे तेव्हा घरची जबाबदारी बाबावर टाकून अगदी सहा वाजतादेखील मी तिथे दाखल झाली आहे. अशावेळी जायचा मुख्य फायदा म्हणजे जवळजवळ कुणीच आलेलं नसतं. आपली गाण्याची प्लेलिस्ट मोठ्याने लावली तरी डोळे मोठे करणारं कुणी नसणार असतं. किंवा शांततेनं दिवसाची सुरुवातही करता येते.

माझ्या वेळेत थोडंफार इथं तिथं होई. पण बरेचदा माझं आटपेस्तो एक तीन चार जणींचा ग्रुप धावून परत लॉकर रूममध्ये मला भेटे. माझी त्यांची ओळख हाय हलोच्या पुढेही गेली. पाश्चात्य देशात लॉकररूममध्ये दिगम्बर अवस्थेत या ग्रुपला पाहताना मला खर तर आता नजर मेल्यामुळे म्हणा किंवा इतका व्यायाम केल्यावर थोडा वेळ असाही काढला म्हणून काय त्यात याची सवय झाली असल्यामुळे म्हणा काही गैर किंवा लाजिरवाणं वगैरे वाटत नाही. उलट आपल्या शरीराला इतकं आपलंसं म्हणून सहज वावरणाऱ्या या बायका मला  योग्य वाटतात.
माझ्याशी त्यांच्यातली एक नेहमी बोले. नेहमीचंच रुटीन बोलणं पण तिने मला तिथे त्या पाचेक मिनिटात एकटं पडू दिलं नाही. आम्ही सर्व त्या क्षणापुरता एकमेकींच्या मैत्रिणी होत असू. या मैत्रीला आणि आम्हाला नावाची गरज नसे.

मागच्या वर्षी मी मध्ये एक वेगळं जिम सुरु केलं होतं. तिथला योगाभ्यास मला आवडत असे फक्त हे जिम थोडं महाग होत आणि नंतर कॉस्ट कटिंगच्या आमच्या दिवसात आम्ही पुन्हा जुन्या जिमवर सेट झालो. तर तिथे एका योग करताना मला "ती" दिसली. साधारण ५५ च्या आसपास वय असेल पण शरीरयष्टी कमनीय आणि योग करतानाचा फिटनेसही अगदी बरोबर. आम्ही हसलो पण तिने नक्की मला ओळखलं का हे मला माहीत नव्हतं. तसंही येत जात कितीतरी अनोळखी व्यक्ती सहजगत्या हाय करून जातात म्हणा.

मग माझं ते जिम सुटलं आणि सकाळी जिमला जायची वेळी मी थोडी उशिरा केली म्हणजे मुलांबरोबर वेळ मिळेल. त्या दिवशी मी थोडी लवकर आणि "ती" थोडी उशिरा असा एक योगायोग आला. मग मी तिला त्या जुन्या जीबद्दल विचारून माझा जुना प्रश्न निकालात काढला. तिने मला तिथेही ओळखलं होत आणि तिनेही काटकसर करायच्या दिवसात ते जिम सोडून दिलं होतं. आज त्यांचा मोठा ग्रुप नव्हता आणि लॉकर रूममध्ये आम्ही दोघीच होतो.

तिला बोलताना दिगंबरावस्थेत जास्त मोकळं वाटत असावं त्यामुळे बोलता बोलता ती माझ्या जवळ आली आणि माझे डोळे एकदम उघडले. तिचे दोन्ही स्तन रोपण केलेले होते. जगाचं आणि बरेचदा स्त्रीचं सुद्धा ज्या अवयवामुळे जास्त लक्ष वेधलं असतं तिला ते नव्हतंच. ते स्वीकारून तिने ज्या उमेदीने बाकीच्या शरीराच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केलं होतं त्याला मी मनातल्या मनात सलाम केला.

याआधी या संपूर्ण गृपबद्दल वाटणारा अभिमान आज काकणभर जास्त वाढला. अशा कितीतरी स्त्रिया ब्रेस्ट कॅन्सरशी सामना करत असतील आणि तरी आपलं रोजचं रुटीन टिकवत असतील. त्यांनी शरीर झाकलं की आपण त्यांना नॉर्मलच समजून त्यांच्याशी वागतो, तुलना करतो. कधीतरी आपण कपड्याआतली त्यांची वेदना पहिली तर त्यांचे हसरे चेहरे आपल्याला बरंच काही शिकवून जातील.


आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त  "ती" आणि अशा अनेक स्त्रियांना माझे कोटी कोटी प्रणाम.
 

Sunday, March 8, 2015

भय इथले....

आवडतं मला माझं स्त्री असणं. त्यामुळे मला काही खास वागणूक मिळावी असं कधी म्हणावंसं वाटत नाही; पण त्यामुळे संधीही नाकारल्या जाऊ नयेत इतकी माफक अपेक्षा मात्र आहे. माझ्या आई वडिलांनी मला मोठं करताना केलेल्या कष्टांची जाणीव मला आहे. म्हणून त्यांची काळजी घेणे, ही जबाबदारी मी दुसरा कुणी पुरुष आहे म्हणून त्याच्यावर ढकलणार नाही. त्याच प्रमाणे माझी मुलं, माझा संसार ही माझीदेखील तितकीच जबाबदारी आहे, याची संपूर्ण जाणीव मला आहे. त्यामुळे माझ्या व्यावसायिक जीवनात काही तडजोडी केल्या तरी ती जबाबदारी झटकून त्या कर्त्या पुरुषावर ब्रेड/बटर साठी मी विसंबून राहणार नाही. त्यासाठी जितके कष्ट तो उपसतोय तितकेच मीही करतेय. त्याची जाणीव मला आहे फक्त माझ्यासारख्या अनेक अशा झगडणाऱ्या स्त्री असतील ज्यांना हे असं सगळं वागण्याबद्दलची जी पोचपावती नेहमीच मिळत नाही, हे मात्र मला खटकतं. कोणी कितीही नाकारली तरी ही वस्तूस्थिती आहे. 

शंभरात अशी एक तरी व्यक्ती असते जी कुठून तरी अचानक उगवते, ज्यांचा तुमच्या रोजच्या संघर्षाशी काही संबंध नसतो पण तुम्ही स्त्री आहात म्हणून एखादा शेलका अभिप्राय मारून ते तुमची उमेद खच्ची करण्याचं त्यांचं काम करत असतात. बाकीच्यांचं माहित नाही पण मला अशी शेलकी माणसं भेटली की उमेद उलट वाढते आणि अशांच्या अज्ञानाची कीव येते. 


स्त्रीला कमी लेखणं हे असं सुरु होतं. मग कधीतरी त्यातली एखादी सगळ्यांच्या तावडीत सापडते. तिचा गुन्हा हा असतो की तिने तिच्या जोडीचे पुरुष जसे निर्भयपणे वागतील तसं किंवा त्याच्या जवळ जाणारं काही छोटं कृत्य केलं असतं. पण आता ती मिळालीच आहे तर तिला सगळ्यात पहिले उपभोगून, तिची विटंबना करून मग वर तिचीच चूक कशी आहे किंवा पुन्हा असं झालं तर तिला कसं वागवलं जाईल याच्या सार्वत्रिक धमक्या दिल्या जातात. 

आज जागतिक महिला दिन आहे  तर त्यानिमिताने मी माझाच ब्लॉग वाचला तर मला  पुन्हा एकदा लक्षात येतं की स्त्रीला भोगवस्तू म्हणून वागवण्यात जगात सगळीकडे अहमहमिका लागलीय. मग ती ८३-८४ मध्ये इराणमध्ये अडकलेली बेट्टी असो नाहीतर आता २०१० मध्ये सुटका केलेली पण आपलं १९ वर्षाचं आयुष्य हरवलेली जेसी असो. आपल्या देशातली तर अनेक प्रकरणं "त्या" एका प्रकरणानंतर बाहेर आली आहेत. उदाहरण शोधायला आपण शोधू आणि सगळीच उदाहरणं काही नकारात्मक आहेत असं नाही पण जेव्हा आपण एकविसाव्या शतकातले म्हणवून घेतो, या काळाच्या प्रगतीची उदाहरणे देतो तेव्हा आपली मानसिक प्रगती तपासली तर त्याबाबतचं चित्र फार काही बदललं आहे असं नाही आहे. 

नेहमी काही तावडीत सापडून तुमची विटंबना होणार नसते तर तुम्ही स्त्री आहात म्हणून तुमचं पाऊल मागं खेचणारी एखादी तरी व्यक्ती, संधी मिळेल, तशी तुमच्या आयुष्यात येत असते. त्यामुळे एकुणात भय इथले संपत नाही हे कटू असलं तरी सार्वत्रिक सत्य आहे. 


ता.क. - ही पोस्ट त्या नराधम विचारांशी सामना करणाऱ्या प्रत्येक स्त्रीसाठी आहे. हे विचार कधी आणि कसे बदलले जातील याबद्दल आता काहीही बोलणं कठीण असलं तरी ही परिस्थिती बदलावी अशी फक्त स्त्रियाच नाही तर बऱ्याचशा पुरुषांचीदेखील इच्छा आहे. या सगळ्या अंधारात आशेचा हाच एक काय तो किरण.