Tuesday, April 14, 2020

गाणी आणि आठवणी २३ - एकला चॉलो रे

"कहानी" चित्रपट जेव्हाकेव्हा नेटफ्लिक्सवर आला तेव्हाच पाहिला. सर्वच चित्रपट एका बैठकीत पहिले जात नाहीत.पण हा मात्र अपवाद निघाला. जसजशी ही कहाणी पुढे जाते तस लक्षात येतं की यातली मुख्य भूमिका करणारी विद्या बालन, तिचं भूमिकेतलं नावही विद्याच आहे, ही गरोदर विद्या आपल्या हरवलेल्या नवऱ्याला शोधायला एकटीच पुढे जाते. 

तो पोलीस, सात्यकी, तिला मदत करत असतो पण जेव्हा तिला कळतं की हाही IB च्या दुसऱ्या अधिकाऱ्यांसाठी आपला वापर करतोय, तेव्हा मनाने उध्वस्थ होऊन ती गेस्टहाऊसवर परत येते आणि अमितजींचा धीरगंभीर आवाज आपल्या कानी येतो. "जोडी तॉर डाक शूनी केउ नाsss अशी एकला चॉलो रे"

जर कुणीच तुझी दखल घेत नसेल तर एकट्याने चालत रहा  

इथून पुढे ही तिची लढाई ती एकटीनेच लढते आणि संपवतेही. लाल-पांढऱ्या साडीतली बिद्या, इतर तशाच साड्या नेसलेल्या बायकांमधून वाट काढत जाणारी, गर्दीतही एकटी असणारी बिद्या बागची. शेवटाला आपल्याला अमिताभच्या धीरगंभीर आवाजात पूर्ण गाणं ऐकायला मिळतं. त्यावेळी जाणवतं की "कहानी"मध्ये गाणीच नाहीत. चित्रपट संपताना आलेल्या या गाण्याचा इफेक्ट वेगळा. समोरून श्रेयनामावली झळकत असते आणि आपण या संपलेल्या युद्धाचा किंवा काही वेळा आपण आपापली युद्ध एकेकट्याने लढून कशी जिंकता/संपवता येईल त्याचे आत्मपरीक्षण करत असतो. 

रवींद्रनाथांनी १९०५ मध्ये बंगालच्या फाळणीच्या वेळी लिहिलेलं काव्य २०१२ मध्ये आलेल्या "कहानी"साठी आणि आता कोविडने घातलेल्या धुमाकुळासाठी ही समर्पक आहे. चित्रपटातलं गीत मूळ गीत आहे असं पकडलं तर एकच कडवं हिंदीमध्ये आहे. म्हणजे रूढार्थाने मला तेवढंच नीट कळलं पण संगीताला शब्दांची भाषा नसते. अमितजींचा आवाज हे गाणं आणखी धीरगंभीर करतो. जीवनाकडे वेगळ्या दृष्टीने पाहायला शिकवतो. मला जेव्हा हतबल झाल्यासारखं वाटतं तेव्हा मी हे गाणं ऐकते. 

जब काली घटा छाये, 
ओ रे ओ रे ओ अंधेरा सच को निगल जाए
 जब दुनिया सारी डर के आगे सर अपना झुकाये, 
जब दुनिया सारी डर के आगे सर अपना झुकाये, 
तू शोला बन जा जो जल के जहान को रोशन कर दे


हे जे संकट, आपण सर्वांवर आलं आहे त्यामुळे मी तरी अंतःर्मुख झाले आहे. आता एकट्याने चालताना काही विचार आपसूक येतात. सगळीकडे कोरोनाच्या प्रतापामुळे सगळी लोकं घरात राहू लागली तेव्हा काय करायचं याचा पत्ता बरेच जणांना नसावा. ज्यांची कामं घरून सुरु आहेत त्यांना काम हाच विरंगुळाही झालाय पण ते असो की नसो आपल्याकडे जादा वेळ आहे आणि तो आपण सत्कारणी लावू शकतो ही भावना तितकीशी लक्षात आली नाही. 

रवींद्रनाथ म्हणताहेत "तू शोला बन जा", काय करू शकतो आपण? रक्तदान, आर्थिक दान, शेजारचा कुणी आजारी/वृद्ध असेल तर त्याचं वाणसामान त्याच्या दरवाज्यापाशी आणून पोहोचवणे, आपलं कुणी एकटं राहत असेल त्यांना फोन करून आधार देणे हेही "शोला" बनवायला मदत करतील. अर्थात स्वतःची काळजी घेणे हेही तितकेच महत्वाचे. आपण काय करताय? 

आजकाल चालताना खरंच कुणी जास्त दिसत नाही त्या वाटेवरचा हा एक फोटो. सध्याच्या वातावरणात थोडे फार मन दुःखी/निराश करणारे विचार येणं साहजिक आहे. तेव्हा हे गाणं ऐकून पहा. ते तुम्हाला एकट्याने पुढे चालायची ताकत/विचार नक्की देईल. एकला चॉलो रे, हेच गाणं श्रेयाच्याही आवाजात आहे, नक्की ऎका
#AparnA #FollowmeNo comments:

Post a Comment

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.