Showing posts with label बालदिन. Show all posts
Showing posts with label बालदिन. Show all posts

Sunday, November 15, 2015

C is for Community ( Not for Competition)

शनिवारची सकाळ. सहा वाजल्यापासून मुलं येऊन सरावाला लागलेली असतात. कदाचित त्यांनी आधी स्पीड स्केट्स घालून सराव केला असेल आणि आम्ही नवाच्या invited only क्लाससाठी पोहोचेपर्यंत त्यांचे इन्डोअर स्केट्स घालायला सुरुवात झाली असेल. आम्हीदेखील पटापटा मुलांच्या पायातले शूज बदलून त्यांना स्केट्स घालायला सुरू करतो. सुरुवातीला जाऊ की नको करणारा माझा सात वर्षांचा मोठा मुलगा एकदा का रिंकमध्ये पोहोचला की तिथलाच होतो. धाकटा, चार वर्षांच्या आसपासचं कुणी नसल्याने टाळाटाळ करायला पाहतो, तोच माझ्या मोठ्या मुलाइतकाच झँडर त्याच्या स्केट्सवरून वार्‍याच्या वेगाने येत "कमॉन, आय अॅम हियर फॉर यू" अशी साद घालून त्यालाही सामील करून घेतो. हे दृश्य आहे आमच्या मागच्या वर्षीपासून नियमित असलेल्या ओक्स पार्क स्केटिंग रिंकमधल्या शनिवारचं.

कोण कोण आहे इथे? या मुलांमध्ये सात वर्षांचा अलेक्झांडर (सगळे त्याला झँडरच म्हणतात) आहे. तो तीनेक वर्षांचा असताना मी त्याला पाहिलं होतं, तेव्हा तो साधं चालण्यापेक्षा स्केट्सवर चांगलं चालतो असं वाटलं होतं. माझ्यासाठी तो आताच स्टार आहे. जसा तो, तशीच पाच वर्षांची सुळूसुळू स्केट्स करणारी हॅडी, एकविसावा वाढदिवस साजरा करण्यासाठी उत्सुक कोर्टनी, मोठी कोण छोटी कोण हे पटकन न ठरवता येऊ शकणार्‍या इव्ह आणि आना या दोघी बहिणी आहेत आणि २०१३च्या जागतिक स्पर्धेसाठी अमेरिकेतर्फे निवडला गेलेला चार्लीसुद्धा आहे. वेगवेगळ्या वयोगटातली वीसेक डोकी - किंवा खरं शरीरं म्हटली पाहिजेत - प्रत्येक शनिवारी एकत्र सरावासाठी / शिकण्यासाठी ओक्स पार्कच्या स्केटिंग रिंकमध्ये येतात.
"आय अॅम प्रिपेरिंग फॉर द नॅशनल्स." "तू इथे यायला शनिवारीसुद्धा पहाटे उठतोस?" या माझ्या प्रश्नाच्या उत्तराला कॉनर्स म्हणाला होता. वर म्हटलं तसं चार्लीने एके वर्षी जागतिक स्पर्धेत अमेरिकेचं प्रतिनिधित्व केलंय. विविध स्तरांवर स्पर्धा होत असतात, त्यात बाकीची मुलंही भाग घेत असतात. म्हणजे म्हटलं तर हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी. मी मात्र दर आठवड्याला सराव करताना पाहते, तेव्हा या शब्दाचा मागमूसही दिसत नाही. एखादी अवघड स्टेप ज्याला जमली, तो दुसर्‍यालाही यावी, म्हणून दिलखुलासपणे मदत करणार.


आजवर बरीचशी अतिशय चांगली माणसं मला योगायोगाने भेटत गेली. त्यातल्या प्रत्येकाने मला काही ना काहीतरी शिकवलं आणि माझी त्या वळणाची जडणघडण होत गेली. माझी या ग्रूपशी दोस्ती ही त्या योगायोगातली आतापर्यंतची सगळ्यात वेगळी घटना किंवा आपण म्हणतो की हे विधिलिखित होणारच होतं, तसं काहीसं.
मला धाकटा मुलगा झाला, तेव्हा माझ्या मोठ्या मुलाला थंडीत कुठे गुंतवावं हा एक प्रश्न होता. त्यात पोर्टलँडची थंडी म्हणजे सूर्यदर्शन अजिबात नाही आणि संततधार पाऊस. त्यामुळे मुलांनी खेळत राहायचं तर काहीतरी इन्डोअर पाहायला हवं होतं. तेव्हा कुणीतरी ओक्स पार्कच्या स्केटिंगचं नाव सुचवलं होतं. त्यात शनिवारी साडेदहाच्या क्लासला एका मुलाच्या तिकिटावर एक पालक फ्री अशी ऑफर होती. ते फुकट आहे म्हणून नाही, तर आमचा मुलगा थोडा बुजरा आहे, त्यामुळे इथे निदान बाबाच्या सोबतीने निदान आत जाईल, या आशेने नवर्‍याने जायला सुरुवात केली.
अगदी सुरुवातीला त्यांना उत्तेजन द्यायला मीही बाळाला स्ट्रोलरमध्ये टाकून जायला लागले आणि आमची ओळख झाली बिलबरोबर आणि त्याच वेळी मी वर उल्लेखलेल्या झँडरला पाहिलं.
या साडेदहाच्या क्लासला आमच्यासारखे हौशे-नवशे पालक त्यांच्या हाफ तिकिटाला घेऊन आणि किती वैट दिवस आहे त्याप्रमाणे स्केटिंग येत असलेले लोक असा बराच गोतावळा असतो. पण तरी बिलचा उत्साह वाखाणण्यासारखा असे. तो प्रत्येकाला स्केटिंग सुरू ठेवावं म्हणून प्रोत्साहित करत असतो. यात त्याचा वैयक्तिक स्वार्थ काहीच नसतो. तो आणि इथे येणारे जवळजवळ सगळेच पोटापाण्याचा आपापला वेगळा उद्योग करून इथे आठवड्याच्या शेवटी किंवा दिवसाच्या शेवटी त्यांचा छंद पुढे न्यायला येतात. त्यात बिलची स्वतःची दोन मुलं इथे शिकतात आणि वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागीपण होतात; म्हणजे त्याने का बरं इतर प्रतिस्पर्धी निर्माण करावेत?
वर म्हटल्याप्रमाणे आम्ही साडेदहाच्या क्लासला जायला सुरुवात केली. बाळाची कामं वाढल्यामुळे मी नंतर त्यातून कटाप झाले. त्यातल्या त्यात ही दोघं नसल्यामुळे थोडा निवांत वेळ मिळाला, हा काय तो माझा फायदा. पण आमच्या बाबाची कसोटी होती. बरेचदा सकाळीच पोराचं स्केटिंग आवडत नाही वगैरे सुरू होई, कधीमधी दांड्या मारणंही सुरू होतं. पण तरी नेटाने किल्ला लढवून स्केटिंग सुरू ठेवलं. केव्हातरी दादा जातो म्हणून धाकटा, "मलापण स्केटिंग करायचं आहे" म्हणून मागे लागला. त्याला नेलं, तेव्हा सुरुवातीला बेबी स्केट्स दिले, ते त्याला नको होते. त्यामुळे तिकडे थोडी लोळालोळी झाल्यावर पुढच्या वेळी विचारू म्हणून वेळ मारून नेली. पण या साहेबाला नको इतकं लक्षात राहतं. त्यामुळे पुन्हा तेच. बरं नेहमीचे स्केट्स दिले तर त्यावर तोल सांभाळताना मला बाजूला धरावं लागे. त्यामुळे रिंकच्या बाजूला एक रिंगण आहे, तिथे आम्ही दोघं एकत्र चकरा मारतोय असं दृश्य. तेही नाही म्हटलं तरी इतरांना थोडं अडखळवू शकतं, म्हणून मग आम्ही दोघांनी ब्रेक घेतला. आता बाकी काही नाही, पण बाबाला स्केट्स घालून तोल सांभाळता येणं आणि एक गोल चक्कर मारणं इतकं येऊ लागलं होतं. त्यामुळे मुलालाही तो मदत करू शकत होता. त्यामुळे पूर्वीसारखं दांड्या मारण्याची संख्या कमी झाली होती. मोठा आपल्या स्केट्सवर उभं राहू लागल्यावर साडेदहाच्या क्लासला धाकट्यालाही सुरू केलं.
याच दरम्यान मी नोकरी बदलली आणि माझी टिफनीशी ओळख झाली. आमच्या दोघींचा साहेब एक आणि कामाचं स्वरूप थोडं वेगळं. ती तेव्हा माझ्या पुढच्या क्यूबला बसायची. त्यामुळे आमच्या कधीतरी व्यक्तिगत गप्पाही होत. एकदा "शनिवारी काय करता?" या प्रश्नाच्या उत्तराला "स्केटिंग" ऐकून ती उडाली. कारण त्याच स्केटिंग रिंकमध्ये ती लहानपणापासून स्केटिंग शिकली आणि आता तिच्या मुली तिथे शिकतात, शिवाय दर एक महिना आड ती स्वतः तिथे स्वयंसेवक म्हणून कामही करते. त्या वेळी आमच्या तिथल्या काही अडचणी पाहून तिने मला साडेदहाऐवजी दुपारी एकचा क्लास कर म्हणून सल्ला दिला. आमच्या नशिबाने तो तिचा तिथला कामाचा महिना होता. त्यामुळे तिने आम्ही गेल्यावर तिथल्या तमाम प्रशिक्षकांशी आमची गाठ घालून दिली. शिवाय आईची ऑफिसमधली मैत्रीण इकडे आहे म्हणून का काय माहीत नाही, पण मुलांनीदेखील अचानक सहकार्य दिलं. त्यात त्या क्लासमध्ये अजून धडपडत असणार्‍या धाकट्याने दादाच्या वयोगटात घुसखोरीही करून झाली.
एकचा क्लास साडेदहापेक्षा कमी गर्दीचा, कदाचित मुलांबरोबर एक पालक फुकट नसल्यामुळे किंवा वेळेमुळे, पण त्यामुळे मुलांकडे जास्त लक्ष पुरवलं जाई आणि साडेदहाला अगदी बेसिक स्केटिंग शिकवलं जाई, तर इथे थोडं पुढे - म्हणजे backwards किंवा एक पाय मागे सरळ करून वगैरे अशा थोड्या पायर्‍या वाढवल्या होत्या. या वेळी आमची ओळख झाली ती एमीबरोबर.

एमीचे तीन मुलगे इथे स्केटिंग शिकतात. वर उल्लेख केलेला चार्ली तिचाच मोठा मुलगा. या तिघांनाही स्केटिंग करताना पाहणं म्हणजे तळ्यात मासे जसे सुळकन इकडे तिकडे फिरतात, तशी ही पूर्ण स्केटिंग रिंकमध्ये सुळसुळत असतात. एमीच्या मते मुलगे सूचना पाळायला फार टाळाटाळ करतात, पण तुमचा मुलगा फार छान ऐकतो.. हे अर्थातच आम्ही कधी अनुभवणार म्हणा:) तर तिने त्याच्याकडे नेहमी लक्ष दिलं आणि साधारण तीनेक महिन्यात ती, "हवं तर एकच क्लास सुरू ठेवू शकता, नाहीतर मोठ्याला सकाळी नऊला एक invited only क्लास आहे त्याला मी घेईन", असं क्लास संपताना म्हणाली.
यात आमचा प्रश्न हा होता की आता आम्ही दोघं मुलं एकतरी खेळ एकत्र खेळायला शिकतील म्हणून रस दाखवत होतो. पण धाकटा अजून चार असल्याने तेवढं काही स्केटिंग शिकला नव्हता. त्यामुळे त्याला नऊच्या क्लासमध्ये प्रवेश देता आला नसता. मग एमीने त्याच्यावरही उपाय काढला. ती म्हणाली, "तुमच्या दोघांनाही सकाळीच आणा."
मोठा क्लासमध्ये असेल तेवढा वेळ धाकट्याला तिथेच कुणी तरी बेसिक शिकवत. बाबालाही स्केट्स देऊन त्यानेही मुलांबरोबर सक्रिय असावं हेही पाहिलं. बाबा आतापर्यंत बर्‍याच क्लृप्त्या शिकला, हे वेगळं सांगायला नकोच. हा क्लास संपला की तुम्हाला हवं तर साडेदहाच्या क्लासमध्ये थांबून सराव करता येईल, ही सोयही होतीच.



तसं माझ्या मुलाचं स्केटिंग बरं होतं; पण अर्थात आता ज्या मुलांबरोबर त्याला शिकायचं होतं, ती बहुतेक सर्व एकतर स्केटिंग करणार्‍या कुटुंबातली असल्यामुळे अगदी लहानपणापासून क्लब करत होती, शिवाय ते आठवड्यात इतर दिवशीही येऊन सराव करून जात. आणखी एक म्हणजे त्यांनी हे वर्षानुवर्षे करायचं ठरल्यामुळे त्यांनी यात गुंतवणूक केली होती. म्हणजे स्पष्ट सांगायचं, तर त्यांची स्केटिंग किट्स अतिशय अद्ययावत आणि आपल्या मध्यमवर्गीय भाषेत सांगायचं तर महाग होती. ती महाग असण्यापेक्षा कुठल्याही खेळात जसं तुम्ही योग्य आयुधं वापरलीत तर तुमचा परफॉर्मन्सदेखील चांगला होतो, तो नियम स्केटिंगसाठीदेखील लागू होतोच. तर सांगायची गोष्ट, आम्ही सुरू केलं आणि दोनेक सेशननंतर कुणीतरी माझ्या मुलाच्या पायाची साइज तिच्या मुलाच्या जुन्या स्केट्सच्या साइजशी जुळेल असा अंदाज करून टिफनीकडे ते स्केट्स देऊन गेली. ती माउली कोण हे मला आजतागायत कळलं नाही. ते स्केट्स वापरून इतकं हलक्याने जाता येतं, हे मुलाच्या लक्षात आल्याने आता इथे आपल्याला स्वीकारलंय हे त्याच्या लेखी जास्त अधोरेखित झालं आणि शनिवारी उठण्यातला त्याचा रस अचानक वाढला. बिलकडे सहज चौकशी करता हे स्केट्स निदान सहाशे डॉलर्सचे असतील असं तो म्हणाला. अर्थात तो स्वतःच म्हणाला की या वयात त्यांचे पाय मोठे होणार असतात, तेव्हा प्रत्येक वेळी नवेच स्केट्स घ्यायला पाहिजेत असं नाही. बाकीची मुलंही जुने स्केट्स वापरतात आणि नवे स्केट्स असतील तर पायाला सराव व्हायलाही वेळ जातो.
नेमकं आम्ही सकाळचं सेशन सुरू केलं, त्या वेळी एमी, अॅबी आणि बिल तिघं मिळून या मुलांचा एक स्प्रिंग शो बसवत होते. त्यात आमच्या मुलांनादेखील घेतलं. सुरुवात शोची गाणी बसवायच्या वेळच्या मस्तीमुळे झाल्यामुळे माझी मुलं या नवीन मुलांमध्ये कधी रुळली ते कळलंच नाही. शिवाय माझ्या धाकट्या मुलाला वगळलं जातंय असं होऊ नये, म्हणून त्याला जमेल असंदेखील बसवलं. त्यामुळे इतर वेळी मला रिंकमध्ये जायला मिळत नाही ही धाकट्याची रडारड बंद झाली.
या शोनंतर पुन्हा जेव्हा नेहमीचा सकाळचा क्लास सुरू झाला, तेव्हा माझ्या मुलासमोर आधीपासून हा क्लास आणि खरं सहा वाजल्यापासून येणारी ही मुलं स्केटिंगमध्ये बरीच पुढे होती हे सहज लक्षात येत होतं. त्यालाही ते मी आधीच सांगितलं होतं. पण त्याला काही येत नसेल तर त्याच्याबरोबर करणारं कुणी न कुणी तरी तिथे असे आणि मला जास्त येतं तर मी का कमी येणार्‍याबरोबर करू.. किंवा हाच माझ्याशी पुढे जाऊन काँपीट करायला लागला तर.. अशा विचारांना तिथे थारा नव्हता.
एकदा एमीबरोबर बोलताना ती चार्लीबरोबर जेव्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी गेली होती, याची चर्चा माझ्याबरोबर करताना ती सहज म्हणाली की तिथे भारताचेही स्पर्धक होते आणि त्यांना स्केटिंग करताना पाहताना कळत होतं की त्यांना अजून ट्रेनिंगची गरज आहे. आम्ही मध्ये वेळ होता तेव्हा त्यांना काही टिप्स दिल्या. "I wish I could have spent some more time with them. I know its hard to get the kind of infrastructure we need for this game". तिच्या या वाक्यात खेळाची आवड जास्त दिसते. त्यामुळे ती सतत इतरांना प्रोत्साहन देत असते. जरी ट्रेनिंगसाठी तुम्ही क्लब मेंबरशिप वगैरे घेऊन करणं जास्त योग्य आहे, तरी आमच्यासारखे अल्याड-पल्याड असणारे लोक वेगळे पडू नयेत, म्हणून नऊच्या क्लासला आम्हाला आमंत्रित केलं जातं. आमच्याबरोबर मुलगी होती, तिची प्रगती पाहून तिलाही एमीने बोलावलं होतं. पुढच्या महिन्यात थॉमसला आणलं आणि तीनेक महिन्यांनी झालेल्या रिजनल्सला पदक मिळालं. आता तो नियमित क्लब करतो.


मला खात्री आहे, अशी अनेक उदाहरणं असतील. यातली बरीच मुलं स्पर्धक म्हणून एकमेकांसमोर उभी ठाकतील यात शंकाच नाही. पण जेव्हा ती सगळी एकत्र सराव करतात, त्या वेळी मात्र ही एक टीम, एक कम्युनिटी असते. आपल्या या मोठ्या टीममधल्या कुणाला काही अडचण असेल तर आपण मदत केलीच पाहिजे, ही भावना यांना वेगळी शिकवावी लागली नाही, असं दिसतं. जो नवा असतो त्याला कुणीतरी मदत करतं, मग हा नवा थोडा अनुभवी झाला की तो पुढच्या नवख्याला मदत करायला तयार होतो. हे चक्र असंच सुरू राहतं.

मागे म्हटलं तसं अशी माणसं, असे मित्र-मैत्रिणी मला मिळाल्याचं समाधान मला वाटतं. इथे ते यासाठीदेखील की मी फार काही न करता मदत करायचा हा वसा माझी मुलंही घेतील. त्यांनी एकंदरीत याच स्पर्धांमध्ये उतरलं / नाही उतरलं, तरी तसा काही फरक पडत नाही. त्यांना अंग सोडून स्केट्सवर गिरक्या घेताना पाहणं जितकं सुंदर वाटतं, तितकंच भरून येतं त्यांना तोल सावरायला मदत करायला कुणीतरी बाजूला आलं की आणि त्यांनीही कुणाच्या तरी खांद्यावर हलके हात ठेवून एकत्र गरगर फिरताना.
आजकाल शुक्रवारपर्यंत कितीही दमलं, तरी जेव्हा शनिवारी मुलं स्केटिंगला जायचं म्हणून आनंदाने लवकर उठतात, तेव्हा आम्हीही आपसूक तयार होतो. इथे स्पर्धा नसायलाच हवी असं काही नाही. पण थोडं कम्युनिटी म्हणून मदतीचीदेखील अपेक्षा करणं चुकीचं नाही. हे छोटे छोटे हात मोठे होताना त्यांच्या मनात हा मदतीचा भाव रुजतोय, हेही तितकंच महत्त्वाचं आहे.
आज बालदिन आहे. त्या निमित्ताने आमच्या मागच्यावर्षीच्या स्केटिंग शो मधला लहान मुलांनी सादर केलेल्या गाण्याचा एक विडीओ इथे देत आहे.  मग आपणही आपल्या लहानग्यांना स्पर्धेच्या तयाऱ्या करतानाच थोडी समुह भावना वाढीला लागावी म्हणन प्रयत्न करणार का? बालदिनाच्या शुभेच्छा. 

हा लेख मिसळ पाव या संस्थळाच्या दिवाळी अंकात प्रकाशीत झाला आहे. त्यासाठी मिपाचे आभार :) 

Thursday, November 14, 2013

त्यांचाही बालदिन

माझ्याकडे अगदी मी शाळेत असल्यापासून लहान मुलांचा ओढा जास्त आहे. शेजारची बाळं आमच्या घरी सतरंजीवर टाकून त्यांच्याशी बोबडं बोलत खेळायला मला मजा वाटे. मग मी दहा वर्षांची असताना मला एक मावसबहीण झाली. मी स्वतः  माझ्या घरात शेंडेफळ असल्याने हे हक्काचं लहान भावंड मिळाल्याचा आनंद मी मनसोक्त घेतला. ती मावशी पण तशी जवळच्या गावात राहत असल्याने तेव्हा जास्तीत जास्त शनिवारी दुपारी शाळा सुटली  की चार आण्याचं हाफ तिकीट काढून जायचं आणि रविवारी दुपारी परत निघायचं असा एक पायंडाच पाडला होता. 


मग माझ्या भाचेकंपनी बरोबर ती चार साडेचार वर्षांची असेपर्यंत माझं लग्नही व्ह्यायचं होतं तोवर खूप मजा करून घेतली. आताही ती मला नावाने हाक मारतात म्हणून मावशी आत्यापेक्षा आमचं नातं जास्त जवळचं आहे. माझी मुलं त्यामानाने माझ्या रागाची देखील धनी होतात. म्हणजे आता हे लिहिताना मला असं लक्षात आलं की मला आवडलेल्या, मी खेळलेल्या इतर मुलांवर मी शक्यतो ओरडणे, रागवणे हे प्रकार सहसा केले नाहीत पण दिवसभरात एकदाही मी माझ्या मुलांवर रागावले नाही अस शक्यतो झालं नाही. असो खर मला आजच्या बालदिनी हे सगळं लिहायचंदेखील नव्हतं. 

गेले काही दिवस फिलिपिन्समधल्या टायफूनच्या बातम्या आपण वाचतोय. त्यासंदर्भात आज एक विस्तृत ईपत्र एच आरतर्फे आलं. त्यात तिकडच्या मुलांचा उल्लेख होता. त्यांचे जवळचे नातेवाईक हरवलेत, त्यांच्या शाळादेखील असून नसल्यागत झाल्यात आणि हे सर्व ज्या वयात त्यांना सामोरं जायला लागतंय म्हणजे खर तर नियतीने केलेला अन्यायच म्हणायला हवं. 
अर्थात निसर्गापुढे माणूस खुजाच. पण आजच्या बालदिनाच्या निमित्ताने आपण अशा काही मुलांना त्यांच्या उर्वरित भविष्याची तरतूद म्हणून काय करायला हव यासाठी त्या मेल मध्ये एक साईट होती तिची लिंक आहे  savethechildren.org
तुम्हाला आणखी काही साईट्स माहित असतील तर तर त्या नक्की कळवा. आजच्या बालदिनी आपण जसा आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करत असाल तसाच याही मुलांचा करुया. 

आणि हो बालदिन म्हटलं म्हणजे आपल्या मुलांबरोबरची मजा तर घायलाच हवी. तुम्ही काय केलतं माहित नाही आम्ही आमच्या १४ च्या रात्री तिकडे आमच्या देशातला आमचा क्रिकेटचा देव, याच्या घरात जायला आम्हाला संधी मिळाली, ज्याला मागच्या रणजीमध्ये वानखेडेला पाहायला आम्हाला संधी मिळाली आणि आज तो त्याचा शेवटचा सामना खेळतोय , त्या सामन्यातली त्याची खेळी आमच्या मुलांबरोबर एन्जॉय केली. आमच्या बच्चेकंपनीने त्याचे पन्नास होताना केलेला जल्लोष. या लिटील मास्टरला माझ्या घरचे लिटील मास्टर्सपण खूप मिस करणार. 
बालदिनाच्या शुभेच्छा. 



Wednesday, November 14, 2012

गानसंस्कार


आमच्या घरात सकाळी साडे पाचला आई-बाबा उठत आणि साधारण सहाच्या आसपास रेडिओ सुरू होई.सकाळी आठेक वाजेपर्यंत म्हणजे ती राजाभाऊंची श्रुतिका होईपर्यंत मराठी आणि मग हिंदीची बारी.नंतर मग संध्याकाळी पुन्हा ’सांजधारा’ आणि त्यानंतर ’फ़ौजी भाईको की फ़र्माईश’ ते मग रात्रीचं बेला के फ़ूल’ पर्यंत काही न काही वाजत असे...त्यामुळे अगदी लहानपणापासून गाणी कानांवर पडत राहिली.आजही बरीचशी गाणी त्याबद्दलची बाकी माहिती आठवत नसली तरी चाल आणि शब्द अशी आपसूक लक्षात आहेत.....

गाण्यांचं कसं काम करताना ऐकली तरी कामात खंड पडत नाही.आपला हात एक आणि कान एक (आणि मेंदु बहुधा तिसरंच काही) करायला तरबेज होतात.मल्टीटास्कींग म्हणावं का याला? काय म्हणायचं ते असू दे पण बरं बरोबर जमतं, नाही का?? माझं गुणगुणंणं काही वेळा अविरत सुरू असतं...अगदी एखादा कॉन्फ़रंस कॉल म्युट करुन ऐकतानाही एखादी लकेर चुकारपणे येऊन जाते आणि मिटिंगची मरगळ आपसूक जाते...न कळता आम्हा भावंडांवर हा गानसंस्कार करणार्‍या माझ्या आई-बाबांचं मला त्यासाठी खूप कौतुक वाटतं...

मागे एकदा आरुष बराच आजारी होता. त्याच्यासाठी आम्ही दोघं आलटून पालटून सुट्ट्या काढत होतो त्यावेळी त्याला सारखं जवळ घेऊन बसावं लागे. मग बाजुलाच एक प्ले लिस्ट लावून ठेवायचे. तो शांतपणे पहुडला असे आणि मी माझं फ़्रस्टेशन गाण्यामुळे तरी विसरायचा प्रयत्न करायचे. या नादात एक झालं, तो बरा झाल्यावर एके रात्री मला झोपवताना त्या प्ले लिस्टमधल्या काही गाण्यांच्या त्याने फ़र्माईशी केल्या. त्यातलं एक तर चक्क हिंदुस्थानी क्लासिकल, आरतीताईंचं "जा रे जा रे संदेसा"...म्हणजे त्याला न येणार्‍या हिंदी भाषेतलं...मी तर उडालेच..

मग मलाच एक छंद लागला. रोज मी गाडीतून सकाळी मुलांना सोडते त्यावेळात एक गाणं लावायचं आणि आठवडाभर तेच एक गाणं सकाळी वाजवायचं. यात शक्यतो मराठी गाणी मी लावते. कारण मराठी भाषा मुलांना कळते म्हणजे गाण्याचे शब्दही ते ऐकतात. हिंदी गाणी आम्ही फ़िरायला वगैरे जातो तेव्हा असतात त्यावेळी आजकाल मुलं चक्क गोंधळ घालतात म्हणजे कॉलेजमध्ये एखादा विषय पोरांच्या पूर्ण डोक्यावरून जायला लागला की त्यांनी मोठमोठ्याने गप्पाबिप्पा मारायला सुरूवात करावी तसं. इतर वेळी घरी मूड असेल तेव्हा यु ट्युबवरची त्याच्या लहानपणी लावायचो ती बालगीतं पण लावायची म्हणजे अगदीच पुढचं पाठ नको...बालगीतं तर काय असंही मुलं ऐकतात. पण सारखं एखादं गाणं ऐकलं की ते गाणंही त्यांना आवडलं की ते ऐकत राहतात...आणि थोडी शांतही बसतात.अर्थात हे काही औषधाच्या मात्रेसारखं गाण्यांची मात्रा वगैरे नाही पण जोवर लक्षात आहे तोवर आपले शब्द, भाषा आणि अर्थात संगीत परीचयासारखं होऊ शकतं. 

मध्येच मी कामासाठी आठवडाभर बाहेर गेले आणि परत आले तर बाबाच्या राज्यात त्यानी "ढिंग चिका" पण शिकुन ठेवलंय...बाबाने "ढिंग चिका" म्हटलं की "हे हे हे" करतानाचा जोश थोडा वेगळाच. थोडक्यात कानावर पडलेलं लक्षात राहायचं वय आता सुरू झालंय. मग त्यात ते कसंही का असेना....:)

सर्वात जास्त मला आवडलं ते मागे मी जी श्रीधरजींची कार्यशाळा केली त्यातलं एका गाण्यातलं वाक्य आरुषला गुणगुणताना ऐकते तेव्हा...त्यांनी आम्हाला शिकवलं होतं की "उन्हात्त पान मनात्त गान" यात त वर जोर आहे..(म्हणून मी ते त ला त जोडून "त्त" लिहिलंय)...आणि छोट्या आरुषचं "उनात्त पान" ऐकताना इतकी गम्मत वाटते की असं ऐकून ऐकून एकेका गाण्याची ओळख करून द्यायचं तंत्र मलाच आवडलंय..

ऋषांकसाठी तर गाण्यांनी मलाच आधार दिलाय कारण तो लहान होता तेव्हा मला एकटीनेच पहिले तीन महिने काढायचे होते. मग मी "रंग बावरा श्रावण"ची सिडी कायम आमच्या बुम बॉक्समध्ये घालून ठेवली होती..त्याच्या झोपायच्या वेळी त्याला पाळण्यात घातलं की मी ती सिडी लावून चक्क स्वयंपाकघरात काम करत बसे..."बाळ उतरे अंगणी"ने सुरू केलेली सिडी साधारण तिसर्‍या गाण्याला माझा बाळ निवांत झोपलेला असे....सीडी संपली की काहीवेळा मी ती पुन्हाही लावे. त्यावेळी ही आरुष कधीकधी मध्येच मोठ्याने "आला किनाला" म्हणत असे. 

मागच्या वर्षी आई-बाबा आल्यावर दिवसा ते दोघा मुलांसाठी गाणी म्हणत आणि काहीवेळा रात्री ऋषांकसाठी एकदा सिडी असं आमचं रूटीन होतं.. त्यानंतर जरा चळवळ्या झाल्यावर त्याने त्या बुम बॉक्सचा डब्बा गुल केला, पण आम्ही ही गाणी आमच्या आय पॅड, आय पॉड वगैरे समस्त ठिकाणी सुखरूप ठेवलीयत..त्यादिवशी एका रिसॉर्टमध्ये साहेब रात्री (की पहाटे) दोनला उठून पुन्हा झोपायलाच तयार नाहीत तेव्हा मी आय पॅडवर तीच गाणी सुरू केली आणि माझा गुणी बाळ थोड्या वेळाने झोपला..

तो झोपताना किती त्रास देतो याचं परीमाण पण लहानपणी गाण्यावर असायचं. म्हणजे तिसर्‍या गाण्याला झोपला तर चांगला..अख्खी सिडी संपून पुन्हा लावायला लागली की मग बाहेर येऊन तसा रिपोर्ट असं आमचं सुरू असतं..या पार्श्वभूमीवर तो बोलायला लागला की त्याला हे गाणं नक्की माहीत आहे का हे जाणून घ्यायची माझी केव्हाची इच्छा होती. मग एके दिवशी झोपायला नेताना मी सहज त्याला विचारून पाहिल,"ऋषांक, आता आपण कुठली गाणी लावायची??" आणि त्याने चक्क त्याच्या बोब्ल्या बोलात "बा..." असं सांगून झोपण्याची अ‍ॅक्टिंग पण करून दाखवली...मला त्यावेळी इतकं सही वाटलं की पुढच्या वेळी पद्द्मजाताई भेटल्या की त्यांचा आवाज जर त्याने ओळखला तरी मला नवल वाटणार नाही..

आता लवकरच ऋषांक दोन वर्षांचा होईल. त्यामुळे त्याचे बोबडे बोल ऐकायला मजा येतेच आहे पण त्यात जर त्याने अशा प्रकारे सारखं ऐकलेल्या गाण्याची ओळख दाखवली की मस्तच वाटतं. सारखं सारखं ऐकून आरूषने एकदा "हे गगनाआआआ" असा सूर लावला त्यातला "हे"चा थोडा अमेरिकन "हेय..."सारखा उच्चार ऐकून हसायला येत होतं तर त्यापुढल्या वाक्यातल्या "सर्व कहाणी?"चं उत्तर ऋषांकने "थावी(ठावी)" असं दिल्यामुळे माझी चांगलीच करमणूक झाली. मी आरुषच्या वेळेस एक घरगुती गाणं बनवलं होतं म्हणजे कुठल्याही प्राण्यांचं किंवा पक्ष्याचं नाव घ्यायचं आणि गाण्यातच हा काय करतो? असा प्रश्न विचारुन तो झोपतो असं म्हणायचं. बेसिकली मुलं काहीवेळा झोपायचं सोडून गाणी आणि गोष्टी ऐकत बसतात त्यावर हा माझा घरगुती उतारा होता. तर कधी कधी ऋषांकला म्हटलं की "मला झोपव", की तो मग त्याच्या बोबड्या बोलात "चिव चिव चिमणी काय कत्ते, काय कत्ते? चिव चिव चिमणी झोपते" असं बोलतो ते ऐकायला खरंच फ़ार गोड वाटतं आणि त्यात मग त्याला आवडणार्‍या इतर प्राण्यांचे अ‍ॅडिशन्सही येतात फ़क्त त्या सगळ्यांचे आवाज आ आ असतात म्हणजे आ आ पिगी काय कत्तो, आ आ नायनो (डायनो) इ.इ. 

आतापुरता सांगायचं तर ही मुलं इंग्रजी माध्यमात शिकतील, मोठी होतील..मातृभाषा म्हणून मराठी तर त्यांना यायलाच हवी. अर्थात कलेच्या म्हणजे पुस्तकं, नाटकं, गाणी याच्या अनुषंगाने मराठीची गोडी मी कितपत लावू शकेन माहित नाही. पण अशा गाण्याच्या निमित्ताने त्यांना काही चांगले शब्द,गाणी लक्षात राहिली तर ते मला हवंच आहे. आणि थोडंफ़ार गुणगुणूही शकले तर सोन्याहून पिवळं नाही का? 

फ़ार पुढचा विचार नाही पण त्यांच्या आत्ताच्या वयापासून वेगवेगळी गाणी ऐकवणे हे मात्र मी करत राहणार आहे...त्याचं एक कारण मलाही गाणी ऐकत राहायची असतात आणि दुसरं अर्थातच न कळत मुलांवर होणारे गान संस्कार...जसे माझ्या लहानपणी माझ्या आई-बाबांनी नकळत आमच्यावरही केलेत....

आजच्या बालदिनाच्या निमित्ताने माझ्या ब्लॉगवाचकांच्या अवतीभवती असणार्‍या मुलांना शुभेच्छा देता देता त्यांच्याकडूनही या विषयावरच्या आणखी काही टिपा/अनुभव ऐकायला नक्की आवडतील. आपण आपल्या मुलांना लहानपणापासून गाणी ऐकायला शिकवता का? 

Monday, November 14, 2011

स्पर्श

आज चौदा नोव्हेंबर...बालदिनाच्या निमित्ताने मोठ्या वाचकांसाठी ही एक लघुकथा.कुणाच्याही प्रत्यक्ष आयुष्यात असा प्रसंग घडू नये हीच अपेक्षा.


_______________________________________________________________________
’आता कुठे बारा वर्षांची तर होतेय.इतकी काय घाई आहे तिला मोबाईल घेऊन द्यायची?’

’अगं, पण जग कुठे चाललंय पाहतेस नं? शिवाय आपल्या आय.टी मधल्या नोकर्‍या.किती बिझी असतो आपणही? ही कुठे अडकली, मुंबईत काय झालं तर निदान संपर्कात तर राहता येईल न?’

’अरे पण तिचं वय?’

’वय-बिय काही नाही.बदलते वक्त के साथ बदलो असं लग्नाआधी कोण म्हणायचं?’ हे संभाषण आता आपलं सासुबाईंपासून वेगळा संसार थाटण्याकडे वळणार असं दिसताच शीतलने आवरंतं घेतलं..’बरं
बघूया', असं समीरला म्हणताना तिला एकदम सानियाचं बाळरुप आठवलं.

खरं तर लग्न झाल्या झाल्या दोघांच्या घरच्या सल्ल्याला न जुमानता चांगली पाच वर्षे थांबून मग जेव्हा मूल व्हायचा निर्णय घेतला तेव्हा निर्सगाने आणखी दोन वर्षे त्यांना थांबायला लावलं त्यावेळीच सगळं सोडून घरी बसायचं असं शीतलने ठरवलं होतं.पण जेव्हा तेव्हा आपल्या लॅपटॉपपुढे बसायची सवय म्हणा किंवा आधीच मोठं कर्ज काढून घर घेतल्याचा खर्चाचा बोजा आता एक बाळ घरात आल्यावर आणखी वाढणार म्हणून म्हणा, बाळंतपणाची रजा थोडी थोडी करुन नऊ महिने वाढवून शेवटी सानियाला पाळणाघरात ठेवायचा निर्णय घेतला गेलाच.

कामावरचा ’तो’ दिवस शीतलला पाळणाघरात वारंवार केलेल्या फ़ोनखेरीज आणखी काही केल्याचं आठवतही नसेल. हळूहळू जसजसे महिने उलटत गेले तसं शीतलपेक्षा सानियालाच पाळणाघराची सवय झाली. तिथल्या काकी खरंच खूप जीव लावायचा. तरीही घरी परत आल्यावर मात्र आई आई करणार्‍या सानियाशी खेळताना, तिचा अभ्यास घेताना शीतलचा दिवसभराचा शीण कुठे पळून गेला तेच कळायचं नाही.समीरही जमेल तेव्हा लवकर ऑफ़िसातून येऊन माय-लेकींबरोबर वेळ द्यायचा. महिन्यातले इयर एंडिंगचे दिवस सोडले तर इतर दिवशी त्याला ते जमायचंही. एक मनाला लागलेली थोडी टोचणी सोडली तर सगळं काही नियमीतपणे सुरु होतं.

सानियाच्या जन्माआधी टीम-मेंबर म्हणून काम करणार्‍या शीतलच्या ऑफ़िसमधल्या जबाबदा‍र्‍याही आता वाढायला सुरुवात झाली होती. सुरुवातीपासून इतरांना मदत करायचा तिचा गुण हेरुन टीम-लीडचं काम तर तिच्याकडे आलं होतंच. हळूहळू जास्तीत जास्त प्रोजेक्ट मॅनेजमेंटचे टास्क्स तिच्याकडे यायला लागले होते. मनातून ती या प्रगतीबद्द्ल सुखावत होती आणि एकीकडे कामाच्या जागचा संध्याकाळचा एक-एक तास वाढत होता.

समीरचंही काही वेगळं विश्व नव्हतं.तोही ऑफ़िशीयली प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून बढती मिळाल्यापासून
 घरी आल्यावरही कुठच्या दुसर्‍या देशातल्या वेळेप्रमाणे कॉन्फ़रन्स कॉल्स, सकाळी लवकर उठून घरुनच प्रेझेंटेशनची तयारी या आणि अशा न संपणार्‍या कारणांमुळे कायम कामाला जुंपला गेलेला असे. त्याला एक काय ती रविवारची सकाळ थोडी-फ़ार मिळायची त्यात अख्खा आठवड्याचं साचलेलं ऐकायचं की राहिलेली झोप पुरी करायची या द्विधा मनस्थितीत समोरच्याने बोललेलं कळायचं तरी का देव जाणे. नुस्तं हम्म, अच्छा, असं का यातले सुचतील ते शब्द टाकून तो मोकळा व्हायचा.

शीतल आणि समीर असे कामात आकंठ बुडल्याने,संध्याकाळी सानियाबरोबर वेळ द्यायचा म्हणून स्वयंपाक-पाणी करणार्‍या रखमाला आता मी येईपर्यंत थांबशील का म्हणून विचारलं गेलं. तिला घरचे पाश नव्हते आणि सानियाही तशी काही उपद्रवी कार्टी नव्हती म्हणून बाईंची अडचण समजून  ती समजुतीने थांबायची. घरात असेपर्यंत जमेल ती कामं उरकत बाईंना आल्या आल्या काही करायला लागू
नये म्हणून हात चालवायची. बाई आपल्याला नोकरांसारखं वागवत नाहीत ही भावना तर होतीच.

पण कुठेतरी काहीतरी कमी जाणवायला लागली होती. आई घरी उशीरा येते हे आतापर्यंत सानियाच्या अंगवळणी पडलं होतं. त्यामुळे शाळेतून  घरी आल्यावर आपला अभ्यास करुन ती सरळ टि.व्ही. नाहीतर गेम्समध्ये रमायला लागली.आतापर्यंत शाळेतला पहिला नंबर तिने सोडला नव्हता म्हणून तिच्या अभ्यास सोडून इतर गोष्टींवर घरातले तिला कुणी आधीपासूनच काही बोलत नसत. आई आली की, ’
सानू  बेटा, चल पटकन जेऊया’, असं म्हणताच ताडकन उठून तिच्याबरोबर जेवायला यायची आणि नेमकं त्याचवेळी आईच्याही नंतर थांबलेल्या कुणा कलिगचा ऑफ़िसमधून  फ़ोन आला की तिचं ते कंटाळवाणं बोलणं ऐकत जेवून  उठून गेलं तरी आईला पत्ताच नसायचा. मग नंतर तर तिने सरळ रखमाला मला खूप भूक लागलीय असं सांगून आधी जेवायला सुरुवात केली. शीतलला वाटलं आपण लेट येतो म्हणून पोर कशाला उपाशी ठेवा. तिने रोज आल्यावर सानू नीट जेवलीय याची चौकशी करायला सुरुवात केली.

समीरला खरं तर आपल्याला अनेक शंका विचारुन माहिती करुन घेणार्‍या लेकीबरोबर रात्री काहीतरी गोड खात बाल्कनीत बसून गप्पा मारायला खूप आवडायचं.पण त्याच्या कामाचं रुटीन पाहून सानियानेच बाल्कनीत बसायचा त्यांचा शिरस्ता मोडून टाकला. ती सरळ आपल्या पांघरुणात शिरुन आवडीचं पुस्तक वाचत बसे. आजकाल या पुस्तकांतील पात्रांशीच तिच्या काल्पनिक गप्पा रंगत. आणि ती तन्मयतेने वाचतेय असं आपल्या मनाचं समाधान करुन समीर पुन्हा आपलं लॅपटॉपमध्ये डोकं घाले. रात्रीची जेवणं होताना आणि जेवणं झाल्यावर या तिघांच्या किलबिलीने इतरवेळी गजबजणारं घर आताशा पिलं उडाली की रिकामी झालेल्या घरट्याप्रमाणे शांत होऊन गेलं. रखमाची ’निघते बाई’ हे अंतिम वाक्य.

असं असलं तरी रात्री झोपताना एकमेकांशी बोलण्याची सवय शीतल आणि समीरमध्ये कायम होती. दोघं एकाच क्षेत्रातली असल्याने आपण खूप बोलू शकतो हे त्यांना वाटे आणि त्यात काही चूक नव्हतं. फ़क्त आपण आजकाल फ़क्त एकमेकांच्या डेड-लाइन्स, ऑफ़िस पॉलिटिक्स, अप्रेजल,टेक्नॉलॉजी याच विषयांवर बोलतो हे मात्र त्यांच्या लक्षात येत नसत. अर्धाएक तास किंवा काहीवेळा त्यापेक्षा कमी वेळ बोलता बोलता एकजण हूं हूं करत झोपला की दुसराही झोपून जाई आणि मग सकाळची तारेवर कसरत करता करता काल आपण काही बोललो होतो याची आठवणही येणार नाही इतक्या चपळाईने दिवसाची कामं त्या दोघांचा कब्जा घेई.गाण्याच्या क्लाससाठी निघून गेलेली सानु दोघांच्या दृष्टीने काहीतरी शिकतेय, आपण तिच्यासाठी म्हणून हा सगळा रामरगाडा चालवतोय. ती पुढे जावी हेच आपल्या मनात आहे म्हणून स्वतःची समजुत मनातल्या मनात कधीतरी काढली जाई इतकंच.

त्यातंच सानियाचा बारावा वाढदिवस आला. नेमका रविवार असल्याने यावेळी तिच्यासाठी सुटी काढली नाही याचा सल नव्हता.

’सानिया, चल पार्टीसाठी चायना गार्डनमध्ये जाऊया. येताना फ़्लोट खाऊया. यावेळी तुझ्यासाठी मस्त ब्रॅंडेड जीन्स घ्यायची अगदी तुझ्या आवडीच्या स्टाइलसकट’, बोलताना खूप एक्साइट झालेल्या समीरला सानियाचा थंड चेहरा पाहून, कागदावर छान दिसलेल्या प्रोजेक्ट प्लानला टिम-मेंबरनी डेड लाइनची तारीख पाहून  दिलेला प्रतिसाद आठवला. आता थोडं टीम स्पिरीट वर आणलं पाहिजे...’गाइज, ऑन अवर लास्ट असाइनमेंट विथ द सेम क्लायंट....’ मनात आलेल्या वाक्याने  तो दचकलाच...बापरे...’ओके बेटा, बरं मग तू सांग. काय करायचं यावेळी..मस्त रविवार पण आहे..बोल.’ ’बाबा, मला सेलफ़ोन हवाय. वर्गात सगळ्यांकडे आहे..’ तिला काही उत्तर द्यायच्या आत शीतलला आपल्याला विचारायला हवं हे लक्षात घेऊन समीर शब्दांची जुळवाजुळव करत बसला. अर्थात अप्रेजलला टीम-मेंबरना हाताळायची सवय झालेल्या समीरला सानियाला पार्टीसाठी पटवणं फ़ार कठीण नव्हतं.टोलवाटोलवी हा प्रोजेक्ट मॅनेजरचा गूण घरच्या प्रोजेक्ट्ससाठी पण कामाला येतो हे त्याला माहितही होतं.

शेवटी पार्टी करुन, फ़्लोट खाऊन परत येताना चौपाटीवर फ़िरुन घरी येईपर्यंत सानिया गाडीत झोपूनही गेली होती. त्यानंतर मग रात्री शीतलबरोबर वरचा संवाद रंगला होता.

खरं म्हणजे आता सेलफ़ोनला वयाची अट आणि आर्थिक अडचण ही दोन्ही कारणं राहिली नाहीत हे शीतललाही कळत होतं पण तरी शाळेपासून लेकीच्या हातात तो यावा असं तिला मनापासून वाटत नव्हतं..पण कसंतरी करुन समीरने तिला पटवलंच...हो म्हणायच्या ऐवजी "प्रोजेक्ट मॅनेजर कुठला" असं ती त्याला म्हणाली तेव्हा तोच जास्त हसला होता. बाकी काही नाही पण अचानक संपर्क साधायला सेलफ़ोन हवा या एकाच कारणावर दोघांचं एकमत झालं होतं.शिवाय तू संध्याकाळी लवकर येत नाहीस त्यावेळी एखादा गमतीशीर मेसेज पाठवून तिचा मूड बनवू शकशील, तुमचं कम्युनिकेशन वाढेल, आई-मुलींमध्ये कसं मैत्रीचं नातं हवं, असली मुलामा देणारी कारणंही समीरने दिली होतीच.

सेलफ़ोन आल्यामुळे सानियाला घरात संध्याकाळी एकटं असतानाचा वेळ आता थोडा बरा जायला लागला.शिवाय आईपण सारखे सारखे मेसेजेस करायची.बाबाही कधीकधी तिचा जुना काढलेला फ़ोटो किंवा एखाद्या पुस्तकातलं छान वाक्य पाठवायचा.आई-बाबांशी पुन्हा एकदा मैत्री वाढत होती.आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाळेत मैत्रीणींमध्ये उगीच थोडा खाली गेलेला तिचा भाव पुन्हा एकदा जैसे थे वर आला होता.आता कसं सगळ्यांशी टेक्नॉलॉजीने बोलता येऊ लागलं.आधी तसंही घरचा फ़ोन होता पण आता टाइमपास एसेमेस..शुभेच्छा सगळं मोबाइलवर. आणि मधल्या सुट्टीत त्याबद्दलची चर्चा. शाळेत अर्थात फ़ोन वापरायला बंदी होती. पण व्हायब्रेटमोडमध्ये असलं की कुणाला कळतंय.

आताच दिवाळीची सुट्टी संपली होती आणि शाळेच्या स्नेहसंमेलनाची तयारी सुरु झाली होती.बाईंनी सुरेल आवाज असलेल्या सानियाला गायनात निवडलं होतं. त्यासाठी रोज शाळा सुटल्यावर एक तास सराव असे. तीन राउंडमधून एकामागे एक बाद होणारे स्पर्धक पाहून सानियाला थोडं टेंशन आलं होतं. पण तिसर्‍या राउंडला जे तीन विद्यार्थी उरले त्यात सानियाचा नंबर होता. आई-बाबाला ही बातमी तिने 
शाळेतूनच एसेमेस करुन दिली. आई-बाबांचं जवळजवळ लगेच "कॉन्गो सानू" आलं आणि तिला हसू आलं.आता आई-बाबा इथे हवे होते असं तिला वाटलं. पण आज घरी गेल्यावर बोलू असा विचार करुन ती मैत्रीणींच्या गप्पांमध्ये सहभागी झाली. त्या शुक्रवारी नेमकं रिलीजमुळे बाबाला ऑफ़िसमध्येच राहावं लागलं आणि आईलाही एका कलिगला लवकर घरी जायचं होतं म्हणून नेहमीपेक्षा उशीर होणार होता.

आई-बाबा सारखे तिला चिअर-अप करणारे मेसेज पाठवत होते आणि तितकीच सानिया अस्वस्थ होत होती. खरं तर इतकी आनंदाची बातमी असूनही तिला जेवावंसं पण वाटत नव्हतं. रखमाला बेबीचं काहीतरी बिनसलंय कळत होतं पण काय करायचं हे न सुचल्याने ती आपली कामं आवरत होती. कंटाळून सानिया आपल्या रुममध्ये जाऊन पडली आणि शीतल घरात शिरली. ’आज बेबीचं चित्त ठिकाणावर नाही’ हे रखमाचं वाक्य तिच्या डोक्यात शिरलं पण आठवडाभरच्या कामाच्या कटकटीने दमलेल्या तिला हा विषय सुरु करायचा नव्हता. शिवाय आज समीरही येणार नव्हता. सानियाच्या दरवाज्याचं दार थोडं ढकलुन पाहिलं तर ती बिछान्यावर झोपलेली दिसली म्हणून तिला उगाच उठवायलाही तिला जीवावर आलं. गाण्याच्या क्लाससाठी सकाळी उठायचं असतं रोज... झोपूदे...असं मनातल्या मनात म्हणून तिनं आपलं पान घेतलं. चार घास घशाखाली गेल्यावर झोपेने तिचाही ताबा घेतला.

समीरचा शनिवारही ऑफ़िसमध्ये जाणार होता म्हणून सानियाला तिचे शनिवारचे सगळे क्लासेस इ.ला न्यायची जबाबदारी शीतलवरच होती. त्या सगळ्या गडबडीत गाण्याच्या स्पर्धेचा विषय राहूनच गेला. रविवारी सकाळी समीर आल्यानंतर मग खास मटणाचा बेत आणि मग लगेच येणार्‍या सोमवारची तयारी करणार्‍या आपल्या आई-बाबांकडे पाहुन त्यांच्याशी काही बोलायचा सानियाचा मूड गेला.पुढच्या शुक्रवारी संध्याकाळच्या कार्यक्रमात तिचं गाणं होतं. हा आठवडा तयारीसाठीचा शेवटचा आठवडा होता.

खरं तर गाणं हा सानियाचा प्राण होता.गाणं आवडतं म्हणून कारेकरबाईंच्या सकाळच्या बॅचला जायचा शिरस्ता तिने आजतागायत कधीच मोडला नव्हता. बाईंबरोबर "सा" लावला की कसं प्रसन्न वाटे. वेगवगळे राग समजावून सांगायची त्यांची हातोटी तिला फ़ार आवडे. त्यांनी शिकवलेल्या सुरांचा पगडा इतका जबरदस्त असे की संध्याकाळी पुन्हा घरी रियाजाला बस म्हणून सांगायला कुणी नसे तरी तिची ती तानपुरा लावुन बसे आणि सकाळची उजळणी करी.

हा आठवडा मात्र ती सकाळी घराबाहेर पडे पण बाईंकडे जायच्या ऐवजी एका बागेत जाऊन नुस्ती बसुन राही आणि आई-बाबा कामावर जायच्या वेळेच्या हिशेबाने ते गेले की घरी परते. संध्याकाळी सरावासाठी पण ती थांबत नसे. बाईंनी याबद्दल विचारलं तर माझ्या गाण्याच्या बाई माझी स्पेशल प्रॅक्टिस घेताहेत म्हणुन चक्क थाप मारली होती.

"hey how is practice " शेवटी गुरुवारी आईचा एसेमेस आला तेव्हा निदान तिला हे माहित आहे असं वाटुन सानियाला थोडं बरं वाटलं. बाबाने तर अख्खा आठवड्यात तिचं गाणं या विषयावर चकार शब्द काढला नव्हता.

"ya ok" बसं आईला इतकंच रिप्लाय करुन सानिया मात्र सेलवर चक्क एक गेम खेळत बसली.

शेवटी शुक्रवार उजाडला. आज संध्याकाळी आई-बाबा आपला कार्यक्रम पाहायला य़ेणार नाहीत याची तिला जवळजवळ खात्रीच होती.गायचाही तिचा बिल्कुल मूड नव्हता.

"Sanu, I am into middle of a work problem" असा आईचा दुपारी आलेला संदेश पाहून सानियाचा उरलासुरला उत्साहही गळाला होता.

पूर्ण आठवडा मूड ठीक नसलेल्या आपल्या मैत्रीणीचं आज काहीतरी जास्त बिनसलंय हे तिच्याबरोबर शाळेत कायम असणार्‍या अर्चनानं ताडलं होतं.पण तरी तिला सरळ विचारुन तिला वाईट वाटावं असंही तिला वाटत नव्हतं. शिवाय वाढदिवसाच्या गिफ़्टचा विषय निघाला होता तेव्हा पटकन सानिया म्हणाली होती तेही तिच्या लक्षात होतं..."मोबाइल न घेऊन सांगतात कुणाला? त्यांना माझ्याशी बोलायला वेळ कुठे आहे?" हे असं याआधी कधी ती आपल्या आई-बाबांबद्द्ल बोलली नव्हती. त्यामुळे उगाच जखमेवर मीठ नको म्हणून ती दुसर्‍याच कुठल्या विषयावर आणि कार्यक्रमांबद्दल तिच्याबरोबर बोलुन तिचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत होती.

सानियाला मात्र आजुबाजुला बाकीचे पालक पाहुन कसंतरी व्हायला लागलं. शेवटी तिने आईला सरळ बाथरुममध्ये जाऊन फ़ोन लावला तर नुसती रिंग वाजत राहिली. सानियाचे डोळे पाण्याने भरले. तरी तिने घाईघाईत "aai, where are you?" असा मेसेजही करून ठेवला. कॉल आणि मेसेज दोन्हींपैकी एकाचं तरी उत्तर येईल म्हणून थोडावेळ बाथरुममध्येच ती थांबली.

अखेर पाच-दहा मिनिटांनी अर्चनाच्या हाकेने तिला फ़ोन बॅगमध्ये ठेऊन बाहेर यावंच लागलं. गाण्यासाठी निवडलेल्या तीन स्पर्धकांनी स्टेजमागे यावे असा इशारा माइकवरुन देण्यात आला होता. अर्चनाला सानियाचा पडलेला चेहरा पाहवेना. काय करायचं तेही कळत नव्हतं.

आता निर्धाराने स्टेजमागे जायचंच नाही असा निर्णय घेऊन सानिया गर्दीत जायला लागली. इतका वेळ आपल्या बरोबर असलेली सानिया कुठे दिसत नाही म्हणून अर्चनाने थोडंफ़ार शोधलं पण ती दिसतच नाही हे पाहून शेवटचा पर्याय म्हणून गाण्याच्या बाईंनाच सांगायला ती सरळ शिक्षक उभे होते तिथं गेली. बाईंना खरं म्हणजे जास्त काही सांगावं लागलंच नाही. सानियाचा मूड जसा तिच्या प्रिय मैत्रीणीने ओळखला होता तसंच आपल्या लाडक्या विद्यार्थीनीचं काय चाललंय हे बाईंच्याही नजरेत आलं होतं. म्हणून जास्त चर्चा न करता त्यांनी हॉलमध्ये सानियाला शोधलंच. "चल, मी तिला समजावते", असं म्हणून बाईंनी सानियाला शोधून स्टेजमागे नेलंही.

बाईंबरोबर खोटं बोलायची ही पहिलीच वेळ. सानियाला तर रडूच कोसळलं. बाईही कावर्‍या-बावर्‍या झाल्या.तिला एका खुर्चीत बसवून कुणाला तरी पाणी आणायला त्यांनी पाठवलं आणि शब्दांची जुळवाजुळव करु लागल्या.सानियाचं इतके दिवसाचं साचलेपण तिच्या नाका-डोळ्यावाटे सतत वाहू लागलं. नाकाचा शेंडा लाल, कानाच्या पाळ्या लाल, आणि सारखी मुसमुसणार्‍या तिला बाईंना पाहावत नव्हतं. इवल्याशा वयात किती हा कोंडमारा असं त्यांच्या मनात येतंय तोच सानियाची आई शीतल अर्चनाबरोबर धावत धावत तिथे आली.

आईला बघून सानिया आईकडे झेपावली.तिचे पटापटा मुके घेत आईच्याही डोळ्यांना धारा लागल्या. तिला घट्ट जवळ घेत आजूबाजूच्यांची पर्वा न करता शीतलने चक्क सानियाची काही न विचारता माफ़ी मागितली. बाईं सानियाला शोधायला गेल्या तेव्हा अर्चनाने सानियाच्या आईला पुन्हा फ़ोन लावला होता आणि परिस्थितीची कल्पना दिली होती.

'पिलू, आईने तुझ्याकडे किती दिवस पाहिलंच नाही नं? इतके दिवस फ़क्त एसेमेसवरुनच तुझी खबरबात घेत राहिले आणि तुला प्रत्यक्ष जवळ घ्यायला मात्र मला वेळच मिळाला नाही नं? एकदाही घरी तुझं गाणं गाऊन घेतलं नाही...इतकं छान स्पर्धेत गाणारं माझं पिलू पण माझ्यासाठी मात्र मागच्या बाकावर उभं करुन ठेवलेल्या मुलासारखं मी तुला शिक्षा दिली...माफ़ कर गं मला राणी प्लीज...."

आईला अचानक पाहून  आणि त्याहीपेक्षा गेले कित्येक दिवस हरवलेला तिचा स्पर्श मिळताच सर्व काही मिळाल्यासारखे वाटणार्‍या सानियाला स्पर्धेआधीच पदक जिंकल्याचा आनंद झाला होता.अजूनही तिचे डोळे भरुन येत होते पण ते आपल्या आईला कन्फ़ेस करताना पाहून.

या सर्व ताणाताणीत या स्पर्धेत जरी तिची चुरशी झाली नाही तरी यापुढच्या प्रत्येक वाटचालीत तिची आई तिच्याबरोबर प्रत्यक्ष असणार होती हे समाधान खूप होतं आणि अति कामाने यंत्र झालेल्या शीतल आणि समीरसाठी मात्र नियतीने काही कठोर घडण्याच्या आत घेतलेल्या छोट्या परीक्षेतच शंभर टक्क्यांनी उत्तीर्ण व्हायचं होतं....एका छोट्या यंत्रापेक्षा स्पर्शाची ताकत त्यांना या प्रसंगातून पुरेपूर
कळली होती.

वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये आई आणि टीन-एज मुली याबद्दल एक लेख वाचला होता. त्यात ज्यांचे आईबरोबर प्रत्यक्ष संपर्क आहेत आणि ज्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वापरायचं प्रमाण जास्त आहे या दोन्ही गटांमधलं परीक्षांमधलं यश याबद्दलचे आकडे दिले होते. त्यातली तफ़ावत पाहून त्यातल्या मुद्द्यांच्या आधारे हा विषय कथारुपाने मांडायचा हा एक प्रयत्न...दिवाळी अंकामधल्या प्रतिक्रियांनी खूप छान वाटतंय. ब्लॉग वाचकांनाही ही कथा आवडेल अशी आशा आहे.....



पूर्वप्रसिद्धी - मोगरा फ़ुलला दिवाळी अंक २०११

Saturday, November 13, 2010

आई, मला गोष्ट सांग ना....

’आई, मला गोष्ट सांग ना’ हे मी माझ्या आईला कधी सांगायला सुरुवात केली माहित नाही. आईला माहित असेल कदाचित तरी एकंदरित वाचनाचा छंद बर्‍याच आधीपासुन आहे हे खरं.पण तरी पुस्तकांचा नाद माझ्या मुलाला थोडा लवकरच लागला असं मला नेहमी वाटतं...म्हणजे गादीच्या कोपर्‍यात पडलेलं पुस्तक मी नावावरुन शोधत असताना त्यानं मला थोडंसं रांगता असण्याच्या काळात आणून दिल्याचं मला आजही आठवतं आणि त्याचं संपुर्ण श्रेय लहान मुलांसाठीच्या पुस्तकांना आणि इथल्या लायब्ररीमध्ये होणार्‍या स्टोरी टाइम या कार्यक्रमाला जातं.
अमेरिकेत मिळणारी लहान मुलांसाठीची पुस्तकं पाहिली तर दणकट पुठ्ठ्याची बांधणी, त्यातली मोठ्ठाली चित्र आणि अर्थातच लहानग्यांना रस वाटेल अशी सोपी भाषा व कथा.सारं कसं जुळून आलंय.लहान मुलंच काय मोठी माणसंही प्रेमात पडतील. निदान मी तरी पडलेय बुवा...मला काय सगळ्याच कथा नवीन...एक वाचायला सुरुवात केली की युवराज दुसरं पुस्तक स्वतःच घेऊन येतात, काही वेळा तर वन्स मोअर पण असतो, काही पुस्तकं तर मुलांना (आणि अर्थातच आईला) पाठ होतात की एखाद्या दिवशी नाही सापडलं तर सरळ साभिनय म्हणूनही दाखवलं जातं...
यावेळच्या मायदेश दौर्‍यात अशा प्रकारची मराठी पुस्तकं शोधण्याचा प्रयत्न केला पण नाही बा...मला काही तसं मिळालं नाही...लहान मुलांची पुस्तकं पण मोठ्यांनीच वाचावी असा शब्दांचा टाइप आणि मोजकीच चित्रं...ही पुस्तकं वाचताना मुलं इतक्या पटकन शब्द अर्थासकट शिकतात की त्यांना वेगळं समजवावं लागत नाही. या पार्श्वभूमीवर पाश्च्यात्यांचं नक्कीच कौतुक करावं असं वाटतं..अर्थात त्यांच्या किंमतीही तशाच असतात पण सगळीच काही विकत घ्यावी लागत नाहीत त्यासाठी आमचं चकटफ़ू वाचनालय कामी येतं की.
वानगीदाखल खालची चलतफ़ीत पाहिलीत तर तुमचं माझं मत एकच होऊन जाईल...खरं म्हणजे एकच पुस्तक वाचायचं म्हणून बसले, रेकॉर्डिंग करायचं बाबाच्या मनात आलं तर चिरंजीवांनी दुसरं कधी आणून आम्ही तेही वाचायला लागलो ते कळलंच नाही. ही दोन्ही पुस्तकं त्याची वय वर्षे दोनमधली लाडकी आहेत हे वेगळं सांगायला नको आणि हे पुस्तक वाचतानाचा आमचा दोघांचा संवादही थोडी-फ़ार मजा नक्कीच आणेल...नशीब त्याला ’आई, मला गोष्ट सांग ना’ हे वाक्य अजून म्हणता येत नाही ते नाहीतर नक्कीच माझ्यामागे भूणभूण वाढली असती....



यावेळच्या बालदिनासाठी ब्लॉगवाचक आणि त्यांच्या घरातील छोटे कंपनीसाठी माझिया मनाकडून ही छोटीशी भेट....बालदिन जिंदाबाद....