Sunday, March 8, 2015

भय इथले....

आवडतं मला माझं स्त्री असणं. त्यामुळे मला काही खास वागणूक मिळावी असं कधी म्हणावंसं वाटत नाही; पण त्यामुळे संधीही नाकारल्या जाऊ नयेत इतकी माफक अपेक्षा मात्र आहे. माझ्या आई वडिलांनी मला मोठं करताना केलेल्या कष्टांची जाणीव मला आहे. म्हणून त्यांची काळजी घेणे, ही जबाबदारी मी दुसरा कुणी पुरुष आहे म्हणून त्याच्यावर ढकलणार नाही. त्याच प्रमाणे माझी मुलं, माझा संसार ही माझीदेखील तितकीच जबाबदारी आहे, याची संपूर्ण जाणीव मला आहे. त्यामुळे माझ्या व्यावसायिक जीवनात काही तडजोडी केल्या तरी ती जबाबदारी झटकून त्या कर्त्या पुरुषावर ब्रेड/बटर साठी मी विसंबून राहणार नाही. त्यासाठी जितके कष्ट तो उपसतोय तितकेच मीही करतेय. त्याची जाणीव मला आहे फक्त माझ्यासारख्या अनेक अशा झगडणाऱ्या स्त्री असतील ज्यांना हे असं सगळं वागण्याबद्दलची जी पोचपावती नेहमीच मिळत नाही, हे मात्र मला खटकतं. कोणी कितीही नाकारली तरी ही वस्तूस्थिती आहे. 

शंभरात अशी एक तरी व्यक्ती असते जी कुठून तरी अचानक उगवते, ज्यांचा तुमच्या रोजच्या संघर्षाशी काही संबंध नसतो पण तुम्ही स्त्री आहात म्हणून एखादा शेलका अभिप्राय मारून ते तुमची उमेद खच्ची करण्याचं त्यांचं काम करत असतात. बाकीच्यांचं माहित नाही पण मला अशी शेलकी माणसं भेटली की उमेद उलट वाढते आणि अशांच्या अज्ञानाची कीव येते. 


स्त्रीला कमी लेखणं हे असं सुरु होतं. मग कधीतरी त्यातली एखादी सगळ्यांच्या तावडीत सापडते. तिचा गुन्हा हा असतो की तिने तिच्या जोडीचे पुरुष जसे निर्भयपणे वागतील तसं किंवा त्याच्या जवळ जाणारं काही छोटं कृत्य केलं असतं. पण आता ती मिळालीच आहे तर तिला सगळ्यात पहिले उपभोगून, तिची विटंबना करून मग वर तिचीच चूक कशी आहे किंवा पुन्हा असं झालं तर तिला कसं वागवलं जाईल याच्या सार्वत्रिक धमक्या दिल्या जातात. 

आज जागतिक महिला दिन आहे  तर त्यानिमिताने मी माझाच ब्लॉग वाचला तर मला  पुन्हा एकदा लक्षात येतं की स्त्रीला भोगवस्तू म्हणून वागवण्यात जगात सगळीकडे अहमहमिका लागलीय. मग ती ८३-८४ मध्ये इराणमध्ये अडकलेली बेट्टी असो नाहीतर आता २०१० मध्ये सुटका केलेली पण आपलं १९ वर्षाचं आयुष्य हरवलेली जेसी असो. आपल्या देशातली तर अनेक प्रकरणं "त्या" एका प्रकरणानंतर बाहेर आली आहेत. उदाहरण शोधायला आपण शोधू आणि सगळीच उदाहरणं काही नकारात्मक आहेत असं नाही पण जेव्हा आपण एकविसाव्या शतकातले म्हणवून घेतो, या काळाच्या प्रगतीची उदाहरणे देतो तेव्हा आपली मानसिक प्रगती तपासली तर त्याबाबतचं चित्र फार काही बदललं आहे असं नाही आहे. 

नेहमी काही तावडीत सापडून तुमची विटंबना होणार नसते तर तुम्ही स्त्री आहात म्हणून तुमचं पाऊल मागं खेचणारी एखादी तरी व्यक्ती, संधी मिळेल, तशी तुमच्या आयुष्यात येत असते. त्यामुळे एकुणात भय इथले संपत नाही हे कटू असलं तरी सार्वत्रिक सत्य आहे. 


ता.क. - ही पोस्ट त्या नराधम विचारांशी सामना करणाऱ्या प्रत्येक स्त्रीसाठी आहे. हे विचार कधी आणि कसे बदलले जातील याबद्दल आता काहीही बोलणं कठीण असलं तरी ही परिस्थिती बदलावी अशी फक्त स्त्रियाच नाही तर बऱ्याचशा पुरुषांचीदेखील इच्छा आहे. या सगळ्या अंधारात आशेचा हाच एक काय तो किरण.