Saturday, February 27, 2010

होळी रे होळी

होळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का? नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्हणजे होळीच्या पूर्ण दिवसात एक, फ़ार फ़ार तर दीड एवढीच काय ती कुंपणापर्यंतची धाव. मग येते ती दुसर्‍याच दिवशी खेळली जाणारी रंगपंचमी..त्यात ते नकोत्या लोकांकडून रंग लावून घेणे आणि तोही जास्त मारक्या केमिकल्सचा असला की संध्याकाळपासुन अनेक दिवस उतरवणे ही अजून एक अजिबात न आवडलेली गोष्ट. मायदेशात असताना कधीही मी रंग खेळायला उतरले नाही आहे. वरून फ़क्त रंगून एकसारखी झालेली माकडं पाहाणे एवढंच केलंय...

आठवणीत खेळलेली पहिली होळी खरं तर देशाबाहेर मागच्या वर्षी खेळलोय. न्यु जर्सीला एक हवेली म्हणून गुजराथी लोकांचं मंदिर आहे तिथे अगदी फ़ायरब्रिगेड आणि पोलिसांच्या कडक पहार्‍यात आवारात जळणारी होळी आणि त्याभोवती प्रदक्षिणा घालणारे लोक आणि मग तिथल्या तिथेच मिळणारा गुलाल आणि दुसरे कुठले रंग फ़ासून मागच्या वर्षी एक-दोन तास चांगलेच होळी खेळलो. अगदी स्ट्रोलरमध्ये आणि मग कडेवर घेऊन आरुषपण रंगला..निमित्त आमच्या एका गुजराथी मित्राचा आग्रह आणि बाळाची पहिली होळी. बाकी हा खेळ खेळावा तो गुजराथ्यांनीच..तिथे फ़ेब्रुवारीच्या थंडीतही संध्याकाळी माणसांची अलोट गर्दी जमली होती आणि सगळी इतकी धमाल करत होते की इतकी वर्षे आपण कधीच होळी का खेळलो नाही अशी चुटपुटही लागली. आता पुढच्या वर्षी नक्की येऊ म्हणावं तर नेमकं मुक्कामाचं ठिकाण बदललं.........

आता कधी न मिळणारी पुरणपोळी जेव्हा एखाद्या मराठीमंडळाच्या कार्यक्रमात नाहीतर एखाद्या सुगरण मैत्रीणीकडे पानात येते तेव्हा इतकी आवडते खायला की इतकी वर्षे घरचीच होती म्हणून किंमत नव्हती हेही जाणवतं..पण असो...इथे साधी पोळी नाही येत तर पुरणपोळी करायचा विचारही मी मनात आणत नाही.

जाऊदे...शेवटी सण आहे तेव्हा परक्या देशात कुणी नसताना उसना का होईना पण उत्साह आणावा लागतो..अरे हो उत्साहावरून आठवलं होळी जिथे असायची त्याठिकाणी सगळी होळीची हिंदी-मराठी गाणी लाउडस्पीकरवर लावायचे ती ऐकायला मला सॉलिड आवडायचं..त्यावेळच्या चित्रहार आणि छायागीतमध्ये पण "रंग बरसे" पाहायचा नित्यनेम आणि "होली है" चा ओरडा..शिवाय ’होळी रे होळी.’...आणि ’हुताशनी माते की जय’ यांनी जरा स्फ़ुरण चढतं.....आता एकदा होळीच्यावेळी पण मायदेश दौरा केला पाहिजे...बरीच वर्ष झाली ती निळी जांभळी माकडं पाहून...

तुर्तास माझ्या भाचीने एका आदिवासी पेंटिगच्या क्लासमध्ये काढलेलं चित्र आहे ते लावते जरा फ़्रिजवर होळीच्या आठवणीसाठी...

सगळ्यांना होळी आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा...यावर्षी जरा इको कलर मध्ये होळी खेळायचा प्रयत्न करुया.

Friday, February 26, 2010

या वेळचा खास मराठी भाषा दिवस..

उद्या २७ फ़ेब्रुवारी, जागतिक मराठी भाषा दिवस. खरं सांगते मला काही हा दिवस प्रत्येक वेळी लक्षात नव्हता आणि आपल्यापैकी बर्‍याच जणांना तो नसेल पण यावेळी दोन कारणांसाठी लक्षात आहे एक म्हणजे मराठी ब्लॉग लिहायला घेतला म्हणून आता मराठीविषयीच्या खास गोष्टींकडे आपसूक जास्त लक्ष ठेवलं जातं आणि दुसरं म्हणजे या मराठी भाषा दिवसाचं औचित्य साधुन सुप्रसिद्ध संगित दिग्दर्शक कौशल इनामदार आपलं मराठी अस्मितेचं गीताच्या ध्वनिमुद्रिकेचं प्रकाशन करणार आहेत यासाठी..

खरं तर म्हणजे बरंच आधी महाराष्ट्र दिनाला हे होणार होतं पण काही कारणाने हा प्रकल्प लांबला गेला. अमेरिकेत राहून याबद्द्ल सर्वप्रथम मला याविषयी कळलं ते कौशलने एका मराठी ऑरकुट कम्युनिटीवर याविषयी लिहिलं तेव्हा..त्यावेळी त्यात कमीत कमी २०$ किंवा ५०० रु. द्यावे असं आवाहन होतं..एक सर्वसामान्य भारतीय माणसाचा कुठल्याही ठिकाणी पैसे मागितले की आता त्याचं पुढे नक्की काय होईल हा प्रश्न माझ्या मनात आला. एकीकडे साईटवरचं त्याचं आवाहन जितकं सच्चं होतं तितकंच आपला पैसा योग्य मार्गी जाईल का हे नक्की करणंही महत्त्वाचं..
ती साईट नीट पाहताना लक्षात आलं त्याने अमेरिकेतला जो संपर्क दिला होता त्या व्यक्तीला म्हणजे सचिन प्रभुदेसाई याला बी.एम.एम. च्या निमित्ताने जरा जवळून ओळखायला लागलो होतो. मग एक दिवस सचिनला समोरुनच विचारलं की काय आहे हे सर्व. सचिन हाही परदेशात राहिला तरी अस्सल मराठीने आणि त्याच्या प्रभावी बोलण्याने आपलंसं करणारं एक व्यक्तिमत्व त्यामुळे त्याने जेव्हा या प्रकल्पाबद्दल आणि मुख्य हे लोकांकडूनच पैसे उभारण्याबद्दलची जी भूमिका मांडली त्याने क्षणाचा विचार न करता मी आपलं खारीचं योगदान या प्रकल्पाला दिलं..त्याने जी मला माहिती दिली त्यावरून हे पैसे निव्वळ स्वतःच्या कॉन्टॅक्ट्सवर जमवायला कौशलला कठिण नाही हे कळत होतं पण अशी वेड लागलेली माणसंच इतिहास घडवतात हेही खरं...
२०$ काय किंवा ५०० रु. काय सर्वसामान्य माणूस आपल्या एकावेळच्या बाहेर चांगल्या ठिकाणी जेवायला यापेक्षा जास्त पैसे उडवतो. एकदा ठरवुन नाही खाल्लं तरी आपण हे डोनेशन करु शकतो या अर्थाची मेलही त्यावेळी मी माझ्या काही संबंधीतांना केली होती..कारण मलाही या भूमिकेमागचा सच्चेपणा पटला होता.
जेव्हा ही सीडी पूर्वनियोजित तारखेला प्रकाशीत होऊ शकली नाही तेव्हा त्याबद्दलची दिलगीरी व्यक्त करणारी इ-मेल स्वतः कौशलनी सर्वांना पाठवली आहे..त्यानंतर जेव्हा सचिनकडे या गाण्याची पहिली अप्रकाशीत कॉपी आली तेव्हा त्याने त्याच्या गाडीत नेऊन आम्हाला ऐकवली. तो दिवसही आठवतो कारणे नेमकी कोजागिरी होती आणि आम्ही एका गेट-टुगेदर साठी भेटलो होतो. ती ऐकवताना खरं सचिनची एक प्रामाणिक भावना होती जी कौशलचीही असणार की तुम्ही जे काही पैशाचं योगदान देताहात त्यावर काम सुरू आहे. अतिशय सुंदर गीत आहे अगदी लिटिल चॅम्प मधल्या मुग्धा पासुन ते आताच्या आणि लिजेंड कॅटेगरीतल्या सर्व गायकांचे आवाज आहेत..फ़ायनल व्हर्जन ऐकायला खूप उत्सुक आहे.
ओरेगावात आल्यावर बदलेल्या पत्यांसंदर्भात जेव्हा कौशल बरोबर इमेल झाली तेव्हा न विचारता त्यांनी आता ही सीडी मराठी भाषा दिवशी म्हणजे २७ फ़ेब्रु. २०१० ला होईल म्हणून (न विचारता) कळवलं तेव्हापासुन मनातल्या मनात देवाला सांगत होते की मराठीसाठी जे काही हा माणूस इतकं खपून करतोय त्याला यश दे. इतके दिवसात आता वृत्तपत्रात वगैरे जेव्हा या सीडीची बातमी वाचते तेव्हा बरं वाटतंय की आता आणखी विलंब न होता ही सीडी उद्या प्रकाशीत होतेय आणि खर्‍या अर्थाने हा मराठी भाषा दिवस खास प्रकारे साजरा होणार आहे...
अनेक शुभेच्छा कौशल इनामदार यांना या प्रकल्पासाठी. सीडीच्या आमच्या कॉपीसाठी वाट पाहु आणि या ब्लॉगच्या सर्व वाचकांनाही मराठी भाषा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

Wednesday, February 24, 2010

विंटर ऑलिंपिकमध्ये हिंदी गाणी...

२०१० चं विंटर ऑलिंपिक सध्या कॅनडामधील व्हॅंकुव्हर इथे चालु आहे. अमेरिकेचे मेरिल डेव्हिस आणि चार्ली व्हाइट यांनी बॉलिवुडमधल्या काही गाण्यावर अप्रतिम आइस डॅन्स केला. त्यांचे कपडेही थोडेसे भारतीय पद्धतीचे वाटावे असे रंग, दागिने इ निवडलंय..त्यांना प्रेक्षकांची उभी राहुन प्रशंसा मिळाली आणि ऑलिंपिकमध्ये सिल्व्हर मेडल..आपल्याला माहित असलेल्या गाण्यावर एखादं पाश्चात्य आणि तेही बर्फ़ावरच्या स्केटिंगचा नाच कसं करतात हे पाहायचं तर हा व्हिडिओ नक्की पहा. मागच्या ऑस्करमध्ये गाजलेल्या ’जय हो’ या गाण्यावरही या जोडीने नृत्य केलंय..

हे खेळ आपले वाटो न वाटो पण गाणं आपलं असलं की पाहाताना छान वाटतं नाही??

Monday, February 22, 2010

रेडिओ

लहानपणी रेडिओचं इतकं वेड होतं की खेळताना पण "रेडिओ आणला.धुतला पुसला (आणि मग हाताला चिमटा काढुन) लता मंगेशकरचा आवाज कसा आला?" असा खेळ खेळायचो..टिव्हि तेव्हा आला होता पण माझ्या घरी तो यायला माझ्या भावंडांची दहावी आणि माझी आठवी इतकं उजाडावं लागलं...पण रेडिओ नक्की केव्हा आणला हे आठवत नाही म्हणजे नक्कीच अगदी मी खूप लहान असल्यापासुन असणार. त्यामुळे एकटं असताना रेडिओ ऐकणं हा माझा अजुनही आवडता कार्यक्रम आहे..


शाळेच्या वयात "बालदरबार" हा एक अतिशय आवडीचा कार्यक्रम होता. त्यावर बोक्या सातबंडे ही मालिका ऐकली होती आणि मला वाटतं बुधवारी आणि शुक्रवारी रात्री आठ वाजता गाण्याचा एक कार्यक्रम होता त्यात कुठल्या तरी शाळेच्या (प्रसिद्ध शाळा असायच्या पार्ले टिळक. बालमोहन अशा त्यामुळे माझं रेडिओवर निदान समुहगान गायचं स्वप्न केवळ फ़ेमस शाळेत नसल्यामुळे भंगलं असं मला म्हणायला आवडतं..असो...कंस पुर्ण करायला हवा) तर बुधवारी त्या समुहगीताची चाल त्या मुलांना शिकवली जायची आणि मग शुक्रवारी तेच गाणं परत गाऊन घेतलं जायचं..जास्त प्रसिद्ध नसलेली पण निव्वळ बालदरबारमध्ये शिकवलेली म्हणून कितीतरी गीतं अशी पाठ झालेली आठवतात.म्हणजे अगदी आठवायचं झालं तर "प्राणाहुनही प्रिय आम्हाला अमुची भारतमाता, या भूमीच्या धुलीकणांनी सजवु अपुला माथा" इतकी सुंदर चाल आहे नं..फ़क्त आता कोणते गीतकार आणि संगितकार त्या कार्यक्रमात यायचे तेवढं मात्र आठवत नाही...शाळेत असताना जितकं आवडीने बालदरबार ऐकायचो तसंच गंमत जंमत म्हणूनही एक कार्यक्रम होता त्याचं टायटल सॉंग माझ्यासारखंच बर्‍याच जणांन आठवत असेल..."गंमत जंमत या या गंमत जंमत, ऐका हो गंमत जंमत हो हो गंमत हो जंमत..." असं...पण फ़क्त लहान मुलांचेच कार्यक्रम ऐकायचो असंही नाही.

आई-बाबा कामावर जायच्या आधी रेडिओच्या घड्याळ्यावर त्यांची कामे चालायची म्हणजे सकाळचे संवादच असे की "बातम्या झाल्या तरी आज अजुन डबे भरले नाहीत" किंवा "आज उठायचं नाही का? राजाभाऊपण आले"..हे सर्व कार्यक्रमही कान सराईतपणे ऐकायचे आणि त्यामुळे सवासातला लागणार्‍या मराठी गाण्यांनी दिवस सुरू व्हायचा तो ती गाणी मनात ठेवुनचं..मग साधारण आठेक वाजताच्या सुमारास मुंबई ब वर जाऊन तिथे हिंदी गाण्यांचा फ़डशा पाडायचा असे. साडे-नऊला शाळेत जायला निघेपर्यंत रेडिओ चालु असे. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा "सांजधारा" हा ब वरच लागणारा मराठी भावगीतांचा कार्यक्रम. संध्याकाळच्या वेळ आशा भोसलेंचं "जीवलगा" किंवा लतादीदींचं "मालवुन टाक दीप" ऐकताना दिवस संपल्याची हुरहुर वाढायची. तसंच अनिल-अरुण यांनी संगितबद्ध केलेली आणि अनुराधा पौडवालनी गायलेली "पिया साहवेना हा एकलेपणा", "गीत प्रितीचे कुठे हरवले सख्या" यासारखी कितीतरी सुंदर गाणीही इथेच परिचयाची झाली. नंतर मग अभ्यास आणि खेळ असले तरी सात वाजता फ़ौजी भाईंयोंसाठीची गाणी आणि भूले-बिसरे गीत यामुळे अनेक हिंदी गीतंही त्यावेळी तोंडपाठ असत. चित्रपट पाहायचा विशेष छंद नसला तरी अनेक छान छान हिंदी आणि मराठी गाण्यांनी ते दिवस भारावलेले असत. आणि त्यासाठी आमचा जुना रेडिओच आमचा सखा बनला होता. तेव्हा सिलोनवर मला वाटतं बुधवारी आठ वाजता अमीन सायानीचं "भाईयों और बहनों"आमच्याही रेडिओवर यावं म्हणून माझा दादा काय काय युक्त्या लढवायचा आणि कितीही खरखर का असेना राजहंसाला फ़क्त पाण्यातलं दूध पिता येतं तसं आम्हाला तिथे फ़क्त अमिन सायानीचं बोलणं आणि नव्या गाण्याचा त्या आठवड्यातला नंबर आणि टॉपचं गाणं एवढं बरोबर ऐकायला यायचं..

काळ पुढे गेला आणि कामावरुन घरीच यायला रात्र होऊ लागली. टिव्हीचं आक्रमण होतंच शिवाय आता वेळही कमी मिळायचा पण तरी सकाळचा रेडिओ आणि निदान रविवारचं सांजधारा बरीच वर्ष आमच्या घराचा एक अविभाज्य अंग होता.

देश बदलला पण रेडिओची आवड तशीच फ़क्त आता ती इथली चॅनेल्स, एन.पी.आर. आणि कंट्री क्लासिकची चॅनेल्स यापुरता मर्यादित आहे. प्रवासाला जाताना कितीही छान छान सी.डी. एम.पी थ्री असल्या तरी रेडिओ ऐकणं होतंच..तरीही हिंदी मराठी गीतं रेडिओवर ऐकायची इच्छा व्हायचीच...मग केव्हातरी eparasaran ची लिंक मिळाली. माझ्या दोन प्रोजेक्ट्स मधला, म्हणजे शुद्ध शब्दात 'बाकावरचा काळ' या चॅनेलने सुसह्य केलाय.

मला रेडिओवर ऐकायला मिळणार्‍या गाण्याबद्द्ल सगळ्यात जास्त काय आवडतं ते म्हणजे पुढचं गाणं कुठच्या मुडचं येईल काही कल्पना नसते पण गाणं सुरु होतं, आपण ऐकायला लागतो आणि नकळत त्याच मुडचे होऊन जातो. पुढच्या गाण्याला पुन्हा वेगळा मुड..जसं "ए री पवन" मधला लताचा आवाज मुग्ध करून काश्मीरच्या खोर्‍यात घेऊन जातो तसंच झटक्यात "रिमझिम गिरे सावन" ने आपण परत चौपाटीवरच्या उसळत्या दर्यावर येतो.आपल्या मनाला इतकं छान झुलवायची ताकद रेडिओच्या आपकी पसंदमध्ये आहे हे माझ्यासारखे रेडिओवेडे नक्कीच मान्य करतील.

Friday, February 19, 2010

हिंदोळे मनाचे...

तो दिवस अजुनही तसाच लक्षात आहे जेव्हा कळलं की माझ्या पोटात तू आलायस...आणखी काही आठवड्यांनी तर व्यवस्थित डोकं, हात पाय असं सावलीसारख्या काढलेल्या लहानशा चित्रासारखं तुझं रुप पाहुन विश्वासच बसत नव्हता की अरे हे तर माझ्याच शरीरात वाढतंय...मग एक चाळा सुरू झाला.वाटायचं प्रत्येकवेळी डॉक्टरने तुला दाखवावं. पण ते तसं नसतं मग पाच-सहा महिन्याचा खरं उण्या म्हणजे वजा पाच-सहा महिन्याचा म्हटलं पाहिजे तेव्हा तुला पाहताना तुझं ते अंगठा चोखणं पाहून पुन्हा एकदा मुग्ध झाले. आणि नंतर मात्र जसंजसं तुझं ते उणं वय वाढायला लागलं तशा बसणार्‍या लाथा अम्म्म...लाथा नको फ़ार कठोर शब्द आहे ते...तुझं ते ढोसणं आवडायला लागलं..आणि मग पोटाला हात लावुन तू आहेस का हे तपासणं हाही एक चाळाच..मला वाटतं त्या साडे-आठ महिन्यांत मन फ़क्त तुझ्याच आठवणींच्या झोक्यावर झुलत होतं...छोट्या छोट्या गोष्टी संध्याकाळी बाबांबरोबर, फ़ोनवर आज्जीबरोबर उगाळत होते...मैत्रिणींकडेही तेच...काय खाऊ?? तुला काय आवडेल?? व्यायाम सगळं काही तुझ्यासाठी...रात्रीचे ज्युलीबरोबरचे ते वॉटर योगा म्हणजे तुझं फ़ेवरिट हे मलाही कळलं होतं..म्हणून तर हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत आपण तो क्लास बुडवला नाही...


नंतर मग तू आलास तो क्षण म्हणजे तर काय हर्षवायुच...तिथल्या सगळ्या बाळांपेक्षा वेगळा, सर्व मुलामुलिंत एकटाच छान काळं जावळ असणारा. आणि त्यानंतर तू सगळंच विश्व व्यापलंस..फ़क्त माझंच नाही तर बाबा, आज्जी आणि सगळ्यांचचं...आता तुझं अधिक वय आणि प्रत्येक महिन्यांत होणारं काही ना काहीतरी यापाठी तास, महिने, दिवस कसे जात होते ते कळलंच नाही.. वाढदिवसाच्या आतच अडखळत चालणारा तू पाहुन मीच पडायचे खरं तर..पण तरी तुला सावरण्यासाठी नेहमीच होते...आम्ही दोघंही आणि गेल काही महिने आज्जी पण...

पण आज तुझं डोळ्यात पाणी आणून मलाच टाटा करणं आणि त्याही अवस्थेत पापा देणं फ़ार अस्वस्थ करुन गेलं रे...असं पहिल्यांदाच झालंय की मी एकटं घर माझी वाट पाहातेय..नेहमीच ’अप अप’ करत आपण दोघं आलो की पुन्हा असलेल्या पसार्‍यात भर घालायचा तुझा छंद आणि ओरडायचा माझा...दोन्ही आज खूप शांत आहेत...लवकर झोप रे असं तुला म्हणणारी मी आज जेवणाची वेळ टळून गेली तरी कसला तरी विचार करत तशीच बसलेय...

मला अपराधी वाटतंय का?? कदाचित हो...पण बाळा ज्याठिकाणी आपण राहातोय आणि पुढे ज्या परिस्थितीत तुला जावं लागेल ना, त्यावेळी फ़क्त माझा आश्वासक हात पाठीवर असून फ़ायद्याचा नाही रे...आज तू रडतोस (आणि मी जास्त); पण उद्या तू तिथेच रमशील आणि माझं मन मात्र आपल्या आठवणीच्या हिंदोळ्यावर झोके घेत तसंच हेलकावत राहिल...

तुझी आई...१९ फ़ेब्रु. २०१०

Thursday, February 18, 2010

माझी बेकिंग गुरु...

तशी याआधी दोनदा माझ्या ब्लॉगमधुन तुम्ही भेटला आहात तिला. एकदा माझी सखी शेजारीण म्हणून आणि नंतर आम्हाला खेकडेगिरी करवताना. आणि आता यावेळी तिची ओळख करुन देते ती तिच्या गृहिणी रूपातली.


मुळात जेवण कसं करतात याबद्दल मला बरंच कुतुहल आहे (करण्याचा आळस असला तरी) त्यामुळे भारतात असताना संजीव कपुरचं खाना-खजाना अगदी मन लावुन पाहायचे तसंच इथंही फ़ुड नेटवर्क अगदी आले त्या महिन्यापासुन आजतागायत पाहाते. स्वतः काही करायचं असेल तर मला अगदी डिटेल रेसिपीच लागते आणि तरी खूपदा पदार्थ करताना पोपटच होतो. म्हणून जरी घरी बरेच प्रकार मी करुन पाहाते आणि ते कधी जमतात कधी फ़सतात तरी एक गोष्ट मी कधीच केली नाहीये किंवा त्या वाटेलाच गेले नाही म्हणा ना..आणि ते म्हणजे बेकिंग.

सुरुवातीला साशाशी झालेली ओळख मैत्रीत बदलत गेली. आणि कसं काय माहित पण या माझ्या प्रिय मैत्रीणीने बहुतेक माझं पाककलेतलं सद्य ध्यान(?) लक्षात न घेता, बेकिंग हा साधारण इथे जास्त प्रमाणावर केला जाणारा प्रकार मला शिकवायचा तिने चंगच बांधला..अर्थात तिच्या आग्रहाला मलाही नाही म्हणवलं नाही आणि मुख्य माझ्या आईलाही मी असं काही शिकावं असं वाटत होतं त्यामुळे आई परतायच्या आधी आईच्या आवडीचा कॅरेट केक करुया म्हणून मी तिला म्हटलं...खरंतर जेव्हा मी तिला म्हटलं "बाई, मला आता सांग काय काय आणि किती किती आणू?" तर तिचं म्हणणं आपल्या इथल्या कुठल्याही शेजारणीसारखं.."काय कमी पडलं तर मी देईन नं?" आणि माझी आई म्हणजे "हे बघ, तिचे नोकरीचे प्रश्न चालु आहेत. त्यामुळे तिला खर्च लावु नकोस". दोघींच्या कात्रीत मी मात्र देवा आता सगळं एकदा नीट निस्तरू दे हाच धावा करायची बाकी होते...असो काही कमी पडलं नाही पण पठ्ठीने बहुतेक ठरवलं होतं की माझ्या आईला तिच्यातर्फ़े काही द्यावं म्हणून खास ऑरगॅनिक गाजर आणून ठेवले होते आणि हट्टाने तेच वापरले..

पण तिला कॅरेट केक करताना पाहताना मला माझी आई, मावश्या, शेजारच्या छान छान पदार्थ करणार्‍या काकी सगळ्या सगळ्या आठवल्या. कारण त्या जसं "घाल अंदाजे" करतात आणि त्यामुळे माझ्यासारख्या होतकरुंच काहीच होत नाही तसंच ती काही काही पावडरी,इसेन्स अंदाजे घालत होती. पुन्हा मला तिच्याकडे लिहुन ठेवलेली सविस्तर रेसिपीसुद्धा दिली पण प्रत्यक्ष करताना ना तिने ती पाहिली ना पाळली. असो...हा कॅरेट केक खूपच छान झाला होता हे सांगणं न लगे.

मला आधी एक गोल ट्रे भरपुर होईल असं वाटलं होतं पण तिने दोन केले आणि बरं केलं. पहिला कसा संपला ते कळलच नाही. आणि दुसराही अगदी चाटुन पुसून लवकरच संपला. खरंतर तिची करण्याची पद्धत खूपच सोपी वाटत होती आणि तसं तिनं म्हटलंही. पण तरी मी स्वतः अजुनही दुसरा केला नाहीये. पण बहुधा करेन.

त्यानंतर दुसरं प्रपोजल तिचंच होतं माझ्या आवडत्या "बिस्कॉटीचं". ही एक इटालियन पद्धतीची दोनदा बेक केलेली कुकी. अमेरिकेत चहा-कॉफ़ी बरोबर खायला छान (आणि तशी सुपर मार्केटमध्ये थोडी चढ्या भावाने मिळणारी) इतकंच माझं नॉलेज होतं. ही पण खरंतर कधीच बनवणार होतो पण मग मध्ये आईची निघायची तयारी, ती स्वतः तिच्या बोटीच्या कामात व्यस्त, मग मला आई मदतीला नसल्याने वेळ नाही या सगळ्या प्रकारात आज एकदाचा वेळ मिळाला तिला आणि मलाही. यावेळी मी सगळं सगळं घेऊन गेले अगदी आठवणीने आणि मला मैदा टाळायला आवडतो हे मागच्या वेळी साशाला कळल्यामुळे मागेच एकदा आम्ही एकत्र एका सुपरमार्केटमधुन स्पेल्ट या नावाने मोड आलेल्या गव्हाचं जे पीठ मिळतं ते घेतलं होतं. आणि मला आवडतात म्हणून अक्रोडही त्यात टाकण्यासाठी घेतले होते.

पण तरी यावेळी आरुषला आवडतील म्हणून तिनं थोडे चॉकलेट चिप्स घातलेच म्हणा. रेसिपी बाहेरही न काढता सरळ तिच्या भाषेत on top of her head असल्याने मागच्यावेळेसारखंच थोडं इकडचं तिकडचं घालुन केलं पीठ मोठ्या लाकडी चमच्याने कालवायला सुरुवात केली. शिकताना या पीठाला हात लावायचा नाही हे मुख्य सांगितलेलं असतं कारण बहुधा हाताच्या उष्णतेने जास्त मऊसर होऊ शकतं.


डबल बेक म्हणजे सुरुवातीला जो पीठाचा गोळा इतका पातळ दिसतो तो की अर्धवट बेक होऊन बाहेर आलेलं त्याचं जाडं रुप पाहुन मला तर अजि म्या ह्ये काय पाहिले असंच झालं. मग त्याच्या कापुन कुकीज करुन पुन्हा बेक करायच्या मग तो प्लेटमधला फ़ोटो दिसतो तशा बिस्कॉटिजचा डोंगर हजर....आता फ़क्त चहा आणि ताज्या ताज्या बिस्कॉटी....

तिने शाळेचा विषयच काढला म्हणून मी तिला विचारलंही त्याबद्द्ल तर बहुधा तिनं बेकिंग सोडून इतर गोष्टी म्हणजे near the flame in a small pan वाल्या शिकल्या असाव्यात आणि आपल्या कॉलेज जीवनात एका डॉक्टर जोडप्याच्या घरी त्यांच्या मुलांना संध्याकाळी पाहता पाहता जेवण करायची नोकरीही केली आहे ही जास्तीची माहिती मला मिळाली.

 
इथे एकंदरित काम करुन शिका असं सगळीच सरसकट करतात त्यामुळे जितक्या सहजपणे ते सांगितलं जातं तितकं ते आपल्या सहजी पचनी पडत नाही. पण ही खूप कामसू आहे हे माझं जुनं मत नेहमीच मी असे तिचे अनुभव ऐकते तेव्हा पक्कच होतं.असो.. आजची बिस्कॉटी करताना मी किती शिकले मला माहित नाही पण खाताना मात्र आतापर्यंत खालेल्ल्या सगळ्या बिस्कॉट्या एकीकडे आणि ही त्या सगळ्यांच्या वर इतकंच म्हणू शकेन..

फ़ार वाटतंय एकदा स्वतःही केक आणि बिस्कॉटी करुन पाहीन...करेन नक्की पण आज मात्र माझ्या या पोस्टद्वारे माझ्या या बेकिंग गुरुला सलाम.

Tuesday, February 16, 2010

लहान मुलांसाठीचं museum...

Museum पाहायचं म्हणजे आमच्यासारखे क्वचित या वाटेला जाणारे लोक कंटाळतील...अर्थात डि.सी.ची (चकटफ़ु) नासा आणि नॅचरल हिस्टरीसारखी काही अपवाद वगळता आम्ही तशी म्युझियम पाहातो पण तरीही Children's Museum काय भानगड आहे याचं मला फ़िलाडेल्फ़ियाला राहात असल्यापासुन लागलेलं औत्सुक्य शेवटी एकदाचं ओरेगावातलं Portland Children's Museum पाहिलं तेव्हाचं काय ते शमलं..
म्हणजे तसं पाहिलं तर खास काही ठरवलं नव्हतं पण एकदा का जागा नवी असली (म्हणजेच मित्रमंडळ आटोक्यात असलं) आणि शिवाय घरी एक बिनचाकाचं पण सतत धावणारं गाडं असलं की असले इथे तिथे फ़िरायचे उद्योग करावेच लागतात. त्यात आमच्या इथली लायब्ररी पडली लाखो में एक वाली...अरे, म्हणजे किती सोय़ी तरी किती द्याव्यात त्यांनी??

आता नाही म्हटलं तरी माणशी आठ म्हणजे गेलाबाजार सोळा डॉलर वाचतात म्हटल्यावर कसं का निघेना जाऊन येऊया असं म्हणून त्यांचा फ़्री पास घेतला आणि निघालोच एका शनिवारी या छोट्यांसाठीच्या संग्रहालयाला.म्युझियममधली माहिती वाचणं म्हणजे आमचा बाबा डोक्याला ताप म्हणतो...तर मग या मुलांच्या म्युझियमच्या निमित्ताने आपल्या डोक्याला ताप देणार्‍याच्या डोक्याला थोडा ताप देता येतील का असा सुप्त कावाही होताच...हे हे...

नेहमीप्रमाणे शेवटच्या क्षणी जिपिएसचं नी आपलं न जुळणं...पुन्हा त्याच फ़्रीवेच्या दुसर्‍या बाजुने इथे कसं यायचं ही नको असलेली (आणि पुन्हा बहुतेक कधीच न लागणारी) माहिती पदरात पडणं आणि शेवटी कधी नव्हे ते एकमताने (हा योग तसा दुर्मिळच) इतकं मोठं लॅण्डमार्क आणि सालं एक्सिटला साईन नाही लावतं असं blaming session पार पाडुन पोचलो एकदाचे....

जागा कमी मिळाल्यासारखं किंवा मिळालेल्या जागेतच जास्तीत जास्त जागा मुलांसाठी जमेल तेवढ्या गोष्टींनी भरल्यासारखं काही मला आत येताना वाटलं. पण सुरुवातीलाच असलेलं अपुर्‍या जागेतला कॅफ़े आणि तिकिटांची खिडकी एवढं दोन ठिकाणची गर्दी वगळता आतुन चांगलं ऐसपैस आहे.

गेल्या गेल्याच पाण्याच्या खेळाचा विभाग काचेआडून दिसल्यामुळे आरुषचे आणि तिथे मुलांची सर्वात जास्त गर्दी दिसल्याने आमचे पाय आपसुक तिकडे वळले. मुलांचे कपडे भिजु नये म्हणून छोटासा रेनकोटसदृष्य प्रकारही आहे. एकदा तो चढवला आणि मुलांच्या स्वार्‍या हुंदडायला मोकळ्या.कुठे वाहत्या धारेखाली हात धर नाहीतर पाण्याला वेगवेगळ्या प्रकारे बांध घालुन पाहा, मग कुठे त्यात पाण्यात तंरगणारी खेळणी सोड नाहीतर नेहमीसारखं भांडं भरुन पाणी सरळ ओत; एक ना अनेक प्रकार फ़क्त पाण्याबरोबर खेळायचे. इतर वेळी घरी फ़क्त आंघोळीच्याच वेळी पाण्यात हात मारायला मिळतात इथं तर फ़क्त पाणीच पाणी चहुकडे म्हणजे बाहेर यायलाच मूल तयार व्हायचं नाही..

पाण्यातून बाहेर आलो तोच एक छोटं नाटकचं थिएटर दिसलं म्हणून तिथंही वळलो. एक छोटं स्टेज आणि मुलांना नटायला थोडे कपडे, विग असं सगळं ठेवलंल..पाहायला अर्थातच पालक वर्ग...नाटकात आमची प्रगती यथातथाच आणि त्यातुन थोडं काळोखी वातावरण त्यामुळे बाहेर आल्यावर जरा ग्रोसरी शॉपिंग आणि कॅफ़े (खोटं खोटं वालं...) मध्ये गेलो. तिथली खोटी फ़ळं, भाज्या, कार्ट हे सगळं इतकं realistic होतं की आम्हीच फ़सलो.

आमच्या मुलाने तर ब्रेड तोंडातच घालायला लावला होता. इथे जास्त गर्दी तीनेक वर्षांच्या पुढील मुला-मुलींची होती.

पण तीन वर्षांच्या आतील मुलांसाठी फ़क्त एक वेगळा विभागही आहे जिथे फ़क्त त्यांच्या उंचीवर खेळता येतील असे खेळ आणि उड्या मारायला गुबगुबीत गादी इ. होती. आम्ही अजून तरी त्याही विभागात जाऊ शकतो म्हणून तिथेही थोडावेळ काढला.एका बाजुला आम्ही निवांत बसलोय आणि दुसरीकडे आमचा मुलगा शांतपणे नवनवे खेळ खेळतोय हे जवळजवळ अशक्यच असलेलं दृष्य पाहताना वेळ कसा गेला कळलंच नाही.मग जरा खाऊ-पिऊही केलं. खरं तर इथले खेळ खेळताना मुलं तहान-भूक (आणि शी-शु सुद्धा) हरपतात पण आपलं नेहमीप्रमाणे घड्याळ्याकडे लक्ष असतंच नं...कॅफ़ेमध्ये फ़ार काही मिळत नाही.एकदम टिपिकल म्हणजे पिझा स्लाइस, ज्युस असं सर्व. हे ऑनलाइन पाहिलं होतं म्हणून मी आमच्यासाठी सॅंडविचेस आणि मुलासाठीपण त्याचं सर्व खाणं घरुनच घेतलं होतं.

इथे जास्तीत जास्त जागा म्युझियमसाठी वापरण्याच्या प्रयत्नात वर म्हटल्याप्रमाणे कॅफ़े खूपच छोटा वाटतो. त्यामुळे खरंतर शक्य असेल तर खाऊन-पिऊन मगच इथे यावं असं आम्हाला तरी वाटलं. पण तरी यांच्या रेस्टरुममध्ये गेल्यावर मात्र मजाच वाटली. कारण सरसकट सगळ्याच पॉटींची साइज छोट्या मुलांच्या हिशेबाने आहे...ही ही...असो.


आता बाजुलाच एक clifford the red dog या कुत्र्याचं घर कम गेम्स असं एक दालन होतं. तिथे या कुत्र्याची मोठी मुर्ती म्हणावी अशी मुलांना खेळण्यासाठी आहे तिच्या शेपटीवरुन छोटी मुलं तर जवळजवळ घसरगुंडी करतात आणि इथे मुलांना पत्रव्यवहाराची माहिती व्हावी अशा उद्देशाने पत्र लिहायची सोय आणि पत्रपेट्या इ. आहे. इथेही आमचा बराच वेळ त्या कुत्र्याच्या लहान आणि मोठ्या आकाराबरोबर खेळण्यात गेला.

मग असंच गोल फ़िरत होतो तर चक्क मातीकामाचाही एक विभाग दिसला आणि तिथेही आपसूक आमचे पाय वळले. इथेही लहान मुलांना कपडे खराब होऊ नये म्हणून प्लास्टिकचा ओव्हरकोट घालायची सोय आहे.

मातीही त्यांचीच आणि सामानसुमानही त्यांचंच. जर तुम्ही काही छान बनवलं आणि घरी न्यायचं असेल तर फ़क्त काही किंमत देऊन ते न्यायचं. नाहीतर तिच माती ते पुन्हा गोळे बनवुन वापरतात. आम्ही दोघं म्हणजे अगदी हाडाचे कलाकार...त्यामुळे जेमतेम एक पोळपाट-लाटणं बनवलं. आता हेही शिकलं पाहिजे असंही माझ्या डोक्यात आलं.

मी लहान असताना माझ्या आईच्या शाळेतल्या एका मुलाने मला एकदा अगदी हुबेहुब दिसणारा बैल बनवुन दिला होता ते आठवलं. आता आमच्या लेकाला असं काही दाखवायचं तर त्यालाच शोधावं लागेल...असो...आमची मर्यादित कलाकारी पार पाडून आम्ही तिथुन निघालो ते थेट छोट्या ट्रेन्सच्या दालनात.

इथे खूप सारे लाकडी ट्रॅक्स, इंजिनं, डबे, बोगदे, पुल असं सगळं सामान होतं आणि मग जोडा आणि दौडा असा जामानिमा होता.

इथे आमचा बाबा आणि बच्चा हे इतके रमले की आई आपल्याबरोबर आहे हेही त्यांच्या लक्षात नव्हतं. सगळी मुलं एकमेकांना सांभाळून खेळत होती हेही विशेष. इतक्यात दोन वाजताच्या स्टोरी टाइमची घोषणा झाल्याने सगळी जणं त्या झाडाखाली धावली. गोष्ट कळण्याच्या वयात अजुन आमचं लेकरू नाही त्यामुळे तिथली एकदम अनोळखी बाई आणि तितकीच अनोळखी गोष्ट पाहून त्याने रणशिंग फ़ुंकल्याने आमचा नाविलाज झाला...

तसं सगळंच पाहुन मजा करून झालं होतं त्यामुळे मग थोड्याच वेळात परतीच्या प्रवासाला लागलो. ही एवढी धमाल करुन थकलेलं माझं लेकरू अगदी गाडी हमरस्त्याला लागायच्या आधीच झोपलंही आणि आम्ही मात्र चला कसं दमवलं, परत यायला पाहिजे एकदा, चारेक तासासाठी छान टीपी आहे असा अगदी प्रसन्न मूड घेऊन परतताना मला तिथल्या एका भिंतीवरचं एक वाक्य आठवत होतं....

"Scientist and babies belong together because they are the best learners in the universe"

Friday, February 12, 2010

फ़ुलोरा..चांदोबा चांदोबा

वय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर ती रात्र झाली की नातवाला हमखास चांदोबा दाखवते आणि मग हा चांदोमामा पुढे संपुर्ण बालपणचा सवंगडी बनतो. आमच्याकडेही सध्या ही फ़ेज चालु आहे. त्यामुळे रात्री दूध प्यायचं नसलं किंवा झोपायला टंगळमंगळ झाली की आम्ही सरळ चांदोमामाला सांगतो आणि मग आमची बरीच कामंही होतात..फ़क्त सध्या जिथे आहोत तिथल्या हिवाळ्याचा एक मोठा प्रश्न म्हणजे इथे सारखं पावसाळी असतं आणि पाऊसही असतो. त्यामुळे आम्ही आपलं "चांदोबा चांदोबा कुठे रे गेला?"चा धोश लावतो..पण तरी तो असतो असं सांगुन ठेवलंय त्यामुळे आधी सांगितलेल्या प्रसंगी चांदोमामा खूप उपयोगी पडतो.

माझ्या लहानपणी हे गाणं आम्ही भावंडं रेडिओवर ऐकुन ऐकुन खूप म्हणायचो. त्यामुळे जसंच्या तसं लक्षात आहे. मला त्याची mp3 शोधायला खरं म्हणजे कंटाळा आला आहे. त्यात तिन्ही कडव्यांची चाल वेगवेगळी आहे त्यामुळे माझाही थोडा गोंधळ झाला आहेच पण पुन्हा रेकॉर्ड करायचा कंटाळा...फ़ॉर चेंज मी ते माझ्या बाळाला ऐकायला रेकॉर्ड केलं ते इथे उपलब्धही आहे. (पण आपल्या जबाबदारीवर ऐका ही तळटीप..)
अरे आणि हो हे गाणं आशा भोसले आणि वर्षा भोसले यांनी गायलंय हे माहित असेलचं पण ते ग.दि.माडगुळकरांनी लिहिलंय हे आताच मायाजालावर कळलं तर माझा आनंद अजुनच वाढलाय. त्यामुळे या महिन्यासाठी चांदोबाच गाणं सगळ्या बालदोस्तांसाठी आणि ज्यांनी हे त्यांच्या लहानपणी ऐकलं असेल त्या सगळ्यांसाठी....

चांदोबा चांदोबा भागलास का?
निंबोणीच्या झाडाखाली लपलास का?
निंबोणीचे झाड करवंदी
मामाचा वाडा चिरेबंदी

आई-बाबांवर रुसलास का?
असाच एकटा बसलास का?
आतातरी परतून जाशील का?
दूध अन शेवया खाशील का?

आई बिचारी रडत असेल
बाबांचा पारा चढत असेल
असाच बसून राहशील का?
बाबांची बोलणी खाशील का?

चांदोबा चांदोबा कुठे रे गेला?
दिसता दिसता गडप झाला
हाकेला ओ माझ्या देशील का?
पुन्हा कधी आम्हाला दिसशील का?

Monday, February 8, 2010

एक दिवस नेटोपासाचा....

खेकडेगिरी झाली आता हा नेटोपास म्हणजे काय प्रकार आहे बुवा? तर संधी सोडवा हे जे काही शाळेत आपण करायचो त्याप्रमाणे नेट + उपास असं म्हणजे "नेटोपास" की नेटुपास??. जाऊदे साध्या सरळ सोप्या शब्दात एक दिवस नेट बंद. बंद म्हणजे संपुर्ण बंद. जे जे काही नेट वापरुन आपण करतो ते सर्व एका दिवसासाठी बंद. थोडक्यात मायाजालात एक दिवसासाठी गुरफ़टायचं नाही.
आता हा जो रविवार गेला त्यादिवशी मी खास हा एक दिवसाचा नेटोपास केला होता. कारण असं काहीच नाही. तसं बरीच वर्षे म्हणजे अमेरिकेत आल्यापासुनचा जवळजवळ सगळाच काळ आपण मायाजालात पुरते गुरफ़टलोय हे लक्षात आलं होतं पण त्याला काही इलाज नाही असं वाटत होतं. म्हणजे अगदी मायदेशातले चित्रपट, बॅंकेचे व्यवहार, कामासाठी करावी लागणारी प्रवासाची रिझर्वेशन्स, जुन्या मित्र-मैत्रीणींबरोबर संपर्क सगळं कसं एका ब्राउजरवर गेलं की खतम... त्यामुळे आपण हळूहळू याचे व्यसनी होतोय हे मान्य केलं नव्हतं. शिवाय मुख्य म्हणजे त्याला काही पर्यायच नाही हेच मनात ठसलं होतं.रोज उठलं की आंघोळ करून देवाला पाया पडायच्या संस्कृतीतले आपण आजकाल पहिलं लॅपटॉप चालु करून बातम्या, मेल नाहीतर असेच काही उद्योग करतोय यात काही गैर आहे असंही वाटलं नव्हतं. अर्थात गैर आहे का हा दुसरा मुद्दा पण हेच काही जग नव्हे याची जाणीव आताशा जास्त होऊ लागलीय.
भांडणं करणं आणि रुसवे-फ़ुगवे हे नवरा-बायकोच्या आयुष्यातलं एक अविभाज्य अंग आहे हे मान्य पण आताशा बर्‍याच भांडणाच्या मुळाशी हे मायाजालात गुरफ़टणं कारणीभूत आहे असंही लक्षात आलं. शिवाय पुर्वी सारखं आता फ़क्त आपले आपण नसतो.आणखी एका जीवाला आपण या जगात आणलंय तर त्याचं दाणा-पाणी सोडूनही बर्‍याच गोष्टी आहेत ज्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि त्यासाठी मुळात आपण उपलब्ध असलं पाहिजे. बघावं तेव्हा आपण नेटवर खिळलोय हेही चांगलं नाही. म्हणून मग एक सुरुवात म्हणून हा प्रयोग खास रविवारी केला. एकतर सुट्टीचा वार म्हणजे तसं मागे कुठला वाघ लागला नाहीये. काही कामं थोडी निवांत केली तरी चालणारेत.
आता एक दिवसाचं मायाजालात गुरफ़टायचं नाही म्हणजे काय मग लॅपटॉपच कशाला चालु करा (आणि मोहात पडा एकतर वायरलेस कनेक्शन म्हणजे अस्तनीतला निखारा) म्हणून मग एक दिवस लॅपटॉपकडे पाहिलंच नाही.नेमकी खेकडेगिरीवर शनिवार-रविवारी वाचलेल्या प्रतिक्रिया असतील त्यांचाही मोह नको.मस्त सगळा वेळ घर, मुल आणि अशाच गोष्टींसाठी दिला. तरी नंतर दुपारनंतर कासावीस व्हायला झालं. काही नाही तर निदान आय-पॉडतरी चालु करुया असं वाटलं म्हणून मग तो मोह टाळण्यासाठी बर्‍याच दिवसांनी एकटी स्वतःसाठी वाचनालयात गेले.
अर्थात तिथेही नेटची सोय आहे पण आपल्याला तो विभाग माहितच नाही असं उगाच स्वतःलाच दाखवलं. खरं म्हणजे या भागात आल्यापासुन मी या वाचनालयाच्या फ़क्त बालविभागालाच जास्त भेट दिली आहे. आज तशीही एकटीच आले होते म्हणून जरा एक मोठ्यांच्या विभागाचाही रिव्ह्यु केला. खरंच खूप छान आहे यांचं कलेक्शन. C.D. section मध्ये भारतीय प्रवर्गात पं. रविशंकर आणि इतर क्लासिकल सी.डी पण आहेत शिवाय पुस्तकांबद्द्ल काय बोलावं. अगदी नवी पुस्तकं सुरुवातीलाच मांडून ठेवलीत. त्यातून एक पुस्तकही घेतलं.आणि तिथेच एका सोफ़्यावर बसून अर्धा-एक तास निवांत वाचत बसले. त्या पुस्तकाबद्द्ल पण जमलं तर लिहिन. सध्या फ़क्त नाव लिहिते my prison, my home काय योगायोग आहे. पण अर्थात याचा विषय वेगळा आहे. इथे होम हे तिच्या स्वदेशाबद्द्ल आहे. असो..मी खरंतर नाव वाचुन उचललंय आणि मग वाचायला बसले तेव्हा आवडलं म्हणून घेतलंय. आता किती सातत्याने वाचायला जमतंय देव जाणे. खरंतर कदाचित अजून बराच वेळ वाचत बसले असते पण घड्याळाकडे लक्ष गेलं तेव्हा म्हटलं लेकाची उठायची वेळ झाली असेल आणि बाबाला सुचनाही जास्त दिल्या नाहीयेत त्यापेक्षा गेलेलं बरं.
निघताना लक्षात आलं की छान सुर्यप्रकाश पडलाय त्यामुळे मग घरी आल्यावर पुन्हा लेकाला घेऊन बाहेर पडलो. बरेच दिवस झाले त्याला पावसाळी बुट घ्यायचे होते त्यानिमित्ताने बरीच सटरफ़टर खरेदी करून अंधार पडल्यावर घरी आलो.
रात्रीची जेवणं उरकून मुलगा झोपल्यावर पुन्हा तोच नेटचा भुंगा डोकं पोखरत होता पण यावेळी आय-पॉडवर पु.ल.ची "नवे ग्रहयोग" ऐकत बसले. तसंही जवळजवळ रोज रात्री मी पु.ल. ऐकते. झोपायच्या थोडा वेळ आधी थोडं हलकंही वाटतं आणि काहीवेळा दिवसभर काही ऐकणं झालं नसलं की मग मला हेच बरं वाटतं.
सरतेशेवटी सोमवारी उठल्यावर मात्र बास झालं चला सोडुया आता उपास असं म्हणत होते असं म्हणून एकदाची मेलबॉक्स उघडली आणि गुगलबाबांनी नेमकी साइन इन करता करता लगेच टिप दिली, If you have forgotten password for this email id, do you remember we can send it to *****@***.com?? Gosh!!! मी म्हटलं यालाही कळलं की काय काल एका माणसाचा नेटोपास होता म्हणून....

Saturday, February 6, 2010

खेकडेगिरी

बरेच दिवसांपासून आमची शेजारीण साशा तिची बोट पाहायला जाऊया म्हणत होती. या ना त्या कारणाने ते जमलं नव्हतं पण दोनेक आठवड्यापुर्वी तिच्या बोटीला गिर्‍हाइक आलं आणि मग तिनं पुन्हा एकदा तो विषय काढला. खरं तर माझ्या नवर्‍याला का कुणास ठाऊक थोडं विचित्र वाटत होतं अर्थात त्याला कुणामध्ये मिसळायला माझ्यापेक्षा जास्त वेळ लागतो त्यामुळे ते साहजिकच होतं म्हणा पण त्यादिवशी जेव्हा ती म्हणाली की आपण बोटीवर जाऊ आणि थोडे खेकडे पकडू म्हणजे थोडक्यात lets go crabbing.. हा निरोप नवर्‍याला दिला आणि मग मात्र "अरे चला चला.. लवकर जाऊया" असं लगेचच चालु झालं. शेवटी मागच्या रविवारी आमची वरात पॅसिफ़िक कोस्टच्या न्यु पोर्ट बंदराकडे निघाली.

आम्हाला साधारण तीनेक तास ड्राइव्ह अंतरावर हे बंदर आहे आणि आमच्या गाईड साशाने आम्हाला येताना आणि जाताना वेगवेगळ्या रस्त्याने नेलं. याआधीही मी तिच्याबरोबर एक-दोन जवळच्या ठिकाणी गेलेय आणि हिला या भागाची खूप छान माहिती आहे हे माहित झालं होतं त्यामुळे तिच्याबरोबर जाताना GPS चक्क काढुन ठेवायचं आणि डोळ्यांना सृष्टीसौंदर्य पाहायला तयार ठेवायचं बास.....
न्यु पोर्टला जाताना आम्ही कोर्व्हेलिसवरून गेलो आणि येताना पॅसिफ़िक कोस्टच्या सिनिक बायवे वरून सगळे फ़्री वे टाळून आलो. दोन्ही रस्त्यांनी जाताना वेगळाच नजारा होता.जाताना दोन्ही बाजुला मोकळ्या शेती आणि मध्येच वळणावळणांच्या दुतर्फ़ा उंचच उंच देवदारांच्या रांगा, थोडावेळ देवदारांनीच गच्च भरलेले डोंगर अशी डोळ्यांचे पारणे फ़िटतील अशी सौंदर्यस्थळं होती. शिवाय आमच्या नशीबाने लख्ख सुर्यप्रकाशामुळे तो टिपिकल इथल्या थंडीचा पावसाळी फ़िल नव्हता आणि बाहेरही प्रसन्न वाटत होतं. आणि परत येतानाच्या रस्त्याचं तर मी शब्दात वर्णनच करू शकणार नाही. डावीकडे दिसणारा प्रशांत महासागर आणि वरखाली होत जाणार्‍या रस्त्यांमुळे मध्ये समोर येणारा दर्या आणि क्षितिज एकाच रेषेवर असं फ़ार छान दृष्य दिसे. या रस्त्यावर अर्धाअधिक वेळ प्रशांत महासागराला लागुनचा रस्ता म्हणजे हवाई बेटांमधील मौईतलं लनाईला गेलेलो त्याचीच आठवण व्हावी. अर्थात दोन्हीकडे महासागर तोच आहे त्यामुळेही का माहित नाही पण पुन्हा एकदा पॅसिफ़िक कोस्टने वेड लावलं..
साधारण साडे-अकरा वाजता आम्ही बंदरावर पोहोचलो म्हणजे आधी ठरवलेल्या वेळेच्या किमान एक तास उशीरा...म्हणजे तसं फ़िरायला जाताना त्यातही समुद्रकिनारी जायचं तर वेळेचं काय? पण आमच्या साशा गाईडचं खेकड्यांचं गणित होतं त्यासाठी ते आवश्यक होतं. कारण भरतीचं पाणी खाडीत शिरतं त्याने आत आलेले खेकडे ओहोटीबरोबर परत आत जातात त्यामुळे या मधल्या वेळातच त्यांना टपकावणे आणि मग मटकावणे यासाठी आज तरी आम्हाला ती वेळ साधायची होती. अर्थातच लेट्स ब्लेम इट ऑन आरुष म्हणून आम्ही आमच्या उशीरा निघण्याचं कारण त्याच्यावर ढकललं पण अधिक वेळ न दवडता गाड्या पार्क करुन लगेच इथे तिथे न बघत बसता माझा नवरा आणि साशा तिच्या बोटीकडे पळालेच. तिने खेकड्यांसाठी लावायला आधीच कोंबडीचं पॅकेट घेऊन ठेवलं होतं. त्यातलं थोडं चिकन एका हुकला अडकवुन मग तो संपुर्ण पिंजरा तिची बोट जिथे लावली होती त्याच्याच आसपासच्या पाण्यात ढकलुन ती दोघं इतर सामान उतरवायच्या तयारीला लागले. आरुषही गाडीतली त्याची छोटी झोप पुर्ण झाल्याने उठला होता त्यामुळे मग सर्वच बोटीत बसायला नि बंदर पाहायला निवांत झालो.

आता विकली गेल्याने बोट फ़क्त पाहाणारच होतो पण मुख्य डोळा खेकड्यांवर होता त्यामुळे सुरूवातीला थोडंफ़ार बंदर फ़िरलो, तिची बोटही आतुन पाहिली पण लक्ष मात्र ध्येयाकडे तसं खेकड्याकडे म्हणून शेवटी तिने एकदा तो पिंजरा काढुन पाहिला तर बर्‍यापैकी चिकन गायब होती पण जाल्यात मासली काय गावली नव्हती...अरारा....मग तो गळ बाहेरच्या बाजुने लटकावला होता त्याऐवजी आतल्या बाजुने लटकवुन मागच्या वेळी टाकला होता त्या बाजुला न टाकता जरा उजवीकडच्या अंगाने टाकुया असं ठरवुन पुन्हा पिंजरा आत ढकलला.साशाला मात्र बहुतेक उशीरा आलो असं वाटायला लागलं पण आम्ही काय तसेही नवशिकेच त्यामुळे वाट पाहात होतो.मग लेकाला करमेना म्हणून नवरा त्याला फ़िरायला घेऊन गेला आणि मला पण नुसतं पाहात बसून कंटाळा आला तसा मी तिला पुन्हा एकदा पिंजरा पाहायची गळ घातली..तिनेही काढुन पाहिला तर मी तर उड्याच मारायला लागले आणि आतापर्यंत बर्‍याचदा खेकडे पकडले असले तरी तिही जाम खूश झाली. चक्क मोठ्ठे दोन काळे ढोण खेकडे गळाला म्हणजे आपलं ते पिंजर्‍याला लागले होते.

आणि ही शूर बाई त्यात हात घालुन बिनधास्त त्यांना काढत होती. परत मला त्यातून नर मादी कशी ओळखायची हेही शिकवलं.मी पहिले तिला थांबुन फ़ोटो काढुन घेतले कारण मला माहित होतं इथल्या नियमात बसले नाही तर ती त्यांना सोडून देणार आणि मग परत नाही मिळाले तर निदान फ़ोटोत तरी असुदे.
जर तुम्ही discovery वरची deadliest catch series पाहिली असेल तर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर खेकडे कसे पकडतात हे साधारण माहित असेल आमची पद्धत साधारण तशीच पण जरा लो स्केलवरची म्हणायला हरकत नाही.तर हे आम्ही पहिले-वहिले पकडलेले dungenes crabs. पाठीच्या बाजुला पाहिलं तर जो त्रिकोण दिसतो तो नराच्या बाबतीत मादीपेक्षा छोटा असतो. आणि इथल्या कायद्याप्रमाणे तुम्ही एक विशिष्ट वाढ झालेले फ़क्त नरच आपल्याबरोबर पकडून नेऊ शकतात आणि त्यासाठी तुमच्याकडे शेलफ़िश साठीचं लायसन्स हवं (आता अर्थातच साशाकडे ते आहे)

ढोबळ मानाने फ़ोटोत दाखवलंय तसं खेकड्याच्या पाठीच्या भागातला सर्वात जास्त लांबीचा भाग एका डॉलरच्या नोटेच्या मापाइतकातरी पाहिजे. लहान असल्यास त्या खेकड्याला पुर्ण वाढ होण्यासाठी परत पाण्यात इमानेइतबारे सोडायचं. इथे सगळी लोकं हे सर्व नियम कटाक्षाने पाळतात. आता आम्ही वर पकडलेल्या दोन खेकड्यांपैकी एक थोडा कमी वाढीचा निघाल्याने वाचला पण हा पहिला मोठा मात्र आमचा हक्काचा आइसबॉक्समध्ये घातला.
आता या खेकडेगिरीत जरा जास्त रस आला म्हणून मग परत आधीच्या लकी जागेतच आमचा पिंजरा टाकुन पाहिला.तेवढ्यात लेकाल घेऊन नवरा आला आणि लक्षात आलं अरे याने काही पाहिलंच नाही मग त्याला बिचार्‍याला तो आइसबॉक्समध्ये चालणारा खेकडा दाखवला. मला परत पिंजरा पाहायचा आहे अशी त्यानेही गळ घातल्यामुळे त्यालाच म्हटलं बघ आताच टाकलाय तर काही लागलंय का तर ती जागा बहुतेक खरंच लकी होती. यावेळी तर तीन-चार खेकडे बसले होते. त्यातला एक हमखास लहान असणार म्हणून आधीच टाकला आणि दोघांची मापं घेतली तर एक थोडा कमी मापाचा निघाला मग हो नाही करता त्यालाही सोडलं आणि एक आमच्या पदरात पडला.

त्यानंतर अजुन एक खेकडाही मापाचा मिळाला. हळूहळू ओहोटी चालु झाली असणार आणि आमची जेवणं खावणं होऊन दुपारही टळत आलेली. आता आवरतं घेतलं पण अख्खा रस्ता आमच्या खेकडेगिरीच्या गोष्टी चालु होत्या. शिवाय परत जातानाच समुद्रकिनार्‍यालगतचा रस्ता डोळे सुखावत होता.
दुस‍र्याच दिवशी मला साशाने मेलवरुन खेकडे शिजवल्याचं कळवलं आणि ती नेहमी खाते म्हणून सर्वच आम्हाला देत होती पण थोडे मी तिला ठेवले.

माझ्या आईचा चिंबोर्‍याचा रस्सा माझ्यापेक्षा जास्त माझा नवराच आठवत होता पण यावेळी मला तो करता येत नसल्यामुळे किंवा असंच अमेरिकन पद्धतीने म्हणजे साध्या सरळ भाषेत उकडवलेलेच खाऊया असं ठरवलं.याला तिखट आवडतं म्हणून फ़क्त त्याच्यासाठी लाल मिरचीचा ठेचा बाजुला घेतला. खरं सांगते एवढं कष्ट करून, वाटणं घाटणं करुन वेळ घालवण्यापेक्षा असे खेकडेगिरी करून आणलेले खेकडे सरळ असेच शिजवुन खावेत.

अहाहा काय ते लुसलुशीत मांस आणि काय त्याची चव. I can say this was the best crabbing and the best crabs I ever had...Photos speak better than words..Enjoy!!!!!

तळटीप:
कधीपासुन crabbing साठी पर्यायी शब्द शोधतेय पण इंग्रजीत जशी to लावुन कुठल्याही शब्दाचं क्रियापद बनवायची फ़ॅशन आहे तसं आपल्याकडे नाही म्हणून वेळ गेला थोडा पण तरी ज्यांना नसेल कळलं त्यांच्यासाठी खेकडेगिरी म्हणजे शुद्ध भाषेत समुद्र किंवा खाडी (किंवा जिथे मिळतील तिथे) जाऊन खेकडे पकडणे..

Thursday, February 4, 2010

एक बंदिस्त क्षण...

आज बरेच दिवसांनी एक दुपार जमुन आली. बाहेर पावसाळी, आत मस्त हिटर लावल्यामुळे बाळ शांत झोपलंय आणि बाहेरच्या खोलीत फ़ायरप्लेसच्या बाजुला वाफ़ाळता चहाचा कप आणि एक पुस्तक घेऊन मी...बसल्या बसल्या अचानक जाणवलं की हे असं मागे कधी केलं होतं आठवत नाही म्हणून मग या जाम्यानिम्याचा लगेच एक फ़ोटो काढुन जणू काही या क्षणालाच कॅमेर्‍यात बंदिस्त केलंय...

फ़ोटोग्राफ़ीसाठी केलेला हा उद्योग नव्हे..त्यामुळे फ़ोटो कसा आहे त्यापेक्षा ही दुपार, हा फ़ोटो पाहिला की नेहमी आठवेल हेच काय ते पाहिलंय...खरं पाहिलं तर किती साधे क्षण असतात जे आपल्याला सगळ्यात जास्त आनंद देऊन जातात..जगातलं कितीही महागडं फ़र्निचर घेऊन दिलं तरी मला एक ऊशी पाठीला लाऊन जमिनीवर बसून अर्धवट दुमडलेल्या पायावर पुस्तक ठेऊन ते वाचायला फ़ार आवडतं. कॉलेजलाइफ़मध्ये याच पोझिशनमध्ये मी जर्नल्सपण लिहायला बसे..टेबल-खुर्ची मिळाली की टेबलावर डोकं ठेऊन चक्क झोपा काढाव्याशाच वाटत...
आता इथेही उजवीकडे सोफ़ा लावल्यानंतर ही थोडी जागा ठेऊन जो कोपरा तयार झाला ना त्यात त्या ऊशीला टेकुन पुस्तक वाचणं म्हणजे अहाहा...डाव्या हातात कप घेऊन वाचणारा माझा चेहरा त्यात स्वतःलाच दिसायला लागतो....त्यात दुसर्‍या बाजुला फ़ायर प्लेस म्हणजे दुधात साखर. आणि चहा म्हणजे तर काय...ये हुई नं बात....बसं इतनाही काफ़ी है और मुड चेंज...

Tuesday, February 2, 2010

कालच्या प्रतिक्रिया...

कालचाच नाही तर मागचे एक-दोन दिवस जरा जास्तच गडबडीचे होते..अरे मराठीब्लॉगज डॉट नेट पण करायला नाही मिळालं म्हणजे समजुन घ्या की राव..भटकंतीची लिहून ठेवलेली पोस्ट पण फ़ोटो कोलाजसाठी वाट पाहात फ़ोल्डरमध्ये पडून राहिली होती मग माझिया मनावर येऊन कसली कुरकुर करावी??
पण मग आपल्यासाठी एवढं खपून लिहिणार्‍या ब्लॉगर्सना वाचायला नको का? आणि वाचून आवडलं की त्यांना प्रतिक्रिया द्यायला नको का? म्हणून चक्क ctrl C आणि ctrl V ला साकडंच घातलं..भाग्यश्रीच्या पोस्टवरचं तन्वीच्या "सहीयत गं" मधला सही आणि आनंदच्या "भारीच" मधला च (माहित आहे मला हे जरा उलटच्या अ आ ई सारखं होतंय) आणि "आहेत" उचलले आणि केलं एकदाचं ctrl v झालं की नाही "सहीच आहेत?" त्याला पुढे चार पाच टिंब आणि एक माझावाला smiley दिला जोडून झालं आपलं माझ्या खर्याखु‍र्‍या प्रतिक्रियेसारखं...मग गेले हेरंबच्या पोस्टवर...बापरे त्या दारुवाली (आता तिचं हेच आडनाव होऊन जाऊदे) हं तर त्या दारूवालीचा एकदम ज्वलंत टॉपिक..म्हणजे प्रतिक्रिया नाय दिली तर हरकत नाय असा पन नाय...मग पुन्हा आनंदच्या प्रतिक्रियेबरोबर सूर जुळत होते मग घेतलं ctrl C आणि दिलं ठेऊन ctrl V..आणि खास माझं स्वतःचं +१..... आता तेवढं करता येतं की....पण प्रतिक्रिया मात्र मराठीत...चुरापावनेपण पाहिलं तर बर्‍याच दिवसांनी छान काहीतरी चुरून ठेवलं होतं..मग पुन्हा त्येच आपलं वरच्या मंडळीचं थोडं त्याच्याच पोस्टमधलं...ctrlcल केलं....आणि तयार झालं.."रिंग रॉंग रिंग रॉंग (रॉंग नंबरची रिंग ..... )हा हा हा.....एकदम धमाल ..............:)" नाही म्हणजे बाकी सगळं ठीक आहे पण एकदम धमाल?? काही अर्थ आहे का?? हे हे...पण राव मराठीत लिवलंय...आणि परतिकिया पण दिलीय वेळेत..(वेळेत ते एक महत्वाचं...) असो...
महेन्द्रकाकांच्या आणि रोहन यांच्या ब्लॉगवर गेलेच नाही...अजून एक-दोन तासात गेलं तरी चार-पाच पोस्ट्सचा कोटा राहिला असेल म्हणून एकदाच जाऊन घाऊकमध्ये वाचेन पण तरी अजुन काही टॉपिक आवडले...वाचले तर अजुन आवडले मग सोडला देवनागरी आणि ctrl C, ctrl V चा नाद आणि दिलं सरळ minglishmadhe.....
हे सर्व सांगायचं कारण?? काही नाही आता काय लिहू पेक्षा हे बरं वाटतंय...आणि मराठी टायपायचा स्पीड आलाय पण विषयांच काय?? संपले की काय?? आणि हो तुम्हाला पण असं कधी प्रतिक्रिया द्यावाश्या वाटल्या आणि त्याही हट्टाने मराठीत तर उचला ctrl C आणि वापरा ctrl V.....तुमचं माहित नाही पण माझ्यासारख्यांचा उत्साह भलताच वाढतो हं कॉमेन्ट्स मुळे आणि मग कदाचित आपोआप विषय सुचतात......