Tuesday, February 16, 2010

लहान मुलांसाठीचं museum...

Museum पाहायचं म्हणजे आमच्यासारखे क्वचित या वाटेला जाणारे लोक कंटाळतील...अर्थात डि.सी.ची (चकटफ़ु) नासा आणि नॅचरल हिस्टरीसारखी काही अपवाद वगळता आम्ही तशी म्युझियम पाहातो पण तरीही Children's Museum काय भानगड आहे याचं मला फ़िलाडेल्फ़ियाला राहात असल्यापासुन लागलेलं औत्सुक्य शेवटी एकदाचं ओरेगावातलं Portland Children's Museum पाहिलं तेव्हाचं काय ते शमलं..
म्हणजे तसं पाहिलं तर खास काही ठरवलं नव्हतं पण एकदा का जागा नवी असली (म्हणजेच मित्रमंडळ आटोक्यात असलं) आणि शिवाय घरी एक बिनचाकाचं पण सतत धावणारं गाडं असलं की असले इथे तिथे फ़िरायचे उद्योग करावेच लागतात. त्यात आमच्या इथली लायब्ररी पडली लाखो में एक वाली...अरे, म्हणजे किती सोय़ी तरी किती द्याव्यात त्यांनी??

आता नाही म्हटलं तरी माणशी आठ म्हणजे गेलाबाजार सोळा डॉलर वाचतात म्हटल्यावर कसं का निघेना जाऊन येऊया असं म्हणून त्यांचा फ़्री पास घेतला आणि निघालोच एका शनिवारी या छोट्यांसाठीच्या संग्रहालयाला.म्युझियममधली माहिती वाचणं म्हणजे आमचा बाबा डोक्याला ताप म्हणतो...तर मग या मुलांच्या म्युझियमच्या निमित्ताने आपल्या डोक्याला ताप देणार्‍याच्या डोक्याला थोडा ताप देता येतील का असा सुप्त कावाही होताच...हे हे...

नेहमीप्रमाणे शेवटच्या क्षणी जिपिएसचं नी आपलं न जुळणं...पुन्हा त्याच फ़्रीवेच्या दुसर्‍या बाजुने इथे कसं यायचं ही नको असलेली (आणि पुन्हा बहुतेक कधीच न लागणारी) माहिती पदरात पडणं आणि शेवटी कधी नव्हे ते एकमताने (हा योग तसा दुर्मिळच) इतकं मोठं लॅण्डमार्क आणि सालं एक्सिटला साईन नाही लावतं असं blaming session पार पाडुन पोचलो एकदाचे....

जागा कमी मिळाल्यासारखं किंवा मिळालेल्या जागेतच जास्तीत जास्त जागा मुलांसाठी जमेल तेवढ्या गोष्टींनी भरल्यासारखं काही मला आत येताना वाटलं. पण सुरुवातीलाच असलेलं अपुर्‍या जागेतला कॅफ़े आणि तिकिटांची खिडकी एवढं दोन ठिकाणची गर्दी वगळता आतुन चांगलं ऐसपैस आहे.

गेल्या गेल्याच पाण्याच्या खेळाचा विभाग काचेआडून दिसल्यामुळे आरुषचे आणि तिथे मुलांची सर्वात जास्त गर्दी दिसल्याने आमचे पाय आपसुक तिकडे वळले. मुलांचे कपडे भिजु नये म्हणून छोटासा रेनकोटसदृष्य प्रकारही आहे. एकदा तो चढवला आणि मुलांच्या स्वार्‍या हुंदडायला मोकळ्या.कुठे वाहत्या धारेखाली हात धर नाहीतर पाण्याला वेगवेगळ्या प्रकारे बांध घालुन पाहा, मग कुठे त्यात पाण्यात तंरगणारी खेळणी सोड नाहीतर नेहमीसारखं भांडं भरुन पाणी सरळ ओत; एक ना अनेक प्रकार फ़क्त पाण्याबरोबर खेळायचे. इतर वेळी घरी फ़क्त आंघोळीच्याच वेळी पाण्यात हात मारायला मिळतात इथं तर फ़क्त पाणीच पाणी चहुकडे म्हणजे बाहेर यायलाच मूल तयार व्हायचं नाही..

पाण्यातून बाहेर आलो तोच एक छोटं नाटकचं थिएटर दिसलं म्हणून तिथंही वळलो. एक छोटं स्टेज आणि मुलांना नटायला थोडे कपडे, विग असं सगळं ठेवलंल..पाहायला अर्थातच पालक वर्ग...नाटकात आमची प्रगती यथातथाच आणि त्यातुन थोडं काळोखी वातावरण त्यामुळे बाहेर आल्यावर जरा ग्रोसरी शॉपिंग आणि कॅफ़े (खोटं खोटं वालं...) मध्ये गेलो. तिथली खोटी फ़ळं, भाज्या, कार्ट हे सगळं इतकं realistic होतं की आम्हीच फ़सलो.

आमच्या मुलाने तर ब्रेड तोंडातच घालायला लावला होता. इथे जास्त गर्दी तीनेक वर्षांच्या पुढील मुला-मुलींची होती.

पण तीन वर्षांच्या आतील मुलांसाठी फ़क्त एक वेगळा विभागही आहे जिथे फ़क्त त्यांच्या उंचीवर खेळता येतील असे खेळ आणि उड्या मारायला गुबगुबीत गादी इ. होती. आम्ही अजून तरी त्याही विभागात जाऊ शकतो म्हणून तिथेही थोडावेळ काढला.एका बाजुला आम्ही निवांत बसलोय आणि दुसरीकडे आमचा मुलगा शांतपणे नवनवे खेळ खेळतोय हे जवळजवळ अशक्यच असलेलं दृष्य पाहताना वेळ कसा गेला कळलंच नाही.मग जरा खाऊ-पिऊही केलं. खरं तर इथले खेळ खेळताना मुलं तहान-भूक (आणि शी-शु सुद्धा) हरपतात पण आपलं नेहमीप्रमाणे घड्याळ्याकडे लक्ष असतंच नं...कॅफ़ेमध्ये फ़ार काही मिळत नाही.एकदम टिपिकल म्हणजे पिझा स्लाइस, ज्युस असं सर्व. हे ऑनलाइन पाहिलं होतं म्हणून मी आमच्यासाठी सॅंडविचेस आणि मुलासाठीपण त्याचं सर्व खाणं घरुनच घेतलं होतं.

इथे जास्तीत जास्त जागा म्युझियमसाठी वापरण्याच्या प्रयत्नात वर म्हटल्याप्रमाणे कॅफ़े खूपच छोटा वाटतो. त्यामुळे खरंतर शक्य असेल तर खाऊन-पिऊन मगच इथे यावं असं आम्हाला तरी वाटलं. पण तरी यांच्या रेस्टरुममध्ये गेल्यावर मात्र मजाच वाटली. कारण सरसकट सगळ्याच पॉटींची साइज छोट्या मुलांच्या हिशेबाने आहे...ही ही...असो.


आता बाजुलाच एक clifford the red dog या कुत्र्याचं घर कम गेम्स असं एक दालन होतं. तिथे या कुत्र्याची मोठी मुर्ती म्हणावी अशी मुलांना खेळण्यासाठी आहे तिच्या शेपटीवरुन छोटी मुलं तर जवळजवळ घसरगुंडी करतात आणि इथे मुलांना पत्रव्यवहाराची माहिती व्हावी अशा उद्देशाने पत्र लिहायची सोय आणि पत्रपेट्या इ. आहे. इथेही आमचा बराच वेळ त्या कुत्र्याच्या लहान आणि मोठ्या आकाराबरोबर खेळण्यात गेला.

मग असंच गोल फ़िरत होतो तर चक्क मातीकामाचाही एक विभाग दिसला आणि तिथेही आपसूक आमचे पाय वळले. इथेही लहान मुलांना कपडे खराब होऊ नये म्हणून प्लास्टिकचा ओव्हरकोट घालायची सोय आहे.

मातीही त्यांचीच आणि सामानसुमानही त्यांचंच. जर तुम्ही काही छान बनवलं आणि घरी न्यायचं असेल तर फ़क्त काही किंमत देऊन ते न्यायचं. नाहीतर तिच माती ते पुन्हा गोळे बनवुन वापरतात. आम्ही दोघं म्हणजे अगदी हाडाचे कलाकार...त्यामुळे जेमतेम एक पोळपाट-लाटणं बनवलं. आता हेही शिकलं पाहिजे असंही माझ्या डोक्यात आलं.

मी लहान असताना माझ्या आईच्या शाळेतल्या एका मुलाने मला एकदा अगदी हुबेहुब दिसणारा बैल बनवुन दिला होता ते आठवलं. आता आमच्या लेकाला असं काही दाखवायचं तर त्यालाच शोधावं लागेल...असो...आमची मर्यादित कलाकारी पार पाडून आम्ही तिथुन निघालो ते थेट छोट्या ट्रेन्सच्या दालनात.

इथे खूप सारे लाकडी ट्रॅक्स, इंजिनं, डबे, बोगदे, पुल असं सगळं सामान होतं आणि मग जोडा आणि दौडा असा जामानिमा होता.

इथे आमचा बाबा आणि बच्चा हे इतके रमले की आई आपल्याबरोबर आहे हेही त्यांच्या लक्षात नव्हतं. सगळी मुलं एकमेकांना सांभाळून खेळत होती हेही विशेष. इतक्यात दोन वाजताच्या स्टोरी टाइमची घोषणा झाल्याने सगळी जणं त्या झाडाखाली धावली. गोष्ट कळण्याच्या वयात अजुन आमचं लेकरू नाही त्यामुळे तिथली एकदम अनोळखी बाई आणि तितकीच अनोळखी गोष्ट पाहून त्याने रणशिंग फ़ुंकल्याने आमचा नाविलाज झाला...

तसं सगळंच पाहुन मजा करून झालं होतं त्यामुळे मग थोड्याच वेळात परतीच्या प्रवासाला लागलो. ही एवढी धमाल करुन थकलेलं माझं लेकरू अगदी गाडी हमरस्त्याला लागायच्या आधीच झोपलंही आणि आम्ही मात्र चला कसं दमवलं, परत यायला पाहिजे एकदा, चारेक तासासाठी छान टीपी आहे असा अगदी प्रसन्न मूड घेऊन परतताना मला तिथल्या एका भिंतीवरचं एक वाक्य आठवत होतं....

"Scientist and babies belong together because they are the best learners in the universe"

24 comments:

 1. अपर्णा, खरेच किती सुरेख आणि लहान मुलांच्या मनाचा विचार करून केलेलं आहे. प्रत्येक विभागात मुले न रमली तरच नवल. पाणी, माती,खाऊ आणि प्राणी सगळेच आहे की. आरूष मातीत मस्त रमलाय आणि वॊव ट्रेनही आहे की. तुमची म्युझियमवारी सहीच झालीये. तुझ्या वर्णनाने त्याची रंगत छान पोचवलीये.:)

  ReplyDelete
 2. हो अगं...सगळी मुलं इतकी छान रमली होती की बास....

  ReplyDelete
 3. वॉव.. काय मस्त आहे म्युझियम, वर्णन, फोटोज सगळंच.. जामच धमाल केलीत तुम्ही.. आता आरुष पुन्हा पुन्हा न्यायला लावणार बघ :-) .. इथे जर्सी गावात आहे का असं काही बघायला पाहिजे..

  ReplyDelete
 4. अरे हो हेरंब. मी पण मातीत हात कालवुन घेतले :)
  आणि यांची बर्‍याच ठिकाणी शाखा आहे...फ़िलीचं पण तुला फ़ार लांब नाहीये पण कदाचित सिटीतलं असेल तर जास्त जवळ पडेल...या वयातल्या मुलांसाठी छान आहे...आणि अगदी आठ-नऊची होईपर्यंतही....

  ReplyDelete
 5. छान आहे म्यूज़ीयम ......

  तो पाठ मोरा लाल भू भू , पण मस्त

  ReplyDelete
 6. धन्यवाद आठवणी...ही ट्रिप आमच्या आठवणीत राहणार आहे म्हणून पोस्टलंय..:)

  ReplyDelete
 7. खुपच मस्त दिसतंय हे म्युझियम. इथे नुकताच कालाघोडा फेस्टिवल बघितला. तिथे हे मातिकाम शिकवणारे लोकं होते. पन्नास रुपये घ्यायचे शिकवायचे.
  खुप सुंदर लिहिलंय पोस्ट.. :)

  ReplyDelete
 8. हे म्युझियम खरंच मस्त आहे...कालाघोडाला पन्नास रुपयात मातीकाम असेल तर काही हरकत नाही शिकायला...मी कधीच गेले नाही आहे तिथे आणि तेही फ़ोर्टमध्ये एक वर्ष काम करुनही...आता मलाच अजब वाटतंय....

  ReplyDelete
 9. धमाल आहे की!!!!
  मस्त मजा आले असेल ना????

  ReplyDelete
 10. @मनमौजी
  हो एकदम फ़ुल्ल टु...नाही थ्री....हे हे...

  ReplyDelete
 11. सुरेख आहे सगळ..

  ReplyDelete
 12. फार काही नाही लिहू शकलो...
  सुचलंच नाही..
  एकूणच सुरेख आहे..
  सगळ अनुभवावास वाटतंय... पण
  कसा नि कधी योग यायचा?
  ब्लोग थ्रू बघणेच सध्यातरी जास्त पर्याप्त आहे..
  नाही का?
  carry on..

  ReplyDelete
 13. अरे अखिल इतकं काय..प्रत्येक पोस्टवर सुचतंच असं नाही आणि त्यातुन मला हलकंफ़ुलक्या विषयावरही हलकंफ़ुलकं लिहिता येत नाही...काही काही पोस्ट नंतर स्वतःला ती घटना आठवता यावी म्हणूनही लिहिल्या जातात...पण तू पुन्हा येऊन चार ओळी टाकल्यास याबद्दल खरंच बरं वाटलं...:)

  ReplyDelete
 14. मस्तच आहे गं हे म्युजियम.....अगं अश्या ठिकाणी मुलं तर खुश होतातच पण आपणही बालपणात जरा फेरफटका मारू शकतो.... तेव्हा हात साफ करावे म्हणजे न लाजता मातीत हात घालावेत :).......

  ReplyDelete
 15. मस्त आहे हे म्युजियम... ते भिंतीवरचं वाक्य एकदम सही...

  ReplyDelete
 16. अगदी खरंय तुझं तन्वी...

  ReplyDelete
 17. आनंद, त्या वाक्याचा मी एक फ़ोटो काढलाय पण इथे जरा जास्तच फ़ोटो झालेत म्हणून मग ते फ़क्त लिहिलं...मलाही ते खूप आवडलं...

  ReplyDelete
 18. मी तर हे पाहूनच हरखून गेलोय ! तासन तास मी तर रमून जाईन इथे !

  ReplyDelete
 19. धन्यवाद पेठेकाका...

  ReplyDelete
 20. काय मस्त म्युझियम आहे गं, खुपच छान!

  ReplyDelete
 21. सोनाली हे म्युझियम खरंच मस्तच आहे...पुन्हा एकदा जायचा विचारही आहे...खास मुलांसाठी असं काही करण्याचा नुस्ता विचारच किती छान आहे नं???

  ReplyDelete
 22. खरच, सुंदर.
  तु म्हणतेस तसं आपण वेस्टर्न कल्चर आत्मसात करतोय पण यागोष्टी नाही
  सोनाली

  ReplyDelete
 23. अगदी खरंय़ ते सोनाली..मी प्रत्येकवेळी अशा तुलना करते त्या त्यावेळी मला हेच जाणवतं...

  ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.