Sunday, September 12, 2010

आमचं "फ़ार्मविले"

काही वर्षे फ़िलीमध्ये स्वतःच्या घरात राहिल्यामुळे वसंत आला की बागकामाच्या मागे लागायची सवय होती..तरीही अर्थात मूळ मुंबईचं पाणी अंगात असल्यामुळे आमची मजल फ़ुलझाडं, टॉमेटो, मिरच्या आणि गेला बाजार वांगं यापलिकडे कधी गेली नाही. पण तरी एकदा रोपं रुजली की मग उन्हाळ्यात घरचं, बिनखताचं खायला मजा यायची. यावर्षी मात्र तसलं काही नाही याची खंत मार्चपासुनच सुरु होती. कुठल्याच दुकानाच्या गार्डन सेक्शनकडे पाहावंसंही वाटत नव्हतं.पण बहुधा माझ्या शेजारणीला, साशाला, माझी व्यथा कळली असावी त्यामुळे मग आपण कम्युनिटी गार्डनमधला एक वाफ़ा घेऊया का? असं तिनं सुचवून पाहिलं.माझी अर्थात ना नव्हती पण तरी आमची सरड्याची धाव माहित होती म्हणून मग तिच्यासोबत एक वाफ़ा घेऊया असं ठरवलं.

आमचा वाफ़ा

अमेरिकेत बर्‍याचशा गावात हे असं कम्युनिटी गार्डनचं प्रस्थ आहे. म्हणजे काही जागांमध्ये वाफ़े नाममात्र शुल्लक भरुन त्या सिझनपुरता भाड्याने घ्यायचे, ते सुरुवातीला पेरणीयोग्य जमीन उखळून वगैरे ठेवलेले असतात आणि पाण्याची सोयही केलेली असते. आपण फ़क्त आपल्याला हवी ती रोपं लावणे, त्यांची निगा घेणे आणि अर्थातच पीक काढणे हे करायचं. काहीठिकाणी विशेषतः चर्चेसच्या वगैरे जागा असतील तर त्यांची उपकरणीही ठेवलेली असतात आणि एखाद-दोन जागा कम्युनिटी स्पॉट्स म्हणून राखीवही ठेवल्या असतात. आपल्याकडे जास्तीची रोपं असतील तर ती तिथं लावायची आणि एखाद्या गरजुने त्यातुन हवं तितकंच स्वतःसाठी घ्यायचं असा फ़ंडा आहे.

लागवडीला सुरुवात
मला खरं सांगायचं तर इतकी वर्षे अमेरिकेत राहून याबद्दल विशेष माहितीच नव्हती त्यामुळे साशाने याबद्दल सांगितलं तेव्हा चला पाहुया कसं जमतंय ते असं तर वाटलंच शिवाय असा काही कन्सेप्ट असू शकतो हेच मला कौतुकास्पद वाटलं. नेमकं ज्या दिवशी आमच्या गावच्या कम्युनिटीतर्फ़े जे वाफ़े होते त्यांचं सुरु वाटपं होणार होतं आम्हा दोघींपैकी कुणालाही त्याच दिवशी जाणं जमणार नव्हतं आणि दुसर्‍या दिवशी गेलो तर अर्थातच सगळे वाफ़े संपले होते. मग काय? वेटिंग लिस्टवर आमचं नाव देऊन परत आलो.पण तसं त्यातुन काही निष्पन्न व्हायची शक्यता नव्हती. मग जवळजवळ मनातुन हे सारं काढलंच होतं तितक्यात मी एका शनिवारी एका लोकल फ़ेअरला गेले होते तिथे एका चर्चचा एक स्टॉल होता तिथे काही वाफ़े उपलब्ध असल्याचं कळलं आणि मुख्य त्यांनी काही शुल्क असं लावलं नव्हतं. फ़क्त आपल्या ऐपतीप्रमाणे दान करावं अशी विनंती होती. नेकी और पुछ पुछ? मी लगेच साशाला हे कळवलं आणि मग तिने अजुन माहिती काढली.
टॉमेटोची सुरुवात

या चर्चची जागा थोडी गावाच्या शेवटाला होती पण तरी दहा-पंधरा मिन्टं ड्राइव्ह म्हणजे ओके होतं आणि ते अजुन वाफ़े बनवत होते त्यामुळे मग एप्रिलमध्येच लगेच त्यांना डोनेशनचे पैसे देऊन आम्ही आमचा वाफ़ा पक्का केला.

एप्रिलच्या शेवटाला वगैरे वाफ़े आपल्या ताब्यात देतात आणि मग लगोलग लावणी केली की मग काय लावताय त्याप्रमाणे जुन,जुलै,ऑगस्ट, सप्टेंबर पर्यंत घरच्या भाज्या खायच्या. याबाबतीत माझा अनुभव तसाही वर उल्लेखलेला आहेच त्यामुळे माझ्या बेकिंग गुरुलाच मी माझी गार्डन गुरुही मानलं आणि तिनं सांगितल्याप्रमाणे आधी घरीच माझ्याकडे ज्या काही टॉमेटो इ.च्या बिया होत्या त्या लावल्या. नेमकं मेमध्ये आम्ही मायदेशवारी केली त्यामुळे थोडीफ़ार प्रत्यक्ष लागवड तिनेच केली पण परत आल्यावर जे काही करु शकत होतो ते आम्हीही केलं..

आमचा छोटा माळी
आरुषकरता तिने दोन-तीन स्ट्रॉबेरीचीही लागवड केली होती. पण यावर्षी वसंतातला सुरुवातीचा पाऊस साधारण जुनच्या सुरुवातीपर्यंत लांबल्यामुळे विशेष स्ट्रॉबेरी आल्या नाहीत पण नंतर मात्र झुकिनी (ही आपल्या दुधीची चुलत-बहिण) ने मात्र थैमान घातलं..

झुकिनीने झुका दिया....
मी माझ्या आत्तापर्यंतच्या वास्तव्यात एवढ्या झुकिन्या खाल्या नसतील. काकडीही अधुन-मधुन आपले रंग दाखवत होती. वांगं, मका छान तरारत होते. तर टॉमेटोबद्द्ल काहीच बोलायला नको. इतकं सगळं आपल्या आपण उगवुन लावु शकतो शिवाय जास्तीच कुणाबरोबर शेअरही करु शकतो ही कल्पनाच काय छान आहे नं? ही बाग लावताना साशाने खास स्पेशल इफ़्केट्स खूप सारे झेंडू गोलाकार लावुन आणि काही सुर्यफ़ुलाची झाडंही लावुन केली . त्यामुळे मला देवासाठी ताजी फ़ुलं तर मिळतातच आहे पण त्याचा मुख्य उपयोग आपल्या बागेत नकोसे किटक येत नाहीत हेही मी शिकले.


मक्याच्या बाजुला झेंडूचं कुंपण
मागे फ़ेसबुकमधल्या बर्‍याच मित्रमैत्रीणींनी मला त्यांच्या त्या फ़ार्मविलची आमंत्रणं, भेटवस्तु, शेजार काय पाठवायचा सपाटा लावला होता.तशीही सोशल नेटवर्किंग साइटवर फ़ार सोशल व्हायला मला जमत नाही; पण नेमकं त्याचवेळी माझं खरखुरं फ़ार्मविले, खरी शेजारीण आणि सध्या खर्रखुर्र पीक असं सुरु आहे. त्यामुळे त्या व्हर्च्युअल फ़ार्मविलमध्ये मी फ़ार नव्हते हे आणखी वेगळं सांगायला नकोच...असा काही प्रकार मुंबईबाहेर जरा वसई-विरार किंवा कर्जत वगैरेच्या इथे राबवला तर एखाद्या पावसाळ्यात थोडी शेती तिथेही करायला काय मजा येईल नं असं ही पोस्ट लिहिताना सारखं वाटतंय....

घरगुती फ़ार्ममधली ताजी ताजी भाजी

22 comments:

  1. chala aata taji aapalya shetatil bhaji khayla milnar tar tumhala :)

    Mastach :)

    ReplyDelete
  2. सही, काय मजा आहे ग!
    खरखुरं फार्मव्हीले. मला फेसबुक वरचे पण खुप आवडायचे, मी खुप खेळायचे.
    चिपळुणला रहात होतो तेव्हा मी घरची भाजी आणि फळे खाण्याचा आनंद खूप अनुभवलेला आहे. खूप मज्जा वाटते स्वतःच्या कष्टाचे फळ बघायला.
    सोनाली केळकर

    ReplyDelete
  3. अरेवा.. हे तर खरोखरचच फार्म विले.. मस्त आहे झुकिन्या.. अजून काय काय पिकवलं शेतात?? मजा आहे ..
    इथुन एखादं बी बियाणं हवं असेल तर सांगा .. पाठवतो इथुन कुरीयरने.

    ReplyDelete
  4. वा! एकदम रसदार भाजी दिसतेय हो! बरेच दिवस फेसबुकवर लोकांच्या लुटूपुटूच्या पिकांबद्दल वाचल्यावर ही खरी पिके पाहून बरं वाटलं :) मला वाटतं काही दिवसांनी ह्या फर्माविले मुळे पिकं शेतात कष्ट करून उगवता येतात ह्यावर मुलांचा विश्वास बसणार नाही.

    ReplyDelete
  5. अपर्णा,
    मी पण हा प्रकार केला होतो. खूप छान वाटते भाजी काढायला. आता मात्र घरीच लावते.

    भारतात असे करता येईल हा विचार इथे सारखा येत रहातो.

    माधुरी

    ReplyDelete
  6. वा वा मस्तच...

    ते थोबाडपुस्तिकेवरचं फार्मव्हिले बघून बघून एवढा कंटाळा आला होता की हे ताजं खरंखुरं फार्मव्हिले बघून खूप बरं वाटलं..

    आणि ही 'घरगुती फार्ममधली ताजी ताजी भाजी' कुठे पाठवायची तो 'पत्ता' तर तुला माहित आहेच ;)

    ReplyDelete
  7. सहीच! डोळे आणि जीव सुखावला घरची भाजी पाहून. जुन्या घरच्या बागेची तीव्रतेने आठवण आली गं. आरुषही रमलेला दिसतोय. :)

    ReplyDelete
  8. मस्त मस्त मस्त
    लहानपणी घरी दोडका,वांग इत्यादी गोष्ठी घरच्या बागेत लावायचो .कोवळा दोडका जेवताना तोंडी लावायचा म्हंटल की पटकन तोडून आणायचो.खूप सही वाटत ते.अन हि खऱ्या खुऱ्या फार्मविले ची कल्पना तर एकदम मस्त

    ReplyDelete
  9. अपर्णा,
    एकदम भारी कन्सेप्ट आहे हा...
    आपल्याकडे छोट्या शहरांमध्ये सहज राबवता येण्याजोगा.. पण तेव्हढी इच्छाशक्ती हवी ना लोकांची!
    मस्तच माहिती.. आणि एन्जॉय घरगुती भाजी!

    ReplyDelete
  10. bara zala mahiti dilis te....ithe yeun 10 varsha zali tari mala dekhil mahiti navati ya baddal....malahi faar aavadata baagkaam karayala...maja yet asel na ithe asa karayala?

    ReplyDelete
  11. हो विक्रम टॉमेटो आणि झुकिनी केव्हा विकता आणले होते ते आता आठवावे लागेल...प्रतिक्रियेबद्दल आभारी...

    ReplyDelete
  12. खरंय सोनाली...आपल्याकडच्या भाज्यांची चव तर आणखी छान असते..पावसाळ्यात माझ्या मामाच्या वाड्यातल्या काकड्या, भेंड्यांची चव पुन्हा नाही मिळाली....तू चिपळूणची नक्की आठवण काढत असशील...

    ReplyDelete
  13. महेंद्रकाका, आभारी पण agricultural असल्याने बिया मला वाटतं कुरियर करता येत नाही..काकड्या, टॉमेटोशिवाय इथल्या पालेभाज्या,सॅलड असं काही काही पण आहे...पुढच्यावेळी नीट प्लान करुन छान छान भाज्या लावु असं वाटतंय....

    ReplyDelete
  14. निरंजन अगदी खरंय..आपण मुलांना हे जर प्रत्यक्षात दाखवु शकलो नाही तर काही खरं नाही पुढच्या पिढीच्या जनरल नॉलेजचं....माझे बाबा मला नेहमी एक विनोद सांगायचे की मुंबईची मुलं म्हणतात दूध भैया देतो...:)

    ReplyDelete
  15. माधुरी, ब्लॉगवर स्वागत. आम्ही घरी लावायचो त्यापेक्षा इथे जास्त लावल्यात म्हणून माझं मलाच हसू आणि कौतुक..पण भारतात पण असा कन्सेप्ट हवा असं जाम वाटतंय.

    ReplyDelete
  16. हेरंब मी ते फ़ार्मविले जाऊन पाहिलं पण नाही पण तोंडावर येऊन पडायची ती आमंत्रण....:)
    अरे हो ते मोदक मिळाले की त्यावरचा पत्ता वाचुन लगोलग भाज्या पाठवुन देते कसं?

    ReplyDelete
  17. सागर तुला तर घरच्या भाज्यांची चव आमच्यापेक्षा जास्त माहित असेल...मला तर फ़क्त भाज्याच नाही माझ्या मावशीची आंबा-चिकुची वाडी, मामाच्या परसदारातला पेरु या सर्वांची चव बाजारात मिळणार्‍या वस्तुंपेक्षा कैक पटींनी छान लागते आणि आठवते....इथे थोडी झलक मिळाली घरगुती चवींची...

    ReplyDelete
  18. बाबा, खरंय तुझं..आपल्याइथे विचार कर असा कन्सेप्ट आला तरी ते पीक लावणार्‍याच्या तोंडी लागेल का?? इथे आम्ही केव्हाही गेलो तर सगळं जसच्या तसं असतं आणि आम्हीही चुकुनही शेजारच्या पीकातलं काही घ्यावं असं मनात आलं नाही...आपल्याइथे जागा, पाणी त्याचबरोबर सचोटी आणि अशा बर्‍याच गोष्टींची कमी आहे....काय करणार?

    ReplyDelete
  19. मेघा, ब्लॉगवर स्वागत. अगं तुमच्या भागातही असेल असं..आतापासुन माहिती काढ म्हणजे पुढच्या स्प्रिंगपर्यंत तुम्हीही तयार असाल. मी आधी कुंडीतही टॉमेटो लावायचे आणि मजा यायची.आता तर काय रान आपलं बाग मोकळी...धमाल येते...

    ReplyDelete
  20. भाग्यश्रीताई, तुझी प्रतिक्रिया आधी दिसतंच नव्हती म्हणून कळत नव्हतं उत्तर देताना.चला आता दिसतेय.
    अगं घरची आठवण मलाही येते..त्यातही ते अजुन आमचं आहे म्हणून कदाचित जास्त...पण असो..
    इथलं म्हणायचं तर हेही नसे थोडके...आणि आरुष तर काय फ़ुल टू फ़ॉर्मात असतो "आउष, नानाना पानी" असा गाडीत गजर सुरु असतो....

    ReplyDelete
  21. पोस्ट, फोटो आणि हे फार्मव्हिले खरचं खूप छान. मला ही कल्पना फार आवडली. अगदी कसेल त्याची जमीन नसलं तरी कसेल त्याचे पीक तरी. आमच्या घरी कोकणात बाबा पावसाळ्यात काकडी, पडवळ, भेंडी, भोपळा, चिबूड तेंड्ली, कारली अश्या भाज्या पिकवतात आणि खूप सारी गोंड्याची (झेंडू) झाडे. दोन तीन महिने का होईना घरची भाजी खातोय म्हटलं की एक वेगळीच मजा असते.

    ReplyDelete
  22. कसेल त्याचे पीक, अगदी बरोबर सिद्धार्थ. मला वाटत तुझ्या ब्लॉगवर मागे कोकणातल्या भाजी की झाडे यांचा उल्लेख होता....मला पुढच्या वेळी भेंडी वगैरे होतात का पाहिलं पाहिजे...आमच्या शेजारचा वाफा होता त्यात निगुतीने पातीचा कांदा कोथिंबीर इ. पण लावलं होत

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.