या मायदेशवारीत दंतचिकित्सक (तेच ते डेंटिस्ट हो) माझ्या यादीवर अम्मळ वरच्या क्रमावर होता. अमेरिकेतली महागडी दंतव्यवस्था हे त्यास कारण नसुन (थोडंफ़ार असलं तरी) निव्वळ कंटाळा या कारणास्तव ओरेगावातला दाताचा डागदर म्या अजुन पाहिला नव्हता त्यामुळे फ़क्त साफ़सफ़ाई (अर्थात दातांचीच) हे छोटंसं काम करायला त्यातला चांगला कुणी दाताचा डागदर शोधा आणि मग त्याने उपटसुंभासारख्या लावलेल्या इतर अनंत शोधामुळे (की नसलेल्या दंतप्रश्नांमुळे) त्याला आणि इंशुरन्स कंपनीला अस्मादिकाच्या रुपाने एक कायमस्वरुपी गिर्हाइक मिळवून द्या (अरे...हे वाक्य कुठे सुरु झालं होतं..आयला संपवतानाची क्रियापद शोधायला हवीत....असो...आणि त्यात कंस...देवा....वाचव माझ्या वाचकांना....) हा तर हे सर्व (म्हणजे जस्ट दोन मिन्टं आधी म्हटल्याप्रमाणे) टाळण्यासाठी आपला देशी वैदु काहीही करुन गाठायचाच होता...
आता इथे ओरेगावाप्रमाणेच बोरीवलीचाही उल्लेख करणं अपरिहार्य आहे (त्यामुळे हे नमनाचं तेल घडा नं. २ वाटत असलं तरी बी म्या काय करु शकत न्हाई म्हंजे न्हाई) हा तर बोरीवली...हे माझं सध्याचं माहेर (म्हणजे सध्या आई-बाबांच निवासस्थान (निवासस्थान हे इतकं शुद्ध निव्वळ आई-बाबांचा आदर द्विगुणीत करण्यासाठी खास बरं का?? ) असलेलं ठिकाण) असलं तरी ते माझं मूळ माहेर नव्हे कारण ही लोकंही इथं येऊन माझ्या भाषेत माझी फ़कस्त दुसरी मायदेशवारी आहे...म्हंजे हे ठिकाण माझ्यासाठी घराबाहेर पडलं की सासरसारखंच..
त्यामुळे इथे माझा कुणी शिंपी, न्हावीण (शुद्ध मराठीत ब्युटीशियन), शालेय मित्र-मैत्रीणी, कट्टे, भेळवाला, नारळपाणीवाला, घड्याळजी, सोनार (झालं भरकटलं गाडं..) पण आइच्यान सांगते आधी माझे बारा बलुतेदार अगदी बांधलेले होते आणि लगीन झालं तरी मागच्याच्या मागच्या वक्ताला त्यांनी पुन्हा तीच सर्विस माझ्यासारख्या गेलेल्या कस्टमरलासुद्धा आस्थेने चौकशी करुन पुरवली होती....(आता ही पोस्ट खरं म्हणजे दंतवैदुकडून या आठवणीतल्या बलुतेदाराकडे वळवण्याचा प्रचंड मोह होतो आहे पण बेगमी म्हणून दुसर्या कुठल्या पोस्टमध्ये त्यांच्यावर डिटेल मध्ये लिहीन म्हणते...तुर्तास त्यांच्या आठवणीसाठी एक वाक्य आणि एक कंस इतकंच बास...) असो...तर अगदी अगदी थोडक्यात (आणि कंसांशिवाय) सांगायचं तर हे सांगायला माझं माहेर पण मला सगळंच नवं विशेष करुन कस्टमर सर्विस प्रकारात मोडणारं सगळं...(हुश्श...तेल संपतंय अलमोस्ट) त्यामुळे यावेळी जरी दंतवैदु माझ्या लिस्टमध्ये टॉपवर होता तरीही तो (किंवा ती) कोण हे गुलदस्त्यामध्येच होतं..आणि त्यातही आईला विचारलं तर आईने चक्क कानावर हात ठेवले. "मी माझे सगळे आधीचे डॉक्टर (आणि चक्क लॅबपण) ठेवलेत..बोरीवलीतल्या डॉक्टरकडे मी जात नाही" - इति मासाहेब..आता आली पंचाईत पण माझे बाबा (मला वाटलं होतंच त्याप्रमाणॆ) माझ्या हाकेला धावले..."अगं इथे मी एक एक डॉक्टर पाहून ठेवलेत. आपण उद्या जाऊया की तुला आत्ता वेळ आहे??" ये हुई नं बात...आय लव्ह यु बाबा...मी लगेच त्यांच्या आत्ताच्या हाकेला ओ दिला आणि आम्ही रिक्षात बसलो..(इथे उतरण्याच्या जागेचं नाव द्यायचा मोह होतोय पण बाबांना पुन्हा त्यांच्याकडे जावं लागेल म्हणून त्यांच्या तोंडचा घास आपलं डॉक्टर काढून घ्यायचं पातक मी माझ्या डोस्क्यावर घेत नाही..तसंही इच्छुकांना हा अनुभव कुठल्याही डॉक्टरकडे येऊ शकेल याची मला खात्री आहे...) असो.....(तर आता एकदाचं संपलं त्येल...)
आता गेल्या-गेल्या अर्थातच आम्ही कुणी व्हिआयपी नसल्याने बाहेरच्या रिसेप्शनीस्टने काही लाल चादर अंथरावी अशी अपेक्षा नव्हतीच.(श्या रेड कार्पेट हो...लाल चादर म्हटलं की उगाच ऑपरेशन आठवलं का?? बुरी नजरवालों....) पण तरी हसल्या-नसल्यासारखं करुन आणि पाचेक मिन्टं नुस्तं आत-बाहेर करुन (थोडक्यात आपण अत्यंत बिजी आहोत हे आमच्या मनावर (तिच्या मते) बिंबवल्यावर) शेवटी एकदाची ती बया आम्हाला प्रसन्न झाली..म्हणजे थोडक्यात कुणासाठी?? हा एक तुच्छ प्रश्न आमच्यापर्यंत आला..तरी नशीब आम्ही एकमेव (म्हणजे तसे मी आणि बाबा दोघं पण पेशंट एक) बाहेर होतो...आणि तिच्या आत-बाहेर करण्यावरुन एक (किंवा दोन खुर्च्या असतील तर दोन) आतमध्ये असेल असा माझा कयास...असो बापडे...ती बिजी तर बिजी...यानंतरचा आमचा संवाद ती आणि मी या भाषेत लिहिला तर जास्त रोचक होईल (किंवा पटकन संपेल)
ती (मला नमनालाच): सर नाही आहेत मॅडम आहेत.
मी: डेंटिस्टच आहेत नं त्या? (म्हंजे त्यांच्या डेंटिस्ट असण्यावर माझा आक्षेप नव्हता हो पण समजा एखाद्या नायर डेंटल मधल्या मुलाने नायर मेडिकल मधल्या मुलीवर मारलेली लाईन असली म्हंजे...हाय की नाय लॉजिक??)
ती (किंचीत हसून): हो.
मी: चालेल मॅडम असल्यातरी. मला फ़क्त क्लिनिंग करायचं आहे.
ती (पुन्हा पुर्वीचीच मग्रुरी): क्लिनिंगला अपॉइंटमेन्ट लागते.
मी (मनात) : च्यायला तुला मला नो एंट्री मध्येच टाकायचं तर सरळ सांग नं उगाच नवी कारणं काय देतेय??
मी (प्रकट): मग द्या अपॉइंटमेन्ट..
ती (मी कामाला लावलं अशा काही चेहर्याने): शनिवारी साडे-चारची आहे. (आणि आम्ही मंगळवारी गेलो होतो..जाम बिजी दिसताहेत हे...)
मी (मनात): च्यामारी इथे पण माझ्या चार विकांतामधला एक शनि संध्याकाळ उडणार वाटतं.
मी(प्रकट) : बरं द्या सध्या. पण रद्द करायची असेल तर फ़ोन केला तर चालेल नं?
बाबा (अरे हो ते पण बरोबर आहेत नाही का?) : अपर्णा, कार्ड घेऊन ठेव त्यांचं...अहो मला जरा एक कार्ड द्या. पुढच्या वेळी फ़ोन करुनच येऊ. (हे बहुतेक आजची फ़ेरी बाद होतेय म्हणून बहुतेक)
ती (वहीत लिहायला नाव विचारायचं सोडून भावी धोक्याची कल्पना आल्यामुळे बहुतेक): जरा एक मिनिट थांबा.
आणि ती (यावेळी खरोखरच्या लगबगीने) आत गेली...
तेवढ्यात बाबा म्हणाले खरं ही मला ओळखते पण आज जरा काम जास्त आहे वाटतं...बाबांना आता थोडं अपराधी वाटत होतं असं वाटुन मी उगाच त्यांची समजुत काढली म्हटलं अहो थांबा मला मजा येतेय....
ती (परत आल्यावर चेहरा शक्य तेवढा कोरा ठेवत): पंधरा मिन्टं थांबाल का? आतमध्ये पेशंट आहे.
मी (मी पण चेहरा कोराच ठेऊन): ठीक आहे...
इतका वेळ ही आपली प्यादी चालवत होती; दिला की नाही चेकमेट? असा चेहरा करायचा खरा मूड आला होता पण मला पहिल्यांदी तरी समोरच्याला मान द्यायची सवय आहे मग त्याने त्याचे दाखवायचे दाखवले की मग पुढची मुव्ह...असो...(हे थोडं अनावश्यक...आय नो..पण असंही एखादं वाक्य असावं असं वाटलं म्हणून....)
आता हे प्रकरण इथे संपेल असं (वाचकांप्रमाणेच) मलाही वाटलं होतं पण खरी गम्मत पुढेही होती..पुढचा संवाद आहे डॉक्टरसाहिबां आणि मी यांच्यातला..सोय़ीसाठी आपण त्यांना डॉ. उल्लेखुया.
डॉ.: हं काय?
मी: मला स्केलिंग करायचं आहे.
डॉ: ते मी बघते.
मी: काहीच नाही...(अरे म्हणजे आता आपल्याला आपल्या दातांची अंदरकी बात माहित असली तरी उगाच कशाला तिला आत्ताच दुखवा..नंतर तिने वचपा काढला म्हंजे??)
डॉ: (तोंडात एकदा प्रेमळ हात आणि कटाक्ष इ. झाल्यावर): हम्म..स्केलिंगच करायला लागेल..चारशे रुपये होतील
मी: हो (म्हणून अर्थातच आ वासला...)
डॉ: (वर,खाली, ऊजवी असं सगळं साफ़ करुन कम कोरुन झाल्यावर डावीकडे आल्यावर): इथली कॅप लुज झाली आहे...
मी: (ती त्या निमित्ताने थांबली आहे याचा फ़ायदा घेऊन दोन मिन्ट तोंड मिटल्यासारखं करुन...(मनात)): आयला ही लोकं एकदा शिरली तोंडात की थोड्या वेळाने ब्रेक का नाही घेत?? त्यांच्या सिलॅबसमध्ये हा महत्त्वाचा भाग कसा नाही...आ वासुन तोंड कायमचं मोठं झालं म्हणजे??
मी (प्रगट): अहो तेच तुम्हाला सांगायचं होतं मला क्लिनिंग झाल्यावर की ती कॅप मध्येच निघते.
डॉ.: अशी कॅप कधीही निघाली की डेंटिस्टकडे जायचं आणि बसवुन घ्यायची. पंधरा दिवसांपेक्षा जास्त झाले तर मग प्रॉब्लेम येतो.
मी: (मी पण तेच करायचं होतं हो अशा अर्थाने पण वेगळे शब्द शोधत): आत्ताच मागच्या आठवड्यात लक्षात आलं माझ्या...
डॉ.: अशी कॅप कधीही निघाली की डेंटिस्टकडे जायचं आणि बसवुन घ्यायची. इथेच असं नाही कुठला जवळचा डेंटिस्ट असेल तिथे जाऊन करुन घ्यायचं.
मी (मनात) : अगं मग कर नं आता?? तू नक्की डेंटिस्ट आहेस नं? मग मी डेंटिस्टच्या खुर्चीत असताना डेंटिस्टकडे जा म्हणून सारखं काय सुरु केलयंस?? नक्की ही नायर मेडिकलची लाइन दिसतेय...
मी (आता हिला मी एखाद्या एकदम रिमोट गावात राहते अस वाटू नये म्हणून नाद सोडून (प्रगट)): हम्म...आता करता येईल का?
डॉ.: ५० रु. होतील.
मी (मनात): आयला हिचा कायतरी प्रॉब्लेम आहे किंवा हिला कुणीतरी पैशासाठी मोठा चुना लावलाय...पन्नास रु. पण असं सांगतेय की पाच हजार..
मी (प्रगट) : चालेल..
यानंतर अर्थातच तिने पन्नास रुपयांचं ते काम पाच रुपयात आपलं मिन्टात..(छ्या वाण नाही पण गूण लागला वाटतं) केलं...स्वच्छ दात आणि घट्ट कॅप घेऊन मी बाहेर आले..(इथे कंसात का होईना एक गोष्ट जरुर सांगितली पाहिजे मॅडमच काम मात्र एकदम एक नंबरी होतं...ते एक जास्त वेळचा आ सोडला तर काय बी त्रास न्हाय बगा..)
असो...शेवटी एकदा़चे ते साडे-चारशे रु. त्या बाहेरच्या कोर्या चेहरेवालीला देऊन आम्ही निघालो. बाबांचं आपलं मला तशी ही थोडी ओळखते प्रकरण सुरु होतंच..पण तेवढ्यात मी माझी आधीची मनातली शंका (लायनीवाली हो) क्लियर व्हावी म्हणून त्यांना म्हटलं ही डॉ.तर चांगली वाटते. दोघं एकत्र प्रॅक्टिस करतात का? अगं ही बहुतेक काही महिन्यांपुर्वी इथे कामाला लागली आहे. चला म्हणजे फ़ुकटच्या जनरल नॉलेजमध्ये वाढ झाली तर..या (तशा) छोटाश्या दंतप्रकरणाच्या शेवटी काढलेले काही निष्कर्श:
१. नव्या दंतवैदुकडे पहिली लढाई दारातच सुरु होते आणि ती आपण जिंकण्याचे चान्सेस जास्त असतात...(कमॉन आपण मायबाप सरकार असतो तिथे)
२. दाताची कॅप कधीही निघाली की डेंटिस्टकडे जायचं आणि बसवुन घ्यायची. पंधरा दिवसांपेक्षा जास्त झाले तर मग प्रॉब्लेम येतो.(^C ^V असलं तरी सौ टका खरा है वो...)
२. सर डेंटिस्ट असतील तर मॅडम डेंटिस्टच असल्या पाहिजेत असं नाही...किंवा दुसर्या शब्दात सर डेंटिस्ट असतील तर डेंटिस्ट मॅडम त्यांचीच लाईन असेल असं नाही...म्हंजे माझा वरचा नायर डेंटल मिट्स नायर मेडिकल फ़ंडा यकदम खरा असु शकतो...
३. डेंटिस्ट मॅडम सारखे पैसे कन्फ़र्म करताहेत म्हंजे त्या पगारी डॉक्टर (उर्फ़ नोकर लिहायचा मोह आवरतेय) असण्याची शक्यता जास्त.
४. आणि हे फ़ायनलवालं.... बाहेरच्या रिसेप्शनिस्टने सरांची (पगार देतात म्हणून) न बोलता केलेली स्तुती खरी असली तरी त्याचा अर्थ मॅडम डेंटिस्ट म्हंजे आपलं ते चांगली डेंटिस्ट नसेल असंच काही नाही...(कदाचित या दोघींचं सकाळी वाजलं असल्यामुळे ही काही पेशंटना सरांकडे पाठवतेय असंही असू शकतं)
असो...अशी ही एक छोटीशी दंतकथा माझा तो एक दिवस आणि आता आठवताना वेळ एकदम मजेत घालवून गेली....
फ़ोटू गुगलबाबाच्या सौजन्याने
सुरवातीच तेल जरा जास्त वाटल पण अंतर काय मस्त झालं लेख वाह...
ReplyDelete"त्याने आपले दाखवायचे दाखवले कि पुढची मुव "
हे भारी होत.
बाबांचं ती मला ओळखते प्रकरण चालू होते
एक नंबर
मस्त मस्त मस्त
सागर ,ते तेल मलाही जाणवलं पण इतकं टाइपलं म्हणून म्हटलं र्हाऊ द्यावं आणि त्यानिमित्त्ताने पोटातलं बरंच काही ब्लॉगावर का होईना बाहेर येतं....बरेच दिवसांनी लिहायला बसायचा परिणाम हा...
ReplyDeleteबाकी सगळा प्रसंगच थोडा जास्त अनपेक्षित आणि मजेशीरच होता...
साबा प्रतिक्रियेबद्द्ल आभा......र...:)
अजब डेटीस्ट कि गजब कहाणी ;)
ReplyDeleteरिसेप्शनिस्ट उगाचच्या उगाच भाव खातात हे बाकी खरं हं..
ReplyDeleteदात प्रकरण म्हणजे आधी धडकी भरते. तू बरीच धीट आहेस.
छान..!
निष्कर्ष लय भारी .. कंट्रोल C आणि कंट्रोल V, चक्क तोंडातून ब्लॉगवर .. सही आहे हा ;)
ReplyDeleteहा हा.. भारी दंतमनोरंजन !! आणि कंसाळलेली पोस्ट बघून तर डब्बल मनोरंजन झालं ;)
ReplyDeleteबाकी, हसताना लक्षात आलं की माझ्याही एका दाताची कॅप हलते आहे. निष्कर्ष क्र २ नुसार लगेच दंतुड्याकडे पळतोच कसा !!
विक्रम..:)
ReplyDeleteमीनल, अगं धीट कसली...आलीया भोगासी आणि काय?? शिवाय बघ मुद्दाम ते मुंबईतल्या दंतुड्याकडे केलं कारण इथे सगळं रेकॉर्डवर असतं आणि मग शंभरवेळा जावं लागतं ते धैर्य नाही म्हणून हे उसनं अवसान...:)
ReplyDeleteआनंद बरेच दिवसांनी दिसतोयस...:) नव्या जागी (नेट) रूळावर आलेलं दिसतंय... प्रतिक्रियेबद्द्ल आभारी.
ReplyDeleteहेरंब, पोश्टेच्या नावातच कंस महाराज आले आणि मग येतच राहिले..शेवटी लक्षात आलं तेव्हा तुझीच आठवण झाली (आणि तुझी पण ती एकदंत वाली पोस्ट आहे त्याचीही) अर्थात विनोदी प्रसंग होता म्हणून नाहीतर हे लिहायला झेपलं नसतं म्हणा....
ReplyDeleteतू इथल्या डागदरकडे जाशील तेव्हा आम्हाला नक्कीच काहीतरी कंसाळ आणि खुमासदार वाचायला मिळेल काय??
कैच्याकै भारी झालाय अनुभव! :)
ReplyDeleteआमच्या इथे एक डेंटिस्ट आहेत.. त्यांचा मुलगा आणि सून (डेंटल कॉलेजातलं लव्ह मॅरेज) दोघेही डेंटिस्ट!
आता तीन दवाखाने काढलेत आणि हाताखाली ४-५ डेंटिस्ट हायर केलेत....
मजा म्हणजे... आता हे तिघे ओरिजिनल मालकच कमी काम करतात... ;)
ठांकु ठांकु बाबा...डेंटिस्टची एकंदरित मजा आहे असं मला आपलं बाबा नेहमी वाटतं कारण दातदुखी झालीच नाही असा विरळा...तू उल्लेखलेले तिघे मालक मस्त आरामात काम (?) करणारच....:)
ReplyDeleteअनुभव भारी आहे एकदम !
ReplyDeleteपण माझ्या डॉक्टरांची कहाणी जास्त "आवरा" आहे :P
अभिजीत, ब्लॉगवर स्वागत...तुझा अनुभव खरंच "आवरा" आहे..
ReplyDeleteलई भारी अपर्णाताई... (बाप्या आसला की त्याला राव, तात्या, अण्णा, आप्पा, पंत, भाऊ, साहेब असं कायबी म्हनता येतं, पन बाय असल्यावर तिला ‘ताय’ सोडून म्हननार काय ह्ये काय मला उमगत न्हाय...) मस्तच एकदम. तुमचा एक फॉलोअर वाढला आज. हा शनिवार-रविवार माझा फक्त ब्लॉग वाचण्यात जाणार आहे असं दिसतंय. कारण या प्रतिक्रियेतलं पहिलं वाक्य मी आज याआधी तीन ब्लॉगलेखकांना प्रतिक्रिया देताना लिहिलेलं आहे. (म्हणजे फक्त ‘लई भारी’ हे शब्द. बाप्यांना ‘अपर्णाताई’ असं संबोधलं सोमवारचा सूर्योदय नाही पाहू शकणार मी. ;-) ) तेव्हा सगळ्यांचे सगळे लेख वाचून होईपर्यंत सोमवार नक्की उजाडेल.
ReplyDeleteलय आभार बगा संकेतभौ....ताय तर ताय.....हित समदी अपर्णाच म्हनत्यात पन तुमास्नी जे जमल तसं...
ReplyDeleteनेमीच इनोदी भट्टी नसते बर का माजी पर परयत्न करते मदे मदे....ग्वाड मानून घेवा...आनी असच आमच्यासाठी पन लिवत चला ब्लॉगावर..कमेंट आल्या की आक्षी बर वाटत...
ल्हिनार. पर्तिक्रिया द्येनार. आसलं इनोदी लिखान येऊ द्या आनखी. मंग संमदं भ्येटेल. पर्तिक्रिया, लिखान वगैरे वगैरे. आन् एक इनंती हाय वो. मला ‘अवो संकेतभौ’ म्हनू नका. आवं बाय, आसं संकेतभौ म्हनलं की म्या लई मोटा मानूस झाल्यासारखं वाटतं बगा मला. आवं, म्या ल्हान हाय अजूनही. म्हंजे माज्या डोसक्यावर क्येस कमी असले (म्हंजी कसं हाय ना... आदी म्या सलमान खान व्हतो, आता अक्षय खन्ना हाय आन् संजय दत्त व्हईल माजा काही दिवसात (‘अनुपम खेर व्हायच्या आत लगीन उरकूया तुजं’ असं माजी आयशी म्हनत्ये..)) तरी म्या काय एवडा मोटा न्हाई. तवा तुमी आपलं मला ‘आरे संकेत’ च म्हना... :-)
ReplyDelete‘आरे संकेत’ म्हनल तर गोरेगावात गेल्यासारखं वाटत बघा....:)
ReplyDeleteबर संकेत प्रतिक्रिया दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद...भेटूया लवकरच...
गोरेगावात गेल्यासारखं वाटणारच. गोरेगावचाच आहे ना मी... :-)
ReplyDelete:)
ReplyDeleteआवडली दंतकथा..! कंसातले पंचेस मस्तच. :)
ReplyDeleteमाझीही दंतकथा मी माझ्या ब्लॉगवर टाकलीय.
http://kolaantudya.blogspot.com/2010/11/blog-post_28.html
आवडली दंतकथा..! कंसातले पंचेस मस्तच. :)
ReplyDeleteमाझीही दंतकथा मी माझ्या ब्लॉगवर टाकलीय.
http://kolaantudya.blogspot.com/2010/11/blog-post_28.html
आभार अमित आणि ब्लॉगवर स्वागत...हा खरा घडलेला प्रसंग आहे म्हणून जमलंय थोड फार तेल घालून लिहायला...
ReplyDeleteतुमची दंतकथाही वाचली....तुम्ही एकंदरीत विनोदी जास्त लिहिता का??