Thursday, September 23, 2010

गाणी आणि आठवणी ५ - आरंभी वंदिन अयोध्येचा राजा

रेडिओची साथ बालपणापासुनची; त्यामुळे सकाळी सहा-सातच्या दरम्यान लागणारी भजनं, अभंग कानावर पडून त्यांचे शब्द, चाल सारं तेव्हापासुन मनात बसलंय.नकळत पं.भीमसेन, किशोरी आमोणकर असे भलेभले गायक ऐकण्याचं भाग्य आपल्याला लाभतंय हे कळण्याचं ते वय नव्हतं. पण त्यातली अशी मनात बसलेली गाणी जेव्हा नंतर मोठं झाल्यावर ऐकली गेली तेव्हा त्यातलं गांभीर्य,अर्थही कळायला लागला आणि अशा गाण्यांची संगत लागली.त्या सुरांच्या मोहिनीने चिंतेच्या काही क्षणात थोडा वेळ का होईना मनाला शांतताही दिली.


"आरंभी वंदिन अयोध्येचा राजा" हा पं.भीमसेन जोशी यांनी गायलेला अभंग मी नक्की असाच सहाच्या वेळेस केव्हातरी ऐकला असणार असं मलातरी वाटतं.सकाळच्या शांत वातावरणात जेव्हा फ़क्त आईने पाणी तापवण्यासाठी सुरु केलेल्या स्टोव्हचा आवाज साथीला असे तेव्हा अर्धवट झोपते हे सूर मनात पक्के झाले आणि त्यानंतर जेव्हाही केव्हा हा अभंग ऐकला तेव्हा तेव्हा तशीच तंद्री लागल्याचं जाणवतंय.

खरं काय जादू आहे या सुरात की शब्दात? पक्कं कळलं नाही पण कुठेतरी मनात हा अभंग बसला आहे असं वाटतं. नेहमी प्रथम वंदिला जातो तो गणपती पण तरी यात अयोध्येच्या राजाला सुरुवातीचं वंदन करुन थोडा साध्या शब्दात सांगायचं तर कोड ब्रेक केलाय का असं वाटतं. बर्‍याच गाण्यांचे जन्म, त्यांच्या चालींबद्दलच्या सुरस कथा प्रचलित आहे तसंच याचाही उगम कळला तर ते वाचायला मला नक्की आवडेल.

पं. भीमसेनजींच्या धीरगंभीर आवाजात जेव्हा आरंभी वंदिन सुरु होतं तेव्हाच आपण त्याकडे खेचलो जातो असा माझा अनुभव आहे आणि साथीला भजनी तालातला ठेका आपल्याला लगेच ताल धरायला भाग पाडतो. ते टाळ जणू काही आपणच वाजवतोय असंही वाटायला लागतं आणि पुढंपुढं त्यांच्या सुरांत अधिकाधिकच गुंतायला होतं. आधीची गंभीरता पहिल्या दोनेक कडव्यांनंतर जेव्हा "काही केल्या तुझे मन पालटेना" या कडव्याला येते तेव्हा मात्र त्यांचा आवाज मुलायम होतो आणि ते सूर आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जातात.

हे कडवं ऐकताना काही वेळा वाटतं आपण कुणा दुसर्‍या व्यक्तीचं मन पालटायला पाहातोय किंवा काही वेळा ते आपलंच मन असतं जे पालटायला तयार नसतं आणि आपणच त्याची आर्जवं करत असतो. ही एकच ओळ, आठेक वेळा तरी सलगपणे गायलीय आणि प्रत्येकवेळी त्यातली नजाकत वेगळी आहे, सुरांची पट्टी वेगळी, पंडितजी वेगवेगळ्या प्रकारे जणू काही मन पालटवण्याचा प्रयत्न करताहेत..त्यांची ती आळवणी अक्षरशः डोळ्यातून पाणी काढते. अगदी थोडक्यात सांगायचं तर ही आळवणी ऐकली तर कुठलाही भक्त किंवा देव यांच मन बदलवण्याची ताकद त्यात आहे.फ़क्त हेच नव्हे तर सारीच कडवी आपल्याला त्या रामाच्या दरबारी घेऊन जातात आणि मग तो सुरुवातीला आरंभी कुणाला वंदायचं हा प्रश्न जर पडलाच असेल तर गौण होऊन जातो. सगळ्यात शेवटी जेव्हा पुन्हा संथ लयीत ते ’अयोध्येचा राजा’ म्हणतात तेव्हा आपल्या नकळत मनातल्या मनात आपण आपल्या हातातले टाळ शांतपणे खाली ठेवलेले असतात ते माझं मलाच कळलेलं नसतं.

बेचैनीचे छोटे मोठे प्रसंग अधेमधे येतच असतात. अगदी साधं एखादा दिवस नीट गेला नसेल आणि मग रात्री झोप लागताना त्रास होत असेल तरी किंवा अवेळी जाग आली की त्या शांततेत हा अभंग जरुर ऐकुन पाहावा. सगळं काही विसरुन आपण एका वेगळ्याच विश्वात जातो. मागे एका विमानप्रवासात तेवीस तास अडकले होते तेव्हा माझ्या नशीबाने आय-पॉडमध्ये हा अभंग होता. त्या प्रवासात मी तो नक्की कितीवेळा ऐकला याची मोजदाद नाही पण जीवाची घालमेल कमी करायला या सुरांनी, शब्दांनी आणि त्यातल्या आळवणीने खूप मदत केली असं मला खात्रीने वाटतं.

आपल्याला कितीही मित्र-मैत्रीण, आवडीतली लोकं असा गोतावळा असला तरी गाणी जितकं आपल्याला हलकं करु शकतात ती ताकद बाकीच्या गोष्टींमध्ये थोडी कमीच आहे. कुणाला एखादा अभंग आवडेल तर कुणी एखादी सुफ़ी धुन ऐकत तंद्री लावेल. पण सुरांची जादू तीच. त्यातही मनात बसलेली गाणी लहानपणापासुन ऐकली असल्यामुळे सवयीची झाली असली तरी एखाद्या विशिष्ट प्रसंगी मोलाची साथ करतात. माझ्यासाठी हा अभंगही असाच.



या लेखाचं अभिवाचन पंडितजींना आदरांजली म्हणून ऋतूहिरवा २०११ साठी केलं होतं ते इथे ऐकता येईल..




19 comments:

  1. हा अभंग नाही ऐकला ग कधी...पण शेवटच्या उतारयात सुरांच्या जादुबद्दल जे लिहल आहेस त्याला १०१ % अनुमोदन...

    ReplyDelete
  2. सुरांमध्ये खरंच वेगळीच जादू असते.. सूर बरेचदा आपली मानसिक अवस्था सहजपणे बदलून टाकतात!
    मस्त झालाय प्रवास! :)

    ReplyDelete
  3. त्यावेळी भीमसेन जोशी हे उदयोन्मुख गायक होते

    ReplyDelete
  4. सुंदर.. खरंय.. गाणी आपल्या मनावरचा ताण जितका हलका करू शकतात तितकं इतर काहीही करू शकत नाही हे सत्यच..

    हे गाणं ऐकलं नाहीये.. ऐकतो आता.. पण मला रामाचं गाणं म्हटलं की पं भीमसेन जोशी यांचं 'राम का गुणगान करिये' हे भजन आठवतं.. माझं प्रचंड आवडतं !!

    ReplyDelete
  5. आभारी देवेन.. आता मी गाणं टाकलय ऐकून बघ...

    ReplyDelete
  6. खरय बाबा, सूर बरेचदा आपली मानसिक अवस्था सहजपणे बदलून टाकतात. आभारी..:)

    ReplyDelete
  7. शरयू, आभारी ही माहिती माझ्यासाठी नवीन आहे..

    ReplyDelete
  8. हेरंब आता मी लिंक दिलीय, ऐकून बघ. तू उल्लेख केला आहेस ते भजनही ऐकलं पाहिजे.

    ReplyDelete
  9. mala pan ha abhanga faar aavadato....kharatar mi pan 5 varshanpurvi pahilyandach aikala aani lagech evadha bhavala ki roj sakali Queens-Manhatten commute kartana train madhe aikayala lagale....ithe sagalya goryanbarobar jatana aaplya kanat matra bhimsen joshincha dheergambheer aavaj....kahitari adbhut satvik vatayacha....pn ha abhanga far kunala mahiti ka nhi te matra na kale...
    post atishay sundar....tuzya saglya posts vachate keep up the good work!!

    ReplyDelete
  10. मेघा, सर्वप्रथम प्रतिक्रियेबद्दल आभारी...वाचणारी लोक लिहितात तेव्हा ब्लॉगरला बर वाटत.
    आणि अग तुझाच प्रश्न मलाही पडला आहे कारण वरच्या प्रतिक्रिया पाहिल्या तेव्हा मला पण वाटले की अरे जे आपल्याला अगदी फेमस वगैरे वाटतंय ते कुणाला माहित कस नाही...पण कदाचित असं असेल की भीमसेनजी हे शास्त्रीय गातात म्हणूनही हे ऐकले गेले नसेल असं मी स्वत:ला सांगतेय...म्हणून मी शेवटी लिंक पण दिली आहे....एकदा ऐकल की आवडेल असाच आहे...
    मी पूर्वी फिलीला असताना ट्रेनने डाऊन टाऊन ला नोकरीसाठी जायचे तेव्हा असाच आपली मराठी/हिंदी गाणी ऐकायचे त्याची आठवण तुझी प्रतिक्रिया वाचून झाली....

    ReplyDelete
  11. सही ग.. आत्ता ऐकलं गाणं.. मस्त आहे. मी म्हणत होतो ते भजन इथे ऐक.

    http://www.youtube.com/watch?v=H6h2Z1mYpZM

    ReplyDelete
  12. धन्यवाद हेरंब. "राम का गुणगान करिये" सुद्धा फ़ारच छान आहे

    ReplyDelete
  13. हो खरं आहे. गाणी मन एकदम हलकं करून टाकतात. माझी सदाबहार आवड म्हणजे पुकार चित्रपटातले "एक तू ही भरोसा" हे दीदींनी गायलेलं गाणं आणि अमोल पालेकरच्या गोलमालमधलं "आनेवाला पल".

    ReplyDelete
  14. सिद्धार्थ, "एक तू ही भरोसा" हे माझही आवडत गाणं आहे....फक्त याची आठवण मी खऱ्या शब्दात लिहू शकेन का माहित नाही....पण आता तू आठवण केलीच आहेस तर एकदा प्रयत्न करावाच लागेल...

    ReplyDelete
  15. नक्की लिहा. वाट पाहतोय.

    ReplyDelete
  16. सुराची बरसात काय असते ते गाण ऐकल्यावरच कळते संगीताची मेजवानी वेगळीच असते,पंडित भीमसेन जोशीचे अभग त्याचेच एक उदहारण

    ReplyDelete
  17. धन्यवाद महेशकाका. आज ही आठवण वाचताना एका योगायोगाच आश्चर्य वाटतय. मला बरेच दिवस, खर म्हणजे माझा जुलैमधला मोठा प्रवास झाल्यापासून ह्या गाण्याबद्दल लिहायचं होत आणि नेमकं मी लिहीलं गेल ते रामजन्मभूमीच्या वाद्ग्रस्थ निकालाच्या आसपास....आणि कुठेही मला ते आधी strike झालं नव्हतं नाहीतर मग पुन्हा पुढे ढकललं असत.

    ReplyDelete
  18. माझा खूप खूप खूप आवडता अभंग आहे हा.अपर्णा खूप सुंदर लिहील आहेस.आवडलं.बरेच दिवस झाले तुझा ब्लोग वाचून आता वेळ मिळाला कि एकदाच सगळा वाचून काढणार आहे.

    ReplyDelete
  19. सागर तुझ्या प्रतिक्रियेबद्द्ल आभारी. नेमकं पंडितजी गेल्यावर लगेच आलेली प्रतिक्रिया असल्यामुळे काही बोलण्यासारखंच नाहीये माझ्याकडे...आपलं कुणी जवळचं गेल्यावर कसं वाटेल तीच भावना आहे त्यामुळे शब्द सुचत नाही...ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो...या ब्लॉगतर्फ़े हीच श्रद्धांजली....

    माझा ब्लॉग सध्या तात्पुरता बंदच आहे त्यामुळे केव्हाही वाच....तुझ्या आवडीचं त्यात काही असलं तर नक्की कळव....

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.