Thursday, August 19, 2010

१ टक्क्याची गोष्ट उर्वरीत...

एक टक्क्याच्या गोष्टीचा प्रारंभ....


माझ्या पोर्टलॅंडच्या विमानाची शार्लेटहून वेळ होती संध्याकाळी सव्वा-सहाची आणि हार्टफ़डहून निघालेल्या विमानाची वेळ होती साधारण साडे-चार. दोन तासांपेक्षा थोड्या कमी वेळाचं हे अंतर जर त्याप्रकारे काटलं गेलं आणि आधी म्हटल्याप्रमाणे तिथल्या गोंधळामुळे माझं विमान जरी वीसेक मिनिटं उशीराने धावत असेल तरी पळत पळत का होईना मी हे विमान पकडू शकले असते.म्हणजे ऑप्टिमिस्टिकली मला उरलेला प्रवास आधीच्या प्लानिंगप्रमाणे करता येणं बर्‍यापैकी शक्य होतं..अर्थात म्हणून मी निर्धास्त नव्हते पण अर्थातच विमान चालवायची सूत्र माझ्याकडे नसल्याने मी काही करुही शकणार नव्हते.मनात मात्र हिरकणीसारखं वाटायला लागलं होतं. पहिल्यांदाच दोन वर्षांच्या मुलाला मी साधारण आठवडाभर जवळ घेतलं नव्हतं. त्यामुळे शार्लेटला डी गेटला विमान लागलं तरी सी-११ ला धावत जायची माझी तयारी होती. आता फ़क्त चाकं खाली टेकायची वाट पाहायची.

सहज माझ्या उजवीकडच्या रो मध्ये एक जोडपं आणि त्यांचा मुलगा बसले होते, त्यातल्या बाजुला बसलेल्या बाबांना विचारलं की तुम्ही कुठे जाताय तर तो म्हणाला सिऍटल. मला उगीच माझं विमान हुकलं तर त्यांचा सहारा होईल का म्हणून विचारलं की कितीचं फ़्लाईट आहे तर तो गृहस्थ शांतपणे उत्तरला २० मिनिटांपूर्वी...अर्रर्र च्चच्च...मी मनात...पण या प्रसंगातही ते तिघं ज्या प्रकारे शांत होते आणि तो आपल्या मुलाबरोबर फ़ुली-गोळा खेळत होता ते पाहून मला खरंच नवल वाटलं..अर्थात माझ्यासाठी मी हिरकणी व्हावं का या विचारात आणि ते तिघं एकत्र हाही मोठा फ़रक होताच म्हणा...असो..

शेवटी एकदाची चाकं टेकली ६-२५ आणि कप्तानाचे सहानुभूतीचे शब्द कानी आले आपल्याला कदाचित गेट मिळायला उशीर लागेल पण आपण सुरक्षित पोहोचलो आहोत हे महत्वाचं. मी शेजारणीच्या खिडकीतून सहज नजर टाकून अंदाज घेतला आम्ही सी गेटला होतो. म्हणजे मला अगदीच धावायला लागणार नव्हतं असं मी स्वतःला बजावत आशावादी राहायचा प्रयत्न केला. तरीही जेव्हा गेटसाठी वळलो तेव्हा उजव्या बाजुला दिमाखात टेक ऑफ़साठी जाणारं दुसरं आकाराने बर्‍यापैकी मोठं विमान दिसलं आणि मनात शंकेची पाल चुकचुकली..अक्षरशः या विमानातून याक्षणी उतरून धाड-धाड बाजुच्या वैमानिकाला बसच्या कंडक्टरसारखं टकटक करुन काय रे पोर्टलॅंड का? हा बघ बोर्डिंग पास असं सांगुन घुसखोरी करावी असा विचारही मनात आला पण यातलं काही म्हणजे काही करता येणार नव्हतं. विमान धक्क्याला(आता आमचे जीव टांगणीला म्हणून धक्क्याला) लागलं आणि ज्यांची विमानं चुकलीत त्या यादीत अर्थातच आमच्या विमानाचा नंबर होता..माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं. आता प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरी काहीही होणार नव्हतं. कारण इस्ट कोस्टवरुन संध्याकाळी वेस्ट कोस्टसाठी प्रत्येक कंपनीचं एखादंच विमान असतं...

बाहेर आलो. विमान कंपनीने माझ्यासारख्यांसाठी पर्यायी बोर्डिंग पास बनवून ठेवले होते. त्यात मला रात्री १०:३० ला शार्लेटहून अटलांटा आणि मग दुसर्‍या दिवशी सकाळी अटलांटाहून पोर्टलॅंड असा मार्ग होता. ’काय गं भवाने राहायची सोय काय?’ असं सौम्य शब्दात विचारल्यावर नैसर्गिक आपत्तीमुळे आम्ही काही करु शकत नाही पण दुसरीकडे तुमच्यासाठी हॉटेलसाठीचे सवलतीचे पास आहेत ते घ्या असं त्या तळसुंदरीनं सांगितलं..आता मात्र मी पुरते विटले होते. तो सी-११ चा गेट आमच्या बरोबर उजवीकडे होता म्हणजे मी माझंच विमान जाताना पाहिलं. त्याच वेळी शार्लेटहून प्रत्येक विमानं निदान तासाभराच्या अंतराने उडाली, बरीचशी रद्द झाली होती पण जी काही एखाद टक्का विमानं उडाली त्यात नेमकं माझं विमान होतं...एक टक्क्यावाले आम्ही आणखी काय??

आता इथे वेळ काढून अटलांटापेक्षा इथुनच किंवा किमानपक्षी फ़िलाडेल्फ़िया किंवा गेला बाजार न्यु-जर्सीहून कनेक्टिंग मिळालं तरी बरं असा विचार करुन मी दुसर्‍या एका रांगेत उभे राहिले. आणि मुख्य आता मला फ़िलीला जायचं अजीबात भावूक वाटत नव्हतं.खरं तर या दोन्ही ठिकाणी भरभरुन असलेल्या मित्रमैत्रीणींपैकी कुणी भेटू शकलं तर या दगदगीचा त्रास थोडा कमीच वाटेल असं वाटत होतं. काळाचा महिमा आणखी काय??

इथे अर्थातच त्या बाईने बरेच प्रयत्न केले पण एकतर फ़िलीला जाणारी सगळी विमानं तुडुंब भरली होती, न्यु जर्सीला दुसर्‍या दिवशी संध्याकाळीच उडायचा पर्याय होता, शार्लेटचा आणखी काही प्रॉब्लेम असं सगळं पाहता तिच्या मते मी अटलांटाला जाणं हाच सर्वोत्तम मार्ग होता. काही नाही सगळी एक टक्क्याची कृपा.हवं तिथं काही नसायचंच...असो...मुकाट्याने मी ते हॉटेलचं कुपन घेतलं आणि फ़ोन करायला सुरुवात केली.या गोंधळाचा फ़टका बर्‍याच जणांना बसला असावा. एअरपोर्टजवळचे डिस्कॉंन्टेड पर्याय बुक्ड होते. एकदा फ़क्त माझ्या टीम-लीडला फ़ोन करुन कल्प्ना दिली कारण दुसर्‍या दिवशी म्हणजे शुक्रवारी एक-दोन महत्वाच्या मिटिंग होत्या त्या रद्द करणे आणि मुख्य हा नवा हॉटेलचा भुर्दंड पडणार आहे याची त्याला आधीच कल्पना देणे महवाचं होतं. तो अर्थातच काही नाही म्हणाला नाही. मग निवांतपणे एअरपोर्टजवळच्या आणखी एका हॉटेलचा डायरेक्ट नंबर एका सहकार्‍याकडून घेऊन रात्रीचं बुकिंग केलं. हे सर्व होईस्तो साडे-आठ वाजले त्यामुळे अगदी बेकार मुडमध्ये तिथे एका ठिकाणी रात्रीचं जेवणही केलं.

आता त्या रात्रीच्या फ़्लाइटसाठी शार्लेटच्या त्या विमानतळावर शेवटी सी पासून ए गेटकडे जायची वेळ आलीच. हा विमानतळावरचा प्रवास म्हणजे लास वेगसच्या व्हेनेशियन किंवा कुठल्याही हॉटेलच्या आतमध्ये मॉल्स आहेत अगदी साधारण तसाच आहे. अर्थात व्हेनेशियनसारखं खरंच वाटणार खोटं आभाळ नाही पण सांगायचं म्हणजे एकदम मॉलच केलाय. बराच मोठा आहे हा विमानतळ हेही लक्षात आलं म्हणजे समजा जर खरंच मला आधी म्हटल्याप्रमाणे डी गेटकडून सी कडचं विमान धावत पळत पकडायची वेळ आली असती तर काही खरं नव्हतं..

सवा नऊच्या आसपास मी माझ्या इच्छित गेटला पोहोचले तेव्हा तिथे अर्थातच कुणी कुत्राही नव्हता.असला वैताग आला होता. नंतर यथावकाश लोकंही आली पण विमानाचाच पत्ता नव्हता. अगदी साडे दहा झाले तरी अजुन पुढची सुचना नाही इतकंच काय ती बया सांगत होती. लोकंही बरीच झाली होती. अचानक बाजुच्या फ़ोनवर हिंदी ऐकायला आल्यामुळे माझे कान उगाच टवकारले. एक हैद्राबादचे काका प्रथमच अमेरिकेत आले असावेत आणि मुलीकडून चुलतभावाकडे जाताना या गोंधळात बिचारे या अटलांटाच्या विमानात स्टॅंड-बायला होते.मला त्यांच्या वयाकडे वगैरे पाहून त्यांना मदत हवी असेल तर विचारावसं वाटलं तेव्हा मग आम्ही चांगल्याच गप्पा मारल्या. त्यावर खरं तर एक वेगळी पोस्ट होईल. पण हे काका होते म्हणून प्रत्यक्ष बोर्डिंग जे साडे-अकराला झालं तोपर्यंतचा वेळ तरी चांगला गेला.

या सगळ्या भानगडीत अटलांटाला पोहोचायला साधारण एक आणि तिथुन बाहेर पडून हॉटेलला चेक-इन करुन प्रत्यक्ष झोपायला जायला जवळ जवळ पहाटेचे दोन वाजले.पुढचं विमान आठचं होतं आणि आता कुठलाही चान्स घ्यायचा नव्हता म्हणून इतरवेळी कधीही मी अर्धा तासापेक्षा जास्त वेळ आधी जात नाही पण चक्क साडे-सहाची एअरपोर्ट शटल पकडायचं ठरवलं. काय चाल्ललंय काय यार असा विचार करत मी साडे-पाचचा गजर लावला.

दुसर्‍या दिवशी सकाळच्या पोर्टलॅंडच्या विमानात बसतानाच कळलं की त्या टवळीने या विमानालाही एक हॉल्ट आहे हे नरो वा कुंजरो स्टाइलने सांगितलच नव्हतं. म्हणजे विमान बदलायचं नव्हतं पण ते मध्ये फ़िनिक्सला तास-दीड तास तरी थांबणार होतं.कप्पाळ आता काय? हेच ते एक टक्का चान्स होता की मी इतकं प्लानिंग करुन काढलेलं एकच थांबा असणारं तिकिट अस चार थांबे होईल याचं आणि ते एक टक्का माझ्या बाबतीत शंभर टक्के खरं होतंय..दुसरं काय....आता विमानात चढल्यापासून उतरेपर्य़ंतच्या सुचनांची सगळी वाक्य ऐकुन मी इतकी किटले होते की मला वाटतं जर एखादं वाक्य ते विसरले असते किंवा क्रम बदलला असता तर मी त्यांना स्युच केलं असतं...असो...

या मारुतीच्या शेपटाचं रावणाच्या मिशीत रुपांतर करायचं तर सातेक तासांचा विमान प्रवास आणि विमानतळावरचा टाइमपास इ. डोक्यावरुन पाणी म्हणजे दहा तासाचा विमानप्रवास करण्यासाठी मी माझ्या इस्ट कोस्टमधल्या ऑफ़िसमधुन साडे-अकरा वाजता निघाले होते ते मी दुसर्‍या दिवशी वेस्ट कोस्टच्या दोन वाजता घरी (एकदाची) पोहोचले. म्हणजेच इस्ट कोस्टच्या संध्याकाळचे पाच वाजता.म्हणजे तासांमध्ये साधारण सव्वीस तास.....अबबब...इतका वेळ तर मला मायदेशाहून इस्ट कोस्ट मार्गेच वेश्टात यायलाही लागला नव्हता..धन्य तो वेदरडीले आणि धन्य माझ्यासारखे असे एक टक्कावाले...और क्या??



तळटीप: त्यानंतरचे दगदगीचे दिवस अजुनही सुरु आहेत फ़क्त तुका म्हणे त्यातल्या त्यात म्हणजे मी ती दगदग घरुन करतेय....आणि काही आठवड्यानंतर का होईना पण ही पोस्टही लिहिली गेलीय..आता "गेले काही दिवस कुठे आहेस?" "अगं लिही नं काही" असं सांगणार्‍या माझ्या ब्लॉगप्रेमींना काही तरी स्पष्टीकरण द्यायला हवं म्हणून थोडं उशीरा का होईना थोडंफ़ार सपष्टीकरण मिळालं आणि पटलं असेल अशी आशा.

16 comments:

  1. अरारारारां... चक..चक..चक.. काय गं.. कुठे कुठे गरागरा फिरून आलीस... :D

    टक्यात टक्का 'बारटक्का' .. तसा तुझा १ टक्का... हे हे हे... आता जरा दमाने घे.. कळले ना!!!

    ReplyDelete
  2. काय वैताग वैताग झाला असेल गं.... जाणवतेय अगदी. हे विमानकंपनीवाले सारखे डोळ्यात पाणी ( लोकांच्या शुष्क डोळ्यांची भारी काळजी हो यांना.... ) अन दिवसाढवळ्या तारे दाखवत असतात. पुन्हा जखमेवर गोड गोड बोलून मीठ चोळण्यात पटाईत....

    बयो, बरी आहेस ना गं? काळजी घे.

    ReplyDelete
  3. बाब्बो.... २६ तास?? हे म्हंजी अतीच झालं की.. वाईस जर्सीचं विमान पकडलं असतंस तर तीच दगदग किती कमी झाली असती हेसांनल...

    ReplyDelete
  4. बाप रे,किती खोळंबा... हया एक टक्क्याने तुझी चांगलीच परीक्षा घेतली ग...काळजी घे...

    ReplyDelete
  5. रोहन आता यकदम दमाने आहे..मध्ये कॅनडाला जाशील का म्हणून पृच्छा होती...मी एकदम कॅनावर आपलं कानावर हात ठेवले....:)

    ReplyDelete
  6. अगं श्रीताई, सॉलिड वैतागले होते मी आणि त्यातही वेळ असा फ़ुकट आणि इथुन तिथे पळवापळवी...बघ नं नकाशात पाहिलस तर उजवीकडून थोडं तिरकस डावीकडे यायला मला खाली, अजून खाली मग मध्ये असं करत आणलं म्हणजे जवळजवळ अर्ध-गोलाकार चक्कर केली मी या देशाची....असो..आता ठीक आहे...

    ReplyDelete
  7. अरे खरंय हेरंब. इतक्या घाईत टिकीट काढलंय नं की तो विचार केला नाही. पण जर्सीचं तिकीट काढलं असतं तर आपल्या दोघांना वेगळ्या विषयावर लिहिता आलं असतं....मे बी नेक्स टाइम..:)

    ReplyDelete
  8. धन्यवाद देवेंद्र....प्रवासातल्या या गोष्टी आपल्या हातात तशाही नसतात पण सगळीकडेच फ़ासे पलटले की मात्र त्रासच जास्त...

    ReplyDelete
  9. काय हे किती ते टक्के टोणपे
    आम्हा तुझ्या ब्लॉगप्रेमींना अधिक कासावीस केलस हे पोस्टून, अज्ञानात शहाणपण बरं होतं की :)

    ReplyDelete
  10. बेक्कार पीडा झाली म्हणायची... एकेक अनुभव असतात! काळजी घे!

    ReplyDelete
  11. हा हा प्रसाद..आठवणीत राहणार आहे ही ट्रीप नेहमीसाठी म्हणून उतरवली कागदावर...तसंही बघ बरेच दिवस ब्लॉगवर जास्त काही लिहिलंही नाहीये...आता ’खो’ ला मार्गी लावा लवकर...

    ReplyDelete
  12. अगदी खरंय बाबा..बरं तिथे जाऊनही काही छान दिवे लावता आलेत असंही नाही. उगाच सांगितलं तसं दुसर्‍यांनी लावलेल्या आगींवर पाणी.....असो...एकएक अनुभव असतात...

    ReplyDelete
  13. आई आई ग..च्यामारी नुसती धावपळ पळापळ..आणि मानसिक त्रास :(
    काळजी घे

    ReplyDelete
  14. आभारी सुहास.... आता ठिक आहे.

    ReplyDelete
  15. किती ही पळापळ !

    लेखन छैली मस्तच..

    भवानी , टवळी शब्दांचा चपखल वापर ;)

    नवीन पोस्टची वाट पाहतो आहे.

    ReplyDelete
  16. राजकिरण, सर्वप्रथम ब्लॉगवर स्वागत....अहो हा प्रसंगच असा होता की ते सारे शब्द आपोआपच आले आहेत....अगदी मनापासून दिलेल्या शिव्याच आहेत त्या....पुढची पोस्ट लिहितेय....येईल इतक्यात...आपल्या प्रतिक्रियाही येउदेत...:)

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.