Saturday, August 7, 2010

करुया अंगत "पंगत"

यावेळच्या मायदेशवारीचं वैशिष्ट्य म्हणजे खादाडी चळवळीवर भर...त्याचं कारण इथे आपल्या चवीचं मिळत नाही यापेक्षाही मागच्यावेळी गेले होते त्यावेळी आरुष खूपच लहान होता त्यामुळे मला कुठेही बाहेर खायला देण्यात आलं नव्हतं...(म्हंजे तेच ते परवानगी) तरी चोरुन-मारुन एक दोन डल्ले मारले होते पण यावेळी राजरोसपणे खाऊगल्यांची भटकंती करायची होती..आणि आम्ही दोघंही खव्वेये असल्याने काही प्रश्नच नव्हता.


बोरीवलीच्या मुक्कामात जास्तीत जास्त वेळा गेलेलो ते हे ठिकाण म्हणजे "पंगत". हे आहे बोरीवली पश्चिमेला गोराईच्या सेक्टर २ च्या दिशेने जाताना एकदा वजिर्‍याच्या देवळाकडून सरळ लिंक रोडचा सिग्नल ओलांडला की आधी उजवीकडे "सायली इंटरनॅशनल स्कूल" दिसते तसंच डावीकडे एक मैदान आणि थोडं पुढे उजवीकडे "पंगत" उभं आहे. जेवणाच्या वेळेच्या थोडं आधी गेलं तरी आम्हाला वरती एसीमध्ये जागा मिळाली नव्हती आणि आणखी थोडं उशीरा गेलो असतो तर मात्र रांगच लावावी लागली असती. एकंदरित खवैयांची गर्दी असणारी जागा; पण जायला मात्र हवं हमखास.

मालवणी जेवण ही इथली खासियत. साधा-सोपा मेन्यु आणि वाढणी पण पुरेशी. किंमत मात्र अगदी वाजवी.पहिल्या वेळी आमचं बिल माझ्या भावजींनी दिलं होतं त्यामुळे पाहिलं नाही पण दुसर्‍या वेळी आम्ही सहा माणसं व्यवस्थित हजाराच्या आत का कायतरी जेवलो असू म्हणजे नक्कीच परवडणलेबल आणि मुख्य म्हणजे मासे खाण्यासाठी जाणार असाल तर जे मिळणार ते अगदी ताजं...जे ताजं मिळत नाही ते त्यादिवशी नसतं..उदाहरणच द्यायचं तर पहिल्या वेळी खाल्लेली सुरमई आवडली म्हणून दुसर्‍या वेळी मागवली तर त्यादिवशी ती नव्हती पण बांगडा होता. शाकाहारी लोकांसाठी अगदी कोथिंबीर वडी पासून वालाच्या उसळीसारखे अस्सल मराठमोळे पदार्थ आहेत. (जाणार आहे मी एकदा शाकाहारीसाठीसुद्धा..:))

आम्ही पहिल्यांदी गेलो ते ताईकडे तिला जेवण करायचा त्रास द्यायच्या ऐवजी त्यांच्याच (आणि आता आमच्याही) पसंतीचं हे ठिकाण ट्राय करण्यासाठी. पाच मोठी आणि दोन छोटी म्हणजे तरी बर्‍यापैकी माणसं होतो. त्यामुळे भरपुर काय काय मागवलं. तळणी खायला (आणि करायला सुद्धा) पटाईत असणार्‍या माझ्या नवर्‍याने आपण वडे मागवणार असल्याचं आधीच जाहिर केलं आणि माझे बाबा,भावजींनीही त्याला दुजोरा दिला. पण मला आंबोळी आवडतात आणि इतरवेळी खाल्या गेल्या नाहीत म्हणून मी मात्र आंबोळी खायचं डिक्लेअर केलं, माझी भाची म्हणजे तशी माझीच मुलगी तीपण मला सामील झाली. पण इथली तांदळाची भाकरी छान असते म्हणून ताईने मात्र आठवणीने भाकरी मागवली आणि बरं केलं सगळंच खायला मिळालं...कुणी काय मागवलंय काय करायचंय. मग सुकं म्हणून तळलेली मांदेली आणि सुरमई तर पापलेटचा नंबर कालवणात लावला. प्रत्येकवेळी काहीतरी हटके खायचं मनात असतं आणि असा पदार्थ शोधणारं माझं अर्धांग यावेळी मोरी म्हणजे काय? असं म्हणून एक मोरीचंही कालवण मागवलं..सोलकढी, भात हे अर्थातच होतंच. ये मोरी, मोरी क्या है म्हणत तो मासा ज्यांनी ज्यांनी तोंडाला लावला त्यांना त्याची चव इतकी आवडली की हा आयटम मागवल्याबद्द्ल नवर्‍याने सर्वांतर्फ़े स्वतःच कौतुकही करुन घेतलं.

आंबोळी इतकी लुसलुशीत होती की मी आणखी मागवली कारण नंतर मलाच मिळाली नाही का असं मला वाटलं..शिवाय जे जसं संपेल तसं मागवलं जातच होतं...आमची ऑर्डर घेणार्‍याला आम्ही किती दिवसांचे उपाशी आहोत असं तर वाटलं नसेल नं? असं आता हे लिहिताना मला वाटतंय. असो.

सगळं दहा-पंधरा मिनिटांत चाटुन-पुसून ताटं लख्ख झाली तरी काहीतरी राहिलं होतं बहुतेक म्हणून मग आठवणीने खरवस मागवला गेला आणि बहुतेक केशर घातलेला तो लुसलुशीत खरवस घशाखाली उतरवुन तृप्त होऊन आम्ही खाली उतरलो ते पुन्हा इथे यायचंच यासाठीच.

आणि त्यानंतर साधारण दीड आठवड्यातच परत आलो..यावेळी आई-बाबा,भाचे कंपनी आणि आम्ही दोघं. मुद्दाम विकडेजच्या दुपारी आलो. रांग नसली तरी बर्‍यापैकी गर्दी होतीच. यावेळी नवं काहीतरी म्हणून खीमा फ़्राय मागवला आणि मासे खातोय तर कशाला म्हणता म्हणता तो आधी आणला गेल्याने त्या खीम्याचा फ़न्ना कधी उडवला ते कळलंही नाही. आणि यावेळी आठवणीने खाला तो तळलेला बांगडा..या फ़ेरीचं वर्णन करण्यापेक्षा दोन्हीचे मिळून फ़ोटो (खरं सुरुवातीला फ़ोटो काढले नंतर मात्र सरळ डल्ला...)पाहिले की तुमची पावलंही या पंगतीत नक्की वळतील आणि सारखी सारखी येत राहतील...आणि मला निषेधाचे कमी खलिते मिळतील काय?? यंज्व्याय...
 

20 comments:

  1. पंगतला जायलाच हवे आता.. तू इकडे होतीस तेंव्हा पासून मला जायला सांगते आहेस ... :) आणि हो खादाडी पोस्टवर जरा कंट्रोल... मला जायला अजून २ आठवडे आहेत... :D

    ReplyDelete
  2. चवदार पोस्ट.. निषेध.. कारण मुंबईला नॉनव्हेज हॉटेलला जाता येत नाही नां.......

    ReplyDelete
  3. रोह्या पोह्या, तू नक्की जा...तुला आणि शमीला नक्की आवडेल....आणि मग परतीच्या वाटेवर राजेंद्रनगरच्या पुलाच्या अलीकडे एक "नॅचरल" आहे तिथेही वळा...:)

    ReplyDelete
  4. काय काका?? आपण तर मुंबईतच गोमंतकमध्ये गेलो होतो की??कधीतरी तसंच जाऊया एकदा नाहीतर....

    ReplyDelete
  5. शुशा-वाल्यांच्यां खातरदारीचाही सरंजाम छान दिसतोय की. मायदेशका बुलावा अभी जोरोशोरोंपे हैं... लवकरच पंगत चा ही योग येणार तर...

    अपर्णा, हे लिहीतानांही मनाने पुन्हा एकदा आडवा हात मारला असशील नं... :D

    ReplyDelete
  6. आमच्या साठी काहीच नाय की वो....:(

    शाकाहरी साठी जाशील तेव्हा सांग...सोबतीला मी येइन..:) :)

    ReplyDelete
  7. श्रीताई, अगं शुशाचे खूप पर्याय आहेत आणि तेही अस्सल म‍र्‍हाटमोळे..आवर्जुन जा आणि पोस्ट...मी पुढच्यावेळी खास गुरुवारी जाईन म्हणते.....आणि बुलावा येतोच आहे..मैने अपनी काली जुबान से कभीच का वो बुलावा भेजा है....:)

    ReplyDelete
  8. योगेश, शाकाहारी पर्याय आहे आणि मी पण शाकाहारी दर्दींच्या शोधात आहे...तेव्हा तुझा नंबर पैला....:)

    ReplyDelete
  9. चांगली माहिती आहे..
    पण मला परतायला अजून ४ महिने असल्याकारणे एक छोटासा निषेध आहे!

    ReplyDelete
  10. बाबा, तू बोरीवलीच्या आसपास राहतोस का?? तीन-चार महिने म्हणजे काहीच नाही रे...आमच्याकडे बघ कधीकाळी वर्षा-दोन वर्षांतून जातो म्हणून जास्त कौतुक बहुधा...:)

    ReplyDelete
  11. बाबा, तू बोरीवलीच्या आसपास राहतोस का?? तीन-चार महिने म्हणजे काहीच नाही रे...आमच्याकडे बघ कधीकाळी वर्षा-दोन वर्षांतून जातो म्हणून जास्त कौतुक बहुधा...:)

    ReplyDelete
  12. इथे शुमांचं प्रस्थ जास्त दिसत असल्याने सौम्य निषेधणार होतो पण शुशाही चांगलं मिळतं असं तू लिहिलं असल्याने जोरदार णी शे ढ !!!

    ReplyDelete
  13. जाणार जाणार.. नक्की जाणार... :) अंगत.. संगत.. पंगत..

    पण तुम्ही असता संगत तर आली असती रंगत.. हेहे.. :) आहेस कुठे अजिबात येत नाहीस की काय ओन्लाईन??

    ReplyDelete
  14. रोहन अरे काय कवितेच्या मूडमध्ये आलास की काय? बघ हं नाहीतर तुलाही खो मिळेल...:) पंगतसाठी संगत यायला मी तयार आहे फ़क्त कधी ते माहित नाही..आणि हो रे आजकाल कामाचा डोंगर झालाय त्यामुळे ब्लॉगवरपण आठवडी बाजारासारखं येते बघुया केव्हा निवांतपणा मिळतोय ते....

    ReplyDelete
  15. खो.... श्शशशश... चुपचाप रेहनेका... :) बोलू नको... पण बहुदा माझी ह्या बाबतीतली मर्यादा सर्वांना ठावूक असल्याने कोणी असे काही करणार नाही... :)

    ReplyDelete
  16. रोहन खरं म्हणजे माझा नंबर आणि तेही मीनलने लावला (जिथे मी कमीत कमी कवितांच्या ब्लॉगवर असते तरी) तर तुझाही कुणी लावला तर त्यात काही नाही...:)
    असो...हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है....

    ReplyDelete
  17. अरे ही पोस्ट मी वाचली होती आणि कॉम्मेंट पण दिली होती...असो

    पंगत माहीत आहे ग पण आता त्याचा दर्जा खास राहिला नाही असे मित्र म्हणतात. माझा जायचा योग आला होता, पण तेव्हा मी शाकाहारी होतो आता कोंबड्या खायला लागलोय परत ;-)

    ReplyDelete
  18. एवढी सोन्यासारखी पोस्ट नजरेतून सुटली होती. नसती वाचली तर जिभेला पाप लागले असते. सुझेच्या पोस्टमुळे लिंक मिळाली. महेंद्र काका आणि सेनापतीनींदेखील बर्‍याच लिंक देऊन ठेवल्या आहेत. नातेवाईकांना न कळवता एक मुंबई दौरा करायला हवा.

    ReplyDelete
  19. सुहास आधीची प्रतिक्रिया आलेली दिसत नाही...ब्लॉगरने खाऊन टाकली वाटतं..:)

    अरे आधी जाऊन बघ..नाहीतर पुढच्यावेळी आपण एकत्र जाऊ म्हणजे तुला नाहीच आवडल तर आम्ही खाऊ...आम्हाला तर खूप आवडली पंगतची चव...

    ReplyDelete
  20. हा हा हा सिद्धार्थ.... तुझ्या लिस्टमध्ये हे नाव नक्की टाक...आता ही लिस्ट कशी execute करायची ते मात्र तुला बघावं लागेल....:)

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.