Saturday, August 14, 2010

आला पिकनिकचा महिना

ऑगस्ट महिना अमेरिकेत "picnic month" म्हणून साजरा होतो असं मागेच रेडिओवर ऐकलं आणि उगाच भावूक व्हायला झालं..गेली काही वर्षे न कळत ऑगस्टमध्ये कितीतरी पिकनिकचा भाग आम्ही सारखेच झालो होतो. अर्थात ऑगस्ट म्हणजे मुलांच्या शाळांच्या सुट्टीचा शेवटचा महिना किंवा काही राज्यात शेवटचे आठवडे, उन्हाळा भरात आलेला, मावळतीचं ऊनही उशीरापर्यंत थांबलेलं, शेतांमध्ये मक्यापासून,वेगवेगळ्या बेरी,पीच,भाज्या सगळ्यांचाच बहर या पार्श्वभूमीवर बाहेर जाऊन खेळणं, खाणं नाही व्हायचं तर काय. म्हणजे त्यावरुनच हे असे मास साजरे होतात इथे. जस जुलैच्या गरम लाटांमध्ये आइस्क्रिम आपसूक जास्ती खाल्लं जातं म्हणून तो "Ice cream month" जाऊदे सध्या हे पुराण इथंच थांबवते कारण खादाडी निषेधासाठीची एक पोस्ट या महिन्यात आधीच टाकून झालीय. खरं तर जुलैमध्ये आइस्क्रिमबद्द्ल लिहायचं मी जाणीवपुर्वक टाळलंय...(आळशीपणाला किती गोंडस शब्द मिळाला नाही??)


हम्म्म्म...तर असा हा ऑगस्ट आला की जवळच्या मराठी मंडळाची पिकनिक आधीची प्लान्ड असायची. त्यात जायचं म्हणजे खेळ आणि खाऊ दोन्हीमध्ये आपलाच मेन्यु...सुरुवातीला नमन चविष्ट भेळे, प्यायला पन्हं असं पार पडलं की मंडळी पार्कात खो-खो, लगोरी, क्रिकेट असे देशी खेळ खेळून दमली की मग वडा-पाव-चटणी, पार्कातच समोर भाजलेली कणसं, रसरशीत कलिंगड यावर ताव मारत दुपार कशी निवायची कळायचंही नाही...बच्चा, बच्चे के मॉं-बाप आणि मायदेशाहून आलेले आजी-आजोबा सगळ्यांसाठी आठवणीतला एक मस्त उनाड दिवस. आम्ही जिथे राहायचो तिथेही काही एक छोटा मराठी ग्रुप होता. ही मंडळीही एकदा जवळच्या पार्कात एखादी छोटीशी पिकनिक प्लान करत आणि मग विकत मिळणारे बर्गर पार्कातल्या ग्रिलवर ग्रिल करुन त्यासोबत चिप्स, ज्युस, सोडा अशा अमेरिकन साध्या-सोप्या मेन्युमध्ये रंगलेल्या मराठी गप्पांमध्ये हाही दिवस उन्हाळ्यातल्या आठवणीत राही.

आणखी एक ग्रुप होता माझी एक मैत्रिण सत्संग करायची त्यांचा. आम्ही महिन्यांतून एखादवेळा त्यांच्या कार्यक्रमाला जायचो पण त्यांच्या वार्षिक सहलीला ती आमच्या कुटुंबाला आवर्जुन बोलवायची. या ग्रुपमध्ये गुजराथी मंडळी जास्त होती आणि त्यामुळे अर्थातच मेन्यु विविधता. एका वर्षी त्यांनी मेक्सिकन भेळ केली होती. एकदम पोटभरा प्रकार आहे. रिफ़्राइड बीन्स एका आंटीने घरुन करुन आणल्या होत्या. त्यावर मग बारीक चिरलेले कांदा, टॉमेटो, साल्सा आणि खूप सारं चीज घालून मिक्स करुन खायचं...सोबर चिप्स होत्याच..(आता गुजु म्हटलं की चिप्स आणि चीज नसेल तर खायचं चीज नाही व्हायचं म्हणा) मग त्याच पार्कमध्ये टेनिस, व्हॉलिबॉल, क्रिकेट खेळून दमल्यावर मग थंड कलिंगडाचा उतारा. काही वेळा तर सकाळीच नवर्‍याला चिकन तंगड्या ग्रिल करायचा मूड आला की मग मसाला लावुन त्या भरुन आणखी एखाद्या मित्रमंडळाला फ़ोन केला की त्यांच्याबरोबर मग पार्कात भेटून तिथेच त्या ग्रिल करणं, सोबतीला चीजचं पुरण भरलेल्या भोपळी मिरच्या (इथल्या मिरच्या त्यातल्या त्यात ढमाल्या असतात त्यामुळे पोटही छान भरतं), हवा असल्यास पाव, घरात भाजायच्या लायकीचं असेल ते कांदा-बटाट्यापासून मक्यापर्यंत काहीही पोटात ढकलताना दिवस कसा जायचा कळायचंही नाही. जास्त खाल्लंय असं वाटलं तर तिथल्या तिथं एखादा ट्रेल करुन टाकायचा म्हणजे उगाच गिल्टी फ़िलिंग पोटात घेऊन घरी जायला नको.

या अशा पार्श्वभूमीवर अजून न रुळलेल्या या ओरेगावात(आता हे रडगाणं कधी थांबवणार मी??) थोडं बोअर होणार असं वाटत असतानाच त्यादिवशी नवरा म्हणाला आमच्या ऑफ़िसची पिकनिक आहे आणि तीही ऑफ़िसच्याच आवारात. म्हणजे मान्य आहे मला याच्या ऑफ़िसचा कॅंपस अम्मळ जास्तच मोठा आहे पण तरी रोज ऑफ़िसला जाणार्‍या लोकांना पुन्हा तिथेच बोलवायचं म्हणजे कॉस्टकटिंग की काय रे? असा विचार करतच मी तिथं पोहोचले आणि एका दिवसात त्या भागाचा नक्षाच बदलला होता. इतर वेळी नुसतं वेल-मेंटेन्ड गवताचा भाग होता तिथे मस्त कनाती, तंबु, संगीत अधुन-मधुन येणारा संगीताचा आवाज आणि खूप सारी माणसं(हेही महत्वाचं नाहीतर इथे लोकं दिसणं म्हणजे एकंदरितच...जाऊदे) पाहून माझे आधीचे विचार कधी बदलले कळलंच नाही. मुलांसाठी चित्रकला, तोंड रंगवणे, फ़ुगेवाली, राइड्स, हुलाहुप स्पर्धा, आणखी ते आपण टेलिमॅचमध्ये पाहायचो त्यासारखी एक धावण्याची स्पर्धा असलं बरंच काही होतं...खाऊचीही चंगळ होती..बार्बेक्युचा धूर मागच्या बाजुला भगभगत होता. मेन्यु अर्थातच अमेरिकन होता. शाकाहारींसाठी बर्गर सॅंडविच, सॅलड, मांसाहारींसाठी हॉट डॉग, चिप्स, मका, फ़ळं, अधेमधे टाइमपास म्हणून म्हातारीचा कापूस, आणि शौकिनांसाठी वाइन बार वगैरे बरंच काहीसं होतं..इतकं वर्णन काय करते मी? थोडीतरी फ़ोटोझलक टाकायला हवी म्हणजे नकळत(??) आलेल्या खादाडीचाच उल्लेख जास्त झाल्याने तयार झालेल्या निषेधांच्या खलित्यांचं रुपांतर कौतुकात होईल....

11 comments:

  1. खादाडी निषेधासाठी या महिन्यात एक पोस्ट टाकुन झाली आहे म्ह्णुन थांबते म्ह्णत खादाडीवरच सुटली स...निषेध...निषेध...निषेध...

    फ़ोटो दिसत नाहियेत ग....

    आणि हो आळशीपणाच गोंडस नाव पण आवडल... :)

    ReplyDelete
  2. खादाडी निषेधासाठी या महिन्यात एक पोस्ट टाकुन झाली आहे म्ह्णुन थांबते म्ह्णत खादाडीवरच सुटली स...निषेध...निषेध...निषेध...

    फ़ोटो दिसत नाहियेत ग....

    आणि हो आळशीपणाच गोंडस नाव पण आवडल... :)

    अशीच पिकनिकची मजा घेत रहा....

    ReplyDelete
  3. देवेंद्र..:) मी पण बघ नं, पिकनिक आणि खादाडी एकमेकांपासून वेगळं करता येईल का याचा विचार न करता तसं लिहिलं आणि शेवटी अर्थातच जाणवलं की खादाडीके बिना कुछ नहीं....फ़ोटो अल्बमचा स्लाइड शो आहे बघ सर्वात शेवटी..ब्राउजरचा प्रॉब्लेम आहे का??

    ReplyDelete
  4. काय गं.. फोटो दिसत नाही आहेत.. आणि कमेंट बहुदा २ वेळा पब्लिश होते आहे... मज्जा केली ना... :) निषेध नाही करणार... टाईम संपत आलाय माझा... ;)

    ReplyDelete
  5. रोहन ब्लॉगर गंडलंय बहुधा...पण देवेंद्रच्या दोन्ही कमेन्टमध्ये एक वाक्य वेगळं तरी होतं..माझी मी उडवली...असो..
    फ़ोटोचं मीही पाहिलं तर IE मध्ये दिसतंय आणि Firefox मध्ये दिसत नाही....आता मला मदत लागेल एखाद्या ब्राउजर एक्सपर्टची..नाहीतर तुला मी पिकासाची लिंक पाठवेन.....
    टायम संपत आलाय म्हणजे आता आम्हीच निषेध काय??

    ReplyDelete
  6. णी शे ढ.. !!

    बाकी काही बोलतच नाही आता..

    ReplyDelete
  7. come on Heramb....at least something about the photos? :)

    ReplyDelete
  8. अग तुला तेच सांगायचं होतं पण राहून गेलं.. फोटू क्रोम आणि अग्निकोल्ह्यात दिसतच नाहीयेत.

    ReplyDelete
  9. निषेध आहेच.. बाय डीफॉल्ट!
    बाकी काय... इथेही ऑगस्ट म्हणजे पिकनिक.... पण मी अजून कधी गेलो नाही...
    पिकनिक म्हणजे अजूनी शाळेचीच आठवते मला... :)
    मस्त लिहिलंयस!

    ReplyDelete
  10. हेरंब, उपाय सुचव आता तुच काही तरी..मला वाटतं पिकासाचं काहीतरी बदललंय....

    ReplyDelete
  11. बाबा, इथे आल्यापासून पिकनिकची व्याख्या बदललीय..माझी एक मुंबईतली मैत्रिण फ़ोटो पाहून मला म्हणाली याला फ़न-फ़ेअर म्हणतात..मग तिला म्हटलं हे काही साहेबाचं इंग्रजी नाही त्यामुळे ही लोक वेगळाच शब्द वापरणार....असो....पण मजा येते तू जाऊन पहा कधीतरी...

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.