Tuesday, November 3, 2009

दिव्यांची आरास





मोठी माणसं घरात असली की सगळे सण कसे नीट आठवण करुन दिले जातात. आता जी पौर्णिमा गेली ती "त्रिपुरी" यावर्षी आई घरात असल्यामुळे तिने आठवण करुन दिली. मग या दिवशीही एक दिव्यांची माळ घरात लावली. ती लावता लावता मला मागची त्रिपुरी आठवली.
मुंबईत बोरिवली पश्चिमेला मंडपेश्वर भागात ज्या गुंफ़ा आहेत तिथे प्रथमच त्रिपुरी पौर्णिमेला जायचा योग आला आणि प्रत्येक जणांनी केलेली दिव्यांची आरास पाहुन डोळे आणि मन तृप्त झाले. मुंबईजवळच राहुनही कधीच जाणं का झालं नाही माहित नाही आणि आता मायदेश सोडुन काही वर्ष झाल्यानंतर का होईना जाणं झालं हेही नसे थोडके. शक्य असेल तर या दिवशी मुंबईकरांनी (आणि इतरांनीही)  तिथे नक्की जायलाच हवं.
इथे एक छोटी टेकडी आहे, जिच्या आत या गुंफ़ांमधलं महादेवाचं मंदिर आहे. आसपास जो काही परिसर आहे तिथे या दिवशीच्या संध्याकाळी तिथे मोठमोठ्या रांगोळ्या काढुन त्याभोवती दिवे, पणत्या, समया ठेवुन दिव्यांची आरास केली जाते. सगळी जणं आपापले दिवे किंवा काही नुसतं तेल घेऊन मग ते सगळीकडे लावतात. कुठला दिवा विझला की तो मागुन येणारा कधी लावतो कळणारही नाही. काळोख व्हायला लागला तसा तो परिसर या लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाला आणि कानावर तिथे लावलेले शांत सुरातले अभंग. दिवाळीचं हे वेगळं रुप प्रत्येक मुंबईकराने डोळ्यात साठवायलाच हवे आणि या गुंफ़ा जतन करण्यासाठीही पाठिंबा. जास्त लिहिण्यापेक्षा फ़ोटो लावते. पुढच्या वर्षी नक्की जाल..






























12 comments:

  1. त्रिपुरारी पोर्णिमा तर विशेष करून महत्वाची त्रिपुर राक्षसाचा वध म्हणजे काय, वाचा, मन, ह्यांची शुद्धता. पौर्णिमेला चंद्राचे दर्शन घेण्याची परंपरा, घरा बाहेर दर पौर्णिमेला मी नेहमी पणती तेवती ठेवते. ह्या अंधश्रधा नक्कीच नाहीत. हेच आपले हल्लोवीन डे. महालक्ष्मी चे मंदिर पण दिव्यांची आरास ने उजळले जाते. माहिती मस्तच आहे. मी सांजवात म्हणून एक पोस्ट लिहून तयार ठेवली आहे त्यात कहिसा परंपरा ना उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे. लवकर पाठवते नक्की वाच.

    ReplyDelete
  2. छान माहिती आहे अनुजाताई. मी तुमच्याही पोस्टची वाट पाहीन..धन्यवाद.छान माहिती आहे अनुजाताई. मी तुमच्याही पोस्टची वाट पाहीन..धन्यवाद.

    ReplyDelete
  3. अग अपर्णा ठाणे ते बोरिवली म्हणजे अगदी विरूध्द टोके पण लिंक रोड सुरू झाला ना त्याचा फायदा उठवून आम्ही हा योग एकदा साधला होता. शिवाय गर्ल्स नाईट होती ती आमची, नुसती धमाल केली होती. आज तुझ्या या पोस्टने खूप आठवणी जाग्या झाल्यात गं.आभार.

    ReplyDelete
  4. बघा तुम्ही ठाणे बोरीवली करुनतरी गेलात..मला वाटलं इतकी वर्ष माझ्या बहिण बो.ला होती पण मी कधीच तिथे का गेले नाही?? आता आईपण बो. मध्ये आली त्यामुळे गेलो...मला फ़ार आवडलं तिथे. फ़क्त असं कळलं की इतर वेळी तिथे सेफ़ नसतं जायला आणि मध्ये कुणी बिल्डर ती जागा घशात पण घालणार होता.

    ReplyDelete
  5. फोटो मस्त आहेत...आमच्या नासिकला गंगेवर घाटावर हजारो दिवे पाण्यात सोडले जातात...पहाण्यासारखा असतो सोहळा....

    ReplyDelete
  6. धन्यवाद तन्वी..मी नाशिकला दिवाळीच्या वेळी नाही गेले कधी. पण कधी योग आला तर नक्की जाईन.

    ReplyDelete
  7. झक्कास. अनेक वर्ष ही आरास बघायला जायचो. बरेचदा संघातर्फे ह्या दिवसासाठी घरोघर तेल गोळा केले आहे आणि लोकांना तिथे यायचे आमंत्रणही दिले आहे. इतर दिवशी ही जागा म्हणजे गर्दुल्ले आणि भिकारी ह्यांचं नंदनवन असायची. त्यात भर म्हणून ह्याच्या मागे / वर असलेल्या सेंट फ्रान्सीस चर्च व्यवस्थापनाने ही जागा पण आमचीच म्हणून दावा केला होता आणि तिथे चर्चचं वाढीव बांधकाम करायची तयारीही सुरू केली होती. बजरंग दलाने 'खाक्या' दाखवल्यावर ते प्रकार थांबले. आणि ह्या गुंफा सेंट फ्रान्सीसच्या जन्माआधीच्या असल्याने तो दावाही हाणून पाडण्यात आला. दळभद्री सरकार काही लक्ष देत नाही. पण ह्या गुंफांचं संरक्षण व्हावं म्हणून रा. स्व. सं. मात्र दर वर्षी नेमाने हा दीपोत्सव साजरा करतं. आज काल जरा ह्या जागेची स्वच्छताही करण्यात येते आणि पुरातत्व खात्याने एक माहिती फलकही लावला आहे.

    असं म्हणताता की ह्या गुंफांपासून ते बोरिवली पूर्वेला असलेल्या संजय गांधी राष्ट्रिय उद्यानातल्या कान्हेरी गुंफांपर्यंत एक भुयार आहे. आणि कान्हेरी गुंफांपासून कल्याणच्या किल्ल्यापर्यंत भुयार असल्याची अफवाही आहे.

    ReplyDelete
  8. ऍडी स्वागत आणि खूपच छान माहिती पुरवल्याबद्द्ल खूप खूप धन्यवाद. मीही त्या चर्च प्रकरणाबद्द्ल वाचलंय पण सविस्तर माहिती नव्हती त्यामुळे फ़क्त या जागेच्या संवर्धनासाठी आपण सहकार्य करावं अशा आशयाने शेवट केला.
    आणि गुंफ़ाबद्द्लच्या अफ़वाही मजेशीर आहेत..असं म्हणतात की वसईच्या किल्ल्यामधल्या एका भुयारातून थेट अर्नाळ्याच्या किल्ल्यापर्यंत वाट जाते...खरं खोटं करायला कुठल्याही गुंफ़ेत एक दोन मिनिटांपेक्षा जास्त अंतरावर मी तरी जाईन असं वाटत नाही....:)

    ReplyDelete
  9. जायला हवं कधीतरी या गुंफांमध्ये. वर्णन छान केलं आहेस एकदम... :-)

    ReplyDelete
  10. संकेत, नक्की जा विशेषत: दिवाळीमध्ये.

    ReplyDelete
  11. मी फ़क्त ऐकून होते गुंफाबद्दल.... तुझी पोस्ट वाचून जावस वाटतय ...... त्रिपुरारी पोर्णिमेला दीव्यांची आरास बघायला जायलाच हव एकदा ....

    ReplyDelete
  12. ज्यो, येत्या दिवाळीत नक्की जा..खूप छान असतं वातावरण आणि संध्याकाळी अंधार पडल्यावर सगळे दिवे पाहाणं हा एक मस्त अनुभव आहे....

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.