खरं तर मी या विषयावर लिहायचं म्हणजे एखाद्या पाचवी फेल चंपुने पी एच डी चा प्रबंध लिहिण्या सारखं आहे. मराठी माध्यमातून शिक्षण झालं तरी व्यावसायिक कामात मराठी लिहिणं कमी म्हणण्यापेक्षा अगदी नसल्यामुळे आता माझं मराठी जरी काही फार चांगलं राहिलं नसलं तरीपण या विषयावर लिहिण्याची हिम्मत करतेय. मराठी भाषे मधे बऱ्याच अनुदिनी सुरु झालेल्या आहेत. खूप सुंदर लेख, कविता लिहिले जातात, लोकं आपले अनुभव पण लिहितात. मला तरी सगळ्यांचच लिखाण वाचायला खूप आवडतं.
बऱ्याचशा ब्लॉग्ज वर मी आपल्या प्रतिक्रिया पण देते. बऱ्याच लोकांच्या अनुदिनीवर इतके सुंदर लेख असतात, कविता असतात, गुजगोष्टी असतात, पण केवळ काही महत्त्चाचे शब्द चुकवल्यामुळे त्या वाचतांना उगीच अडखळल्यासारखं वाटतं. बरेच लोकं अगदी साधा शब्द आहे ’आणि ’ हा दिर्घ(आणी) लिहिलेला असला की तो वाचतांना अडखळल्या सारखं वाटतं. माझा पण नेहेमीच गोंधळ उडतो ह्र्स्व आणि दिर्घ लिहितांना. तरीपण शक्यतोवर उच्चाराप्रमाणे लिहिण्याचा जर प्रयत्न केला तर बरच शुध्द लिहिलं जाऊ शकतं.
आता माझी पण लिहिण्याची पध्द्त जी आहे ती बोली भाषेप्रमाणेच आहे. म्हणजे असं बघा, की ’लिहिलं’.. हा शब्द जेंव्हा लिहितॊ, तेंव्हा वर असलेल्या अनुस्वारामुळे ते बरोबर वाचलं जातं,जेंव्हा ’लिहिल’ असं लिहितो तेंव्हा ते बरोबर वाचलं जात नाही. म्हणजे काय, तर बोली भाषेत लिहितांना जर अनुस्वार तरी पण दिला तरच ते बरोबर वाचता येते, नाहीतर लिहिल (लिहिलं) , केल, (केलं) चा उच्चार चुकीचा केला जातो. ...
प्रमाण भाषेनुसार हा अनुस्वार देण्याची पध्दत हल्ली बंद करण्यात आलेली आहे, आणि हे चुकीचे मानले जात आहे. हल्ली प्रमाण भाषेत ’लिहिलं’ ऐवजी ’लिहिले’, ’केलं’ ऐवजी ’केले’ , ’सारखं’ ऐवजी ’सारखे’, असे लिहिण्याची पध्दत आहे. अर्थात आपण ( मी सुध्दा) जे बोली भाषेनुसार लिहितो, ते व्याकरणाच्या दृष्ट्या फारच चुकीचे आहे. पण निदान ते वाचताना अडखळल्यासारखं तरी होत नाही असं मला बुवा वाटतं.
अगदी साधे सोपे नियम जरी पाळले तरीही बरेच लिखण शुध्द होऊ शकतं.जसे "आणि" हा शब्द ह्रस्व लिहिणे. शब्दाच्या सुरुवातीची वेलांटी ह्र्स्व लिहिणे. बहुतेक शब्दांची शेवटच्या अक्षरची वेलांटी ही नेहेमीच दिर्घ असते. अर्थात मी या विषयामधे भाष्य करण्याइतपत मोठी नाही, पण मला जे काही प्रामुख्याने जाणवले, ते इथे लिहिले आहे. या मधे जर कांही चुका असतील तर त्या अवश्य दुरुस्त करा.यात अजुन काही नियम/सुचना घालुन आपल्या सर्वांसाठी एक नियमावली किंवा संदर्भ मिळाला तरी खूप.
जेंव्हा वेलांटी ही शब्दाच्या मधे येते, तेंव्हा मात्र ती बहुतेक वेळेस ह्रस्वंच असते. हे सगळे ठोक ताळे आहेत. आता बघा, आणि जरी ह्रस्व असला तरी पाणी हा दिर्घंच असतो. या सगळ्य़ांची कारणं शोधताना जाणवलं की शेवटी आपण अर्थानुसार तो शब्द किती दिर्घ उच्चारतो त्यानुसार ते ठरत असावे. अर्थात या विषयातल्या एखाद्या माहितगाराने हा लेख अजुन पुढे वाढवला तर झाला तर आपल्या सर्वांचाच फ़ायदा आहे. कारण आधी आपण मायाजालवर मराठीत लिहित नव्हतो ते लिहायला (आणि वाचायला) लागलो. पुढची पायरी मराठी भाषा शुद्ध लिहायचा प्रयत्न करणे असं म्हणायला काही हरकत नाही.
असो. अजुन एक मुद्दा म्हणजे मराठी शब्द, हे मराठी व्याकरणाप्रमाणेच लिहावेत. जसे प्रत्येक शब्द, जॊ इकारान्त, किंवा उकारान्त असेल तर तो नेहेमी दिर्घ लिहावा. फक्त संस्कृत मधुन घेतलेल्या शब्दांना संस्कृत प्रमाणे नियम लावावे. मराठी व्याकरणामधे संस्कृत चे शब्द घेतल्यामुळे जास्त त्रास होतो लिहितांना. इतर भाषांमधे पण संस्कृत शब्द घेतले आहेतच , पण त्यांनी व्याकरण त्या - त्या भाषेचं लावलंय म्हणुन इतर भाषांचं व्याकरण सोपं जातं मराठी पेक्षा.
शाळेत शिकलेले अजुन काही आठवलेल्या नियमात महत्त्वाचा नियम म्हणजे,
१. एकेरी शब्द नेहमी दिर्घ लिहावेत जसे मी, ही, ती.
२. आणि त्याच शब्दाचं रुप जसं ती - तिला इथे तिला मध्ये "ति" ह्र्स्व, तू - "तुला" (हा मी जास्तीत जास्त वेळा चुकीचा लिहिलेला पाहिला आहे म्हणून खास उल्लेख)
३. उच्चारानुसार लिहिले जाणारे काही शब्द उदा.
उगीच
करतील
म्हणून
जीवन
खूप
तरी
करून
देऊन
ऋतु
काही वेळा वेळ असेल तर मी चक्क एखादं मराठी पुस्तक पाहाते आणि नक्की करते माझं शुद्धलेखन बरोबर आहे का?? तुम्ही म्हणाल हा काही पर्याय आहे का? पण चुकवण्यापेक्षा बरं. तरीसुद्धा काही ना काही राहून जातेच म्हणा...
या विषयावरचा गाढा अभ्यासू म्हणून श्री अरुण फडके यांचं नाव घेता येइल. फडके यांचे बरेच कार्यक्रम होतात व्याकरणावर. त्यांची बरीच पुस्तकं पण आहेत शुध्द लेखनावर. आता इथे माझ्याकडे संदर्भासाठी नाहीयेत पण मिळवुन थोडा प्रयत्न तुम्ही आम्ही सर्व मिळुन आपली भाषा शुद्ध लिहिण्यासाठी प्रयत्न जरुर करायला हवा यासाठी हा प्रपंच. कळावे लोभ असावा...
ता.क. या पोस्टसाठी माझे काही ब्लॉग मित्र-मैत्रीणींनी त्यांची नावे न सांगण्याच्या अटीवर मदत केली आहे. एकटीने हे एवढे नियमही लिहीणे अन्यथा जमलंच नसतं. अजुनही ज्या काही त्रुटी असतील त्या भरुन काढण्यासाठी वाचक वर्ग मदत करेल ही अपेक्षा.
अपर्णाबाई: लेखन शक्यतोवर शुद्ध करावे या मताचा तुम्ही पुरस्कार केलात, याबद्दल तुमचे अभिनंदन. सध्या कुठलीतरी सबब पुढे करून याबाबत आपली चूक मान्य करायची नाही अशा गलथानपणाची लाट आली आहे. राजकारणी लोक चोर आहेत आणि एकमेकांना आतून सहभागी आहेत, हे म्हणायला आपल्याला फार आवडतं. हे गलथान लेखकही असेच एकमेकांना सामील आहेत. 'माझ्यावर मराठी लिहायची वेळच येत नाही.' ही फारच प्रगती आहे आणि त्याचा आनंद आहे. त्याबद्दल अभिनंदन. आता इथेही लिहू नका आणि भाषेवर प्रेम असल्याचा डांगोरा पिटत तिच्यावर अत्याचार (इथे जास्त कडक शब्द वापरायचा मोह टाळतो आहे) करू नका. जिथे खात्री नाही तिथे निदान त्या शब्दाचं शुद्ध रूप इंटरनेटवर शोधायचा प्रयत्न करा. ज़वळच्या बर्गर किंगचा पत्ता शोधताना गूगलची मदत घेता तशी भाषेसाठीही ती घ्या. एरवी ज़ाहीर, किंवा निदान खाज़गी, टीका तुमच्यावर होणारच. प्रयत्न करूनही चुका झाल्यात तर ते तुलनेने क्षम्य आहे.
ReplyDeleteचांगले लेख लिहिणारे बहुतेक लोक चुका करतच नाहीत, आणि इतरांच्या चुका सुधरवत बसत नाहीत. चूक लिहिणारे लोक दुबळं आत्मसमर्थन करत बसतात. अशी परिस्थिती आहे.
तुमच्या लेखात काही चुका आहेत. ई/इ-कारान्त आणि उकारान्त शब्द नेहमीच दीर्घ नसतात. 'पाणी' आणि 'पाणि' हे दोन्ही शब्द अस्तित्वात आहेत. त्यांचे अर्थ भिन्न आहेत. 'परंतु' शब्द संस्कृतात नसावा पण र्हस्व (Rhasv) आहे. 'तथास्तु', 'ऋतु' हे तर संस्कृतोद्भवच आहेत. पण ढोबळमानानी तुमचा नियम उपयोगी पडणारा आहे.
> प्रमाण भाषेनुसार हा अनुस्वार देण्याची पध्दत हल्ली बंद करण्यात आलेली आहे, आणि हे चुकीचे मानले जात आहे. हल्ली प्रमाण भाषेत ’लिहिलं’ ऐवजी ’लिहिले’, ’केलं’ ऐवजी ’केले’ , ’सारखं’ ऐवजी ’सारखे’, असे लिहिण्याची पध्दत आहे. अर्थात आपण ( मी सुध्दा) जे बोली भाषेनुसार लिहितो, ते व्याकरणाच्या दृष्ट्या फारच चुकीचे आहे. पण निदान ते वाचताना अडखळल्यासारखं तरी होत नाही असं मला बुवा वाटतं.
>-----------
हे तुमचं प्रतिपादन साफ चुकीचं आहे. औपचारिक भाषेत 'केले आहे' असा वापर अपेक्षित असतो. अनौपचारिक संदर्भात लेखी भाषा वापरताना (खाज़गी पत्रं, मित्रांनाच नाही तर अगदी मास्तरांना सुद्धा तसे पत्र लिहिल्यास, अनौपचारिक असतात; ब्लॉग ९०% वेळा अनौपचारिक असतो) 'केलं आहे' असाच वापर करण्याची प्रथा होती, आणि अज़ूनही आहे. शब्दावरचा आघात दर्शवण्याची ही पद्धत बंदही करण्यात आलेली नाही, आणि ती चुकीचीही समज़त नाहीत.
हे दोन मुद्दे सोडल्यास तुमचा लेख उत्तम वठला आहे.
@जे कोणी निनावी (किंवा आगंतुक) असाल ते.....
ReplyDeleteआपला आक्षेप नक्की कशावर आहे हे खरं समजत नाही...कारण या लेखाचा उद्देशच मुळी कसलं समर्थन करणे असा आहे असं मला तरी वाटत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे चूक मान्य करायची नाही हे जे काही म्हणता तर तसे मुळीच नाही. उलट सर्वांनी(किंवा निदान ज्यांची तशी इच्छा आहे त्यांनी) मिळुन आपापली भाषा (बिघडली) असेल तर शुद्ध करायचा प्रयत्न करणे असं स्पष्ट आहे....आपला सल्ला म्हणजे एकतर सर्वगुणसंपन्न व्हा नाहीतर ते सोडा असा काहीसा दिसतो..त्याने नक्की काय साध्य होईल ते तुम्हीच जाणता....
एकमेका सहाय्य करु वगैरे प्रकार मला वाटतं काही काही लोकांना बघवत नाहीत आणि मग दुसरा जर सुधारण्याचा प्रयत्न करत असेल तर खेचा त्यांचे पाय असा प्रकारही हे लोकं करु पाहतात..आपला एकंदरीत रोख तसा काहीसा दिसतोय...
इतकी मोठी प्रतिक्रिया देऊन वर नाव न देण्याचा दुबळेपणा आहेच...त्यापेक्षा आपल्या माहितीत काही sites असतील त्यांचा संदर्भ दिला असता तर बरं झालं नसतं का???
या आधीही आपण नक्कीच माझ्या ब्लॉगवर आला असाल आणि तेव्हा वाटलं नसेल पण थोडी पाय खेचणारी का होईना पण आपण जी प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल आपलं अभिनंदनच केलं पाहिजे नाही का???
अपर्णाबाई: मी केलेल्या टीकेचा रोख तुमच्यावर नाही. भलत्या सबबी सांगणार्यांविरुद्ध आहे. ना मी तुमचे पाय खेचले आहेत. तुमची भूमिका बरोबर आहे. 'मी १००% शुद्ध लिहीत नाही. (मी पण नाही.) मी पाचवी फेल चंपू आहे. पण मनापासून प्रयत्न करते.' ही उत्तम सुरुवात आहे. प्रामाणिक इच्छा असेल तर सुधारणा होत राहील.
ReplyDelete'प्रयत्न करूनही चुका झाल्यात तर ते तुलनेने क्षम्य आहे.' असं मी बोललो होतो. तेव्हा सर्वगुणसंपन्नतेचा आग्रह तुम्हाला कुठे दिसला हे मला कळत नाही. पण जाहीर लेखन करण्यासाठी काही किमान पात्रता लागते. किमान प्रयत्न करून लेख बर्यापैकी शुद्ध असावा, असा प्रयत्न लागतो. तीही तयारी अनेकांत नाही, आणि लॅपटॉप घेण्याइतका आणि VSNL/Comcast ला महिन्याचे पैसे देण्याइतकी रक्कम खिशात आहे, हा एकमेव 'पात्रते'चा निकष बनला आहे. या ज़ोरावर बरंच लेखन चालू असतं. ते टीका न करता चालवून घेतलं तर भाषेची अवस्था अज़ूनच खराब होणार. म्हणून मी कधीमधी लिहितो. आज़पासून २५ वर्षं आधीच शान्ताबाई शेळके इंग्रजी वळणाच्या मराठीचा निषेध करत होत्या. ती परिस्थिती नंतर जास्तच बिघडली आहे. माझ्या २०-२५ वर्षाच्या मित्रांना तर मराठी अंकमोज़णीही कळत नाही.
शेवटी राहिला मुद्दा निनावीपणाचा. तुम्ही ज़े लिहिता किंवा मी ज़े लिहीतो त्यात काहीही शौर्य, धाडस, धोका वगैरे नाही ज्यामुळे सही करणं आदराचं ठरावं किंवा नाव न लिहीणं दुबळेपणाचं ठरावं. समज़ा मी दीपक-प्रभाकर-भावना-अमेय असलं खरंखोटं नाव ठोकून दिलं तर त्यानी माझ्या मतांचा खरेखोटेपणा कसा कमीजास्त होणार? तुम्हाला लेखनाचे नियम गोळा करायला कोणी मदत केली असावी याचा मला अंदाज़ आहे. त्या काहींशी मी मेल/पत्र-व्यवहार केला आहे. त्यातही काही वाखाणण्याज़ोगा भाग नाही. आधी मी गंमत म्हणून निनावी लिहू लागलो. नंतर 'निनावी प्रतिक्रियांना अर्थ नाही' या दिव्य मताची मौज़ घ्यायला म्हणून निनावीपणा सुरू ठेवतो आहे. कधीकधी मूळ लेख खूप आवडला तर प्रतिक्रियेखाली नाव लिहितो, पण ते अपवादानीच.
> त्यापेक्षा आपल्या माहितीत काही sites असतील त्यांचा संदर्भ दिला असता तर बरं झालं नसतं का?
>-----
मला अशा ज़ागा माहित नाहीत, पण wiki / khapre वगैरे ठिकाणी माझ्या बर्याच शंकांचं निरसन होतं.
अपर्णा माझ्या सासूबाईंकडे नित्यनेमाने गेली कित्येक वर्षे( ३५-४०)हेच तपासायला लिखाण येते.त्यामुळे सवय लागली आहे म्हण किंवा तू म्हणतेस तसे काही शब्द इतके भसकन डोळ्यांत घुसतात.(माझ्याही चुका होत असतीलच:( ) चांगल्या चांगल्या लेखांचा रसभंग होतो. माझाही सतत प्रयत्न असतो जे लिहावे ते शक्य तितके शुध्द लिहावे. असे लिहूनच नकळत ते अंगवळणीही पडत जाते. आणि चा आणी प्रकार तर मीही अनेक ठिकाणी वाचला आहे. केलं, आणलं सारखे शब्द आजही वापरले जातातच. आणि ते जरूर वापरावेत असे माझे मत आहे.दुसरी एक महत्वाची गोष्ट मी पाहते ती म्हणजे बरेचदा नको तिथे शब्दावर आघात दिलेला असतो आणि नेमका आवश्यक परिणाम साधणारा शब्द बापुडवाणा दिसतो.अशामुळे वाक्याचा अर्थच बदलून जातो. हे लक्षात घेणे गरजेचे आहे. नियम एकदा लक्षात घेतले व अडेल तेव्हां तेव्हां लागलीच निराकरण केले तर फार त्रास वाटू नये. चांगला मुद्दा मांडला आहेस.
ReplyDeletevअतिशय उत्तम झालाय लेख.. माझ्या सारख्या सारख्या चुका करणाऱ्यासाठी फायदा होईल. बऱ्याच गोष्टी माहिती असतात, तरीही त्या चुकीच्या लिहिल्या जातात. जसे ईकारान्त शब्दाला प्रत्यय जोडला तरीही तो शब्द इकारान्तंच रहातो. जसे "चुकी"च्या, "तरी"ही वगैरे वगैरे.. हे जरी माहिती आहे तरीही लिहितांना बरेचदा चुकतं. ..
ReplyDelete"प्रमाण भाषेनुसार हा अनुस्वार देण्याची पध्दत हल्ली बंद करण्यात आलेली आहे, आणि हे चुकीचे मानले जात आहे. हल्ली प्रमाण भाषेत ’लिहिलं’ ऐवजी ’लिहिले’, ’केलं’ ऐवजी ’केले’ , ’सारखं’ ऐवजी ’सारखे’, असे लिहिण्याची पध्दत आहे. अर्थात आपण ( मी सुध्दा) जे बोली भाषेनुसार लिहितो, ते व्याकरणाच्या दृष्ट्या फारच चुकीचे आहे."
ही गोष्टं मी पण वाचलेली आहे एका पुस्तकात, आणि माझ्या माहिती प्रमाणे तुम्ही जे लिहिलं आहे ते बरोबर आहे.
अपर्णाबाई: 'प्रमाण भाषेनुसार हा अनुस्वार देण्याची पध्दत हल्ली बंद करण्यात आलेली आहे, आणि हे चुकीचे मानले जात आहे.'
ReplyDeleteश्री महेंद्र कुलकर्णी : 'ही गोष्टं मी पण वाचलेली आहे एका पुस्तकात, आणि माझ्या माहिती प्रमाणे तुम्ही जे लिहिलं आहे ते बरोबर आहे.'
अनामिक : 'हे तुमचं प्रतिपादन साफ चुकीचं आहे.'
श्री कुलकर्णी: कृपया असा गैरसमज़ पसरवू नका. माझ्या नावाविषयी तुम्हाला अंदाज़ आला असेलच. इंटरनेटवर निनावी राहणे कठीण, आणि तशी माझी इच्छाही नाही. शंका असल्यास मला मेल पाठवा. पण तरीही खुलासा करतो की पूर्ण खात्री असल्याशिवाय मी ठाम विधान करत नाही. मला शंका असल्यास तसा आधीच उल्लेख करतो.
अनौपचारिक संदर्भात 'केलेच' शब्दाचं 'केलंच' हे रूप वापरतात, आणि गाळल्या गेलेल्या मात्रेच्या ठिकाणचा ज़ोर/आघात अनुस्वाराने दर्शवल्या ज़ातो, यात काहीही शंका नाही. आपलं लेखन औपचारिक स्वरुपात सादर कारायचं की अनौपचारिक याचं स्वातंत्र्य काय ते लेखकाला आहे. मी गेल्या ५ मिनिटात भालजी पेंढारकर, शान्ता शेळके, जी ए कुलकर्णी, शिरीष कणेकर यांची पुस्तकं ६०-७० सेकंद चाळली. तेवढा वेळ दोन्ही प्रकारचे (औप. आणि अनौप.) प्रयोग शोधून काढायला पुरेसा आहे. कणेकरांचा विषय हलकाफुलका म्हणून अनौपचारिक वापर जास्त, तर शान्ताबाईंचा भारदस्तपणाकडे कल एवढाच काय तो फरक. पण शान्ताबाईंच्याही पुस्तकात १० सेकंद उशीराने का होईना पण 'जायलाच हवं' असा उल्लेख मिळालाच. शान्ताबाईंसारखी विद्वान व्यक्ती चुकीचे उल्लेख करणार नाही.
आता 'पडत नाही' या शब्दातला 'ड' वरचा ज़ोर किंवा 'जायलाच' मधला 'च' वरचा ज़ोर अनुस्वाराने दाखवत नाहीत कारण तिथे लुप्त झालेली मात्रा नाही. अशा गोष्टी कळायला भाषेचं ज्ञानच लागतं. ते आपल्या भाषेविषयी ज़ास्त असतं, इतर भाषांमधे आपला गोंधळ होतो.
थोडक्यात काय तर प्रमाण भाषेला किंवा लेखी भाषेला अनौपचारिक संदर्भ वर्ज्य नाहीत.
माझं म्हणणं बरोबर आहे. अनुस्वार लिहुन लिहिणं व्याकरणाच्या नियमा प्रमाणे चुक आहे. संदर्भ :-"आधुनिक भाषाविज्ञान" (संरचनावादी, सामान्य आणि सामाजिक) , संपादक डॉ. कल्याण काळे .
ReplyDeleteअसो.. माझा काही व्याकरणाचा अभ्यास नाही- पण कधी तरी घरी असलेली पुस्तकं चाळतो. त्यात एकदा हे पहाण्यात आलं होतं.
असो..
माझा यावर वाद घालण्याची इच्छा नाही, कारण हा माझा प्रांत नाही. त्यामुळे यावर जास्त कांही भाष्य़ करित नाही.
जात आणि जातं
ReplyDeleteअनुस्वार नसला तर इतका फरक पडतो.
खेचर गवत खात आणि खेचर गवत खातं....
जर पहिला शब्द वाचला, तर तो खात असा वाचला जातो अनुस्वार नसल्याने.
भाग्यश्रीताई, आपल्या प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद.आपल्या सासुबाईंकडुन ब्लॉगर्ससाठी काही सोप्पे नियम मिळाले तर नक्की कळवा. आपण इथे काही कुणाला सिद्ध करण्यासाठी लिहितो असं नाही पण फ़क्त एक पुढची चांगली पायरी म्हणून जमेल तितकं शुद्ध लिहावं यासाठी वाटलं म्हणून लिहिलं...ब्लॉग ही म्हटलं तर वैयक्तिक डायरी आहे...बाकीच्यांनी वाचलं त्यांना आवडलं नाही आवडलं तरी ब्लॉगर्स लिहित राहणार. आपल्या आठवणींना हक्काचा कोपरा मिळाला आहे. तो चांगल्या प्रकारे कसा सजवता येईल ते महत्त्वाचं...
ReplyDeleteमहेन्द्रकाका, तुम्हाला कारण नसताना बराच किल्ला लढवायला लागला असं दिसतं. मी आपला ब्लॉग नेहमी वाचते आणि जे आपण लिहिता तेही खूप आवडतं पण शुद्धलेखनाच्या चुका होतात हे आपणही मान्य करता..यापुढे आपण जरा जास्त शुद्ध लिहायचा प्रयत्न करु या..........:)
अपर्णा,
ReplyDeleteलेख आवडला. तुमच्या पहिल्याच वाक्यात आणि एकंदर संपूर्ण लेखात उकारांत शब्द हस्व उकाराने लिहिले आहेत, ते खरं म्हणजे दीर्घ हवेत.
उदा: "माध्यमातुन" ऐवजी "माध्यमातून", "राहुन गेले" ऐवजी "राहून गेले", "म्हणून", "करून", "देऊन" असाच दीर्घ प्रयोग रूढ आहे.
तुमच्या लेखातून खरंच अधिक शुद्ध लिहण्याची कळकळ जाणवली म्हणून ही दुरूस्ती सुचवते आहे, त्यात तुमच्या लेखावर टीका करण्याचा उद्देश नाही.
विशाखा.
ReplyDeleteबरं झालं आपण या चुका दाखवल्यात. मी आता त्या बरोबर केल्यात...आणि त्यात कसली टिका??? अहो ज्यांना जे जे शुद्धलेखनाबाबत माहित आहे त्यांनी ते आमच्यासारख्यांना कळवलं तरच आमचं सुधरेल ना?? आपल्या अभिप्रायाबद्द्ल अनेक आभार...
'म्हणून', 'बोलून' हे ऊ/उ - कारान्त शब्द नाहीत, हे ध्यानात घ्या. आणि शुद्धलेखनाचे नियम एकत्र करत असाल तर या शब्दांचा 'उकारान्त' असा उल्लेख करू नका. 'काकू', 'फालतू', 'विठ्ठलू', 'परंतु' हे उकारान्त शब्द आहेत. आपण लोक चूक उच्चार करतो हे अशुद्ध लेखनामागचं एक कारण आहे. लोक 'बोलुन तर बघ' असा उच्चार करतात; पण तो शब्द 'बोलून' असा आहे. त्या ऊ-काराचा उच्चारही दीर्घच व्हायला हवा.
ReplyDeleteअपर्णा,
ReplyDeleteमला समजले होते की, तूझी पुढची पोस्ट शुध्लेखनाची आहे. विषय मांडलास, छान वाटले. आपण शुद्ध लिहिण्याचा नेहमीच प्रयत्न करतो. मराठीतून लिहिण्याची इच्छा असणे हेच शुद्धतेच्या नियमांपर्यंत आपसुखच घेऊन जाणे आहे. प्रत्येक लेख शुद्ध भाषेत असावा ह्या मागची मनोभूमिका प्रेरणादायी आहे. नेट वर काही उपलब्ध आहे असे आढल्यास जरूर पाठवीन.
माझे लेख फारसे कोणी वाचत नाही कारण माझी भाषाशैली ही ब्लॉग प्रमाणे संवादरुपी नाही. एखादे पुस्तक वाचतोय अशी भावना होते असे विरोप मला आले आहेत. रोज येणारे अनुभव न लिहिता मी एखादा विषय शोधून त्यावर लिखाणाची बैठक जमवते. कधी गंभीर, नम्र विनोद, प्रासंगिक असे प्रयत्न करते त्यामुळे भाषाशैली कदाचित पुस्तकरुपी वाटत असेल, पुस्तक समजून वाचावे. मी पण बोलीभाषेत लिहिण्याचा निश्चित प्रयत्न करेन. शुद्धलेखन व भाषाशैली पेक्षा
मी लिहिते हे महत्त्वाचे आहे सध्या तरी एव्ह्वढेच......
baap re bap etyakya bhardast comment mule mala comment takay chi jara bhiti ch vatat aahe hahhaha .... nways pan hya subject var lekh lihilya baddal abhinandan .. ashudha likhan kiti hi changale asel tari vachay la aawadat nahi ............ chal bye -ashwini
ReplyDelete@अनामिक,
ReplyDeleteआपण एक वेगळा मुद्दा मांडला आहे. आणि ते उच्चार चुकीचे आणि मग लिखाण की उलट याने मला उगाच कोंबडी की अंडा याची आठवण झाली...:)
अनुजाताई, प्रतिक्रियेबद्दल आभार. शेवटी ब्लॉगवर आपण का लिहितो यामागची प्रत्येकाची भूमिका वेगळी असते.मला तर कधी कधी माझ्यापुरता बोलायचं तर ती प्रत्येक पोस्टबद्दल वेगळी असते असंही वाटतं. म्हणजे माझ्या मनात साचलेल्या खूप गोष्टी कुठेतरी बाहेर पडाव्यात म्हणून काही पोस्ट तर काही आठवणी जपून ठेवाव्यात म्हणून, काही वेळा आपण काही यातून चांगलं करू/शिकू शकलो तर बरं म्हणून असं माझं तरी असतं...त्यामुळे तसा वाचक वर्ग असेल तर मग जे काही थोडे फ़ार प्रतिसाद असतात त्यानेही बरं वाटतं...असो...बोलुया या विषयावर कधीतरी....
ए अश्विनी, तू आता इथे देवनागरीतही प्रतिक्रिया दे ना?? :)) तुला बरहा किंवा कुठलं दुसरं सॉफ़्टवेअर पाठवु का?? ऑफ़िस ठिक चालु असेल अशी अपेक्षा....आणि मी फ़क्त एक सुरुवात केली आहे खरं माझी यातून अपेक्षा कुणी जास्त व्यवस्थित या विषयावर लिहावं अशी आहे...असो..धन्यवाद आणि अशीच भेट देत जा....
nako pathvus kuthale s/w ofc madhun nahi vaparu shakat ajun tari sagale thik aahe next week comp. meeting aahe tyat kalel sagal ...... baki thik -ash
ReplyDeleteकोणीतरी "जवळच्या बर्गर किंगचा पत्ता शोधण्यासाठी गुगलची मदत घेता तशी भाषेसाठीही घ्या असा सल्ला दिला आहे."
ReplyDeleteमी आत्ताच "पद्धत की पध्दत" याचा निकाल लावण्यासाठी गुगल सर्च केला आणि त्यात दोन्हीसाठी एक लाखापेक्षा जास्त रिजल्ट्स मिळाले. इतकं अशुद्ध लेखन इंटरनेटवर होत असतं की हा उपाय कुचकामी आहे.
_____
शब्दावरचा आघात दर्शविण्याची अनुस्वाराची पद्धत बंदही करण्यात आलेली नाही आणि ती चुकीचीही समजत नाहीत.
या मताशी सहमत.
http://tinyurl.com/ngn5jm
नियम तेरावा पहावा.
लेखनात पात्राच्या किंवा वक्त्याच्या तोंडी बोलण्याची भाषा घालावी लागते.त्या वेळी तिचे स्वरूप बोलण्यातील उच्चाराप्रमाणे अनुस्वारयुक्त असावे. उदाहरणार्थ: 'असं केलं , मी म्हटलं;त्यांनी सांगितलं अन्य प्रसंगी ही रूपे ए-कारान्त लिहावीत. उदाहरणार्थ : असे केले;मी म्हटले;त्यांनी सांगितले
_____
आपण जर फायरफॉक्स अथवा ओपन ऑफिस वापरत असाल तर इंग्रजीसारखेच लाल खुणेवर उजवी टिचकी देऊन शुद्धलेखन तपासू शकता. हे दोन दुवे पाहा.
https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/12797
http://extensions.services.openoffice.org/project/dict-mr
शंतनु, प्रतिक्रियेबद्द्ल खूप खूप आभारी. तुमच्याप्रमाणेच मलाही गुगलवरती शुद्ध आणि अशुद्ध दोन्ही शब्द मिळाल्याचा अनुभव आला म्हणून हा विषय चर्चेत आणायची हिम्मत केली. खरं तर आपण जसं इंग्रजीचं स्पेलिंग चुकवत नाही तसंच मराठी लिहिताना पण शुद्ध लिहायची सवय लावायला हवी.सध्या ज्या प्रकारे शाळेतून बाहेर पडल्यावर मराठी लिहिणं कमी होतं त्याने आपल्याला सुरुवातीला नक्कीच त्रास होईल पण प्रयत्न केला पाहिजे...विशेषत: ब्लॉगर्सनी कारण आपलं लिखाण आपल्यालाच तपासायचं असतं.
ReplyDeleteआपण आवर्जुन लिहिलंत त्यामुळे बरं वाटलं..आपण शेवटी सुचवलेले दोन पर्याय जरूर वापरून बघेन...धन्यवाद.
लेखन करुन कम्युनिटी वर टाकताना ब~याच शुध्द लेखनाच्या चुका असतात..शुध्द लेखन तपासणी करणारे [मराठी] एखादे सॉफ़्ट वेर वा साईट माहित असल्यास सुचवु शकता का? Avinash
ReplyDeleteअविनाश, सर्वप्रथम ब्लॉगवर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी आभार....
ReplyDeleteइथे तुमच्या माहितीसाठी महेंद्रकाकांचा प्रतिसाद चिकटवतेय...
"त्या साठी फायरफॉक्स वापरावं लागेल. आधी फायरफॉक्स डाउन लोड करा, आणि नंतर पुढे प्लग इन्स इन्स्टॉल करायचे. लिंक इथे आहे प्लग इन ची..
http://mac.softpedia.com/get/Internet-Utilities/Marathi-Dictionary.shtml"
मी श्री. कुलकर्णींच्या मताशी सहमत आहे. ‘करणे’, ‘बोलणे’ हे आणि यांसारखे शब्द विकल्पाने ‘करणं’, ‘बोलणं’ याही प्रकारे लिहिले जाऊ शकतात. शेवटचा अनुस्वार हा लुप्त झालेल्या मात्रेचं अस्तित्व दर्शवतो. आणि बोलीभाषेत एकारान्त शब्दांपेक्षा अनुस्वारयुक्त शब्दच जास्त वापरले जातात. एखाद्या माणसाचं भाषण किंवा त्याने म्हटलेली काही वाक्यं जर लिहायची असतील तर वक्त्याचे मूळ शब्द वापरायचे असतात. त्यामुळे एकारान्त आणि अनुस्वारान्त असे दोन्ही प्रकार बरोबर आहेत.
ReplyDeleteमराठी उकार आणि इकार यांच्याबाबत सर्वसाधारण नियम:
१. उकारान्त आणि इकारान्त शब्द सहसा दीर्घ लिहावेत.
उदाहरणार्थ: बाटली, काजू, छत्री, राणी, राहू
अपवाद: आणि, नि, परंतु, पाणि (हात या अर्थाने)
२. वरील नियम तत्सम शब्दांनाही लागू आहे. (तत्सम शब्द म्हणजे जे शब्द संस्कृत भाषेतून जसेच्या तसे मराठीत आले आहेत)
उदाहरणार्थ: कवी, रवी, वाणी, रघू, मती, बाहू वगैरे
३. शब्द उकारान्ती किंवा इकारान्ती नसेल तर त्या शब्दातील शेवटचा उकार किंवा इकार सहसा दीर्घ असतो.
उदाहरणार्थ: करून, दीर्घ, खाऊन, जीर्ण, गूळ, आशीर्वाद वगैरे
अपवाद: निशा, प्रिय, समिधा, अनुज्ञा वगैरे
४. शेवटचा उकार आणि इकार सोडून बाकी सगळे उकार किंवा इकार सहसा र्हस्व असतात.
उदाहरणार्थ: विहिरीमध्ये, जमिनीवर, अनुरक्ती, परिसीमा वगैरे
अपवाद: कीर्ती, दीप्ती, शारीरिक वगैरे
५. ईकारान्त शब्दाला प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागल्यावरही संबंधित इकार किंवा उकार सहसा दीर्घच राहतो.
उदाहरणार्थ: तरी - तरीही, काजू - काजूमध्ये, राणी - राणीला वगैरे
६. इकारान्त किंवा उकारान्त शब्दांना आणखी एक शब्द जोडून जर नवीन शब्द तयार झाला असेल तर नवीन शब्दात संबंधित इकार किंवा उकार सहसा र्हस्व होतो.
उदाहरणार्थ: अणू - अणुरेणू, मूळ - मुळाक्षर, प्रीती - प्रीतिभोजन, कवी - कविश्रेष्ठ वगैरे
७. एखाद्या शब्दाला ‘इक’ हा प्रत्यय लागताना सहसा त्याच्या पहिल्या अक्षरातील स्वरात पुढील बदल होतात:
‘अ’ ऐवजी ‘आ’, ‘इ’ ऐवजी ‘ऐ’, ‘उ’ ऐवजी ‘औ’
उदाहरणार्थ: समाज - सामाजिक, परंपरा - पारंपरिक (हा शब्द अनेक लोक ‘पारंपारिक’ असा चुकीच्या पद्धतीने लिहितात.), अध्यात्म - आध्यात्मिक (‘आध्यात्म’ आणि ‘अध्यात्मिक’ हे दोन्ही शब्द चुकीचे आहेत.), शरीर - शारीरिक, सिद्धांत - सैद्धांतिक, निमित्त - नैमित्तिक, उष्ण - औष्णिक
‘पद्धत’ शुद्ध की ‘पध्दत’:
याबाबतचा नियम असा आहे की एखादं अक्षर हे दुसर्या अक्षराच्या पोटात लिहिलेलं असेल तर त्या अक्षराचा उच्चार पूर्ण होतो आणि पूर्ण लिहिलेल्या अक्षराचा उच्चार अपूर्ण होतो.
उदाहरणार्थ:
* ‘पद्धत’ या शब्दात ‘ध’ पूर्ण तर ‘द’ अर्धा उच्चारला जातो. (‘पद्धत’ चा उच्चार पद्धत असा आहे तर ‘पध्दत’ चा उच्चार पध्दत असा आहे.)
* ‘द्विज’ या शब्दातही ‘द’ चा उच्चार अपूर्ण असून ‘व’ चा उच्चार पूर्ण आहे.
* ‘उद्भव’ या शब्दात ‘भ’ चा उच्चार पूर्ण असून ‘द’ चा उच्चार अर्धा आहे. पण हाच शब्द जर ‘उभ्दव’ असा लिहिला तर त्याचा उच्चार ‘उभ्दव’ असा होतो.
वरील प्रकाराची आणखी काही उदाहरणे:
द्वितीय, प्रकाश (या शब्दात ‘प’ पूर्ण लिहिला गेला असला तरीही त्याचा उच्चार मात्र अपूर्ण आहे), मुखोद्गत वगैरे वगैरे
टीप: वरीलपैकी काही शब्द नीट दिसत नसल्यास ते मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये पेस्ट करा आणि फाँट साईझ खूप वाढवा. फरक कळायला मदत होईल.
This comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteसंकेत, मला तुझी मोठी प्रतिक्रिया आवडली आहे आणि म्हणून मी सर्वच प्रतिक्रिया ठेवते आहे....ही पोस्ट लिहिली तेव्हाच तुझी मदत जास्त झाली असती असं वाटतय...) पण आताही तू मांडलेले मुद्दे इच्छुकांना नक्की उपयोगी पडतील...:)
ReplyDeleteआभारी.
मराठीत लिहिण्यासाठी ऱ्हस्व दीर्घ चे नियम साठी गूगलून पाहिले तर हा लेख सापडला, लेख आणि प्रतिक्रीया मधून बरीच माहिती मिळाली... Thanks
ReplyDeleteप्रसिक, आभार....खर तर कुणी तरी यावर विस्ताराने लिहावं म्हणून मी ही पोस्ट लिहिली आहे...सुरुवात वाचून ते कळलं असेलच..तरीही तुला काही मदत झाली असेल ही आशा..:)
ReplyDelete