आज म्हणजे एप्रिलच्या २२ तारखेला ब-याच देशात वसुंधरा दिवस (earth day) साजरा करतात. सध्या इथे planet green या चॅनलवर बरेच कार्यक्रम दाखवताहेत. त्यांचा एक आवडलेला संदेश म्हणजे प्रत्येक दिवस अर्थ डे असल्यासारखा साजरा करा. खऱ्या अर्थाने तसे करण्याची गरज निर्माण झाली आहे. बदलते ॠतु, वाढते तपमान काही वेगळा विचार निर्माण करतेय का? आपल्या भावी पिढीला आपण कुठली हवा आणि पाणी वारशात देणार आहोत. या विश्वातील एक सर्वसामान्य नागरीक म्हणुन आपण यासाठी काय करु शकतो याचा स्वत:साठी घेतलेला वेध आणि जे या लेखाला भेट देऊ शकतील या सर्वांनी थोडा विचार व कॄती करावी यासाठीचा हा छोटा प्रयत्न.मला माहित आहे की ही post कदाचीत थोडी बोअरिंग होणार आहे पण हे लेक्चर वाचून वीस पैकी दोन-तीन जणांनी तरी काही कृतीत आणले तरी सार्थक झाले.
सर्वात प्रथम कचऱ्यासंबंधी. जिथे सोय आहे तिथे रिसायकलींग करणे आणि ओला कचरा वेगळा टाकणे. पण रिसायकलींगसाठीपण एनर्जी लागते आणि त्या प्रक्रियेत वातावरण दुषित करणारे वायु बाहेर पडतात म्हणुन शक्यतो रियुजचा फ़ंडा बेस्ट. प्लास्टिकचा एकंदरित कमीत कमी वापर करत असाल तर सोन्याहुन पिवळं.
मी यावर्षी आमच्या इथल्या मराठी मंडळात संक्रांतीचं वाण म्हणून मोठ्या ज्युटटाईप धुता येतील आणि साधारण ३० पौंड वजनाचा भार सहन करु शकतील अशा पिशव्या (grocery bags) मेंबर्सना द्यायची सुचना केली आणि सर्वसंमतीने ती आम्ही implement केली. मला वाटत सर्व जरी नाही तरी ५० टक्क्यांनी जरी ही बॅग वापरली तरी दुकानांतुन घेतल्या जाणा-या प्लास्टिकच्या बॅग्स कमी वापरल्या जातील. इथे काही दुकाने स्वत:ची बॅग वापरल्याबद्द्ल ३०-४० सेंट का होईना पण रिबेटही देतात..असो. तर मुद्दा हा की जमेल तेवढे शॉपिंगसाठी स्वत:च्या बॅगा वापरा. मला तर ही ग्रोसरी बॅग रिटर्न गिफ़्ट म्हणुन द्यायला जास्त छान वाटते. बघा तुम्हालाही पटतंय का??
आजकाल सगळीकडे पेपर टॉवेल, टिश्यु ई कागदी माल तोंड, ओटा पुसायला वापरले जातात. विशेषत: प्रगत देशात तर त्याशिवाय पान हलत नाही. मला माहित आहे ओल्ड हॅबिट्स डाय हार्ड पण राव जर रोज तुम्ही टिश्यु वापरत असाल तर दिवसाला एक कमी वापरुन पाहा. हळुह्ळु त्यांची संख्या कमी करु शकाल आणि काय आहे जरी सर्वांनी एक एक पेपर टॉवेल कमी वापरला तरी तो बनवायला जी जंगलतोड होते त्यात लक्षणीय कपात होईल. आहात कुठे?
इंधनाची बचत करणेही खूप गरजेचे आहे. शक्य तिथे स्वत:च्या गाडीऐवजी पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करणं मस्ट केलं पाहिजे. शिवाय सौर उर्जा, विंड मिल्स इ.चा वापरही वाढवला पाहिजे,
रेडिओवर इतक्यात ऐकलेला एक संदेश म्हणजे एखादी पॅक्ट वस्तु विकत घेताना कमीत कमी पॅकींग सामान ज्यासाठी वापरलंय अशी वस्तु निवडा. खरंय नाही का. म्हणजे आपण वस्तु चांगली आहे का त्याशी मतलब ठेवावा. त्याचं जॅझी पॅकींग नंतर फ़ेकुनच देणार ना?
अजुन एक अतिशय चांगला मुद्दा म्हणजे ऑफ़िस, घर इ. ठिकाणी अगदी आवश्यक असेल तिथेच प्रिंट माराव्या. खर तर किती कामे, इ-मेल न छापता करायची सवय लावणे पर्यावरणासाठीच नाही तर आपल्याला आवरायच्या आणि आपली व्यक्तिगत माहिती, मेल प्रिंटच्या माध्यमातुन चुकीच्या हातात पडण्यापेक्षा हा पर्याय कितीतरी बरा नाही का? माझ्या गाणं शिकवणा-या गुरु मला नोट्स देताना नेहमी पाठकोऱ्या कागदावर देत. किती छान वापर आहे ना हा वापरलेल्या कागदांचा?
झाड लावा हे सांगणारे बरेच भेटतील. मान्सुनमध्ये तर असे झाडे लावणारे आरंभशुर सगळीकडे भेटतील. पण त्यापेक्षा लावलेली झाडे जगवण्याचा प्रयत्न करा. आणि ज्यांना मोठी झाडे लावणे, जगवणे शक्य नसेल त्यांनी एका छोट्या कोप-यात तुळस, गुलाब यासारखी कुंडीतली रोपे लावली तर पर्यावरणासाठी खुप मदत होईल. झाडं लावताना खर तर लोकल झाडं लावली गेली पाहिजेत नाहीतर त्याचे दुष्परिणाम निसर्गचक्रावर होतात.
उन्हाळ्यात बरीच फ़ळं खाणं होतं, जसं आंबा (जो आता मी जाम मिस करते) , कलिंगड, चिकू इ...मी भारतात असताना दर उन्हाळ्यात बाल्कनीत एका बाजुला छोट्या ताटात खालेल्या फ़ळांच्या बिया गोळा करुन ठेवे. उन्हात त्या आयत्याच सुकत आणि मग मान्सुन ट्रेकला गेलो की जंगलात थोड्या थोड्या अंतरावर त्या फ़ेकुन द्यायचे. कदाचित त्यातली एखादी बी रुजुन पावसाळा संपेपर्यंत त्याचे रोप वाढेल आणि समजा नाही रुजले तर पक्ष्याला पोटाला आधार म्हणुनतरी तिचा उपयोग होईल.
ब-याच छोट्या छोट्या गोष्टींतुन आपण पृथ्वीची होणारी हानी टाळु शकतो. मी माझ्या परिने काही बाबतींवर थोडा प्रकाश टाकु पाहातेय. माझी ही सागराला दिलेली ओंजळच म्हणा ना. पण अशा छोट्या छोट्या ओंजळी एकत्र आल्या तर होणारा विनाश आपण नक्की टाळु शकतो. आपल्या पुढच्या पिढीच्या हातात फ़क्त वाडवडिलांपासुन कमवुन ठेवलेली संपत्तीच आणि संस्कारच द्यायचे नाहीत तर ते उपभोगण्य़ासाठी चांगले निरोगी वातावरणसुद्धा. मग काय करणार ना सेलेब्रेट everyday as earth day???
khara aahe tuza mhanana....aapan sarvanni thoda thoda kele tari khup help hoil...
ReplyDeleteआभार , अनामिक.
Delete