Tuesday, April 28, 2009

मैत्रीबद्द्ल थोडे वेगळे काही....

चांगल्या मैत्रीचा ठेवा भाग्यवंतांनाच मिळतो, गर्दीतल्या थोड्यांशीच आपला सूर जुळतो....
सुरात गायलेलं मैत्रीचं गीत आयुष्याला सुरेल करतं, अशा गीताचं माधुर्य आयुष्यभर पुरुन उरतं....
सुदैवाने आपल्यातही असंच मधुर नातं आहे, त्याच्या आधाराने आयुष्य सुखात व्यतीत होतं आहे....
आपलं नातं कायम राहो हीच एक सदिच्छा
अलिकडेच वाचलेला एक स्र्कॅप.. "मैत्री" आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात हमखास येणारं नातं. जेवढं लिहावं तेवढं कमीच. प्रत्येकाचा अनुभव वेगळा. पण कुठेतरी नक्कीच भावलेला. मैत्रीचं नातं कायम राहो असंच वाटतं पण असाही क्षण येतो जेव्हा हेही नातं दुरावलं जातं. कधीकधी कळतही नाही की ह्या दुराव्याची सुरुवात केव्हा झाली आणि जेव्हा कळतं तेव्हा फ़ारच उशीर झालेला असतो.
माझ्या कॉलेजमधल्या काही मैत्रीणी जेव्हा मेडिकलला गेल्या तेव्हा साधारण लक्षात आलं की हा एकमेकींना न देता दिलेला निरोपच आहे. त्यावेळी इ-मेल आणि चॅट या भानगडी पण नव्हत्या. अगदी सुरुवातीला एकमेकींना पत्र लिहिली गेली पण मुंबईतल्या मुंबईत ज्या होत्या त्यांच्याशी संपर्क तुटलाच. तरी मुंबईबाहेर शिकणा-या दोन मैत्रीणी पत्ररुपी भेटीने टिकुन राहिल्या...आता आम्ही इ मेलवर अपग्रेडपण झालो. नशीब...
ईंजिनियरींगची काही लोक ओरकुटरुपाने पुन्हा भेटले. पण कॉलेजमधली चार वर्ष जिच्याबरोबर खूप धमाल केली ती हळुहळु कशी लांब गेली हे कळलं तरी चुकवु शकले नाही. आता पुन्हा लग्न-मुल झाल्यावर संपर्क आला पण ती पुर्वीची निखळ मजा येत नाही असं वाटतं....कधीकधी तर काय कस चाललंय च्या पुढे गाडी जात नाही.
याच दरम्यान पक्षीनिरीक्षणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मैत्रीची नवी पालवी फ़ुटली. आता स्वत:मध्येही बरीच मॅच्य़ुरिटी आली होती. ही माझी मैत्रीण माझ्यापेक्षा वयाने मोठी, घरातली एकुलती एक, व्यवसायाने प्राध्यापिका. हा काळ म्हणजे नव्याने बेस्ट फ़्रेन्ड्स बनवण्याचा नव्हता. आम्ही सर्व एकत्र भटकायचो. काहीवेळा बोलता बोलता वाद होत, पण तात्पुरते. जेव्हा भेटणार तेव्हा आणि इतर वेळी फ़ोनवर मनमुराद गप्पा मारणार. वैयक्तिक प्रश्न माहित जरी असले तरी एकमेकांची इच्छा असेल तरच त्याची चर्चा. आयुष्यात वेळेवर जोडीदार न भेटलेली पण त्याबद्द्ल जास्त खंत न करता नेटाने बाकीच्या सर्व गोष्टींचा, छंदांचा मनमुराद आनंद लुटणारी आमची ही मैत्रीण खुपदा आमच्या हेव्याचा विषयही बनली.
नंतर मी देशाबाहेर असल्याने नाही म्हटलं तरी थोडी गॅप आली पण २००५ च्या भारतभेटीत शिवाजी पार्कच्या गर्दीत आम्हाला बरोबर हुड्कुन काढून भेळेची पुडी हातावर ठेऊन "खा..काही होत नाही पोटाला" म्हणून जमवलेली गप्पांची मैफ़ल आवरण्याचं कारण पार्कात व्हायला लागलेला अंधार !!! पुन्हा निघायच्या आधी नेब्युलाबाहेर खात खात निरोपाच्या गप्पा मारताना गलबलुन आलं पण पुन्हा भेटणार याची खात्री.
२००८ च्या फ़ेब्रुवारीत एकदा घरी फ़ोन लागत नव्हता आणि अचानक लक्षात आलं की आपली गुड न्य़ुज अजुन कळवली नाही म्हणुन हिच्याकडे फ़ोन केला. बरं नाही म्हणुन आज जास्त बोलुया नको हे थोडं विचित्र वाटलं पण म्ह्टलं पुढ्च्या महिन्यात पुन्हा फ़ोन करुया.. अजुन एका कॉमन मित्राला पण याविषयी म्हटलं तर त्यानेही काही जास्त लक्ष दिलं नाही. नंतरचे दिवस स्वतःच्या होणा-या बाळाच्या तयारीत फ़ोन राहुनच गेला आणि दुस-या मित्राची इ-मेल आली....our dear friend is no more.......एकदम गळुन गेले...पाठोपाठ बाकीच्या सर्वांनी मला खास करुन खूप विचार न करण्याची ताकीदही दिली....
शेवटच्या स्टेजला कळलेला कॅन्सर दोन महिन्यात तिची सुटका करुन गेला. कसं पचवायचं, तिच्या आईला फ़ोन करायची पण हिम्मत झाली नाही. काही महिन्यापुर्वी मुंबईत गेल्यावर भेटुन आले पण आतुन कुठे तरी धागा तुटल्यासारखा झाला होता. आजपर्यंत अनेकदा मैत्रीच्या पडत्या काळात मनाला सांभाळता आले. नव्या मैत्रीने आयुष्यात स्थान मिळवले पण हा दुरावा कधी न भरुन येणारा आहे. वरचा स्क्रॅप वाचताना मला या दुराव्याचीच तीव्रतेने आठवण होतेय...मागच्या एप्रिलमध्ये कायमसाठी दुरावलेल्या माझ्या मैत्रीणीसाठी हा धागा समर्पित.

11 comments:

 1. खरय तुझं ..मैत्री ही बरेचदा एक अगम्य गोष्ट असते...ज्यांच्याविना आपण एक क्षणही रहात नसतो ते कधी कसे दुर होतात कळत नाही आणि अचानक नवा मैत्रीचा हात पुढे येतो...
  खुप टचिंग पोस्ट आहे.....

  तन्वी

  ReplyDelete
 2. खरंय तुझं म्हणणं तन्वी..

  ReplyDelete
 3. hmm kharech ayushacha pratek valanavar navin maitri hot aste mage valun baghata na tya tya veli atishay jiv ki pran asleli sakhi aata koni ch nasate ...................... kadhi tari khup aathavan yete ph hoto pan ti odh aani ti maja yet nahi ................ hyala jivan aise nav ..........

  ReplyDelete
 4. अगदी खरय आपलं म्हणणं. एकच शंका फक्त मुलींच्याच बाबतीत असं होतं का?

  ReplyDelete
 5. नाही. हे मुलांच्याही बाबतीत होतं, पण मुलं निसर्गतःच मुलींपेक्षा थोडी कमी भावनिक असतात. त्यामुळे ‘किती दिवसांनंतर आपलं बोलणं होतंय, नाही? आज तुझी खूप आठवण आली म्हणून फोन केला’ असे संवाद मुलांच्या फोनमध्ये होत नाहीत. ‘हरामखोरा, एवढ्या दिवसांत फोन नाही केलास! मेला होतास काय?’ अशी सहसा सुरुवात होते. भावना त्याच, शब्द वेगळे आणि भावना व्यक्त करण्याची पद्धत वेगळी..

  ReplyDelete
 6. नाही. हे मुलांच्याही बाबतीत होतं, पण मुलं निसर्गतःच मुलींपेक्षा थोडी कमी भावनिक असतात. त्यामुळे ‘किती दिवसांनंतर आपलं बोलणं होतंय, नाही? आज तुझी खूप आठवण आली म्हणून फोन केला’ असे संवाद मुलांच्या फोनमध्ये होत नाहीत. ‘हरामखोरा, एवढ्या दिवसांत फोन नाही केलास! मेला होतास काय?’ अशी सहसा सुरुवात होते. भावना त्याच, शब्द वेगळे आणि भावना व्यक्त करण्याची पद्धत वेगळी..

  ReplyDelete
 7. हम्म संकेत...यावर कुणी मुलगाच प्रकाश टाकेल असं वाटत होतं..त्याबद्द्ल आभार....बाकी ते "मेला होतास काय??" वगैरे फ़ोन माझे मित्रही काही वेळा मला(आणि अर्थात मी त्यांना, अशी भाषा मुलीबरोबर करण्यात मजाही नाही) करतात त्यामुळे एकदम पटेश.....

  ReplyDelete
 8. तू तुझ्या मित्रांना ‘मेला होतास काय?’ म्हणतेस? वा... चांगलं आहे. असं करणारी तू पहिलीच मुलगी आहेस माझ्या माहितीतली... :-)

  ReplyDelete
 9. हो आहेत तसे. पण जुने ट्रेकिंगमधले आणि पहिली नोकरी नेटवर्किंमध्ये होती तेव्हाचे... थोडक्यात ठेवणीतले मित्र आहेत ते....(त्याना आता मला मुल झाल तर मी सिरिअस आई कशी होणार याची चिंता)......नशीब मी त्यांच्या कडून शिव्या शिकले नाही ते.....नाहीतर नोकरीत त्या टीममध्ये मी एकटी मुलगी म्हणजे माझे काही लाड नव्हते...खर मला सांगाव लागायचं त्यांना की मी एक (आणि तुमच्यात एकटीच) मुलगी आहे.....

  ReplyDelete
 10. हीहीही. बरं आहे. म्हणजे तू अगदी मुलांत मुलगी लांबोडी (हा शब्द नक्की काय आहे आठवत नाहीये. त्यामुळे अंदाजानेच लिहिलाय...) होतीस तर. अगदी टॉमबॉय टाईप!

  ReplyDelete
 11. लांबोडी हीहीहीहीहीहीहीहीहीहीहीहीहीहीही

  ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.