स्वतःला आम्ही बिम्ही म्हणवुन घ्यायची सवय मला नाही. बरं वाचनालय ही अशी टी.पी. (म्हणजे time pass हो) करायला जायची जागा पण नाही. मग काय इतकं आम्ही लायब्ररीत वगैरे? सांगते...आम्ही म्हणजे मी आणि माझा अकरा महिन्यांचा मुलगा. म्हणजे मी काही अगदी खाष्ट आई व्हायचं इतक्यात तरी ठरवलं नाहीये पण इथे लायब्ररीत खास लहान मुलांसाठी खेळ, गोष्टी असे कार्यक्रम ठेवले असतात जे मी इतके दिवस ऐकून होते ना त्यासाठी प्रथमच आमच्या चिरंजिवांना नेलं. नेलं म्हणजे न्यायचा धीर केला त्याची आठवण म्हणून ही खास पोस्ट.
नकटीच्या लग्नाला सत्राशे विघ्ने पैकी पहिलं विघ्न म्हणजे सकाळचा मोठा कार्यक्रम जो खुपदा न्याहारी नंतर जमेल तेव्हा करायची बाळराजांची सवय. पण आज मी जरा लकी होते त्यामुळे साडे नऊ पर्यंत डायपर बदलुन आम्ही तयार होतो. पण हाय..मी लायब्ररीच्या वेबसाइटवर वेळच पाहायची विसरले होते. नशिबाने आम्हाला एक पाच मिनिटाच्या ड्राईव्हवर ही गावची लायब्ररी असल्याने आयत्या वेळी पोहोचता येण्यासारखं होतं.
बाहेर जायचं नक्की केलं आणि पाहाते तर कार सीट घरातच. मला या अमेरिकन बायांच आश्चर्य वाटतं. दहा- बारा पौंडाची कारसीट आणि त्याच्या दुप्प्ट वजनाचं बाळ उचलुन पार्किंग लॉटपासुन मुक्कामाच्या ठिकाणी आरामात जाताना दिसतील. मी गेल्या अकरा महिन्यात एकदाही हे धाडस केलं नाहीये. आपली म्हणजे सरड्याची धाव कुंपणापर्यंत. नव-याने कारसीट गाडीत लावली असेल तर फ़क्त बाळाला त्यात बांधायचं आणि स्वारी पुढे.. आता काय करायचं? बरं शेजारी, म्हणजे डावीकडची आणि समोरची मंडळी कामावर आणि ऊजवीकडे एकटी राहणारी म्हातारी बेट्टी. ती काही ड्राईव्हवेवर आताच चालायला शिकलेल्या आमच्या बाळाला आवरु शकणार नाही. पण आज डावीकडच्या मंडळीकडे दोन दोन गाड्या पार्क दिसतात. चला बघुया कुणी मिळतंय का मदतीला. दोन-तीनदा दार वाजवल्यावर आमच्या शेजारणीच्या सासुने दार उघडलं. हिला आपल्या नातीला मधेमधे सांभाळायला आवडतं आणि आमच्या नशिबाने ही स्वतः इथेच तिला सांभाळणार होती. तशी खूप मदतीला तत्पर इथली लोकं पण आपण सांगितलं तरच. मग काय आमचं पोरगं थोडावेळ तिच्याकडे आणि मी गाडी तयार करुन स्वारी एकदा जायला तयार झाली. सर्व ट्रॅफ़िक सिग्नलपण व्यवस्थित मिळून बरोबर दहा वाजता आम्ही पोचलो.
आधी तर नवीन जागा बघुन आईला चिकटणारा माझा मुलगा तिथे असणारी खूप मुले पाहुन लगेचच पळापळी करायला लागला. चला बरे झाले मी म्हटले. एका हॉलमध्ये सर्वांना नेल्यानंतर एक त्यांची इन्स्ट्रक्टर ओळख करुन देत कार्यक्रम सुरु झाला. सुरुवातीला "when you are happy when u know u clap your hands" हे गाणं साभिनय चालु केलं. आणि अशीच काही इतर गाणी क्रमाने चालु झाली. तिच्याकडे हाय हॅलो,बटाटा आणि म्हणजे कुठच्याही विषयावरची चारोळीसदृष्य मजेदार गाणी होती..मला त्यातली बरीच नवीन होती. आधीच मी मराठीतून शिकलेली आणि बरीच वर्ष इंग्रजी बडबडगीतं ऐकलीही नाहीत. एकीकडे थोडी व्यवस्थित चालु, उभं राहु शकणारी दोन तीन मुलं मनापासून अभिनय करतात. माझ्या मुलासारखी काही मुलं भरकटल्यासारखी इथे तिथे फ़िरतायेत आणि मध्येच आपली आई आहे ना आसपास हे पण चेक करतात. तर कुणी एक्स्पेरियंस मुलं नंतर खेळायला मिळणार हे माहित असल्यासारखं खेळ्ण्याच्या कपाटाकडेच घुटमळतात अगदी मजेदार दृष्य होतं.
माझा मुलगा अचानक एका मुलीच्या मागे मागे लागु लागला मला कळेचना की हे काय आतापासून! नंतर पाहिलं तर तिच्या तोंडात पॅसिफ़ायर होतं इथे बऱ्याच आया सोय़ीचं पडतं म्हणून देतात तोंडात ठेऊन पण आमच्या बाळाला हा दागिना नवा त्यामुळे तो ते काढण्यासाठी आपला तिच्या मागे मागे...शेवटी त्याला मांडीवर घेऊन बसले तर नेमकी आमच्या समोर बसलेली एक आई नव्या फ़ॅशनचा छोटा टॉप घालुन बसल्यामुळे मागे थोडा कंबरेचा भाग दाखवत बसली होती. आजकाल दात येत असल्यामुळे बाळाला हात वगैरेची स्कीन दिसली तर चावायची सवय आहे. ईथे तर एकदम गोरी गोरी कातडी समोरच...हा जवळ जवळ सुटलाच होता माझ्या हातातून तिच्या दिशेने तेवढ्यात पुढचा बाका प्रसंग ओळखून मी पटकन त्याला घेऊन मागे काही खुर्च्या भिंतीला टेकवून ठेवल्या होत्या त्यावर जाउन बसले. नशीब कोणाला कसला अंदाज आला नाही ते.
थोड्याच वेळात माझ्या नशिबाने गाणी संपली आणि दोन कोप-याला खेळण्यांची दोन कपाटे होती ती उघडून मुलांना खेळायला दिले...आता जरा एक्सप्लोर करायचे तर आमचे बाळराजे फ़क्त सगळी खेळणी गोळा करुन पुन्हा तिथल्या एका बॉक्समध्ये घालायचा उद्योग करु लागले. म्हणजे काही मुले ती खेळणी घेऊन पळत होती आणि हा ती परत मिळवून जागच्या जागी ठेवतोय...हाय रे.....हाही वेळ तसा मजेत गेला. मुख्य आता आई आपल्याबरोबर खेळत नसली तरी चालत होतं...इतक्यात क्लिन अप साठीचं खास गाणं चालु झालं आणि सर्वांनी घेतलेली खेळणी कपाटात आणायला सुरूवात केली. आम्ही तर इतका वेळ जवळ जवळ तेच काम करत होतो... असो पण एक तास कसा गेला खरंच कळलं नाही.
अमेरिकेत आल्यानंतर इथल्या अनेक सुविधांपैकी सार्वजनिक वाचनालय ही आम्हा दोघांनाही आवडलेली सोय आहे. तुम्ही फ़क्त त्या गावात राहण्याचा हवाला म्हणून एखादे पत्र आणि तुमचा आय.डी. दाखवलात की लायब्ररी कार्ड तुमच्या नावावर. नो फ़ी नो नथिंग... अगदी सुरुवातीच्या बेकारीच्या काळात मी इथे अगदी पडिक असे आणि नंतरपण मला दर आठवड्याला प्रवास करावा लागे त्यावेळीही विमानात वाचायला पुस्तकं घ्यायला जाणं नेहमीचं. हॅरी पॉटरचे सर्व भाग मी लायब्ररीतुनच वाचून संपवलेत. आतापर्यंत मला हव्या त्या प्रत्येक विषयावर इथे पुस्तक मिळालय. अगदी भारतीय पाककृतीचं सुद्दा. असो..लेकाला लायब्ररीत नेण्याच्या निमित्ताने मीच मनाने किती मागे जाऊन आले कळलंच नाही.
पण खरंच आहे अगदी सर्व वयाच्या लोकांसाठी काही ना काही कार्यक्रम इथे असतात. आता मीच माझ्या मुलाला ज्या कार्यक्रमासाठी आणलेय ते जन्मापासून ते दोन वर्षे वयासाठी तर वरच्या मजल्यावर अगदी सिनियर सिटिझनसाठी संगणक शिक्षण इ. पर्यंत कार्यक्रम असतात. आणि सर्व चकटफ़ु..पुन्हा एकदा मी इथल्या लायब्ररी सिस्टिमला मनोमन धन्यवाद दिले. खरंच कसं मेंटेन करतात माहित नाही. आपण भारतीय वेस्टर्न कल्चर किती पट्कन आमच्या कडेही आहे हे आजकाल मॉल, फ़ॅशनेबल कपडे ई. च्या रुपाने दाखवत असतो नाही? पण वेस्टर्न कल्चरमधले हे गुण आपण कधी आणि कसे घेणार?
अगदी खर आहे. आपल्याकडेही अश्या लायब्ररी चालु व्हाव्यात असं फार वाटत मला. निदान अश्यापेक्षा ज्या आहेत त्या तरी थोडी व्हरायटी वाढवुन चकट-फु कराव्यात असं फार वाटत मनोमन
ReplyDeleteagdi chakat fu nasalya tari kamit kami paise etc ghevun suru karvyat pan karavyta khar ch tikad che sagale gheto pan hya changlya gosti ka ghet nahi aapan ....................
ReplyDeleteधन्यवाद...काय करता येईल यासाठी आपण नवीन लोकांनी विचार केला पाहिजे..चकटफ़ु नाही तरी थोडी फ़ी घेऊन आपल्या विभाग/सोसायटी पुरता चालु करुन मग हळुहळु विस्तार वाढवता येईल का?
ReplyDeleteआरुष सही बेटा..असाच पुढे म्हणजे मागे(मुलींच्या) जात जा.....बाकी लायब्ररी विषयी ..खरच अशी लायब्ररी हवी...आम्ही दोन मैत्रीणी मिळुन मस्कतमधे या जुलैपासुन हा उपक्रम सुरु करणार आहोत....
ReplyDeleteबाकी लिखाण उत्तम....
तन्वी
अगं आजकाल मुलींच्या मागे लागतो म्हणजे बरं ना आपल्याला दुसरी चिंता नको करायला असं माझा नवरा म्हणतो.
ReplyDeleteतुमच्या मस्कत उपक्रमाबद्द्ल लिही नंतर.
अपर्णा,
ReplyDeleteआरुषच्या गमति वाचुन सॉलिड हसले मी. बाका प्रसंग तर खरोखर बाका होता. धमाल पोस्ट आहे, मजा आली.
सोनाली अगं जवळजवळ वर्षभरापुर्वीची आठवण करुन दिलीस बघ मलाच...बाका प्रसंग तर होताच पण तुला सांगते नेहमी आपण मुलांच्या दोन पावलं पुढेच विचार करत असतो ना? त्यामुळे ते कुठे आपली गोची करतील याचा अंदाज वेळीच येतो...This is something you just learn without anyone teaching you..hee hee..
ReplyDelete