Friday, May 22, 2009

माझ्या सुरुवातीच्या नोक-या

त्या दिवशी एका घरगुती पार्टीत नोकरी या विषयावर चर्चा रंगात आली होती. प्रत्येक जण आपापला अनुभव सांगत होते, तेव्हा मन सात वर्ष मागे गेलं.
इंजिनियरींग झाल्यावर मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलं तरी आमच्या इथे कॅंपससाठी फ़क्त महिन्द्रा आली होती आणि मेकच्या काही मुलांना घेऊन गेली. टेलिकॉमवाले आम्ही सु.बे. (सुशिक्षित बेकार) मध्ये सामील.. मग इथे तिथे प्रयत्न करुन पहिली नोकरी नेटवर्क कम हार्डवेअर सपोर्टसाठी मिळाली. नाव लिहित नाही पण ही एक मोठी पण सरकारी कंपनी होती. त्यांनी कायम नोकरीतली पळवाट म्हणून माझ्यासारख्या अडल्या-नडल्या ईंजिनियरसाठी तथाकथित हंगामी पद काढले होते. म्हणजे काही नाही काम नेहमीपेक्षा जास्त आणि पगार मात्र ३००० रु. फ़क्त. एका वर्षानंतर पुढचं काय ते कळेल. असो. आधीच घरी राहुन कंटाळा त्यात काही तरी डोक्याला उद्योग म्हणून काम सुरु केले.
क्लायंन्टकडे दिवसभर काम. कधी कधी अक्षरश: वेठबिगारी का काय म्हणतात तसे वाटे. काही काही ठिकाणी quarterly maintainance च्या नावावर डेस्कटॉप्स पु स णे.... आणि तेही स्वच्छ. बोलतोय कुणाला. एक वर्ष भरायचं आणि पुढे पाहु असं ठरलं होतं. काही काही कलिग्ज खूपच चांगलेही होते. त्यामुळे ते दिवसही गेले. आणि शेवटच्या काही महिन्यात एकट्याने साईट सांभाळणे असे कामाविषयीचे चांगले अनुभवही मिळाले. आता वाट पाहात होते त्या सो कॉल्ड अप्रेजलची. माझ्या आसपास लागलेल्या ब-याच जणांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली होती पण तरी आपण केलेल्या कामाचे चीज होतेय की नाही हे तर पाहायला हवे ना?
होता होता तो दिवसही आला. आणि हेड ऑफ़िसला गेले. डिविजनल हेड, एक एच. आर. वाली आणि मी असा वन ऑन वन सामना होता. हेडनी कामाची अगदी तुफ़ान स्तुती केली. बहुतेक क्लायंन्ट आणि सिनियरचा फ़िडबॅक चांगला मिळाला होता. आणि मग रड्या आवाजात सांगायला सुरुवात केली. तुमचं सर्व चांगलं आहे पण काय आहे, बी.ई. च्या पाचव्या सेमेस्टरमध्ये तुम्हाला फ़र्स्टक्लास नाही. थ्रु आऊट फ़र्स्टक्लास नसल्यामुळे तुम्हाला अजुन एक वर्ष हंगामी काम म्हणून काम करावे लागेल आणि मग आपण बघु. आणि मुख्य म्हणजे तुम्हाला एकटीला आय डी बी आयची टेरिटरी यावेळी देऊ. मला जो काही सात्विक संताप आला ना की मी म्हटले काम देताना तर तुम्हाला माझा थ्रु आऊट फ़र्स्टक्लास आठवत नाही आणि आता एका वर्षानंतर आधीच्या कामाचं पाहायचं तर तुम्ही थ्रु आऊट फ़र्स्टक्लास पाहातयात. मनात म्हटलं पुढच्या वर्षीपण अशीच रडगाणी गातील..काय भरवसा..असो. हातातली नवीन हंगामीची ऑफ़र अर्थातच नाकारली.
घरी येऊन ही बातमी देताना नाही म्हटलं तरी थोडं धस्स झालं पण आतापर्यंत घरच्यांचा मला जो सपोर्ट होता तो तसाच राहिला. असो. काळ तसा कठीण होता.
म्हणजे नोकरी पण नाही काय करायच तेही नक्की ठरवलं नव्हतं. फ़क्त मागच्या वर्षभरातील अनुभवावरुन ते क्षेत्र थोडं जास्त मेल डॉमिनेटिंग वाटलं म्हणून मग सरधोपट सॉफ़्टवेअरसाठी प्रयत्न करायचा असं साधारण ठरवलं. त्यावेळी जावा जरा हिट होतं त्यामुळे एक दोन-तीन महिन्याचा दादरला कोर्स चालु केला. त्यांचा जॉब असिस्टंट पण असणार होता. त्यामुळे आता सर्व लक्ष अभ्यासावर केंद्रित केलं. तसं बरं चांगलं होतं पण डॉट कॉम बुम नेमकी त्याच वेळी कोसळायला लागली आणि माझ्यासारखे उभरते सॉफ़्टवेअर इंजिनियर मनानेच कोसळले. त्या सो कॉल्ड जॉब असिस्टंटची पण रडगाणी चालु झाली. इथे माझी एक मैत्रीण झाली होती. आम्ही दोघी एकत्र नोकरी शोधण्याचा प्रयत्न करत होतो. तर त्या जॉब असिस्टंटतर्फ़े आम्ही दादरमध्ये एका ठिकाणी मुलाखतीसाठी गेलो.
सर्व फ़ार्स होता. एक सरकारी नोकरी करणा-या बाई दुसरीकडे नव-याच्या बिझनेस कॉन्टॅक्ट्स वापरुन काही सॉफ़्ट्वेअर प्रोजेक्ट्स घेऊन आमच्यासारख्या होतकरुंकडुन करुन घेत होती. काम पण घरी स्वतःच्या पी.सी. वर करायचे. आणि हिला नंतर फ़्लॉपीवर आणुन द्यायचे. पगार पण यथातथाच. मला मनातुन पसंत नव्हतं पण माझी ती मैत्रीण जरा जास्तच उत्साहित वाटली म्हणून हो म्हटले. तिथे कोर्सच्या इथे मात्र लगेच नोटीस बोर्डवर आम्ही पहा किती छान जॉब असिस्टंट देतो ई. फ़ुशारक्या मारुन पार.
चला काही तरी उद्योग सुरु झाला. मला स्वतःच्या जी.के. मध्ये काही भर पडतेय वाटत नव्हते. शिवाय त्या बाईंची काम घेताना बोलण्याची पदधतही फ़ार छान नव्हती. नशीब आधीच्या नोकरीत कमवेलेल्या पैशात आणि ज्ञानात स्वतःचा पी.सी. स्वतः बनवला होता. नाहीतर ही थातुर मातुर नोकरी पण पदरात पडली नसती. मागच्या वर्षी तो पी.सी. मोडीत काढताना काय यातना झाल्यात त्या माझ्या मलाच माहित आहे. असो. मन ना असं उगाच भरकटतं...जाउदे.
तर हा कसाबसा चालु असलेला प्रकार चार आठवड्यात संपण्याचं मुख्य कारण साकीनाक्यातल्या एका कंपनीत जावाच्या नोकरीसाठी अर्ज केला होता; तिथे मिळालेली नोकरी. आधीच्या बाईंचे तोंड पाहायची इच्छाच होत नव्हती म्हणून पगारही घ्यायला गेले नाही. माझी मैत्रीण मला सांगत होती पण मी तसा प्रयत्न केला नाही.
ही नवी नोकरीही फ़क्त आधीच्या जंजाळातून सुटका म्हणून पत्करली होती असं म्हणणं जास्त बरोबर ठरेल.कारण पहिल्यापासून उगाच संशयास्पद वातावरण. एकतर मुलाखत ई. शनिवारी ठेवली होती आणि त्यादिवशी तिथे इतकं गुढ वातावरण. आता आठवलं तरी विचित्र वाटतं आणि पगार होता ६००० रु. तरी दोन वर्षांचा बॉंड. अडला हरि म्हणून सुरु केलं. ही नोकरी सुरु झाली पण म्हणावं तशी पकड घेत नव्हती. फ़क्त काही मराठी कलिग्ज तिथे मिळाले. ब्रेक टाईम बरा जायचा. पण प्रवासही त्रासदायक होत होता.
मागे त्या आधी उल्लेख केलेल्या मैत्रीणीबरोबर अंधेरीतल्या सिप्झमध्ये जवळ जवळ सर्व कंपन्यांमध्ये रेझ्युम टाकुन आलो होतो. वरची नोकरी सुरु होऊन दोनेक आठवडे झाले असतील; सिप्झमधल्या एका कंपनीची मुलाखतीसाठीची मेल आली. मुलाखत शनिवारी असल्यामुळे आधीच्या ठिकाणी रजा-बिजा टाकण्याचा काही संबंध नव्हता. नशीब बरं होतं. सकाळी नऊ वाजता सुरु झालेली मुलाखत प्रक्रिया रात्री नऊला संपून हातात. पगार दहा हजार हातात. बाकीचे कापाकापीचे वेगळे. पहिल्यांदा पाच आकडे पाहुन थोडासा हर्षवायुच झाला. शिवाय सिप्झ म्हणजे सॉफ़्टवेअरची पंढरी. आता करिअरची गाडी सुसाट सुटणार याची उगाच खात्री.
असं असतं असंच नाही. माझ्या सगळ्यात पहिल्या नोकरीतला एक मित्र अजुन कॉन्टॅक्टम्ध्ये होता. तो आणि मी एकाच दिवशी ती कंपनी जॉईन केली होती. रात्री नऊ वाजता त्याला फ़ोन केला. माझं कौतुक करायला तो मला बोरिवली स्टेशनला भेटला. काय मंतरलेले दिवस होते. नाव किना-याला लागल्यासारखं घरच्यांनाही वाटलं.
ऑफ़र लेटर घेऊन घरी आले पण मनाची तयारी अजुनही होत नव्हती. आता काय?? काय म्हणजे आधीची नोकरी जावामध्ये म्हणजे आधी शिकलेल्याचा फ़ायदा करुन देणारी तर नवीन जागी कुठच्याही म्हणण्यापेक्षा मेनफ़्रेमवर टाकण्याची जास्त शक्यता होती. रात्र जरा बेचैनीची गेली. पण इतकी मोठी कंपनी, पगार आणि टेक्नॉलॉजी काय पुढे मागे बदलता येईल असा सारासार विचार करुन सोमवारी जुन्या नोकरीवर बरं नाही असा फ़ोन करुन ह्या मेडिकलला गेले. उरलेला आठवडा जुन्या ठिकाणी भरला पण तोच शेवटचा करावा असाही विचार केला. नव्या नोकरीची जॉइनिंग डेट पुढची होती त्यामुळे आई-बाबांबरोबर शिर्डीला जायचा कार्यक्रम निश्चित केला. इथेही बॉन्ड होता म्हणून तिथले कलिग्ज म्हणाले जाताना सांगून जाऊ नकोस. त्या शुक्रवारी तिथला एक कलिग अंधेरी स्टेशनला माझ्याबरोबर सोडायला, बाय म्हणायला म्हणून आला. मनातल्या मनात कळत नव्हते ही नोकरी सोडण्यामागे शहाणपणा आहे की नाही?
सांगायचे तात्पर्य गेले सहा महिने एक तो जावाचा क्लास नंतर या दोन बिनपगारी नोक-या करुन फ़ायनली एका नवीन दोन वर्षांचा बॉन्ड असलेली नवीन नोकरी माझी वाट पाहात होती. या नोकरीबद्द्ल पुन्हा केव्हातरी लिहिन. म्हणजे आतापर्यंतचा प्रवास वाचायला मजा आली असेल तरच हा!
पण आता खास हे आठवण्याचे दुसरे निमित्त सध्या मंदीच्या काळात पुन्हा एकदा नोकरी शोधायला कंबर कसली आहे. त्यामुळे आतापर्य़ंतचे सर्व अनुभव एखाद्या निवांत दुपारी हमखास आठवतात.नशीबात वेगवेगळ्या नोक-यांचा योगच दिसतोय असं काहीसं वाटतंय...बघुया हा नवा अनुभव कधी मिळतोय ते....

9 comments:

  1. मस्त आहे बुवा तुमचा अनुभव मी पण खुप नोकर्‍या बदलल्या चार ते पाच नोकर्‍या बिनपगारी पण फुल अधीकारी सारख्या केल्या बेस्ट ऑफ लक तुमच्या मंदीच्या काळात नोकरी शोधण्यला

    ReplyDelete
  2. धन्यवाद शैलेश...आपले प्रत्येकाचे फ़क्त नोक-यांचेच अनुभव लिहायचे तर एक वेगळा ब्लॉग होईल नाही का?

    ReplyDelete
  3. ALL THE BEST FOR YOUR NEW JOB SEARCH!!!!!!!!!!!!! YOU WILL GET 100% :)

    Ashwini

    ReplyDelete
  4. ..फारच वाइट अनुभव घेतलेत तुम्ही.. पण डोन्ट लुझ युवर हार्ट.. एव्हरी थिंग विल बी ऑल राइट. मी तुमचा ब्लॉग नेहेमी गुगल रिडर मधे वाचतो, आणि तिथे कॉमेंट्स देता येत नाहित.. म्हणुन राहुन जातात कॉमेंट्स.

    आता तोच डॉट कॉम चा फुगा पुन्हा डिफ्लेट झालाय. फुटला असं म्हणणं चुकीचं ठरेल. माझ्या मित्राचा मुलगा बिई मेक झाला होता, कॅंपस मधे सिलेक्ट झाला आय टि कंपनीत. पण आता त्या कंपनीचे पत्र आलेले आहे. की रेसेशन मुळे नविन रिकृटमेंट्स बंद केल्या आहेत म्हणुन, आणि तुम्ही इतरत्र जॉब बघायला मोकळे आहात म्हणुन.

    अजुन कांही दिवस तरी असंच चालणार ... एकच सिल्वर लाइनिंग दिसते आहे, भारतात स्टॉक मार्केट रिव्ह्यु होतंय.. म्हणजे आता जॉब्ज रिक्वायरमेंट्स वाढतिल..

    ReplyDelete
  5. अहो ही खूपच जुनी गोष्ट आहे. त्यामुळे आताची वेगळी परिस्थिती आहे त्याचा सामना करायला तसं टेंशन नाहीये. पण तोंड देणं भाग आहे. आता ब-यापैकी अनुभव पाठीशी आहेत. आणि ह्या पोस्ट नंतर इतके अनुभव आलेत ना लिहिन कधीतरी...

    ReplyDelete
  6. sadhyaache diwas vait aahet khare. pan hehi jatilch. hyaa aadhihi ashi vait paristhiti yevoon gelich aahe. Aparna all the best. Aattach thoda thoda badal hou lagala aahech.Arthat changala ga. :)

    ReplyDelete
  7. हो खरयं भानस. आपल्या शुभेच्छा आहेत हेही खूप महत्त्वाचे आहे.

    ReplyDelete
  8. मस्त आहे पोस्ट
    खूप आवडली
    घरोघरी मातीच्या चुली.
    ह्या पोस्ट ने धीर दिला.
    पुढील अनुभव सुद्धा लिही.वाचायला नक्की आवडेल.

    ReplyDelete
  9. सागर, खास आभार इतक्या जुन्या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्याबद्दल...आता मलाच ही पोस्ट वाचून मजा वाटतेय...आणखी अनुभव लिहायचा नक्की प्रयत्न करेन...:)

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.