Monday, May 18, 2009

चिमणीचा घरटा

गेले दोन वर्ष मागल्या दारी जो ओटा आहे तिथे वळचणीला एक चिमणा-चिमणी घरटं बांधतात आणि साधारण मेच्या सुमारास पिलं बाहेर येतात. या वर्षीही चिमणीला मी हिवाळा संपता संपता तिथेच पाहिले आणि म्हटलं हिला जागा आवडलेली दिसते. नंतर इतकं लक्षही द्यावसं वाटलं नाही पण काही आठवड्यांनी अचानक इथे आपल्या इथल्या मैनेसारखे पण संपुर्ण काळे दिसणारे ककु त्यात जाताना दिसले आणि पुन्हा एकदा लक्ष घरट्याकडे वेधले.
पक्षिप्रेमासाठी पुर्वी इतकं मनमुराद फ़िरता येत नसलं तरी जमेल तितकं घरगुती पक्षीनिरिक्षण आणि वाचन मी आवडीने करते. त्यामुळे जेव्हा मी ककुला तिथे जाताना पाहिले मला लगेच आपल्या कोकिळेची आठवण झाली. कावळ्याच्या घरट्यात शिताफ़ीने अंड टाकुन मग पिलं थोडी वाढवुन मिळाली की मग त्यांचं पाहणारी कोकिळा. मला वाटलं ही पण तशीच भानगड दिसते. आता या नैसर्गिक चमत्काराचे आपण इकलौते गवाह वगैरे होणार म्हणुन एकदम फ़ुल फ़्लेज थ्रिल. आता रोज घरट्यावर लक्ष ठेउया, मध्ये मध्ये फ़ोटो आणि जमलं तर शुटिंग काय काय बेत पण मनातल्या मनात आखायला सुरुवात केली.
चिमणी आणि ककु रोज आलटुन पालटुन जाताना दिसत होती. मला तर वाटत होतं ककु कपल भलतच हुशार पण आहे. चिमणी बाईंची नाहीतर चिमणा काकांची फ़ेरी झाली की लगेच संधीचा फ़ायदा घेऊन आतमध्ये जाउन काहीतरी खुसुर-फ़ुसुर करत. पण ही बया चोचीत दोरे, गवताच्या काड्या-बिड्या घेऊन काय बाहेर येत होती काय कळत नव्हतं. म्हणजे दुसरीकडे कुठे घर बांधतेय आणि इथुन सिमेंट-रेतीची तरतुद चाललीय काय माहीत...हे नाही हं चालायचं. माझा अंदाज खोटा ठरला तर आधीच टिंगल करणा-या माझ्या नवऱ्याच्या हातात कोलीत नाही का मिळणार. पण तसं नाहीयं वाटतं.

नंतर एकदा चिमणा आणि ककु यांचं जोरात भांडण चालु झालेलं; मीच नाही तर आत खेळणा-या माझ्या लेकानं पण ऐकलं. चांगलीच चिडली होती दोघं. मला आपलं काहीच कळत नव्हतं. म्हणजे हिने अंडी घातलीत आणि तिनाची चार झालीत हे गणित चिमणा चिमणीला कळलं की काय? पण भांडणं चालुच होती आणि आता ककुच्या घरट्यातल्या फेऱ्या पण वाढल्या होत्या. मी जास्त कन्फ़्युज.
आता बरेच दिवस चिमणी मात्र तिथे दिसत नाही.
आणि आमच्या बागेत एक लाकडी बर्डहाउस ठेवलेय तिथे बसु लागली. कळलं मला की तिच्या लाडक्या जागेवर अतिक्रमण झालय आणि विणीचा हंगाम पुर्ण संपायच्या आत दुसरं घर बांधलं नाही तर गोची होईल म्हणुन तिनं आपली सोय बंगल्यातुन वन बेडरुम मध्ये करायला घेतलीय. वाईट वाटलं पण काय शेवटी "survival of the fittest".
बरं ते जाउदे पण आताच घरट्यातुन पिलांचे आवाज यायला लागलेत. श्री आणि  सौ ककु सारखे किडे घेऊन फेरयांवर फेऱ्या  मारताहेत. शेवटी न राहावुन कॅमेरा उंच पकडुन फ़ोटो काढलाय.




पिलांच्या चोची काय सुंदर दिसताहेत...पुन्हा एकदा एक्साइटमेंट! पण मला त्यांचे आवाज मात्र चिव-चिव सारखे का वाटताहेत काय कळत नाहीहेत..
काय हरकत आहे एखाद्या वर्षी ककुच्या घरट्यात चिमणीने अंडी टाकायला?

3 comments:

  1. dur deshat rahat asatana asha chotya chotya gosti nakki ch manala khup anand det asnar enjoy .............. lekh khup ch chan zalay

    ReplyDelete
  2. Are you from Mumbai ? Flamingo's have come to Sewri Mumbai, if you are interested in watching

    ReplyDelete
  3. Comments baddal dhanyawad...
    Harekrishnaji, I am from Mumbai but these days out of India. We used to go to Sewri for Flamingoes...This year they are a bit late there I guess. Thanks for your suggestion....

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.