Tuesday, May 19, 2009

प्रिय अपर्णास....

मागच्या आठवड्यात चिरंजीवांचा पहिला वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने माझ्या बाबांनी बरेच दिवसांनी मला एक पत्र लिहिले. त्यातला काही भाग खास लक्षात ठेवावासा वाटतोय. ब्लॉगवर आला की आपसुक जास्त वेळा नजरेखालुन जाईल म्हणुन थोडं पर्सनल असलं तरी पब्लिक करतेय.

चि. आरुषचा पहिला वाढदिवस म्हणून हा पत्रप्रपंच. त्याला सर्दी झाली हे मला कळलं. आई आपल्या बाळाला मोठं करते म्हणजे १."घार हिंडते आकाशी, चित्त तिचे बाळापाशी!" २. "वानर हिंडे झाडावरी, पिले बांधुनि उदरी". कविता म्हणणारे म्हणोत बापडे. पण जी माय म्हणजे आई हे करते धन्य ती!
चि. आरुषकडे तुझे भरपूर लक्ष आहे. मला अमेरिकेत आल्यावर कळले, मुलांना पंधरा वर्षे जपावे लागते. "मुले ही देवाघरची फ़ुले आहेत" हे साने गुरुजींना कळले. ब-याच लोकांनी तो सुविचार म्हणून फ़लकावर लिहिला. अनुभव मात्र आईला किंवा आजी-आजोबांना आला.
पंधरा वर्षांपर्यंत मुल चंचल, अपक्व, नासमज असते. कान, नाक, डोळा, हातपाय कसे सुरक्षित ठेवावे हे त्याला कळत नाही. पडणे, झडणे, सायकल चालविणे इथे बारीक लक्ष ठेवावे लागते. अगदी डोळ्यात तेल घालून.
मुलांविषयी थोडेसे....(सन्मा. चिपळूणकर सर)
* मुलांवर डोळस प्रेम करा. त्यांच्या गुणदोषांसकट त्यांचा स्विकार करा.
* मुलांना सतत धारेवर धरु नका. अपमानित करु नका.
* गरज असेल तेवढेच त्यांना करु द्या.
* मुलांना गरज असेल तेवढेच मार्गदर्शन करा.
* मुलांना शिकवत राहण्यापेक्षा त्यांना सुचवा.
* मुलांना स्वयंअध्ययनाची गोडी लावा.
* खेळण्याची संधी द्या.
* योग्य-अयोग्य. चांगले-वाईट, भले-बुरे ओळखण्याची दृष्टी त्यांना द्या.
* मुलांना अवाजवी शिक्षा करु नका.
* मुलांसमोर नकार घंटा सतत वाजवून त्यांचा उत्साह, उभारी खच्ची करु नका....
तुझेच बाबा...

5 comments:

  1. वर लिहिलेलं वाचायला जरी सोपं असलं तरिही आचरणात आणणं फार कठिण! वर दिलेली प्रत्येकच गोष्ट करतो आपण. एक अजुन गोष्टं, आपल्या मुलांची तुलना लोकांच्या मुलांशी करणं अगदी चुकिचं आहे.. कुठल्याही बाबतित.

    ReplyDelete
  2. हो माहित आहे. आमच्या पिढीने तरी असे करु नये म्हणून लिहून ठेवले आहे. आणि कदाचित आश्चर्य वाटेल पण माझ्या बाबांनी यातल्या ब-यापैकी गोष्टी पाळल्या आहेत...

    ReplyDelete
  3. खूप काही शिकण्यासारखं आहे या पत्रातून....हे पाळ्णं जरी असलं तरी ते तसे केले गेले पाहिजे हे खरे.....

    तन्वी

    ReplyDelete
  4. आरूषचा या वर्षीच्या मे महिन्यात दुसरा वाढदिवस असेल, पण नेमकी तारीख नाही कळाली गं... बाय द वे, तुझ्या या पत्रातील बहुतेक गोष्टींना मी मुकलोय (माझ्या बालवयात!).. पण तु मात्र तुझ्या आरूषचे खुप लाड करतेस हे वाचून खुप बरं वाटलं...

    - विशल्या!

    ReplyDelete
  5. विश्ल्या आरुष १६ मेचा आहे. सध्या तरी त्याचे लाड चाललेत पुढचं पुढे....:)

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.