माझी मावशी परळला आंबेडकर पूल संपतो, साधारण त्या भागात राहायची. माझ्या बालपणीच्या सार्वजनिक गणपती, मुंबईला प्लाझाला झालेला बॉम्बस्फोट, साऊथ मुंबईमधील फिरलेल्या जागा, नेहरू सायन्स सेंटर आणि प्लॅनेटेरियम, माझे रुपारेलमधले दिवस या सर्व आठवणी या जागेशी खूप संबंधीत आहेत. ती तिथे राहत नसती तर मला वाटतं मला अजूनही मुंबई जितकी आवडते तितकी आवडली नसती.
कधी कधी वेळ मिळाला की मी नील आर्तेचा मुंबई कोलाज वाचते तेव्हा माझ्याही नकळत मी परळच्या त्या चाळीच्या चौथ्या मजल्याच्या समोरच्या बाल्कनीतून खाली वाहणाऱ्या नदीसारखी वाहने पाहत असते. मागच्या दारी उभं राहिलं तर कुठच्यातरी मिलची चिमनी आणि मला वाटतं वरळीच्या आकाशवाणीचा टॉवर दिसायचा. तिथून भन्नाट वारा यायचा. अजूनही येत असेल. गरमीच्या सिझनमध्ये दुपारी दोन्ही दरवाजे उघडे ठेवले की घरात पंखा लावायची गरज नसे.
मावशी घरी असली की दुपारी तिच्या हातचा ताजा भडंग खायला मिळे. त्यांचं घर शाकाहारी असल्यामुळे जेवणात वरण-भात आणि त्यावर घरच्या तुपाची धार. मला तर खूप पूर्वी सकाळी दुधाचं मोठ्ठ घमेलंसदृष्य नळ असणारं भांड खांद्यावर उचलून प्रत्येक घरी जाणारा दूधवाला भैय्या पण आठवतो. नंतर मग त्या एका चार खणाच्या ट्रेसारख्या हातात धरून नेणाऱ्या काचेच्या बाटल्यात दूध मिळू लागलं आणि मग शेवटी प्लॅस्टिकने पूर्ण जगच व्यापलं. तर ते असो. त्यांच्याकडच्या तुपाला खूप छान वास येत असे आणि ते रवाळ असे. तसं तूप मी इतक्यात खाल्लंही नाही.
अर्थात घरचं जेवण, भाज्या इत्यादींची चव त्यांच्या कोल्हापूरकडून येणाऱ्या मसाल्यामुळे वेगळी असावी पण काही वेळा संध्याकाळ झाली की माझी मावसबहीण "चल जरा बाहेर जाऊन येऊ या" असं म्हणून मला बाहेरचं खाऊ घाली. आमच्या घरात हा प्रकार फार रुळला नव्हता. आईला सगळं घरीच खायला द्यायची सवय होती आणि तशीही रस्त्यावर खाणे संस्कृती मी राहत असणाऱ्या भागात फार प्रचलीतही नव्हती.
तसं तर खाली उतरल्यावर उजवीकडे जाऊन सिग्नलला रस्ता ओलांडून परत डावीकडे आल्यावर एक सँडविचवाला मस्त सँडविच बनवीत असे, ते मला आवडत असे. ते किंवा मग आम्ही खाली उतरतानाच वर येणार भेळवाला दिसला की भेळ असं काहीतरी आम्ही खात असू.
पण माझ्या मावसबहिणीच्या मनात जर काही स्पेशल असेल तर मात्र ती यातलं काही करत नसे. आधी आम्ही आंबेडकर रोडवरच थोडं चालत असू. तिथे खाली फुटपाथवरच व्यवसाय करण्याऱ्या मंडळींकडे थोडा टाईमपास अर्थात विंडो शॉपिंग केली जाई. क्वचित मावसबहीण तिच्यासाठी एखादे कानातले रिंग्ज वगैरे काहीबाही घेई सुद्धा. काही वेळा मावशीने काही काम दिलेही असे, जसे वसईवाल्याकडून भाजी घेणे किंवा आणखी पुढे चालत जाऊन शंकराला हार वगैरे वाहणे, तर ते केले जाई आणि मग आमची पावले आंबेडकर पूल जिथे संपतो (की आमच्या बाजूने सुरु होतो) तिथे वळत.
डावीकडे गेले तर गौरीशंकरचं प्रसिद्ध दुकान. पण तिथे न जाता समोर रस्ता ओलांडून पुलाच्या उंचीखाली थोडा झाकल्यासारखा दिसणारा, खरं तर तो काही झाकला वगैरे नसणार माझीच उंची तेव्हा कमी असेल, तर तो किर्तीमहल चा फलक दिसे.
आम्ही दोघी तशा काही अगदी खूपदा तिथे गेलो असे नाही; पण मला आठवतं तोवर मी नेहमीच माझ्या या मावसबहिणीसोबत तिथे गेले आहे. किर्तीमहलला आत गेल्यावर एक वर जायचा जिना आहे. वरचा भाग तेव्हा एअरकंडिशन्ड वगैरे होता का आठवत नाही पण आम्ही खायला वर जात असू.
माझं बाहेर खायचं तेव्हाचं प्रमाण पाहिलं तर मला काय मागवावं हे सहसा सुचत नसे पण तेव्हा मला फार गोड आवडत नसे म्हणून मी बहुतेकवेळा वडासांबार किंवा मसाला डोसा हे घरी आई न करणारे प्रकार घेई. घरी चमच्याने खाणे वगैरे पण सर्रास नसे त्यामुळे ती हौसही इथे खाताना भागे. माझ्या बाबतीत मी डावखुरी असल्याने मला चमच्याने खाताना डावा हात वापरावा लागतो पण नेहमीच हाताने जेवायचं तर मला उजवा हात वापरायला शिकवलं आहे. असो तर डाव्या हाताने खायला मिळालं की मला अजूनही आनंद होतो आणि भूकही चांगली भागते असा अनुभव आहे. तर आम्ही दोघी गप्पा मारत हळूहळू खायचा आनंद घेत असू.
आमच्या या किर्तीमहलच्या मला आठवणाऱ्या भेटींमध्ये जाणवलेली एक गोष्ट म्हणजे ही माझी मावसबहीण नेहमी तिथे दहीवडाच मागवे. दहीवडा कुठल्याही ठिकाणी मागवला की ते त्यांची ती स्टीलची लंबगोलाकार वाटी एका प्लेटमध्ये ठेवून त्याबरोबर टन स्टीलचे चमचे देतात तसंच इथेही देत. तिच्यातला थोडा दहीवडा ती मला चव घ्यायला देई. मी नाही म्हणत नसे पण मला प्रत्येकवेळी ते मिट्ट गोड दही खाताना, ही हा पदार्थ का मागवते असं नेहमी वाटे. मला तेव्हा कधीही दहीवडा आवडला नाही. मला वाटतं ती मला तो कधी तरी आवडेल म्हणून चव घ्यायला देत असावी पण मला इतकं मिट्ट गोड दही खायला आवडेल असं वाटलं नाही. ती आणि मी कधीतरी त्यांची फिल्टर कॉफी शेयर करत असू. (घरी हाही प्रकार तेव्हा दुर्मीळ होता.)
खाऊन झाल्यावर मात्र कुठेही न रेंगाळता घरी जायचं हा आमचा शिरस्ता होता. मला वाटतं ते गोडमिट्ट दही खाऊन तिला झोप येत असावी आणि मलाही दुपारचा इतका मोठा नाश्ता करण्याची सवय नसल्याने अंग जड होत असेल. दहीवडा आणि किर्तीमहल हे समीकरण मात्र माझ्या डोक्यात फिट्ट बसलं आहे. त्यांनंतर कुणाबरोबर खास दहीवडाही खाल्ला नसावा बहुतेक.
मग जेव्हा आम्ही ईस्ट कोस्टवरून नॉर्थवेस्टला येत होतो तेव्हा आमची मैत्रीण विजया हिने जेवायला बोलवलं तेव्हा स्टार्टर म्हणून दहीवडा बनवला होता आणि तिने दही अजिबात गोड केलं नव्हतं. चटण्या आणि वडाही सुंदर चवीचा. मला वाटतं दहीवड्याबद्दल माझ्या मनात जे काही किल्मिष होतं ते तिने त्यादिवशी दूर केलं.
परवा फार दिवसांनी मला स्वतःलाच दहीवडा खावासा वाटला. शंभर पाककृती आणि सतराशे साठ टिपा वाचून मला का कोणास ठाऊक किर्तीमहलचे ते दिवस आठवले. तेव्हा आयता मिळाला असता तर नाक मुरडून झालं वगैरेही विचार करून झाले. पण आता काय स्वतः मेल्याशिवाय आपलं बनवल्याशिवाय कोण देणार?
त्यानिमित्ताने बनवलेला आमच्या घरचा हा दहीवडा आणि या पोस्टमध्ये उल्लेखलेले सगळेच लोकं आता लांब (काहीतर परत न येण्या अंतराइतके लांब) गेले आहेत त्या सर्व प्रसंगांची आठवण म्हणून ही पोस्ट.
#AparnA #FollowMe
No comments:
Post a Comment
मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.