काल माझा बी.एम.एम. संमेलनातला आशाजींचे स्वागत करण्याचा प्रसंग लिहिता लिहिता मनात आले की आता सर्वच आठवणी लिहुन काढुया. एकतर हे आमचे प्रथमच सहभागी झालेले संमेलन आणि त्यातुन आम्ही दोघही त्यात स्वयंसेवक म्हणून कामही केले. त्यामुळे थोडं हळवेपण जास्तच. बघुया जसं आठवेल, जमेल तसं थोडं थोडं लिहिन म्हणते. जर जास्त डोस झाला तर जसा जुलै महिना अमेरिकेत आईस्क्रीम खायचा महिना म्हणून समजला जातो तसा जुलैचा ब्लॉग संमेलना़चा ब्लॉग म्हणून ओळखुया झालं.
तर सुरुवातीला आम्ही ठरवलं होतं की रोज ड्राईव्ह करुन जाउया आणि गाडी फ़िलाडेल्फ़िया सिटीत पार्क करुया. तसं पाहायला गेलं तर अंतर फ़ार फ़ार तर अर्ध्या तासाचं असेल. शिवाय हॉटेलचे नाही म्हटलं तरी साधारण चारशे- साडेचारशे डॉलर्स वाचतील हा हिशोबही होताच. या संमेलनासाठी आशाजी येणार म्हणून त्यांचा एक हिन्दी गाण्यांचा कार्यक्रम २ तारखेला म्हणजे मुख्य संमेलन सुरु व्हायच्या आधी ठेवला होता. आयत्या वेळी स्वयंसेवकांसाठी हा कार्यक्रम विनामुल्य असणार असे जाहीर झाले आणि झालं माझा जीव खालीवर व्हायला लागला.
आधी आम्ही आमचा मुलगा लहान असल्यामुळे ह्या कार्यक्रमाला जायचे नाही असे ठरवले होते. पण चकटफ़ुची पाटी पाहिल्यावर चान्स घेऊया असा विचार साहजिकच मनात आला. शिवाय पुढे संमेलनाचे तीन दिवस आमचा दिवटा काय पराक्रम करेल त्याची रंगीत तालीमही होईल म्हणून जाऊया असे ठरले.
२ तारखेचा कार्यक्रम एकतर वेळेच्या खूपच उशीरा सुरू झाला, आमचा मुलगा गाडीत झोपला पण गाडीतुन स्ट्रोलरवर ठेवेपर्यंत जो ऊठला तो बराच वेळ झोपलाच नाही. शिवाय कार्यक्रमही विशेष रंगला नाही म्हणून शेवटी तिथुन निघालो.
पण तरी घरी येइस्तो जवळ जवळ रात्रीचे साडे-बारा वाजले. मुलाचीही झोप नीट झाली नाही म्हणून इतर वेळी साडे सहालाच पांघरुणात उठणारं कार्ट ऊठलंच नाही. पहिल्या दिवशी सर्वजणी पैठणी नेसणार म्हणून मलाही तयार व्हायला उशीर झाला.
आठला तरी निघु असं रात्री म्हणणारे आम्ही साडे-आठपर्यंत घरीच. नऊ पर्यंत नाश्त्याची वेळ होती. मिळेल असं काही वाटत नव्हतं पण आमची गाडी जरा कुठे ट्रॅफ़िक नसल्यामुळे हायवेवरुन भरधाव जात असताना अचानक समोर दोन्ही बाजुच्या मध्यभागी काही वेळा थोडी जागा सोडलेली असते तिथे गाडी घेऊन टपुन बसलेल्या मामाने त्याची गाडी सटकन आमच्या गाडीच्या पाठी आणली. मी म्हटलं नवर्याला कितीवर चालवत होतास रे. तर म्हणे पंच्याहत्तर. झालं आता मोठं तिकीट मिळणार असं वाटतंय तेवढयात मामासाहेबांनी आमच्यावरुन उडी पुढे मारली आणि समोरच्यासाठी दिवे चालु केले. हुश्श! आमच्या नशीबाने आमच्या समोरचा जास्त जोरात होतं म्हणून कावळा पुढचं मोठं सावज पकडायला उडाला वाटतं.
सुरुवातीचाच अनुभव हा असा. कसंबसं नऊच्या ठोक्याला आमचा स्ट्रोलर आत घेऊन पोहोचले पण अर्थातच न्याहरीची वेळ संपली होती आणि आमची दोघांची लाडकी साबुदाण्याची खिचडी (खास आषाढीचा बेत) आणि दुधी हलवा यांना आम्ही मुकलो. अर्थात थोडंफ़ार वेळेच्या आत येऊनही लोकांच्या भरगोस (की भरपेट) प्रतिसादामुळेही न मिळालेली लोकं होती मग आम्ही आपलं त्यातच समाधान केलं की आपण तसही उशीरा आलो होतो. स्वागतासाठी ठेवलेला पेढा खाउन तोंड गोड केलं आणि मुलाचा स्ट्रोलर घेऊन उरलेल्या दिवसातले कुठले कार्यक्रम हा पाहायला देईल याचा विचार करत राहिले. नवर्याने आपला मोर्चा कधीच कामावर वळवला होता. कारण ते लांबच्या हॉटेलमधुन लोकांना घेऊन येणारी शटलबद्द्ल काही अडचणी असतील तर त्यासाठी हॉटेलला थांबणार होते.
थोड्या वेळाने नवर्याचा फ़ोन आला की बास झाली धावपळ. उरलेल्या दिवसांसाठी मी आपल्याला हॉटेल बुक केलय... तर अशी झाली सुरुवात ३ जुलैची.. उरलेली कहाणी उद्या. आतापुरता एवढेच.
Thode photo hi taka na...
ReplyDeleteश्वेताताई, तुम्हाला लिखाण वाचुन फ़ोटोही पाहावेसे वाटले हे वाचून फ़ार बरं वाटतयं... थोडेफ़ार फ़ोटोही टाकते आता..
ReplyDeleteअभिप्रायाबद्दल धन्यवाद.