Tuesday, March 13, 2012

का नडे???

"तुला त्या कानड्यात काय दिसलं एवढं??" माझा नुकताच ओळख झालेला एक कलिग होता त्याचे हे २००१ मधले उद्गार मला कायम लक्षात राहतात..कारण तेव्हा खरं तर मला स्वतःलाच ते माहित नव्हतं. पण तो आवडला होता...जाम आवडला होता...माझं इंजिनियरिंग संपता संपता माझ्या तिथल्या सगळ्या मित्र-मैत्रीणींनाही हे अगदी तोंडपाठ झालं होतं....की कुठल्याही मॅचबद्दल चर्चा सुरू झाली की जीव जाईस्तो मी त्याची बाजू मांडत राहणार....आणि मुख्य म्हणजे माझं क्रिकेटपेक्षा जास्त प्रेम टेनिसवर आहे हे त्यांना, मला सगळ्यांना माहित होतं तरी क्रिकेटचा विषय आला आणि कुणी भिंत हलत नाही असलं काहीही म्हटलं की मी तिथे हटकणारच.....इथे तर या कलिगला जवळजवळ महिन्याभरातच कळलं (आणि मी त्या कंपनीत महिनाभरच टिकले होते म्हणा) की माझ्या क्रिकेटबद्दलच्या बोलण्यात जास्त नाव राहुलचं येतंय....त्याला कुणी वावगं म्हटलं की अक्षरशः तिळपापड होतो....

त्याच्यात काय आवडलं हे
"हे, हे आणि हे" अशा शब्दात सांगणं तसं आताही अवघडच आहे...त्याने "त्या" वर्ल्डकपमध्ये (आपण घेतला नाही तरी) केलेल्या सर्वाधिक धावा, आपल्या समोरचा फ़लंदाज दिग्गज असो किंवा आताच बॅट धरलेला कुणी दोघांनाही सारख्याच समंजसपणे दिलेली सयंत साथ, संघाला आपल्या मैदानावर असण्याची गरज असण्याच्या क्षणी खेळपट्टीवर घट्ट रोवून ठेवलेले पाय, धावफ़लक हळूहळू हलता ठेवण्याने होणारा पूर्ण संघाचा फ़ायदा यात त्याचं वैयक्तिक नुकसान झालं तरी संघ महत्त्वाचा हे सगळं सगळं त्या "हे, हे आणि हे" मध्ये बसवायचं म्हणजे कठीण आहे........आणि खरं तर कशासाठी ही एक वेगळा दुय्यम प्रश्नच..म्हणजे त्यातून काय सिद्ध व्हायला हवंय..त्याची कारकीर्द जशी मला भावली तशी बाकी कुणाला भावली नसली तरी पटली तर नक्कीच असेल.....शिवाय आता हा प्रश्न जास्त सलतो कारण जिथे तो सगळ्यात जास्त पटतो, भावतो त्या कसोटीतून बाजुला व्हावं हेच पटत नाहीये...सहन होत नाहीये.....

मला नेहमी वाटतं की सचिनची खेळी पाहायला मिळणार्‍या पिढीत मी जन्माला आले हे माझं भाग्य पण त्याहीपेक्षा जास्त अशा प्रखर सूर्याच्या तेजाने झाकोळून न जाता स्वतःचा वेगळा प्रकाश पाडण्याचं सामर्थ्य असणारा एक तारा राहुल द्रविड याला एका बाजुला आपल्या संघाची गडगड सुरू असताना पाय रोवून खेळायला बघायला मिळणार्‍या पिढीतली मी आहे हेही माझं अहोभाग्यच

....आणि हा संयतपणा ज्याज्यावेळी त्याने दाखवला आहे त्याच्याविरोधात बोलणार्‍यांची तोंड गप्प झाली आहेत...फ़क्त त्यांनी ती नेहमी बंद ठेवली नाहीत आणि त्याच्या त्याच संयतपणाचं वेगळ्या अर्थाने भांडवल करायचा प्रयत्न केला. अर्थात त्याने कधी कुठल्या वादात आपलं तोंड घातलं नाही.....कारण तिथंही तो "वॉल"सारखा शांत होता. आपल्या संघाला जेव्हा आपली गरज आहे तेव्हा ती पूर्ण करायचं त्याच्याकडचं कंत्राट त्यानं कधी सोडलं नाही....

राहुल द्रविडबद्दल मी काय लिहिणार??

....मला वाटतं ही पोस्ट कदाचीत त्याच्या जाण्याबद्दल नाहीचेय मुळी....मागच्या पोस्टमधल्या हतबलतेनंतर आपण खरं तर अलिप्तपणा आणू हा जो काही माझा स्वतःचा स्वतःला सांगण्याचा प्रयत्न आहे त्याला लागलेली ही एक ठेच....जाणार्‍या व्यक्तींना सारखं पाहात राहायचा काही प्रकार गेले काही महिने माझ्या बाबतीत होतोय त्याची ही परिसीमा म्हणावी आणि हे सारं क्रमाने माझ्या लक्षात राहावं म्हणून केलेली ही काही नियतीची उपाययोजना असावी........
इथवर ही पोस्ट वाचल्या गेली असेल तर मग हे स्पष्टीकरण थोडं आवश्यक आहे....कारण बाबा मुंबईला परत गेले आणि कितीही उदास व्हायचं नाही असं ठरवलं होतं तरी एक विचित्र उदासीनता आलीच. मग मागच्या पोस्टेतून ते सारं अखेर मांडलं गेलंच..त्यानंतर जवळजवळ लगेचच्याच आठवड्यात इथेच भेटलेली, ब्लॉगवरही जिच्याबद्द्ल बोललं गेलंय ती मैत्रीण साशा तिच्या घरच्यांना भेटायला, त्यांच्याजवळ जायला दूर पार या देशाच्या मध्यबिंदुवर गेली, तिला सोडायला गेलेलो मनाने परतही आलो नसू तितक्यात आणखी एक मुलांच्या निमित्ताने जवळ आलेलं कुटूंबही कामाची जागा बदलल्याने आणखी दुसरा कोपरा धरून तिथं मुव्ह झालं...त्यांना खरं तर जाऊन आता आठवडाच होईल तितक्यात मी ही बातमी वाचतेय..म्हणजे साध्या शब्दात सांगायचं तर काय चाललंय काय? असंच वाटावं...म्हणजे प्रत्येकाच्या जाण्याचा माझ्या वैयक्तिक आणि दैनंदिन आयुष्याशी घनिष्ठ संबंध असायलाच हवा असं नाही पण मनात ते प्रोसेस होताना त्याचे नसलेले संबंध जोडले जातात..उदासीनतेचा पूर दाटून येतो.....
गेले काही दिवस हिवाळ्यानेही थैमान घातलंय...थंडी, सोसाट्याचा वारा, पाऊस आणि अगदी कालपर्यंत रात्रभर आणि दिवसाही पडणारा बर्फ़....आणि या अशा वातावरणाचा परीणाम अर्थातच मुलांच्या तब्येतीवर नाही झाला तर नवलच...पण या सगळ्या मार्‍याशी सामना करत कुठेतरी माझिया मनाला स्वतःला सावरायला हवं..आशेचं पाणी घालून चैत्रपालवी फ़ुलवायला हवी...नाहीतर कुणीही मनाच्या जखमेवर घातलेल्या फ़ुंकरीने बरं वाटायच्या ऐवजी सगळंच
"का नडे?" च्या मोठ्या प्रश्नावर रेंगाळत राहील.....

11 comments:

 1. अपर्णा, द्रविड माझाही आवडता. सचिन टीममध्ये असतानाही स्वतःचा ठसा उमटवू शकणारा म्हणून.
  जवळची माणसं दूर जाणं, त्यातच हिवाळ्याने आलेला उदास भाव - जाणवतंय तुझ्या पोस्टमधून. A piping hot mug of coffee along with favorite book or movie is recommended :)

  ReplyDelete
 2. अपर्णा, द्रविड माझाही आवडता. सचिन टीममध्ये असतानाही स्वतःचा ठसा उमटवू शकणारा म्हणून.
  जवळची माणसं दूर जाणं, त्यातच हिवाळ्याने आलेला उदास भाव - जाणवतंय तुझ्या पोस्टमधून. A piping hot mug of coffee along with favorite book or movie is recommended :)

  ReplyDelete
 3. खरं आहे. आत्ता कसोटीत आपली पहिली विकेट पडली की एक शांत आणि संयमी खेळाडू येऊन गार्ड घेताना दिसणार नाही.

  बाकी मागे तू सचिनच्या घरी जाऊन आल्याची कमेंट माझ्या ब्लॉगपोस्टवर टाकली होतीस नां अगदी तश्शीच कमेंट आज मला करायला मिळते आहे...

  बंगलोरला महाराष्ट्र मंडळाचा कार्यकर्ता असल्यामुळे ३-४ वेळा द्रविडच्या आई वडिलांना भेटण्याचे आणि त्यांच्याशी बोलण्याचे भाग्य मला लाभले आहे बरे :D

  ReplyDelete
 4. राहुल द्रविडकडे पाहिल्यावर क्रिकेट सभ्य गृहस्थांचा खेळ आहे हे पटतं. यानंतर कदाचित इतकं सभ्य कोणीच नसेल क्रिकेटमध्ये. फार वाईट वाटतंय आता कसोटी पाहताना द्रविड नसेल. :(

  ReplyDelete
 5. पोस्ट आवडली अपर्णा! राहुलबद्दल आणि एकूणच जे मत मांडलंय त्याच्याशी १००% सहमत!:)

  ReplyDelete
 6. गौरी, आभार्स ग...दोन गोष्टींसाठी....कॉफ़ीची आठवण करून दिल्याबद्द्ल कारण टीवान्यानंतर (आणि पावसामुळे) सारखं टी टी टी सुरू होतं त्यात तुझ्या कमेंटमुळे घरात कॉफ़ीपण आहे (आणि कॉफ़ीमेकर) त्यामुळे त्यांनाही जरा कामाला लावलं...आणि अगं तुला कसं कळलं की मागे केव्हातरी अशाच विंटरी वातावरणात एक सिनेमाची पोस्ट अर्धी पडून होती..आता पूर्ण करून टाकतेय....सो बिंगो...:)

  ReplyDelete
 7. सिद्धार्थ, तू काय मी ही पोस्ट टाकेपर्यंत दबा धरून बसला होतास जणू...आम्ही काय रे फ़कस्त जुनं घर (मालक आणि पालकाविना) पाहून आलोय..पण बाब्बा तुमची तर पार त्याच्या घरच्यापर्यंत वट आहे..काय नाय आता म्होरल्या वक्ताला तिकडे आम्हाला पण घेऊन चल...आता वाटतं तू बंगळुरात होतात तोवर एकदा आलो असतो तर हे दर्शनही झालं असतं...मला काही सिलेक्टेड सेलेब्रेटिजना प्रत्यक्षात भेटायला/बोलायला आवडेल त्यात सचिन, द्रविड तर आहेतच...नशीबाने आशाताई आणि नाना (हो आपला पाटेकरांचा) यांच्याशी इथे भेटून झालंय हे त्यातल्या त्यात जमेचं...आणि हे मी तुला यावेळी (पण) जळवायला नाही लिहित आहे..असंच आठवलं म्हणून....

  ReplyDelete
 8. इंद्रधनू, प्रतिक्रियेबद्दल अत्यंत आभारी....क्रिकेटमधलं एक अति सभ्य व्यक्तिमत्वच आहे हे....आणि इथून पुढे त्याचा वारस कोण देव जाणे...

  ReplyDelete
 9. विनायकजी, खूप खूप आभार....

  ReplyDelete
 10. राहुल, सचिनसारखे लोक निव्वळ सेलिब्रिटी नसून त्यांना आपल्या रोजच्या आयुष्यात किती महत्वाचं स्थान आहे हे शेवटच्या २-३ परिच्छेदांवरून कळतंय !!

  ReplyDelete
 11. खरंय नं रे हेरंब...ही लोकं जर आपल्या आयुष्यात अशा प्रकारे आली नसती तर कसं कळलं असतं आपल्याला की संयम, शिस्त आणि नम्रपणा काय ते?? नाहीतर आजुबाजुचे काही उथळ पाण्याला खळखळाट प्रकारचे लोक कार्यालयात आणि इकडे तिकडे पाहून आपलीच डोकी फ़िरली असती....
  आभार्स एकदम सगळ्या पोस्ट्स वेळ काढून वाचल्याबद्दल....:)

  ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.