आठवणींच्या ब्लॉगवर जर आठवणीच काढल्या नाहीत तर काय होतं तसंच थोडंसं गेले काही महिने झालं होतं...म्हणजे जे काही सांगायला हवं ते थोड्याफ़ार प्रमाणात लिहायला लागलेय पण तरी लेखणी अर्धी म्यान असल्यासारखी....मग त्या दिवशी मैत्रेयीच्या वॉलवर तिच्या हाताने लिहिलेला एक शेर एक मुलगी पक्षी हातातून सोडतेय अशा चित्राबरोबर दिसला..तो शेर होता.....
चल दे देती हूं आजादी
जिसे बांध को रखा था
दिल ने बरसों से
अब वो भी कर सकेगा आवारगी!
तिच्या त्या पोस्टला कमेंट देताना आपसूकपणे तिचीच एक आवडती गझल लगेच आठवली आणि मग अर्ध्या म्यान लेखणीला बाहेर काढायची आठवण आली....येस्स....गाणी.....माझ्याबरोबर गाणी नसती तर मला वाटतं मी कधीच हरवून गेले असते...
विशेष करून उत्तर अमेरीकेतल्या सहा महिन्यापेक्षा कमी-अधीक काळ असणार्या थंडीत....कारण किती नाही म्हटलं तरी ते वातावरण खूप जास्त मानसिक परीणाम करणं..एकवेळ कुणी आपल्याला काही बरं-वाईट बोललं तर ते विसरणं शक्य असतं पण हिवाळी, मळभी वातावरणावर निदान माझ्यासाठी तरी गाण्याशिवाय इलाज नाही....
अशाच एका थंडीत माझी ओळख मैत्रेयीबरोबर झाली....तिचं माझं नातं गुरू-शिष्येचं...माझ्या पेन्सिलव्हेनियातल्या वास्तव्यात माझ्यासाठी घडलेली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे एका घरगुती गणपती उत्सवात नरेंद्र चिरमुले यां एका अत्यंत गुणी तबलावादकाची ओळख होणं आणि मग त्यांनी माझ्यासाठी मैत्त्रेयीकडे पुन्हा गाणं शिकवायची विनंती करणं. म्हणजे बरीच वर्षे तिने आपलं घर-मुलं यासाठी गाणी शिकवणं सोडलं होतं. अर्थात गाण्याचे लोकल कार्यक्रम ती तेव्हाही करायची पण शिकवायचं थांबवलं होतं.
माझी तिची फ़ोनवरची भेट म्हणजे माझा मी करून दिलेला परिचय...खरं तर तिने काही न विचारता (आणि फ़ी पण न सांगता) तू ये मग जर आपल्या दोघींना जमत असेल तर हे करून पाहू अशा अर्थीचं बोलणं होतं. आता त्याआधीची माझी स्वतःची गानपार्श्वभूमी अशी काहीच नव्हती. निव्वळ गाणं ऐकायला आवडतं...हिंदुस्थानी क्लासिकल ऐकते थोडंफ़ार पण कळत काहीच नाही. तिला हे मी अगदी स्वच्छ शब्दात तिला सांगितलं आणि "सा रे ग म" पासून आमची शिकवणी सुरू झाली. तिला गुरूवार जमत होता म्हणून मग त्यादिवशी ऑफ़िसवरून घरी आलं की साडे सात ते साडे आठ अशी वेळ आम्ही ठेवली होती. साधारण दीड वर्षे म्हणजे आरुषचे पोटातले साडे-आठ महिने पूर्ण होईपर्यंत मी तिच्याकडे प्रत्येक आठवड्याला जात होते. त्यानंतर अर्थात आरुषचा जन्म झाल्यानंतर ते थांबलं आणि मग पुन्हा सुरू करायचा विचारही करायच्या आत अठरा महिन्यांच्या आरूषला घेऊन आम्ही पार ३००० मैल लांब आलो.
असो...तर हे नमनाचं तेल संपल्यावर गाण्याकडे वळायला हवं. मला वाटतं २००७ च्या हिवाळ्यात, मी आणि वंदना म्हणून आणखी एक विद्यार्थिनी माझ्याच बरोबर शिकायला यायची, आम्ही दोघी बरेचदा मैत्रेयीला नॉन क्लासिकलही म्हणायला लावायचो. आम्हाला शिकवताना तिला ऐकायची संधी सोडायची नाही असं आमचं न बोलता ठरलंच होतं जणू..आणि अशाच एका दिवशी स्वतः रचलेली आणि कंपोज केलेली एक गजल मैत्रेयीने आम्हाला ऐकवली.
इस विराने देस में न दिल लगे मेरा
रात है लंबी कब होगा सबेरा....
ही गजल पूर्ण ऐकली तेव्हा आमच्या दोघींच्या अंगावर काटा आला. आम्ही तिला ती पुन्हा गायला सांगितलं आणि तिच्या संमतीने ते रेकॉर्डही करून घेतलं..
आपण आपला देश सोडतो आणि अगदी देशातल्या देशातही दुसर्या प्रांतात जास्त काळासाठी जातो तेव्हा कधी ना कधी अशा लंबी रातेंचा सामना आपण केला असेलच ना? त्यात उत्तर अमेरीकेत तर हिवाळ्यात एकदा का घड्याळ मागे झालं की रात्री खर्या अर्थानेही मोठ्याच होतात. मी तेव्हा निरागसपणे मैत्रेयीला विचारलंही होतं, "क्या आपने ये गजल विंटर में लिखी है?" यावरचं तिचं प्रसन्न हसू मला आजही आठवतंय..
इस विराने देस में न दिल लगे मेरा
रात है लंबी कब होगा सबेरा....
ना कोई चहलपहल
बस कांच के महल
जाने क्यों जमा दिया मैंने यहां डेरा
रात है लंबी कब होगा सबेरा
ना लगे अपनापन
सब अपनी धून में मगन
जाने क्यों समझ बैठी
इस देस को मेरा........
इस विराने देस में न दिल लगे मेरा
रात है लंबी कब होगा सबेरा....
वरचे शब्द वाचले आणि तिच्या आवाजातलं गाणं ऐकलं की मला वाटत नाही आणखी काही सांगायची गरजही लागणार आहे.....आपापल्या सोयीने आपल्या एकटेपणाला हे गाणं सोबत करू शकतं आणि त्यासाठी परदेशातच असायला हवं असंही नाही आहे....आपले प्रश्न हे फ़क्त आपले असतात. या अवस्थेतून जेव्हा आपण जातो तेव्हा कदाचित आपणही यातल्या निदान दुसर्या कडव्याशी नक्की सहमत होऊ शकतो....
गेले कित्येक दिवस गाण्यांच्या आठवणी लिहीणं मी थांबवलं आहे..याचा अर्थ गाणी मनात वाजायची थांबली होती असा नाही पण लिहायचा तो मूड येत नव्हता. पण सगळ्यात वरच्या प्रसंगात म्हटल्याप्रमाणे मैत्रेयीशी तो संवाद सुरू झाला आणि गाणी सोडून अनेक विषयांवर आम्ही बोललो. त्याच बोलण्यांत मग मी तिच्याकडे हे गाणं ब्लॉगवर टाकायची परवानगी मागितली..तिने ती लगेच दिलीच आणि गाणंही लगेच उपलब्ध करून दिलं. मी तिच्याबरोबर नुस्त्या पेटीवर ऐकलेल्या गाण्यापेक्षा हे गाणं वेगळा परीणाम करतं..तिचा कसलेला आवाज आणि गाण्यातली समज मी तिची शिष्या म्हणून समजवण्याची माझीच पात्रता नाहीये..खरं तर मला आज हिंदुस्थानी क्लासिकल ऐकायची जी काही समज आली त्यात तिचाच वाटा आहे हे म्हणणं जास्त समर्पक आहे....पण आज या पाडव्याला, या ब्लॉगच्या वाढदिवशी, मला माझ्याच गुरूला माझ्या ब्लॉगवाचकांसमोर सादर करायला मिळणं यापेक्षा आनंद तो काय??
आयुष्यातल्या वेगवेगळ्या वळणांवर अत्यंत गुणी आणि मोठ्या उंचीवर जाऊनही ज्यांचे दोन्ही पाय खंबीरपणे जमिनीवर आहेत अशा अनेक व्यक्तींबरोबर मला प्रत्यक्ष शिकायची संधी मिळाली हे माझं भाग्य आहे. मैत्रेयीचं स्थान त्या दृष्टीने माझ्यासाठी खूप मोठं आहे....आम्ही फ़क्त गुरू-शिष्या अशा कधीच नव्हतो..तिच्या घरगुती कार्यक्रमात तिनं माझी, "ही माझी पहिली शिष्या" म्हणून ओळख करून देणं माझ्यासाठी खूप मोठं आहे........
अजूनही मला जर परत पेन्सिलव्हेनियाला जायला मिळालं तर माझ्या स्वतःच्या घरासाठी जितकं जायला आवडेल तितकंच पुन्हा एकदा माझं गाणं सुरू करायला मैत्रेयीच्या घराची घंटी वाजवायलाही मला नक्की आवडेल...तो सुदिन येणार का माहित नाहीए पण आज हा पाडवा गोड करताना
May I take this pleasure to introduce my teacher, my guru, the best person I met who opened the big doors not just to Hindustani Classical music but help me take little steps in other aspects of day to day life mentoring me even now to take care of myself whenever I felt lonely in the other coast of US of A......
Ladies and gentlemen please put your hands together for Maitrayee Patel....:)
वरती तो व्हिडीओ आहे तिथे "इस विराने" नक्की ऐका आणि टाळ्यांचा प्रतिसाद मैत्रेयीपर्यंत जाऊद्या...:)
ब्लोग वाचतानाच विचार करत होतो कि गझल ऐकवाल का अशी विनंती करूया... पण संपता संपता खाली video ची लिंक मिळाली... अप्रतिम!!!!!!!!!! :)
ReplyDeleteमज्जा आली वाचून आणि ऐकून सुद्धा!!!
निळ्या छत्री साठी आभार पोचवायला आलो होतो आणि एकदम मस्त धमाल असा हा पोस्त भेटला... धन्यवाद :)
अपर्णा, माझी अतिशय आवडती गझल आहे ही. खूप छान वाटलं ऐकून. :) धन्सं!
ReplyDeletekay chaan mhantalay, Kharach khup sundar...shabdach nahit dusare...aani ha thandicha tras sahan kelyavar tar jara jastich bhidali kavita...tu bhagyavan aahes, itki chaan guru-cum-maitrin tula milali tyabaddal. lekh changala zalay.
ReplyDeleteशब्द आणि गायन दोन्ही अप्रतिम आहे. आभार ओळ्ख करून दिल्याबद्दल :-)
ReplyDeleteगजल पो(टो)चली ! मी तर जगतोय ही गजल सध्या.. त्यामुळे अधिकच.
ReplyDeletesundar lilays! ghazal sudha chan mhatliy hi chan. Very good.
ReplyDeleteमस्त... :-)
ReplyDeleteसुंदरच! व्हिडीओसाठी आभार गं. आवाज आणि शब्द दोन्ही प्रभावी.
ReplyDeleteमैत्रीयीच्या साईटची लिंक चालत नाहीये.
अहाहाहा... सहीच !!!
ReplyDeleteसंतोष, आभार....गझल मला मैत्रेयीने दिली आणि तिचा तिच्या साईटवरचा फ़ोटो टाकुन व्हिडिओ बनवला...
ReplyDeleteश्री ताई, तुझा काहीतरी गोंधळ झाला आहे किंवा तू घाईत वाचलं/ऐकलं असशील...कारण ही गझल तिने तरी यु ट्युब किंवा कुठे टाकली नाहीये..कदाचित याच अर्थाची दुसरी कुठली गझल असेल....असो..भाव महत्त्वाचा..तुला आवडली नं?? भा.पो....:)
ReplyDeleteमेघा मला वाटतं याआधीही तू एका गाण्यांचा आठवणींवर या ब्लॉगवर कमेंट दिली होतीस...त्यामुळे पुन्हा तुला इथलं गाणं आवडलं याचा आनंद झाला..आणि पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे माझ्यासाठी हे गाणं खास आहे....आणि खरंय गं एवढा हिवाळ्याचा त्रास काढल्यावर असं एखादं ताजं गाणं हवंच ना....येत जा...:)
ReplyDeleteआणि अगं मी खरंच जाते तिथे एखादी तरी चांगली मित्र-मैत्रीण मिळवते....बरं असतं नं आपल्यालाही त्यांच्या सहवासाचा आनंद असतो...and its mutual always so I am glad about it..Thanks again...
सविता आभार आणि शब्द खरंच अप्रतिमच आहेत....
ReplyDeleteहेरंब अरे माझ्या लक्षात आलं नव्हतं बघ..पण बघ हिवाळा आला नाही आणि जास्त अंधारलं नाही तर उन्हाळ्याची आणि प्रकाशाची जाणीव/गरज आपल्याला कशी होणार असं समज...हेही दिवस जातील..पुढच्या वेळी मी खास तुझ्यासाठी एक छान गाणं नक्की घेऊन येईन...खरं म्हणशील तर थंडी पावसाचा मलाही कंटाळाच आलाय आता....
ReplyDeleteअपूर्व, आभार...मैत्रेयीचा आवाज माझ्या आई-बाबांनाही फ़ार आवडतो..ते इथे होते तेव्हा दोन महिने सतत माझ्याबरोबर यायचे आणि तिनेही घरच्यासारखं त्यांना समोर बसवून माझी शिकवणी सुरू ठेवली...हे वर लिहायचं राहिलंच...बरं झालं आठवण झाली....
ReplyDeleteमैथिली आभार...तू व्हायोलिन कधी काढतेस सांग....मला ऐकायचंय...:)
ReplyDeleteकांचन आभार..अगं बरं झालं लिहिलंस...ब्लॉगरने ती लिंक टाकताना आधी स्वतःची पण लिंक टाकली होती..आता चालतेय...बघ पुन्हा वेळ मिळेल तेव्हा...
ReplyDeleteसुहास आभार....आजकाल ब्लॉगवर जास्त नसतोस का???
ReplyDeleteसुंदर लेख आणि सुरेख गझल. पुन्हा पुन्हा ऎकली. मैत्रेयीची अजुन गाणी असतील तर ऎकायला आवडतील.
ReplyDeleteलवकरच तुझ्या आवाजातलंही एखादं गाणं ऎकायला मिळेल अशी अपेक्षा. :-)
आभार दिपक....
ReplyDeleteखरंय पुन्हा पुन्हा ऐकण्यासारखीच गझल आहे न?? मैत्रेयीने मला शिकवताना गायलेल्या बंदिशी, आलापी माझ्याकडे आहेत..तिच्या साईटवर पण तिचं मला वाटतं गुजरातीमधलं काम आहे....
आणि माझा आवाज?? हे कुठून आलं मध्येच...पोस्टमध्ये बघ मला शास्त्रीय संगीत ऐकायला शिकायचं होतं हा मूळ उद्देश होता या शिकवणीचा पण जर तुझी फ़र्माईश आहे तर तू कधी भेटणार ते सांग....:)
मागच्यावेळी तर काहीच संपर्क झाला नव्हता.....