Friday, November 27, 2009

घर पाहावं सोडून

"घर पाहावं बांधून" ह्या म्हणीचा कर्ता करविता नक्कीच बाबा आदमच्या काळातला असणार कारण त्याच्यावर बहुधा फ़क्त एकदा घर बांधुन झाल्यावर सोडण्याची वेळ कधीच आली नसणार.आपल्या इथल्या जवळजवळ सर्व शहरांतले जागांचे वाढते भाव पाहाता घर पाहवं बांधुन म्हणणं या काळात किती बरोबर आहे देव आणि कदाचित बिल्डर्स जाणे पण तसंही असलं तरी मी तर म्हणेन तुम्ही मारे घर कितीही चांगलं घ्याल नाहीतर बांधाल पण बच्चु एकदा का गाशा गुंडाळायची वेळ आली की ते प्रोजेक्ट शंभर टक्के यशस्वी करायचं म्हणजे येरागबाळ्याचं काम नव्हे.


मी मुंबईत असेपर्यंत तरी अशी नोकरीसाठी पटापटा शहरं बदलणारी वृत्ती नव्हती पण इथे अमेरिकेत मला वाटतं काही काही लोकांना तर दर तीनेक वर्षांनी घरं नाही बदलली तर चैन पडत नाही.तरी आता एकंदरित रियल इस्टेट थंड असल्यामुळे मालकीची घरं बदलायचं थोडं कमी झालंय पण भाड्याच्या जागांचं काय?? त्या बदलायचं अजुन तसंच आहे. असो. तर मुद्दा हा नाही आहे. प्रश्न आहे तो एकदा घर मग ते स्वतःचं असो भाड्याचं, बदलायचं ठरवलं तर इथुन गाशा गुंडाळा आणि नव्या जागी परत गाशा सोडा हे एका वाक्यात सोपं वाटणारं प्रकरण आपल्याला कुठल्या दिव्यातुन जावं लागणार आहे ते खरं म्हणजे दिव्य पार पडल्यावरचं कळतं.


घर सोडायच्या व्यापाची मोजणीच करायची असेल तर गणिती भाषेत वर्षांच्या समप्रमाणात करावी. नाही कळलं?? म्हणजे जितकी जास्त वर्षं तुम्ही एका वास्तुत राहिलात त्यावरुन आता किती मोठं खटलं मागं लागणार ते समजुन घ्यावं. मुहुर्ताचा नारळ जर तुम्ही घरातल्या सर्व वस्तुंची एकदा यादी उर्फ़ इन्व्हेंटरी करून करणार असाल तर सावधान! आपण महाभारत युद्ध भाग १ सुरु करतोय याची पूर्ण कल्पना असुद्या. अहो म्हणजे माहित आहे इथे दरवर्षी थॅंक्स-गिव्हिंग आणि त्याची चुलत-मावस-सावत्र इ.इ.भावंडं असणार्या सेलच्या नावाखाली आपण कायच्या काय शॉपिंग करत सुटतो पण आता इन-मीन-तीनच्या कुटुंबात स्वयंपाकघरात असू दे, लागतं, म्हणून प्रत्येक वस्तुंची तीन-चार व्हर्जन्स असतील तर बायकोचं काही खरं नाही. तीन-तीन डिनर सेट घरात आणि त्यातला एक तर स्वयंपाकघरातल्या सगळ्यात उंच जागी ठेवला गेल्यामुळे जवळजवळ कधीच न वापरला गेलेला? ही पास्ता प्लॅटर खरं म्हणजे पीठ मळायला चांगली पडेल असं म्हणून घेतलेली चक्क स्वयंपाकघर सोडून दुसरर्याच खोलीतल्या कपाटात तिच्या ओरिजीनल पॅकिंग सहित?? असा नवर्याच्या हल्ला होणार याची पुर्वकल्पना असेल तर बायकांनो आधीच त्याच्या कपड्याच्या ढिगार्यातुन लेबलं पण न काढलेले कपडे त्याला दाखवायला विसरु नका आणि मुख्य म्हणजे त्याच्या जिमच्या न वापरलेल्या वस्तु दाखवायच्या ऐवजी फ़क्त त्याच्या ढेरीकडे बोट दाखवा न बोलता प्रतिहल्ला यशस्वी होईल. आमच्याकडे तर स्वयंपाकघरातही वस्तु वाढवण्यात नवरोबांनीही सढळ हस्ते मदत केलीयं. कुठेही शेफ़ नाईफ़ दिसले की त्याच्यातला कसाई जागा होतो. मोजले तर कांदा-टॉमेटोपासुन मासे-मटण प्रत्येक वस्तू वेगवेगळ्या सुरीने कापता येईल की काय असं मला नेहमी वाटतं आणि कधीही माझं कापताना बोटाला लागलं तर तू चुकीची सुरी घेतलीस असा माझ्यावर नेहमी हल्ला होतो. हां तर सांगायचं म्हणजे घर बदलायला किती अवकाश आहे त्यावर हे हल्ले प्रतिहल्ले किती काळ चालु द्यायचे हे पाहायचं. नाहीतर माझ्यासारखी भडकू असेल तर "जा मग ओत पैसा बाहेर आणि बघ तुझं तुच. मला खूप काम आहेत" असं सांगुन तहाच्या बोलणीचा मार्गपण बंद करुन टाकला की बिचारा नवरा. खरंच बिचारे नवरे, बायकोने असं काही सांगितलं की नक्की काय वाटतं त्यांना देवजाणे पण आता अशा केसमध्ये यांच्या मदतीला आल्यासारखं करून कामं नंतर वाढवणार्या लोकांनाच इथं मुव्हर्स म्हटलं जातं असं मला वाटतं.


तर तात्पर्य, जर मोठं घर आणि जास्त वर्ष हे कॉंबिनेशन असेल तर मात्र प्रोफ़ेशनल मुव्हर्स हेच तुमचं महाभारतापेक्षा मोठं होऊ शकेल असं युद्ध थांबवु शकतील. म्हणजे थोडक्यात काय तर तुमची इज्जत तुम्ही काढण्यापेक्षा त्यांना वर भरमसाट पैसे देऊन त्यांनी नको त्या वस्तु नेऊन, हव्या त्या ठेवुन गेले की आपण महाभारत युद्ध भाग २ करायला मोकळे..आणि फ़ार लांब जात असाल तर गाडीलाही विसरू नका. तिलाही शिपच केलेलं बरं पडतं. त्यामुळे त्याची तजवीज आधी करायला हवी. हे काम त्यामानानं कमी वेळखाऊ आहे कारण गाडीचे डिटेल्स आपल्याला इंटरनेट वर देऊन मग तुलनेने परवडणार्याबरोबर एक दिवस पक्क करता येतो. आणि मुख्य म्हणजे तो बदलणंही जास्त खटपटीचं नाही. पण घरातल्या सामानाचं तसं नाही. मुव्हिंग करणार्या कंपन्या शक्यतो आपला माणूस पाठवुन आपलं सामान पाहुन त्याचं साधारण वजन किती होईल त्याप्रमाणे किती खर्च येईल याचा अंदाज देतात. काही काही कंपन्या तेही इंटरनेटवर करतात पण त्यात फ़सवणूकीचा संभव जास्त. म्हणून असे अनेक अंदाज घेऊन त्यातल्या एकाबरोबर आपलं मुव्हिंग पक्कं करणे या गोष्टीसाठीसुद्धा आपला बराच वेळ जाणार आहे हे खूपदा लक्षात येत नाही त्यामुळे जायचा दिवस दोनेक आठवड्यावर आला तरी हे झालं नाही तर भाग दोन युद्धाला आधीच तोंड फ़ुटतं हेही लक्षात असूद्या.

युद्ध भाग दोन आधी सुरू झाल्यामुळे आता खूप गोष्टी नवरा-बायको कुठल्या मुद्यावरून गुद्यावर य़ेणार नाही त्यावर अवलंबुन असतात. मग पॅकिंग त्यांना द्यायचं, आपण करायचं की थोडं त्यांनी थोडं आपण हा यक्षप्रश्न उभा राहतो. नेहमीप्रमाणे नवरोबांना तू कशाला त्रास करतेस (किंवा मग त्याला मदत करायला लागणार त्याने आपण कशाला त्रास घ्या हा खरा अर्थ) आपण त्यांनाच सांगु की, असं म्हटलं की आपण काही करण्यात तसाही अर्थ नसतो. त्यातून घरात लहान मूल असेल तर मग वेळही मिळणं कठीण. आता वाट पाहाणं फ़क्त त्या दिवसाची.


ही इथली मुव्हर्स लोकं तशी खरंच प्रोफ़ेशनल असतात. पण दिलेल्या सुचनांच तंतोतंत पालन करणारी. एकदम संगणकाला मागे टाकतील. किचनमधलं सर्व असं जर तुम्ही म्हटलं तर तिथे तुम्ही स्वतःसाठी ठेवलेला ब्रेड, त्याच्या बाजुला दुसरं कसलं वेश्टन टाकायचं राहिलंय, पडलं असेल ते सगळं सगळं घेतील. त्यामुळे त्यांच्या पाठी गृहमंत्रीण उभी तर कारभारी बेडरुममधल्या सुचना देऊन खाली इतर राहिलेली जुजबी कामं जसं हौसेने घेतलेल्या मोठ्या स्र्किनवाल्या टि.व्ही.ची पिलावळ साउन्ड सिस्टिम, डिव्हीडि प्लेअर, रेकॉर्डर हे सर्व मोकळं करणे याच्या मागे. मध्येच आठवतं अरे आपली अमुक-तमुक बॅग काही महत्वाची कागदपत्र असल्याने आपल्याबरोबर ठेवलीच पाहिजेत. ती शोधायला वर जावं तर त्यांनी तिथे डोनेट करायला काढलेल्या कपडे इ. च्या बॅगेलाही मुव्हिंगच्या सामानात कोंबलंय. नशिब पाहिलं असं म्हणत आता त्यांनी बिघडवलेलं काम मुकाट्याने आपणचं करतो. त्याने निदान नसत्या गोष्टींच्या वजनाचा भुर्दंडतरी पडणार नाही. दोष खरं तर मुव्हर्सचा नसतोच. कारभार्यांनी काय सांगितलंय त्यावर पण असतं. आणि या कामगारांना फ़क्त होयबा नायबा कळणार. आपण आपल्या न आवरलेल्या पसार्यांतून त्यांना हे हवं आणि ते नको सांगायचं आणि त्यांनी ते लक्षात ठेवायचं म्हणजे जरा अतिच..असो.

दोनेक तासांत आम्ही करू सांगणार्यांना आपली पसरलेली घर आवरून बंद करून ठेवायला पाच-सहा तास पुरतात आणि आपण हुश्श करून जमिनीवर (अहो फ़र्निचर नेलं ना त्यांनी) टेकतो आणि म्हणतो झालं बाबा. पण हे दोन मिनिटांचं हुश्श असतं. आता उरलेलं घर आवरायला उठलं की अरे हा आरसा का नेला त्यांनी?? हा तर इथेच ठेवायचा होता. अरे बाथरुममधलं काहीच नेलं नाही वाटतं. अशा सु(?)संवादांनी घर भरून जातं. युध्द भाग दोन पुढे न्यायचे त्राण खरं संपले असतात केवळ म्हणून आपण झालं गेलं गंगेला मिळालं म्हणतो आणि काही जास्त महत्वाच्या गोष्टी नव्या पत्यावर सरळ पोस्ट करतो. उरलेल्या काही वस्तु चांगल्या असल्याने मग जवळ राहणा-या मित्र-मैत्रीणींना पटवून त्यांना देऊन टाकतो.



इतकं सामान त्यांनी नेलं तरी घर अजुन पुरतं रिकामं झालेलं नसतंच त्यामुळे आता कचरा टाकण्याचा एक जंगी कार्यक्रम पुढच्या एखाद्या दिवसासाठी जाहिर करावाच लागतो आणि आपली उरली-सुरली कुलंगडी बाहेर येतात. आता यापुढे असं अनावश्यक सामान कधी घेणार नाही असं आपण आपल्याला म्हणत राहतो. आणि मोठमोठे बॉक्सेस रिसायकलींग, डोनेशन भरून घराबाहेर त्यांचीच रांग लागते. घर मोठं असेल तर चकाचक करायचं काम फ़क्त कामवालीच करू शकते यावर माझा एकशे एक टक्के विश्वास आहे. तिथे पाच-पंधरा डॉलर्स जास्त घेतले तरी मला अजिबात वाईट वाटत नाही.


असो हा फ़क्त ट्रेलर आहे. आता जेव्हा ही लोकं तुमचं सामान पोचतं करतील त्यावेळची कामं तुमची तुम्हालाच करायची आहेत. मुव्हिंगच्या कंपन्या जशा पैशापासरी दिसतात तशा अनपॅकिंग असिस्टन्स नावाने काहीही दिसत नाही. यात काय ते समजायचं. तेव्हा खरी लढाई तो आगे है...सामान यायची वाट पाहातानाच नव्या रिकामी घरात बसून ही पोस्ट लिहितेय आणि मनातल्या मनात म्हणते "घर पाहावं सोडून"....


ता. क. यातले सर्व फोटो नवीन रिकाम्या घराचे आहेत.

24 comments:

  1. अपर्णा मला माझे दिवस आठवले. ३००० स्क्वे.फूटाचे घर आवरताना जे काय सूर्य-चंद्र-तारे-काजवे दिसलेत.....तरिही मला आवडते.:)
    बाकी घर पाहावे सोडून हेच आजकाल जास्त म्हणायला हवेय. मस्त गं.

    ReplyDelete
  2. धन्यवाद भाग्यश्रीताई. नव्या अपार्टमेन्टचे फोटो कसे वाटले?

    ReplyDelete
  3. अपर्णाबाई: वर्णन वाचून मजा आली. अज़ून एक गोष्ट तुम्ही विसरलात, म्हणजे प्रवासाआधी तब्येतीवर यामुळे पडणारा ताण. तसा त्रास तुम्हाला नसेल तर स्वतःला नशीबवान समज़ा. दोन महिन्यांपूर्वी माझा एक मित्र अमेरिका सोडून भारतात गेला. आवराआवर करून बिचारा थकला. इतरांनी त्याला सांगितलं की या सगळ्यात कमी झोप, घसा बसणे या गोष्टी टाळ, एरवी चिडचिड्या प्रकृतीत प्रवास करावा लागेल, आणि प्रवासातही ओझी बाळगावीच लागतात. शिवाय त्याची एक मुलगी अगदीच ४-५ महिन्यांची होती, आणि ती एक वेगळी ज़बाबदारी होती.

    मित्राच्या घरचा तो सगळा पसारा तुमचा लेख वाचून डोळ्यांपुढे आला.

    ReplyDelete
  4. धनंजय काका, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. तब्येतीबद्दल लिहायचं राहिलंच. आमच्याबाबतीत कोस्ट टु कोस्ट असल्यामुळे पोचल्यावर जेट लॅग जाणवतोय; पण मेहनतीचं काम मुव्हर्सनी केल्यामुळे जास्त दगदग जाणवली नाही. शिवाय आम्ही सामान गेल्यावर दोन दिवसांनी निघालो, त्यामुळे थोडी विश्रांती मिळाली.

    ReplyDelete
  5. इथे तसं सोपं आहे. एकदा पॅकर्स आणि मुव्हर्स ला कॉंट्रॅक्ट दिलं की अगदी पॅकिंग पासुन अनपॅकिंग, आणि सांगितलेल्या जागी सामान लाउन देण्यापर्यंत तेच करतात.
    घर छान दिसतंय. सामान पोहोचलं की नाही अजुन?

    ReplyDelete
  6. महेंद्रकाका सामान पंधरा दिवसांनी येईल आज फक्त गाडी आली. बरं आहे नं, आपल्याकडे सगळी सोय आहे ते?.

    ReplyDelete
  7. लिखाण नेहमीप्रमाणे झकास ... आणि घर तर मस्तच ... सामान आलं आणि घर सजवल की परत एकदा फोटो काढा त्याच जागांचे आणि ब्लॉग वर टाका ... बघायला मस्त वाटतील... :)

    ReplyDelete
  8. नवे घर मस्त आहे...आरूष बागडत असेल ना आता तिथे!!! मला या घर बदलण्याच्या प्रकाराची जाम सवय झालीये गं आता....मी तुला सांगितलेच ना आमचे आठ वर्षात आठ घरं बदलून झालीत!!!! त्यातही ईशान लहान असतानाच चार/पाच घरे बदलली.....बरं भारतात सामान आपणच भरायचं गं आणि वाहू ही लागायचं बरेचदा...इथे मस्कतला आल्यावर जेव्हा पॅकर्सनी सगळं केलं तेव्हा चुकल्यासारखे वाटले गं.....
    बाकी नवे घर आणि पोस्ट मस्त आहे!!!!

    ReplyDelete
  9. धन्यवाद रोहन. कुठे गायब आहेस?? सामान आल्यावर परत फोटो नक्की लावेन. Before and After सारख पाहायला मजा येईल.

    ReplyDelete
  10. तन्वी, आमची ही सहावी वेळ. फक्त पहिल्या पाच पहिल्या तीन वर्षांत! त्यामुळे हा अनुभव लिहीला गेला आणि यावेळी कोस्ट टू कोस्ट म्हणून व्याप जास्त.
    आरुषचं म्हणशील तर त्याला रान मोकळं. त्यामुळे तो घरातच उंडारतोय. सामान लागेपर्यंत पकडापकडी हा एकच खेळ खेळणार बहुधा :)

    ReplyDelete
  11. अपर्णा (ताई?)सुट्टीवर होतो ना मुंबईला... शिवाय घरी थोड़े प्रॉब्लम होते म्हणुन गायब होतो... आता आलोय परत कामावर आणि लिखाण सुद्धा सुरू केलय. फोटोंची वाट बघतोय ... :)

    ReplyDelete
  12. रोहन, तू मला अपर्णाच म्हण बाबा. तेच बरंय. मुंबईत जाऊन आलास म्हणजे बराच ताजातवाना झाला असशील अशी अपेक्षा आहे. एकदा सामान, फ़र्निचर इ.इ. लागलं की नक्की फ़ोटो टाकते.

    ReplyDelete
  13. नव घर अप्रतिम आहे. आणखी काही फोटोंच्या प्रतीक्षेत आहे. समान पोहोचला कि अवश्य टाका बर का.

    ReplyDelete
  14. स्वागत रविंद्रजी आणि आभार. सामानाचीच वाट पाहतोय. सगळं लागलं की फ़ोटो नक्की टाकेन....

    ReplyDelete
  15. mast aahe tuze navin ghar aani post sudha .......... :)

    ReplyDelete
  16. धन्यवाद (अश्विनी???)!!!

    ReplyDelete
  17. अपर्णा,
    घर मस्तच आहे. आवरताना काय उपद्व्याप करावे लागतात हे मी आत्ताच अनुभवलंय. चार वर्षात दोनदा घर बदलले. कालच ह्यांना व लेकाला एक बंगला आवडला. मी मात्र पुन्हा हादरले, पण दोन वर्षात लेकाची दहावी आहे हा माझा प्रतिहल्ला यशस्वी झाला. सामान लागले की पुन्हा पोस्ट टाक.

    ReplyDelete
  18. धन्यवाद अनुजाताई.

    ReplyDelete
  19. = olekhles mala vatale me nav lihile asel :) -ashwini

    bagh tuze anonymous la olkhanya che skill mast develope zale :)

    ReplyDelete
  20. हा हा हा....अगं मी अनामिकांचं अक्षर ओळखते....:) कशी आहेस?? सध्या तिथे आठ-आठ पानांचे ascent येतात म्हणजे चिंता नसेल...

    ReplyDelete
  21. me majet sadhya tari thik suru aahe ofc madhe aaj ch take over che confirm letter aaale baghu aata pudhe kay hote te ............

    -ash

    ReplyDelete
  22. अश्विनी बरं आहे ना एक चिंता मिटली म्हणायची...Good luck.

    ReplyDelete
  23. छान आहे लेख. बर्‍याच वेळाने एक हलकाफुलका, खुसखुशीत लेख आला. याआधीचे बरेच लेख हे ललित, प्रसंगवर्णन किंवा आठवणी या क्याटेगरीत मोडणारे होते. त्यामुळे हा लेख मला जास्त आवडला. तू विनोदी लेखांची फ्रिक्वेन्सी जरा वाढवलीस तर माझ्यासारख्या Happy-go-lucky (पक्षी: उडाणटप्पू आणि रिकामटेकड्या.. ;-) ) वाचकांची सोय होईल.

    ReplyDelete
  24. संकेत, अगदी खर सांगायचं म्हणजे मला विनोदी लिहिणं फार जमत नाही..म्हणजे मी खूप सिरीयस व्यक्ती आहे असही नाही पण एखादा विनोदी प्रसंग असेल तरी मी सांगताना तो तितकासा रंगत नाही अस मलाच वाटत...पण अधून मधून प्रयत्न करते...साधारण विनोदी लेख असले की वाचक/प्रतिक्रिया जास्त असतात हे मी पण पहिले आहे पण त्यासाठी ओढून ताणून काही करता येण्यासारखं नाही....
    तुला असे लेख अधून मधून या ब्लॉग वर मिळतील पण इथे बऱ्याचदा आपण इतके जुन्या आठवणीत जातो की मग पोस्ट तशा जास्त येतात.....

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.