Sunday, December 13, 2009

सखी शेजारीण

नवीन जागा ती पण परदेशात असली की शेजारी नसणार हे जवळजवळ गृहित धरलं होतं. कसंबसं एका जागी बस्तान बसवुन चार-दोन डोकी ओळखीची झाली होती तोवर घरंच बदललं...त्यामुळे नव्या जागी आल्याच्या दुसर्याच संध्याकाळी दारावर टकटक ऐकुन मी नवर्याला म्हटलं, "अरे, जरा हळू धाव आरूषबरोबर.बघ, खालच्या माळ्यावर राहणारे वरती आले वाटतं." नवर्याने दार उघडलं. मी किचनमध्ये फ़ोडणी देता देता मनाची तयारी करत होते; मुलाच्या दाणदाण धावण्याची काय काय कारणं द्यायची, माफ़ीनामा इ.इ. पण हे काय? दारातला आवाज चक्क "हाय मी साशा. तुमच्या खालच्या माळ्यावरच राहाते. काल मी पाहिलं तुम्हाला ये-जा करताना आणि मी आज पम्पकिन मफ़िन्स बनवले तेव्हा म्हटलं ओळखही होईल आणि काही हवं नको विचारताही येईल."(अर्थात इंग्रजीत) मी अक्षरश: तीन-ताड उडाले. आतापर्यंत अमेरिकन शेजार्यांनी माझ्या कुठच्याही अपार्टमेन्टमध्ये येऊन ओळख-बिळख केलेली कधी आठवत नाही. फ़क्त जेव्हा आम्ही घर घेतलं तेव्हाच काय त्या अशा शेजार्यांशी ओळखी. मग आता इतकं प्रेमाने आलेल्या व्यक्तीला भेटलं तर पाहिजे म्हणून मीही लगेच गॅस आईकडे सोपवुन तिला नमस्कार करायला दारात आले.


तर ही आमची इथली पहिली सखी शेजारीण "साशा".आणि आम्ही आल्या आल्या झालेली आमची पहिलीवहिली तिनेच खास प्रयत्न करून घेतलेली भेट. ती गेली तीन वर्ष या भागात राहाते. गेले तीन महिन्यांपासुन नोकरी गेल्याने तिच्या रुमपार्टनरबरोबर इंशुरन्सचा अभ्यास करुन नवी नोकरी/व्यवसायाच्या मागे असलेली. "जिम आणि मी फ़क्त एकत्र राहातो. No romantic relations" असं खास आवर्जुन स्वतःच सांगितलं. मग आपलं नेहमीचं संभाषण कुठून आलो, काय करतोय इ.इ. माझ्या याआधी झालेल्या ओळखी झालेल्या काही इतर अमेरिकन्स प्रमाणे आमची सर्वांची, अगदी आता काही आठवडेच इथे असणार्या माझ्या आईचंसुद्धा नाव लिहुन घेतली.
तशी थोडी थंडी इथंही आहे, त्यामुळे आम्हाला ब्लॅंकेट्स, कर्म्फ़रटर्स हवी आहेत का? मुलासाठी काही माहिती हवी आहे का? स्वयंपाकघरात काही भांडी-कुंडी लागणारेत का? एक-ना दोन हजारो मदतीचे हात एकदमच पुढे करणारी. आपल्या इथे साधना कट म्हणतात ना तसे केस पण थोडे तिरके वळवलेले, साधारण पाच फ़ुट चार इंचापर्यंत उंची, गोरी गोरी पान, निसर्गंत: लालसर गाल, तिच्या घरात असणार्या मांजरासारखेच घारे डोळे आणि अतिशय प्रेमळ मुलायम आवाज अशी "साशा". तिने आणलेले मफ़िन्स खरंच छान होते अगदी तिच्या आवाजासारखे मुलायम. अरे हो आणि त्याच्यावर तिने तिची रेसिपीसुद्धा प्लॅस्टिकच्या पिशवीत लिहुन ठेवली होती. किती अभिनव असतात ना काही माणसं? भारतीय माणसांबद्द्ल तिला थोडं आकर्षण असणार असं एकंदरित बोलण्यातुन वाटत होतं.मी म्हटलं तिला नंतर सगळं सामान आलं की एकदा चहाला ये. तिचा मदतीचा आग्रह जरा जास्तच होता म्हणून मी फ़क्त तिला विचारलं इथुन लायब्ररीत जायलासुद्धा बस आहे का?
त्यानंतर आमच्याशी थोडावेळ इतरही काही विषयांवर ती बोलली. तिला म्हटलं मी की आई आता काही आठवडेच राहिल तर अगदी आवर्जुन म्हणाली की मग तुम्ही तिला पॅसिफ़िक दाखवायला नक्की घेऊन जा आणि तिथे खूप वारं असतं म्हणून आईच्या कानात घालायला कापुस न्यायला विसरू नका. आणखी काही इथल्या हवामान विषयक टिपा देऊन आणि थोड्या जुजबी गप्पा संपवुन ती गेली. माझ्या आईला फ़ारच बरं वाटलं की मला एकतरी संपर्क करू शकणारी शेजारीण आहे. माझ्या आधीच्या घरून निघताना तिला नव्या जागेबद्द्ल सगळ्यात जास्त काळजी हीच होती बहुतेक.
थोड्याच वेळात दारावर पुन्हा टकटक. अतितत्परतेने लगेच मला हवी ती बसची माहिती काढुन आणली पण तिने. आता मला जरा काळजीच वाटायला लागली कारण माहित नाही हा मदतीचा अतिरेक न ठरो असंही वाटून गेलं. शिवाय एक-दोन भेटीतच जास्त सलगीत आलेल्या माणसांबद्द्ल मला सगळ्यात प्रथम तर भितीच वाटते. न जाणो आपल्याला ही आपुलकी जबरदस्ती न होवो.
आधीच सामान अजून आलं नाही अशा अपुरया स्वयंपाकघरात रविवारी झटपट कांदेपोहे केले तेव्हा उगाच साशाची आठवण झाली.तसंही तिच्या त्या पम्पकिन मफ़िनच्या रिकाम्या डिशमध्ये काय द्यावं हा प्रश्न होताच.आणि त्यातुन आदल्या रात्री आणलेला उरलेला पिझ्झा गरम करायला ओव्हनचा ट्रेपण नव्हता. चला नाहीतरी ती इतकं म्हणून गेलीय तर घेऊया तिची मदत अशा दुहेरी तिहेरी हेतुने गेले कांदेपोहे आणि बाजुला थोडं फ़रसाण घालुन. दाराबाहेर मला पाहुन लगेच माझा हात प्रेमाने दाबुन ती मला घरात घेऊन गेली आणि तिचा दिवाणखाना आतुन पाहिल्यावर मी थक्कच झाले. घरी टि.व्ही. नाही हे तिनं तसंही पहिल्या भेटीत सांगितलंच होतं.( माझ्या नवरयाला त्यामुळे पडलेला प्रश्न म्हणजे आता हिच्या घरचं फ़र्निचर कुठच्या दिशेकडे पाहिल...असो) तर अगदी आटोपशीर पण छान इंटेरिअर केलं होतं.
फ़ायरप्लेसच्या वरच्या भागात बरोबर तिथं असणार्या भागाच्या आकाराची मोठी फ़्रेम आणि समोर एकच तीन माणसं बसु शकतील असा सोफ़ा. मधल्या उरल्या जागेत मोठा रग. मोठ्ठा शब्द्पण कमी पडेल असा. जरा आडवा वाटेल असा. मला तो भारतीय वाटला पण लगेच मी काही विचारलं नाही. आणि सगळ्यात वेगळं म्हणजे आडव्या समोरासमोरच्या भितींना टेकवुन ठेवलेल्या चक्क "कायाक" म्हणजे त्या एक किंवा दोन माणसंच पाय लांब करून बसू शकतील अशा होड्या. लांबच्या लांब दिवाणखान्याला शोभतील अशा. एकावर एक तीन एका बाजुला आणि दुसरया बाजुला दोन. मी काही विचारायच्या आतच ती म्हणाली "आवडल्या ना? मीच बनवल्यात." बापरे. आता तोंडात बोट घालण्याचीच पाळी होती. मग बेडरूममध्ये त्यांची सुबक वल्ही बनवली होती तीही दाखवली. लगेच आणखी एका बोटीचा फ़ोटोही दाखवला; आपण स्पीडबोट म्हणतो ना तशी. ही तिला आता विकायची आहे कारण ठेवणं परवडत नाही.
मग बोलता बोलता तिनेच सांगितलं की अशीच एकदा समुद्रावर असताना कायाक सरळ करताना की काय तिच्या पाठीचा कणा, गळा असं सर्व ताणलं गेलं आणि त्यामुळे तिची मोठी गळ्याची सर्जरी झाली. त्याचा मोठा व्रण पाहून मला जरा गलबलंच. आणि या सगळ्यात वाईट म्हणजे हे सर्व तिचा नवरा सहन करू शकला नाही; म्हणून त्यांचा घटस्फ़ोट झाला. जेव्हा आधाराची सगळ्यात जास्त गरज होती तेव्हाच तो गेला. त्याला घरातलं सगळं फ़र्निचर हवं होतं आणि तिला तसंही कमी सामान चाललं असतं म्हणून मग तेव्हापासून ती एकटी आहे.आणि कधीतरी हा जिम तिच्या अपार्टमेन्टमध्ये रूममेट म्हणून आला असावा. त्याच्याशीही तिने माझी ओळख करून दिली. थोडासा पायाचा प्रॉब्लेम असल्याने लंगडणारा असला तरी तो खूप मदतशील आहे अशी तिची टिपणी होती.
मला फ़क्त तिला पोहे देऊन, माझ्यासाठी ट्रे घेऊन यायचं होतं आणि तरी बराच वेळ गेला. वरती मुलाची आन्हिकं आटपायची होती. तिचा निरोप घेईस्तोवर बरंच काही तिला बोलायचं होतं असं वाटत होतं. मला तिने तिची सर्व पुस्तक, ती योगाभ्यास करते हे दाखवलं आणि मुख्य म्हणजे तिचं जे मांजर आहे, खरं म्हणजे बोका, तो खरं तर तिच्या सर्जरी नंतर तिला सोबती म्हणून कसा आला आहे अशा बर्याच गोष्टी सांगितल्या. तिला मध्येच आजारपण वर आलं की दिसेनासं होतं आणि ते या बोक्याला कळतं मग तो तिला नमस्काराची पोझ घेऊन आणि हातावर हात ठेवुन आधार देतो. एकीकडे मला तिच्याबद्द्ल नक्कीच काहीतरी वाटत होतं पण तरी या लोकांची आयुष्य वेगळी आणि अति गुंतागुंतीची असतात हे पुन्हा एकदा कळत होतं.
मग मागच्याच रविवारी आमचं सामान आलं आणि मुव्हर्स ते वरती आणू लागले तशी पुन्हा एकदा दारावर टकटक. अरे साशा?? हे काम चालु आहे तर मी तुमच्या बाळाला माझ्या घरात घेऊन जाऊ का म्हणजे तो मध्येमध्ये न आल्यामुळे तुमचं पटापट होईल. मी आईला आणि आरूषला त्यांच्याकडे थोडावेळासाठी पाठवलं. मला खरंच आश्चर्य वाटलं की फ़ारशी ओळख नसलेल्या आमचा इतका विचार करणारंही कुणीतरी आहे.
आतापर्यंतची सगळी घरं आणि तिथली वास्तव्यं वेगवेगळ्या कारणांसाठी लक्षात राहिलीत पण इथल्या वास्तव्यात सगळ्यात जास्त लक्षात राहिल ती आमची सखी शेजारीण आणि तिनं दाखवलेली आपुलकी यासाठी असं सध्यातरी वाटतंय...

13 comments:

  1. मस्त अनुभव !! अगदी भारतातल्या शेजारर्यान सारखं वाटल असेल ना? आमच्या याआधीच्या apartment मध्ये पण अशीच एक शेजारीण होती.. चाळीशीच्या आसपासची. एकटी रहायची. पण एकटी राहते असं ना म्हणता नेहमी म्हणायची कि "I live with my two dogs." .. तिला भारतीय लोक , इंडिअन फूड वगैरे जाम आवडायचं. खूप आणि खूप छान गप्पा मारायची नेहमी माझ्याशी आणि माझ्या बायकोशी. आम्ही तिला बर्याचदा पाव भाजी, बटाटे वाडे असं काही काही द्यायचो. असो माझ पुरण संपत नाहीये. मस्त झालाय लेख.. अगदी आमच्या "रेचल" ची आठवण आली.

    ReplyDelete
  2. अपर्णा चला तुला आता मस्त सखी शेजारीण मिळाली.:)छोट्याछोट्या मदतीचीही गरज असते गं अशावेळी. तुझ्या लिहीण्य़ावरून वाटत नाही अतिरेक गळेपडू असेल.तेव्हां Enjoy...:)मलाही अगदी पहिल्या नेबरची-केट व जॊनची फार आठवण आली. भारी गोड प्रकरण होते ते आणि त्यांचे दोन कुत्रे व चार मांजरी.
    पोस्ट सहीच.

    ReplyDelete
  3. अगदी खरंय हेरंब..मला एकदम भारतातल्या शेजारच्यांसारखं वाटलं आणि जास्त जेव्हा ती मुलाला थोडा वेळ घेऊन जाऊ का म्हणाली...
    इथे असं कुणी मिळणं दुर्मिळच..आम्ही नशीबवान म्हणायचो..नाहीतर ही इथली लोकं कुत्र्या-मांजरांपाठी जास्त. आमच्या लायब्ररीत read to the dogs म्हणून एक कार्यक्रम पण आहे पण त्यावर फ़िर कभी....

    ReplyDelete
  4. भाग्यश्रीताई, तू म्हणतेस ते खरंय..गळेपडू नसणार फ़क्त मी मुळचीच भित्री आहे या बाबतीत कारण मग नंतरचा त्रास स्वतःला होतो ना..असो..उगाच भरकटत नाही....आणि तू म्हणतेस तेही बरोबर आहे छोट्या छोट्या मदतीसाठी कुणी ना कुणीतरी लागतंच गं..आता माझ्या ब्लॉगर मित्र-मैत्रीणीची काळजी मिटली असेल की नव्या जागी माझं कसं व्हायचं....:)

    ReplyDelete
  5. sahi boss congrats milali ek chan maitrin ... :) -Ashwini

    ReplyDelete
  6. अभिनंदन नव्या जागी इतकी चांगली शेजारीण मिळाल्याबद्दल...

    ReplyDelete
  7. धन्यवाद अश्विनी आणि देवेन्द्र...:)

    ReplyDelete
  8. चला तर नवी मैत्रीण मिळाली....मस्त दिसतेय गं तुझी ही मैत्रीण!!! तिला विचारून फोटू टाक नंतर तिचाही आणि तिने बनवलेल्या कायाक चाही...तू जे वर्णन केलेस ते पहाता ती नाही म्हणायची नाही....आणि आरुषला आवर्जून मावशी म्हणायला सांग..(हे होते माझे फुकट सल्ले!!!)
    आता ’तिच्या घरातलं फर्निचर कुठल्या दिशेला पाहिल...’या प्रश्नाचं गांभिर्य मला समजू शकतं!!!(हीहीही!!तुझ्या नवऱ्याला दुजोरा.....)
    आणि एक महत्वाचं ’स’ पासून नावं सुरू होणारी लोक तुझी मैत्रीण पटकन होतील कारण तू ’अ’पासून आहेस...ह्ये म्हणज्ये आमचं वेयक्तिक रेसर्चचं शोद हायं बरं का!!!!!

    ReplyDelete
  9. चला तुला चांगली शेजारीण आणि मैत्रीण मिळाली. बाकी अमेरिकन लोक हे भारी प्रोफेशनल असतात असा माझा समज आहे, पण तुझा अनुभव ए॑कुन समजाच गैरसमजात रुपांतर होऊ पाहतंय. आपलेही भारतीय पदार्थ त्यांना खाऊ घालत चल. बाकी त्या लोकांना पनीर टिक्का मसाला आणि फोडणीची डाल आवडते असं ए॑कुन आहे. अनुभव बाकी छान...

    -अजय

    ReplyDelete
  10. अजय, अरे मला तर अजुनही वाटतं नातेसंबंधांच्या बाबतीत ही लोकं जास्त प्रोफ़ेशनल असतात. म्हणजे परका हा परकाच..म्हणून खरंतर मला तिचं आश्र्चर्य वाटलं. अरे आपण कसं शेजार्याला सहज दिवाळीचं ताट देतो तसं इथं कुणी शेजार्याने ख्रिसमसचा केक दिल्याचं स्मरणात नाही..असो.
    पण भारतीय जेवण म्हणशील तर ते या लोकांना आवडतं. ऑफ़िसमधल्या अनुभवांवरुन साधारण नान, तंदुरी चिकन, गुलाबजाम आणि तसंही इथे बाहेरचं भारतीय जेवण कमीच तिखट असतं त्यामुळे पालक पनीर इ. आवडणारे लोक आहेत...तू आवर्जुन लिहिलंस म्हणून बरं वाटलं..

    ReplyDelete
  11. तुझ्या शेजारणीला पोस्ट मधील थोडे तरी इंग्लिश मध्ये भाषांतर करून वाचून दाखव. तिला ही आवडेल की भारतीय शेजार धर्म मानतात. तुमची मैत्री अजून वाढेल. तिने तिच्या काही गोष्टी प्रांजळ पणे तुला सांगितल्या ह्यावरून तू पण तिच्या समस्यांचे गांभीर्य नक्कीच कमी करशील कारण ती
    पण तेव्हढीच सुदैवी आहे, तुझ्या सारखी छान मैत्रीण तिला लाभली. फक्त भानस ने सांगितलेले पण महत्वाचे आहे हे नक्की........

    ReplyDelete
  12. तन्वी, अजयच्या आधी नंबर लावुन पण मला तुझी प्रतिक्रिया दिसलीच नाही. तर त्याबद्द्ल पहिल्यांदी माझी सॉरी...:)
    अगं आणि काय टेलिपथी आहे तुझे फ़ुकटचे सल्ले म्हणजे सगळं मी आधी विचार केलेलंच आहे फ़क्त मला तिला हे ब्लॉग, फ़ोटो असं विचारणं आगाऊपणा वाटला असता असं वाटुन मी फ़क्त दोन आठवड्यानंतर तिच्यावर लिहिलं...बाकी काय तुमचं रिसर्चचं संशोधन चालु राहु देत..आवडलं...:)

    ReplyDelete
  13. अनुजाताई, प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद. आपल्या सुचना नक्की लक्षात ठेवेन. मला रूळायला अम्मळ वेळ लागतो तेव्हा पाहुया हळुहळु कसं जमतंय ते....

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.