Monday, April 23, 2012

दोन ओंडक्याची होते जर्सीमध्ये भेट.....


खरं तर अशा प्रकारची पोस्ट या ब्लॉगवर साधारण दोन वर्षांपुर्वीच्या जुलैमध्येच येणार होती...म्हणजे यायला काहीच हरकत नव्हती..पण ओंडका क्रमांक एक किंवा खरं तर ओंडकी उर्फ़ माझिया मनातली "मी" हिने अति डोकं लावून विमानाचं तिकिट काढताना गोंधळ केल्याने काही केल्याने ओंडका क्रमांक दोन उर्फ़ वटवट सत्यवान याला प्रोजेक्टरुपी लाटेने च्यामारीकेच्या दुसर्‍या किनारपट्टीवर वेगळं ठेवलं..
यावेळी मात्र ओंडकीला आधीच पुर्वीच्या चुका न करण्याची अक्कल आल्याने (वाचा...लेसन्स लर्न्डच्या कृपेने...) आधी उल्लेखलेले हे दोन ओंडके मागच्या आठवड्यात एकदाचे जर्सीतल्या एका शांत कुटिरेत भेटले.....शांत कुटीर उर्फ़ सत्यवानाचं घर हा या (अघोषित) मेळाव्याचा मुख्य पंडाल होता हे आता लक्षात आलं असेलंच.....
या दोन परिच्छेदात अशा प्रकारे ही पोस्ट या ठिकाणी खरं तर संपली आहे... पण प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या असंख्य अलिखित नियमाप्रमाणे थोडी फ़ार असंबद्ध बडबड केल्याशिवाय किंवा थोडक्यात त्या आधी म्हटलेल्या शांत कुटिरेचं रुपांतर हास्यकल्लोळ, तू हे कर तरच मी हे करेन या आणि अशा असंख्य कलकलाटाने भरल्याशिवाय ही पोस्ट कशी पूर्ण होणार???
मागे काही दिवसांपूर्वी वटवटच्या फ़ेबुवर (मी फ़ेबुवर नाही आहे हो...फ़ेस आला तोंडाला माझ्या त्यांची प्रायव्हसी सार्वजनिक करण्याची पद्धत पाहून..असो तर..) हां तर त्या वटवटच्या फ़ेबुवर गाजलेल्या एका फ़ोटोमुळे घडलेल्या एका छोट्याशा मेळाव्याचा हा मोठा वृत्तांत....वॉर्न करायचं काम केलंय नंतर पोस्ट संपत नाही वगैरे किंवा पुन्हा एकदा मनातलंच इ.इ. छाप प्रतिक्रियांचं मूल्य शून्य असेल हा (आगाऊ) इशारा...:)
तर झालं असं किंवा खरं तर झालं काहीच नाही माझं एक हापिसचं काम नेमकंच पूर्व किनारपट्टीच्या जवळ निघालं..आणि मी फ़क्त त्याच्यात माझ्यासाठी शनिवारचा एक दिवस मागितला (नंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे शुक्रवारही मागावा लागला ही वेगळी बाब पण वरिजिनल प्लानमध्ये माझ्याकडे फ़क्त शनिवार होता) सुदैवाने नव्या यॉर्कातलं विमानतळ कामासाठी वापरावं लागत असल्याने मी यावेळी हॉटेलमध्ये न राहता नव्या जर्सीतल्या एका शांत कुटीरेची निवड केली...(म्हंजे काय आहेच माझी साधी राहणी आणि साधेच विचार) आता ह्याच शांत कुटीरमध्ये राहणारा ब्लॉग ओळखीमुळे आता चांगली गट्टी जमलेला हेरंब उर्फ़ वट्टू (आता ओंडका म्हणायचा मोह होतच नाहीये कारण गप्पाची भट्टी चांगलीच जमल्यामुळे आमची गट्टी जमलीय नं...) याने माझं हे असं आगाऊपणे त्याच्या (आता अशांत केलेल्या) कुटीरेमध्ये येणं खिलाडूपणे स्विकारून मध्यरातीला माझ्यासारख्या सभ्य मुलीला नवीन यॉर्कातल्य कुणी त्रास देऊ नये म्हणून खास जातीने हजर राहून माझ्यातला सुजाण ड्रायव्हर जागा केला...(होय कंपनीने भाड्याने दिलेल्या गाडीला ड्राइव्ह करून शांत कुटिरकडे न्यायचं पवित्र कार्य मीच पार पाडलंय आणि यावर दोन शब्द येताहेतच...)
अरे हे काय...नाही नाही काही नाही तर मेळाव्याचं पहिलं पुष्प गुंफ़ायला सगळ्यात महत्वाची मदत केली ती विमानतळातल्या एअर ट्रेनने बंद पडून...त्यामुळे अर्थातच आमच्या आनंदावर विरजण पडायचं काहीच कारण नव्हतं म्हणा..कारण ती भर आम्ही तिथेच उपलब्ध असलेल्या बस सर्व्हिसवर आमचा भार टाकून लगेच भरुन काढली....:) आणि हो तो वर म्हटलेला ऐतिहासिक फ़ेबु फ़ोटोने (इथून पुढे ऐतिहासिक हा शब्द बर्‍याच उल्लेखांमध्ये अध्याहृत असेल हे चा वांच्या ध्यानात आलं असेलच) तर त्यादिवशीच्या फ़ेबुवर तर बॉंबच फ़ुटला..."हे काय नवीन आता?" "हा मेळावा कधी झाला आता?" या आणि इतर प्रश्नांनी वट्टुच्या फ़ेबुला फ़ेस आला.....त्यामुळे अर्थातच ही पोस्ट लिहायची जबाबदारी त्याने माझ्यावर टाकली...( आणि हेच नाही बर्‍याच जबाबदार्‍या त्याने माझ्यावर टाकल्या....मी त्यातल्या किती कशा पेलल्या ते त्याला हवं तर तो लिहील आणि नाही लिहिलं तर इथे वट्टूची वट वाढवायची संधी मी सोडणार नाही हे तुझ्या ध्यान्यात आलं असेलच नं सत्यवाना...)
तर आता त्याने मला इतकं प्रेमाने आणि मध्यरात्रीही एकही जांभई न देता (आणि हातात फ़ुले-बिले अस्लं काही आणून ते सांभाळायचा त्रास मला न देता) विमानतळावर रिसिव्ह केलं याबदल्यात मीही त्याला माझ्या कामासाठी घेतलेल्या गाडीने (चक्क) नवीन यॉर्कातले रस्ते, एव्हेन्यु न चुकवता, एकही भोंग्याची देवाणघेवाण न करता आणि सगळ्यात मुख्य एन वाय पि डीवाल्यांना न पिडता वाहतुकीचे नियम काटेकोर पाळीत इप्सित स्थळी म्हणजे शांत कुटीरेमध्ये घेऊन गेले...इथे खरं तर तांत्रिक दृष्ट्या कामाचा दिवस सुरु व्हायला काहीच तास शिल्लक राहिल्याने आम्ही विश्राम करून मेळाव्याचा विचार नंतर करायला हवा होता पण काही (किंवा खर तर बर्‍याच बाबतीत) आमचं लाइक माइंड असल्याने विश्रामाचा विचार बाजुला ठेवून आम्ही सरळ चर्चेला सुरूवात केली..चर्चांचे विषय महत्वाचे नव्हते कारण ते सारखेच बदलत होते.
मॅगी बस दो मिनिट....खाने और पकाने के लिए....:)
प्रत्येक छोट्या मोठ्या मेळाव्यांमधला जिव्हाळ्याचा विषय म्हणजे दीडिखा आय मीन खादाडी यावर मात्र एक छोटा वाद निर्माण झाला...(म्हणजे थोडक्यात नॉर्मल मेळाव्यासारखंच) तर झालं असं सत्यवानाने काय खाणार असा प्रश्न विचारल्यावर जनाची नाही तरी मनाची लाज बाळगून नको रे वगैरे करून माझिया मनाला खास सत्यवान स्पेशल मॅगीचे वडे खायची इच्छा झाली आणि त्यात माझी फ़क्त दोन मिन्टात बनलेलं मॅगी देऊन ती धुडकावण्यात आली...अर्थात सुदाम्याचे पोहे खाऊन वाढलेल्या संस्कृतीतले आम्ही दोघं असल्याने हा वाद मॅगी लगेच संपवून (आणि भांडी घासायची जबाबदारी सत्यवानाकडेच देण्यात येऊन) आम्ही पुन्हा एकदा चर्चा सुरू केल्या...आणि पुन्हा तेच आधी म्हटल्याप्रमाणे वातावरणावरून सुरू झालेल्या या चर्चा विविध वळणांनी फ़क्त हास्याचे फ़वारे, लोल्स आणि मंडळींना आवाहन इ.इ. रुपी फ़ोडण्या पडत पुढे सरकत संपायचं नावच घेत नव्हत्या.....
पण अखेरीस घड्याळाचा काटा फ़ारच पुढे गेल्याने आम्ही साधारण तीनेक तासाच्या विश्रामाचा ठराव मंजुर करून पहिले सत्र (अक्षरश: वेळेअभावी) आटोपते घेतले..
आता दोन दिवस माझ्या कामाचे असल्याने त्याविषयावर ब्लॉगवर लिहिण्यात काहीच पॉइंट नाहीये पण झलक म्हणून हा नकाशा पाहिलात तर कामही किती अटीतटीचे झाले हे लक्षात येईल..(इथे मी दोन दिवसांत पाच राज्यांचा दौरा करुन एक नवाच उच्चांक प्रस्थापित केला हे काही सुजलेल्या मनगटाने लिहायचं नाहीये मला पण लिहिताना ते ओघानेच आलं आहे याची पुन्हा एकदा सु.वा. नोंद करतीलच.)
हा माझा छोटासा प्रवास कामाचा आणि गाडी परत देण्यापर्यंतचा...
तर (एकदाचं काम आटोपून) पुन्हा परत येताना आधीचा विमानतळाचा अनुभव लक्षात घेऊन भाड्याची गाडी परत द्यायचं ठिकाण आम्ही बदललं होतं...नशीबाने शांत कुटीरेपासून ते खरं तर तीनच मैलावर होतं. पण पाच राज्य जितकी लवकर कव्हर करता आली त्याच्या ऐवजी या तीन मैलापैकी शेवटचे तीनशे यार्ड कव्हर करताना आली...म्हणजे इतकं विक्रमी वेळेत येऊनही अखेर हेची फ़ळ इ.इ. विचार माझिया मनात येणार तोच वटवट्याने कुणालाही रस्ता न विचारायचा (जगातल्य यच्चयावत पुरूष जमातीचा) नियम मोडीत काढून चक्क रस्त्यातल्या पोलीसाची मदत घेतली...आणि त्याने अर्थातच आम्हाला चुकवले नाही हे इथे नोंदवायला हवं....इथेही मर्फ़ीबाबा आले का असा अभद्र विचार डोक्यातून काढून टाकून मी तर सरळ मनातल्या मनात मेळाव्याचे दुसरे पुष्प गुंफ़ायला सुरूवातही केली..
आणि या पुष्पाचं संपूर्ण श्रेय शांत कुटीरमालक सत्यवानाला जातंय. कारण माझ्या लाडक्या नवीन यॉर्कात एका शुक्रवारच्या संध्याकाळी हे पुष्प गुंफ़ायची कल्पना फ़क्त त्यालाच सुचू शकते...
सत्यवान म्हणे पोळीपेक्षा
फ़मिलिया
 पिझा भारी
हे शहर आधीच्या एका पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे मला माझ्या मुंबईची याद देते त्यामुळे इथे जायला मी तसंही कधीही तयार असतेच इथे तर मेळाव्याचा प्रश्न होता..आता मागे हटणे नाही..तिथल्या (नेहमीच्याच) वार्‍यांना न जुमानता आम्ही आमची पदयात्रा जारी ठेवली...आणि त्याचबरोबर काही मार्मिक गोष्टींवर आपल्या टिपण्ण्या करून माझं मनोरंजन करायची संधी सत्यवानाने सोडली नाही...जास्त गर्दीच्या ठिकाणी मोठ्याने हसायची संधी मी नेहमीच साधून घेते....टाइम्स स्क्वेअरला ती मी पुरेपुर साधली हे आता पुन्हा सांगायला नको.....:)
गार्लिक नॉट्स...यम्म्म
आता प्रश्न होता तो म्हणजे पोटपुजेचा...माझी लाडकी पोळी त्याच्या घरी करून द्यायचा माझा लाडीक हट्ट सत्यवान काही पुरवणार नाही हे माहित होते (खरं तर म्हणूनच मी ती ऑफ़र त्याला प्रत्येक पुष्पाच्या ब्रेकमध्ये दिली होती हे आता मेळावा संपून दुसरा आठवडा उजाडल्याने सांगायला हरकत नाय) तर खायच्या बाबतीतले सगळे हक्क मी आधीच वट्टुला दिले असल्याने त्याने त्याची चांगलीच वट असलेल्या मध्ये मला सगळ्यात ब्येस्ट पिझा म्हणजे फ़मिलिया या जगप्रसिद्ध दुकानात पिझा खायला नेलं..तिथेच गार्लिक नॉट या खाद्यपदार्थाशी त्याने माझा परिचय करुन दिला त्यामुळे नंतर रात्रीच्या सत्रासाठी आम्ही ते आठवणीने बांधून घेतले (आणि खायला आठवणीने विसरलो. म्हंणजे वट्टुने आतापर्यंत ते एकट्यानेच गट्ट्म केले असणार....)
चॉकलेट आइस्क्रिम कोई शक??
तर अशा प्रकारे पिझा खाल्यामुळे आम्हाला गोडाचे वेध लागले त्यामुळे मग नंतर लगेचच आम्ही आमचा मोर्चा "कोल्ड स्टोन"कडे वळवला..हे ठिकाण आमच्या लाइक मांइड्स मधलं आहे हे जाता जाता नोंदायला हरकत नाही.इथे तुम्हाला हवं ते आइस्क्रीम, त्यांतल्या अन्य पदार्थांसोबर थंड दगडावर मिक्स करून दिलं जातं..म्हणून कोल्ड स्टोन (अरेच्च्या हाही एका जळाऊ पोस्टचाच विषय आहे...)
तर त्यानंतर एक कॉफ़ी आणि एक चॉकोलेट फ़्लेव्हरच आइस्क्रिम हातात आल्याने चर्चा थोड्या मंदावल्या पण पटापट आइस्क्रिम संपवून चर्चासत्र आम्ही जारी ठेवले....
साधी राहणी आणि साधं खाणं
आता साधारण दहा वाजत आल्याने एका सभ्य मुलीला शांत कुटीरमध्ये न्यायची जबाबदारी कार्यवाहक या नात्याने सत्यवानाने (पुन्हा एकदा) आनंदाने पार पाडली.
आता मात्र चर्चेमध्ये आणखी एक प्रतिनिधी असावा असे आम्हांस वाटू लागले आणि तोच फ़ेबुचा फ़ोटो पाहून अचंबित झालेल्या खुद्द पोटोबा लेखिकेने दूरध्वनीवरून आपली हजेरी लावली..हा दूर ध्वनी इतका दूरवरून आला होता की त्यामुळे आमची पोटोबाची घरगुती सोय न केल्याने तिलाच आम्ही बोल  लावले....त्यातच माझ्यासाठी तर सत्यवानाला पोळी नाही तर निदान पापड तरी भाजून दे सदृश्य मागण्या मांडण्यात आल्या..अर्थात घेतलेल्या जबाबदार्‍या कशाप्रकारे झटकून टाकायच्या यावरती एक पी एच डी पूर्वीच झाल्याने मी निश्चिंत होते..शिवाय पहिल्या पुष्पाच्या दिवशीच शांत कुटीरचा एक मुआयना केल्यावर पोळीचं पीठ काय मीठही असेल की नाही अशा शंका आल्याने इथे काही आपल्या पाककुशलता सत्यवानाला दाखवून अवलक्षण करायची वेळ येणार नाही याची खात्री मा.म.ला होती...
त्यानंतर पुन्हा एकदा शेवटच्या दिवसाचे पुष्प कशा प्रकारचे गुंफ़ायचे याच्या काही माफ़क चर्चा करून आम्ही दुसरे पुष्प संपवले..खरं तर तोस्तर तांत्रिक दृष्ट्या तिसरा आणि शेवटचा दिवस सुरू झाला होता हे पुन्हा एकदा सु.वां...च्या.....
तिसरा दिवस घाईत जाणार असे सुरूवातीपासूनच वाटत होते कारण पाहुणे मंडळीने किंवा खरं तर मी शांत कुटीरेच्या माझ्या कक्षात कागदपत्र, वायरी इ.ची बरीच गर्दी केली होती..ती आवरणे हे जिकिरीचे काम होते..कारण शांत कुटीरवाले यात काहीच सहकार्य करणार नव्हते..सहकार्य कस्लं खरं तर सकाळी भरपूर मस्का लावून पाव जातीने भाजून देऊन वर खाताना आणखी मस्का मारून मला आग्रहाने खायला लावले...लवकरच ही मस्कापट्टी मी कॉफ़ीची जबाबदारी घ्यावी म्हणून होती हे लक्षात आले.....अर्थात त्यामुळे शाही कॉफ़ी बनवायची संधी मला मिळाली...
बटर लावता लावता

या प्रसंगामुळे मला अर्थातच माझ्या घरी जसं एक काम तू, एक काम मी हे नेहमी सुरू असतं त्याची कमी भासली नाही... आणि हे सत्र अगदी जरा पेन दे नंतर आता मी पेन दिलं होतं तर पुस्तक तू घेऊन ये अशी सारखीच कामाची समप्रमाणात वाटणी करून वट्टूने आपली लाइक माइंड्सची पेटंट्स पक्की करायचं कामही हा मेळाव्यात हिरीरिने केलं...
हीच ती शाही कॉफ़ी
इथे एक महत्वाचा मुद्दा लिहायचा राहूनच गेलाय की मी पहिल्या पुष्पाच्या दिवशी पोहोचले तेव्हा शांत कुटीरमध्ये माझा स्वच्छ कक्ष पाहून मला मी नक्की अपेक्षा केली होती त्या घरात आले होते का या शंकेचं तिसर्‍या पुष्पात ज्या काही घरगुती गप्पा झाल्या त्यात झालं...ते म्हणजे निदान दोन दिवसांची का होईना पण नोटीस देऊन आल्यामुळे सत्यवानाने आपलं साफ़ सफ़ाई कौशल्य पणाला लावून मेळाव्याच्या स्वागत समितीचं काम एकहाती संपवलं होतं...मला पोळी करायची संधी मिळू नये याची सोयही तेव्हाच केली असावी असा त्यावेळी मला दाट संशय आला..
सगळ्यात जास्त रंगलं ते तिसरं सत्र..कारण इतक्या वेळ विस्मरणात गेलेले (अर्थात आम्हा दोघांचेच) ब्लॉग हा विषय यात होता...(विस्मरण या शब्दावर श्लेष आहे हे चा वांच्या.....) .चित्रपट हा सर्वच ब्लॉगर्सचा लाडका विषय त्यामुळे त्यावर एक साधक चर्चा सुरू झाली. पण चित्रपट कलावंत, त्यांची नावे आणि कहाण्या लक्षात ठेवायचं माझं कौशल्य पाहता (आणि या विषयावरच्या रसिक वाचक/ब्लॉगर्सची अनुपस्थिती लक्षात घेता) ही चर्चा बाधक होईल का अशी शंका येऊन त्याऐवजी चित्रपटापट सत्यवानाचं पुनरूज्जिवन करून आठवड्याला अनेक चित्रपट पाहून झाल्यावर निदान एका तरी चित्रपटावर पोस्ट लिहायची असा एक ठराव सर्वानुमते (म्हणजे मत मांडणं आणि ठराव पास करणं दोन्ही करणारी व्यक्ती मीच होते म्हणा) हां तर ठराव सर्वानुमते संमत झाला..
गाणी आणि आठवणीं या विषयावर एक छोटी चर्चा शेवटी मला गावंसं वाटावं लागण्यावर आली आणि मेळावा आटोपणार याचे बिगुल वाजायला लागले...(गाणं ऐकताना पेंगलेल्या सत्यवानाचे डोळे याची साक्ष देतच होते म्हणा)
अखेर बाहेर जेवायच्या बोलीवर शांत कुटीरेचा मी निरोप घेतला...खरं तर मेळाव्याच्या निमित्ताने त्या कुटीरेमध्ये केलेला कलकलाट, खादाडी, गप्पा, .. सोडून पाय निघत नव्हता..पण विमानतळाने आल्यावेळसारखेच सहकार्य केले तर कायमचाच मेळावा होण्याची सत्यवानाला काळजी लागली त्यामुळे वेळेच्या बाबतीत आम्ही कुठलंच कॉम्प्रोमाइज किंवा साध्या भाषेत आय एस टी केलं नाही..त्यामुळे सुसंगत चर्चा, खादाडी, फ़िरणे इ.. होऊ शकले हे सु.वां..च्या.....
परत निघाल्यावर ट्रेनने नवीन जर्सिमधून नवीन यॉर्कात जाणे या विषयावर खरं तर एक वेगळी कंपोस्ट होऊ शकते...(सत्यवान इथल्या इथे तुला निदान चारेक पोस्टींची संधी म्या उदार मनाने देत आहे...वाचतोय्स का??) या प्रवासात मला मी मुंबईच्या मेळाव्याला गेले होते तेव्हा असलेल्या मेगाब्लॉकची आठवण झाली एकंदरीत मेगाब्लॉक आणि मेळावा यांचं नातं जूनं दिसतंय तर..... शेवटी एकदाचे वेळेच्या थोडं फ़ार आधी पोहोचल्यावर मुंबईत रविवारी होणारा मेगाब्लॉक नव्या यॉर्कात शनिवारी दुपारी रंगीत तालीम म्हणून करतात की काय विचार असा एक टिपिकल मुंबैकरीण म्हणून माझ्या मनात डोकावून गेला.
एअरपोर्टची छोटी खादाडी
तर आमची वरात सुस्थितीत विमानतळावर पोहोचल्यावर एक शेवटचा खादाडी प्रयत्न झाला....आणि मग मात्र सेक्युरिटी चेक इनकडे पावलं वळवावीच लागली...
ब्लॉगिंगमुळे जर चार चांगल्या लोकांशी संबंध आले तर दोन जणांच्या मेळाव्यानेही बरंच काही (म्हंजे काय ते आता विचारू नका. पोस्ट प्लान्ड परिच्छेदांच्या कधीच पुढे गेली आहे...) साध्य होतं हे या तीन पुष्पांच्या निमित्ताने लक्षात आलं आहे..फ़क्त घरच्या सर्व मंडळींना पुन्हा लवकर वेठीस धरता येणार नाही याची कल्पना असल्याने पुढचा मेळावा ओरेगावात घ्यायचे योजिले आहे...तरी इच्छुकांनी विमानांची डिल्स पाहायला सुरूवात करावी..तारीख काय कधीही फ़ायनल करता येईल...
जाता जाता माझिया मनात एक जूनीच कविता नव्याने आल्याशिवाय राहवत नाही...
दोन ओंडक्यांची (आपलं ब्लॉगर्सची) होते नव्या जर्सीत भेट
एक डायरेक्ट फ़्लाईट दूर सारे
पुन्हा ओरेगावी (होईल तेव्हा) भेट.....
तळटीप...फ़क्त महत्वाचे काही फ़ोटो तातडीने वरच्या पोस्टमध्ये टाकण्यात आले आहेत...आणखी फ़ोटो सवडीने पिकासावर टाकण्यात येतीलच. इच्छुकांनी करभरणी (वाचा: आपली मौल्यवान प्रतिक्रिया/सूचना इ..) देऊन नावनोंदणी करावी......:) आणि हो ही सक्तीची करभरणी का लागू झाली यासंबंधी काही शंका असल्यास जरा एकदा गुगलबाबांच्या वर्तुळात चक्कर मारून यावे...कसे...:)

18 comments:

 1. सही.. अखेर भेट झालीच.. हेरंब हे असे १-१ मेळावे करण्यात तरबेज झालाय.. आधी मी, मग श्री, मग अनघा आणि आता तू... ;) माझ्या माहितीत तरी इतकेच.. :) बाकी अजून असतील तर न्यायाधीश सांगतीलच.. :D

  जरा आधी मला कळवले असतेस तर ह्याच विकांताला फोन केला असता म्हणजे एका फोनात २ दगड.. आपले.... एका दगडात २ पक्षी :D पकडता आले असते.. :)
  तूला घ्यायला विमानतळावर आला... बघ मला रिस्क घेत पहाटे १ वाजता ह्याच्या घरी पोचावे लागले होते... ;)

  बर मी आलो होतो तेंव्हा अनूजा आणि वर आई देखील असल्याने असल्याने मला जेवणाची कसलीच चिंता करावी लागली नाही. पण हे फामिलीया मस्त दिसतंय.. :) भूक लागली आता पोस्ट संपवतो आणि काहीतरी खायलाच जातो कसा... :D

  ReplyDelete
 2. मला अक्च्युअली काय लिहु आणि काय नको असं झालंय प्रतिक्रियेत.. (जनरली असं पोस्ट टाकताना होतं लोकांचं)

  पण एकूणच गप्पा, बडबड, गाणी, वादविवाद, खादाडी, मस्करी, भटकंती, न्यूयॉर्क, न्यूजर्सी, टाईम्स स्क्वेअर, पिझ्झा, कोल्ड स्टोन आईस क्रीम, मॅगी, कॉफी, गार्लिक नॉट्स, ब्रेड बटर, खेचाखेची, बकबक, फोन्स, ड्रायव्हिंग, मेगाब्लॉक (फेबुचे नव्हे.. ट्रेन्सचे ;) ), ब्लॉग्ज, हसणं, खिदळणं, भावूक होणं, घाईगर्दी, थट्टा, धावपळ, पुन्हा भेटण्याची आश्वासनं इ इ इ इ सगळ्यापेक्षाही मला जे काही मिळालं असेल आणि आवडलं असेल ते म्हणजे या भेटीतून मिळालेला आनंद, समाधान, दृढ झालेली मैत्री. And that was the BEST part of it !!!

  फार सिरीयस वाटतेय कमेंट माहित्ये पण मस्त इनोदी पोस्टला मुद्दाम जरा कॉन्ट्रास्ट म्हणून सिरीयस कमेंट देऊन बघावी असा विचार केला आणि चक्क जमली की ;)

  ReplyDelete
 3. या पोस्ट मध्ये एक महत्वाची गोष्ट राहिली आहे. किंवा 'माझिया मना' तल्या वालीने शिताफीने ज्याचा उल्लेख टाळलाय ती गोष्ट म्हणजे ही.

  http://goo.gl/4tC3S

  ReplyDelete
 4. खरे तर ही तिहेरी ओंडक्यांची भेट व्हायची होती. पण... असू दे. आता पुढला मेळावा लवकरच सरप्राईज किंव ओरेगावात करुयात. प्रत्यक्ष नाही पण निदान फोनवरुन तरी हजेरी लावल्याने खूपच मजा आली. बाकी, अपर्णा तुझा ड्रायव्हिंगचा धाडसी प्लॅन चांगला निभावलास गं! सहीच! हेरंबचे घरही दोन दिवस जरा हसले-खिदळले. :) तुमची खादाडी मस्त!

  ReplyDelete
 5. मस्त ग अपर्णा ... आणि हेरंब लवकरच मिनी मेळाव्यांचा विक्रम करणार आहे बहुतेक!

  ReplyDelete
 6. Very good post. Wachtana Maja ali. So tumhala bhetun tyachya kititari pat dhamal ali asnar. Gr8 one again.

  AJ

  ReplyDelete
 7. रोहन मला वाटतं हेरंबचं सगळ्यांबरोबर काही तरी असा योगायोग आहे की सगळे जिकडे कुठे जातात व्हाया जर्सीच जावं लागतं नाहीतर ही भेट तर माझ्यासाठीपण सरप्राइज होतं....अरे खूप अचानक ठरलं..त्यालाच घर साफ़ करायला दोन दिवस मिळाले...:)
  तुझा फ़ोन आला असता अचानक तर आणखी मजा आली असती...पण तसंही तुम्ही दोघं भेटला आहात नं....त्यामुळे हा वेळ मी थोडा माझ्याकडेच ठेवला त्यात कामाची घाई होतीच....:)
  आपण तिघं एकदा फ़मिलियाला जाऊ याच...मस्तच आहे त्यांच्या पिझावरचं चीज.....:)

  ReplyDelete
 8. सत्यवाना, माझ्या पोस्टला सिरियस कमेंट देता देता ते माझ्या शाही कॉफ़ीला चक्क कॉफ़ी म्हटलंयस तू...आणि काम करवून घेतलीस ती आलेल्या पाहुणीकडून....हे हे...
  पण खरंच मस्त होती ही ट्रिप.....सध्या माझं स्वतःचं जे काही धावपळ धावपळ सुरू आहे नं त्यात मला मिळालेला हा बेस्ट स्प्रिंग ब्रेक होता असं म्हणेन.....

  आणि तुझ्या दुसर्‍या कमेटंबद्दल, लिंक काय टाकतो....वाच आणि पोस्ट....माझ्याच्याने आता मोठी पुस्तकं तसंही वाचवत नाहीत रे...:)

  ReplyDelete
 9. आमची ओंडकी नं. तीन आम्हाला दगा देऊन गेली त्याला काय करणार पण "तुम होती तो हम कितना टेस्टी खाना खा सकते थे" या एकाच मुद्द्यावर आमचं शंभरवेळा एकमत झालंय आणि नाइलाजाने आम्ही पाव आणि कॉफ़ीवर भागवलं...अर्थात पिझा होताच म्हणा..पण पोटोबाची सोय पुढच्या वेळेस तुलाच करावी लागेल...हा मेळावा मिस करायची शिक्षा म्हणून....:)

  ReplyDelete
 10. अगदी गौरी....हेरंब म्हणजे मिनी मेळावा स्पेशालिस्ट म्हणूया...आणि हा मेळावा ज्या लीलया संभाळलं नं त्याने ते तर म्हणजे शिक्कामोर्तबच आहे गं...
  तुला आणि जनरली खास आवर्जुन लिहिण्यार्‍यांना uncut unseen फ़ोटो पाठवले आहेत...बघ वेळ मिळाला की....:)

  ReplyDelete
 11. अपूर्व खरंच जबरी धमाल आली.....आणि हे सगळं टोटली अनप्लान्ड कारण प्रचंड धावता दौरा होता..तू तो नकाशा (साभार हेओ) पाहिलास तर कळेलच तुला...:)

  ReplyDelete
 12. कसली गुंड लोकं आहेत एक एक. फ्लाईट, कार, ट्रेन, खादडी, ख्याख्या, खीखी... (फक्त) दोघांनी इतका दंगा केला. म्हणूनच मी तुम्हाला कुठे नेत नाही. तुमचे वय काय? तुम्ही करताय काय? तुमच्या पिल्लानीं दंगा केला तर 'शांत व्हा' हे कुठल्या तोंडाने सांगाल? सुधर जाओ ओय्.

  ता.क. हेरंब ओक यांच्या सदनिकेला "ब्लॉगर दूतावास" म्हणून घोषित करण्यात यावे असा प्रस्ताव गजालवाडीतून मांडण्यात येत आहे.

  ReplyDelete
 13. हाहाहा... तुला ती 'स्ट्रेस बस्टर क्लब' वाली पोस्ट आठवते का? त्या क्लबाची पहिली मिटींग होती ही असं समज ;)

  रच्याक, "ब्लॉगर दूतावास" !!!!!!!! अशक्य लोळतोय !!! हे फक्त सिद्ध्यालाच सुचू शकतं !!

  ReplyDelete
 14. सिद्धार्थ, अशक्य लोळतेय मी.....:D :D शांत कुटीर काढून वरती "ब्लॉगर दूतावास" हे नाव फ़ायनल करायला काहीच हरकत नाय....:)
  आणि हो हेरंब स्ट्रेस बस्टर क्लबचा अध्यक्ष म्हणून तुझी नेमणूक झाल्याचंही फ़ायनलच....आपल्याला अनुमोदकांची पण आवश्यकता नाही..तू आणखी १-१ मेळावे घेशील तेव्हा अनुमोदनाचं काम होणार आहेच...:)

  अरे माझा एक मित्र मला मुलं व्हायच्या आधी आता वर सिद्धार्थ म्हणाला तसंच म्हणाला होता की बहुतेक तुझी मुलं तुलाच शांत बस म्हणून सांगणार आहेत....आणि आज हे सिद्धुच्या कमेंट वाचली तेव्हा इत्कं पटकन आठवलं न.......तुम्ही लोकांनी आम्हाला कुठे नेलं नाय (वाचा:तुमच्या खादाडी आणि अन्य ट्रिपांना) म्हणून आम्ही दोघांचीच ट्रिप केली....:)

  ReplyDelete
 15. बापरे! काय काय हा उच्छाद नुसता...
  हेरंबाचा तो मॅगीचा टोप घेतलेला फोटु झ्याक आलाय..
  बाकी मी डायट्वर असल्याने नो कमेंट्स ऑन फूड....
  "ब्लॉगर दूतावास" +++++++++++++
  द ग्रेट सिद्धू ....

  ReplyDelete
 16. दिपक, तुला फ़क्त हेरंबचा फ़ोटू दिसला मी समजू शकते तू डाएटवर आहेस... ख्या ख्या ख्या.... तुझ्यासाठी आम्ही डाएट मॅगीवडे बनवू असा एक ठराव मांडून पाहाते.....:)
  तुला करपरतावा पाठवलाय त्यामुळे डाएट कर वा नको करूस तुझ्या समोर खादाडी,दंगा सगळं सगळं येणारे.....:)

  ReplyDelete
 17. :-) .. 'ब्लॉगर दूतावासा'ला पुढल्यावेळी नक्की भेट देण्यात येईल.. अन ओरेगाव तर तसं जवळ पडेल.. वाट पाहत राहणे.. (प्लीज) :D

  ReplyDelete
 18. आनंदv आभार्स...मागच्या वेळी वाट पाहून शेवटी कोंबडी बझवर टाकली होती...तूर्तास तू त्या अनकट अनसीन कर परताव्याचा "आनंद" घे...मग नक्कीच ब्लॉगर दूतावासाला भेट देशील रे.....आणि हो ओरेगाव जवळच आहे.....केव्हाही ये....स्वागतच आहे....(अवांतर..काय ट्रीपचं सुरू आहे की काय??)

  ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.