आज एक बातमी वाचली, नऊ वर्षांपूर्वी एका दहा वर्षांच्या मुलाने अमेरिकतेल्या एका समुद्रकिनाऱ्यावरून एका बाटलीत, एक छोटासा संदेश आणि पत्ता लिहून ती बाटली समुद्रात फेकली. नऊ वर्षांनंतर ती फ्रान्सच्या एका किनाऱ्यावर एका माणसाला मिळाली आणि त्याने पत्रद्वारा संपर्क साधला. आता त्या मुलाचे वय एकोणीस वर्षे आहे. हे पत्र मिळाल्यावर तो मुलगा मानाने पुन्हा दहा वर्षांचा झाला. ते पत्रही तसं भाबडंच होतं.
माझीही मुलं आता नऊ आणि अकरा वर्षांची आहेत. त्यांच्याशी बोलताना काही वेळा त्यांच्या अपेक्षा किती छोट्या आहेत किंवा एखाद्या प्रसंगात ते कसा वेगळा विचार करतात हे समजतं आणि नकळत हळवं व्हायला होतं.
परवा आरुषला त्याच्या सेकंड डिग्री ब्लॅक बेल्टच्या प्रॅक्टिससाठी सोडताना विचारलं, " आता ही शेवटची प्रॅक्टिस. उद्या टेस्ट, मग तायक्वांडो संपलं. तुला काय हवं?" तो निरागसपणे म्हणाला, " आई, उद्या मला स्नॅकसाठी चिप्स देशील?" मी त्याच्यासाठी एखादी सरप्राईज पार्टी करू किंवा त्याला निदान बाहेर जेवायला नेऊ, असा विचार करत होते आणि हा मुलगा माझ्याकडे फक्त चिप्स मागत होता.
आजकाल काहीवेळा रुषांक आपल्या दादाच्या "दादा"गिरीला कंटाळून असेल एक लहान भावंडं असलं तर बरं असं म्हणतो. त्याच्या बोलण्यात त्याला "भाऊ" हवाय असं दिसतंय. एकदा आम्ही दोघेच असताना मी हा विषय त्याच्याकडे काढला. तो म्हणाला, "आपल्याला अजून बेबी मिळू शकतात का?" मी हो म्हटलं, पण त्याला सांगितलं की तुला भाऊच मिळेल असं काही नाही. दोन मुलगे घरात आहेत म्हणजे खरं तर मुलगीच होईल किंवा आवडेल.
तो थोडा विचारात पडला आणि म्हणाला, " मग आपल्याला आर्या आणि झिनी (या आमच्या एका मित्राच्या जुळ्या मुली) चे कपडे, खेळणी वगैरे घ्यावे लागतील." त्याला आजवर त्याच्या दादाचे, क्वचित इतर ओळखीच्या मोठ्या मुलांचे कपडे मिळतात. (नवेही मिळतात) त्यामुळे आता ही नवी मुलगी वाढवतानाच सोपं उत्तर त्याच्याकडे तयार आहे. मला त्याच्या या चिमुकल्या दृष्टीचं फार कौतुक वाटतं.
मला वाटतं, आपण मुलांच्या मोठेपणाची तजवीज, त्यासाठीची तयारी वगैरे करणं बरोबर आहे. पण काही वेळा फक्त छोट्या छोट्या अपेक्षा पूर्ण कराव्यात. त्यांच्याबरोबरच्या अशा संवादातली मजा काही और आहे.
#AparnA #FollowMe
No comments:
Post a Comment
मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.